शिवप्रतापाची झुंज ( अंतिम भाग )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
26 Sep 2020 - 1:01 pm

या कथेचे आधीचे भाग ईथे वाचु शकता

शिवप्रतापाची झुंज ( भाग १)

शिवप्रतापाची झुंज ( भाग २)

शिवप्रतापाची झुंज ( भाग ३)

शिवप्रतापाची झुंज ( भाग ४)

शिवप्रतापाची झुंज ( भाग ५)

मार्गशीर्ष सप्तमीचा सुर्य महाबळेश्वराच्या डोंगरा आडून उगवला. थंडीमुळे सगळ्या कोकणावर धुक्याची चादर पसरलेली होती. जावळी खोर्‍यावर दाट ढगांची दुलईच अंथरली होती. फक्त प्रतापगडाचा बालेकिल्लाच काय तो ढगामधून वर डोकावत होता. खानाची छावणी अजूनही सुस्तपणे पडली होती.त्यांना कोणतीच घाई नव्हती.ईकडे गडावर मात्र भेटीची तयारी सुरु झाली होती. सकाळपासूनच प्रत्येकाच्या चेहर्‍यावरचा ताण जाणवत होता.वरकरणी सगळेजण हसून एकमेकाला धीर देत होते, मनातील खळबळ मात्र लपविणे कठीण जात होते.स्वताला कसे फसवणार ? राजे मात्र स्थिरचित्त आणि निश्चल होते. महाराजांनी नापिताला बोलावून घेतले आणि आपली दाढी थोडी कापून घेतली. स्नान करुन त्यांनी केदारेश्वराचे दर्शन घेतले.गड बांधताना जाळीच्या खाली हे शिवलिंग सापडले होते.आज त्याच प्राचीन शिवलिंगासमोर हात जोडून शंभु शंकराचे,आई तुळजाभवानीचे,शहाजीराजांचे, जिजाउ मासाहेबांचे आणि समस्त रयतेचे स्मरण महाराजांनी केले.प्रत्यक्ष मृत्युच्या मगरमिठीत जायचे होते,मात्र संकल्पापासून ढळण्याचा तसुभरही विचार त्यांच्या मनी आला नाही. नित्याचा दानविधी उरकून पुरोहीत आणि दुसर्‍या ब्राम्हणास नमस्कार करुन त्या सर्वांचा शुभाशिर्वाद घेतला.दही,दुर्वा,अक्षता यास स्पर्श केला.सुर्यबिंबाचे दर्शन घेतले.पुढे उभे केलेल्या गायी वासरास स्पर्श करुन ती गाय गुणवान ब्राम्हणाला सोन्यासहीत दान दिली.थोडेसे भोजन करुन महाराजांनी शुध्द जलाचे वारंवार आचमन केले.अंगावर चिलखत परिधान करुन त्यावर शुभ्र अंगरखा चढवला. बख्तर घालून त्यावर तुरा खोवलेला शिरपेच डोक्यावर चढवला. अंगरख्यावर केशराच्या पाण्याचा शिडकावा केला. डाव्या हातात बिचवा लपवला तर अस्तनीत नवटाकी पट्टा घातला, पायांत चोळणा घालून कास कसली. एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात पट्टा धारण करुन राजे गडाच्या पायर्‍या उतरु लागले.ईतक्यावेळ उसना संयम ठेवलेल्या सोबत्यांचे डोळे नकळत पाणावू लागले.जो तो 'मी सोबत येतो' असा आग्रह धरु लागला.महाराजांनी त्यांच्या भावना जाणल्या आणि धीर दिला."आम्ही तर जिवीत तृणप्राय समजून शत्रुच्या अंगावर चालून जात आहोत.यात यश आले ठिक आहे.परंतु काही भलताच प्रसंग आला तर तुम्ही घाबरुन जाउ नका.ठरल्याप्रमाणे शत्रुवर चालून जाउन त्याचा मोड करा व राज्याचे रक्षण करा.तुम्ही सर्वजण शुर व पराक्रमी आहात.आमची सर्व मदार तुमच्यावर आहे.तुमच्यासारखे ईमानी व वीर पुरुष आहेत म्हणून आम्हाला यवनाची पर्वा वाटत नाही.आजपर्यंत हे स्वराज्य वाढले ते तुम्ही केलेल्या सहाय्यामुळे आणि शौर्यामुळे.हे आपले धन कायम राखण्यासाठी जीवाची पर्वा न करता लढाल तर तुमची किर्ती दिगंत होईल". राजांचे हे भाषण एकून सर्वांना स्फुरण चढले आणि त्या खानाला आणि त्याच्या फौजेला कापून काढायला हात शिवशीवू लागले.
निश्चयाने ठाम पावले टाकत राजे गडाच्या महाद्वाराबाहेर पडून भेटीच्या शामियान्याकडे निघाले.त्यांच्या मागून संभाजी कावजी कोंढाळकर, जीवा महाले, काटोजी ईंगळे, कोंडाजी कंक्,येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सुरजी काटके,विसाजी मुरुंबक, संभाजी करवर आणि सिद्दी ईब्राहिम निघाले.
---------------------------------------------------------------
खान त्याच्या छावणीतून तयार होउन बाहेर पडला.धिप्पाड शरीराच्या खानाने काळ्या रंगाचा कुडता, त्यावर पायघोळ झगा घातला होत्या.मलमलच्या हिरव्या रंगाचा कपड्याचा ह्या झग्यावर नकसकाम केले होते. हिरवा पातशाही शिरपेच, त्यावर तुरा आणि मोत्याची झालर लावलेली होती.डोळ्यात सुरमा चढवलेल्या खानाच्या नजरेत कपटीपणा सहज वाचता येई. अफझलखानाच्या हातात तलवार दिसत होती मात्र कंबरेला गुप्तपणे लपवलेला खंजिर मात्र सहजसहजी दिसणे शक्य नव्हते. पायात कुर्रेबाज चढावा घातलेला खान तोर्‍यात चालत बाहेर आला.त्याला पाहून कृष्णाजी आणि पंतानी मुजरा घातला.खानाने एका गालात कपटी हसत त्याचा स्विकार केला.ईतक्यात फाझल पुढे झाला आणि त्याने अब्बुजानना मिठी घातली आणि पुन्हा एकदा विनवणी केली "अब्बुजान, मत जायिये किले पे .मुझे अब भी सिवापर भरोसा नही है. सिवा को यही नीचे बुलाईये"
"तुम फिक्र मत करो बेटे.हमे सिवा को मिलने जाना ही होगा.नही तो ये मुहीम पुरी कैसे होगी ? और हम अकेले थोडे ही जा रहे है? हमारे साथ हमारा कदीम नौकर बडा सय्यद है, उसका मुकाबला नामुमकीन है. और हमारे साथ दस सरदार भी है.तुम सुकून हो कर आराम फर्माओ. हम थोडी ही देर मे सिवा से मिलकर वापस आते है"
फाझल्,अंकुश, अंबरखान नाराजानी खानाची स्वारी निघताना बघत होते. खान पालखीत चढला, भोयांनी पालखी उचलली आणि खानाच्या व आदिलशाहीच्या जयजयकाराच्या घोषणा घुमल्या. पालखी गडाच्या वाटेवर चढू लागली. त्याच्या बरोबर दिड हजार बंदुकबाज निघाले. वास्तविक भेटीच्या अटीत ठरल्याप्रमाणे अशी फौज न्यायची नव्हती.पण धुर्त पंताजी बोकील काहीच बोलले नाहीत. निम्मा गड चढून झाला होता. कमालीची उभी चढण चढून भोई कमालीचे दमले होते.त्यांच्या छातीचे भाते सुरु होते, फौजही हा चढ चढून कमालीची वैतागली होती. वाई ते महाबळेश्वर, महाबळेश्वर ते पार आणि आता पार ते प्रतापगड सततच्या चढउतार करुन फौजेवर प्रचंड ताण पडला होता, आता हि खडी वाट्,त्यात आडवी तिडवी वाढलेली झाडे, काटेरी वेली. जरा बसावे म्हणले तरी मध्ये अजिबात सपाटी नव्हती. त्यात दुपारचे चढते उन. निम्मी वाट चढून झाली आणि अचानक गोपिनाथ पंत पुढे झाले खानाच्या पालखीजवळ जाउन म्हणाले, "हुजुर एक दरखास्त होती, भेटीच्या अटीमध्ये आपण्,एक किंवा दोन सेवक आणि दहा अंगरक्षक ईतकेच बरोबर घ्यायचे ठरले आहे.आपण हि दिड हजाराची फौज घेउन चाललात्,ती बघून राजे घाबरतील, कदाचित ते भेटीला येणार नाहीत.आपण हि फौज विसाव्याला ईथेच सोडली तर बरे होईल.आपण भेट संपवून परत जाताना फौजेला घेउन जाउया"
खानाने कृष्णाजींकडे पाहिले, कृष्णाजींनी मान हलवली. सगळी फौज मागे ठेउन खानाची पालखी, बडा सय्यद आणि दोन्ही वकील पुढे निघाले. खानाची फौज थोडी वाईमध्ये,थोडी पारच्या छावणीत आणि थोडी गडाच्या वाटेवर विभागली गेली होती. खान आणि फक्त अकरा सरदार भेटीच्या शामियानात असणार होते.आणि त्याच्या सभोवती झाडीत असंख्य मावळ्यांचे डोळे त्यांना निरखत असणार होते.
---------------------------------------------------
