Skip to main content

लोकसंख्या वाढीचा बागुलबुवा

लेखक साहना यांनी रविवार, 07/02/2021 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
खालील ध्याग्यावर दिलेली प्रतिक्रिया थोडी खूपच लांब झाली म्हणून इथे वेगळा लेख म्हणून पाडत आहे. https://misalpav.com/node/48280 पाश्चात्य देशांत २-३ दशकांनी एक नवीन पोपट निर्माण होतो. मग हा विषय घेऊन तेथीतील हस्तदंती मनोऱ्यातील लोक येथेच्छ प्रोपागंडा करून लोकांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल करतात. महायुद्धानंतर निर्माण झाला तो बागुलबुवा लोकसंख्या वाढीचा आणि हा बागुलबुवा बऱ्याच काळ चालला. भारतासारख्ग रीब देश ह्या विदेशी प्रोपागंडाला जास्त डोके न चालविता बळी पडतात. (सध्या बागुलबुवा वातावरण बदलाचा आहे आणि तो सुद्धा तितकाच दांभिक पणाचा आहे). लोकसंख्या वाढीचे परिणाम समजण्यासाठी भौतिक शास्त्र किंवा जीवशास्त्र पूर्णपणे निरर्थक आहे. त्यासाठी अर्थशास्त्र समाजणे जरुरीचे आहे. ह्या संदर्भांत अमेरिकेतील १९८० मधील सायमन-एहरलीच हि पैज वाचणे मनोरंजक ठरेल. तर अर्थतज्द्न्य जुलिअन सायमन आणि जीवशास्त्री पॉल एहरलीच ह्यांच्यात एक मोठी जाहीर पैज लागली. १९६८ साली पॉल ह्यांनी पॉप्युलेशन एक्सप्लोजन नावाचे एक भयंकर प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यांच्या मते लोकसंख्या वाढ तात्काळ थाम्बवली नाही तर जगांत प्रचंड अन्न कमतरता होऊन कोट्यवधी लोक मरणार होते. ह्या पुस्तकाने खळबळ माचवली आणि ह्यांच्या नादाला लागून गोऱ्या लोकांनी मुले निर्माण करणे कमी केले (ज्याची फळे ते आज भोगत आहेत). भारत, चीन आणि अनेक देशांनी जास्त विचार न करता विविध योजना राबवून लोकसंख्या वाढ म्हणजे जणू काही भस्मासुर आहे असा प्रोपागंडा निर्माण केला. ज्युलियन सायमन ह्यांनी त्यांची हि भविष्यवाणी साफ खोटी ठरणार आहे असे जाहीर रित्या प्रकाशित केले आणि १० हजार डॉलर्स ची जाहीर पैज लावली. पैजेच्या नुसार ज्युलियन ह्यांचे म्हणणे होते कि बहुतेक संसाधनाचा तुटवडा तर असणार नाहीच पण वर तीच संसाधने स्वस्त सुद्धा असणार आहे. १९९० साली जुलिअन सायमन हे पैज सहज, म्हणजे अगदी मोठ्या फरकाने जिंकले. त्या दहा वर्षांत जगाची लोकसंख्या सुमारे ८०० दशलक्ष वाढली पण जे ५ धातू त्यांनी निवडले होते त्यांची किंमत बऱ्यापैकी कमी झाली होती. लोकसंख्या वाढीचे काहीच वाईट परिणाम आहेत असे नाही. लोकसंख्या वाढीचे अनेक वाईट परिणाम आहेत. पण जगांत नक्की किती लोक असायला पाहिजेत हे सुद्धा कोणीही निर्धारित करू शकत नाही. बहुतेकांना लोकसंख्यावाढीचे वाईट परिणाम दिसतात पण त्याचे असंख्य चांगले फायदे दिसत नाहीत. लोकसंख्या कमी झाली तर हे अनेक फायदे गायब होतीलच पण त्या फायद्यांना आम्ही मुकलो आहोत हे सुद्धा समजणार नाही. सोपे उदाहरण घेऊया. पोलिओ ची लस हि आमच्या साठी वरदान ठरली आहे ह्यांत काहीच दुमत नाही. अक्षरशः कोट्यवधी मुलांचा जीव ह्या लसीने वाचवला आहे. पण फक्त लसच नाही तर अनेक औषधे निर्माण झाली आहेत त्यामुळे आम्हा सर्वांचेच जीवन जास्त सुखकर झाले आहे. तर हि औषधे कशी निर्माण होता ? अक्षरशः हजारो लोकांचे परिश्रम ह्यांत गुंतले असतात. जगाच्या पाठीवर जितके जास्त डॉक्टर, संशोधक आहेत तितकी जास्त औषधांचा शोध लागतो. आज देशाची लोकसंख्या ७ अब्ज ऐवजी ४ अब्ज असती तर मार्केट मधील अनेक औषधें गायब झाली असती. पण मी फक्त औषधांचे उदाहरण दिले आहे. सॉफ्टवेर पासून, टीव्ही वरील विविध चॅनेल पर्यंत अनेक गोष्टी गायब झाल्या असत्या आणि आम्हा सर्वांचा जीवनमानाचा स्तर खूपच खाली गेला असता. तुमहाला आवडत असलेली कुठलीही गोष्ट घ्या. समजा तुम्हाला तुमचा फोन आवडतो. ह्या फोनच्या निर्मितीसाठी हजारो पेटंटन्स लागली आहेत आणि अक्षरशः लक्षावधी विविध छोटे छोटे शोध अनेक लोकांनी निर्माण केले आहेत. आणि ह्यांत जो एकूण मानवी वेळ गेला आहे त्याची जर बेरीज केली तर कदाचित कोट्यवधी मनुष्य-तास त्या फोन चा शोध लावण्यासाठी खर्च झाले आहेत. समजा देशाची लोकसंख्या अर्धी असती तर तितके मनुष्यतास खर्च होण्यासाठी दुप्पट वेळ लागला असता आणि फोन आपल्या हाती येण्यासाठी २०२० ऐवजी कदाचित २०४० वर्ष लागले असते. अर्थानं त्याच तर्काने आम्ही असे म्हणू शकतो कि जगाची लोकसंख्या फक्त ७ अब्ज असल्याने आज आमच्या हातात अश्या अनेक गोष्टी नाहीत ज्या कदाचित २०५० मध्ये आमच्या हाती असतील. आज जगाची लोकसंख्या १४ अब्ज असती तर कदाचित आणखीन अजब साधने आणि तंत्रज्ञान आमच्या हाती असते. > अहो पण लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास पर्यावरणाचे काय ? हा मुद्दा अनेक लोक वर काढतात आणि काही प्रमाणात तो रास्त सुद्धा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसे जीवनमान उंचावते आणि लोक जास्त काळ जगू लागतात त्याच वेळी लोकांना मुलें नकोशी होतात. आमच्या आजोबांच्या काळी खाण्यापिण्याचे वांधे होते त्यामुळे लोक दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि रात्रभर प्रजनन करायचे. महिलांची अवस्था फक्त चूल आणि मूल अशी होती. पण त्यांची चूक नव्हती. रात्री आणखी करणार काय ? मग ४०-५० वर्षांत हृदयविकाराचा झटका वगैरे येऊन मृत्यू. आता जीवनमानाचा स्तर उंचावलाय. गर्भनिरोधक आल्याने शरीरसुख घेता येते आणि प्रजनन रोखता येते. रोमान्स ची व्याख्या रुंदावलीय. आता जोडपी चित्रपट