✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गावाकडची मजा-बालकथा

ब
बिपीन सुरेश सांगळे यांनी
गुरुवार, 12/12/2019 - 22:48  ·  लेख
लेख
गावाकडची मजा ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मी गावाला चाललो होतो. एसटीमधून. डुलक्या घेत. पण माझ्या मनाला त्या अर्धवट झोपेतही बरं वाटत नव्हतं . तुम्ही म्हणाल,गावाला जायचं म्हणजे मजाच की ! मी गावाला चाललो होतो, ते सहल म्हणून नाही. मजा म्हणून नाही. तर कायमचा ! मी पुण्यासारख्या शहरात राहत होतो . माझी शाळा , माझे शाळेतले मित्र, माझे वाड्यातले मित्र या सगळ्याला मी आता मुकणार होतो. अन गावाकडे ?... काय माहिती ! मी गावाला पहिल्यांदाच चाललो होतो. माझे अप्पा कधी आम्हाला गावाला घेऊन गेले नाहीत. अन ते कधी जाताना दिसले नाहीत .मला वाटतं त्यांची आजोबांशी कट्टी होती . मोठ्या माणसांचं आपल्याला काय कळत नाही ! अप्पांची कंपनी बंद पडली . मला फार काही माहिती नाही; पण आई - अप्पांच्या बोलण्यामुळे मला हे कळलं.म्हणून बहुतेक आम्ही गावाला चाललो होतो. गावाला पोचलो. आजी – आजोबांनी मला जवळ घेतलं. कुरवाळलं .खूप लाड केला . बरं वाटलं. सुरवात तर चांगली झाली होती. आजी नऊवारी साडीतली . कपाळावर लालभडक कुंकवाची आडवी रेघ मारलेली . म्हातारी -पण कडक . स्वभावाने अंगणातल्या गोड पेरूसारखी ! घर छोटं. साधंसंच. अगदी कमी वस्तू असलेलं . गरिबाचं. आमचं घर शेतामध्ये होतं. शेताच्या पलीकडे रस्ता. तो खाली उतरत गेलेला. गाव तिथे, खाली . खड्ड्यात असल्यासारखं . गावाच्या मागे नदी . गाव छोटं. दोन-चार साधी दुकानं. म्हणजे खाऊची पंचाईतच होती . गावात देऊळ एक , शाळा एक आणि शाळेला नो मैदान ! मला तिथल्या शाळेत घातलं. अन वर्गातली पोरं ? छे ! अगदीच गावरान पोरं ती. त्यांना मी भारी वाटत होतो. शहरामधून आल्यामुळे . पण ते मला त्यांच्यात घेईनात . मी 'नवीन ' होतो . त्यांच्यातला नव्हतो . त्यांचे खेळ वेगळे . पळापळी , लंगडी अन हो मारामारी सुद्धा . मारामारी हादेखील त्यांचा एक खेळ होता . मला कंटाळा आला. मजाच येईना. करायचं काय, कळेचना … बोअर व्हायला लागलं. मग मी मैदानात पळायचो . त्यात मैदान छोटं . कधी पक्षी पहायचो . नाहीतर वर्गात टांगलेले रंगीबेरंगी तक्तेही पाहत बसायचो . त्यात सगळी पोरं गावात राहणारी. माझ्या बाजूचं कोणीच नाही. मी एकटाच. असा लांब लांब. टेकाडावर रहाणारा . शाळेत जाता-येताही सोबत नसायची. शाळेच्या मागे एक पेरूचं झाड होतं. पोरं पेरू तोडायला जायची. मग मीही जायचो. तिथला मालक ओरडायचा. पोरं लहान. बिचारी घाबरायची. एकदा दांडगट धन्याला फटकेही पडले . मग मी त्यांना सांगितलं,’ माझ्या अंगणात पेरूची दोन-चार झाडं आहेत. अगदी आरामशीर वर चढता येतील अशी .तुम्ही या माझ्याकडे. कोण तुम्हाला ओरडणार नाही. हवे तेवढे पेरू खा.’ पेरू पण असा भारी ! गुलाबी रंगाचा. लांबुडक्या आकाराचा , कलमी. गोड अन चवदार. झालं तर. जमलं ! पोरांशी माझी मैत्री झाली. पण एक घोळ होताच. शाळा दुपारी असायची. मला वेळ कळायचीच नाही. घरात घड्याळसुद्धा नव्हतं आमच्या. एकच घड्याळ ,तेही अप्पांच्या हातात . अन अप्पा शेतात . तसा रस्ता पाचच मिनिटांचा. घंटा वाजली की मी दप्तर उचलायचो. चालत शाळेत जायचो. रोजचा उशीर. वर्गाबाहेर उभं राहण्याची शिक्षा ठरलेली . पोरं हसायची . त्यातून धन्या जास्तच. काय करावं , कळेना. डोकं चक्कर झालेलं . पण मी ‘तेच’ डोकं चालवलं. शाळेची घंटा वाजली की मी निघायचो . चालत नाही , तर पळत. उताराचा रस्ता. माझी दोन पायाची गाडी बुंगाट पळायची. दोन मिनिटात मी शाळेत . मग उशीर वाचला. संध्याकाळी शाळा सुटली की जाम भूक लाग लेली असायची. मग पुन्हा पळत पळत घरी. दिवाळीनंतर शाळेत खेळांच्या स्पर्धा सुरु झाल्या. मैदान छोटं . मग नदीकाठालाच स्पर्धा व्हायच्या. मी पळण्याच्या शर्यतीत भाग घेतला. ती स्पर्धा कशी ? - तर आमच्या शाळेच्या मागे डोंगरावर एक मारुतीचं देऊळ होतं. थोडंसं उंचावर . तिथे जाऊन घंटा वाजवायची, की परत शाळेत . ही आमच्या सरांची आयडिया होती . पोरांचे वयानुसार गट पाडलेले होते . थंडीचे दिवस होते . नदीवर छान पांढरट धुकं धरलेलं . अन कुठं धुकं पार करणारा ,एखादा पक्षी . एखादा पांढरा बगळा . माझ्या गटाची बारी आली . धन्या म्हणाला, ' तू ल्येका हितंबी उशीर करणार ! आधीच तू काडी पैलवान ! ' गुरुजींनी शिट्टी वाजवली . पोरं पळाली. आणि मी ? – मित्रांनो,मी सगळ्यात पुढे होतो. देवळापाशी पोचलो . शेंदरी रंगात माखलेल्या मारुतीरायाच्या पाया पडलो . त्याच्या हातातल्या उंचावलेल्या गदेकडे पाहिलं. कपाळी शेंदूर लावला . टण्णकन घंटा वाजवली . आणि परत फिरलो . मी जिंकलो. पहिला आलो. धन्या मागेच राहिला . दमला . काडी भिरभिरली अन धन्याची चांगली जिरली. गुरुजींनी जवळ घेतलं. कौतुक केलं . ते म्हणाले ,' पोराहो , ह्ये पायलं का - शहरातून येऊनबी त्यानी तुमाला हरवलंय !’ लै भारी वाटलं. मी जिंकलो. कारण ? - तुम्हाला माहिती आहेच की - माझं रोजचं शाळेमध्ये पळत पळत जाणं -येणं . आजीने त्या दिवशी माझी छान नजर काढली . वर खाऊला पैसे दिले . अप्पांनी कौतुक केलं ते वेगळं . आता मी गावात रुळलोय .मला शाळा आवडते .नवीन मित्र आवडतात. गावात राहण्याची वेगळीच मजा असते. आता वाटतं , शहरात राहून ती मजा मला कधीच कळली नसती . ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
3652 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

छान लिहिलय

विनोदपुनेकर
Fri, 12/13/2019 - 17:52 नवीन
छान लिहिलय
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय. .

मुक्त विहारि
Fri, 12/13/2019 - 17:57 नवीन
आवडलं. ..
  • Log in or register to post comments

आता वाटतं , शहरात राहून ती

जॉनविक्क
Fri, 12/13/2019 - 21:47 नवीन
आता वाटतं , शहरात राहून ती मजा मला कधीच कळली नसती
हे वाक्य सोडून संपूर्ण कथा मस्त वाटली
  • Log in or register to post comments

वाचकांचे खूप आभार

बिपीन सुरेश सांगळे
Sat, 12/14/2019 - 18:09 नवीन
वाचकांचे खूप आभार
  • Log in or register to post comments

मस्तंच. छान लिहिलंय.

पद्मावति
Sat, 12/14/2019 - 22:35 नवीन
मस्तंच. छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा