ती वाचली असती (कथा)

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
24 Oct 2020 - 9:22 pm

बैलगाडी संथगतीने गावाच्या दिशेने जात होती. सूर्य मावळतीला जात होता. मावळतीची शांतता, सूर्याचा तांबूस प्रकाश आजूबाजूला पसरला होता. सगळे अवतीभोवतीचे वातावरण  एका लयीत शांत शांत भासत होते. परतीचे पाखरे अधून मधून नजरेस पडत होते. बैलगाडीचा तो खडs खडss आवाज, या अशा वातावरणात मजेशीर वाटत होता. ते तिघेजण गाडीत शांतपणे बसून, त्या आजूबाजूच्या वातावरणाची शांतता कायम ठेवत होते. गाव साधारणता अजून, सहा मैल बाकी असेल. खरंतर त्यांनी गावात पोहोचायला घाई करायला हवी होती. कारण रात्र लवकर सुरू होणार होती. रात्रीचा तो काळाकुट्ट अंधार, आजूबाजूला पसरणार होता. पण त्यांची ती संथ चाल आहेत तशीच कायम होती. ते तिघेही पुरुषच होते. बाजाराचा दिवस असल्याने, तालुक्याच्या ठिकाणी गेलेले असावेत. बाजार संपल्यावर परत गावी निघाले असावेत. रस्ता नेहमीचाच परिचयाचा असल्याने, ते निर्धास्त होते. त्यांच्या चेहऱ्यावर कसलाच त्रासिक भाव जाणवत नव्हता. दोन्ही बैलं पुढे बघत, समोरचे अंतर कमी करत होते. एव्हाना आता अंधारायला सुरुवात झाली होती. रातकिड्यांचा आवाज नेमकाच चालू झाला होता. समोरचे दृश्य हळूहळू अदृश्य होत होते. आजूबाजूचा भोवताल अंधारात लपेटला जात होता. रस्ता सरावाचा असल्यामुळे, बैलांना पुढे चालताना मोठे प्रयास पडत नव्हते. आता अंधार गडद जाणवत होता. चांदण्यांचा ठिपका प्रकाश, त्या अंधाराची दाहकता थोडी सौम्य करत होता. त्या तिघांपैकी एकाने आपल्याजवळील कंदील पेटवला. कंदिलाच्या उजेडामुळे, आजूबाजूला मंदसा प्रकाश पडला. त्या काळ्याकुट्ट अंधारात, तो कंदिलाचा मंद मंदसा प्रकाशही गडद जाणवू लागला. त्या प्रकाशाने त्या तिघांचे चेहरे उजळून निघाले.

"आज जरा जास्तच उशीर झालाय आपल्याला."
सगळ्यात पाठीमागे बसलेला व्यक्ती, तिघातील शांतता भंग करत म्हणाला.

"हो आज जरा उशीरच झाला."
गाडी चालवणारा पुढे बघत उत्तरला.

"बाजार संपल्या-संपल्याच, आपण निघायला हवे होते. इकडेतिकडे घुटमळत आपला वेळ वाया गेला."
तिसरा व्यक्ती प्रथमच तोंड उघडत म्हणाला.

आता आशा शांत अंधारात त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. परिसरात सगळीकडेच अंधाराचा काळा पडदा पसरला होता. त्या कंदिलाच्या प्रकाशाचा परीघ, संथपणे पुढे सरकत होता. त्यांचे बोलणे, हसणे, चिडवणे सुरु होते. ते हळूहळू गाव जवळ करत होते. गाडी धुळीच्या रस्त्याला लागली होती. अचानक त्यांची नजर, त्या भुंड्या झाडावर पडली. तिघेही आळीपाळीने, त्या रस्त्याकडेच्या झाडाकडे बघू लागले. खरेतर त्या झाडावर पाहण्यासारखे काहीच नव्हते. चंद्राच्या मंद प्रकाशात ते झाड काहीसे विचित्रच दिसत होते. एखाद्या तापसी साधूच्या जटा, स्वैर  वेड्यावाकड्या कुठल्याही दिशेने वाढाव्यात, तशा त्या झाडाच्या वाळक्या फांद्या, इकडे तिकडे पसरलेल्या होत्या. झाडावर एकही पान नव्हते. हिरवेपणाचे एकही लक्षण त्यावर अस्तित्वात नव्हते. झाड जळालेले दिसत होते. वरच्या फांद्यावरचा कोळशाचा काळा रंग, त्या मंद प्रकाशातही ठळकपणे दिसत होता. वातावरणात गार वारा वाहत होता. त्याने आजूबाजूचे झाडे, पाने, गवत, छोटी रोपटे हलत होते. पण हे झाड स्थिर होते. त्या वाऱ्याने हलावे, असे काही त्या झाडावर शिल्लकच नव्हते. पाने, छोट्या फांद्या, मुकुल जळून खाक झाले होते. शिल्लक फक्त हा असा सांगाडा उरला होता. एखादा धष्टपुष्ट माणूस, कुठल्यातरी अनाहुत आगीत सापडावा, बघता बघता तो सगळा भस्म होऊन, केवळ हाडांचा सापळा शिल्लक उरावा, तसा काहीसा तो वृक्ष भासत होता. त्याच्याकडे पुन्हा पुन्हा पाहताना, तिघांच्याही मनात भीतीची एक हलकीशी लहर उमटून गेली. अशा रात्री त्या सांगाड्याची भीषणता, जरा जास्तच जाणवत होती. दिवसा त्या वृक्षाचा सांगाडा, मजेशीर वाटला असता. पण या अशा वेळी तो मजेशीर नक्कीच वाटणारा नव्हता. भीतीने थोडेसे घर तिघांच्याही मनात निर्माण केले. थोडाफार फरकाच्या अंतराने, तिघांनीही त्या वृक्षावरून आपली नजर बाजूला काढली. एव्हाना त्या गाडीच्या संथ वेगात, तो वृक्ष मागे पडून गेला. सोबत त्याचे ते भग्नपणही मागे गेले. ते पुढे सरकत गेले.

