Skip to main content

लष्कराच्या भाकऱ्या......

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 30/06/2020 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात. हा लघुलेख साहित्यक्षेत्रातील आणि वृत्तमाध्यमांतील अशा काही अनुभवांचा आहे. साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक आणि लेखक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो. ........... मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते. मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो. यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला. वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले: १. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत? २. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का? ३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा ! ....... असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे. ................................... आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव. एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये बुडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात. खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. ते वाचून जरा अस्वस्थ झालो आणि मग त्यांना ईमेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले. आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव. सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘करोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/ ) हाच आहे. मग या वृत्तपत्रास ईमेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे. गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ. बस ... आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो .फोनबिन जाऊदे मरूदे, हे धोरण. लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण..... जोपर्यंत आपला हात दुखत नाही तोपर्यंतच ! ..........................................................................................

वाचने 123884
प्रतिक्रिया 179

प्रतिक्रिया

लष्कराच्या भाकऱ्यांबद्दल तुमचे अभिनंदन डॉक्टर ! पण ते किती मनस्तापाचे काम आहे याची कल्पना आहे. लेखक- कवी, वार्ताकार, भाषेचे शिक्षक, पत्रकार ई. भाषाजीवींनी तरी निर्दोष लिहावे, तसा किमान प्रयत्न दिसावा ही माझी अपेक्षा असते. But this is wishing too much :-) द हिंदू ची आठवण विशेष आवडली. Proof reader नकोसा असल्यास / परवडत नसल्यास हे तरी किमान सर्वच छापील माध्यमांना करता येईल.

हि पहा परवाच्या ई-लोकसत्तातली बातमी... दोन वेळा बरोबर मवाळ शब्द आणि दोनवेळा 'मळाव' शब्द दोन ठिकाणी टंकला आहे. news बाकी वेगळ्या विषयावरचा तुमचा हा लेख आवडला!

In reply to by टर्मीनेटर

सध्या प्रूफरीडर परवडत नसल्याने बऱ्याच वृत्तपत्रांनी ती जबाबदारी उपसंपादकांवर दिली आहे, पण यांना उपसंपादक न म्हणता उपदव्याप संपादक म्हणावं अशी परिस्थिती आहे, २०१६ साली एक वृत्तपत्रात इंटर्नशिप करत असतांनाचा किस्सा, सगळी वृत्तपत्र सहसा त्यांच्याकडे आणून दिलेली मृत्यूवार्ता आणि फोटो एका छोट्या जागेत छापतात. एके दिवशी उपसंपादकाच्या डुलकीमुळे त्या कॉलम मध्ये मृत्यूची बातमी देतांना चुकून सध्या सत्तेत असलेल्या एका मोठ्या नेत्याचे नाव आणि फोटो दुःखद निधन म्हणून छापून आले होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती बातमी वाचून त्या नेत्याच्या समर्थकांनी वृत्तपत्राच्या कार्यालयात फोन करून मुख्य संपादकांना जेरीस आणलं होतं. दुसऱ्या दिवशी दिलगिरी छापून कसबसं ते प्रकरण मिटवण्यात आलं. ऑनलाईन एडिशनमध्ये होणाऱ्या चुकांबद्दल मागे एबीपी माझा चे खांडेकर आणि लोकसत्ताचे कुबेर यांना कित्येक वेळा ट्विटर वर टॅग करून चुका दाखवून दिल्या होत्या, पण त्यांना शष्प फरक पडत नाहीत, इतके ते कोडगे झाले आहेत. तेव्हा तो प्रकार सोडून दिलाय सध्या

In reply to by महासंग्राम

महासंग्राम, तुम्हीही भाकऱ्या भाजतय त्याबद्दल कौतुक !
चुका दाखवून दिल्या होत्या, पण त्यांना शष्प फरक पडत नाहीत, इतके ते कोडगे झाले आहेत.
अरेरे... काय करणार ?