खानाने शामियान्यात प्रवेश केला.अलिशान सजवलेला तो शामियाना बघून खान थक्कच झाला, "ये ईतनी दौलत है सिवा के पास ? ये सोने के नगीने, मोतींयो के हार, कहां से लाये ये सब ? ईतनी दौलत तो हमारे पातशहा सलामत के पास भी नही."असुयेने आणि संतापाने अफझलची भिवई चढली.
"हुजुर हे आपल्याच सेवेसाठी आहे,एकदा राजांनी आपल्यासमोर शरणागती पत्करली कि हे सगळे आपलेच आहे.अहो खानसाहेब, हे सोने,मोती कसले घेउन बसलात हे सगळे मावळ, जावळी, किल्ले आपलेच तर आहेत."
"हां! बिलकुल दुरुस्त फर्माते हो तुम पंडतजी. वो सिवा कब आयेगा ?" खान दाढीवर हात फिरवत बैठकीवर रेलला. शामियानाचा थाट बघून त्याचे आश्चर्य वाटले होते. ह्या दरिद्री मावळी मुलुखातील हा साधा जहागिरदार सिवा, त्याच्यापाशी हि दौलत.एकदा सिवाला मारला की हि सगळे आपलेच.खान स्वताशीच हसत स्वप्नरंजन करु लागला.
खानाने अधिरपणे काकांना म्हंटले राजांना सिताब घेऊन या. काकांनी बाहेर असलेल्या जासुदाकरवी गडावर निरोप पाठवला. पण काका स्वतः मात्र तेथून हलले नाहीत. कारण खानावर लक्ष ठेवणे गरजेचे होते, त्याचा काय भरवसा ?
-------------------------------------------------------
राजे गड उतरुन शामियानाच्या परिसरात येउन पोहचले.भव्य शामियान्याच्या तितक्याच भव्य प्रवेशद्वारातून आत काय चालले आहे ते दिसत होते. आत खान लोडाला टेकून आडवा झाला होता,तर त्याचा खितमदगार बडा सय्यद हातात पट्टा चढवून शेजारी उभा होता.कृष्णाजी पंत एका कोपर्‍यात उभे होते.राजांनी ईशारतीने गोपिनाथ पंताना बोलावून घेतले."पंत खान ठरल्याप्रमाणे वागत नाही असे दिसते.शामियान्यात हत्यारबंद सेवक असणार नाही असे ठरले होते तरी बडा सैय्यद तिथेच उभा आहे,त्याला दुर जायला सांगा"
पंत घाईघाईने शामियान्यात गेले."हुजुर, शिवाजी राजे बाहेर मुलाखतीसाठी येउन उभे राहिले आहेत."
"तो फिर देर किस बात कि?बुलाओ उसे अंदर" खान मग्रुरीत म्हणाला.
"जी, लेकीन वो डर रहे है.आपके कदीम खिदमदगार सैय्यद जो यहां खडे है.भेटीच्या ठरलेल्या कराराप्रमाणे शामियान्यात हत्यारबंद शिपाई असणार नाही" पंतानी खानाला समजावले.
"डर रहे है ! अरे और कितनी बार ये सुनेंगे ?डर रहा है तो ठिक है. कोई बात नही.सैय्यद, तुम बाहर जा के रुको.जरुरत पडे तो हम तुम्हे आवाज देंगे"
मुजरा घालून बडा सय्यद ठरलेल्या जागी जाउन उभा राहीला. राजांचे मावळे ठरलेल्या जागी जाउन मोहरा घेतला. राजांनी शामियान्यात प्रवेश केला आणि ताठ मानेने खानाच्या नजरेला नजर देउन उभे राहीले. खान सदरेवर उठून उभा राहिला.'तो अब सिवा हात आया.इसी पल का मुझे इंतजार था.अब ये पहाडी चुहा कहां भागेगा' खानाच्या मनातील विचार त्याच्या मुद्रेवर स्पष्ट वाचता येत होते.राजांच्या अपमान करण्याच्या हेतुने त्याने मोठ्या गुर्मीने गोपिनाथ पंताना विचारले,"पंत,सिवा,सिवा सुन रहे थे,ये है क्या सिवा?"
तितक्याच ठामपणे राजांचा स्वर शामियान्यात घुमला,"कृष्णाजी ! खान, खान म्हणत होता,तो हाच का खान ?"
अफझल आता चांगलाच चमकला.ईतके दिवस सिवा भितो आहे असे एकत होतो.ईथे तर सिवा न घाबरता आमच्या समोर उभा रहातो आणि आम्ही कोण म्हणून विचारतो.म्हणजे सिवा ईतके दिवस भ्याल्याचे नाटक करत होता ? खानाने आपली तलवार कृष्णाजींकडे दिली तर राजांनी त्यांची भवानी गोपिनाथ पंतांकडे सुपुर्द केली.
खान आढ्यतेने म्हणाला ,"हा ईतका अलिशान शामियाना आणि हि ईतकी दौलत ! सिवा, आप तो एक नाचीज शख्स है"
राजे ताठ मानेने आणि स्थिर नजरेने खानाकडे पहात म्हणाले "खानसाहेब्,ज्याची करणी त्याला ! भ्यावे ते रघुनाथाला भ्यावे कि तुम्हाला ?आपण कोण ते आम्ही चांगले जाणतो"
या सडेतोड उत्तरामुळे खान चांगलाच चकीत झाला पण स्वताला सावरुन वरकरणी तो म्हणाला,"अरे तु हा फुकटचा युध्दाचा उत्साह कशासाठी आणला होतास, पातशाही चाकरीचा नितीमार्ग सोडून हा बगावतीचा गलत रस्ता का धरलास ?तु आदिलशाहीची,कुतुबशाहीची किंवा सर्वशक्तिमान दिल्लीच्या पातशहाची सेवा करत नाहीस. स्वताच्या सामर्थ्याची घमेंडी धरतोस म्हणुन तुझ्यासारख्या उध्दटाला शिक्षा करण्यासाठी मी आलो आहे.हा दौलतीचा लोभ सोड, तुझे सर्व किल्ले दे आणि मला शरण ये.मी तुला माझ्याबरोबर विजापुरला घेउन जाईन आणि स्वताचे हाताने तुला पातशहासलामतांच्या समोर नेउन मुजरा करायला लावीन आणि मग यापेक्षा मोठी दौलत तुला देईन. आवो सिवा, हि शहाणपणाची घमेंड सोडून माझ्या हातात हात दे आणि मला अलिंगन दे" खान दोन्ही हात पसरुन उभा राहिला.राजशिष्टाचार म्हणून असे आलिंगन द्यायचे आहे आणि जो दगा होईल तो येथेच याची चांगलीच जाणीव राजांना होती. शांतचित्ताने राजे खानाजवळ आले. खानाने दोन्ही हात पसरले. साक्षात मृत्युच्या जबड्याने आपला आ वासला होता. असाच प्रसंग रामावर मेघनाथाने नागशक्ती सोडली तेव्हा आला, लंकेत जाताना राक्षसीने आपला जबडा पसरुन हनुमानाला मृत्युचे आव्हान दिले होते, बालकृष्णावर कंसाने असंख्य राक्षस पाठवेले तेव्हा आला होता.हे सगळे त्या यमपाशातून यशस्वी बाहेर पडले होते.आज तोच इतिहास पुन्हा घडणार होता का ? राजांनी खानाला अलिंगन दिले आणि काळाचाही श्वास थांबला. असेच असंख्य श्वास यावेळी थांबले असावेत, राजगडावर जिजाउंचा, राणीवशातील समस्त शिवपत्नींचा, कंपालीच्या किल्ल्यातील शहाजीराजांचा, शिवथरघळीत समर्थांचा, असंख्य मावळ्यांचा, स्वराज्याच्या आणि स्वराज्यात नसलेल्या पण पातशाही जाचातून मुक्त होण्याची इच्छा असणार्‍या सर्वसामान्य रयतेचा, सगळ्या तीर्थस्थानावर हा प्रसंग सुखरुप निभावून जावा यासाठी देव पाण्यात असावेत. कदाचित कृष्णा,कोयनाही वहायच्या थांबल्या असतील.
धिप्पाड खानाच्या मिठीत राजे दबले गेले.खान उंचापुरा, धिप्पाड, त्याच्या जेमतेम छातीपर्यंत राजांचे डोके पोहचत होते. अचानक खानाने राजांचे मस्तक डाव्या बगलेत दाबून धरले, विलक्षण चपळाईने उजव्या हाताने कमरेला लपवलेला कट्यार म्यानातून बाहेर काढली आणि राजांच्या बगलेत चालवली.पण राजांच्या अंगरख्याखाली चिलखत होते त्यामुळे राजांना कोणताच धोका झाला नाही. खानाने पहिला दगा दिल्याचे पाहून राजे संतापले,त्यांनी डाव्या हातात बिचवा घेतला आणि खानाच्या पोटात चालवला.खानाने अंगरख्याच्या आत काही घातलेले नव्हते, त्यामुळे बिचव्याचा वार पोटात थेट आत गेला.पोट फाडून बिचवा बाहेर काढताना त्याबरोबर खानाची आतडीही बाहेर आली. रक्त्,चरबीचा लोंढ्याने सदर लाल झाली. खानाची मिठी एकदम सुटली. एकक्षण त्याला काय झाले ते कळालेच नाही.