पाहतात, दिनार करतात, कुठे फिरायला वगैरे जातात. पुस्तके वाचतात आणि नेटफ्लिकस पाहतात. त्याशिवाय प्रत्येक वेळी फिरायला वगैरे जाताना लक्षांत येते कि जास्त मुले म्हणजे खूपच जास्त खर्च त्यामुले फार तर एक दोन मुले खूप होतात. ह्यामुळे आपसूकच जन्मदर खालावत जातो. ह्या दृष्टिकोनातून कर्वे हे खूपच दूरदर्शी आणि विद्वान होते. मुले जास्त जन्माला घालण्याचे एक कारण म्हणजे मुले मारण्याचे प्रमाण सुद्धा खूप होते. आता ते कमी झाल्याने वंशाला एक दिवा असला तरी पुरतो मोठी माळ लावायची गरज नाही. परंपरागत घरे आता बंद पडत आहेत. बापाने बांधलेल्या घरांत मुलें राहू इच्छित नाहीत म्हणून "वंशाचा दिवा" हि सुद्धा जास्त डिमांड नसलेली गोष्ट झालीय. मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च आणि लोकसंख्या वाढीचा दर हि दोन महत्वाची व्हेरिएबल्स अर्थतज्ञ पाहतात आणि दोन्ही मध्ये खूपच जास्त संबंध आहे. आणि ह्या संबंधाने मानवी लोकसंख्या चादर पाहून हात पसरेल ह्यांत मला तरी अजिबात शंका वाटत नाही. मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च : मार्जिनल खर्च ह्याचा अर्थ प्रत्येक ऍडिशनल मुलाच्या संगोपनासाठी खर्च किती येतो. एका मुलाचा खर्च प्रचंड असतो. कारण मूल नाही तर माता काम करू शकते. एक मूल झाले आणि तिने नोकरी सोडली तर ते पैसे येणे बंद होतात आणि त्यामुळे तो मुलाच्या संगोपनाचा खर्च ठरतो. पण एकदा नोकरी सोडल्यानंतर तिला २ मुले झाली तर त्या दुसऱ्या मुलाचा मार्जिनल खर्च खूपच कमी असतो. (एका मुलासाठी ३ लक्ष वर्षाला खर्च येतो तर दोन मुलांसाठी ३.५ लक्ष खर्च येतो इत्यादी). जुन्या खाली हा मार्जिनल खर्च खूपच कमी असायचा कारण बहुतेक खर्च हा फक्त अन्नाचा असायचा. आता तुम्ही दुबईला किंवा किमान खंडाळ्याला जाता तर सुद्धा तिकिटाचा खर्च प्रत्येक मुलांमागे होतो तो फार असतो. ४ मुले झाली तर मग तुम्हाला ५ सीटर गाडी सुद्धा चालत नाही. जसे जसे जीवन मान उंचावते तसे तसे मार्जिनल खर्च हा खूपच वेगाने वाढतो. मुलाला विदेशांत शिकायला पाठवायचे तर ५० लक्ष रुपये पाहिजेत. दोन मुले झाली तर मग १ कोटी. पण गरीबाच्या घरांत हे प्रश्न नसतात. पण खर्च वाढतो म्हणजे नक्की काय होते ? माणसाला जगांत फक्त दोनच खर्च असतात. एक खर्च असतो ऊर्जेचा दुसरा खर्च असतो दुसऱ्या माणसाच्या वेळेचा. (आयफोन पासून कांदे बटाटे पर्यंत तुम्ही काहीही विकत घेतले तर तुम्ही फक्त ऊर्जा आणि दुसऱ्या लोकांचा वेळ ह्या दोनच गोष्टींचा मोबदला देत असता. समजा ह्या दोन गोष्टी अपरंपार आणि फुकट असत्या तर आयफोन आणि कांदे बटाटे ह्यांची किंमत सुद्धा शून्य असती.). खर्च वाढतो ह्याचा अर्थ तुम्ही जास्त ऊर्जा आणि मानवी वेळ खर्च करत आहात असा होतो. आपण पर्यावरणाच्या नावाने बोंब मारतो तेंव्हा पर्यावरणाला होणारी हानी हि १००% ऊर्जा ह्या एका संसाधना द्वारे तुंबलेली जाऊ शकते. पण ऊर्जा महाग असल्याने आम्ही ती हानी अन-डू करू शकत नाही. जर पर्यावरणाची हानी वाढत गेली तर ऊर्जेचा दर सुद्धा वाढत जातो आणि आणि त्यामुळे मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च. त्यामुळे हि दोन्ही व्हेरिएबल्स एकमेकांना बॅलेन्स करतात. पण ऊर्जा हि काळाचा ओघांत स्वस्त होत गेली तर लोकसंख्या सुद्धा वाढत जाते आणि पर्यावरणाला हानी सुद्धा होत नाही. ह्या दोन्ही व्हेरिएबल्स मधील गणिती संबंध तसा स्पष्ट पणे अभ्यासाने कठीण आहे कारण लोकसंख्या वाढली कि हे लोक नवीन शोध लावून ऊर्जेचा दर आणखीन कमी करतात. टीप : युनायटेड नेशन्स किंवा विविध तद्न्य मंडळी जगाची लोकसंख्या सुमारे २०५० मध्ये स्टेबल होईल असे भाकीत करत आहेत. मला त्यांत शंका वाटते. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मते ऊर्जेचा खर्च येत्या २० वर्षांत १०० पटीने कमी होणार आहे. बहुतेक ऊर्जा फ्युजन सेल द्वारे किंवा इतर कुठल्या नवीन शोधांतून निर्माण होईल आणि त्यानंतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमालीचा पडणार आहे. ऊर्जा स्वस्त आणि मुबलक होताच, शेती, पिण्याचे पाणी वगैरे गोष्टींचा काहीही तुटवडा असणार नाही त्याशिवाय कार्बन एमिसशन वगैरे उलट करणे सहज शक्य होणार आहे. कदाचित IVF वगैरे प्रक्रिया खूपच सोप्या होऊन गरोदर न राहता सुद्धा मुले निर्माण करणे शक्य होईल आणि त्यामुळे कुठल्याही वयांत मुले निर्माण करणे शक्य होईल आणि कदाचित मंडळी जास्त मुले निर्माण करतील. अर्थांत मी हे भाकीत एखाद्या ज्योतिष्या प्रमाणे वर्तवत आहे. टीप २ : जगांतील सर्व नैसर्गिक संसाधने हि अक्षय म्हणजे अनलिमिटेड आहेत. एकच असे संसाधन आहे जे अक्षय नाही आणि ते म्हणजे मानवी वेळ. हि संकल्पना बहुतेक इकॉनॉमिक्स च्या पुस्तकांत मंडळी गेलेली असते पण राजकीय कारणासाठी पाश्चात्य राष्ट्रांनी "लिमिटेड रिसोर्सिस" आणि "अनलिमिटेड रिसोर्सेस" किंवा "रिन्यूएबल ऊर्जा" आणि "नॉन रिन्यूएबल ऊर्जा" असल्या श्रेणी शाळांतून आम्हा मुलांच्या डोक्यांत घातल्या. हि विचारसरणी डाव्या लोकांची असून पाश्चात्य देशांतून आपल्या देशांत आली आहेत आणि त्यांत काहीही तथ्य नाही. हि गोष्ट बहुतेक लोकांना पचणार नाही किंवा पटणार नाही कारण ह्या प्रकारच्या प्रोपागंडावर आमच्या देशांत कुणीही प्रश्न विचारला नाही. कुणाला इंटरेस्ट असेल तर वेगळ्या लेखांत विस्ताराने लिहीन. प्रतिक्रिया किंवा खरडवहीवर लिहून कळवा.

