Skip to main content

पन्नाशीचा टप्पा

लेखक मनोज यांनी सोमवार, 08/06/2020 10:50 या दिवशी प्रकाशित केले.

आता आता दादा होते
कसे मग काका झाले
तरुणाच्या यादी मध्ये
बघा किती मागे गेले

दिसते आहे टक्कल
पांढर्‍या झाल्या मिश्या
हळू हळू मोठ्या होती
कश्या प्रौढत्वाच्या रेषा

शत्रूवर येऊ नये
तो प्रसंग येतो असा
तिशीची बाई म्हणते
काका जागा आहे बसा

पटापट हातातून
आयुष्य जात पळून
पन्नाशीचा टप्पा आला
मागं पहावं वळून

काय काय राहिलंय
केली पाहिजे यादी
काय माहित कधी
धरावी लागेल गादी

तू लक्ष नाही द्यायचे
कुरबुर केली कुणी
ऐकत बसावं मस्त
आवडती गाणी जुनी

कारणाशिवाय एक
टाकून द्यावी रजा
पोरा सोबत आपल्या
खूप करावी मजा

खर आहे घरासाठी
तर झिझल पाहिजे
एकदा सरीत पण
चिंब भिजलं पाहिजे

राहिलं असेल बघ
ते डोंगरावर जाणं
जुने छंद आठवून
शिक चित्र किंवा गाणं

प्रेमाला वय नसतं
दे बायकोला गजरा
व्हायचं रसिक कधी
चुकवून त्या नजरा

भरून घेतल आहे
आता थोडं फार वाट
मदतीचा हात थोडा
ज्यांना दु:ख आहे दाट

बाहेर बाहेर झालं
तू आत पहा वाकून
उलगडून बघ ते
जे ठेवलस झाकून

लेखनविषय:

वाचने 7722
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

आवडली कविता !

बाहेर बाहेर झालं
तू आत पहा वाकून
उलगडून बघ ते
जे ठेवलस झाकून

...हे खासच !


मस्त, आवडली कविता !

प्रेमाला वय नसतं
दे बायकोला गजरा
व्हायचं रसिक कधी
चुकवून त्या नजरा

आजकाल रोमॅन्टिसिझम फक्त गजर्‍यावर कुठं भागतं ?
हॉटेलींग, गिफ्टस वै बराच खर्च करावा लागतो ! :-)


लै भारी ! चांगलं लिहिलंय. साठीची गझल आठवली.

''शत्रूवर येऊ नये
तो प्रसंग येतो असा
तिशीची बाई म्हणते
काका जागा आहे बसा''

बाकी वयाचं काय वाटत नै हो, पण जेव्हा सुंदर महिला माझ्या सारख्या देखण्या तरुणाला 'काका' म्हणतात तेव्हा वाईट वाटतं. मी पण 'काकू' म्हणून हिशेब पूर्ण करून टाकतो. ;)

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समोरचीचा काकु म्हटल्याने आपले फ्रस्ट्रेशनच दिसते.
त्यापेक्षा "अग छकुले? किती गोड मुलगी आहे ती? कोणाची आहे बाळ माझी?" असे बोलत बोलत एखादा गालगुच्चा घेउन टाकायचा
हाकानाका
पैजारबुवा,


In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गालगुच्चा घेउन टाकायचा

हा .... हा ..... हा .... हा ..... हा .... हा ..... हा .... हा .....


In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बाप रे....! गालगुच्चा आणि काकुचा.... नाय, नो, नेव्हर.
शाब्बास...घाला तुम्ही आम्हाला जेलात. :(

-दिलीप बिरुटे
(सभ्य मिपाकर )


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुपचुप यांच्या वाड्याजवळील स्नॅक सेंटरवरचा किस्सा सांगा हो


In reply to by प्रशांत

आता आता दादा होते
कसे मग काका झाले
तरुणाच्या यादी मध्ये
बघा किती मागे गेले

प्रशांतसेठ, वल्ली आणि मी गुपचुप वाड्याजवळी स्नॅक्स सेंटरला गेलो होतो.
उपवासाच्या मिसळ आम्ही मागितल्या होत्या. मस्तय तेथील मिसळ.
आमच्या गप्पा चालूच होत्या की तिथे एक तरुणींचा घोळका आला त्यातल्या थोड्या पोक्त बाईने वल्लीला काका थोडं तिकडे सरका म्हटल्याचे आठवले.

प्रशांतसेठ आणि मी हसुन हसुन जमीनीवर लोळायचे बाकी होतो. =))

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा..हा... मस्त वाटेल म्हणायला. ओ वल्लीकाका! ;)

सं - दी - प