१९९४ साली रिलीज झालेला, आणि आज एक क्लासिक म्हणून मानला गेलेला एक अप्रतिम चित्रपट. टिम रॉबिन्स आणि मॉर्गन फ्रीमन यांच्या अप्रतिम अभिनयानी नटलेला असा हा एक सर्वांगसुंदर चित्रपट आहे. कथानायक अँडी डूफ्रेन (टिम रॉबिन्स) याने शॉशँक स्टेट प्रिझन मधे घालवलेला जवळ्-जवळ २० वर्षाचा काळ, आणि तिथे त्याला करावा लागलेला अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना, आणि "Fear Can Hold You Prisoner, Hope Can Set You Free" ही टॅगलाईन सार्थ ठरवणारा सुरेख शेवट, हे या चित्रपटाचं मुख्य कथासुत्र.
कथेचा थोडक्यात सारांश असा:
साल १९४७. कथानायक अँडी डूफ्रेन याला स्वतःची बायको, आणि तिचा प्रियकर यांच्या खूनाच्या आरोपाखाली, निव्वळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. आणि त्याची रवानगी शॉशँक स्टेट प्रिझन मधे केली जाते. या तुरुंगाचं वैशिष्ट्य म्हणजे, इथे असलेले बरेचसे कैदी हे, त्यांनी न केलेल्या गुन्ह्यासाठी, अँडी प्रमाणेच, निव्वळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर इथे आलेले असतात. त्यांच्यापैकीच एक कैदी म्हणजे एलीस बॉईड (मॉर्गन फ्रीमन), ज्याला सगळे "रेड" या नावानी ओळखतात. ऑलरेडी २० वर्षं शि़क्षा भोगलेला हा माणूस, तुरुंगात काही डॉलर्सच्या बदल्यात कैद्यांसाठी बेकायदेशीर रित्या वस्तु स्मगल करण्यासाठी ओळखला जातो.
पहिल्याच दिवशी सर्वं नविन कैद्यांना भयंकर टॉर्चरला सामोरं जावं लागतं. हे सगळं सहन न होवून जर एखादा कैदी रडू भेकू लागलाच तर त्याला, शॉशँकचा Chief of guards "कॅप्टन बायरन हॅडली" याच्या अमानुष माराला सामोरं जावं लागतं. पण मुळातच शांत स्वभावाचा अँडी या सगळ्याला तितक्याच शांतपणे सामोरा जातो. काही दिवसातच या सगळ्या वातावरणाशी जुळवून घेता घेता, त्याची "रेड"शी मैत्री होते. इतर कैद्यांप्रमाणेच, रेड अँडीसाठीही त्याला हव्या असलेल्या वस्तु स्मगल करून आणू लागतो, ज्यामधे एक रॉक हॅमर आणि काही नट्यांच्या पोस्टर्सचा समावेश असतो.
असेच दिवस जात असतात, आणि एक दीड-दोन वर्षांनंतर योगायोगाने एक प्रसंग असा घडतो ज्यामुळे अँडीच्या त्या तुरुंगातल्या आयुष्याला एक विलक्षण कलाटणी मिळते. हुद्यानी बँकर असलेला अँडी, तुरुंगाचा Chief of guards कॅप्टन हॅडली याला त्याची वडिलोपार्जित संपत्ती पुर्णपणे टॅक्सफ्री करण्याची क्लुप्ती सांगतो. अर्थातच ती यशस्वी होते, आणि तुरुंगातले बाकीचे गार्ड्स सुद्धा आर्थिक सल्ल्यांसाठी अँडीकडे येउ लागतात. यांच्यातच तुरुंगाचा मुख्यं अधिकारी "वॉर्डन सॅम्युएल नॉर्टन" याचाही समावेश असतो.