वाचने 48906
प्रतिक्रिया 178

प्रतिक्रिया

In reply to by चौकटराजा

> रीही ते सक्तीचे असणारा कायदा भारत देशात आहे ! जगात आहे ! तो कशासाठी ? तर त्याने एकतर काही सामाजिक प्रश्न निर्माण होत असावेत असा समज कायदे करणाऱ्याचा आहे म्हणून ! चुकीचा कायदा आहे. सीट बेल्ट कायद्याप्रमाणेच.

सुबत्ता व लोकसंख्या नियंत्रण यांचा एक संबंध मला असा दिसतो की सुबत्ता आली की हाव वाढते हाव वाढली की अधिक मुले झाली तर आपली हाव पुरी होणार कशी या काळजीने कमी मुलांना जन्म दिला जातो ! दुसरे कारण मला असे सापडते की आपले शिक्षण ,आपल्याला जाणवणारी स्पर्धा या पेक्षा आपले मुलाला अधिक कठीण परिस्थितीत आयुष्य घडव्हावे लागेल अशी काळजी म्हणून कमी मुले . वेगळी मीमांसा कुणाकडे असेल तर तिचे स्वागत आहे .जगात कुणाला काय वाटून लोकसंख्या का कमी झाली यापेक्षा ती कोणकोणत्या कारणाने वाढते व कोणत्या कारणाने कमी होते हे नीट पाहावे लागेल . माझ्या निरीक्षणात लोकसंख्या वाढीत खालील घटक महत्वाची भर घालतात. १) जगभर मुलगीच सासरी जात असल्याने मुलगाच आपल्याला म्हातारपणी आधार होईल अशी अटकळ ! ( १९९१ नंतर ही अटकळ फोल होताना दिसत आहे !) त्यामुळे मलगी झाली तर हरकत नाही पण एकतरी मुलगाच हवा ही भावना . २) आपल्या दोघ नोकरी करत असल्याने आपले एक मूल एकलकोंडे होऊ नये व नाती हळू हळू पातळ होत असल्याने एकाला दुसरे जिव्हाळ्याचे जवळचे कुणीतरी असावे ही भावना . ३) एक मूळ मतिमंद ,अपंग असेल तर त्याची काळजी आपल्यानंतर कोण घेणार सबब दुसर्या मुलाचा जन्म . ४) आपल्या भावाला बहिणीला मूल नाही त्यांची संपत्ती जवळचे नातेवाईक म्हणून आपल्याच मुलांना मिळेल या आशेने आपण एखादे मूल जास्त जन्माला घातले तर काय बिघडले ही भावना . ५) आपला मोठा बिझिनेस आहे त्याला पुढे विकासात घरचेच विश्वासाचे मनुष्यबळ हवे सबब थोडी जास्त मुले असायला काही हरकत नाही ! असा हिशेब ! ६) अधिक मुले घरात नांदणे ही मानसिक गरज असणे ! ७) बाळ मृत्यू कमी व वैद्यकीय प्रगतीमुळे दिर्घआयुष्य यामुळे एकाच वेळी मुले व आईवडील जगात अस्तित्वात असण्याचा काळ जास्त . माणसाचे जसे जीवन असते की त्याच्या वाढीला , रोगातून बरे होण्याला एक थ्रेशोल्ड असतो त्यात्यानंतर कितीही उपाय केले तरी देह वाढत नाही वा रोगमुक्त होत नाही प्रमाणे समाजजीवनाचे असते . अन्न निर्मिती ,वैज्ञानिक क्रान्तिकारक शोध लागण्याची शक्यता ई त्याला अपवाद नाहीत. समजा भारताला जमीन कमी पडू लागली तर अमेरिका व्हायोमिंग सारखे एखादे राज्य भारताला फुकट देऊन टाकेल अशी शक्यता किती ? तर फक्त युद्ध झाले तर ! असे त्याला उत्तर मिळेल . एक दिवस असा नक्कीच येईल की भारतातील , चीनमधील लोकांना भारतात परत पाठवावे असा अमेरिकेत फतवा निघेल . अमेरिकेची ती थ्रेशोल्ड लिमिट अजूनही आलेली नाही. ती आली की लोकसंख्या वाढीचे फायद्याचे समर्थ करणाऱ्या सर्व थिअरीज कोलमडून पडतील. माणसाच्या संशोधक मेंदूची माणसाला आजही गरज आहे ती कायम राहील उपयोजित क्षेत्र व श्रम क्षेत्र यातील गरज मात्र कमी होणार हे सांगायला कुणा तज्ञ माणसाची गरज नाही .

उत्तम विषय आणि बहुतांशी उत्तम चर्चा. चंद्रसूर्यकुमार यांचा प्रश्नही रोचक आणि नेमका. एकूण पाहता व्यक्तिगत पातळीवर न जाता चर्चा झाल्यास अधिक रोचक होईल. विषय विचार करण्यासारखा आहे.

गेल्या काही वर्षांपासून तथाकथित उच्च जातींमधील लग्नाळू मुली वधुवरसुचक मंडळात थेट 'नॉन आयटी क्षमस्व,नॉन MBBS क्षमस्व' किंवा विशिष्ट शहरातच राहणारा,स्ववास्तूत राहणारा,किमान इतका पगार असणारा' असे लिहून येत आहेत. सर्वच मुलींच्या अपेक्षा अतोनात वाढल्या आहेत.(यावर सर्वाधिक प्रतिसादांचा धागाही येऊन गेला आहे) तर यामुळे कायमच्या बिनलग्नाच्या राहणार्‍या किंवा चाळीशीत विवाह होणार्‍या पुरुषांमुळे लोकसंख्या वाढीला थोडा आळा बसेल का? कारण जे या उच्च जातींमधे आज होतंय तोच ट्रेंड नंतर अन्य सर्व जातींमधे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by उपयोजक

अपेक्षा पूर्ण करणारी मुल पण कमी असतात. म्हणजे सुख वस्तू असणारे. स्वतःची मोठी जागा असणारे. उत्तम नोकरी व्यवसाय असणारे. मुल ही कमीच असतात सर्वच मुलींना असा जोडीदार मिळणे शक्य नसते अस्तित्वात च नाही तर मिळणार कोठून त्या मुळे अनेक मुली सुद्धा वयाच्या 40 शी पर्यंत शोध च घेत अविवाहित असतात. त्याचा लोकसंख्या वर नक्की परिणाम होणार. मुलीची कमी होत जाणारी संख्या हे पण विवाह साठी मुलगी न मिळण्याचे कारण आहे . ज्या गोष्टी ची उपलब्धता कमी त्याची किंमत जास्त. त्याचा संबंध लोकसंख्या जास्त असणे उद्योग वाढ होण्यास आवश्यक आहे ह्याच्या शी पण आहे. जेवढी लोकसंख्या जास्त तेवढे स्वस्तात कामगार उपलब्ध होतात. सर्वच क्षेत्रात निपुण असणाऱ्या लोकांची संख्या जास्त असली की उद्योगांना मनुष्य बळ स्वस्तात मिळते कारण ते विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. मोजकेच डॉक्टर,किंवा बाकी स्किल ,unskil लोक उपलब्ध असतील तर त्यांची कमतरता जाणवते आणि त्यांना जास्त पगार सुद्धा द्यावा लागतो .

लोकसंख्या किती असावी हे जसे महत्वाचे आहे त्या पेक्षा जास्त जी लोक आहेत त्यांचा दर्जा काय आहे हे अती महत्वाचे आहे. 1) ते तंदुरुस्त आणि निरोगी आहेत का 2) त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे का. 3)ते खेळात किंवा बाकी ॲक्टिविटी निपुण आहेत का 4) ते व्यसनी आणि चरसी तर नाहीत ना. म्हणजे लोकांचा दर्जा हा उच्च असावा . त्या साठी उत्तम सरकारी यंत्रणा असणे गरजेचे आहे उत्तम स्थिती निर्माण करण्यासाठी उत्तम प्रशासन हे हवेच.. फक्त जास्त लोकसंख्या आहे आणि त्या मध्ये जास्त व्यसनी आहेत ,अशक्त रोगीट आहेत . शिक्षित आहेत पण सुशिक्षित नाहीत क्रिमिनल आहेत. अडाणी आहेत . तर अशा ह्या फक्त आकडे वाढवणाऱ्या लोकसंख्या असलेल्या जनतेचा देशाच्या प्रगतीत काय हातभार असणार.

जे आयडी लोकसंख्या वाढ कशी चांगली ह्याचे जोरदार समर्थन करत आहेत त्यांना स्वतःला 8 ते 10 मुल आहेत का? आहे असा कोणी इथे. 8 ते 10 जावू ध्या 3 मुल असणारा तरी कोणी आहे का नवतरुण इथे.

In reply to by Rajesh188

बोलती बंद प्रतिसाद.... सहमत आहे

In reply to by मुक्त विहारि

लेखाचा रोख आठ दहा किंवा तीन मुले जन्मास घालून लोकसंख्या वाढवावी असा प्रचार करण्याकडे नसावा असे वाटले. लोकसंख्यावाढ हाच विनाश असा बागुलबुवा उभा करुन कृत्रिमरित्या ती कमी करण्याचे कायदे करणे आवश्यक नाही असा रोख दिसतोय. एकंदरीत cause effect यांची दिशा समजण्यात गल्लत होतेय अशी काहीशी वेगळी बाजू मांडण्याचा हा प्रयत्न वाटतो आणि त्यात तथ्य असावे. लोकसंख्या वाढीचे सर्व फायदेच आहेत असे नाही हेही नोंदवलेलं दिसतं. पण जे तोटे म्हणून दाखवले जातात त्यातील कार्यकारणभाव चुकीचा आहे असं मला समजलेलं मूळ धागाकर्त्याचं म्हणणं. चुभूद्याघ्या.

