Skip to main content

सूर्यस्वप्न...

लेखक Amita joshi यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

सूर्यस्वप्न...

मिहिराने पुसले हळूच निशेला, भेटशील का ग तु मावळतीला.... मोहरून गेली निशा त्या हाकेला, स्वप्नात रंगली दिनकराच्या ओढीला....

रंगूनी आभाळ, केशरी पूर्वसंध्येला लगबगली पाखरे, जाण्यास कोटराला.... किरणे आतुरली आता, शर्वरीच्या आगमनाला वाट पाहुनी अंधुकली, क्षण लागता ओसरायला.... तारकांचे पैंजण घालून, काजव्यांचे पदर ओढून साजिरी निशा अवतरली,रातराणीचे अत्तर लेवून.... निशेलाहीे ठाऊक नव्हते, अकल्पित असे काही होते तिच्या आगमनासमयी, तेज सारे लोपले होते.... काळोखाच्या गर्द गाभारी, हुरहूर लावून अंतरी प्रश्न अनंत टाकूनी, कुठेसी विरला तो शौरी.... घटका सरता पहाटवारे, वाहू लागले माथ्याला अरुणोदय होता पूर्वेला, किलबिल झाली क्षितिजाला.. नकळत यामिनीच्या लोचनांनी, टिपले राजस सूर्याला कर जुळता रजनीसूर्याचे, तम सर्वत्री लोपला.... एकरूपतेचा क्षण तो उज्वल,अवघ्या विश्वात रंगला विभावरी विलीन होऊन, मिहिर तेजस्वी प्रकटला....
अमिता


वाचने 12034
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

रंगूनी आभाळ, केशरी पूर्वसंध्येला लगबगली पाखरे, जाण्यास कोटराला.... किरणे आतुरली आता, शर्वरीच्या आगमनाला वाट पाहुनी अंधुकली, क्षण लागता ओसरायला.... तारकांचे पैंजण घालून, काजव्यांचे पदर ओढून साजिरी निशा अवतरली,रातराणीचे अत्तर लेवून.... वाह! खुप सुरेख वर्णन


@Amita joshi

'सूर्यस्वप्न...'

ही कविता आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर


तुमचं शब्द सौंदर्य सुरेख आहे. मिहिर, शर्वरी हे शब्द सहसा वाचनात येत नाहीत.

कविता छानच! खूप आवडली.