कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ३

स्टार्क's picture
स्टार्क in जनातलं, मनातलं
16 May 2020 - 8:16 pm

कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - १
कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - २

जाने कहाँ मेरा स्वेटर गया जीsss अभी अभी यहीं था किधर गया जीsss

ऑक्टोबरची कडक धूप जाऊन अचानक चांगलीच ठंड पडली होती. शिमल्यावरून निघालेला बिचारा छप्परतोड पाऊस तर निहालगंज येई येई पर्यंत वाटेतच दमून गेला पण त्याने बागवान चाचांना अनार आणि आमच्यासाठी सुकूनभरी ठंडी हवा जरूर पाठवली होती. मला शनिवारच्या सकाळच्या शाळेला ऊशीर होत होता आणि काही केल्या माझा हिरवा स्वेटर मला सापडत नव्हता. मी माझ्याच तंद्रीत गाणं गुणगुणत पूर्ण घरभर फिरून ऊलथापालथ चालवली होती...

जाने कहाँ मेरा स्वेटर गया जीsss अभी अभी यहीं था किधर गया जीsss

माझ्या कपड्यांची अलमारी ऊचकटून झाल्यावर मी दिवाणखान्यातली अलमारी बघत होते आणि अचानक मागून अब्बूंचा आवाज आला,

कही मारे ठंड के चुहा तो नही ले गयाsss कोने कोने देखो न जाने कहाँ सो गयाsss

मला एवढं हसायला आलं म्हणून सांगू त्यांना दाढीतल्या दाढीत हसत धीरगंभीर आवाजात गाणं गातांना...मी आजवर अब्बूंना कधी मधी गुणगुणतांना ऐकलं होतं पण माझ्यापेक्षा डब्बल ऊंचीचे धट्टेकट्टे अब्बू हात मागे बांधून माझ्या चेहर्‍यापर्यंत झुकत गात असतांना मोठे मिष्किल वाटत होते.. ते गात गातच 'अम्मीला विचार रसोईत जाऊन' म्हणून मला खुणावत होते...

मी आपली पुन्हा माझं पालुपद घेऊन अम्मीकडे गेले विचारायला,

जाने कहाँ मेरा स्वेटर गया जीsss अभी अभी यहीं था किधर गया जीsss

अम्मीचं मश की दाल पकवणं चाललं होतं... ती दुपट्ट्याला हात पुसत म्हणाली..

यहाँ ऊसे लाऊं काहे को बिना काम रेsss जल्दी जल्दी ढुंढो के गलने लगी दाल रेsss

तुम्हाला सांगते मला पुन्हा असा गोड धक्का बसला ना अम्मीला गातांना ऐकून... एकतर अम्मी माझ्या वेंधळेपणावर न रागावता, माझ्यावर न डाफरता डोळे मोठ्ठे करून मला दटावल्याचा जो अभिनय करीत होती तो ईतका गोड होता आणि अम्मीचा आवाज माशाल्ला.. मला आजवर कधी कळलेच नव्हते की ऊठसूठ माझ्यावर डाफरणार्‍या अम्मीकडे एवढा गोड गळा आहे.... गाता गाताच अम्मी मला दादाजानच्या खोलीत बघण्यासाठी ईशारा करीत होती..
पलंगावर ऊशाला टेकून मंद हसत बसलेल्या दादाजानसमोर बोट नाचवत, डोळे बारीक करून, लटक्या रागाने मी विचारले...

सच्ची सच्ची कह दो दिखाओ नहीं दात रेsss तुने तो नही है चुराया मेरा माल रेsss

त्यावर मोठं गोड हसत त्यांनी थरथरत्या डाव्या हाताने माझे बोट पकडले आणि कंबल खालून रंगीत कागदात गुंडाळलेलं एक पुडकं माझ्या हातात दिलं... हसतांना त्यांचे डोळे टिमटिम लकाकतांना मला दिसले.. एक सुद्धा शब्दं बोलण्यासाठी आता त्यांना खूप कष्टं पडत..डोळ्यांनीच ते मला सांगत होते 'ऊघड ते पुडकं ऊघड'..
गोंधळून जात मी ते पुडकं ऊघडलं, 'वाह! नया स्वेटर?' आनंदाने मी दादाजानला मीठीच मारली..

