Skip to main content

कोविड१९ : व्याप्ती आणि भवितव्य

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 31/07/2020 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे. या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत: १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज. वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय. आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

वाचने 107712
प्रतिक्रिया 243

प्रतिक्रिया

कार्यालयीन सहकारी पॉझिटिव्ह झाला. सकाळी पॉझिटिव्ह, संध्याकाळपर्यंत इस्पितळात भरती. कोविड अगदी जवळ ठेऊन ठेपल्याची जाणीव सतत होते आहे.

हात स्वच्छ धुणे,अंतर राखणे आणि मास्क वापरणे ह्या त्रि सूत्री चा कधीच विसर पडू देवू नका. ताप येणे,कोरडा खोकला येणे, अशक्त पना जाणवणे . ह्या लक्षणाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका लगेच डॉक्टर चा सल्ला घ्या.

परवा रात्री ताप आल्यामुळे काल अँटी जेन चाचणी केली, तिचा निकाल positive आला. आज पुन्हा rt-pcr चाचणी केली. आताच email मिळाला positive असल्याचा. महानगरपालिकेने काही गोळ्या दिल्या आहे त्या कालपासून सुरू केल्या आहेत, कालपासून स्वतःचे कुटुबिया पासून विलागिकरण केले आहे. रोज व्यायाम करण्याची सवय आहे. थोड्या तापा शिवाय इतर काही त्रास होत नाही आहे. गोळ्या, आयुर्वेदिक काढा सुरू केलेला आहे ह्या व्यतिरिक्त अजुन काय काळजी व उपाय करावे ह्याचे कृपया मार्गदर्शन करावे.

In reply to by nashik chivda

करोनाची भिती बाळगू नका. सामान्य तापाप्रमाणे त्यावर आता उपचार होतात. आणि रुग्ण लवकर बरे होतात. आपणही लवकर बरे व्हाल. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेत राहा. -दिलीप बिरुटे

@ nashik chiwda , तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या, सर्व पथ्य पाळा , मन शांत ठेवा ण लवकर बरे व्हा ही शुभेच्छा :)

In reply to by पियुशा

धन्यवाद पियुशा, डॉक्टरांच्या सल्यानुसार सगळी औषधे घेत आहे. अश्विनी मेमाणे यांचा स्वानुभव दिशादर्शक ठरला.

या नव्या धाग्यावर वरील सर्वांचे आणि वाचकांचे स्वागत ! आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा ! मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन हे महत्वाचे. यानिमित्ताने गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर ,आरोग्य सेवक आणि जनसंपर्क जास्ती असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत. सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.

@ डॉ. कुमार, ह्यात आपल्या तज्ञ मार्गदर्शनाची आवश्यकता असावी : दुसर्‍या धाग्यावरील उपचर्चेत गा.पै. नी Original antigenic sin चा दाखला "परिचयकाठीण्य येण्यासाठी लस हवीच असं नाही. .....लस हा उपचार कधीच नसतो. ती फारतर पूरक असू शकते." अशा प्रकारचे मत व्यक्त करण्यासाठी (आणि बहुधा अंशतः लस विरहीत नैसर्गिक हर्ड इम्युनिटीच्या समर्थनार्थ) केला असावा असे जाणवते. यातील सरसकट सर्वच लसींबाबत संशयाचे भूत उभेकरणार्‍या तसेच लस विरहीत नैसर्गिक हर्ड इम्युनिटीच्या समर्थन करणार्‍या भूमिका, मला व्यक्तिशः साशंकीत करणार्‍या वाटतात, पण या विषयावर तज्ञ जाणकार डॉक्टरच मार्गदर्शन करू शकतील असे वाटते. अनेक आभार

मागा हा विषय गुंतागुंतीचा असल्याने मी काही अधिकृत संदर्भ सवडीने वाचेन. गरज भासल्यास संबंधित तज्ञांशी बोलेन आणि मगच लिहीन. धन्यवाद.

In reply to by हेमंतकुमार

नक्कीच काही कालावधी लागला तरी हरकत नाही, गा.पैं.च्या प्रतिसादानंतर माझ्या पहिल्या गुगलण्यात हा २०१७ मधला निबंध दुवा https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5748348/ चाळण्यात आला. रोचक वाटल्याने वाचण्याचा प्रयत्न केला पण मला विषयाची जाण नसल्याने बर्‍यापैकी डोक्यावरून गेला. आपल्याला कदाचित ऊपयूक्त वाटेल म्हणून. अनेक आभार

धन्यवाद कुमार १ आपले दोन्ही धागे १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ : घडामोडी समज,गैरसमज. व त्यावरील चर्चेतील आपली उत्तरे मला व्यक्तिश: उपयुक्त ठरली. तुम्ही हा उपक्रम राबविल्याबद्दल आपले शतश: धन्यवाद. मा. पंतप्रधानांनी घोषित केलेल्या प्रथम लॉकडाउन पासून मला खरंच वाटत नव्हते की मला स्वतःला कधी करोना टेस्ट करण्याची गरज भासेल. मागील आठवड्यापर्यंत माझ्या जवळील मित्रपरिवारामध्ये फक्त एकाच करोना positive केस होती. पण ह्या आठवड्यामध्ये अचानक ९-१० केसेस आज दुपारपर्यंत समजल्या. अचानक माझ्या शहरात ह्या केसेस कश्या वाढल्या शिवाय माझ्या चिरपरिचितांमधील जे बाधित आहेत त्यांची लक्षणे देखील एकाच प्रकारची आहेत . सरकार जरी नाही म्हणत असले तरी हे सामुहिक संसर्ग असल्याचे दिसते आहे. ह्यातून पुढील चित्र कसे असेल ह्याचा काही अंदाज तुम्ही देऊ शकता का ? वृत्त वाहिन्यांवरील धारावीच्या ज्या बातम्या पसरविल्या जात आहेत उदा. हर्ड इम्म्युनिटी ह्यात कितपत सत्य असावे ?

