"पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?"...
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आम्हा मुलांचे दहावीचे वर्ष असते .... आम्हा सगळ्यांना प्रिलिम चे आणि नंतर च्या SSC परीक्षेचे वेध लागलेले असतात ... शाळेय जीवन अगदी काही आठवड्यांचे राहिले असते... अभ्यास करूच , पण उरलेल्या दिवसात खूप मजा करून घेऊ अशी भावना असते सगळ्यांची ....
पण शालेय जीवन निरागस असते अशी एक फसणूक करणारी समजूत आहे ...
वर्गात एक मुलगा असतो ....
गोरा ...
घाऱ्या डोळ्यांचा ...
काटकुळा ...
संवादिनी वर काळी दोन च्या स्वरात पण नाकात बोलणारा ...
त्याची ती "पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?"
अशी खर्जातील पण सानुनासिक हाक मला चांगलीच आठवते ...
त्याच्या आजी बरोबर तो एका वाड्यात राही ... आई, वडील कोणीच नसलेला तो ...
दरवर्षी "पुढे ढकलला" या प्रगती पुस्तकावरील शेऱ्यावर दहावी पर्यंत आलेला तो ...
वर्गातील टगी पोरं जी असतात त्यांचे तो गिर्हाईक ...
त्याला सर्व प्रकारे त्रास देणं म्हणजे बाकीच्यांचा असुरी आनंद असतो..
त्याचा डबा लपव, आणि डब्याची सुट्टी संपत आली की मग त्याला तो डबा दे, त्याचे दफ्तर पळव .. तो रडला की मग त्याला परत दे ...
अहो एखाद्यास त्रास द्यायचा ठरवला तर काय अनेक प्रकार शोधता येतात नाही का ?...
हे सर्व चूक आहे हे मनात कळणारा एक समूह वर्गात असतोच (आणि मीही त्याचा एक भाग असतो) पण त्या टग्या पोरांना कोण आवरणार आणि सांगणार ? त्या टग्यांच्या नादी कोण लागणार ...
त्यापेक्षा त्यांच्या मध्ये सामील होणं सोपे नाही का ?
एक दिवस डब्याच्या सुटीमध्ये त्या बिचार्या मुलाची तळी भरायची असे आम्हा सगळ्यांचे ठरते...
तो बिचारा डबा खाऊन वर्गात येत असतो ..
तेवढ्यात कोणीतरी मागून त्याचे डोळे हाताने बंद करतात ...
कोणी त्याचे हात धरून ठेवतात ...
आणि मग त्याच्या वर टपलांचा वर्षाव सुरु होतो... तो बिचारा ओरडायचा यत्न करतो ...मग टपला मारणाऱ्यांतील एक जण त्याचे तोंड दाबतो ... काही उत्साही मुलांचे नुसत्या टपलानी समाधान होत नाही ... मग बुक्क्या सुरु होतात
काहींचे त्या बुक्क्यांनी पण समाधान होत नाही ... मग एक लाथ त्याच्या पेकाटात बसते ... उजव्या छातीच्या खाली ... अगदी यकृतावर ... तो अर्धमेला होतो ..
कळवळतो ...
मग सगळे बाजूला होतात ...
काही वेळानी तो बिचारा उठतो ...
डोळे रडून लालेलाल झालेले असतात ...
सात्विक संतापाने थरथर कापत तो बोलतो ... " अरे का मला त्रास देता ? मी काय वाईट केलय तुमचे .... ~~~ सोडणार नाही तुम्हाला कोणाला ... भिकारचोटानो ... पुढचे शब्द आम्हास काळतच नाहीत ..
शाळा संपते आणि आम्ही काहीसे खजील होईन घरी परततो ...
पुढे नंतर तो शाळेत येतच नाही ... SSC ला शेवटल्या पेपरला तो आम्हास दिसतो तो शेवटचाच .... (म्हणजे तो जिवंत असताना शेवटचा ..... )
. .
. . . .
***********************************************************************
.शाळा संपून ६-७ वर्षे झालीत ... नुकतेच सगळे नोकरी धंद्यास लागतोय ... कोणी इंजिनिअर तर कोणी काय तर कोणी काय ...