In reply to by टर्मीनेटर

मी अशाच प्रकारची एक चूक एका प्रथितयश दैनिकात वाचली होती. त्या वेळी अण्णा हजारेंची आंदोलनं विशेष चर्चेत होती. त्यामुळे दैनिकांमध्ये समाजसेवक अण्णा हजारे हे नाव सतत वाचायला मिळायचे. एका दैनिकात समाजसेवक हे नाव मसाजसेवक असे छापून आले होते. मसाजसेवक अण्णा हजारे हे वाचताना गंमत वाटली.

अनिंद्य व टर्मिनेटर, धन्यवाद. सहमती. …………………………… ज्यांना निर्दोष लेखन हा महत्त्वाचा विषय वाटतो, त्यांच्यासाठी एक पुस्तक सुचवेन. पुस्तकाचे नाव आहे Write better, Speak better. रीडर्स डायजेस्टचे हे प्रकाशन आहे. बरेच जुने पुस्तक आहे. जरी ते इंग्लिश असले तरी त्यातील बहुमूल्य सूचना आपल्याला कुठल्याही भाषेसाठी उपयुक्त आहेत. त्यातील एका प्रकरणातील एक वाक्य माझ्या मनावर कायमचे कोरले गेले. लेखकाने असे म्हटले आहे, “तुम्ही एक कोरा कागद घ्या आणि त्याच्यावर पानभर मजकूर स्वतःच्या मनाने लिहा. नंतर शब्दकोश बघून तो मजकूर तपासायला घ्या. जर का त्या संपूर्ण मजकूरात तुम्ही एकही स्पेलिंगची चूक केलेली नसेल, तर तुम्ही स्वतःच स्वतःचे अभिनंदन करण्यास पात्र आहात !” ( स्पेलचेक वगैरे सेवा नसलेल्या काळातील हे वाक्य आहे. सध्या मजकूर वा तपशीलातच होणाऱ्या चुकांना संगणक तरी काय करणार? लेखकच जबाबदार असतो).

या चर्चेत भाग घेतलेले आपण सर्व जण निर्दोष लेखनाबाबत जागरूक आहोत. यासाठी आपण व्यक्तिगत पातळीवर प्रयत्नही करतोय. या संदर्भात समूह पातळीवर काही उपक्रम माझ्या पाहण्यात आले होते. त्याच्या काही आठवणी लिहीतो. तुम्हीही लिहा. शालेय शिक्षकांच्या मार्गदर्शक आठवणी देखील लिहीता येतील. ..... ‘अंतर्नाद’ मासिकात कित्येक सलग अंकांमध्ये महाराष्ट्र शासनाची शुद्धलेखनाची मूलभूत नियमावली छापलेली असायची. संपादक सर्व लेखकांना आवाहन करीत, की या मासिकाकडे लेखन पाठवताना त्या नियमावलीनुसार लिहीत चला. लेखन करताना जेव्हा आकडे लिहायचे असतात तेव्हा ते अंकात / अक्षरात कधी लिहायचे याचेही बारकावे त्यात असत. माझ्यासह अनेक लेखकांना त्याचा चांगला उपयोग झाला.

दुकानांच्या पाट्यांवरील लेखनात बऱ्यापैकी चुका आढळतात. त्या सुधारण्यासाठी बऱ्याच वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या वृत्तविद्या विभागाने एक सुरेख उपक्रम राबवला होता. तो म्हणजे रंगाऱ्यांसाठी कार्यशाळा. बहुतेक दुकानदार हे त्यांच्या दुकानाच्या पाटीवरील लेखन शुद्धतेबाबत जागरूक नसतात. एका गावातील पाट्या रंगवण्याची कामे करणारे रंगारी साधारण ठरलेले असतात. हा मुद्दा ध्यानात घेऊन सदर कार्यशाळा आयोजली होती. अशा प्रकारे रंगारी प्रशिक्षित झाले, तर पाट्यांवर लेखनही निर्दोष होईल अशी यामागे धारणा होती.