आनंदाच्या भरात रसोईत धावत जाऊन अम्मीला मी सांगितले. 'अम्मी....अम्मी हे बघ दादाजानने मला नवा स्वेटर दिला'
अम्मी माझ्या चेहर्‍यावरून हात फिरवत म्हणाली 'जल्दी जल्दी बडा हो रहा है न मेरा बच्चा.. जुना स्वेटर तुला होत नव्हता ना निलू, म्हणून दादाजानने अब्बूंना सांगून नवा स्वेटर मागवून घेतला. बघ बरं होतोय का तुला?'
अम्मी अशी म्हणाली खरी पण मला माहितीये हे नवीन स्वेटर घेण्यामागचं दिमाग अम्मीचंच असणार.. कित्ती कित्ती प्रेमळ होती माझी अम्मी आणि मी तिच्याबद्दल काय काय विचार करीत असे.
'आणि तुला सांगून ठेवते निलू, आता घरात सुद्धा बिना दुपट्ट्याचं फिरायचं नाही, बाहेरच्या लोकांची ये-जा चालू असते... माझे जुने दुपट्टे मी काढून ठेवले आहेत ते वापरायचे समजलं'
झालं! अम्मीचा पूर्ण वर्षभराचा माझ्याशी प्रेमाने बोलण्याचा हिस्सा एका वाक्यातंच संपला आणि पुन्हा लगेच डाफरणं चालूच.
'मी नाही तुझे दुपट्टे वापरणार! एकतर ते एवढे रूंद आणि लांबच्या लांब असतात आणि एकाला रंग असेल तर तौबा तौबा... सगळे पांढरेच'
मी माझं नवीन स्वेटर कुरवाळत धुसफुसत म्हणाले...
'काही मोठे आणि लांब नाहीयेत ते आता... अमजद दर्जी कडून तुझ्या दुपट्ट्याच्या मापाचे कापून त्यांना सिलाई घालून आणली आहे मी... आणि तुला पांढरे नको असतील तर तू त्यांना रंगाची बांधणी करून घे'
मला अम्मीचे पांढरे दुपट्टे वापरण्याची नसीहत बिलकूल पसंत नव्हती हे खरे पण माझे जुने पांढरे दुपट्टे मला रंगवू दे म्हणून मी अम्मीकडे कधीपासूनची भूणभूण लावली होती हे सुद्धा तेवढेच खरे होते... त्यावर अम्मीने असा तोडगा काढला होता तर. दुपट्टे रंगवायला मिळणार म्हणून मला कोण आनंद झाला. ऊद्याच्या रविवारीच कुल्फी आणि पापलेटला मला दुपट्टे रंगवण्यात मदत करण्यासाठी घरी बोलवण्याचे मी लगोलग ठरवूनच टाकले.

नव्या स्वेटरची नवी ऊन मला दिवसभर गुदगुल्या करीत राहिली. कुल्फी आणि पापलेटही 'अगं हे किती मुलायम आणि ऊबदार आहे' म्हणत त्यावरून राहून राहून हात फिरवत होत्या. मी कुल्फी आणि पापलेटला ऊद्या सकाळी माझ्या घरी यायचं आहे ह्याची कितव्यांदा तरी आठवण करून दिली. त्या घरी येणार आणि आम्ही एकत्रं बांधणीचा घाट घालणार ह्या कल्पनेनंच मला दिवसभर बांधणीच्या पाण्यासारख्या आनंदाच्या रंगीबेरंगी ऊकळ्या फुटत होत्या.

अकराला पापलेट आली आणि ती तिच्याबरोबर तीन खरेखरे ताजे पापलेटं सुद्धा घेऊन आली. अम्मीनं तिला आमच्या बेकरीतले बिस्किट खिलवले आणि ती तिची विचारपूस करत बसली. अम्मीच्या तावडीत एखादी मोहतरमा सापडली की अम्मी तिच्या सगळ्याच खानदानाबद्दल
चौकश्या करीत बसे आणि पापलेट तर बिचारी लहान मुलगीच होती. अम्मीच्या चौकश्यांच्या सरबत्तीला ती बिचारी मोठ्या तपशीलात ईमाने-ईतबारे ऊत्तर देत होती आणि तिची तीन बिस्किटं खाऊन होईपर्यंतही मला दम निघत नव्हता. त्या दोघींनी मला बेकरार करून करून रडकुंडीला आणायचे असा मनसुबा आधीच भेटून बनवला होता की अशीही शंका मला येऊन गेली. पापलेटनं दहा वेळा तरी ओठांजवळ नेलेले बिस्किट तोंड बोलण्यात मसरूफ असल्याने पुन्हा बाजूला केले, तरी बरं मी तिला पंचवीस वेळा 'संपव आणि ऊठ लवकर' असे डोळ्यांनी खुणावले असेल. शेवटी मोठ्या मुष्कीलीनं तिची तीन बिस्किटं संपली आणि अम्मीने अजून काही तिच्या हातात टिकवण्याआधी मी तिला घेऊन चबुतर्‍यावर धूम ठोकली. पण कुल्फीचा अजूनही पत्ता नव्हता. मी अम्मीला ती आल्यावर मला चबुतर्‍यावर आवाज द्यायला सांगितले.