In reply to by nashik chivda

ना चि, सर्वप्रथम शुभेच्छा. काळजी घ्या. ......................... आपल्या प्रतिकारशक्तीचे दोन मोठे विभाग आहेत; १. अँटीबॉडीज आणि २. विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशी ( T cells). 1.antibodies : ही प्रथिने दोन प्रकारची असतात : a.. मारक (Neutralizing) b.. अ-मारक यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत/ व्यक्तीत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही). पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत. २. अँटीबॉडीज आणि T पेशींची मोजणी वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते. अँटीबॉडीजची मोजणी तुलनेने सोपी असल्याने नेहमीच्या प्रयोगशाळेत होते. याउलट पेशींची मोजणी संशोधन पातळीवर करावे लागते. ती गुंतागुंतीची असते. तसेच त्या पेशी नेहमीच रक्तप्रवाहात सापडत नाहीत. ज्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज आहेत त्यांच्यात T सेल्सची निर्मिती नेहमीच झालेली असेल असे मात्र नाही. विविध रुग्णांमध्ये वेगवेगळे प्रतिसाद आढळलेले आहेत. …………………. आपण समूह प्र- शक्तीकडे जात आहोत . आता प्रश्न जनतेच्या % चा आहे. पण ‘किती %’ वर अजून एकमत नाही. देशोदेशींचे अनुभव/मते वेगवेगळी आहेत.

आपली रोगप्रतिकार यंत्रणा healthy असावी आणि तीन तीच काम योग्य रित्या करावे इथपर्यंत समजून घेता येईल. पण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे म्हणजे काय हे समजणे अवघड जातं आहे. रोगप्रतिकार यंत्रणा जी आपल्या शरीरात असते त्या मध्ये अनेक पेशी,उती,etc ह्यांचा सहभाग असतो. प्रतेक बाह्य आक्रमका शी लढताना वेगवेगळ्या पेशी भाग घेता ,प्रतेक वेळेस लढण्याची पद्धत वेगळी असते. मग रोग प्रतिकार शक्ती वाढवणे म्हणजे नक्की कोणत्या पेशींची ताकत वाढवणे,. त्यांची संख्या कृत्रिम पण वाढवणे धोक्याचे आहे . आणि संख्या वाढवली की स्वतः शरीराचं त्या वाढलेल्या पेशी नष्ट करेल. मग इम्मुनिटी बूस्टर म्हणजे नक्की काय.

इम्मुनिटी बूस्टर म्हणजे नक्की काय.
१.काही संसर्गजन्य आजार निसर्गतः दीर्घकाळ/ कायमची प्रतिकारशक्ती देतात. २. काही आजार निसर्गतः अल्पकाळ /अपुरी प्रतिकारशक्ती देतात. ३.वरील दोनच्या बाबतीत लसीकरणचा विचार केला जातो. मूळ रोगजंतूच्या गुणधर्मानुसार लसीने मिळालेली प्रतिकारशक्ती कमी अधिक कालावधीची असते. ४. म्हणून अशा बाबतीत बूस्टर डोस ठराविक काळाने देतात.

सुरुवातीला ज्यांना कोणाला ताप आला असेल त्यांना अधिकृत सरकारी ताप केंद्रावरच जाण्याचे आदेश होते डॉक्टरांनाही तशा सूचना होत्या. आता बहुतेक हे धोरण शिथिल केले असावे. जर सौम्य आजार असेल तर घरच्या घरीच विलग करून उपचार घ्यायला सांगतात. तेव्हा रुग्णाला नक्कीच पद्धतीचा पर्याय ठरवता येईल. मात्र संबंधित चाचणी करून ती + आली असेल तर नियमानुसार त्याची नोंद सरकारदप्तरी करावी लागते. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या बाबतीत रुग्णालयानुसार आपापले धोरण आहे. काही ठिकाणी आधुनिक वैद्यक उपचारांच्या जोडीनेच अन्य पद्धतीचाही अवलंब केला जात आहे - जर रुग्णाची तशी इच्छा असेल तर. अशा वेळेस संबंधित रुग्णालयाच्या बोर्डावरीलच त्या पद्धतीचे डॉक्टर तसे उपचार देतात.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे.

भारतातील चार प्रमुख जैव व अरोग्य विज्ञान संस्थांनी मिळून - सध्या कोरोना प्रजातीतील SARS-CoV-2 प्रकारच्या वीषाणूंमुळे जी कोविड-१९ श्वसनजन्य संसर्ग आजार पसरवणारी साथ चालू आहे - त्याबद्दल एक अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिला आहे. इतर सजीवांप्रमाणे वीषाणूंमध्येही जे जनुकीय बदल होतात त्यांना म्युटेशन (उत्परिवर्तन) म्हणतात, SARS-CoV-2 ह्या करोना वीषाणूचे संक्रमण आधूनिक विज्ञानाच्या काळात होत असल्यामुळे वीषाणूंचे कोणते उत्परिवर्तन कोणत्या भौगोलीक प्रदेशात (देशात) अधिक आढळून येते आहे यावर वीषाणूविज्ञानाला लक्ष ठेवता येते (आणि मग एका अर्थाने कोणते कोणते उत्परिवर्तन कोणत्या देशातून कोणत्या देशात गेले याचे भाकीत वर्तवता येते ) त्या संबंधाने म्हणजे भारतात करोना SARS-CoV-2 कोणत्या भागात कोणकोणते करोना-उत्परिवर्तन साथ पसरवते आहे ह्याची माहिती देणारा हा अहवाल आहे. जानेवारी २०२० च्या सुमारास भारतात प्रथम आली ती 19A आणि 19B ही वुहान-चीन मध्ये आढळलेली उत्परिवर्तने; पण नंतर मागे टाकले ते युरोप, आमेरीका, पुर्व आशिया आणि सौदी आरेबीया मार्गे आलेल्या करोनाच्या उत्परिवर्तनांचा A2a haplotype (20A/B/C) with D614G गटाने हा गट भारतात अधीक संक्रमण-सक्रीय असल्याचे अभ्यास अहवाल म्हणतो. D164G हे उत्परिवर्तन संक्रमण-सक्रीयतेत अधिक प्रभावशाली असल्याचे अहवाल म्हणतो. यातील 20 B करोना-उत्परिवर्तनाचे प्राबल्य दक्षिण आणि पश्चिम भारतात आढळले तर 20 Aचे प्राबल्य पूर्व आणि ऊत्तर भारतात अधिक आढळले. मार्च ते मे भारतातील लॉक्डाऊन्समुळे इतर उत्परिवर्तनांचा भारतात प्रवेश होण्यास (तात्कालीक) अडथळा येण्यात मदत झाली असेही हा अहवाल नोंदवतो. अहवाल बनवण्यात सहभागी संस्थांची नावे * National Centre for Biological Sciences in IISc-बेंगलोर, * National Centre for Cell Science (NCCS) पुणे * the Indian Council of Medical Research (ICMR) दिल्ली, *National Institute of Biomedical Genomics (NIBMG), कल्याणी, पश्चिम बंगाल
“We will not know which haplotype is more virulent until there is further investigation and in-vitro research. The strength of the virus doesn’t just depend on the virus itself or the mutation, but also the host. India is a vast country with different socio-economic nature and customs, which determine our diet, for instance, and also our immunity. The viral load also depends on the host,’’ says Das of NIBMG
संदर्भ: इंडियन एक्सप्रेस वृत्त SARS-CoV-2 चे लॉगफॉर्म Severe acute respiratory syndrome coronavirus 2 असे आहे. मी वीषय तज्ञ नाही उत्तरदायीत्वास नकार लागू