In reply to by गवि

बरोबर आहे. किमान १-२ लोकांना मुद्दा समजला आहे हे पाहून माझे लेखन अगदीच वेंधळटपणाचे नाही असे वाटते. अर्थांत मुद्दा मी जास्त अधोरेखित करायला पाहिजे होता. लोकसंख्या शेवटी स्वतःला रेग्युलेट करते आणि हे स्व-नियंत्रण सरकारी नियंत्रणापेक्षा जास्त चांगले आहे. हा सारांश होता.

In reply to by साहना

सर्वात प्रथम, उत्तम लेख आणि तितकीच उत्तम चर्चा घडवुन आणल्या बद्दल लेखीकेचे आभार. मुळात लोकसंख्या वाढ चांगली की वाईट, हा मुद्दा अगदी फार पुर्वी पासुनच चर्चीला जात आहे. अगदी थॉमस मालथसच्या काळापासुन. "स्व-नियंत्रण सरकारी नियंत्रणापेक्षा जास्त चांगले आहे" हे विधान सकृत दर्शनी पटण्या सारखेच आहे. पण, त्या विधानचे संदर्भही तितकेच महत्वाचे असतात. जेंव्हा समाज स्व-नियंत्रण करण्यासाठी लागणारा वेळ खुप असतो आणि वेळ दडवण्याने दुष्परिणामाची तिव्रता अधिक असते, तेंव्हा जगभरात सगळीकडे सरकारे बाजारात असो अथवा लोकसंख्या नियंत्रण, त्यात हस्तक्षेप करीतच असतात. थोडक्यात जेंव्हा अकार्यक्षम बाजार किंवा समाज असतो, तेंव्हा सरकारी हस्तक्षेप जरुरी असतो. उ.दा. अनेक वेळा आलेल्या महामंदी, युरोपियन कर्ज संकट आताचे करोना संकट इ. लोकसंख्येच्या संदर्भात अनेक अतिशय गरीब एशियन, आफ्रिकन देश जिथे नियंत्रित लोकसंख्या अकार्यक्षम समाज लवकर करु शकत नाही.

In reply to by Rajesh188

कुणी तरी दूध पिण्याचे फायदे ह्यावर निबंध लिहिला तर "आपल्या घरी किती म्हशी आहेत" हा प्रश्न विचारणार आहात काय ? इथे पाहण्यासारखे काहीही नाही. पुढे चला.

In reply to by साहना

जर एखाद्याला, एखादा विचार पटत असेल, तर तो सूरूवात घरापासून करण्याचा प्रयत्न करतो ... मला रासायनिक शेतीचे वाईट परिणाम माहिती असल्याने, मी नैसर्गिक पद्धतीने शेती करणे उत्तम ... आधी केले मग सांगीतले, हेच तत्व इथे लागू पडते .. एक उदाहरण देतो ..... कुटुंब नियोजनाचे समर्थन करणारे, कर्वे आडनावाचे एक गृहस्थ होते ... त्यांनी स्वतः पासून सुरूवात केली...

In reply to by मुक्त विहारि

१. सर्वानी असे केले पाहिजे. २. सर्वाना असे करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. ह्या दोन वाक्यांत फरक आहे. १ मधील वाक्याला राजेश ह्याचा तर्क लागू पडतो. २ ह्याला पडत नाही. लोकांना हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करण्याचे स्वातंत्र्य असायला पाहिजे का ? ह्या प्रश्नाचे उत्तर मी हो म्हणून दिले तर मी स्वतःचा धंदा सोडून हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करायला सुरुवात करावी असा होत नाही. जे लोक इथे कुटुंब नियोजनाचे समर्थन करत आहेत त्यापैकी किती लोकांनी आपली नसबंदी केली आहे ?

In reply to by साहना

तुम्ही सल्लागार आहात....स्वतः करणार नाही... एक उदाहरण देतो, मध्यंतरी विडी कामगारांच्या हलाखी बद्दल एक लेख वाचनांत आला होता. लेखक स्वतः विडी कामगारांच्या बरोबर राहिले होते. त्यामुळे तो लेख जास्त भावला ... क्रियेविण वाचाळता, व्यर्थ आहे.

In reply to by मुक्त विहारि

काय संबंध? लोकांना खाजगी जागी सिगारेट पिण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे असे म्हणणारा स्वतः चेन स्मोकर असला पाहिजे का लोकांना दारू पाजाणार्याने स्वतः अट्टल असलेच पाहिजे का प्रपंचातील बरेच मौलिक सल्ले देणारे रामदास स्वामी स्वतः बाल ब्रह्मचारी होते. समलैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्याने स्वतः समलैंगिक असलेच पाहिजे का? लेखिका फक्त सरकारने हस्तक्षेप करू नये इतकेच म्हणतेय, सरकारने अनुदान द्यावे असे म्हणत नाहीये. ज्यांना मरायचे आहे त्यांनी हेल्मेट न घालता रस्त्यावर फिरावे.. ज्यांना आपल्या जीवाची भीती वाटते त्यांनी पिस्तुल घेऊन फिरावे.. पण पिस्तुल असेल आणि वापरण्याची अक्कल नसेल तर? भलत्याच ठिकाणी गोळी घालेल ना तो!! त्यामुळे ज्याच्याकडे अक्कल आहे त्यालाच ते स्वातंत्र्य असावे.. त्यामुळे एका मर्यादेत राहून, मे बी 2/3 कितीही मुले जन्माला घालण्याचे स्वातंत्र्य असावे. अर्थात उद्या याच न्यायाने मला 10 बायका करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिले असेही म्हणता येईल.. म्हणजे मग 10* 4 = 40. मग हे 40 लोक जर साम्यवादी निघाले, (सर्वासामान्यपणे जेव्हढी गरिबी जास्त तितका साम्यवादाकडे ओढा अधिक) तर लोकशाही देशात ते 40 साम्यवादि आपल्या एका भांडवळवादी मुलाची संपत्ती राष्ट्रीयीकृत करण्याची शक्यता वाढते.. तस्मात नियंत्रण असावे!!

In reply to by आनन्दा

1) खून करणे वाईट आहे असे सांगणारा स्वतः खुनी नसावा 2) भ्रष्टाचार कसा समाजाला पोखरतो आणि त्यासाठी कडक शिक्षा हवी असे विचार मांडणार व्यक्ती स्वतः भ्रष्ट नसावं 3) स्त्री चा सन्मान राखला पाहिजे असे सांगणारा व्यक्ती स्वतः स्त्री लंपट नसावा. 4) आपण जे सल्ले देतो त्याचा स्वतःला अनुभव असावा. एवढी माफक अपेक्षा का असू नये. 5) इंजिनियर लाच जा डॉक्टर च हो असे सांगणाऱ्या व्यक्ती ला त्या क्षेत्रातील पूर्ण अनुभव आणि माहिती असावी. हल्ली क्रिकेट ची bat पन हातात न घेतलेली व्यक्ती सचिन नी कसे खेळायला पाहिजे आणि त्यांनी अमक्या तमक्या चुका केल्या हे अधिकार वानी नी सांगतो ते नक्कीच योग्य नाही.

In reply to by Rajesh188

मुख्यमंत्रीसाहेब, तुम्हाला लेखकाचा मुद्दा काळात नाहीये असे दिसतेय.. लेखकाला लोकानी सदसद्विवेकबुद्धी वापरून निर्णय घ्यावा असे अपेक्षित आहे.. तुम्ही किती मुले जन्माला घालहे सरकारने सांगणे म्हणजे साम्यवाद आहे.. उद्या जर या उद्योगांनी लोकसंख्या कमी झाली तर सरकार प्रत्येकाला 5-5 मुले जन्माला घालायला लावणार का? त्यापेक्षा जे काही व्हायचे असेल ते नैसर्गिकरित्या व्हावे असे लेखिकेचे मत आहे, जे पटण्यासारखे आहेच, परंतु व्यापक जनहिताच्या दृष्टीने विचार करता, सरकारने पूर्ण स्वतंत्र ठेवू नये, कारण सर्वसामान्य जनता तारतम्य बाळगण्याची शक्यता नाही, आणि अश्या गोष्टीमुळे सामाजिक असमतोल वाढेल असे माझे मत आहे. तुम्हाला काय वाटते मुख्यमंत्रीसाहेब?