आपल्या पोटाकडे त्याचे लक्ष गेले आणि डोळे वटारुन तो आपल्याच पोटातून ओसंडणारे रक्त बघत होता,वेदनेने त्याचा चेहरा पिळवटला. शामियान्यातील दोन्ही वकील दिगमुढ होउन हे दृष्य बघत होते. अचानक खानाला भान आले, तो जोरात ओरडला "मारले! मारले!! दगा! दगा!! धावा, इसने मुझे मारा, इसे खतम कर डालो". तितक्यात कृष्णाजी भास्करांना प्रसंग लक्षात आला, त्यांनी खानाने दिलेली तलवार हाती घेउन राजांवर उगारली. सावरलेल्या राजांनी गोपिनाथ पंतांकडची भवानी तलवार हातात घेउन कृष्णाजी भास्करांचा वार अडवला आणि म्हणाले, "पंत, आम्ही बालक, स्त्री,ब्राम्हण यांचेवर शस्त्र उगारत नाही,आपण तलवार आवरावी". पण रागाने बेभान झालेल्या कृष्णाजींनी आणखी एक वार करण्याचा प्रयत्न केला, मग राजांचा नाईलाज झाला. तलवारीच्या एकाच घावात त्यांनी कृष्णाजींना यमसदनी पोहचवले. तसेच पट्ट्याचे दोन घाव घालून खानाच्या मस्तकाचे दोन तुकडे केले. खानाचे मस्तक एकीकडे पडले, कोथळा दुसरीकडे, शरीर तिसर्‍याच जागी पसरले,रत्नांचा शिरपेच्,पट्का विखरुन खानाचा अंत झाला. एका राक्षसी महत्वाकांक्षेचा अंत झाला. थोरले बंधू संभाजी राजांना दगा देणार्‍या नीचाचा वध झाला, शहाजी राजांना कैद करणारी दुष्ट प्रवृत्ती जावळीच्या भुमीवर तुकडे होउन पडली होती, असंख्य मुर्त्यांना ध्वस्त करणारे ते हात आता कधीच कोणत्या देवतेला उपद्रव देणार नव्हते, अनेक हिंदूवर अत्याचार करणारे ते डोळे खोबणीतून बाहेर आले होते. असंख्य रोखले गेलेले श्वास जणु पुन्हा सुरु झाले. विकारी नाम संवत्सरी, मार्गशीर्ष मासी,शुक्लपक्षी, सप्तमी तिथीस्,गुरुवारी, माध्यान्ही, देवदेष्टा अफझलखान ठार झाला. सह्याद्रीचा स्तंभ कडकडून नरसिंह बाहेर आला आणि त्याने हा बत्तीस दाताचा बोकड फाडून टाकला.
ईतक्यात शामियान्यातील गडबड एकून खानाच्या पालखीचे भोई लगबगीने आत आले, त्यांनी खानाचे प्रेत कसेबसे उचलले आणि पालखीत घालून पळायला सुरवात केली.खानाचे दहा अंगरक्षक शामियान्यात धावून आले.सय्यद बंडाला झालेला प्रसंग लक्षात आला, संतापाने त्याने राजांवर चार्,दोन वार केले,मात्र राजांनी हातातील तलवारीने ते परतून लावले. डोळ्याचे पाते लवते आहे न लवते आहे तोच जीवा महाला तिथे पोहचला आणि "राजं,थांबा! याला मीच मारतो" म्हणून सय्यद बंडाला काय होते आहे हे समजायच्या आत त्याचा हात कलम केला.दुसर्‍या घावात सय्यद बंडला जीवाने कायमचे लोळवले.खानाचे बाकीचे अंगरक्षक धावून आले,पण त्यांना राजांच्या दहाही अंगरक्षकांनी त्यांना क्षणार्धात संपवले. या गडबडीत गोपिनाथ पंतावरही वार व्हायचा,पण राजांनी त्यांना वेळीच सावरले. बघता बघता काही क्षणापुर्वी सजलेला शामियाना रक्तांने माखला होता,जिकडे जिकडे मुडदे पडले होते. या गर्दीचा फायदा घेउन खानाचे शव घेउन पळणारे भोई आणि पालखी संभाजी कावजीच्या लक्षात आली"अरे चालला कुठ ? खानाला आता हितच गाडणार हाय आम्ही" असे म्हणून संभाजीने काकडी कापावी तसे भोयांचे पाय कापले. क्षणार्धात सगळे भोई विव्हळत जमीनीवर पडले.त्यांच्या खांद्यावर घेतलेली पालखी धाड्कन जमीनीवर पडली. त्यातून खानाचा अवाढव्य मृतदेह जमीनीवर अस्ताव्यस्त पडला. त्याच बरोबर संभाजी कावजी पुढे झाला आणि एका घावात खाटकन त्याने खानाचे मुंडके कापले आणि एका हातात धरुन विजयी उन्मादात राजांकडे धावला. चढे घोडीयानिशी सिवाला पकडून विजापुरला नेण्याची भाषा बोलणार्‍या खानाच्या शरिरावर त्याचे मस्तकही राहीले नव्हते. राजे आणि त्यांचे दहा अंगरक्षक अत्यंत वेगाने गडाकडे निघाले. टेहळणी बुरुजाच्या तटावरुन खाली हे दृष्य पहाणारे मावळे थक्क झाले.रक्ताने माखलेला राजांचा अंगरखा बघून काळजीने त्यांना काय करावे ते समजेना. राजांनी त्यांना ताबडतोब तोफेची ईशारत देण्यास सांगितले.
----------------------------------------------------
धाड ! धाड !! धाड !!! तोफांचे इशारतीचे तीन बार जावळीच्या रानातील किर्र शांततेत घुमले.शिंग वाजली. खानाची छावणी काहीशी सुस्तावली होती.हे तोफांचे बार म्हणजे भेटीची सलामी असावी अश्या कल्पनेने फार कोणाला त्याचे काही वाटले नाही आणि सगळी छावणी एका कुशीवरची दुसर्‍या कुशीवर झाली.ईतक्यात -----
इतके दिवस गुढ शांत भासणारे जंगल जिवंत झाले.'हर हर महादेवच्या आरोळ्या उठल्या. एकच गलका झाला आणि काही समजायच्या आतच चोहोबाजुने पेव फुटावे तसे झाडीतून मावळे बाहेर येउ लागले.जणु नवी सृष्टी निर्माण झाली.झाडाआडून ,जाळ्यांमागून खडकांच्या बाजूने शिवाजी राजांचे सैन्य बाहेर पडू लागले. एकच कापाकापी सुरु झाली.कित्येकांना आपण कधी मेलो याचाच पत्ता लागला नाही. कित्येकांना हत्यारे घेण्यास किंवा घोड्यावर चढण्यास सवड मिळाली नाही. बाजी सर्जेरावनी जिवाची शर्थ केली, कन्होजी जेधे,बांदल सेना पार गावाच्या परिसरातून येउन खानाच्या लष्करावर तुटून पडली. गडाच्या उतारावर अडकलेल्या दिड हजार पठाणी सेनेवर खासे नेतोजी आणि त्यांच्या फौजेने झडप घातली, फाझलखान, अंकुशखान, मुसेखान त्यांच्या छावणीत आराम करत होते,सगळे आवाज एकून बाहेर आले,तोच त्यांना बेभानपणे शाही फौजेची लांडगेतोड करणारे मावळे दिसले.ईतक्यात गडाच्या उतारावरुन धावत आलेल्या काही पठाणांनी खबर आणली कि खासा अफझलखान मारला गेला आहे. हि खबर एकून सैन्याचा धीरच खचला.उलट सहा महीने ह्या शाही फौजेचा धुडगुस पहाणार्‍या,दैवतांच्या विटंबनेच्या बातम्या एकणार्‍या आणि मुलुख गेलेला पहाणारा सामान्य मावळा त्वेषाने पेटून उठला. सपासप तलवारी चालु लागल्या. प्रत्येक मावळा हजाराला भारी होता. साऱ्यांनीच 'हर हर महादेवच्या' गजरात एकच कल्लोळ उडऊन दिला. अगदी बेभान होऊन एका एकाची खांडोळी उडवीत होते, रक्ताचे पाट वाहू लागले. कृष्णा-कोयना लाल पाण्याने वाहू लागल्या. जावळीचे अरण्य आक्रोश आणि रणगर्जनांनी भरून गेले. पळून सुदधा जात येईना. खानाच्या सैन्याला पळून जायला एकच वाट होती ! ती म्हणजे नरकाची......
शाही फौजेची ती बेसुमार हानी मुसेखाना पठाणाला बघवेना, तो नेट धरुन सैनिकांना म्हणाला, "आपले खानसाहेब पैंगबरवासी झाले म्हणून सगळे संपले काय ? आम्ही अध्याप हिंमत धरुन आहोत्,चारही बाजुने रस्ते बंद आहेत, तेव्हा आपला पराक्रम दाखवा.पळून कसले जाता?" आपले धनुष्यबाण घेउन मुसेखान रागाने छावणीबाहेर पडला. विजापुरी सैन्याच्या तोफा सुरु झाल्या.मात्र ईतक्यात मोरोपंताचे पारघाटातील लष्कर दाखल झाले. त्या धडाक्याने शाही फौजेची उरलेली हिंमत खचली.सैन्य सैरावैरा पळत सुटले. जो मुसेखान त्वेषाने धीर धरुन आला होता, त्याचे धनुष्य तोडले गेले, घोडा मेला.तेव्हा सरळ युध्दभुमीतून मुसेखान पळत सुटला. याकुतखानाने थोडा प्रतिकार केला,मात्र आपली काही खैर नाही हे बघून त्याने झाडीच्या आडोश्याने पलायन केले. अंकुशखान तर अनवाणीच पळाला आणि आपल्या दोन भावांची पर्वा न करता फत्तेखान पायाला चिरगुटे बांधून गर्द अरण्यात पशार झाला.ईतक्यात सुर्य मावळतीला गेला. जावळीच्या रानावर अंधाराबरोबरच थंडी उतरली. खानाचे बरेचसे सैन्य पडाव झाले होते. कोणताही सेनापती नसलेले अफझलखानाचे सैन्य शरण आले. राजांचा चुलत चुलता मंबाजीराजे भोसले या युध्दात मारला गेला. तर झुंजारराव घाटगे, छोटा रणदुल्लाखान्,अफझलखानाचे दोन मुलगे सापडले. ह्या सगळ्या समरप्रसंगात महाराजांच्या सैन्याला मोठी लुट हाती लागली. पासष्ट हत्ती, चार हजार घोडे, बाराशे उंट्,तीन हजार जड्,जवाहिरे,दोन हजार कापड, सत्तर हजार नगद मोहोरा, याशिवाय तोफा हे सर्व गाढवावर लादून प्रतापगडाची वाट चढू लागले.