In reply to by माहितगार

Institute of Genomics and Integrative Biology (IGIB-CSIR), नवी दिल्ली आणि Institute of Medical Sciences and SUM Hospital, भुवनेश्वर यांनी मिळून ओरीसातील ७५२ क्लिनीकल सँपल धरुन एकुण १,५३६ सँपल्सचे विश्लेषण केले तर त्यांना तब्बल करोना वीषाणूचे 73 novel variants मिळाले त्यातील B.1.112 and B.1.99 हि दोन म्युटेशन्स प्रथमच आढळली असे बातम्या म्हणताना दिसतात. सार्स-कोविड-२ (२०१९) सहा महिने म्हणजे आता पुरेसा जुना आहे तेव्हा novel हा शब्द का जोडताहेत ? की खरेच ७३ नवीन स्ट्रेन्स मिळाल्या हे बातम्यांवरून समजत नाही. पण ७३ स्ट्रेन्सचा जिनोम अहवाल बनवणे हे कामही थोडके नाही. जर ७३ स्ट्रेन्स एकट्या ओरीसात पोहचली असतील तर म्युटेशनचा हा दर प्रचंडच म्हणावा लागेल. एवढी मुय्टेशन्स का होत असतील ? आणि हे खरे असेल तर कोणत्याही एका लसीला एवढ्या सगळ्या म्युटेशन्सना तोंड देणे झेपेल का? https://www.tribuneindia.com/news/science-technology/researchers-identi… *** *** *** आमेरीकन तज्ञ Anthony Fauci लस ५०% परिणामकारक निघाली तरी साथ कह्यात आणण्यात बरेच मोठे यश म्हणताना दिसतात . https://indianexpress.com/article/explained/coronavirus-vaccine-tracker…

In reply to by माहितगार

त्याचा मथितार्थ: १. विषाणू मध्ये जनुकबदल हे सतत होत असतात. २. पण अशा प्रत्येक बदलामुळे त्याच्या प्रथिन रचनेत बदल होतोच असे नाही. ३. सध्याच्या एका विशिष्ट बदलामुळे विषाणूची संसर्गक्षमता वाढू शकते, पण हा प्रयोगशाळेपुरता काढलेला निष्कर्ष आहे. ४. तो निष्कर्ष प्रत्यक्ष मानवी व्यवहारात अद्याप सिद्ध झालेला नाही.

In reply to by माहितगार

चांगला मुद्दा. विषाणूचे उपप्रकार सांगताना दोन संज्ञा वापरतात: १. Strain : विषाणूत जनुकीय बदल होतो >> त्याच्या मानवी शरीरातील ‘वर्तनात’ बदल होतो. >> आजाराचे स्वरूप बदलू शकते. २. Clade : जरी विषाणूत जनुकीय बदल झाला तरी त्याने वरीलप्रमाणे काही होत नाही.

In reply to by हेमंतकुमार

नुकतेच एका सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांचे ‘सार्स 2 चे जनुकीय बदल’ यावरील मत वाचले. त्यांच्या म्हणण्यानुसार या विषाणूचे दरमहा सरासरी दोन जनुकीय बदल होत आहेत. आता सध्याची साथ सुरू होऊन सुमारे नऊ महिने उलटले आहेत. त्यांच्या मते एखाद्या विषाणूची पुरेशी उत्क्रांती व्हायला हा कालावधी फारच कमी आहे. अन्य उदाहरणे तुलनेसाठी पाहता येतील. जुने करोना विषाणू जवळपास पन्नास वर्षे मानव जातीमध्ये फिरताहेत, तर इन्फ्लुएंझाचे विषाणू तर शंभर वर्ष फिरत आहेत. सध्याच्या विषाणूची उत्क्रांती अजून चालू आहे. ती एवढ्या लवकर पूर्ण होईल असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

या आजाराचे काही दीर्घकालीन परिणाम होतील का? हा प्रश्न परिचितांकडून वारंवार विचारला जात आहे. त्यासंदर्भात हा जुना दाखला : पूर्वीच्या सार्स-१ ने बाधित आणि त्यातून बचावलेल्या रुग्णांचा गेली बारा वर्षे अभ्यास झालेला आहे. त्यामध्ये काहींना पुढील त्रास दिसून आले : १. वारंवार होणारे संसर्गजन्य आजार २. हृदयविकार ३. काही इंद्रियांचे ट्युमर. .......... आताच्या आजाराचेही असे दीर्घकालीन निरीक्षण करावे लागेल.