आता हा एवढा, दुर्गादेवीचा डोंगर ओलांडला की, गाव येणार होते. डोंगरातून काहीशी खडबड वाट होती. लहान मोठे दगड गोटे गाडीच्या चाकाखाली येत होते. त्यावरून गाडी गेली की, लहान-मोठे धक्के बसत होते. त्या धक्क्याने कंदील हालत होता. त्याने प्रकाशाचा परीघ इकडून तिकडे फिरत होता. वातावरण आता कमालीचे शांत भासत होते. त्यांच्यातील संभाषणही आता शांत झाले होते. बाजूला थोडे पुढे, डाव्या हाताला एक घळई दिसत होती. गाडी त्या अरुंद  घळईजवळून जात होती. अचानक एक हलकासा कण्हण्याचा आवाज आला. अगदी अस्पष्टसा. पण कानापर्यंत येईल एवढा स्पष्टसा. अचानक तिघेही ताठ झाले. एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले. गाडीचा वेग कमी झाला होता. जवळजवळ जाग्यावरच थांबली गाडी. पुन्हा तसा अस्पष्टसा कण्हण्याचा आवाज आला. आता त्यांना तो नीट ऐकला. बहुदा तो स्त्रीचा असावा. काहीतरी जखम, दुखापत झाल्यासारखा तो आवाज भासत होता.  तिघांच्या मनात नवल, भीती उभी राहिली.

"तुम्ही तो आवाज ऐकला का?"
पाठीमागे बसलेला व्यक्ती त्या घळईकडे बघत म्हणाला.

"हो, ऐकला."
दोघेही एकाच सुरात म्हणाले.

आवाज त्या घळईतूनच येत होता. कोणीतरी आत पडले असावे. बहुदा स्त्री असावी. आत पडून जखमी झाली असावी. गाडी जाग्यावरच थांबली होती. तिघेही आवाज आला त्या घळईकडे बघत होते. पुन्हा एकदा आवाज आला. आता आवाज थोडासा स्पष्ट ऐकू आला. कोणीतरी असह्य वेदनेने तडफडत असावे. केवळ कण्हण्याचा आवाज येत होता. तिघेही सावध झाले. हे तर निश्चित होते की, आवाज स्त्रीचाच होता. तो घळईतूनच येत होता. कोणीतरी घळईत पडलेले होते. ते जबर जखमी असावे. तिघांच्याही पुढे आता प्रश्न पडला. काय करावे? अशा या काळ्याभिन्न रात्री  कोण घळईत पडले असेल? ती स्त्री एवढ्या रात्री इकडे का आली असावी? ती खरंच स्त्री असेल का? आधीच त्या भुंड्या वृक्षाची भीती मनात होती. त्यात आता हे प्रकरण. तिघांच्याही मनात चलबिचल सुरू झाली. काय करावे काहीच कळेना. आता त्या स्त्रीच्या कण्हण्याचा आवाज सलग येऊ लागला. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असावी. कदाचित तिला यांची चाहूल लागली असावी, पण अंगातील त्राण संपल्याने तिला बोलणे जमत नसावे. आता तिच्या तोंडातून घर्sss घर्ssss असा आवाज निघू लागला. अशा या शांत काळोखात, तिचा तो आवाज कमालीचा भयप्रद वाटू लागला. तिघांची अवस्था शांत झाली. त्यांना काय करावे काहीच कळेना.