कैद झालेल्या सरदारांना राजांसमोर उभे केले गेले. राजांनी त्यांना आदराने वागवले.ज्यांना चाकरीत यायचे होते त्यांना पदरी घेतले.ज्यांना परत विजापुरला जायचे होते, त्यांना वाटखर्चाची सोय करुन रवाना केले गेले. झुंझारराव घाटगे व शहाजीराजांचा परमस्नेह होता,हे जाणून महाराजांनी आपल्या जवळ रहाण्याचा आग्रह केला,मात्र त्यांनी तो मान्य न केल्याने त्यांना वस्त्रालंकार देउन सन्मानाने रवानगी केली. युध्दात जे जखमी झाले होते त्यांचा महाराजांनी स्वतः परामर्श घेतला. जे रणामध्ये मृत्युमुखी पडले होते त्यांच्या मुलांना वेतन पुढे सुरु राहिल असे पाहीले, ज्यांना पुत्र नाही त्यांच्या स्त्रीयास निम्मे वतन दिले गेले, जखमी झाले होते त्यास दोनशे होन, शंभर होन्,पन्नास होन व पंचवीस होन असे जखमेचे स्वरुप पाहून दिले गेले. युध्दात पराक्रम केलेल्या वीरांना बक्षिस म्हणून घोडे,हातातील कडी, कंठमाला,तुरे,पदक्,चौकडे, मोत्याचे तुरे दिले गेले. काहींनी केलेला पराक्रम ध्यानी धरुन त्यांना गाव मोकासा दिला गेला.एकूण राजांना या युध्दातून भरपुर संपत्ती मिळाली,त्याचबरोबर त्यांनी युध्दात भाग घेतलेल्या प्रत्येकाचा यथोचित सन्मान केला.
--------------------------------------------------------------------------
गर्द झाडी, डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा अंधार, मार्गशीर्षाची कडाक्याची थंडी, काटे बोचणर्‍या जाळ्या, यातून धडफडत चालत रहावे तो पायाच्या कोणत्या बोटाला ठेच लागून कळ मेंदूपर्यंत जाईल त्याचा नेम नव्हता. आजुबाजुला प्राण्यांचे भेसुर आवाज.अश्या खडतर परिस्थितीतही फाझलखान, मुसेखान्,अंकुशखान आणि खवासखान चालत होते. युध्दभुमीतून पळाल्यानंतर योगायोगाने त्यांची गाठ पडली होती.आपण कोणत्या दिशेला चालतो आहोत त्याचा पत्ता लागत नव्हता. पण फक्त चालायचे,निदान अंतर काटले जाईल.चुकून त्या सिवाच्या फौजेत सापडलो तर प्राणाला मुकू याची खात्रीच या चौघांना होती. ईतके सांगूनही अफझलखानाने या कोणाचेही एकले नव्हते,याब्ध्दल ते खानाला दोष देत होते.सिवाला तर दर पावलागणीक शिव्यांचा भडीमार सुरु होता. चार-पाच घटकांपुर्वी हेच सगळे अलिशान तंबुत आराम करत होते यावर त्यांचाच विश्वास बसत नव्हता. अजून सप्तमीचा चंद्र उगवायचा होता,मात्र चांदण्यांचा थोडाफार अंधुक प्रकाश जावळीच्या खोर्‍यावर पडला होता.अचानक फाझलखानाला त्या प्रकाशात लांबवर काही माणसांची चाहूल लागली. सगळ्यांचे प्राण कंठाशी आले. माणसे ! म्हणजे त्या सैतान सिवाचे लोक तर नव्हेत ? या खुदा! शेवटी सापडलोच आपण. ईतक्यात त्या सावल्या जवळ जवळ येउ लागल्या.चौघांनीही बाजुच्या जाळीच्या आडोशाला उड्या मारल्या. तीन-चार लोक बोलत बोलत येत होते. त्यांचा आवाज जसा जवळ आला, तसे अचानक फाझलखानाला जोष आला,तलवार उपसून तो जाळीच्या बाहेर पडला आणि त्या लोकांच्या दिशेने धावत सुटला.फाझलखानाला ईतके साहस कोठून आले असा प्रश्न खवासखानाला पडला,तो हि घाईघाईने जाळीतून तलवार उपसून फाझलखानाच्या मागे धावला. फाझल रागाने धावत त्या लोकांपर्यंत पोहचला आणि त्यातील एकाची गचांडी त्याने रागाने धरली आणि तलवार उपसून म्हणाला,"तुम्हे तो मै मार डालुंगा. तुम हि इस हादसे कि जड हो. तुमनेही मेरे अब्बुजानको ईन घने और पहाडी मुल्क मे आने को मजबुर किया,जिस की वजह से आज उनको जान गवाने कि बारी आ गयी.मै तुम्हे यही कत्ल कर देता हुं"
अचानक झालेल्या हल्ल्याने बाचवळल्याने तो सरदार फाझलखानाच्या पाया पडू लागला,"हुजुर, मुझसे गलती हो गयी.मुझे माफ करो.शिवाजी असा दगा करलं असं सपनात बी वाटल नव्हतं.मला वाटलं खानसाब त्याला चिरडून टाकतील".
ईतक्यात जवळ पोहचलेल्या खवासखानाच्या लक्षात सारा प्रकार आला.सापडलेला माणुस प्रतापराव मोरे होता.याच नालायकाने स्वताला राज्य पाहिजे म्हणून विजापुरची फौज अश्या भयंकर प्रदेशात आणली होती. याच्यामुळेच सर्वस्व गमावण्याची वेळ आली होती. पण हि वेळ विवेकाने घ्यायची होती.प्रतापरावाला शिक्षा पुन्हा केव्हाही करता आली असती. आता सर्वात महत्वाचे होते,चक्रव्युहासारख्या अवघड अश्या या भयंकर प्रदेशातून सुटण्याचे.
"फाझल, रुको उसे मत मारो.वरना हम सब और मुसिबत मे फस जायेंगे"
"क्यों ? इसे तो अभी के अभी खत्म कर देना चाहिये" फाझल रागाने धुमसत होता.खवासखानाने कसेबसे फाझलला आवरले आणि विलक्षण मउ आवाजात तो प्रतापरावाला म्हणाला,"देखो प्रतापराव्,जो हुआ सो हुआ.अब पहले ये बताओ कि हम जल्द वाई कैसे पहुंच सकते है? वहां हमारा जनाना है.जितने जल्दी हो सके उन औरतोंको लेकर विजापुर भागना होगा.कही सिवा के लोग वहां पहुंच गये तो जिंदा बचना मुष्कील है".
"आप फिकर मत करो हुजुर! मला जावळीच्या उगवतीकडून चढणारी आडवाट म्हायती हाय.त्या वाटंला कोनबी येत न्हायी.चला बीगी बीगी,लवकर वाईला पोहचाय पाहिजे" सगळ्या सावल्या त्या वाटेने वेगाने वाईकडे निघाल्या.
---------------------------------------------------------
प्रतापगडाच्या सदरेवर विलक्षण उत्साही वातावरण होते.का असणार नव्हते ? कालची रात्र संपुर्ण गड चिंतेने तळमळत होता,तर पायथ्याची खानाची छावणी विजयाची आणि सिवाला ठार मारण्याची स्वप्न पहात निंवात निजली होती.आज प्रतापगडावर विजयी सभा भरलेली होती,तर खानाच्या छावणीपाशी फक्त प्रेत आणि अस्ताव्यस्त पसरलेले सामान उरलेले होते.पण त्याठिकाणी नाही म्हणायला अजून थोडी जाग होती,जंगलातील कोल्हे,लांडगे,तरस तिथे एकत्र जमून मृतदेहाचे लचके तोडत होते,मधूनच त्यांचे भेसूर आवाज उमटायचे.आता त्यांना पुढचे काही दिवस पुरेल ईतके मास तिथे होते.
"राजं,लई मोठा पराक्रम आज केलासा" कान्होजी विलक्षण खुषीत होते.तसा तर प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आनंद ओसांडून वहात होता.सुर्यास्त झाला तरी आज गडाचे दरवाजे उघडे होते, विजयश्रीचे स्वागत करायला नको? एकेक वीर गडावर चढून सदरेत येत होता.तो आला की त्याची पराक्रम गाथा सांगत होता, हास्याचे फवारे उडत होते. फार दिवसानी गड मनमोकळे हसत होता.आउसाहेबांना आणि राणीवशाला हि बातमी पोहचवायला हेजीब तातडीने राजगडावर रवाना झाला होता.