१. ज्यांना लक्षणे होती पण घरीच विलग केले होते, त्यांनी लक्षणे नाहीशी झाल्यावर दहा दिवसानंतर विलगीकरण थांबवावे. नवव्या दिवसापासून (औषधाविना) ताप अजिबात नसावा. २. जे कोविडबाधीताच्या संपर्कात होते त्यांनी १४ दिवस विलग राहावे. ३. ज्यांना बंद खोलीत १० पेक्षा जास्तीच्या समूहात जावे लागले आहे आणि त्यानंतर लक्षणे नव्हती, त्यांनी ‘त्या’ दिवसानंतर १४ दिवस विलग राहावे. ४. ज्यांना तीव्र आजार होता, त्यांनी पहिल्या लक्षणापासून 20 दिवसांपर्यंत विलग राहावे.( रुग्णालयात दाखल असल्यास तेथील सल्ल्यानुसार). ५. या सर्वसाधारण सूचना आहेत. परंतु आपापल्या डॉक्टरचा सल्ला आवश्यक.

In reply to by हेमंतकुमार

प्रवासा संबधी काय नियम आहेत , विशेष करुन जे गणेश उत्सवासाठी प्रवास करणारे आहेत त्यांच्या बाबतीत.

वरील नियम आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संस्थळावरून घेतले आहेत. प्रवासासंबंधी असे काटेकोर नियम सहसा तिथे मिळत नाहीत. संबंधित देश, राज्य सरकारे आणि त्यांचे सल्लागार डॉक्टर मिळून असे निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार तारतम्याने घेतात.

आम्ही उभयता २९ जून रोजी भारतातून अमेरिकेत मुलाकडे आलो. त्यानंतर तीन-चार दिवसातच आम्ही दोघे कोरोनाग्रस्त झालो (भयंकर अशक्तपणा आणि कोरडा खोकला दहा-पंधरा दिवस होता) नंतर मुलगा-सूनेचे रिपोर्टही पोझिटिव्ह आले. आता मात्र सर्व ठीक आहोत. कोणतेही औषध घेतलेले नाही वा डॉक्टरकडे गेलो नाही. घरीच थोडीबहुत काळजी घेऊन आपोआप बरे झालो. या सर्व अनुभवावर इथे लेख लिहीण्याचा विचार आज सकाळीच मनात आला, तेवढ्यात हा धागा दिसला.

कोणतेही औषध घेतलेले नाही ? परंतु स्थानिक सरकारने हे लक्षात आल्यावर उपचार घ्या असे सांगीतले नाही? तुमचया शहरात / राज्यात काय नियम होते त्यावेळेस ?

In reply to by चौकस२१२

@चौकस२१२... आम्ही कोणताही औषधोपचार वा डॉक्टरी सल्ला घेतलेला नाही. या सर्व अनुभवावर लवकरच लेख लिहीणार आहे.

In reply to by चित्रगुप्त

करोना प्रकरण सुरु झाल्यापासुन, पहील्यांदा काहीतरी वेगळे समोर आलेले आहे. लेखाच्या प्रतिक्षेत.

कोविडच्या सुमारे चाळीस टक्के रुग्णांना श्वसनअवरोध होतो. त्यातील काहींना पुढे फुफ्फुसकाठिण्य होत आहे, हे भारतात आणि जगात अन्यत्रही दिसत आहे. ज्यांना आज सौम्य कोविड झालेला आहे त्यांना देखील भविष्यात हा त्रास होऊ शकेल. म्हणून अशा व्यक्तींनी कालांतराने स्वतःच्या फुफ्फुसक्षमता चाचण्या तज्ञांकडून जरूर करून बघाव्यात असे सुचवले गेले आहे.

ह्यावर उपाय आहे का ?
>>>>> हा विशेषज्ञांचा प्रांत आहे. प्रत्यक्ष काठीण्य झालेले नसताना काही अगदी मूलभूत काळजी अशी असते : १. समतोल आहार २. शिस्तीत वजन नियंत्रण ३. धूम्रपान कायमचे बंद ४. व्यायाम तज्ञांचे सल्ल्याने विशिष्ट व्यायामप्रकार. या प्रकारांनी हाडे व स्नायू यांचे कमाल कंडिशनिंग केले जाते. आजार झाल्यानंतरचे उपचार फारसे समाधानकारक नाहीत. त्यावर अविरत संशोधन चालू आहे. Immunosuppressant प्रकारची काही औषधे देता येतात.

पाहिले तर covid19 बरा होतो म्हणजे काय होत. त्या साठी कोणती कन्फर्म टेस्ट आहे का की आता 1 पण व्हायरस शरीरात नाही. फक्त लक्षण संपली की रोगी बरा झाला अस आता तरी समजलं जाते. काही व्हायरस आक्रमण करत असतील आणि काही सुप्त राहत असतील जसे बाहेर च्या वातावरणात राहतात ते detect होवू शकतात का? Covid19 होवून गेल्या वर भविष्यात शरीरावर काय परिणाम करेल हा सामान्य लोकांचा विषय नाही हे क्षेत्र फक्त संशोधक मंडळी साठी आहे असे मला वाटत. Selected माहिती मिळाल्या मुळे आणि पूर्ण ज्ञान नसल्या मुळे सामान्य लोकांवर त्या माहिती चा निगेटिव्ह परिणाम होईल. सर्व सुरळीत झाले की लोक covid19 ला विसरून जातील. योग्य आहार,व्यायाम, ह्या साध्या गोष्टी पण कोणी करणार नाही. असे पण अनेक आजार,अनेक धोके क्षणा क्षणा ल आहेत. त्या अनेक धोक्याच्या गर्दीत covid19 पण हरवून जाईल.