बांधणीची सगळी तयारी मी पापलेट येण्या आधीच करून ठेवली होती. चबुतर्‍यावरच्या वीटांच्या चुल्ह्यात घालण्यासाठी झाडाच्या वाळक्या फांद्या गोळा करून झाल्या होत्या, बोहरीच्या पानसरीच्या दुकानातून तोळाभर कपड्यांचा निळा रंग आणून ठेवला होता, पिवळ्या रंगासाठी तर मी हलदीच वापरणार होते. अम्मीकडून हलदी, चणे, मीठ आणि दोराही आणून ठेवला होता. पाण्याने भरलेली बादली चबुतर्‍यावर नेतांना मात्र माझी मोठी फजिती होऊन मी अर्धी ओलीच झाले. त्यात थंडीमुळे एवढी हुडहुडी भरली की एकदा वाटलं आत्ताच्या आत्ता चुल्हा पेटवून शेकून घ्यावं. पण मग पुन्हा वाळक्या फांद्या सापडत फिरावं लागलं असतं म्हणून ते राहिलंच.
मला दुपट्ट्यांवर, गर्द निळ्या आकाशात लुकलुकणार्‍या चंद्र आणि तार्‍यांची एक नक्षी हवी होती आणि दुसरी हिवाळ्याच्या सकाळच्या पिवळसर कोवळ्या प्रकाशात कौलांच्या फटीतून येऊन फरशीवर सांडणार्‍या ऊन्हाच्या नाजूक ठिपक्यांची. सगळी तयारी करून झाली होती पण कुल्फीचा अजूनही पत्ताच नव्हता. मला एकदा वाटले अम्मीने तिला चौकशांमधे फसवून रसोईतच तर पकडून नाहीना ठेवले? म्हणून मी दोनदा गुपचूप रसोईत डोकावून सुद्धा आले, पण कुल्फीचा काहीच पत्ता नव्हता.
मी आणि पापलेट कुल्फीची वाट बघत खिदळत गप्पा मारत बसलो होतो तेवढ्यात मला माझ्या मागूनच अम्मीचा आवाज ऐकू आला,
'अगं हे काय? भले वा! तुम्ही अजून बांधणीच्या गाठीही मारायला नाही घेतल्या आणि चुल्हाही ठंडाच. अल्ला! कश्या बडबड्या पोरी आहेत ह्या. नुसता पसारा करण्यापुरताच ऊत्साह आहे ह्यांच्यात', आम्ही चबुतर्‍यावर काय गोंधळ घालत आहोत ते बघायला आलेल्या अम्मीच्या चेहर्‍यावर मोठे त्रासल्यासारखे भाव होते.
'अरे अम्मी, आम्ही कुल्फीची वाट बघतो आहोत'
'आता ह्या ठंडीत आणि कुल्फी कशाला हवी आहे तुम्हाला?'
'अगं ती, ती ही नाही का ती... माझी मैत्रिण.. हां..तरन्नूम... तरन्नूम तिची वाट बघतो आहोत'
'पण मग कुल्फीचं काय म्हणालीस?'
'कुठे काय? काहीच तर नाही'
'बरं! ते कुल्फी, तरन्नूम मला काही माहित नाही. तुमच्याकडे एक तास आहे. मी लाहोरी मच्छी बनवायला घेतली आहे तुम्ही एक वाजेपर्यंत जेवायला नाही आलात तर मी ते जेवण नेऊन मशीदीत देऊन येईन, मग बसा ऊपाशी संध्याकाळपर्यंत' अम्मी आमच्यावर डाफरत निघून गेली.
आधी अम्मीचा कुल्फी ऐकून गोंधळलेला चेहरा, मग कुल्फीच्या खर्‍या नावाचाच मला पडलेला विसर आणि मी कशी वेळ मारून नेली ह्यावर आम्ही दोघी पुन्हा मनसोक्तं खिदळलो.
हसून हसून डोळ्यात आलेलें पानी टिपत मी पापलेटला डोळे मिचकावत विचारले, 'पापलेट, तुझं खरं नाव काय आहे गं?'
तसं पापलेट माझा कान ओढत म्हणाली, 'विसरलीस ना माझंही नाव? थांब मी तुझीच बांधणी करते आता.'
मी कळवळून म्हणाले, 'आsss..शमा बेग... कान सोड माझा.. खूप दुखतंय.. मी मजाक करत होते'
आम्ही पुन्हा खिदळत, पुन्हा कुल्फीच्या नावाने शंख करीत शेवटी दुपट्ट्यांना गाठी मारायला घेतल्या.
बदरच्या पूर्ण चंद्रासाठी टम्मं फुगलेले चार चणे कपड्याच्या मधोमध ठेऊन गाठ वळत मी त्याला दोरा बांधून टाकला. मग दोरा घेऊन त्या चंद्राभोवती एक गोल काढून त्यात आमच्या तिघींच्या नावाने एकेक असे तीन चणे बांधून टाकले. मग मी आणि पापलेटने दुपट्ट्याच्या दोन्ही टोकांच्या बाजूने बसत एकेका चन्याला वर्गातल्या मुलींची नावं देत कापडात ठेऊन गाठी घालून दोर्‍याने घट्टं बांधून टाकले. प्रत्येक नावासरशी पापलेट त्या मुलीची काहीतरी मजेशीर गोष्टं सांगत राही. नफीसाला काय तर म्हणे पुढचे दोन दात सशाचे बसवले आहेत, अबीदा ह्याच वर्गात दोनदा नापास झाली म्हणून तिचा निकाह होणार आहे शाळेचं वर्ष संपले की, हीनाच्या अम्मीला आत्ता आठवं बाळ झालं अश्या एक ना अनेक बाता. मला कधीच कळायचे नाही हिला सगळ्या मुलींच्या खबरा मिळतात तरी कुठून.
अर्धे चणे संपल्यावर आम्ही थांबलो आणि पुन्हा एकदा कुल्फीच्या नावाने बोटे मोडली. मी चुल्हा पेटवून त्यावर एका भल्या मोठ्या वाडग्यात पानी ऊकळायला ठेवले. गाठी मारलेले दुपट्ट्याचे कापड मोठे मजेशीर दिसत होते, जणू ठंडीमुळे रुसून ते जागोजागी गाल फुगवून बसले आहे. मग तश्याच गाठी आम्ही दुसर्‍या दुपट्ट्यावरही मारायला घेतल्या. एक मोठा सूर्य आणि बाकी ऊन्हाच्या ठिपक्यांना पापलेटच्या नात्यातल्या आणि मुहल्यातल्या मुलींची नाव देत ऊरलेले चणेही बांधून टाकले. पापलेटने त्या मुलींचीही अशी काही मजेशीर वर्णने केली की मी त्या मुलींना कधीही भेटले नसले तरी मला त्या आता माझ्या एकदम ओळखीच्याच असल्यागत वाटू लागले. कुल्फीच्या नाकात अल्लामियाने जसा एक जास्तीचा पुरजा बसवला आहे तसे पापलेटच्या डोळ्यातही नक्कीच काहीतरी बसवलेले असले पाहिजे म्हणून तिला ह्या सगळ्या मजेदार गोष्टी दिसतात असे मला वाटून गेले.
मग आम्ही दोन्ही गाठी मारलेले दुपट्टे मीठाच्या ठंड्या पाण्यात भिजत घालून, ऊकळलेले कढत पानी दोन वेगवेगळ्या भांड्यात ओतून एकात निळा आणि दुसर्‍यात पिवळा रंग घालून ढवळत बसलो. रंग आणि पानी एकजान झाल्यावर ते चुल्ह्यावर चढवून त्यात निथळलेले दुपट्टे घालून वाळक्या काड्यांनी पाच मिनिटे तेही ढवळत बसलो. पापलेटची अखंड बडबड चालूच होती. आता तिची गाडी तिच्या मोठ्या बहिणीच्या मैत्रिणींची अफलातून वर्णनं करण्यावर आणि त्यांच्याबद्दल काहीबाही चावट माहिती सांगण्यावर घसरली होती. शेवटी ते दुपट्टे गरम रंगीत पाण्यातून काढून साध्या पाण्यात घुसळून आम्ही जास्तीचा रंग धुऊन टाकला आणि पिळून त्यांना दोर्‍यांवर वाळत घातले.
बांधणीसाठी एवढी मेहनत करून आणि बातुनी पापलेटच्या ईकडच्या तिकडच्या गरमागरम पण मजेशीर माहितीवर पोट दुखेतोवर हसून खूप भूक लागली होती. तेवढ्यात अम्मीचा आवाज आलाच, 'आता तुम्ही दोघी खाली येता की मी येऊ पुन्हा वरती?'
मग आम्ही थेट रसोईत जाऊन असे काही जेवलो की जणू सात दिवस ऊपाशीच आहोत. जेवतांनाही पापलेट मुद्दाम आमच्या चबुतर्‍यावरच्या गप्पांमधला एखादा मजेशीर शब्दं वापरे आणि आम्ही खीखी करत खिदळत राहू. जेवतांना अम्मी शांत आणि विचारात गढलेली वाटली, दादाजानची तबियत नासाज झाली की अम्मी आणि अब्बू दोघेही असेच शांत रहात.
जेवण झाल्यावर तिसर्‍यांदा आम्ही कुल्फीच्या नावाने शिमगा केला आणि मग पापलेट निरोप घेऊन निघून गेली. जातांना अम्मीने तिच्या हातात एक बिस्किट आणि नानखटाईचा डब्बा दिला. पापलेट कोपर्‍यावरून दिसेनाशी झाल्यावर मी तडक दादाजानच्या खोलीत गेले. ते कसल्यातरी ग्लानित असल्यासारखे वाटले आणि अम्मी त्यांच्या ऊशाला बसून होती. ग्लानित ते काही तरी मंदसं पुटपुटत होते पण मला ते आजिबातंच काही कळत नव्हते.