राजांनी सर्वप्रथम गोपिनाथ पंताना बोलावले.पंत जुने जाणते माणुस.थेट आउसाहेब आणि शहाजीराजांच्या जवळचे.त्यांनी तलवारीने पराक्रम गाजवला नसला तरी जिभेचा पट्टा चांगलाच चालवला होता.राजे म्हणाले"पंत, तुम्ही मोठी कामगिरी बजावलीत.खानाच्या भेटीच्या वेळी तलवारीचा वार अंगावर झेललात.आज वेळ आहे तुमच्या कामगिरीचा यथोचित गौरव करण्याचा.तुम्हाला आम्ही सासवडजवळील हिवरे गाव ईनाम देत आहोत.आणखी काही हवे असल्यास मागून घ्या"
"राजे,मी फक्त आपण नेमून दिलेले काम केले.हा देह उतारवयात स्वराज्याच्या कामी झिजला,यापेक्षा मोठे काही नाही,आपण दिले तेच अधिक आहे, आपली,स्वराज्याची सेवा करायची संधी मला मिळाली यापेक्षा जास्ती काही मला नको".
ईतक्यात नेतोजी आल्याची वर्दी सदरेवर आली.नेतोजी ताड्ताड पावलं टाकत आले आणि मुजरा घालून राजांना म्हणाले "महाराज, बहुतेक सगळी विजापुरची फौज मारली गेली. फकस्त त्यो फाझल्,अकुंश,खवासखान आणि याकुतखान पळाले.पण जाउन जाउन जातात कोठे ?जावळीच्या जंगलात आपले लोक त्यांचा शोध घेत आहेत.महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे शिरवळ्,सुपे, सासवड्,कोकण सगळीकडे आपल्या फौजेने हल्ले केल्,सगळी ठाणी ताब्यात आल्यात.सिद्दी हिलाल, नाईकजी पांढरे,नाईकजी खराटे हे सरदार आपल्याला शरण आलेत. "
"वा ! काका,एकंदरीत हि अफझल मोहीम आपल्याला फायद्याची ठरली काका.आदिलशहाने अफझलबरोबर आपल्यासाठी भरपुर रसद पाठविली." राजे थोड्या मिष्कीलीने म्हणाली.सगळी सदर माना हलवून हसली.
"काका, पण आता आपल्याला विश्रांती नाही. खानासारखा बडा सरदार आमच्यावर चालून आल्याने आदिलशाही ठाणी बेसावध आहेत.बहुतेकांचा अंदाज खान सिवाला ठार मारेल असा आहे.याचाच आपल्याला फायदा घ्यायचा आहे.कोकणात दाभोळ बंदराचे आणि वाघोटन खाडीतील अफझलच्या गलबताचे राजकारण करायला दोरोजी रवाना झाला आहे.आता वेळ आहे ती आदिलशाही मुलुखात मैदान मारण्याची !
काका,तुम्ही तातडीने वाईवर निघा,अजून फाझल वाईला पोहचला नसेल तर खानाचा खजिना वाईला तो ताब्यात घ्या.लगेच पुढे वैराटगड्,चंदन-वंदन्,पांडवगड्,सातार्‍याचा किल्ला,वसंतगड,कर्‍हाडपासून करवीरपर्यंत मुलुख आपल्याला शक्य तितक्या लवकर ताब्यात घ्यायला हवा.अफझलखानाला मारल्याचा फार मोठा हबका विजापुर दरबाराला बसेल. तो सावरायच्या आत पन्हाळगडापर्यंतचा मुलुख आपल्याला स्वराज्यात आणायचा आहे." राजांनी भराभर मसलत सांगितले.नव्या मोहीमेच्या कल्पनेने सदरेवरच्या नेतोजी,तानाजी,कान्होजी यांचे दंड फुरफुरू लागले.
-----------------------------------------------------------------------
रडत-खडत्,पडत-धडपडत एकदाचे फाझल्,मोरे,खावसखान वगैरे वाईला पोहचले.खानाची छावणी निवांत झोपली होती.प्रतापगडाच्या खाली काय अनर्थ झाला आहे ते तिथे कोणाच्याही गावी नव्हते. फाझल घाईघाईने आत गेला,तर पहार्‍याच्या सैनिकांना तो ओळखूनच येईना.कसा येईल ? फाझल्,मुसेखान्,याकुतखान सगळ्यांच्याच चेहर्‍यावर मरणकळा होती.अंगावर कपडे आहेत कि चिंध्या ते समजत नव्हते, चेहरा,सगळे अंग यावर काट्याने ओरबडून काढल्याच्या खुणा होत्या. कशीबशी सगळ्यांची ओळख पटली. 'खानाला मारला' हि बातमी समजताच एकच आकांत उसळला.सगळ्या बिब्ब्या छाती बडवून रडू लागल्या. आता मात्र फाझलचा पारा चढला.त्याने चिडून सगळ्यांना गप्प बसण्यास सांगितले आणि शक्य तितक्या लवकर आवरण्याचा हुकुम केला. ईथे एके एक क्षण महत्वाचा होता.केव्हा ते सिवाचे सैतान येतील आणि कापून काढतील याचा नेम नव्हता.त्याने घाईघाईने फौजेला आवरायचा हुकुम सोडला.फक्त आवश्यक ते सामान घेउन पळायची तयारी करायला सांगितली.सगळ्या बायकांना अक्षरश उचलून घोड्यावर घातले. प्रतापराव मोरे आणि वाईच्या छावणीवर असलेल्या खंडोजी खोपडेंनी एक मधला रस्ता धरायचा सल्ला दिला. उजेड व्हायच्या आतच सगळी फौज वेगाने पाचवडच्या दिशेने बेहाय दौडू लागली.ईतक्यात महाबळेश्वराच्या डोंगरावर मशाली घेतलेले घोडेस्वार दिसू लागले.
'अगदी वेळेवर सुटलो!'फाझलखानाने निश्वास सोडला आणि घोड्याला टाच मारली.
-------------------------------------------------------------------------------------
वैराटगडाच्या मागून प्रसन्नचित्ताने सुर्यनारायण उगवला.वाईवर धुक्याची चादर हळुहळु विरु लागली.रोजच्या सवयीप्रमाणे उठलेल्या वाईकरांना अचानक शांतता जाणवू लागली.खानाच्या छावणीची काहीच चाहुल नव्हती. तळावर अक्षरशः चिटपाखरू नव्हते.अचानक राजांची काही माणसे घोड्यावरुन गावात शिरली, त्यांनी ती बातमी साखरेच्या मुठींनी सांगितली,'खान मारला गेला'.गेले तीन महिने छळणारा तो दैत्य मेला ! सगळीकडे एकच आनंदाचे वातावरण उसळले. सगळे वाईकर आज दिनक्रम विसरले.एरवी चैत्रात बाहेर निघणारी गुढीची काठी आज मार्गशीर्षात बाहेर निघाली आणि राजांच्या स्वागतासाठी गुढ्यातोरणं उभारल्या गेल्या. सगळीकडे सडा,रांगोळ्या घातल्या गेल्या.हार्,फुलांनी अंगणं सजून गेली.
ईतक्यात घोड्यांच्या टापाच्या आवाजात राजे आणि मावळ्यांची फौज वाईत शिरली. सुवासिनींनी राजांना ओवाळले.राजे खानाच्या छावणीवर गेले आणि तिथे मोहीमेचा आढावा घेत असताना नेतोजी काका फौज घेउन निराश मनस्थितीत आत आले.
"राजं! त्यो फाझल निसटला.प्रतापराव मोरे आणि खंडोजी खोपड्यांनी त्याला मधल्या वाटन कर्‍हाडला नेल हाय.मी फौज त्याच्या मागावर सोडली,पण मध्ये लयी वेळ गेलाय्,सापडला न्हाई तो" नेतोजी खाली मान घालून म्हणाले.
"ठिक आहे काका,आता आपणही वाईत फार वेळ थांबायला नको.लगेच निघुया. तुम्ही काही फौजा चंदन-वंदन आणि वैराटगडावर पाठवा.आम्ही तातडीने कर्‍हाड गाठतो"
----------------------------------------------------------------------------
कृष्णा कोयनेच्या तीरावर वसलेले सातवाहनांची राजधानी असलेले प्राचीन कर्‍हाड! फाझलखानाची फजिती सांगत कृष्णा आली तर खानाच्या सैन्याने लाल झालेली कोयना तीला मिळाली. फाझल मात्र आधीच ईथून निसटला होता. अर्थात फाझल गेला तरी आदिलशाही मुलुख मात्र स्वराज्यात आला होता. राजांनी वाटेतील सगळी ठाणी घेउन लगेच करवीरावर जाण्याचा हुकुम केला.
राजांनी प्रसन्नचित्ताने महलक्ष्मीच्या मंदिरात प्रवेश केला.राजा कर्णदेवाने बांधलेल्या त्या प्राचीन मंदिराने कित्येक वर्षानंतर मोकळा श्वास घेतला. पुजार्‍यांनी राजांना आस्थेने महालक्ष्मीच्या मुर्तीजवळ नेले.मातेच्या त्या प्रसन्न मुखाकडे राज पहात असताना विचार करु लागले.
'खानाने आमच्या तुळजापुराला,पंढरपुराला,शंभु महादेवाला उपद्रव दिला.आज आमची महालक्ष्मी यावनी जाचातून मुक्त झाली.याचप्रमाणे बाकी सर्व तिर्थस्थळे मुक्त होतील तेव्हा आमच्या या स्वराज्याच्या कार्याला खरा अर्थ प्राप्त होईल.आईभवानीला दिलेल्या त्रासातून सुरु झालेली हि मोहीम आई महालक्ष्मीला मुक्त करुन संपली'.
समाधानांनी राजांनी त्या आदिशक्तीसमोर मस्तक झुकवले.
(समाप्त )