पण तरीही आम्ही शाळेतील मित्र ६ एक महिन्यातून एकदा भेटतो ... पण दरवेळी भेटणाऱ्यांची संख्या कमी कमी होत आहे ....
. . .
. .
.
अंह अंह ... आम्हास नोकरी धंद्यातून वेळ मिळत नाहीये म्हणून नाही ...
.....तर आमच्यातील एक एक जण गचकतोय म्हणून ...
२ वर्षांपूवी पहिली बातमी आली ती खन्नाची ... खन्ना म्हणजे आमच्या वर्गातील भाई पोरगा ... दारू चिकार प्यायचा ... यकृत निकामी होऊन गेला .. शेवटी भ्रम झाला बिचार्यास ... कानात सारखे बोळे घालत असे ... सांगे, कस कसचे आवाज येतात म्हणे ...
मग ढोले गेला ....
मग गोडबोले ...
मग मुन्ना शेख ...
सगळॆ एक एक करून जातायत ... मरताना भ्रमिष्ट होऊन जातात .. कानात बोळे घालायला मागतात ... खूप आवाज येतात म्हणे त्यांना ....
असो..
हल्ली मला नाईट शिफ्ट असतात ... सारखे क्लायंट कॉल्स .. आजूबाजूला कलिग्स असतात ते बरंय ...
सांगायचा मुद्दा असा की ........
. .
प्रथम तो आवाज मला वॉशरूम मध्ये आला .... "पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?"
आवाज जुना असला तरी ओळखीचाच ... त्याचाच ... मी हादरलो ...
मग तो पुन्हा दिसला एकदा ... सोसायटीच्या पार्किंग मध्ये .... तसेच ते लाले लाल डोळे ... आणि ...
पुन्हा तोच प्रश्न
"पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?"
आता दोन आठवडे झालाय ....
"पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?" या वाक्याने कान किटलेत ...
आणि किती मोठ्या आवाजातील वाक्य ते ... संवादिनी वर काळी दोन च्या स्वरात पण नाकात बोललेल ... पण भसाड्या आवाजातील ... त्याचे दिसणे तर आता नित्याचेच झालय ..
पण त्याचे डोळे प्रत्येक वेळी जास्त लाल आणि मोठे का होतात ?
माझं ENT , मानसोपचार तज्ज्ञ हे सगळं सगळं या आठवड्यात झालंय सर्व रिपोर्ट नॉर्मल ... कंपनीतून मी १ महिन्याची रजा टाकलीय ..
पण काही फरक नाही तो खर्जातील आवाज आता नाही सहन होत . कानात बोळे तरी किती कोंबणार ?
आणि त्यात भर म्हणून काल पासून उजव्या छातीच्या खाली ... यकृतावर मधूनच कळ येतीये ... कोणीतरी पेकाटात लाथ घालावी ना अगदी तशीच .......
आणि प्रत्येक कळी नंतर तोच भसाड्या आवाजातील प्रश्न ....
"पोंक्शा ~~~~ येतोस का डबा खायला ?"...
(कौस्तुभ पोंक्षे यांच्या डायरीतून...)
प्रतिक्रिया
जबरदस्त
भयानक आहे रे सगळं पोंक्षा!
बापरे!
फार वाईट.
भारी लिहिलीयं ! आवडली !
परिणामकारक लिहिलय.
एकदम मस्त कथानक
हे अनुभवलंय!
त्रास देणारे काय करतात? माहिती नाही.....
भारी कथा!
भारी लिहिलंय
उत्तम
सुंदर कथा
पालकनीति
अत्यंत छान कथा आहे. अत्यंत
कथा आवडली.
जबरदस्त लेखन. सुरुवातीला
अप्रतिम
सुंदर कथा
खरंच भयानक
bullying
माझ्या वर्गात एक मुलगा होता.
डरना
सुदंरच
भारी लिहिली आहे कथा, आवडली.
मस्त
सुंदर कथा!
जबरी कथा !
@ kvponkshe,
भारी कथा!
_/\_