आपण ही लेखमालिका सुरु ठेवल्याबद्दल आभार! चर्चा होऊन चांगली माहिती मिळत आहे. हा धागा बघितलाच नव्हता. आमचे काही अनुभव whatsapp वर शेअर केल्यानंतर दुर्गविहारी यांनी लिंक दिली. तेच अनुभव परत इथे टाकतोय. या सगळ्या सिस्टिम मधून जवळून जातो आहे. त्यामुळे काही गोष्टी सांगाव्याश्या वाटत आहेत. यात अभ्यास वगैरे काही नाही किंवा हेच खरं आहे असं नाही. पण जाणवलेल्या गोष्टी सांगाव्यात असं वाटलं. टेस्ट मध्ये गोंधळ आहे/नाही ठामपणे सांगता नाही येणार. पण जवळपास सगळ्या पॉजिटीव्ह लोकांना काही ना काही लक्षण दिसतात(सौम्य असली तरी). आतापर्यंत कॉमन लक्षण माहित झाली आहेतच. त्यामध्येच काहीतरी strange, वेगळं जाणवेल तुम्हाला. म्हणजे एकाने सांगितलं की "अशी अंगदुखी मला आयुष्यात कधी नव्हती!" हेच डोकेदुखी, ताप याबाबतीत. किंवा डायरिया सुद्धा काहीतरी वेगळेपण जाणवेल आणि तुमचं शरीर च सांगेल कि काहीतरी वेगळं आहे. आर्थिक दृष्ट्या शक्य असल्यास(आणि विशेषतः वयस्कर लोक/लहान मुलं) खाजगी लॅब मध्ये टेस्ट करा. सरकारी व्यवस्था चांगलीच आहे. पण कितीही काळजी घेतली तरी तुम्ही एखाद्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात येण्याची जास्त शक्यता वाटते मला आणि नसला तरी संसर्ग होईल. खाजगी लॅब घरी येऊ शकतात स्वाब घ्यायला. वरून संस्थात्मक अलगीकरण लागत नाही. अचूकतेबद्दल माहीत नाही. मी जवळून बघितलेल्या व्यक्तीचा खाजगी मधला रिपोर्ट पॉजिटीव्ह होता आणि तो बरोबर होता हे सिद्ध झाले. False positive बद्दल माहित नाही. पॉजिटीव्ह आलेल्या ६ व्यक्ती आणि सोबतचे ८-१० लोक या सगळ्यांनी सतत वाफ घेतली. फायदा होत असावं असं आम्हाला वाटलं (वैद्यकीय मत नाही). ==> कुमार सर, आपले मत? सगळ्या तरुण लोकांना थोडाफार त्रास झाला आणि बहुतांश लक्षणे यावर नेहमीचे डॉक्टर जे औषधे देतात( Azithromycin, Paracetamol, Vitamin C, Zinc) यावर बरं वाटलं. oxymeter वापरून ऑक्सिजन पातळी वर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहेच. आयुर्वेदिक औषध(जवळच्या डॉक्टर ने दिलेली) पण घेतली. आजकाल बहुतांश लक्षणे नसणाऱ्या लोकांना घरी उपचार घेऊ देतात. त्याचा फायदा घ्या. वयस्कर किंवा इतर व्याधी(उदा. मधुमेह) असणाऱ्या लोकांना जर त्रास जास्त होतोय आणि ऍडमिट करावं लागेल अशी शक्यता असल्यास, माझं वैयक्तिक मत आहे कि खाजगी ठिकाणी ऍडमिट करा. सरकारी सेवेबद्दल काही तक्रार नाही आहे पण बहुतांश ठिकाणी प्रचंड रुग्णसंख्येमुळे हॉस्पिटल आणि इतर यंत्रणेवर ताण खूप आहे. माझी काही निरीक्षण उगाच वाद वाढवतील म्हणून मांडत नाही इथे. आपण संपर्कात आलोय असं वाटत असेल आणि जवळपास वयस्कर लोक असतील तर लवकरात लवकर टेस्ट करा. विश्वास ठेवा, या संभ्रमावस्थे मधून जेवढ्या लवकर बाहेर याल तेवढा फायदा होईल. दुर्दैवाने आमच्या एका जवळच्या नातेवाईकांचे कोरोना मधून उदभवणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स मुळे दुःखद निधन झाले. ६५ वय, मधुमेह या गोष्टी जीवघेण्या ठरल्या. शेवटी त्यांना खाजगी ठिकाणी शिफ्ट केलं पण त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. शेवटी, ऑक्सिजन लेव्हल खूप कमी झाली. काळजी घ्या! ------------------------------------------------------------------------------------------------ अजून काही प्रश्न चर्चे साठी - वर लिहिलं त्याप्रमाणे वाफेचा खरंच फायदा आहे का? कारण बहुतांश माहिती ही whatsapp विद्यापीठामधून आली होती. मला बहुतांश लक्षणे ऍलर्जिक सर्दीची असल्यामुळे नेहमीप्रमाणे वाफेचा फायदा झाला. - टेस्ट च्या अचूकतेबद्दल काय सांगता येईल? अँटीजेन टेस्ट ५०% च अचूक आहे आणि स्वाब PCR ही ७०% अचूक असं वाचनात आलं. अर्थात, खातरजमा केली नाही. पण बरंच उलटसुलट ऐकायला मिळत आहे. कालच बातमी होती कि सरकारी दवाखान्यातील ४ डॉक्टरांचे सरकारी सेंटर वर स्वाब दिले ते पॉजिटीव्ह आले. त्यांना लक्षणे नव्हती म्हणून तीच तपासणी खाजगी लॅब मध्ये केली असता सगळ्यांचे निगेटिव्ह आले. अशा खूप ऐकीव/खऱ्या-खोट्या बातम्या फिरत आहेत आणि लोकांचा संभ्रम वाढवत आहेत. त्यात whatsapp मधून लोकांच्या गळी हे उतरलं आहे की प्रत्येक पेशंट मागे हॉस्पिटल/नगरपालिकेला ठराविक रक्कम मिळते, त्यामुळे मुद्दाम पॉजिटीव्ह देतात. वर बहुतांश तरुण लोकांमध्ये लक्षणे नसल्यामुळे त्यांचे अतिरंजित अनुभव आहेतच जोडीला. एकाच घरातील बाकीच्या लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत, जरी घरातील पॉजिटीव्ह लोकांच्या नजीकच्या संपर्कात आले असतील तरी. टेस्ट कधी केली यावर अवलंबून आहे का? एवढं विस्ताराने लिहायचं कारण म्हणजे अशा समजुतींमुळे लोक जीव गमावत आहेत. - एकदा संसर्ग होऊन बरे झाल्यानंतर परत कधीच होणार नाही अशी ठाम समजूत आहे. आणि असे लोक बिनधास्त फिरत आहेत. त्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, अशा बऱ्या झालेल्या लोकांपासून इतरांना कधीपर्यंत संसर्ग होऊ शकतो? - मुळात आजकाल 'पेशंट बरा झाला' हे दर्शवणारी टेस्ट बहुतांश ठिकाणी केली जात नाही आहे. त्यामुळे ती स्वतःहून करावी का? सौम्य लक्षणे असणाऱ्या आणि लवकर घरी सोडलेल्या लोकांसाठी? किती दिवसांनी करावी? किती दिवस अलगीकरण असावे? - वर काही प्रतिसादांमध्ये नमूद केलंच आहे, याचे दूरगामी परिणाम दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये बातम्या दिसत आहेत. त्यावर अजून चर्चा आणि आपण सांगितलेले उपाय, चाचण्या याबद्दल जागरूकता हवी. - सरसकट सगळ्यांनी precaution म्हणून व्हिटॅमिन-सी, झिंक च्या गोळ्या घ्याव्यात का? - लहान मुलांना इतर लसीकरणामुळे(BCG/MMR) धोका कमी आहे, हे खरं आहे का? त्यांच्याबाबत काय काळजी घेता येईल? धन्यवाद!

