विजयादशमी..!!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
विजयादशमी...!!
मस्त आरामात पेपर वाचत असतानाच, चिरंजीव वही घेऊन आले. बाबा मला विजयादशमीचा निबंध सांगा. "अरे..आईला विचार रे राजा.." मी प्रामाणिक प्रेमाने म्हटले. अहो, दुसरीतच आहे तो.. पी.एच.डी.चा निबंध सांगत नाहीये. तेवढं जमेल तुम्हाला... माझ्या अस्मितेला लागलेला धक्का सावरत, मी 'हो' म्हटलं.. जुजबी माहिती सांगत लेकाचा पानभर निबंध पूर्ण झाला..
पण पुन्हा मात्र पेपर वाचनात मन रमेना. अरे, हे माझं सुट्टीच्या दिवशीचं वाचनाचं सुख हिरावून कोण घेतंयं..? रामदास स्वामींची आठवण झाली. जगी सर्व सुखी, असा कोण आहे.. आणि त्यांची गंमत वाटली. कारण याचं उत्तर त्यांनी दुसऱ्याच ओळीत पहिल्या शब्दात दिलं आहे. "विचारी" मना, तूची शोधूनी पाहे..! खरंच की, अविचारानं वागणाऱ्या माणसांना सुख लाभणार तरी कसं..? लेको, असे गालात हसू नका राव.. माझा, भाषा किंवा तत्त्वज्ञान विषय नाहीये. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. तोडण्या मोडण्यात आणि पुन्हा जोडण्यात पटाईत..!! पण रिव्हर्स इंजिनियरिंग, या आमच्या एका विषयाप्रमाणे, माझं डोकं मात्र उलट चालू लागलं ते असं.... तर, "विजयादशमी"...!!
उलट दिशेने जाऊ लागल्यावर.. 'दशमी' आणि 'विजया' दोन शब्द दिसले. त्यात पुन्हा 'मी' आणि 'दश', हे दोन भाग झाले. मी म्हणजे अहंकार आणि दश म्हणजे दहा इंद्रिये....!! पुरुष, प्रकृती, महत् तत्व आणि मग अहंकार हा क्रम तर तुम्ही सर्व जाणताच... सात्विक, राजस, तामस ह्या अहंकाराच्या तीन प्रकारांपैकी, पहिल्या दोन प्रकारांनी, एकमेकांच्या मदतीने पाच ज्ञानेन्द्रियं आणि पाच कर्मेंद्रियं उत्पन्न केली..!! आता इथे, "दश" आणि "मी" यांच्यामध्ये, एक न दिसणारं अकरावं इंद्रियं आहे.. आपलं "मन"..!! बघानां.. शब्दात सुद्धा लपलयं.. आहे, पण दिसत मात्र नाही... हे मन, उभयात्मक इंद्रियं आहे. कारण ते ह्या दशेंद्रियांचा समन्वय साधत असतानाच, स्वतः मात्र ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ह्या दोन्ही स्तरांवर कार्य करतं..! तर ही "सुपर बेस्ट इलेव्हन"... आपली 'अकरा इंद्रियं' हो... सांख्य असोत वा वेदान्ती, सर्वांना मान्य आहेत. श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या वेदांतसूत्रात, याचा उल्लेख केलाच आहे.. आणि भगवान श्रीकृष्ण तर म्हणतात, "इंद्रियाणां मनश्चास्मि"..! तेव्हा "मन" तर सर्वात महत्त्वाचं ठरतं. आत्म्याचा मनाशी, मनाचा इंद्रियांशी आणि इंद्रियांचा अर्थाशी, म्हणजेच विषयांशी संयोग होतो आणि आपल्याला ज्ञान होतं....!!
आता दुसरा शब्द, "विजया"...! दोन झोपाळ्याच्या वेण्या, आणि कानावर लाल रिबीनीची दोन फुलं... सॉरी सॉरी.. नाही नाही.. हे नव्हे...! भावा, गल्ली चुकली हं माझी..!! ही विजया आत्ता मनात नव्हती...
तर, आजची 'विजया' म्हणजे, दुर्गा देवीचं अमोघ शक्तीशाली रूप..!! सप्तशती पाठातल्या वर्णनाप्रमाणे, दुर्गादेवीने नऊ दिवस युद्ध करून अखेर दसऱ्याच्या दिवशी महिषासुराचा वध केला. म्हणून या दशमीला "विजयादशमी" असं नाव पडलं. आता आपल्या जीवनातले असूर म्हणजे, अहंकार आणि षडरिपू... त्यांचा नाश करायचा तर शक्ती (दुर्गा) हवीच.. त्यासाठी आपल्याला मनच उपयोगी पडतं. आपण उपासनेने मनाची शक्ती, म्हणजे "मनोबल" वाढवलं, तर ह्या असुरांचा नाश होणारच आहे. पण "मनसस्तु परा बुद्धिः।" या श्लोका प्रमाणे, बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे. तिची व्याख्या सुद्धा, "निश्चयात्मिका बुद्धिः।" अशी केली जाते. ईश्वराने दिलेल्या या बुद्धिरुपी देणगीचा, जर विवेकाने वापर केला, तर आपण खरंच सुखी होऊ शकतो...