ऊन्हं ऊतरल्यावर मी सुकलेले दुपट्टे घेऊन आले आणि मी आणि अम्मी दिवाणखान्यात त्यांच्या गाठी सोडत बसलो. अम्मी अजूनही खोई खोई वाटत होती. दुपट्ट्याच्या गाठी सोडता सोडता मध्येच ती म्हणाली, 'निलू, ऊद्या तुझ्या अफरोझा फुफी येणार आहेत कानपूरवरून. दादाजान राहून राहून त्यांचं नाव घेत आहेत ग्लानिमध्ये, म्हणून तुझ्या अब्बूंनी त्यांना तार केली आहे एकदा भेटून जा म्हणून. त्या अब्बूंपेक्षाही मोठ्या आहेत की नाही आणि त्यांचे खानदानही मोठे रईस आहे तिकडे कानपूरला. आता तू मोठी झाली आहेस ना बेटा तर त्यांच्यासमोर आपण अदबीने वागायचे. मोठ्याने बोलायचे नाही, पळापळ करायची नाही समजले. त्या असे पर्यंत तुला काही हवे असेल तर तू मला रसोईत येऊन हळूच सांग. ठीक आहे?'
मी नुसतीच शहाण्यासारखी मान हलवली आणि खाली बघून गाठी सोडत राहिले. माझे मन अफरोझा फुफींबद्दलच्या माझ्या आठवणींचा कप्पा धुंडाळण्यात रमून गेले होते.