In reply to by लई भारी

तुमच्या ज्या प्रश्नांना यापूर्वीच मी मागील धाग्यात आणि इथे दिलेली उत्तरे दिलीत ते आधी घेऊ . वर लिहिलं त्याप्रमाणे वाफेचा खरंच फायदा आहे का? >>> प्र.क्र. १९ : इथे पहावा : https://www.misalpav.com/node/46973 एकदा संसर्ग होऊन बरे झाल्यानंतर परत कधीच होणार नाही अशी ठाम समजूत आहे. आणि असे लोक बिनधास्त फिरत आहेत. >>> प्र. क्र. १२ इथे पहावा : https://www.misalpav.com/node/46973 किती दिवस अलगीकरण असावे? >>> इथेच वर 7 Aug 2020 - 6:58 pm चा माझा प्र पहावा. सरसकट सगळ्यांनी precaution म्हणून व्हिटॅमिन-सी, झिंक च्या गोळ्या घ्याव्यात का? >>> क जीवनसत्व : औषधरूपात घेण्याची गरज नाही. रोजच्या आहारात लिंबू आणि मोसमानुसार पेरू, आवळा इत्यादी फळे व्यवस्थित खावीत. झिंक : त्याचे महत्वाचे स्त्रोत म्हणजे कवच असलेले जलचर प्राणी, मांस, अख्खी धान्ये, बीन्स आणि कठीण कवचाची फळे. लहान मुलांना इतर लसीकरणामुळे(BCG/MMR) धोका कमी आहे, हे खरं आहे का? >>>> प्र. क्र. २ इथे पहावा : https://www.misalpav.com/node/46973

In reply to by हेमंतकुमार

- टेस्ट च्या अचूकतेबद्दल काय सांगता येईल? अँटीजेन टेस्ट ५०% च अचूक आहे आणि स्वाब PCR ही ७०% अचूक >>>> होय. RT-PCR चाचणी अशी केल्यास : नाकातील swab : सुमारे ६५ % घशातील swab : ...... ४० % अँटीजेन टेस्ट वरीलपेक्षा खालील स्थानावर आहे. ती नकारात्मक आल्यास RT-PCR चाचणी करावी. एकाच घरातील बाकीच्या लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत, जरी घरातील पॉजिटीव्ह लोकांच्या नजीकच्या संपर्कात आले असतील तरी. टेस्ट कधी केली यावर अवलंबून आहे का? >> होय. चाचणी + येण्याचे प्रमाण संसर्गाच्या दिवसानंतर आठवड्यागणिक कमी होत जाते : पहिला आठवडा सर्वाधिक ते पाचवा जेमतेम ६% चालू.....

In reply to by हेमंतकुमार

त्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, अशा बऱ्या झालेल्या लोकांपासून इतरांना कधीपर्यंत संसर्ग होऊ शकतो? >>>> बाधित रुग्ण किती काळ संसर्गक्षम राहील याचे उत्तर आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असते. स्वाब चाचणीवर आधारित दोन अभ्यासांचा निष्कर्ष असा आहे: १. 8 ते 37 दिवस ( सरासरी वीस दिवस ) २. 18 ते 48 दिवस ( सरासरी 31 दिवस) ( म्हणून संबंधित डॉ चा सल्ला आवश्यक ). ................................

In reply to by हेमंतकुमार

तेच प्रश्न इथे विचारल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तो लेख राहून गेला वाचायचा बहुधा. या प्रतिसादासाठी उत्तरे एकत्र करायची तसदी घेऊ नका!

@कुमार1 सध्या Oxford, Moderna आणि आणखीन एक दोन लसींचा दुसरा आणि तिसरा टप्प्याची चाचणी चालु आहे, समजा सर्व काही सुरळीत झालं तर लस बाजारात यायला आणखीन कमीत कमी किती दिवस लागतील.

१. रा चा, या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी मी योग्य व्यक्ती नाही ! औषधी कारखानेच काय ते सांगू शकतील. एक मात्र आहे. लसीची सुरक्षितता आणि उपयुक्तता हे एका तराजूत ठेवून त्याचा सुयोग्य समतोल साधावा लागतो. तो साधल्या शिवाय कुठलीही घाई करू नये. यावर अधिक मी मागच्या भागाच्या प्रश्नोत्तरं मध्ये कुठेतरी लिहिलेले आहेच. ....................... २. ल भा, तुमच्या प्रश्नांची काही उत्तरे पूर्वीच्या भागांमध्ये आलेली आहेत . ती संकलित करून जरा निवांतपणे सविस्तर लिहितो..... धन्यवाद !