आता ३.३१ दुपारी ही बातमी : निशिकांत कामत यांच्या निधनाच्या अफवा; रुग्णालयाची माहिती https://www.loksatta.com/manoranjan-news/critically-acclaimed-director-n... ................................. पण त्याआधीच मटा मृत्यू जाहीर करून बसले होते. (तसेच काही टीव्ही वाहिन्या, इ.) हे पाहा एक जागरूक वाचक : (https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-...) लेटेस्ट कमेंट लाज वाटली पाहिजे तुम्हाला मटा.. खोटी बातमी दिली होती.. ती चूक मान्य करून दिलगिरी तरी व्यक्त करा ujjwal pawaskar उज्व्वल याना धन्यवाद !

आजची अक्षम्य चूक : त्यावर मी अशी इ मेल केली आहे : प्रति संपादक सकाळ , पुणे महोदय आपल्या ११/९/२० च्या अंकात पान ७ वर मोठी चूक झालेली आहे. ( (https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=7) ) ती अशी : बातमी : ‘अतिघाई महागात जाई “ चौकटीतले वाक्य : Rapid antigen चाचणीत रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्याचीच चाचणी होते वरील वाक्यात “रक्ताच्या नमुन्याचीच” हे अत्यंत चुकीचे आहे. या चाचणीत नाकातील swab चा नमुना घेतात. लोभ असावा

मराठीतील ‘ळ’ आता हिंदीतही वापरायचा : केंद्र सरकारचा आदेश. https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=3 प्रकाश निर्म यांच्या प्रयत्नांना यश.

In reply to by हेमंतकुमार

संस्कृत उद्भव आहे इतकेच नोंदवतो. ऋग्वेदाची सुरुवात - अग्निमिळे पुरोहितं...

धन्यवाद !

एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील स्वाभाविक घटनेचा विनाकारण बागुलबुवा करून अतिरंजित बातम्या दिल्या जातात. त्यांचा सुरेख समाचार घेणारे हे विश्लेषण.

सध्या समाजात वावरताना आपण जे ‘शारीरिक अंतर’ पाळत आहोत त्यासाठी एकच मराठी शब्दाचा शोध वृत्तमाध्यमांतून कसा उत्क्रांत होत गेलाय ते पाहणे रोचक आहे. सामाजिक अंतर >>> शारीरिक अंतर >> अंतरसोवळे (हा अपेक्षेप्रमाणेच वादग्रस्त !) ..... परवा ‘सकाळ’मध्ये ‘अंतरभान’ वाचला आणि तृप्त झालो. सुंदर ! याहून वेगळा वाचला असल्यास लिहा.

कसे फसवे शीर्षक देतात बघा: जानेवारीत 14 दिवस राहणार बँका बंद; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या कधी आहेत सुट्या https://www-esakal-com.cdn.ampproject.org/v/s/www.esakal.com/arthavishw… या १४ (२शनि व सर्व रवि वार धरून) मध्ये संपूर्ण देशाला फक्त ७ लागू आहेत! बाकी स्थानिक शहरानुसार वेगवेगळ्या.

काही चांगल्याची दखल घेतो. कोविडचर्चे दरम्यान अनेकदा 'co-morbid' हा शब्दप्रयोग यायचा. त्यासाठी सुटसुटीत मराठी शब्दाच्या शोधात होतो. परवा लोकसत्तात 'अनियंत्रित सहव्याधी' वाचला आणि आवडला.

बरोबर. जेव्हा सहव्याधी नियंत्रित असते तेव्हा कोविडने गंभीर होण्याचा धोका कमी असतो. जेव्हा ती अनियंत्रित होते तेव्हा धोका खूप वाढतो .