अफरोझा फुफींबद्दल माझ्याकडे फारश्या आठवणी नाहीत पण त्यातल्या त्यात सगळ्यात अलिकडची म्हणजे झीनतआपाच्या (हो तीच ईनायत चुडीवाल्याला जहान्नुममध्ये खवीसकडून हात दाबून घ्यायला पाठवणारी) शादीत शरीक होण्यासाठी त्या आल्या तेव्हाची. अफरोझा फुफी शादीला येणार म्हणजे तो एक मोठाच वाकिया असे. सगळ्यांची कोण लगबग ऊडत त्यांची सरबराई करण्यात. अकरा वाजता निहालगंज रेल अड्ड्यावर त्यांच्या गाडीच्या येण्याची घंटा झाली की ऊमद्या घोड्यांचे दोन टांगे तय्यार असतच असत. त्यांना स्टेशनवर घ्यायला फक्तं अब्बूनींच गेलं पाहिजे ईतर कोणीही नाही असाही रिवाझ होता. गाडी आली रे आली की दोघेही टांगेवाले धावत आत जाऊन अफरोझा फुफींचं सगळं सामान लगोलग बाहेर आणून एका टांग्यात भरत. मग काळ्या कुळकुळीत दगडासारख्या चेहर्‍याची फुफींची कनिझ फातिमा डाव्या गालाच्या मागे पानाचा वीडा दाबत बाहेर येऊन अब्बू स्टेशनवर आल्याची खात्री झाल्यावरच शांतपणे फुफींना घेऊन खाली ऊतरत. तिच्या खांद्याला असलेल्या शबनम मध्ये फुफीला लागणार्‍या सगळ्या गोष्टी असत. मग फुफी व अब्बू एक टांग्यात पुढे आणि फातिमा व सामान दुसर्‍या टांग्यात मागे असा लवाजमा हमरस्त्यावरून निघून आमच्या मुहल्ल्यात येत असे.
मला मात्र ही फातिमा बिल्कूल आवडत नसे, तिची नजर मोठी ऐटबाज पण करडी होती. तिच्या डोळ्यात कायम एक थंडपणा असे, जणू त्यातले पाणी आटून त्याचे बर्फ झाले आहे. ती अगदी मोजकंच बोले आणि जे बोले त्यात फक्त 'अफरोझा बेगमला हे अमूक चालत नाही, ते तमूक ईथून काढून टाका किंवा तो लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज बंद करा' अशी नकारघंटाच असे. जेवण झाल्यावर कधी फुफी गप्पांमध्ये रंगलेल्या असल्या की हिने म्हणावं 'आता बेगमची आरामाची वेळ झाली आहे' म्हणजे सगळेजण तोंड कडवे झाल्यागत एकदम बोलायचे थांबलेच म्हणून समजा, अगदी फुफी सुद्धा. मला कधीच कळत नसे की फुफी त्या खत्रूड कनिझचं सगळं म्हणणं एकदम शहाण्या मुलीसारखं ऐकतात तरी का? फुफींसाठी बनवलेला कमरा आधी फातिमा जाऊन न्याहाळत. मग ती 'ही खिडकी लावा, ती रजई बदला, ही खुर्ची तिकडे ठेवा' अश्या हिदायती देत राही आणि सगळ्या बिचार्‍या मुली फुफीसाठी फातिमा सांगेल ते करीत. जणू त्या फातिमाच्याच कनिझ आहेत. मग शेवटी वैतागून फुफी म्हणत, 'फातिमा, नको त्रास करून घेऊ जीवाला. चंद घंटों की तो बात है .... आठाच्या गाडीने निघणारच आहोत आपण परत.' हे ऐकून मग फातिमा 'जो हुकूम बेगम' म्हणत पिच्छा सोडी. मला तर वाटे ही फुफीचं नाव पुढे करून ही कनिझच स्वतःची पसंद-नापसंद सगळ्यांवर लादत राही. काम ईतर मुली करणार आणि त्रास हिच्या जीवाला?.. मला कळतच नसे फुफींना नेमकी कोणाची कीव येत असे. ईरफानमियांना म्हणजे फुफांना मी कधी पाहिलेले नाही, कारण ते कधीच निहालगंजमध्ये येत नसत पण फातिमाला त्यांनीच, फुफींनी जास्तं गपशप किंवा हसीमजाक करू नये आणि महत्वाचे म्हणजे मुक्काम न करता आठाच्या गाडीने माघारी यावे म्हणून फुफींवर नजर ठेवण्यासाठी नेमले होते असा माझा पक्का शक होता. शादीच्या वेळी फातिमाच्या ह्या वागण्याला वैतागून झीनतआपाच्या मैत्रिणी आपाला म्हणाल्या सुद्धा, 'कोण बेगम आहे आणि कोण कनिझ तेच कळत नाही'
तेव्हा झीनतआपा मोठ्या फणकार्‍यात म्हणाली, 'अशीच आहे ती काळुंद्री खवीसाची बहीण फातिमा. आमची फुफी मोठी सुंदर आणि प्रेमळ, पण बाळ होत नाही म्हणून तिच्या अमीर मियांने दुसरा निकाह करून फार दु:ख दिले तिला. आता निदान तलाक तरी मिळू नये म्हणून, मियाच्या मर्जीनेच वागावं लागतंय बिचारीला. अगदीच बघवत नाही तिच्या मायूस चेहर्‍याकडे आणि त्यात ती चुडैल फातिमा कायम सावलीसारखी मागावर असते, जरा म्हणून फुरसत मिळू देत नाही फुफीला. '
आपा म्हणाली ते सगळंच मला काही नीटसं कळालं नाही, पण जर कोणी माझा असा सतत सावलीसारखा पाठलाग केला असता तर मी पळून तरी गेले असते किंवा दिवसभर रडत तरी बसले असते. पण झीनतआपा म्हणत होती ते खरेच होते, अफरोझा फुफी होत्याच मोठ्या नाजूक आणि सुंदर. मी कुल्फीला पहिल्यांदा बघितले तेव्हाही मला फुफींचीच आठवण झाली. तलम रेशमी सलवार सूट त्यावर कशिदा काम केलेला दुपट्टा आणि त्यावर ओढलेली पश्मिनी शाल, कानात छोटे डूल, पायात मखमली कापडावर जरीकाम केलेली जुती आणि गहिर्‍या वासाचे ऊंची ईत्र, फुफींचा खानदानी पेहराव अगदी बघत रहावा असा असे. त्यांचं बोलणं आजिबात कुठल्या ऊतार-चढावाशिवायचं एकाच लयीत असे पण आवाज मात्र कुल्फी सारखाच बारीक, किणकिणल्यासारखा आणि मंजूळ होता. पण मला त्यांच्या सुंदर, आरस्पानी चेहर्‍यावर कायम एक मायुसी पसरलेली दिसत राही, जणू त्या आतून आजारी असाव्यात. त्या कधीच मनमोकळं हसत वा बोलत नसत. हमेशा काहीतरी बोझ अंगावर वागवल्यासारखे त्यांचे खांदे अम्मीसारखे ताठ न राहता कायम झुकलेले दिसत जे त्यांच्या ऊंची पेहरावापुढे मोठे विचित्र वाटे.

