खोटं कsssधी बोलू नये!

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
1 Mar 2021 - 11:51 am

आयुष्यात प्रत्येकजण खोटं बोलतोच. कधी न कधी. खूप वेळा. काहीजण तर नेहमीच खोटं बोलतात.

मीही अनेकदा खोटं बोलले. लहानपणी तर बरेचदा. "अमुक अमुक कुणी केलं? तू केलंस का?" ह्या आई-वडिलांच्या, मोठ्या भावाच्या प्रश्नाला मी नेहमी,"मी नाही बाई, कुणास ठाऊक, मला काय माहीत?"अशी खोटी उत्तरे दिली आहेत.

"दुधावरची साय कुणी खाल्ली?"-"मी नाही खाल्ली.
"इथलं नेलकटर कुठाय?"-"मला काय माहीत?"
"ह्या डब्यातला सुई दोरा कुठं गेला?"-"मी नाही घेतला. शप्पत. मला माहीत नाही."

खोटं बोलणारेच जास्त शपथा घेतात. तशीच मीही वारंवार शपथ घ्यायची.

लहानपण सरलं. तारुण्य आलं, तशी खोटं बोलण्याची कारणं बदलली.

"किती मार्कस् पडले?"-"चांगले"
"म्हणजे किती?"-"शंभरपैकी त्रेसष्ठ."(त्यावेळी हे मार्कस् चांगले समजले जात.)

"पेपर दाखव."-"मैत्रीणीनं नेलाय".

"तो मुलगा कोण होता?"-"नोटस् द्यायला आला होता. हुशार आहे. त्यांच्यामुळे माझा पण अभ्यास सुधारेल ना?"

"मैत्रीणीकडून का नाही घेतल्यास नोटस्?"-"सगळ्या खडूस आहेत. देत नाहीत." इ.इ.

वय वाढत गेलं तसं खोटं बोलण्याची प्रमाण कमी कमी होत गेलं. नोकरी लागल्यावर बाॅस विचारायचा."काम झालं का?"कामाला हातही न लावता मी उत्तर द्यायची,"होत आलंय सर. थोडंसं राहिलंय. उद्या नक्की देते."

मग लग्न झाल्यावर खोटं बोलण्याची पद्धत बदलली. अंगात ताप असला तरी,कंबर, डोकं दुखणं असलं तरी, मुलाला नवऱ्याला काळजी वाटू नये, त्यांनी घाबरून जाऊ नये म्हणून "मी मजेत आहे. मला काहीही झालेलं नाही." असं मी बेलाशक खोटं बोलायची. मोलकरणीच्या दारुड्या नवऱ्याला मुद्दामच तिचा पगार कमी सांगून वरचे पैसे तिच्या नावाने बॅंकेत खातं उघडून त्यात गुपचूप टाकायची. बाबांनी मुलांना रागावू नये म्हणून मुलाच्या चुका दडवायची. असं खोटं बोलण्याचं स्वरुप बदललं.

आता रिटायरमेंट नंतर खोटं बोलण्याची सवय पार गेली.
आता खोटं बोलायची गरजच भासत नाही. कसं मुक्त, मोकळं वाटतं.

माझं एक खोटं बोलणं मात्र माझ्या कायमचं लक्षात राहिलं आहे. माझ्या लहानपणी आमच्या घरात एक गाय होती. तिला चारा टाकायचं आणि बादलीतून पाणी प्यायला द्यायचं काम माझ्याकडे होतं. मी ते रोज नित्यनेमाने करायची. उन्हाळ्याचे दिवस होते. एके दिवशी काय झालं,आमची रात्रीची जेवणं झाली. मी आणि ताईनं मागचं सगळं आवरलं. आम्ही गाद्या घातल्या आणि पहुडलो. अचानक माझ्या लक्षात आलं की आज गायीपुढं पाण्याची बादली ठेवायची राहिली. मग मनात विचार आला की राहू दे. एक दिवस राहिलं म्हणून काही बिघडत नाही. आता गादीतून उठून तिच्यापुढे पाणी ठेवायचा कंटाळा आलाय. मी डोळे मिटून घेतले.

वडिलांनी विचारलं,"गायीपुढं पाणी ठेवलंस का?"
"होsss! मगाशीच." मी सरळ थाप ठोकली.

आम्ही झोपलो.

वडील नेहमी आमच्या आधी लवकर उठायचे. त्यांनी उठवल्यानंतर गोठ्याकडे फेरी मारली. गायीसमोर पाण्याची बादली नव्हती. गाय जीभ बाहेर काढून हंबरत उभी होती. त्यांनी गायीसमोर पाणी ठेवलं. आत आले आणि मला हाक मारली. मी त्यांच्यासमोर उभी राहिले.
ते माझ्या अंगावर ओरडले, "गायीसमोर पाणी ठेवलंय असं रात्री खोटं का सांगितलंस? मुकं जनावर ते! त्याला बोलता येत नाही. रात्रभर तहानलेली राहिली ती. मी पाणी ठेवल्यावर ती हपापून पाणी प्यायली. पाणी संपल्यानंतर रिकामी बादली चाटत राहिली. मग आणखी थोडं पाणी घातलं मी. उन्हाळ्याचे दिवस आहेत. जास्त तहान लागते. देऊ का एक ठेवून?”

