Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कुमार जावडेकर on Tue, 12/22/2020 - 23:37
लेखनविषय (Tags)
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
समीक्षा
लेख
काल-परवाच टीव्ही. वर एक तलत महमूदचं गाणं कुठल्यातरी गलत महमूदच्या आवाजात पुनर्मिसळ केलेलं माझ्या बघण्यात आलं. तो गायक तलत नव्हता हे ऐकताना (नव्हे, ऐकता क्षणीच) कळलं आणि महमूद तरी होता की नव्हता हे कळण्याआधीच मी चॅनेल बदललं. पण तरी ते गाणं ओठांत येत राहिलं आणि त्यामुळे अनेक गोष्टी आठवल्या. आपल्या आवाजाला जरासा रफ्फू केला की आपणही महंमद रफीसारखे गाऊ शकतो असा समज असलेले अनेक शेख महंमद आमच्या बालपणी होऊन गेले होते. अन्वर, शब्बीर कुमार, महंमद अजीज अशी अनेक नावं त्यांनी धारण केली होती. (पुढे त्यातूनच 'सोनू निगम'ची स्थापना झाली आणि बाकीच्या या छोट्या-मोठ्या गायकांची सुट्टी झाली.) असं अनेकदा होतं. काही गाणी आपण रेडिओ, टीव्ही, सीडी. इ. माध्यमांतून पुनः पुन्हा ऐकतो, पुनर्प्रत्ययाच्या आनंदासाठी. काही गाणी तर इतकी लवकरच का संपून जातात असंही वाटतं. 'नखरेवाली' या गाण्यात किशोर कुमारला अजून एक तरी कडवं का नाही इथपासून 'किरवाणी' या रागातली गीतं कितीही ऐकली तरी अधुरीच का वाटतात (आणि मनात तो राग रेंगाळतच का राहतो) असे प्रश्न मला वारंवार पडत आले आहेत. याउलट काही गाणी रेडिओ, टीव्ही, कॅसेट, सीडी, मोबाईल, युट्यूब कुठूनही ऐकू आली की आपल्याकडून त्यांना बदलणं किंवा बंद करणं या क्रिया घडवण्यासाठीच तयार केली जातात का? कधी कधी मला असं वाटतं की रसग्रहणाचेही कदाचित तीन प्रकार असावेत. पहिलं साधं-सोपं रसग्रहण. उसाचा रस पिण्यासारखं. निव्वळ आनंद. कितीही वेळा घ्यावा. आपली भूमिका फक्त घेणाऱ्याची. दुसरं रसग्रहण म्हणजे, गाणं चवीनं ऐकणं किंवा पुस्तक चवीनं वाचणंच; पण त्याबरोबरच त्यातली सौंदर्यस्थळं जाणून घेऊन. त्या रागांच्या, कवितांच्या किंवा नाटकांमधल्या संवादांतल्या खुब्या लक्षात घेऊन केलेलं. बालगंधर्वांनी भीमपलासमध्ये लावलेल्या शुद्ध निषादासारखं. (अर्थात, या गोष्टीचा विषाद वाटणारेही काही महाभाग होतेच.) तिसरा 'रसग्रहणा'चा अर्थ - रसाला लागलेलं ग्रहण - असा असेल का?... असा प्रश्न मला अनेक वेळा पडतो. (आता अर्थात, प्रश्न पडतो हे म्हणणं मला खरं तर पटत नाही. तो तर उभा असतो... 'खडा सवाल' म्हणून आणि आपल्याला टोचत असतो, आपल्या विचारधारेत - की रसात - खडा आल्यासारखा.) या रसग्रहणात 'चंद्रग्रहण' म्हणजे चंद्राला लागलेलं ग्रहण, सूर्यग्रहण म्हणजे 'सूर्याला लागलेलं ग्रहण'; त्याचप्रमाणे 'रसग्रहण' म्हणजे रसाला लागलेलं ग्रहण असं अभिप्रेत आहे. असो. रसग्रहण कुठलंही असो, विषय गोड असला म्हणजे झालं. पेरू खाणाऱ्याला बियांचं वावडं नसावं. अन्नू मलिकबद्दलचं रसग्रहण हे दुसऱ्या प्रकारातलंच आहे हे तरीही मला सुरुवातीलाच (म्हणजे नमनाला घडाभर तेल झाल्यावर) नम्रपणे, नमून, नमूद करावंसं वाटतं. "अन्नू मलिक यांच्याबद्दल मला एक चांगली गोष्ट सांगायची आहे, " एका कार्यक्रमात एक निवेदक म्हणाला होता, "की ते सरदार मलिकांचे चिरंजीव आहेत." या वाक्यावर सगळे श्रोते हसले आणि अन्नू चिरंजीव असला तरी त्याचं संगीत कसं चिरंजीव नाही याची त्यांना जाणीव झाली. वास्तविक, 'सारंगा तेरी याद में' हा एक रंग सोडला तर मला तरी सरदारांचे इतर रंग काही फारसे याद किंवा ज्ञात नाहीयेत. अन्नूचे मात्र अनेक राग-रंग बघितले आहेत. पण काय आहे, जुन्या लोकांसारखा अन्नू मलिकला कुणी वाली (किंवा राममित्र सुग्रीव) नसल्यामुळे कुणीही माकडं त्याची चेष्टा करू शकतात. वास्तविक हिंदीत 'चेष्टा' म्हणजे 'प्रयत्न'. तशी संगीताची चेष्टा अन्नू मलिकनं खूपच केलेली आहे, याबद्दल कुणाचं दुमत नसावं! 'एखादी गोष्ट पडणे म्हणजे त्याचा अण्णू गोगट्या होणे' हे जसं पु.ल. 'अंतू बर्वा'त म्हणून गेले होते, तसाच काहीसा समज माझा अन्नू मलिकबद्दल झाला होता. ‘एखादे गाणे न आवडणे म्हणजे ते अन्नू मलिकचे संगीत असणे' असं मला अनेक दिवस वाटत आलं होतं. 'त्यासाठी रसिकता म्हणजे काय हे तुम्हांला आधी कळलं पाहिजे' असं माझे एक विद्वान मित्र म्हणाले. मी त्यांना पु. लं. च्या 'गाठोड्या'तली सामंतांच्या घरची मासे खाण्याची 'रसिकता' सांगण्याचा मोह आवरला. आता त्यांच्यासारखं (म्हणजे आमच्या मित्रवर्यांसारखं - सामंत वैनींच्या बांगड्याच्या आमटीसारखं नाही -) रसग्रहण जर मी करायला लागलो तर माझी काही खैर नाही. "१९६० नंतर संगीत संपलं." (वास्तविक आमच्या मित्रांचा तेव्हा जन्मही झाला नव्हता.) "शास्त्रीय संगीतात फक्त आमिर खान आणि बडे गुलाम अली खान, तर चित्रपट संगीतात नौशाद, सज्जाद आणि सुरुवातीचा मदन मोहन यांपलीकडे काही दम नाहीये", असा त्यांनी एकदा मला सज्जड दम भरला होता. (आता सज्जादचा नौशादवर फार राग होता हे त्यांना माहिती होतं की नव्हतं याची शहानिशा मी न करता फक्त त्यांच्यासमोर 'ये हवा ये रात ये चांदनी' हे माझं सर्वांत आवडतं गाणं आहे अशी कबुली दिली होती.) सज्जादचं जाऊ द्या; पण नौशाद किंवा शमशादवरसुद्धा लिहिण्याची कुणाची बिशाद आहे? शिवाय, जुन्या कुठल्याही विषयावर काही लिहायचं म्हणजे हे मित्र सोडून अनेक इतर व्यक्ती-प्रकृतींनाही सामोरं जावं लागतं. म्हणून आमचा बिचारा अन्नू बरा. आता साधी गोष्ट घ्या. 'बैजू-बावरा'तलं प्रत्येक गाणं (आमिर खान यांच्या गाण्यांचा अपवाद वगळता) 'हो जी हो' नं सुरू होतं. म्हणून आम्ही ते संगीत चांगलं या म्हणण्याशी 'हो ला हो' करतो. 