In reply to by आनन्दा

मला लेखिकेचा दृष्टिकोन पण पूर्ण समजला आहे आणि तुमचा पण दृष्टकिन समजला आहे. दोघे पण बरोबर आहात . फक्त लोकसंख्या चा समतोल साधला जावा एवढेच माझे सामान्य मत आहे. मग तो ऐच्छिक पद्धतीने साधला गेला तर उत्तम च नाही तर काही मर्यादे नंतर हस्तक्षेप करून समतोल साधने गरजेचे आहे एवढीच साधी इच्छा आहे.

In reply to by Rajesh188

लोकांना फक्त फटक्यांचीच भाषा समजते .... बाॅसने डोळे वटारले की, समस्त भारतीय जनता कामाला लागते .....

In reply to by Rajesh188

फक्त लोकसंख्या चा समतोल साधला जावा एवढेच माझे सामान्य मत आहे. मग तो ऐच्छिक पद्धतीने साधला गेला तर उत्तम च नाही तर काही मर्यादे नंतर हस्तक्षेप करून समतोल साधने गरजेचे आहे एवढीच साधी इच्छा आहे मी आज चक्क काही अंशी राजेश यांच्या विधानाशी सहमत आहे बळजबरी नसली तरी लक्ष ठेवावं लागतेच,देश पातळीवर आणि ते सुद्धा दोन्ही बाजूने म्हणजे अति लोकसंख्या किंवा पुरेशी लोकसंख्या नसणे या त्या दोन्ही बाजू २ उद्धरणे देतो ( लोकसंख्या कमी असल्यामुळे सरकारला लक्ष घालावे लागते ) १) सिंगापोर मध्ये ( विविध आर्थिक करणामुळॆ बहुतेक) लोक लग्न करीत नाहीत ( आणि म्हणजे बहुतेकदातयामुळे प्रजोत्पादन होत नाही कारण लग्नबाहेर प्रजोत्पादन त्यामानाने कमी आहे ) त्यामुळे तरुण तरुणींना "उत्तेजित " करण्यासाठी सरकार स्वतः म्याच मेकर म्हणून कि काय वीकएंड क्रूझ जमवून आणायची.. २) "लग्न किंवा लिव्ह इन काह्ही असो पण मुलं करा आणि देशाची लोकसंख्या वाढवा " सरकार प्रत्येक मुलांमागे अंदाजे अडीच लाख रुपये आईला भेट आणि इतर सवलती देत असे ( साधय माहित नाही ) AUSTRALIA तेवहा जर साहनजी किंवा कोणाचे असे म्हणणे असेल कि "लोकांना पाहिजे ते करू दे आपोआप सगळे सुरळीत होते " तर ते तेवढे काही पटत नाही बुवा .. असो

In reply to by शा वि कु

असे का वाटते? अशी कल्पना करा, आज तुम्हाला एकच मुल झाले, त्याला तुम्ही चांगल्या संधी दिल्यात आणि चांगला पैसा मिळवू लागले वगैरे.. चांगले घर, एखादा व्यवसाय वगैरे.. तुम्ही असे करता कारण तुम्हाला आर्थिक सुबत्ता म्हणजे काय ते माहीत आहे. तुमचे मूल देखील तेच करेल कारण त्याला सुबत्तेची किंमत माहीत आहे. पण तुमचा शेजारी, ज्याला याची किंमत माहीत नाही, तो ५ मुले जन्माला घालेल. ती ५ मुले दुर्दैवाने तुमच्या मुलासारखे सुखी जीवन जगु शकतील असे नाही.. कदाचित २ जगती, तीन नाही.. मग ते ३ आणखीन ५ मुले प्रत्येकी जन्माला घालतील.. म्हणजे तिसर्‍या पिढीत तुम्च्याकडे १, आणि शेजार्‍याकडे १५+२ = १७. आता तुम्चे १ जे असेल ते म्हणजे अंबानीची लाईफस्ताइल जगत असेल.. आणि ते १७ खुप स्ट्रगल करत असतील.. ते काय म्हणणार याला, तुझ्या बापाने दिलाय तुला धंदा काढून, तुझे कर्तृत्व काय? म्हणजे तू या धंद्याला लायक नाहीस. जिथे गरिबी असते तिथे साम्यवादाचा ओढा जास्त असतो. कारण आपल्याला मिळत नाही, आणि कोणाला मिळते, म्हणजे ते अपले शोषण करूनच मिळवले आहे असे माणूस सहज धरून जाऊ शकतो. अश्या परिस्थितीत जर साम्यवादी वाढले, किंवा कोणत्याही कारणाने पुरेश्या संधी उपलब्ध नसल्याने जर गुन्हेगारी वाढली, तर ज्यचाकडे आहे त्यालाच भीती असते. नंगे से खुदा भी डरता है.. त्यामुळे अश्या परिस्थितीत ज्याचाकडे आहे त्याचेच नुकसान होइल.. मग अश्या परिस्थितीत आपण पद त्याच्यासारखी ५ -५ जन्माला घालून समतोल साधावा का? तुम्हाला काय वाटते?

In reply to by उपयोजक

हेच एका वेगळ्या प्रकारे भांडवलशाहीला देखील लागु पडते. ईर्शा द मॅन आपल्या पेक्षा बेटर... त्यातनच आपल्या प्रगतीच्या आकांक्षेला बळ मिळते :ड

In reply to by मुक्त विहारि

जे काही मी वर लिहिले आहे त्यापेक्षा सोपे करून सांगण्याची माझी क्षमता नाही. त्यामुळं पटत नसल्यास क्षमा करावी. मिपाकर सुद्न्य आहेत आणि किमान इतर काही लोकांना तर्क समजेल अशी भाबडी अपेक्षा.

राजेश जी , इथल्या चर्चा.. फक्त काही नवीन विचार मिळतो का या साठी असतात त्यामुळे मी तरी तसा व्यक्तिगत प्रश्न विचारीत नाही. सर्वच डॉकटर दारू न पिणारे धूम्रपान न करणारे असत नाहीत तसे ते आहे ! लोकसंख्या मर्यादीत ठेवण्यासाठी कायदा करणे युक्त नाही पण त्यावर नियंत्रण व्हावे अशी समाजाची इच्छा असेल तर त्यासाठी काही नकारात्मक व काही प्रोत्साहनात्मक कायदे जरूर करता येतील. जसे तीन मुले असतील तर ग्रामपंचायतीला उभे राहाता येणार नाही ,संडास बांधला नसेल तर नगरसेवक होता येणार नाही असेच काही ! हेल्मेट नसेल तर विमा रक्कम मिळणार नाही असे ही काही ! अर्थात हे सर्व घटनेच्या मूळ चौकटीत बसत असेल तरच हे वेगळे सांगणे नको ! माझा एक शेजारी मला विचारता झाला तुम्ही संघात गेला होतात का ? किती वर्षे ? मी चार पाच वर्षे असे उत्तर दिले ! तो ऐकीव पणे संघाचा द्वेष वाला होता. जेव्हा मी समाजवादावर बोलायचो त्यावेळी त्याला मी संघात गेलो आहे का याची शंका यायची ! दुसरा एक फेसबुकवर होता तो पक्का संघवादी अर्थातच समाजवादाचा द्वेष्टया होता तो मला कम्युनिस्ट म्हणायचा . दोघानाही दोन्ही विचारधारांच्या मधली काही धारा असते याचे भानच नव्हते . तसे अर्थशास्त्राचेही असते . जगात या शास्त्राइतके वाद कोणत्याही शास्त्रात नाहीत . कारण हे एक मानशास्त्राचीच शाखा आहे हे आता मान्य होत आहे. त्यामुळे असे म्हणतात की नवश्रीमंत माणसाला नेहमी भांडवल वाद आवडतो . तो व्यावसायिकांना तर जास्तच आवडतो ! तो खेळाडूंना आवडतो ! कलावंतांना आवडतो कारण यात आपली किंमत ठरण्याची एक अनैसर्गिक अशी पद्धत असते ! उदा खेळाडूने लोकप्रियतेच्या जोरावर शाम्पूची जाहिरात तो ना वापरता देखील करून पैसे मिळविणे ! आपण सांगितल्या प्रमाणे ज्या वेळी आता जे नवश्रीमंत झाले आहेत त्याना येणाऱ्या कौशल्याचा पुरवठा करणारी माणसे बेसुमार होतील त्यावेळी हीच माणसे समाजवादाच्या गोष्टी करतील . एकेकाळी ठेवीच्या जाहिराती देणारे आता कर्जाच्या जाहिराती देत आहेत. आता पेपरात ठेवीची जाहिरात आली तर ती कुठल्यातरी किडुक पतसंस्थेची असते. एका गंमत इथे लिहितो ते माझेच वाक्य आहे .. खर्च करणे हा मूर्खपणा आहे तसे फार सेव्हिंग करणे हाही मूर्खपणाच ! पण हे दोन्ही मूर्ख लोकच इकोनिमी चालवीत असतात ! सगळेच पोहायला शिकले तर लाइफ जॅकेटचा धंदा बुडेल पण त्याची काळजी देवाला असते. सगळे पोहायला शिकतच नाहीत !