अँडीच्या ह्या ज्ञानाचा फायदा नॉर्टन स्वतःच्या वैयक्तीक फायद्यासाठी करु लागतो. एका स्थानिक बांधकाम प्रकल्पासाठी तुरुंगातल्या कैद्यांचा उपयोग करुन त्यातून भरपूर आर्थिक नफा, अँडीच्या मदतीने नॉर्टन मिळवू लागतो. यातही अँडीच्या अप्रतिम बुद्धीमत्तेचा प्रत्यय येतो. सिस्टम मधल्या लूपहोल्सचा वापर करून, अँडी एक खोटी ओळख तयार करतो, ज्याचं नाव असतं "रँडल स्टिफन्स". नॉर्टनचा सगळा बेकायदेशीर कारभार लपवण्यासाठी या, मुळात अस्तित्वातच नसलेल्या, पण ड्रायव्हिंग लायसन्स पासून सोशल सिक्युरिटी नंबर पर्यंत, सर्वं डिटेल्स उपलब्धं असलेल्या व्यक्तिचा उपयोग केला जातो.
असाच काळ पुढे सरकतो, आणि एके दिवशी टॉमी विलियम्स नावाचा एक तरूण कैदी शॉशँकमधे येतो. याच्याकडून अँडीला त्याच्या बायकोच्या खून्याची माहिती मिळते. अँडी रिट्रायलसाठी नॉर्टनची मदत मागतो, पण एकदा अँडी सुटला तर नॉर्टनचा बेकायदेशीर कारभारही उघडकीस येईल या भितीने नॉर्टन अँडीला एकांतवासात पाठवून देतो, आणि कॅप्टन हॅडलीच्या हातून टॉमीची चा खून करवतो. अशाप्रकारे एकांतवासातून परत आल्यावरही, तुरुंगातून सुटण्याची उरली-सुरली आशाही संपलेला अँडी नॉर्टनचं बेकायदेशीर खातं सांभाळण्याचं काम करु लागतो.
आणि एक दिवस सकाळी, अँडी त्याच्या सेलमधनं गायब झाल्याचं लक्षात येतं आणि संपूर्ण तुरुंगात हाहाकार माजतो. सेलचं दार तर बंद, पण आतला कैदी गायब ह्या द्रुश्यावर नॉर्टनचा काही केल्या विश्वासच बसत नाही. आणि या क्षणी चित्रपटाला खरी कलाटणी मिळते. अँडी सेलमधून कसा पळतो, तो कुठे जातो, काय करतो यासाठी चित्रपट स्वतःच पाहिल पाहिजे. सगळं इथेच रिव्हील करून रसभंग नाही करणार.
तीव्र इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर माणूस काय करु शकतो याचं उत्तम दर्शन या चित्रपटात घडतं. संपूर्ण चित्रपट अथं पासून इती पर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो. यात उत्तम पटकथेबरोबरच टिम रॉबिन्स आणि मॉर्गन फ्रीमन यांच्या अप्रतिम अभिनयाचाही मोठा वाटा आहे.
आज एक क्लासिक म्हणून ओळखला गेला असला तरी, त्यावेळी म्हणजेच १९९४ साली मात्र फारसं यश या चित्रपटाच्या पदरात नाही पडलं. ह्याचं मुख्यं कारण कदाचित त्याच वर्षी प्रदर्षीत झालेले "फॉरेस्ट गम्प" आणि "पल्प फिक्शन" हे सुपरहिट चित्रपटही असू शकतील. ह्याचा परिणाम त्यावर्षीच्या ऍकॅडेमी पुरस्कारांमध्येही दिसून आला. सात नामांकनं मिळून सुद्धा, एकही पुरस्कार याच्या पदरात पडला नाही.
त्यानंतरमात्र वर्षागणिक चित्रपटाची लोकप्रियता वाढायला सुरुवात झाली. आजच्या तारखेला हा चित्रपट आजवर बनवलेल्या गेलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.
मला कल्पना आहे की चित्रपटाच्या मानाने खूपच त्रोटक आहे हे लिखाण. अजूनही बरच काही लिहिता येईल, पण एकतर हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, आणि "द शॉशँक रिडेम्शन" सारख्या चित्रपटाचं सौंदर्य शब्दात मांडण्याइतकं सामर्थ्य माझ्याजवळ नाही. काही सुचना असतील तर जरूर कळवा.
सुमीत भातखंडे
हा माझाही