पण काहीही झाले तरी फुफी निघण्याआधी अब्बू, अम्मींबरोबर बंद कमर्‍यात तासभर तरी गपशप करीत. तिथे मात्रं त्या कझाग फातिमाला शिरकाव नसे हे बघून मला फार बरं वाटे. त्यादरम्यान ती मला शोधत येई आणि पुरुषी आवाजात 'अफरोझा बेगमने तुला याद केलं आहे' म्हणून सांगे, की मी तिच्या मागोमाग चालू पडे. त्यावेळी फातिमाची नजर मला खूप जालीम वाटे, जणू ती मनातून आम्हा सगळ्यांशी नफरतंच करीत असावी. मी आत गेल्यावर, मला पाहून फुफींना कोण आनंद होई. त्या मला मांडीवर बसवून घेत माझ्या चेहर्‍यावरून हात फिरवत म्हणत,
'माशाल्ला.. शौकत भाईजान.. अगदी ईदच्या चाँद सारखी दिवसेंदिवस खूबसुरत होते आहे तुझी लाडो, नैन-नक्श तर एकदम तिच्या अम्मीकडूनच घेतले आहेत जणू....बहोत लंबी ऊमर नसीब हो तुम्हे मेरी बच्ची...दुनियाकी सारी खुषियां अल्लाह-ताला तुम्हारे दामन में भर दे'
त्या मोठ्या प्रेमाने माझी विचारपूस करीत, कौतूक करीत. गालांच्या पाप्या घेत, केसांवरून हात फिरवीत, माझ्या हातांची बोटं कुरुवाळत तेव्हा त्यांचे मोठ्ठे डोळे पाण्याने भरून जात. मला मात्र मनातून फार विचित्र वाटत राही त्यावेळी - त्या लाड करतात म्हणून आनंद होई, थोडी शरमही वाटत असे पण त्यांचे वाहते डोळे बघून मग खूप ऊदासीही दाटून येई. त्यांचा प्रेमळ स्पर्श आणि गहिर्‍या ईत्राचा वास मात्र खूप हवाहवासा वाटे. त्यांना सांगावसं वाटे की त्यांनी कायम ईथंच रहावं आमच्या जवळ म्हणजे आम्ही त्यांना कायम हसत आणि खूष ठेऊ. जातांना त्या मला हमखास काहीतरी किंमती भेट देत. माझ्या दागिन्यांचा डबा आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी फुफींनीच तर दिल्या आहेत.

फुफी आल्यानंतर ऊडणार्‍या ह्या सगळ्या गडबडीत काही तरी मोठी गोष्टं मला कायम चुकल्या चुकल्यासारखी, राहून गेल्यासारखी वाटत राही. सुरुवातीला ते नेमकं काय आहे हे मला लक्षात येत नसे, पण आता विचार करू जाता ती 'राहून गेलेली गोष्टं' काय होती हे एकदमच ऊमगून आलं......फुफी आणि दादाजान मधली खामोषी.

मी फुफींबद्दल विचार करत बसले आणि माझ्याही नकळत दुपट्ट्यांच्या सगळ्या गाठी सोडून झाल्या सुद्धा.
'वा! निलू, बहोत खूब. ही तर खूपच कमाल नक्षी बनली आहे गं. कलाकार है मेरा बच्चा'. .. अम्मीचं बोलणं ऐकून मी ताळ्यावर आले.
'बघू बघू!' म्हणत मी ते दोन्ही दुपट्टे लांब अंथरून पाहिले तेव्हा त्यांच्यावर अगदी माझ्या मनातल्यासारखी नक्षी ऊतरलेली होती. चंद्राभोवतीचे तीन लख्खं चमकणारे तारे पाहून मी मनातल्या मनात स्वतःला आणि पापलेटला शंभरवेळा तरी शाबाशकी दिली असेल आणि तेवढ्याच वेळा कुल्फीला 'दगाबाज लडकी' म्हणत गाली सुद्धा. नाही तर काय! आम्ही तिच्या ईच्छेसाठी किती जोखीमभरी मुहीम केली आणि तिने साधं माझ्या घरी येण्याची तसदी घेऊ नये. मला तर दोन्ही दुपट्ट्यावरच्या प्रत्येक ठिपक्याला पापलेटने दिलेली नावं सुद्धा आठवत होती. दुपट्ट्यांची घडी घालून ते मी रात्री झोपतांना ऊशाखाली ठेऊन दिले तेव्हा मला वाटलं की शाळेत, मुहल्ल्यात एवढे सगळे लोक नेहमी माझ्या बरोबर असतील तर मला कधीही एकटं आणि मायुस वाटणार नाही.