In reply to by चौकटराजा

मुले नकोतच हा माझा अट्टाहास नाही.... नियंत्रण असावेच... अति मुले जन्माला घातल्याचे दुष्परिणाम, जे डोळ्यासमोर आहेत ते लिहीतो ... 1. स्वतःची 15 एकर जमीन, साल 1900... आजच्या घडीला 7-12 वर, 60 जण असते ...सुदैवाने कुणीही शेतीवर अवलंबून नाही, पण असते तर, सगळ्यांना 10 गुंठेच जागा मिळाली असती. कुणाचेच भागले नसते. 2. मुलगा मॅट्रिकला असतांना वडील वारले, साल 1930, मुलगा हुषार, मेडीकलला प्रवेश मिळाला पण 7 लहान भावंडे, मेडीकल मध्ये वर्षे घालवण्या इतका वेळ न्हवता, प्राण्यांचे डाॅक्टर झाले... त्यांचे उमेदीचे आयुष्य, भावांना शिकवण्यात गेले... 3. साल 1910, उत्तम सरकारी नौकरी, पण कर्व्यांना काय समजते? ही विचारसरणी, 1940 साली निवृत्ती, पदरी 12 मुले, त्यापैकी 4 घरात, 8 बाहेर गावी, कुणीतरी मनी ऑर्डर पाठवणार तेंव्हा महिना निघणार ... अफाट मुले असल्याने, ही डोळ्यासमोरची उदाहरणे आहेत .... तरीही कुणाला वाटत असेल तर, भरपूर मुलांना जन्म द्या..

In reply to by मुक्त विहारि

> अफाट मुले असल्याने, ही डोळ्यासमोरची उदाहरणे आहेत माझ्या लेखांत मी कुठेही जास्त मुले निर्माण करा असे लिहिले नाही. प्रत्येक व्यक्तीने आपले हित आणि सुख समाधान पाहून आपल्याला पाहिजे तितकी मुले जन्माला घालावीत आणि इतरांनी आणि विशेषतः सरकारने त्यांत ढवळाढवळ करू नये असा लेखाचा रोख आहे. हे सांगण्यास मी कुठे कमी पडले कि वाचणारे उगाच आपले पूर्वग्रह माझ्या लेखावर थोपत आहेत हे मला समजत नाही. लोकांनी आपल्याला पाहिजे तितकी मुले निर्माण केली म्हणून लोकसंख्या विस्फोट वगैरे होऊन काहीतरी खूप वाईट घडेल हे भाकीत चुकीचे आहे इतकाच लेखाचा सारांश आहे. काही मंडळींनी १२ मुले जन्माला घातली आणि त्यामुळे कुठल्याही मुलांचे संगोपन ठीक होऊ शकले नाही हा तुमचा अनुभव १०० वर्षे मागे प्रत्येक घरांत दिसत होता. पण आणखी उपाय तरी काय होता ह्या मंडळींकडे ? दिवसा काबाडकष्ट आणि रात्री प्रजनन हेच चालू होते. गर्भनिरोधक उपलब्ध नव्हते आणि इंद्रियनिग्रह तर मोठ्या मोठ्यांना जमला नाही ह्या लोकांचे काय ? पण त्याच वेळी ह्यांनी प्रजनन केले म्हणून काही देशाचे वाट्टोळे झाले नाही. अफाट लोकसंख्या असून सुद्धा देश चांगला आहे आणि वेगाने प्रगती करत आहे. प्रचंड प्रमाणात मानव संसाधन आहे म्हणून देशाला काही किंमत आतंरराष्ट्रीय स्तरावर आहे. त्याकाळी काही कायदे केले नाहीत मग आज करायची काय गरज आहे ? आणि काहीही कायदे नसताना भारताचा प्रजनन दार आपसूकच कमी होत असताना आणखी कायदे करून काय फायदा ?

अशी समाजाची इच्छा असेल तर त्यासाठी काही नकारात्मक व काही प्रोत्साहनात्मक कायदे
>>> +१११ पटेश ! कायदा / सुविधा (मुद्द्यानुसार )

साल 1960 ते 1970 छानसे खेडेगाव, टुमदार घरे, भांडणे नाहीत, हवा शुद्ध, बियर बार एखाद दुसरा.रात्री 8 नंतर ध्वनी प्रदूषण शुन्य... साल 1970 ते 1980 वस्ती वाढली, रिक्षा सुरू, रात्री 10 नंतर ध्वनी प्रदूषण अतिशय कमी.भांडणे थोडी वाढली. 1980 ते 2020 वस्ती अफाट, धुळ अफाट, आवाज अफाट, भांडणे वाढली, बियर बार संस्कृति वाढली.. अफाट लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम असे दिसतात... अदृष्य परिणाम, दर माणशी, शेती उत्पन्न कमी झाले.माणसे शहरात यायला लागली.त्यामुळे भाऊबंदकी वाढली.शेते ओसाड पडायला लागली.गोठे ओसाड झाले...

In reply to by मुक्त विहारि

असे कसे?? लोकसंख्या वाढली म्हंजी मॅन हौर्स आणि क्रिएटिव्हिटी पण वाढली.. त्यामुळे आपोआप जागा, शेती, गाड्या, रेलवे, दवाखाने, बसेस, हवा, पाणी, झाडे, पैसा, रस्ते हे पण आपोआप वाढेल.. थोडी कळ काढा. तोवर एखादे पुस्तक वाचा.. किंवा चीन चा अभ्यास करा. नुकतेच लग्न झाले असल्यास अपत्य निर्मिती सुरूच ठेवा.. कोणतीही अडचण येणार नाही. जितकी जास्त मुले तितका प्रगत समाज.. सॅरकॅस्टिक प्रतिसादाबद्दल क्षमस्व पण अती सर्वत्र वर्जयेत या नियमाप्रमाणे एका ठराविक ब्रेकपॉईंट नंतर सर्व कोलॅप्स व्हयला सुरवात होईल. जास्त लोकसंख्या = प्रगती हे जर समीकरण असेल तर भारत आज जगावर राज्य करत असता पण परिस्थिती काय ते सर्व पाहतायेत. पृथ्वीचा समतोल, निसर्ग, इतर प्राणी, हे सर्व थोडा वेळ बाजूला ठेवू. फक्त मनुष्याचा विचार करू. मनुष्य हा इतर प्राण्याप्रमाणे नाहीये जे फक्त खाण्या पिण्याच्या शोधात जगतात आणि वेळ आल्यावर प्राणायसाठी पार्टनर शोधतात.. मानवी जिवन अश्या इतर प्राण्याप्रमाणे नसून त्यापेक्षा खूप वेगळे आहे ज्यामुळे फक्त अन्न आणि निवारा मिळाले कि झाले असं नाहीये. इतर असंख्य गरजा आहेत आणि त्या गरजा आयुष्याचा भाग आहेत. लोकसंख्या वाढली तर त्या सर्वांवर मर्यादा येतील आणि शेवटी मानवाचे आयुष्य इम्पॅक्ट होईल. वर मूवी म्हणल्याप्रमाणे दर सेकेंदाला एक लोकल सोडली तरीही ती इतकी फुल असेल कि त्यात चढणे मुश्किल होईल..! इतकी मुले होतील कि सर्वांना शिक्षण देणे अवघड होईल. इतकि वाहने होतील कि 10 पदरी रस्ते केले तरी लांबच लांब रंगा लागतील. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात ठेवणे हे मानवाच्या हिताचे आहे.