नुकतेच दीर्घकालीन मधुमेही असलेले काही परिचित दगावले. मधुमेह आणि कोविड (किंवा अन्य आजार) यांचे नाते एकमेकास अधिक खड्ड्यात घालायचे असते. ( अब > अ + ब ). मधुमेही ही कोविडग्रस्ताचे बाबतीत शरीरात अशा घटना घडतात : १. इन्सुलीनचे उत्पादन कमी होणे, २. शरीर पेशी इन्सुलीनच्या कार्यास दाद न देणे आणि ३. काही कोविडग्रस्त रुग्णालयदाखल व्यक्तींना steroidचे उपचार चालू असतात. हे औषध इन्सुलीनच्या विरोधी गटातील आहे. अशा तऱ्हेने वरील तिहेरी परिणामातून मूळचा मधुमेह अधिक बिघडतो. त्यातून कोविडची गुंतागुंत वाढून तो गंभीर होतो.

In reply to by मराठी_माणूस

कारण गंभीर स्थितीतील कोविडमध्ये हे एका स्टिरॉइड औषधाचा जीवरक्षक म्हणून उपयोग होतो. सर्वांनाच काही ते दिले जात नाही.

मधुमेही असलेले काही परिचित दगावले >>> "कोविडने दगावले" असे वाचावे.

डॉ संकेत मेहता अभिनंदन ! हे डॉ कोविड ने स्वतः रुग्णालयात दाखल असताना आणि स्वतः ऑक्सिजनवर असताना दुसऱ्या रुग्णासाठी धावून गेले: https://m.timesofindia.com/city/surat/doc-on-oxygen-support-risks-own-l…

आमेरीकन कोविड्लाट अजूनही चालूच असली तरी, लहानमुले करोनाला अधिक य्शस्वी तोंड देत आहेत हे पाहून आमेरीकन मंडळींनी शाळा चालू करण्याचा प्रयोग करुन पाहीला तर मुलांमधील करोनाबाधीत व हॉस्पीटलायझेशन प्रमाण सबस्टॅशिअली वाढल्याचे सांगणारे हे वृत्त

खरे आहे.

करोना संसर्गातील वास आणि चव जाणे विषयक संशोधनाचे टाईम्स ऑफ ईंडिया वृत्त दुवा - सँपल साईज फारच लहान दिसतो पण काहीच नाही पेक्षा काही बरे.

कोविडबाधित मृतांचे शवविच्छेदन आता अधिक प्रमाणात होत आहे. त्यातून स्पष्ट झालेल्या काही गोष्टी : १. फुप्फुसांना झालेली इजा लक्षणीय आहे हा विषाणू तिथल्या विशिष्ट (प्रकार- 2 ) पेशींवर हल्ला करतो. या पेशी एरवी एक मेद पदार्थ निर्माण करून फुफ्फुसे लवचिक ठेवतात. आता या कार्यात बिघाड होतो. २. वरचा श्वसनमार्ग आणि फुप्फुसातील या विषाणूची घनता सार्स १/ मर्स च्या तुलनेत खूप जास्त आहे. ३. रक्तवाहिन्यांच्या आतील पातळ आवरणाला झालेली इजाही लक्षणीय.

गवि, ते सर्व व्यक्तिगत प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. जिथे ही चांगले असते, तिथे आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच गोष्टी बऱ्या होऊ लागतात. पण जिथे ती खालावलेली असते, तिथे हे बदल अजून पुढे जात राहतात.

गेल्या काही दिवसात असंख्य ढकलपत्रातून कोविड-विरोधी अशास्त्रीय औषधांचा प्रचार/ चुकीची माहिती देणे चालू आहे. माझ्या परिचयातील अनेकांनी मला त्याबाबत विचारणा केली. अशा ढकलपत्रांमधून उल्लेखिलेली सर्व रसायने अथवा औषधे कोविडचा प्रतिबंध अथवा उपचार यादृष्टीने अशास्त्रीय आहेत. संबंधित रसायने वापरून रुग्णांवर शास्त्रशुद्ध प्रयोग झालेले नसून त्यासंबंधी कुठलाही अधिकृत पुरावा सध्या उपलब्ध नाही. अशा रसायनांची यादी : १. चांदीयुक्त गोळ्या वा द्रव २. कण्हेरीचा अर्क ३. थायामोसिन, मेथिलीन ब्लू ४. चिंता कमी करणारी औषधे ५. नवजात बालकाच्या नाळेतील मूळ पेशींपासून तयार केलेले उत्पादन. सर्वांना विनंती की अशा प्रकारची ढकलपत्रे तुम्हाला आल्यास तातडीने डिलीट करून टाका. कृपया पुढे पाठवू नका.

या इंडीयन एक्सप्रेस वृत्तात दिलेल्या कोविड-१९ बाधीत महाराष्ट्रीय डॉक्टरांचा सरासरी मृत्यूदर आय एम ए च्या आकडेवारी नुसार तब्बल 9.5 टक्के म्हणजे सर्वसाधारण मृत्युदरापेक्षा जवळपास तिपटीने अधिक दिसतो आहे. डॉक्टरांना लागण होण्याचे प्रमाण अधिक असणे समजण्यासारखे आहे पण सर्वसामान्यांपेक्षा माहिती आणि सुविधा सक्षमता डॉक्टरांची अधिक असताना मृत्यूदर एवढा अधिक येण्यामागे काय कारण असावे?