"आपण आधी गाडीच्या खाली उतरू. घळईत जाऊन पाहू. काय आहे ते नीट बघू. बहुदा कोणीतरी स्त्री जखमी असावी. तिला मदतीची गरज असेल."
पाठीमागे बसलेला माणूस म्हणाला.

" हो, मलाही असंच वाटतं. आपण घळईजवळ जाऊन बघायला पाहिजे."
त्याच्या शेजारी बसलेला माणूस म्हणाला.

"अरे मूर्खांनो, तुम्ही वेडे झालात काय. अवतीभवतीचा परिसर बघा. रात्र बघा. सगळं कसं भयानक आहे. मला वाटतंय, हा काहीतरी वेगळाच प्रकार असावा. ती खरीखुरी स्त्री नसावी. आपल्यासाठी तो सापळा असावा. कोणीतरी आपल्या जिवावर टपून बसले असावेत तिथे.  आपण सगळे जवळ गेलो की, संपलोच म्हणून समजा. ऐका माझ. कोणी गाडीच्या खाली उतरू नका. आपण इथून लगबगीने निघून जाऊ."
गाडी चालवणारा भयग्रस्त होत म्हणाला.

त्याच्या या स्पष्टीकरणामुळे दोघेही शांत झाले. पण पाठीमागच्याला असे निघून जाणे पटेना. त्याला राहून राहून वाटत होते की, घळईत नक्कीच कोणीतरी स्त्री जखमी असावी. पण त्याची एकट्याची गाडीखाली उतरण्याची हिम्मत होईना.
तो काकुळतीला येऊन म्हणाला,
"तुम्ही ऐका माझं. तिथे खरच कोणीतरी जखमी स्त्री असेल. तिला मदत न करता, आपण पुढे जाणे योग्य होणार नाही. माणुसकी म्हणून  आपण निदान घळईजवळ जाऊन तरी बघू.  ती जखमी असेल तर, आपल्या मदतीने तिचा जीव आपण वाचवू शकतो."
पण गाडी चालविणारा त्याला जोरकसपणे विरोध करू लागला.
आता त्या स्त्रीचा आवाज जरा मोठ्याने येऊ लागला. घर्sss घर्sss असा आवाज जरासा भयप्रद वाटू लागला. घसा कोरडा पडल्यावर कंठातुन जसा आवाज येतो, तसा काहीसा आवाज आता येऊ लागला.  कदाचित तिची वेदना वाढत असावी, किंवा मग तिला वाटत असावे, हे मदत करणारे निघून जाऊ नयेत. त्यांना जवळ बोलावण्यासाठी, ती जोरात बोलण्याचा प्रयत्न करत असावी. पण तोंडातून केवळ घर्ss घर्sss असा आवाज येत असावा.

"तुम्हाला मरायचं असेल तर मरा. इथे काहीतरी अमानवीय दिसत आहे. तो घर्sss घर्ssss आवाज साधासुधा नाही. ऐका माझ. चला निघू.  इथे क्षणभरही थांबायला नको. घळईजवळ आपलं मरण आहे. ती स्त्री मानवी रक्ताची भुकेली असेल. म्हणून तो आवाज येत आहे. आपला मृत्यू तिथे टपून बसला आहे, आणि तुम्ही तिथेच जाण्याची घाई करत आहात. चला इथून झटपट जाऊ."
गाडी चालवणारा आता प्रचंड भीतीने आणि क्रोधाने त्या दोघांना म्हणू लागला.

आता तिघेही चुळबुळ करू लागले. काय करावे काहीच कळेना. पाठीमागच्या माणसाला असं त्या स्त्रीला एकट सोडून जाऊ वाटेना. निदान ती कोण आहे? ती कशा अवस्थेत आहे? तिला काय झाले आहे? हे तरी बघावे. त्याला अस्वस्थ वाटू लागले. पण काही कळायच्या आतच गाडी चालविणाऱ्याने, गाडी पुढे दामटली. त्या स्त्रीचा आवाज आता अस्पष्ट होत गेला.  तो आवाज आता कानापर्यंत पोहोचेना गेला. पाठीमागच्या माणसाच्या मनात, काहीशी हुरहुर दाटून राहिली. आपण तिला मदत न करता पुढे आल्याचे दुःख, त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तर दुसर्‍या बाजूला, एका मोठ्या संकटातून आपण वाचलो आहोत. बरे झाले गाडीतून खाली उतरलो नाही. असे काहीसे समाधानाचे भाव, गाडी चालवणाऱ्या माणसाच्या चेहर्‍यावर दिसत होते.