माझे सर्व लिखाण तुम्ही येथे एकत्र वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

संदर्भग्रंथः-
१) शिवभारत- कविंद्र परमानंद
२) सभासदाची बखर- कृष्णाजी अनंत सभासद
३) ९१ कलमी बखर
४) राजाशिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे
५) शिवचरित्र निंबधावली
६) अफझलखानाचा वध- वि.ल.भावे
७ ) छत्रपती शिवाजी-सेतु माधवराव पगडी
८) युगप्रवर्तक शिवाजी महाराज-वा.कृ.भावे
९ ) मराठ्यांची बखर- ग्रँट डफ
१०) शिवाजी अँड हिज टाईम्स- जदुनाथ सरकार
११) पत्रसार संग्रह भाग १,२,३
१२ ) नेताजी पालकर यांचे युध्दातील योगदान
१३) शिवकाल- वि.गो.खोबरेकर
१४) चंद्रराव मोर्‍यांची बखर
१५) मराठ्यांचा इतिहास- अ.रा.कुलकर्णी,ग.ह.खरे
१६) शिवाजी महाराज चरित्र- कृ.अ.केळुसकर

इतिहासलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

26 Sep 2020 - 1:26 pm | अनन्त अवधुत

हा पण भाग मस्त जमुन आला. सगळी लेखमाला आता परत एकदा वाचतो.

नीलस्वप्निल's picture

26 Sep 2020 - 1:27 pm | नीलस्वप्निल

वाटच पहात होतो... खुप सुन्दर वर्णन...

शशिकांत ओक's picture

26 Sep 2020 - 2:45 pm | शशिकांत ओक

थरारक सांगता...

विनिता००२'s picture

26 Sep 2020 - 5:15 pm | विनिता००२

वा! वाचते आहे असे वाटलेच नाही. काय जोश आहे लिखाणात पण! :)

डोळ्यांत पाणी आले.

सुखी's picture

26 Sep 2020 - 11:24 pm | सुखी

दंडवत __/\__

टवाळ कार्टा's picture

27 Sep 2020 - 6:38 am | टवाळ कार्टा

भारी

सुंदर लेखमाला! कितीही वेळा खानवधाच्या वेगवेगळ्या गोष्टी वाचल्या तरीही परत परत वाचताना तिचकीच उत्सुकता आणि थरार अनुभवता येतो!

तसेच पट्ट्याचे दोन घाव घालून खानाच्या मस्तकाचे दोन तुकडे केले. खानाचे मस्तक एकीकडे पडले, कोथळा दुसरीकडे, शरीर तिसर्‍याच जागी पसरले

आणि

त्याच बरोबर संभाजी कावजी पुढे झाला आणि एका घावात खाटकन त्याने खानाचे मुंडके कापले आणि एका हातात धरुन विजयी उन्मादात राजांकडे धावला

ह्या काहीतरी घोळ होतोय!

- (मावळा) सोकाजी

दुर्गविहारी's picture

28 Sep 2020 - 1:59 pm | दुर्गविहारी

प्रतिसादाब्ध्दल धन्यवाद! थोडी चुक झाली आहे.शिवभारत ग्रंथाप्रमाणे ते वर्णन आहे.मात्र मुंडके संभाजी कावजी यांनीच कापले असे हवे.चुक दुरुस्त करतो.