In reply to by बाप्पू

आपला प्रतिसाद उपरोधिक असला तरी मी उत्तर देते. > छानसे खेडेगाव, टुमदार घरे, भांडणे नाहीत, हवा शुद्ध, बियर बार एखाद दुसरा.रात्री 8 नंतर ध्वनी प्रदूषण शुन्य... निव्वळ गतवैभवाची खोटी कल्पना आहे. त्या खेडेगावात कचरा बाहेर जळत असतील. जमीनदार मंडळी गरिबांचे शोषण करत असतील बहुसंख्य जनता अडाणी आणि निरक्षर असेल. बाळ मृत्युदर आभाळाला टेकलेला असेल. आरोग्याच्या सध्या सुविधा सुद्धा नसतील. अनेक आईवडिलांनी स्वतःच्या हातावे आपल्या लहान मुलांना सरणावर चढवले असेल किंवा पुरले असेल. त्याशिवाय तुम्ही "लोकसंख्या वाईट" म्हणून म्हणता ती वाढवण्याचे काम सुद्धा बहुतेक ह्याच लोकांनी अविश्रांत मेहनत घेऊन केले असेल. वीज आहेच असे नाही पण असली तरी भारनियमन. तुम्ही प्रदूषण म्हणता पण बहुतेक महिला लाकूड नाहीतर शेणी जाळून त्या धुरांत स्वयंपाक बनवत होत्या. आणि सरासरी आयुर्मर्यादा ५० च्या आसपास होती. महिलांना साधी आरोग्याची साधने उपलब्ध नव्हती. (आज सुद्धा अशी खेडेगावे सर्वत्र आहेत पण बहुतेक भारतीय अश्या खेडेगावांत राहू इच्छित नाही ह्यावरून ह्या खेडेगावांत राहणी अत्यंत निकृष्ट आहे असे बहुतेक भारतीयांना वाटते. ) > वस्ती वाढली, रिक्षा सुरू, रात्री 10 नंतर ध्वनी प्रदूषण अतिशय कमी.भांडणे थोडी वाढली. त्याच वेळी दळणवळणाची साधने निर्माण झाली. शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसायांच्या संधी उपलब्ध झाल्या. महिलांची काम करण्याची प्रवृत्ती वाढली. टीव्ही आला, वीज थोडी चांगली आली. पारंपरिक गरीब लोकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. पिण्याचे पाणी थोडे स्वच्छ झाले. आयुष्यमर्यादा साधारण ५ वर्षांनी वाढली. शेती आणि मजुरी कमी झाल्याने पिळवणूक सुद्धा कमी झाली. > वस्ती अफाट, धुळ अफाट, आवाज अफाट, भांडणे वाढली, बियर बार संस्कृति वाढली.. हो पण लोकांना हेच आवडत आहे. म्हणून तर खेडेगावांतून लोक अफाट संख्येने शहरांची वाट धरत आहेत. धूळ किंवा आवाज ह्या वाईट गोष्टी आहेत ह्यात शंकाच नाही पण त्याच वेळी इतर अनेक चांगल्या गोष्टी शहरांत असतात त्यामुळे धूळ आणि आवाज सहन करून सुद्धा लोक मुंबईत किंवा पुण्यात राहणे पसंद करतात टिम्बक्तू बुद्रुक मध्ये नाही. तुम्हाला धूळ दिसते आणि आवाज दिसतो, चांगल्या शिक्षणाच्या सुविदा, चांगल्या पायाभूत सुविधा, मनोरंजनाची साधने, सुरक्षा, चांगले आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य इत्यादी गोष्टी दिसत नाहीत. --- बहुतेक माणसांनी अशी धारणा करून घेतली आहे कि पूर्वी चांगले होते, आता खराब झाले आहे. ह्याला काहीही अर्थ नाही. माणसाचे मन असे आहे कि भूतकाळांतील चांगल्या गोष्टी आठवणीत राहतात पण वाईट गोष्टी आपण सोयीस्कर पद्धतीने विसरतो. १९६० चा काळ चांगला होता म्हणून ओरड करण्यार्यांनी पोलिओ झालेल्या व्यक्तीला किंवा ज्या बापाने आपले मूळ आणि त्याची आई ह्या दोघांना एकाच दिवशी मारताना पहिले आहे त्यांना जाऊन सांगा. काय झाले पाय अधू झाला तर ? बियर बार संस्कृती नव्हती ना !

In reply to by साहना

200 वर्ष पूर्वी जावू नका त्या वेळचे लोकांचे जीवन कसे होते हे आपल्याला फक्त काही लिखित दस्त्वेज मधून च कळते लीहणारा कोणत्या विचाराचा होता किंवा कोणासाठी लिहीत होता त्या वर त्याचे सत्य अवलंबून आहे. पण ह्या 100 वर्षातील जनजीवन कसे होते हे लोकांना पक्के ठावूक आहे .आज जे 50 शी मध्ये आहेत त्यांनी ते अनुभवले आहे आणि त्यांच्या आई वडिलांकडून अजुन 50 वर्षाचा इतिहास त्यांना खरा माहीत आहे . पूर्वी म्हणजे काही वर्ष पूर्वी च खेडेगाव ही अतिशय सुंदर होती.प्रदूषण नव्हत त्या मुळे नदी नाले स्वच्छ होते . हवामान बदल तर तेव्हा पण होता पण त्याची तीव्रता आता आहे तेवढी नव्हती काही वर्षांनी येणाऱ्या दुष्काळ चा काळ सोडला तर पावूस वेळेवर सुरू होत होता आणि भरपूर पडत होता. जमिनी मधील पाण्याची पातळी खाली गेलेली नव्हती खूप पाणी होते जमिनीत. रासायनिक खते, कीटक नाशक नसल्या मुळे शुध्द ऑरगॅनिक धान्य आहारात होते. संकरित प्राणी नसल्या मुळे देशी कसदार दूध उपलब्ध होते. लोकसंख्या कमी असल्या मुळे जमिनी जास्त हीत्या. लोक निती वान होती पैसे किती आहेत ह्या पेक्षा माणूस कसा आहे ह्याला जास्त किंमत होती. वातावरण अतिशय स्वच्छ असल्या मुळे लोक तंदुरुस्त होती आज च्या सारखे 25 विशित च blood pressure, Madhu मेह,jadpana नव्हता . लोकांचे आता आयुष्य वाढले आहे ते कोणाचे ज्यांचा जन्म 1900 ते 1870 पर्यंत चा आहे त्यांचेच . त्या पुढील लोक 50 शी सोडा 40 शी मध्येच स्वर्गवासी होतील अशी त्यांची अवस्था आहे. आजच्या पेक्षा पाढच्या 100 वर्षाचा काळ हा अतिशय सुंदर होता ..ह्या वर दुमत होण्याचे कारण च नाही. घर मोठी होती कुटुंब एकत्र होते लोक स्वार्थी नव्हती.. आता शहरांची अवस्था कचरा पेटी सारखी झाली आहे. फक्त घान,फक्त गर्दी,फक्त दूषित हवा आणि सर्वत्र पसरलेल्या बकालपणा असेच शहरांचे वर्णन करता येईल.. अमेरिकेने मोठ्या नावाने भारतीय लोकांना त्यांच्या देशात प्रवेश दिला म्हणून ते त्या देशातील अमेरिकन लोकांनी कष्टाने उभ्या केलेल्या सुनियोजित शहरात राहत आहेत. ती फक्त अमेरिकन लोकांची कृपा आहे.भारतीय लोकांना त्यांच्या देशात त्यांनी प्रवेश दिला. भारतीय लोकांचं तेथील सुनियोजित शहर बसवण्यात काही हातभार नाही फक्त ते अमेरिकेवर भार आहेतं

In reply to by गवि

माझ्या जीवनशैलीला, गावातील वातावरण पसंत पडते... ह्याचे अर्थ, शहरात राहणारे अयोग्य आणि मीच तेवढा योग्य, असा होत नाही .... तुम्ही तुमच्या जीवनशैलीला योग्य असे वातावरण निवडले आहे आणि मी माझ्या .... समजा जर मला, तुम्ही करता ते काम आवडत असते तर मी शहरच निवडण्याचे Chances जास्त होते ... याउलट, तुम्हाला जर शेतीची आवड असती तर तुम्ही गाव निवडले असते .... एकाच व्यक्तीला हजारो कंगोरे असतात, तसेच एकाच समाजाला,एकाच तराजूत तोलणे अयोग्य आहे ... आता एक कट्टा, शेतावर करू... मस्त पैकी बियर पिऊ ... आजकाल गावोगावी बियर शाॅपी सुरू झाल्या आहेत ...