जाऊ दे.. फाssर जड होतयं हे सगळं...नाही का...? तेव्हा माझा मुद्दा असा आहे की, आपल्याला जगात सर्वात सुखी व्हायचं असेल तर, चांगलं विचारीपणे, अर्थात विवेकाने वागलं पाहिजे. पण मनाच्या कोलांट्या, षडरिपूंची आक्रमणं आणि अहंकार, हे आपलं सुख, क्षणोक्षणी लुटून नेत राहतात.. आणि दुःख, मनस्ताप, नैराश्य यांचा भरघोस आहेर न चुकता देऊन जातात... रामदास स्वामींनी तर मनाला इतका परोपरीने उपदेश केला केलायं, पण मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेत जिंकण्याच्या पलीकडे जाऊन, त्यातले विचार कृतीत आणण्याचे कष्ट आपण कधीच घेत नाही. सध्याच्या या वेगवान आयुष्यात आपण फक्त प्रवाहपतिताचे काम करतो. आणि मला सुख नाही म्हणून नशिबाला बोल लावतो. अहंकाराचं एक मोठसं रिंगण म्हणा, कुंपण म्हणा... आपणच आपल्याभोवती निर्माण करतो. आणि आत गुदमरतोय अशी निरर्थक ओरड करतो. सहानुभूती मिळवतो. पण स्वतःचा शोध मात्र कधीच घेत नाही....!!
थोडं डोळे मिटून, ह्या मायावी बाह्य जगाशी संपर्क तोडून, आत जाऊया का...? "सोsहं.." तो मीच आहे.. याची जाणीव होण्यासाठी मनानेच पुढाकार घेऊन, बुद्धीच्या मदतीने आता सीमोल्लंघन केलं पाहिजे. तरच "आत्मस्वरूपाचं अनमोल सुवर्ण" हाती लागण्याची शक्यता.....
"अहो... श्रीखंडात जायफळ पुरे का...?" आमची मुलुखमैदान कडाडली. जठरातल्या अग्निनारायणांना जर रोज "दशमी" चा नैवेद्य दाखवायचा असेल.. तर गृहलक्ष्मीची प्रत्येक गोष्ट मनापासून ऐकावी आणि तिला कायमच "विजया" घोषित करावं..!
आलो.. गं ..आलो.. चला मित्रहो, अस्मादिकांच्या उलट-सुलट आणि वेगळ्या विचारांची ही नौका, जनसागरात पाठवली आहे खरी.... तुम्हीही तिला अग्रेषित(फॉरवर्ड) करून गती द्या. पण काही कारणांनी ती मध्येच बुडली... तर अर्थातच (मानभावीपणे) इदं न मम।, असं म्हणायला मी मात्र निस्पृहपणे मोकळाच राहणार बरं का..!!
या वैचारिक प्रयोगपरीक्षेचं शेवटचं अनुमान लिहायचं राहिलं.. ते असं... मनुष्यजन्माचे सार्थक करताना विजयी व्हायचं असेल तर.. दश (दहा इंद्रियं), मी (अहंकार) यांच्यावर विवेकी मनाचा अंकुश असणं, नितांत गरजेचं आहे.. "अहो...येताय ना..?" अरे देवा.. नाटकाची दुसरी घंटा झाली.. निघतो आता..!
निरोप घेताना गोंदवलेकर महाराजांची आठवण येते. "अभिमान शत्रू मोठा.." असं आपल्याला कळकळीने विनवताना ते म्हणतात.. "स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा । हाचि सुबोध गुरूंचा, मीपण जाळोनिया जगी वागा ।। तेव्हा,.. "मी" चा आसरा सोडला, तर दसरा नक्कीच हसरा होईल ... आणि एकदा का ह्या "मी"चं मांडलिकत्व संपून, त्यावर आपली सत्ता प्रस्थापित झाली, की मग रोजच "विजयादशमी"... तुमची, माझी आणि सर्वांचीच....!!
जयगंधा..
२५-१०-२०२०.
प्रतिक्रिया
??
गूगल
उत्तर देण्यासाठी विलंब झाला,
एका शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित
दशमीची फोड :)
+१