'बचपन की मुहब्बत को' आळवतो. पण अन्नूच्या 'बाली उमर ने मेरा हाल वो किया' ला नावं ठेवतो. वास्तविक दोन्ही चित्रपटांच्या गीतांमध्ये लता मंगेशकर आहे. आता बैजूमधल्या बावऱ्या महंमद रफी ऐवजी इथे अजीजीनं गायलेल्या महंमद अजीजचाच काय तो फरक. याखेरीज, अगदी बडे गुलाम अली खान किंवा आमिर खान नसले तरी गुलाम अलीच्या आवाजात त्याच चित्रपटात गीत ध्वनिमुद्रित करूनही अन्नू 'चमकता चांद' होण्याऐवजी 'आवारगी'च 'टूटा हुआ तारा' ठरला. हीच त्याची गत पुढे (चालू काळातल्या) आमिर खानला घेऊन केलेल्या 'अकेले हम, अकेले तुम' नं केली. आमिर खान हा एक अयशस्वी संगीतकार असतो अशी ती कथा होती आणि अन्नू(अण्णू)नं ती, अत्यंत सहजपणे, अत्यंत यशस्वीरित्या सादर केली होती. '१९४२-अ लव्ह स्टोरी' च्या काळात आर. डी. बर्मनचं निधन झालं आणि पुढच्या 'करीब' या चित्रपटासाठी विधुविनोद चोप्रांनी अन्नूला जवळ केलं. त्याची गाणी लोकप्रिय झाली असतील, पण नवीन आर. डी. सापडला असं कुणी म्हटलेलं अन्नूच्या नशिबात काही आलं नाही. 'बॉर्डर'नं सोनू निगमचा उदय झाला आहे हा संदेसा दिला, तर 'रेफ्युजी'नं जावेद अख्तरच्या शब्दांनाच जास्त भाव दिला. 'अशोका'च्या संगीताची त्याच सुमारास आलेल्या 'लगान' मार्फत रहमाननं विकेट काढली आणि 'उमराव जान' ऐकताना लोकांना नवीन अन्नू स्मरणात राहण्यापेक्षा जुना खय्यामच आठवत राहिला. अन्नूनं तरीही आपल्या अख्ख्या कारकीर्दीत कधी डगमगण्यात किंवा हिरमुसण्यात वेळ घालवला नाही. 'बाजीगर' नंतर आपला पथच नाही, तर आपला 'विजयपथ' कोणता आहे हे त्यानं 'राहों मे उन से मुलाकात हो गयी' म्हणत स्पष्ट केलं. आधीच्या 'सोनी महिवाल' किंवा 'मर्द'वर लक्ष्मीकांत-प्यारेलालचा प्रभाव असेल, पण आता चलती असलेल्या नदीम-श्रवणच्या संगीत-संयोजनाशीही आपण कशी सलगी करू शकतो हे त्यानं दाखवून दिलं. पुढे नदीम-श्रवण आटपले/आपटले, पण अन्नू 'फिर तेरी कहानी याद आयी', 'सोल्जर', 'बादशहा', 'डुप्लिकेट', 'सर' पासून 'मुन्नाभाई एम. बी. बी. एस.', 'मै हूं ना' पर्यंत लोकप्रियच होत राहिला आणि आपलं संगीत-संयोजनही काळाप्रमाणे बदलत राहिला. 'मास अपील' मिळालं; त्याला फक्त साधलं नाही ते 'क्लास अपील'. अर्थात, त्या मोहातही तो पुढे कधी पडला असेल असं वाटत नाही. आपलं संगीत 'उरलो उपकारापुरता' या भावनेनं 'दम लगाके हैश्शा' करत तो ढकलत बसला आणि 'चमत्कार' झाला! (हा १९९२ मधला 'प्यार हो जाएगा' हे गीत असलेला त्याच्या उमेदवारीच्या काळातला 'चमत्कार' नव्हता.) 'मोह मोह के धागे' हे गीत त्यानं संगीतबद्ध केलं आणि कधी नव्हे ते अन्नू मलिकला अनुल्लेखानं मारणारेच त्याचं गुणगान गाऊ लागले. 'सम्हाला है मैने बहोत अपने दिल को, जुबांपर तेरा फिर भी नाम आ रहा है' ही अन्नूची ओळ आळवायची पाळी आता त्या बिचाऱ्यांवर आलेली होती! 'रास्ते आस्ते चल जरा' एवढंच अन्नू यानंतर त्यांना म्हणाला, मनातही आणि जनातही. त्यानं आपलं धोरणही चालूच ठेवलं - 'बत्ती गुल, मीटर चालू'... - कुमार जावडेकर (माझ्या 'निवडक अ-पुलं' या इ-पुस्तकातून https://www.amazon.in/dp/B086YZNVWH)
  • Log in or register to post comments
  • 4791 views