In reply to by साहना

कुणाला बर्गर प्रिय तर कुणाला चटणीभाकर ... कुणाला मनोर्यात बसून, पुस्तक वाचून, सल्लागार व्हायला आवडते, तर कुणाला स्वतः माहिती घेऊन ... त्यामुळे तुमचे विचार आणि माझे विचार, ह्या बाबतीत वेगळे आहेत... दोघेही दोन धृवांवर उभे आहोत...

माकडांचा कायदा, साल साधारण, 1980 आंब्याची झाडे भरपूर आणि आंबा पण भरपूर, घरात खाणारी मंडळी 6, पैपाहुणा कितीही आला तरी, आंब्याला तोटा नाही.. माकडे मारायला परवानगी असल्याने, माकडांचा अजिबात उपद्रव नाही ... साल 2000, माकडांना अभय ... झाडे तितकीच, आंबेही भरपूर, घरात खाणारी मंडळी 8, पण, माकडे आंबेच शिल्लक ठेवत नाहीत ... पैपाहुणा आला तर, नको वाटतो... कारण, घरच्यांनाच जेमतेम आंबे मिळतात... सध्या बर्याच ठिकाणी, रात्रंदिवस, नेपाळी गुरखे, आंब्यांचे रक्षण करायला ठेवावे लागतात... सकाळी माकडे आणि रात्री टाॅर्चवाले आंबे चोर....गुरख्यांचा खर्च वाढल्यामुळे आंब्याचा दर पण वाढला... माकडांच्या लोकसंख्येमुळे, लोकांना जास्त भावात आंबे विकत घ्यावे लागतात... माकडे, म्हणजे सरकारचे जावईच, असे झाले आहे. आज, कोकणात फळफळावळ घेण्याचे कष्ट कुणीही करत नाही... बघता बघता, एका तासात, कोबीचा वाफा उध्वस्थ झालेला, मी प्रत्यक्ष बघीतला आहे... अफाट लोकसंख्येमुळे, एखाद्या शेताची लूट करायला, एखादी टोळी पण तयार होऊ शकते.

In reply to by मुक्त विहारि

न्यूनगंड आणि अहंगंड एकाच प्रतिसादात ! भारतीय समाजाबद्दल न्यूनगंड. आणि 'इतर लोकं आमच्यासारखे समजूतदार नाहीत हो' हा अहंगंड.

In reply to by शा वि कु

हेल्मेट सक्तीचा कायदा करावा लागतो, ह्यातच सगळे आले ... आणि अहंगडा बद्दल, मीच तेव्हढा समजूतदार, असा तुमचा गैरसमज झाला असेल तर, क्षमस्व ...

In reply to by मुक्त विहारि

दोष का द्यायचा? साहना यांची मते विचारात घेतल्यास. आणि दुसरी बाजू या क्रिकेट टीमला पोसायची जबाबदारी कोणाची? आणि उद्या ही मुले गुन्हेगार बनली गरीबीमुळे तर ती जबाबदारी कोणाची?

In reply to by उपयोजक

गुन्हेगार होण्याची शक्यता वाढू शकते...

आरक्षण मागतायत.त्या मागण्या न्याय्य आहेत की नाहीत याचाही विचार न करता आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी होत आहे.त्यासाठी विविध मार्गाने आंदोलने,अडवणुकी होत आहेत.खुल्या गटातील या जातींनी त्यांच्या जातीअंतर्गत लोकसंख्या मर्यादित न ठेवल्याने त्यांच्यावर ही वेळ आलीय असे म्हणता येईल का? या जातींची एकगठ्ठा मते मिळण्याच्या आमिषाने राजकारण्यांनी ही आरक्षणे मिळवून दिली तर या जातींना त्यांच्या लोकसंख्येमुळे फायदा झाला असे म्हणावे का? पण राजकारण्यांच्या या एकगठ्ठा मते मिळवण्याच्या लालसेपोटी आरक्षण दिल्याने समाजात जो गहजब माजेल,दुरावा निर्माण होईल त्यात देशाचा तोटा नाही का?

लोकसंख्या वाढवायची मग त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी उंच इमारती बांधून ती गरज पूर्ण करायची. सर्व मोकळ्या जागा नष्ट करून त्या जागेवर लोकवस्ती करायची. मुलांना खेळायला पण जागा ठेवायची नाही. पृथ्वी वर जे अनेक जीव आहेत ती पृथ्वी ची संपत्ती आहे आणि निसर्ग चक्राचे महत्वाचे घटक आहेत त्यांचे जीवन धोक्यात आणायचे . अन्न पिकवण्यासाठी जागा कमी पडते म्हणून vertical शेती करायची.एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पोसण्यासाठी विविध कारखाने निर्माण करून प्रदूषण निर्माण करायचे आणि शुध्द हवा हवी म्हणून परत ऑक्सिजन निर्मिती चे कारखाने काढायचे...ट्रेन आणि विविध प्रवासी साधन वाढवत जायचे. आणि त्याच बरोबर यांत्रिकी करणं करून रोजगार कमी करायचे.माणसाचे पूर्ण आयुष्य फक्त जगावे कसे ह्याच एकमेव प्रश्नात वाया जाईल ह्याची तरतूद करायची. जमीन कमी पडते म्हणून समुद्रावर अतिक्रमण करायचे त्या अतिक्रमण करण्याचे काय भयंकर परिणाम होतील ह्याचा विचार करायचा. कशा साठी हे सर्व करायचे .कशाला हवी प्रमाणाबाहेर लोकांची संख्या. पृथ्वी मनुष्याचे अस्तित्व असावे एवढीच कमीत कमी लोकसंख्या असेल तर ह्या एकमेव सजीव सृष्टी ला अनुकूल अशा पृथ्वी चे रक्षण करायचे की माणसं साठी एकमेव घर असलेल्या ह्या पृथ्वी ला विनाशाकडे घेवून जायचे. कशात शहान पण आहे हे तुम्ही च ठरवा.

शाळेत असताना, म्हणजे २५ वर्षापूर्वी एका शिक्षकांनी ही संकल्पना मांडली होती, तेव्हा पुर्ण पणे कळले नव्हते पण तुमच्या लेखातील बरेच मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत. विस्ताराने लिहा ही विनंती ़

शाळेत असताना, म्हणजे २५ वर्षापूर्वी एका शिक्षकांनी ही संकल्पना मांडली होती, तेव्हा पुर्ण पणे कळले नव्हते पण तुमच्या लेखातील बरेच मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत. विस्ताराने लिहा ही विनंती ़

नाही बुवा नाही पटलं. हे थोडक्यात असं झालं की प्रत्येक १००,००० व्यक्ती मागे १ चांगला वैज्ञानिक जन्माला येतो म्हणून लोकसंख्या वाढली की वैज्ञानिक वाढतील व जीवनमान उंचावेल. असंच थोडसं लॉजीक खेळाच्या बाबतीत लावून पहा, दर १०००० व्यक्तिमागे १ चांगला फुटबॉलपटु जन्म घेतो तर चीन / भारत फुटबॉलमधे जगज्जेते असायला हवे होते.