एक अक्षम्य चूक : "कमला हॅरिस या नुकत्याच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणजे त्या अमेरिकेच्या ‘सेकंड लेडी’ आहेत." https://www.loksatta.com/blogs-news/joe-biden-twitter-account-kamala-ha…

In reply to by हेमंतकुमार

बरोबर. हे जर संख्या शास्त्रावर आधारीत अंदाज असतील तर असे मथळे देणे आणि लोकांच्यात घबराट पसरवणे सर्वथा चुक. मग जेंव्हा रुग्णसंख्या कमी होत होती तेंव्हा अमुक अमुक दिवसांनी रुग्णसंख्या शुन्य होइल असा का नाही अंदाज वर्तवला . दुसरे , लोकांनाच सतत दोष का ? पुर्ण टाळेबंदी असतानाही रुग्णसंख्या वाढतच होती ना ? तेंव्हा काय कारणीभुत होते ?

"आता अभिनेते आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे खासदार परेश रावल यांना करोनाची लागण झाल्याचं समोरं आलं आहे." https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actor-paresh-rawal-te... ...... विकीवरुन खात्री केली की ते माजी खासदार आहेत. (त्यांना नंतर मध्येच कधीतरी राज्यसभेवर घेतले की काय, असा वाचणाऱ्याचा गैरसमज होऊ शकतो.)

छान लेख पुस्तकाच्या मुखपृष्ठापासूनच असंख्य चुका दिसत असताना लेखिकेने पुस्तकविक्रेत्याचा सल्ला मनावर घेऊन सर्व दुरुस्त्या केल्या ! संबंधितांचे अभिनंदन.

In reply to by हेमंतकुमार

आणि लेख वाचून छान पण वाटलं. मराठी वृत्तपत्र, मराठी वृत्तवाहिन्या, मराठी जाहिराती, मराठी मालिका अन् मराठी सिनेमा मधील बातम्या, लेख, कथा, पटकथा, संवाद, लिहिणाऱ्या सर्व व्यक्तींना असे उपचार करून सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे!

In reply to by हेमंतकुमार

मी देखील एकेकाळी मुद्रण व्यवसायाशी संबंधित असताना अगदी गणेश / नवरात्री मंडळांचे अहवाल, पतपेढ्यांचे अहवाल अशा प्रकारचे अंक असले तरी शुद्धलेखनाचा आग्रह ठेवत असे आणि स्वतःच त्यासंबंधी दुरुस्त्या विनामोबदला करत असे. त्यामुळे लेख आवडला आणि मनाला भिडला ! बीएआरसी मधे असलेल्या बंगाली लोकांचा सार्बोजनीन नवरात्रोत्सवाचा अंक हा याला अपवाद. हे लोक्स मुद्रित संशोधनाबाबत फार जागरुक असत आणि त्यांच्या क्वचीतच असलेल्या चुका शोधायला मला फार आवडे.

तु. का. +१११ ध मु +११
पतपेढ्यांचे अहवाल अशा प्रकारचे अंक असले तरी शुद्धलेखनाचा आग्रह ठेवत असे आणि स्वतःच त्यासंबंधी दुरुस्त्या विनामोबदला करत असे.
>>> आवडले ! छान.

तपशील व भाषा : सगळाच आनंद ! मुंब्रा कळवा मतदारसंघाचे आमदार आणि गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ... ................ आणि हा एक नवाच शब्द ! "पंकजा मुंडेंचं बीडमधील रेमडेसिव्हिरच्या अवैद्य विक्रीवरून अजित पवारांना पत्र" हा 'वैद्य ' चा विरूद्धार्थ आहे काय ? :)))

हल्ली भाषा आपण सोडूनच देतो. पण निदान समाजशास्त्राची माहिती तरी नीट असावी ना ? हे पाहा: बंगाल व गोव्याला विधान परिषद असल्याचा नवा शोध ! आता ममता पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या तरी त्यांना सहा महिन्याच्या आत विधान परिषदेवर निवडून जावं लागणार आहे. ....गोव्यात पार्सेकरांना सहा महिन्यांच्या आत डच्चू त्यानंतर सहा महिन्यांमध्ये भाजपाने पार्सेकरांना विधान परिषदेवर न पाठवता https://www.loksatta.com/explained-news/west-bengal-election-2021-mamata... आणि हे त्याहून भारी : ढाका- पश्चिम बंगालचे परराष्ट्रमंत्री एके अब्दुल मोमिन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. https://www.esakal.com/global/bangladesh-minister-abdul-momin-criticize…