एव्हाना दुर्गादेवीचा डोंगर पार झाला होता. मध्यरात्र झाली होती. तिघांनाही हायसं वाटलं. गाव जवळ आला होता. गावातील दिवे दिसू लागले. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला. त्यापाठोपाठ आता काही माणसांचा, स्त्रियांचा काहीसा संमिश्र आवाजही कानावर येऊ लागला. कुजबूजण्याचा, बोलण्याचा आवाजही येऊ लागला. याचा अर्थ गावातील लोक जागे होते. पण एवढ्या उशिरा पर्यंत हे सगळे गावकरी जागे कसे?
ते गावाच्या अगदी जवळ आले. आता गावातले आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागले. कोणीतरी मोठ्याने रडत होते. आक्रोशत होते. कोणीतरी मोठ्याने शोक करत होते. सत्तरीची एक म्हातारी छाती बडवून घेत होती. काही माणसांच्या दुःखद संभाषणाचा आवाजही कानावर येत होता.
गावात काही तरी घडले होते. वाईट! अति वाईट घडले होते! तिघांच्याही काळजात धस्स झाले.
गाडीचा वेग वाढविला गेला. एक मोठी गल्ली पार करून, गाडी चालविणाऱ्याने गाडी त्याच्या घराकडे घेतली. त्याच्या काळजात जोराची कळ आली. काळीज थरथर उडू लागले. त्याच्या घरासमोर मोठी गर्दी जमली होती. त्याची दोन्ही मुले जोर-जोरात रडत होते. म्हातारी छाती बडवून घेत होती. आक्रोश करत तोंडातून बडबडत होती,
"माझी सुन पळवली. माझा पैसा-अडका नेला.  झोपलेली जवान सून पळवली, त्या लुटारूंनी! माझ्या डोळ्या देखत तिला नेल. मी काय करू देवा. हे काय केलंस तू! माझी सून परत दे! देवा नारायणा!"

काळ्या - लाल मुंग्या डोळ्यात घुसून, आपल्या मेंदूपर्यंत पोहोचून त्याचा लचका तोडत आहेत, त्याने प्रचंड प्रमाणात डोक्यात कलकल होत, आहे अशी प्रचंड कलकल गाडी चालविणार्‍याच्या डोक्यात झाली. दुःखाचा, पश्चातापाचा एक प्रचंड मोठा उमाळा त्याच्या डोळ्यातून पाण्यासोबत बाहेर पडला. हातातील बैलगाडीचा कासरा खाली टाकून, त्याने गर्रकन पाठीमागच्या माणसाकडे पाहिले. दोघांची नजरा नजर झाली. आपण घळईत पाहायला हवे होते, अशी भावना त्याच्या डोळ्यात, त्या पाठीमागच्या माणसाला दिसली.
हातात कंदील घेऊन तो गाडी चालवणारा जोरात दुर्गादेवीच्या डोंगराकडे धावत होता. गाडी चालवून चालवून तो दमला होता. थकला होता. पण त्याचे कष्ट त्याला जाणवेनात. पण पश्चातापाने मात्र तो गलिगात्र झाला. तो रडत होता. धुमसत होता. पश्चातापाने आतल्या आत जळत होता. पाठीमागच्याचे आपण ऐकले का नाही? ही सल त्याला अणकुचीदार काट्यासारखी टोचू लागली. तो घळईजवळ आला. आता घळई शांत जाणवत होती. घळईतून कुठलाच आवाज येत नव्हता. त्याने थरथरत घळईत कंदिलाचा उजेड टाकला. त्या कंदिलाच्या मंद उजेडातही, त्याला त्याच्या बायकोचा चेहरा ओळखता आला. पण मृत चेहरा. लुटारूंनी डाव साधला होता. क्रोधाची, पश्चातापाची एक मोठी सणक त्याच्या डोक्यात निर्माण झाली. डोके हातात धरून तो पाठीमागे कोसळला. जोरात रडून-रडून त्याने आजूबाजूचे वातावरण घनगंभीर केले. दुखद केले. आणि अशा घनगंभीर वातावरणातही, त्याच्या मनात तो विचार डोकावून गेला.

आपण तिला वाचवू शकलो असतो...!

अभिप्राय नक्की सांगा.

-वैभव देशमुख.

कथालेख

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

24 Oct 2020 - 9:59 pm | कपिलमुनी

..पोलीस टाइम्स वाचत जाऊ नका किंवा क्राईम पेट्रोल बघत असाल तर काही दिवस ब्रेक घ्या..

छान, अशाच उत्तम कथा लिहीत रहा.
पुढील कथेच्या प्रतीक्षेत

सोत्रि's picture

26 Oct 2020 - 8:53 am | सोत्रि

छान!

- (अभिप्राय देणारा) सोकाजी

Bhakti's picture

26 Oct 2020 - 9:34 am | Bhakti

भारी लिहिलंय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Oct 2020 - 10:37 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली, वातावरण निर्मिती मस्त झाली आहे,
पैजारबुवा,

Jayagandha Bhatkhande's picture

30 Oct 2020 - 2:56 pm | Jayagandha Bhat...

कथा आवडली...!!