गामा पैलवान's picture

28 Sep 2020 - 6:58 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,

मी ही संभाजी कावजीने प्रत्यक्ष मुंडकं कापलं असं बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या पुस्तकात वाचल्याचं आठवतं (शिवभारत तेच का?). त्यात संभाजी कावजी हाती मस्तक घेतलेल्या कालभैरवासारखा दिसंत होता असा उल्लेख आहे.

तसंच त्या प्रसंगी सय्यद बंडा त्वरेने आत घुसला व त्याने महाराजांच्या डोक्यावर वार केला असंही वाचल्याचं आठवतं. तो वार चुकवतांना राजे खाली पडले. त्यांच्यावर दुसरा वार करण्यासाठी सय्यद बंडाने हात उचलला. तोवर जिवा महालाही आंत घुसला होता (बहुतेक जिवा सय्यदपेक्षा जास्त लांबवर उभा असल्याने उशिरा घुसला असावा.). जिवाने जिवाच्या आकांताने वार करीत सय्यदचा उगारलेला हात वरच्यावर छाटून टाकला, व दुसऱ्या घावात त्यास स्वर्गवासी केलं. त्याचं कलेवर महाराजांच्या अंगावर पडलं. अफजल व सय्यद बंडाच्या रक्तात महाराजांचे कपडे पार भिजून निघाले. मात्र गंभीर दुखापत दिसून आली नाही. राजे लगबगीने प्रतापगडी कूच करते झाले. तेव्हा डोईस गव्हायेव्हढी जखम आढळून आली.

हे सगळं वाचल्याचं आठवतं, पण नक्की कुठे ते आठवंत नाही!

आ.न.,
-गा.पै.

कानडाऊ योगेशु's picture

28 Sep 2020 - 7:13 pm | कानडाऊ योगेशु

मी ही संभाजी कावजीने प्रत्यक्ष मुंडकं कापलं असं..

होय. मी ही असे वाचले आहे. पुढे असेही वाचले होते कि संभाजी कावजीने महाराजांसोबत सावलीसारखे राहायचे असे ठरले होते पण उत्साही कावजी जखमी खानाच्या मागे गेला आणि त्याचे मुंडके छाटुन आला. संभाजी कावजी एकटा खानाच्या मागे गेला तेव्हा त्याला काहीही होऊ शकले असते तर तुझ्या आईला कसे सामोरे गेलो असतो असे महाराजांनी त्याला रागे भरल्याचे वाचल्याचे आठवते

दुर्गविहारी's picture

28 Sep 2020 - 7:37 pm | दुर्गविहारी

तुम्ही जे वर्णन केले आहे ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या "राजा शिवछत्रपती" या ग्रंथात आहे. "शिवभारत" हे कविंद्र परमानंद नेवासकर यांनी लिहीले आहे.कविंद्र परमानंद हे शहाजी राजांच्या पदरी होते.शिवाजी महाराज सन १६४२ ला पुणे जहागिरीत आले,त्यांच्या बरोबर हे कविंद्र मावळात आले.त्यांनी शिवभारत उर्फ अनुपुराण हे काव्य लिहीले आहे.परमानंद शिवरायांचे समकालीन आणि मुख्य म्हणजे त्यांच्या सोबत असल्याने त्यांनी लिहीलेल्या वर्णनात बरेच तथ्य आहे.काव्य स्वरुपात असले तरी एकंदरीत वर्णन बरेच सत्याच्या आसपास जाणारे आहे.
शिवभारत प्रमाणे शिवाजी महाराजांनी वाघनखाचा उपयोग केलेला नाही तर तलवारीने खानाला मारले. ( मलाही हेच पटते.ह्याचे स्पष्टीकरण मी जो विश्लेषणात्मक लेख लिहीलेला आहे त्यात येइलच ) यामध्ये खानाच्या डोक्यावर वार झाले आणि शिवाजी महाराजांनीच खानाला मारले असे स्पष्ट आहे.मात्र विवीध एतिहासिक साधनात निरनिराळ्या शक्यता येतात.
संभाजी कावजी हा निसंशय शुर होता,पण खानाच्या वधाच्या वेळी त्याने थोडा आततायिपणा दाखविला.वास्तविक महाराजांची सुरक्षा हि त्याचे प्राथमिक कार्य होते,ते सोडून तो खानाच्या पालखीच्या मागे धावला,ज्याची काही गरज नव्हती.भेटीच्या जागेच्या आजुबाजुला बरीच फौज होती जी खानाच्या प्रेताला खाली सोड्णे शक्य नव्हते. पुढे या संभाजी कावजीला शिरवळची जहागिरी पाहिजे होती जी त्याला महाराजांनी दिली नाही म्हणून तो शाहिस्तेखानाला मिळाला. तसेच जीवा महालाने ही सांगितलेली कामगिरी एकली नाही म्हणून महाराजांनी त्याला फौजेतून कमी केले.

राघव's picture

28 Sep 2020 - 7:43 pm | राघव

संभाजी कावजी वर नंतर महाराजांची मर्जी खफा झाली हे कुठंतरी वाचलंय, पण

पुढे या संभाजी कावजीला शिरवळची जहागिरी पाहिजे होती जी त्याला महाराजांनी दिली नाही म्हणून तो शाहिस्तेखानाला मिळाला. तसेच जीवा महालाने ही सांगितलेली कामगिरी एकली नाही म्हणून महाराजांनी त्याला फौजेतून कमी केले.

हे मात्र माहित नव्हते.

अवांतरः
बाजी जेधे [सर्जेराव] हे फत्तेखानाच्या स्वारीच्या वेळेस पडले असंही कुठंतरी वाचलेलं आठवतंय. बाजी पासलकरही त्याच लढाईत पडले बहुदा. माहित असल्यास सांगावे.

माझ्या वाचनात असं आलय..

बाजी जेधे शहाजीराजांच्या पदरी होते. शहाजींनी त्यांना शिवाजीराजांकडे पाठवले. अफझल खान स्वारीच्या वेळी बाजींनीच मावळातल्या देखमुख मंडळींना हिम्मत देऊन राजांच्या पाठिशी उभे केले.
सर्जेराव हा बाजींच्या ५ औरस मुलांपैकी एक. तो वडिलांच्या अगोदरच स्वराज्याच्या सेवेला लागला. दक्षीण दिग्विजयाचे वेळी त्याला मुलगा, नागोजी, धारातीर्थी पडला. पुढे सर्जेरावाचे संभाजी महाराजांशी काहितरी बिनसले. पण नंतर त्यांचे मन संभाजीराजेंनी परत आपल्याकडे वळवले.

माझ्या माहितीप्रमाणे कान्होजी जेधे शिवाजीराजांसमवेत बंगळूराहून आलेत.
बाजी जेधे हा त्यांचा मोठा मुलगा आणि शिवरायांचा सवंगडी. सर्जेराव ही उपाधी वाटते.

पण त्यांचे नाव पुढे कुठे वाचनात आले नाही. आपण सांगीतलेली माहिती माझ्यासाठी नवीन आहे.

अर्धवटराव's picture

29 Sep 2020 - 10:21 pm | अर्धवटराव

बाजी सर्जेराव हा कान्होजीचा मुलगा. बाजी जेधेचे वडील शहाजीराजांच्या पदरी होते असं टंकायला हवं होतं.

उर्वरीत भाग बहुतेक मी संभाजी/श्रीमानयोमी मधे वाचला होता.

तुषार काळभोर's picture

27 Sep 2020 - 9:16 am | तुषार काळभोर

एक एक शब्द वाचताना अंगावर रोमांच उभे राहत होते.

हे वाचताना आपलाही श्वास तर नाही थांबला असं वाटून गेलं!

खानाने दोन्ही हात पसरले. साक्षात मृत्युच्या जबड्याने आपला आ वासला होता. असाच प्रसंग रामावर मेघनाथाने नागशक्ती सोडली तेव्हा आला, लंकेत जाताना राक्षसीने आपला जबडा पसरुन हनुमानाला मृत्युचे आव्हान दिले होते, बालकृष्णावर कंसाने असंख्य राक्षस पाठवेले तेव्हा आला होता.हे सगळे त्या यमपाशातून यशस्वी बाहेर पडले होते.आज तोच इतिहास पुन्हा घडणार होता का ? राजांनी खानाला अलिंगन दिले आणि काळाचाही श्वास थांबला. असेच असंख्य श्वास यावेळी थांबले असावेत, राजगडावर जिजाउंचा, राणीवशातील समस्त शिवपत्नींचा, कंपालीच्या किल्ल्यातील शहाजीराजांचा, शिवथरघळीत समर्थांचा, असंख्य मावळ्यांचा, स्वराज्याच्या आणि स्वराज्यात नसलेल्या पण पातशाही जाचातून मुक्त होण्याची इच्छा असणार्‍या सर्वसामान्य रयतेचा, सगळ्या तीर्थस्थानावर हा प्रसंग सुखरुप निभावून जावा यासाठी देव पाण्यात असावेत. कदाचित कृष्णा,कोयनाही वहायच्या थांबल्या असतील.

आणि प्रत्यक्ष खानाचा वध केला तो प्रसंग.. महाराष्ट्राच्या इतिहासातील सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवावा असा प्रसंग. कितीही वेळा वाचलं, ऐकलं, तरी प्रत्येक वेळी अंगावर काटा येतो!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Sep 2020 - 10:57 am | ज्ञानोबाचे पैजार

रोमांचकारी, जबरदस्त मजा आली वाचताना
आता पुढे काय? अग्र्यावरुन सुटका?
पैजारबुवा,

दुर्गविहारी's picture

28 Sep 2020 - 2:03 pm | दुर्गविहारी

धन्यवाद ! :-)

आधी याच अफझलखान वधाचे अभ्यासकाच्या नजरेतून विश्लेषण बुधवारपासून पोस्ट्करेन.त्यानंतर "स्वराज्याचा लढा आणि पुरंदराचा तिढा" हि लेखमालिका पोस्ट करणार आहे.सध्या शिवछत्रपतींच्या सर्जिकल स्ट्राईकवरची "लालमहालाची शास्त" हि कथा लिहायला घेतली आहे.

बबन ताम्बे's picture

27 Sep 2020 - 1:28 pm | बबन ताम्बे

दमदार आणि प्रभावशाली लेखणीच्या सहाय्याने आपण इतिहासातील हा अदभुत आणि रोमांचकारी प्रसंग जिवन्त केलात.
एका गोष्टीचे मात्र नवल वाटते. एवढा क्रूर आणि कपटी खान आडवाटेच्या जागी स्वतः आणि फक्त दहा अंगरक्षक घेऊन भेटीला यायला तयार कसा झाला. घटकाभर मान्य केलं की त्याला त्याच्या ताकदीची घमेंड होती म्हणून त्याने शिवाजी महाराजांना त्याने ठरवल्या प्रमाणे जिवन्त किंवा मृत पकडुन नेले असते. पण वर आणि खाली महाराजांचं एव्हढं सैन्य तयारीत असताना त्याला तरी जिवन्त परत जाता आले असते का? थोडक्यात महाराज आणि गोपीनाथ पंतांनी मुत्सद्देगिरीची कमाल करून सावज गुहेत आणलं हे स्पष्ट दिसतेय.

कानडाऊ योगेशु's picture

27 Sep 2020 - 10:06 pm | कानडाऊ योगेशु

खानाने एका हिंदु राजाला असाच दगाफटका करुन मारले होते. फक्त बोलणी करु असे चुचकारुन खान त्याला भेटायला गेला व खत्म करुन आला. त्यामुळे हा प्रकार खानासाठी अगदीच नवीन नव्हता. त्यामुळे तो गाफिल राहिला असण्याची शक्यता असावी.

दुर्गविहारी's picture

28 Sep 2020 - 2:06 pm | दुर्गविहारी

बरोबर ! शिरे या कर्नाटकातील संस्थानाचा राजा कस्तुरीरंगन याला खानाने दगा करुन मारले.

कानडाऊ योगेशु's picture

28 Sep 2020 - 3:39 pm | कानडाऊ योगेशु

धन्यु.
हा उल्लेखही अफझुलखान वधाच्या लेखात यायला हवा. ह्याने खान किती चाणाक्ष व कपटी होता व तसेच राजांचा सामना काय पातळीच्या शत्रुशी होता हे अधोरेखीत होते.

हा उल्लेख भाग २ मध्ये आलेला आहे.आपण वाचु शकता.

"बेटा, आपली दरबाराची तबियत बडी नाजुक झाली आहे. महमदशहा गुजर गये आणि दरबारात दुफळी माजली आहे. तु महमदशहाचा वारिस मुलगा नाही असा काही सरदारांचे मत आहे. आपल्यासमोर फार पर्याय नाहीत.मला वाटते आपण अफझलला सिवावर पाठवू.तो आपल्याशी एकनिष्ठ आहे.मागे चंद्रराव मोरेकडून जावळी ताब्यात घ्यायला आपण त्यालाच पाठविले होते.त्या मुलुखाचा तो जाणकार आहे. शिवाय याच सिवाच्या थोरल्या भावाला संभाला यानेच कनकगिरीच्या वेढ्यात मारले.शहाजीला यानेच जिंजीला पकडले.अब सिवा कि बारी है.अफझल धाडसी आहे.एकबार हात मे ली हुई मुहिम वो जी जानसे पुरी करेगा. और सबसे बडी बात वाई हि अफझलची जहागीर आहे.तीचा सांभाळ करणे त्याची जबाबदारी आहे"

तसेच भाग ३ मध्ये देखील हा संदर्भ आहे.

"खर आहे शिवबा, शिवाजीची आई म्हणून मेंदू आल्या प्रसंगाला तोंड दिले पाहिजे हे मानतो,पण शिवबाच्या आईचे काळीज तुटते" पुन्हा एकदा जिजाउंनी पदर डोळ्याला लावला. "हा खान तर आमचा जन्मजात वैरीच आहे जणु. आधी यानेच राजांना जिंजीच्या वेढ्यात कैद केले. विजापुरात हत्तीवर नेउन कैद केले.आपल्या थोरल्या बंधूना संभाजी राजांना कनकगिरीच्या वेढ्यात कपटाने मारले. आमच्या सुनबाई जयंतीबाईंना विधवा पहाण्याची वेळ आमच्या नशिबी आणली ती याच नीच माणसामुळे.आज तो आमच्या आणखी एका मुलाच्या जीवावर उठला आहे. काळी सावली बनूनच अफझलखान आमच्या आयुष्यात आलेला आहे."

इथे उल्लेख आहे.

बेकार तरुण's picture

27 Sep 2020 - 4:44 pm | बेकार तरुण

खूपच सुरेख लेखन.... फार मजा आली वाचायला....
अत्यंत आभारी आहे....

डीप डाईव्हर's picture

28 Sep 2020 - 5:24 pm | डीप डाईव्हर

सगळे भाग वाचले. भारीच झाली मालिका 👍

राघव's picture

28 Sep 2020 - 7:37 pm | राघव

खूप आवडली मालिका.

आधी याच अफझलखान वधाचे अभ्यासकाच्या नजरेतून विश्लेषण बुधवारपासून पोस्ट्करेन.त्यानंतर "स्वराज्याचा लढा आणि पुरंदराचा तिढा" हि लेखमालिका पोस्ट करणार आहे.सध्या शिवछत्रपतींच्या सर्जिकल स्ट्राईकवरची "लालमहालाची शास्त" हि कथा लिहायला घेतली आहे.

वाचावयास उत्सुक आहे! :-)

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:31 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:31 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:31 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:31 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:31 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:31 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान.

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान.

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान.

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान.

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान.

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान.

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान.

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान.

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान.

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान.

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान.

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान.

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान.

नितिन पाठे's picture

28 Sep 2020 - 8:32 pm | नितिन पाठे

सगळे भाग वाचले. खूप छान.

@ नितिन पाठे २१ तोफांची सलामी माहिती आहे पण २२ वेळा एकच प्रतिसाद देण्याची हि सलामी कशी काय जमली बुवा तुम्हाला?
(कृपया हलके घ्या 😀)

नितिन पाठे's picture

30 Sep 2020 - 3:10 pm | नितिन पाठे
नितिन पाठे's picture

30 Sep 2020 - 6:47 pm | नितिन पाठे
व्हय's picture

29 Sep 2020 - 12:55 am | व्हय

जबरदस्त लेखमाला. एक एक प्रसंग अगदी जिवंत उभा केलात.
संपूर्ण लेखमाला एका दमात वाचून काढली ते एकदम "सुट्टी नॉट्स" ऍटिट्यूड आपोआप भिनला....आज चार कामं जास्त होणार बघा..
धन्यवाद.__/\__

विटेकर's picture

29 Sep 2020 - 4:06 pm | विटेकर

जिथे कृष्णा - कोयना जिथे थांबल्या .. तिथे आम्ही श्वास रोखला त्यात काय विशेष !
३२ दातांचा बो़कड फाडला ... हर हर महादेव !!!

एक अत्यंत सकस आणि दर्जेदार लेख माला !! मनः पूर्वक धन्यवाद !