In reply to by हेमंतकुमार

पूर्वी एक अमृत नावाचे एक प्रसिद्ध मासिक की पाक्षिक होते, त्यात उपसंपादकांच्या डुलक्या (उसंडु) नावाचे एक लोकप्रिय सदर होते, त्याची आठवण आली.

प्रचेतस,
उपसंपादकांच्या डुलक्या
>> यावर इथे चर्चा झाली होती.

एखाद्या इंग्लिश शब्दाचा नीट उच्चार करता येणार नसेल तर तो चुकीच्या मराठीत लिहिण्याऐवजी सरळ इंग्लिशमध्ये लिहिलेला परवडतो. ही एक घोडचूक बघा : राजीव सातव यांना संसर्ग झालेला सायटोमॅजिलो विषाणू https://www.loksatta.com/maharashtra-news/mp-rajeev-satav-death-after-cy... विषाणूच्या मूळ नावात megalo (मेगालो) शब्द आहे आणि त्याचा अर्थ ‘मोठा’ असा आहे. आता याचे 'मॅजिलो' असले विचित्र अर्थहीन मराठी रूप छापण्यात काय मतलब आहे ? आजच्या छापील सकाळ मध्येही अगदी हीच चूक केलेली आहे. अशाने सामान्य माणूस हाच चुकीचा आणि अर्थहीन उच्चार करू लागतो आणि विनाकारण अपभ्रंश रूढ होतात.

या धाग्यावर मौलिक सूचना करणाऱ्या सर्वांना आवडेल असा एक लेख आजच्या छापील सकाळमध्ये संपादकीय पानावर आहे. ‘मराठीच्या व्रतस्थ अभ्यासक’ हा यास्मिन शेख यांच्यावरील गौरव लेख आहे. २१ जूनला त्या वयाची ९६ वर्षे पुरी करणार आहेत. त्यांना आपल्या सर्वांतर्फे ‘शतायुषी व्हा !’ अशा शुभेच्छा देतो आणि वंदन करतो. या लेखातील एकच वाक्य उद्धृत करतो : “आजही कुठे मराठीतली चूक दिसली की कुणीतरी अंगावर ओरखडा काढल्यासारखे दुःख त्यांना होते”. अंतर्नाद मासिकाने त्यांना 23 वर्षे मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून नेमले होते ही विशेष नोंद करतो.

1 औरंगाबाद मध्ये कॉपी पकडल्याने विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीच्या क्ष व्या मजल्यावरून उडी मारली. हा क्ष विविध वृत्तपत्रांत व्हेरीएबल आहे. लोकमत - पाचवा मजला लोकसत्ता - तिसरा मजला महाराष्ट्र टाईम्स - इंटरनेट आवृत्तीत दुसरा मजला (आणि छापील वृत्तपत्रात चौथा मजला!!) :)

In reply to by तुषार काळभोर

इंटरनेट आवृत्ती मोफत असू शकेल पण छापील आवृत्ती आपण विकत घेतो व एक ग्राहक म्हणून वस्तूचा/सेवेचा दर्जा याबाबत आपण ग्राहक न्यायालयात तक्रार नोंदवू शकतो का ?

In reply to by गॉडजिला

हा मुद्दा रोचक आहे. मी माझ्या माहितीतील एका माहितगार व्यक्तींना याबद्दल विचारले आहे. ते विचार करून सांगतो म्हणालेत. कळल्यावर लिहीन

In reply to by हेमंतकुमार

वृत्तपत्र ही सेवा असल्याने मला वाटते की ते ग्राहक न्यायालयाच्या कक्षेत यावे... जाणकारांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत

खरे आहे. आधीच दुःखद बातमी आणि त्यात अशा अक्षम्य चुका...