मी घाबरले. मला वाटलं वडील आता मला मारणार! पण त्यांनी मला मारलं नाही. त्यांनी उभ्या आयुष्यात आम्हां मुलांना कधीच मारलं नाही. त्या दिवशीही फक्त एवढंच म्हणाले," पुन्हा असं होता कामा नये."

मी खालमानेनं होकार दिला. धावत गायीकडे गेले. मला खूप पश्चात्ताप झाला होता. अपराध्यागत वाटत होतं. ऐन उन्हाळ्यात एका मुक्या जनावराला मी रात्रभर तहानलेलं ठेवलं होतं. "मला माफ कर" मी तिच्यापुढे हात जोडले. माझे डोळे पाणावले. पण माझी चूक गायीनं कधीच माफ केली होती. माझ्याकडं पाहून त्या निष्पाप जीवानं शेपूट उंचावली. मी खाजवावं म्हणून मान वाकडी करत आपला गळा माझ्यापुढं केला. मी प्रेमानं तिचा गळा, गाल, कपाळ आणि तिची पोळी खाजवत राहिले.

जीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

1 Mar 2021 - 12:14 pm | कानडाऊ योगेशु

गायीचा अनुभव ह्रद्य आहे.

तुषार काळभोर's picture

2 Mar 2021 - 4:16 pm | तुषार काळभोर

गायीचे डोळे नेहमीच प्रचंड कणव असलेले, दयार्द्र वगैरे वाटतात.

मुक्त विहारि's picture

2 Mar 2021 - 7:24 pm | मुक्त विहारि

कुठलाही प्राणी उत्तमच असतो...

योगी९००'s picture

1 Mar 2021 - 12:46 pm | योगी९००

छान लिहीले आहे. गायीचा अनुभव चांगला लिहीला आहे.

मुक्त विहारि's picture

1 Mar 2021 - 10:04 pm | मुक्त विहारि

अंगावर शहारे आले

स्वधर्म's picture

2 Mar 2021 - 2:07 pm | स्वधर्म

आणखी लिहा.

मस्त आठवण... वाचुन छान वाटले..

मदनबाण's picture

2 Mar 2021 - 4:14 pm | मदनबाण

आजी, अनुभव आवडला !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

प्रकाश घाटपांडे's picture

2 Mar 2021 - 7:16 pm | प्रकाश घाटपांडे

लहानपणी आमच्या शेतातल्या गाय आणि वासरांकडून मी माझे डोके अनेकदा चाटून घेतले आहे. काय मस्त स्पर्श असतो. एक मायेचा ओलावा असतो. त्या बदल्यात त्याची पोळी खाजवायची. कस्ला इफेक्ट येतो त्यांना आणी आपल्यालाही

कानडाऊ योगेशु-मी लिहिलेला अनुभव तुम्हाला हृद्य वाटला! धन्यवाद.

तुषार काळभोर-तुमचं म्हणणं पटलं.गायीच्या डोळ्यांत अपार करुणा आणि दया असते.

मुक्तविहारी-हो.. सगळेच प्राणी निष्पाप असतात.

योगी९००- लिखाण आवडलं हे वाचून समाधान वाटले.

मुक्तविहारी-माझ्याही अंगावर लिहिताना शहारे आले.

स्वधर्म-आणखी लिहा" हे तुमचं प्रोत्साहन मला आणखी बळ देऊन गेलं.

गणेशा , मदनबाण- थॅंक्यू, धन्यवाद..

प्रकाश घाटपांडे-गायीकडून डोकं चाटून घ्यायचा अनुभव भन्नाट असेल. पण आपले केस गळत असतील तर गायीला बिचारीला त्रास.

सर्वांना धन्यवाद.

कंजूस's picture

6 Mar 2021 - 9:37 am | कंजूस

आळस हा खोटे बोलायला लावतो.

सिरुसेरि's picture

6 Mar 2021 - 12:50 pm | सिरुसेरि

गायीचा अनुभव हळहळ लावुन जातो .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Mar 2021 - 2:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान लेखन आवडलं. गाईबद्दलची आठवण खासच. आजी, या खोटं बोलण्यावर आपण मिपाकर किती खोटं बोलता यावर मी दोन धागे काढले होते. एक प्रश्नावली आणि मग निष्कर्ष त्याची आठवण झाली. १) आपण खोटे बोलता का ?तुम्ही खोटंच बोलता : एक निष्कर्ष

-दिलीप बिरुटे

कंजूस, सिरुसेरि, धन्यवाद.

प्रा. डॉ. बिरुटे, दोन्ही धागे वाचणार आहे. गाईबद्दलची आठवण अनेकांच्या मनाला भिडली असं जाणवलं. सर्वांना धन्यवाद.