प्रतिक्रिया

Submitted by तुषार काळभोर on Wed, 12/23/2020 - 05:55

Permalink

अनु मलिक

बॉर्डर, रेफुजी मध्ये जितका गुणी वाटतो, तितक्याच चोऱ्या करून शिव्या खाल्लेला संगीतकार आहे. पाश्चात्य संगीतवरून' प्रेरित ' होणे, ही कदाचित नव्वदीच्या दशकात त्याची आणि निर्मात्यांची गरज असेल. शिवाय अशी प्रेरणा ओपी नय्यर पासून झाडून सगळ्यांनी घेतलीच आहे , अशी एखादी पळवाट काढता येऊ शकते. पण Macarena या एकाच गाण्याची एकाच वर्षात दोनदा औजार आणि ढाल (१९९७) चोरी केल्यावर त्याचं हे काही थोडं फार कौतुक होतंय,त्यातच अनु मलिक ने समाधान मानावं. -( सोनू निगम चा फ्यान ) पैलवान
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Wed, 12/23/2020 - 10:27

Permalink

पुढे त्यातूनच 'सोनू निगम'ची

पुढे त्यातूनच 'सोनू निगम'ची स्थापना झाली आणि बाकीच्या या छोट्या-मोठ्या गायकांची सुट्टी झाली.
चोक्कस! - (सोनुफॅन) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Wed, 12/23/2020 - 13:04

Permalink

छान लेखन . शिरीष कणेकर ,

छान लेखन . शिरीष कणेकर , इसाक मुजावर , अभिजीत देसाई यांच्या लेखनाची आठवण झाली . बाकी या लेखात उल्लेख केलेली गाणी आवडीची असल्याने संगीतकाराबद्दल पास .
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 12/23/2020 - 15:06

Permalink

काय एक एक भारी शब्द काढले

काय एक एक भारी शब्द काढले आहेत राव तुम्ही. गलत महमूद पुनर्मिसळ बाकी लेख समजायला मला तो पुन्हा वाचायला लागलो. एक सुधारणा आहे. अकेले हम अकेले तुम मध्ये अमीर खान गायक असतो बहुतेक. संगीतकार नाही. बाकी छानच लिहिलं आहात.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 12/23/2020 - 16:26

Permalink

खुमासदार शैलीचा मस्त लेख,

खुमासदार शैलीचा मस्त लेख, आवडला !
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Mon, 12/28/2020 - 20:48

Permalink

चिटको आवडल्या

कुमार जावडेकर, चिमटे, टपल्या व कोपरखळ्या आवडल्या. शेवटची 'निवडक अ-पुल' ही कोटीही आवडली. बाकी, मला संगीतातलं फारसं कळंत नाही. त्यामुळे आपला दुरून नमस्कार! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by चलत मुसाफिर on Wed, 12/30/2020 - 19:15

Permalink

मानलं तुमच्या हौसेला

नदीम श्रवण, अनु मलिक हे ठोकळे कधी तपशीलवार, विस्तृत लेखांचे विषय होऊ शकतात असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. या लोकांनी इतक्या बेधडक चोऱ्यामाऱ्या केल्या आहेत की त्यांच्या ओरिजनल चाली ऐकतानाही संशय येत राहतो. असो. बाँब फोडणारे, खुनाच्या सुपाऱ्या देणारे-घेणारे अंडरवर्ल्डचे भाई जिथे बडे निर्माते म्हणून मिरवत होते, तिथे चाली चोरणे हा गुन्हा किरकोळच म्हणायचा. आता फक्त आनंद- मिलिंद राहिले. त्यांच्यावरही येऊ द्या लेख. शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on गुरुवार, 12/31/2020 - 09:52

In reply to मानलं तुमच्या हौसेला by चलत मुसाफिर

Permalink

सहमत

सहमत
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com