ग्राहक न्यायालयात दाद मागता येते का...या बाबतीत आणखी काही गोष्टींचा खुलासा अपेक्षित आहे. वृत्तपत्राकडून झालेली चूक आहे की हलगर्जीपणा हे पहावे लागेल त्या बरोबरच त्या चुकीमुळे अथवा हलगर्जीपणामुळे कोणाचे/कितीजणांचे काय आणि किती नुकसान झाले या सर्वांवर ग्राहक न्यायालयात दाद मागणे व तिथून न्याय/समाधान/नुकसानभरपाई मिळणे हे अवलंबून असेल. मराठीतील प्रख्यात वृत्तपत्रातील 'अग्रलेख मागे घेत आहोत' ही घटना बहुतेकांना आठवत असेल. ज्यांचे नुकसान झाले (पक्षी भावना दुखावल्या गेल्या) त्यांचे उपद्रव मूल्य काय आहे या वर बरेचदा या गोष्टी ठरतात. सध्या प्रादेशिक भाषांमधील वृत्तपत्रांमध्ये काम करणारे बहुतांश पत्रकार आणि तत्सम कर्मचारी बहुधा इंग्रजी माध्यमातून शिकलेले असतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या 'उसंडू' वाचायला मिळतात. तुमच्या लेखात उल्लेख केलेल्या चुका सामान्य वाचकाच्या दृष्टीने नक्की हानिकारक आहेत. त्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे नक्की तक्रार करता येईल.

माहितीपूर्ण प्रतिसाद ! माझ्या विनंतीवरून आपण वेळ काढून योग्य ती माहिती इथे दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे.

In reply to by हेमंतकुमार

_/\_

वृत्तमाध्यमातील बेफिकिरीबद्दल आतापर्यंत बरेच काही लिहून झाले आहे. एकंदरीत जालावरील देवनागरी लिखाणाबाबतच्या बेफिकिरीचे अजून एक उदाहरण देतो. माझा एक छंद आहे. गाजलेली जुनी हिंदी गाणी मी अशाप्रकारे ऐकतो: एका विंडोत मी LyricsIndia.net या संस्थळावरून त्याचे हिंदीतील शब्द समोर ठेवतो आणि दुसऱ्या विंडोत पार्श्वभूमीला तेच गाणे युट्युब वरून लावतो. शब्द समोर असल्याने ते गुणगुणायला खूप आनंद वाटतो. देवनागरीतून गाणी लिहिलेली पाहून सुरुवातीला मी या संस्थळावर खूश झालो. पण अलीकडे दोन गाण्यांबाबत मात्र कटू अनुभव आला. गाण्यातील एखादा शब्द पूर्ण बदलणे, चुकीचा देणे वा शब्दांचा क्रम बदलणे असे काही प्रकार तिथे दिसून आले. त्याने निश्चितच रसभंग होतो.

मध्यंतरी सहयाद्रीच्या बातम्यांत हे ऐकले: "केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांनी एका परिषदेचे आभासी उदघाटन केले." 'आभासी उदघाटन ' हा प्रयोग कानाला बरोबर वाटत नाही. ते शब्दशः भाषांतर झाले. त्यापेक्षा आधी असे ऐकले होते: "….. दूरदृश्यप्रणाली द्वारा उदघाटन केले" हे अधिक बरे वाटते. छान आहे हा शब्द. गेले वर्षभर हा वापरात आहे.

कुंद्रा प्रकरणात वृत्तवाहिन्यांची भयानक अक्षम्य चूक. मराठी कलाकार उमेश कामतला झाला प्रचंड मनस्ताप

In reply to by हेमंतकुमार

कडक कारवाई व्हायला हवी. वृत्तपत्रे सुटलेत कसेपण.