दुसर्‍या दिवशी मी शाळेत गेले तेव्हा कुल्फी आधीच येऊन बसली होती आणि वहीत तिची नेहमीची नक्षी काढत होती. तिला बघून मला तिने काल केलेल्या शिष्टपणाचा रागच आला. मी बाकावर बसता बसताच तिला विचारले, 'काय गं दगाबाज लडकी, एवढ्यांदा आठवण करून देऊनही काल माझ्या घरी येण्याचं विसरलीस ना?'
तर ती तुटकपणे म्हणाली, 'माझी तबियत नासाज होती म्हणून झोपून होते दिवसभर'
'अच्छा! हे बरं आहे. आम्ही तुझ्या शब्दाखातर काहीही वेडं धाडस करावं आणि तुला काही छोटसं करण्याची वेळ आली की तू तबियतीचं नाटक करणार'.. मी तिला मुद्दाम टोमणा मारला. त्यावर ती काहीही हूं की चूं न करता नक्षी गिरवत राहिली. आधी काढून झालेल्या नक्षीवरच पुन्हा गिरवतांना मी तिला पहिल्यांदाच पहात होते. ती माझ्याशी साफ खोटं बोलत असल्याची मला खात्रीच वाटत होती. मी ही मग तिच्याशी काहीही न बोलता समोर बघत राहिले. पापलेट आल्यावर तिने कुल्फीला काल न येण्याबद्दल विचारलं तर तिलाही कुल्फीनं 'तबियत नासाज होती आणि दिवसभर झोपून होते' असंच सांगितलं. पापलेटचा त्याच्यावर चटकन विश्वास बसला, ती कुल्फीला कालच्या बांधणीबद्दल आणि आमच्या सगळ्या गपशपबद्दल सांगत राहिली. त्या गुफ्तगूत कुल्फीचा सहभाग नेहमीसारखा जोशीला बिल्कूल नव्हता आणि पापलेटला संशय येऊन वाईट वाटू नये म्हणून मीही अधेमधे मोजकंच बोलत राहिले. माझ्या आणि कुल्फीमधला अबोला पापलेटच्या ध्यानात आला होता की नाही ठाऊक नाही. आमच्या तिघींमध्येही ती सर्वात साफदिल असल्याने असल्या गोष्टी तिला चटकन लक्षात येतच नसत. मग तो पूर्ण दिवस तसाच ऊदासी आणि अबोल्यातच गेला. दादाजानचं अजूनाजून ग्लानित जाणं, अफरोझा फुफीबद्दल विचारणं, त्या दोघातली ह्याआधीची खामोषी ह्यातलं न ऊमगलेलें कोडं सोडवतांना माझं मन आधीच बेकरार होत होतं आणि त्यात आता पुन्हा कुल्फीच्या नव्याच खुफिया वागण्याची भर पडली होती.

शाळा सुटल्यावर घरी पोहोचतच होते तेव्हा मला डॉक्टर गुप्ता आमच्या घरातून निघून स्कूटरवर बसून जातांना दिसले. दिवाणखाण्यात फातिमा पानाचा वीडा लावत बसली होती. एकवार माझ्याकडे बघून तिने मुंडी हलवत दादाजानच्या खोलीकडे जाण्याचा ईशारा केला. मी दादाजानच्या खोलीत गेले तेव्हा ते अजूनही ग्लानितच होते. ऐकूही येणार नाही अशा अतिशय क्षीण स्वरात ते 'जुssम्मssन.......अssफssरोssझा.' असं काही तरी पुटपुटत होते. अफरोझा फुफी ऊशाला बसून त्यांचा हात हातात घेऊन मुसमुसत आसवं गाळत होत्या. अम्मी आणि अब्बू फुफींच्या बाजूला शांतपणे ऊभे होते. मला पाहून अम्मीने तिच्याकडे येण्याचा ईशारा केला आणि मी अम्मीला बिलगून ऊभी राहिले. माझे सगळेच अपने तिथे असूनही त्या खोलीत मला फार ऊदास आणि एकटं वाटत होतं.
बराच वेळ शांततेत गेल्यावर शेवटी आलेला हुंदका कसाबसा आवरून फुफी म्हणाल्या... ' कळत्या वयात हयातीभर बोलणं टाकलं अब्बूंनी आणि आता हे असं आठवण काढणं. आपण आपल्या मनाला समजवावं तरी किती आणि कसं?'
'आवरा स्वतःला आपा... निलू आहे ईथे तिच्यासमोर नको'
'मी सुद्धा निलू एवढीच होते ना रे...जेव्हा माझ्याकडून ती नादानी झाली आणि आपण जुम्मन भाईजानना हरवून बसलो. सगळीकडे दंग्यांच्या गरम हवेने सरायगंज पेटलेले होते..घराबाहेर पडायचे नाही म्हणून अब्बूंनी शंभरदा बजावले होते पण मी नादान, बेवकूफ मुलगी गेलेच माझ्या अजीज मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी. मी पोहोचले सहीसलामत पण मला शोधायला म्हणून गेलेले जुम्मन भाईजान पुन्हा कधी परतलेच नाहीत. माझ्या ह्या नादानीसाठी अब्बूंनी आजवर मला माफ केले नाही. असे करतांना त्यांचं मन किती पिळवटून निघत होतं ते दिसतंच आहे आता. एका हाडामासाच्या मुलीसाठीची माया अशी दाबून ठेवणं सोपं नाहीये हे मला कळतंय. अब्बूंची औलाद त्यांच्यापासून हिराऊन घेतल्याने माझ्या दामनमध्ये एकही औलाद न टाकून अल्लाने मोठा न्यायच केला म्हणायचा..'
'बस आपा बस... निलू तू जा पाहू आधी तुझ्या खोलीत. बेगम तुम्ही.... '
'हो हो... निलू चल आपण तुझ्या खोलीत जाऊयात.... तुझ्या अफरोझा फुफींना थोडा आराम करू दे पाहू.. प्रवासामुळे थकल्या आहेत त्या'

माझ्या मनात वेगवेगळ्या विचारांच्या लहान मोठ्या पक्षांचे थवे ईकडे तिकडे सैरभैर ऊडत होते.... काहीच धड समजत नव्हते... कोणामुळे नेमके काय झाले...कोणाची नादानी होती त्याचाही नीट ऊलगडा होत नव्हता. राहून राहून दादाजानचा डोळे मिटलेला कृश चेहरा डोळ्यासमोर येत होता. मी अम्मीच्या मांडीवर डोकं टेकवून माझा हिरवा स्वेटर छातीशी धरून दरवाजाकडे बघत शांत पडून राहिले. अम्मीच्या थोपटण्याने मला कधी झोप लागली तेही कळाले नाही. रात्री ऊशीरा कधी तरी अम्मी मला हलकेच ऊठवत होती. 'निलू, ए निलू ऊठतेस का बेटा. दादाजान याद करत आहेत तुला'
डोळ्यांवर खूप झोप असूनही 'दादाजान याद करत आहेत' ऐकून मी ऊठलेच. डोळे अजूनही पूर्ण ऊघडत नसल्याने सगळीकडे अंधारच वाटत होता. मी अम्मीच्या हाताला धरून दादाजानच्या खोलीत आले. अफरोझा फुफी कुठे दिसत नव्हत्या...बहूतेक त्या नेहमीसारख्या आठाच्या गाडीने निघून गेल्या असाव्यात.
मला पाहून अब्बू म्हणाले, 'ये बेटा, दादाजानने डोळे ऊघडले बघ... अशी त्यांच्या समोर ये पाहू.'
मी दादाजान समोर जाऊन ऊभी राहिले तर त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी 'मेरी प्यारी निलू.. मेरी अफरोजा' असं पुसटसं म्हणत माझ्या चेहर्‍यावरून त्यांचा सुरकुतलेला हात फिरवला. त्यांच्या स्पर्शाने माझ्या अंगावर एकदम शहारे आले. मला त्यांचे डोळे पुन्हा त्यादिवशी सारखे लुकलुकतांना दिसले. दादाजानने नजर वळवत मोठ्या अपेक्षेने अब्बूंकडे पाहिले. तसे अब्बूंनी दादाजानला पलंगावरून ऊचलून आपल्या गोदीत घेतले. अब्बूंच्या धिप्पाड हातांमध्ये कृष झालेले दादाजान अगदीच लहान बाळासारखे दिसत होते. मला कळतंच नव्हते हे काय चालले आहे. मी गोंधळून अम्मीकडे बघितले तेव्हा अम्मी म्हणाली, 'अल्लाची मेहेरनजर आपल्या बेकरीवर रहावी म्हणून दादाजानला बेकरीत जाऊन नमाज अदा करण्याची ईच्छा आहे. अब्बू तिथेच घेऊन चालले आहेत त्यांना येतीलच लगेच माघारी.'
अब्बू दादाजानला घेऊन गेल्यावर मी अम्मीला बिलगून बसले..मला खूप बेकरार वाटत होते. दहा-पंधरा मिनिटांनी अब्बू दादाजानना घेऊन परत आले तेव्हा त्यांचे दोन्ही डोळे घळघळा वहात होते आणि दादाजान अब्बूंच्या गोदीत लहान बाळासारखे शांतपणे पहुडले होते.

-- क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

17 May 2020 - 7:52 am | अर्धवटराव

एखाद्या चांगल्या निर्माता-दिग्दर्शकाकडे हे कथानक घेऊन जा.. सोन्यासारखी कलाकृती तयार होईल.

पहाटवारा's picture

17 May 2020 - 10:46 am | पहाटवारा

+१
विशाल भारद्वाज !!

स्टार्क's picture

17 May 2020 - 7:36 pm | स्टार्क

आवर्जून दिलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.

कथेच्या चवथ्या भागाचा दुवा

कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ४

अनिंद्य's picture

18 May 2020 - 12:13 pm | अनिंद्य

... चंपे सी इक इक पांखडिया...

फार चित्रदर्शी आणि अपनायत असलेले लेखन.

राजस्थानी बांधणी रंगण्याचे काम हमखास मुस्लिम मुली करतात.
हे वाचत असतांना त्याप्रसंगी म्हटली जाणारी गाणी मनात रुंजी घालत आहेत. स्वेटरचे गाणे, फूफी, इत्र, जुम्मनची याद, दादाजान, रंगलेला दुपट्टा .... चंपे सी इक इक पांखडिया... जमून आलेले जीवनगीत!

सिरुसेरि's picture

18 May 2020 - 4:53 pm | सिरुसेरि

एखाद्या चांगल्या निर्माता-दिग्दर्शकाकडे हे कथानक घेऊन जा.. सोन्यासारखी कलाकृती तयार होईल. +१०० . गुलजार

रुपी's picture

19 May 2020 - 12:07 pm | रुपी

हा भाग अगदी एखाद्या बांधणीच्या ओढणीसारखा रंगीबेरंगी झाला आहे. अगदी आनंदी सुरुवात आणि दुःखद शेवट! मध्ये मध्ये कुठे बांधणीचा प्रसंग, कुठे फुफीबद्दलच्या गोष्टी, कुल्फीची थाप..
लहानपणी शिकलेली बांधणी आणि तेव्हा बनवलेली वही आठवली :)

खुप दिवसांनी असे काही वाचायला मिळाले. खुप आवडले. पुलेशु!!
लिहित राहा म्हणजे आमच्या सारख्या वाचक तृप्त होतील.

मीअपर्णा's picture

20 May 2020 - 2:06 am | मीअपर्णा

मस्त आहे यांचं आयुष्य. वाचायला मजा येतेय. लिहिते रहा :)