डॉक्टरांचा सरासरी मृत्यूदर
प्रश्न चांगला आहे पण उत्तर गुंतागुंतीचे आहे. त्यासाठी निव्वळ मृत्युदर ही माहिती त्रोटक राहिल. मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे सखोल विश्लेषण करावे लागेल. त्यात खालील मुद्दे पहावे लागतील : • वयोगट व लिंग • मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार होते का ? • धूम्रपान • कोविडने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अन्य जिवाणूंचे संसर्ग झाले होते का, इत्यादी. अशा विश्लेषणात बरेच किचकट संख्याशास्त्रीय निकषही लावावे लागतात. त्यानंतर चित्र स्पष्ट होते

In reply to by हेमंतकुमार

आपण म्हणता तसे वयोगटाचा मुद्दा महत्वाचा असू शकतो की सर्वसाधारण लोक्संख्येपेक्षा डॉक्टरमंडळींचे सरासरी वयोमान अधिक होते आणि ज्येष्ठ नागरीक असलेल्या डॉक्टर मंडळींना कोविड-१९ संसर्गाला तोंड देणे जमले नाही. पण डॉक्टर मंडळी नैसर्गिक प्रतिकार शक्ती विषयक माहिती आणि सुविधा बाबतीत अधिक सक्षम असण्याची शक्यता कायम रहाते. दुसरे असेही शक्य आहे की सर्वसाधारण लोक्संख्येपेक्षा डॉक्टरांच्या मृत्यूंची नोंद अधिक व्यवस्थीत झाली असू शकेल. असे असेल तर सर्वसाधारण मृत्यूदराचे अंडर रिपोर्टींग प्रचंड होत आहे असा अर्थ निघेल. स्वतःच्या मधुमेह, उच्च रक्तदाब व्यवस्थापनात डॉक्टर मंडळी अधिक सक्षम असतील असे गृहीत धरता यावयास हवे आणि फारतर सर्वसाधारण जनते एवढ्याच मर्यादा आहेत असे समजता येईल पण या मुद्याने तफावतीचे आकलन निटसे होत नाही. एक विचार करण्यास अवघड शक्यता अशी की मधुमेह, उच्च रक्तदाब व्यवस्थापनात वापरली जाणार्‍या एखाद्या औषधींचे अनाहुत साईड इफेक्ट भोवत नाहीत ना याचा शोध घेण्याची गरज नाही ना अशी शंका मनाला चाटून गेली. (अर्थात हा मुद्दा तज्ञ आणि संशोधकांसाठी आहे, सर्वसामान्य लोकांनी लगेच खरा समजून पसरवू नये)
कोविडने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अन्य जिवाणूंचे संसर्ग झाले होते का, इत्यादी
इलाज करणार्‍या डॉक्टरांना आणि इस्पितळ कर्मचारी वर्गास आजारी डॉक्टरांबद्दल अधिक आस्था असेल आणि ते असे सर्व इस्पितळातून सरसक्ट होऊ देणार नाहीत अशी अपेक्षा करण्यास हरकत नसावी. * धुम्रपान बाबतही डॉक्टर सर्वसाधारण लोक्संख्येपेक्षा अधिक सजग असतील किंवा फारतर मेळ खातील त्यामुळे तिपटीचा मृत्यूदर लक्षात येत नाही. *सॉरी माझ्या आधीच्या प्रतिसादात संदर्भ वृत्त दुवा देण्याचे बाकी राहीले होते.

पुन्हा एकदा हा मुद्दा - विदाचे सखोल विश्लेषण उपलब्ध झाले पाहिजे. संख्याशास्त्रात confounders अशी एक संकल्पना असते. बरेचदा ती लावल्यानंतर दोन गोष्टींचा संबंध खरा नसल्याचेही उघडकीस येते. यावरील अधिक चर्चा शास्त्रीय व्यासपीठावरच होऊ शकते. इथे नाही. आता अन्य काही मुद्दे : १. सध्या रुग्णतपासणी करणाऱ्या डॉक्टर्सना सामान्यांच्या तुलनेत विषाणूचा डोस हा सतत आणि खूप मोठ्या प्रमाणात सोसावा लागत आहे. २. सामान्यांपेक्षा डॉक्टर्स हे प्रचंड तणावाखाली आहेत. ३. अशावेळेस शरीरात तणावकालीन हार्मोन्सची पातळी वाढते ही हार्मोन्स इन्सुलिन विरोधी असतात. ४. समजा, अशा डॉक्टरांना मधुमेह असेल तर मग १ व ३ चा एकत्रित दुष्परिणाम खूपच जास्त होतो. ५. रुग्णालयात दाखल झाल्यावर अन्य काही संसर्ग झाल्यास त्यावरील औषधांना डॉक्टर मंडळी बऱ्याच वेळा जास्त रेझिस्टंट असू शकतात. ...... Doctors are the worst patients असे गमतीने म्हटले जाते, परंतु त्या विनोदामागे एक गंभीर वास्तव सुद्धा दडलेले आहे !

In reply to by हेमंतकुमार

पुन्हा एकदा हा मुद्दा - विदाचे सखोल विश्लेषण उपलब्ध झाले पाहिजे.
सहमत आहे . अर्थात या मुद्यांची चर्चा घडल्या शिवाय पुरेसे लक्ष घातले जाईल याची शाश्वती नसते. आणि किमान प्राथमिक निष्कर्ष निघावेत यासाठी सहा महिने हा तसा पुरेसा कालावधी आहे, तसे ते निघाले नसतील तर चिंताजनक बाब आहे.
अन्य काही मुद्दे :
हे रॅशनली पटण्यासारखे वाटतात. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादांसाठी अनेक आभार

अनलॉककाळात प्रवास आणि खानपानावरील बंधने शिथील होताना दोन वेगवेगळ्या बातम्यांकडे लक्ष गेले एक हरियाणातील मुख्य रस्त्यांवरील धाब्यातून कोविड-१९चा मोठास संसर्ग पसरत असल्याचे लक्षात आले , दुसरी बातमी पुणे जिल्ह्यातील महामार्ग काठच्या ग्रामीण भागात संसर्ग इतर ग्रामीण भागापेक्षा अधिक असल्याची बातमी वाचली. तात्पर्य येते वर्षभर शक्यतोवर बाहेर खाण्याचा मोह टाळून प्रवास करताना शिदोरी घरून घेऊनच निघावे हे श्रेयस्कर असावे.. आणि चहा घरी प्यावा. किमान गर्दी असलेल्या ठिकाणी चहा वडापाव आणि धाब्यांचा मोह टाळावा.

विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती कशी काम करते हे दाखवण्यासाठी एक सोपी स्वरचित आकृती खाली देत आहे. त्यातून T आणि B पेशी, अँटीबॉडीज इत्यादींचे काम स्पष्ट होईल. ok