अटक झालेली व्यक्ती उमेश गणपत कामत ही वेगळी आहे.

करिष्मा कपूरचं लग्न झालं तेव्हा अशीच बौद्धिक दिवाळखोरी झाडून सगळ्या वृत्तवाहिन्यांवर दाखवली होती. करिष्मा कपूरचं लग्न झालं दिल्ली स्थित उद्योगपती संजय कपूर सोबत. आणि प्रत्येक हिंदी मराठी वृत्तवाहिनी शक्ती पिक्चरचे सीन दाखवत होती. करिष्मा कपूर व (माजी पती) संजय कपूर 1 शक्ती चित्रपट (अनिल कपूरचा भाऊ संजय कपूर) 1

धमालच धमाल !! ही बातमी : प्रसिद्ध अभिनेत्री सन्नी लिओन हिच्या कारच्या नंबर प्लेटचा वापर दुसराच कोणीतरी करत होता.त्यामुळे वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी सन्नीला वाहतूक पोलीस शाखेकडून वारंवार ई-चलन पाठविण्यात आले. तर दुसरीकडे सन्नीच्या पत्नीने त्यांच्या गाडीचे कागदपत्रे आणून पोलिसांना दाखवली. https://www.esakal.com/mumbai/after-twenty-hours-lost-vinayak-found-by-n... ……….. सन्नीचा नवरा कोण म्हणून गुगल केले असता असा प्रश्न दिसतो : Who is Daniel Weber's husband? Sunny Leone and Daniel Weber celebrated their 10th wedding anniversary https://www.google.com/search?sxsrf=ALeKk01IUt3xosRFvxci1JP9k3UDoXbq-g:1... सन्नीला पत्नी आहे तर Daniel ला नवरा !

ज्याप्रमाणे इंग्रजांनी ‘मुंबई’ शहराचं नाव उच्चारताना बदलून ‘बॉम्बे’ असं केलं होतं, >>> वास्तविक असं नाहीये. मूळ bom baim हे नाव पोर्तुगीजांनी दिलेले आहे. ब्रिटिशांनी फक्त त्याचं स्पेलिंग बदलून Bombay हे केले.

कोविड बातमी : दरम्यान डॉ. पांडा यांनी एक गोष्ट नोंदवली ती म्हणजे दुसऱ्यापेक्षा तिसरी लाट कमी उंचीची असेल https://www.esakal.com/desh/early-signals-of-3rd-wave-seen-in-some-stat… ... वरच्या वाक्यात उंचीपेक्षा तीव्रता शब्द योग्य वाटला असता

In reply to by हेमंतकुमार

ते दुसऱ्या व तिसऱ्या लाटेच्या आलेखाबाबत बोलत असतील तर उंची शब्द कदाचीत चूकीचा म्हणता येईलच असे नाही.

हे पहा इथे: https://www.loksatta.com/blogs-news/money-heist-season-5-review-profess… फ्लॅशबॅकमध्ये बर्लिनच्या मुलाला दाखवण्यात आले आहे. तो एक आयआयटी एक्स्पर्ट आहे. आयआयटी >>> आय टी म्हणायचे असावे ना ? का स्पॅनिश मालिकेत आपल्या आयआयटीतले कोणी घेतलेय !!

"वसंत गुर्जर हे साठोत्तरी पिढीतील एक महत्त्वाचे (avant-grade) कवी आहेत."
(https://www.aksharnama.com/client/article_detail/5453) लेखनाला जोर येण्यासाठी जर परभाषेतील शब्द वापरायचा असेल तर तो काळजीपूर्वक वापरावा. वरील कंसातील मूळ शब्द फ्रेंच असून त्याचे स्पेलिंग avant-garde आहे. इंग्लिश मध्ये garde चा अर्थ ‘गार्ड’ असा होतो. बऱ्याचदा हे नीट समजून न घेतल्याने तिथे लोक grade करून टाकतात !