✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

प
पाषाणभेद यांनी
गुरुवार, 12/12/2019 - 19:01  ·  लेख
लेख
Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा मिसळपाव.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा. दुसरे असे की जर अशा सोशल फोरवरील काही मुद्दे असोत किंवा धागे असोत ते शासनातले अधिकारी व्यक्ती, मंत्री की ज्यांच्या हातात नियम बनवणे आणि राबवणे शक्य आहे त्यापर्यंत जर गेले आणि त्यांनी गंभीरपणे यातील तथ्थे जाणून घेवून जर उपायोजना करण्याचा प्रयत्न केला तर अशा पाळल्या गेलेल्या नियमांमुळे नागरीकांचे जगणे अधीक सुखावह होवू शकते. वरील प्रस्तावना अजून समजली नसेल तर खालील लेख वाचून समजू शकते. थोडक्यात लेख आधी आणि वरील प्रस्तावना नंतर असे असते तर ते अधिक योग्य असते हे लक्षात यायला लेख वाचावा लागेल. लेखाची प्रकृती थोडी गंभीर आहे. काल मी शहरातल्या उपनगराच्या रस्त्याने रात्री पायी जात होतो. तेव्हा समोरून वाहने येत होती. त्यात चारचाकी आणि दुचाकी होत्या. सदर वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश हा सरळ डोळ्यांवर येत होता. एका वाहनाचा प्रकाश इतका तिव्र होता की माझेच नव्हे तर माझ्या मागे येणार्‍या पादचार्‍याचेही डोळे दिपले. त्याने आणि मी तेथेच थांबून घेतले. त्याच्या आणि माझ्यात डोळ्यांवर आलेल्या हेडलाईट संदर्भात संवाद झाला. असाच मुद्दा आमच्या वाहनविषयक व्हाटसअ‍ॅप वर चर्चेला आला होता. त्या क्षणीक बीजचर्चेला या धाग्याच्या निमित्ताने सार्वजनीक रुप देण्याचा प्रयत्न आहे. ( सर्वसामान्यपणे तांत्रीक इंग्रजी प्रतिशब्द बोलतांना जास्त वापरले जात असल्याने लेखातही तेच वापरले आहेत.) वाहनांचे हेडलाईट्स - हाय बीम - लो बीम - अप्पर लाईट - लोअर डिप्पर लाईट वाहनांमध्ये जे हेडलाईट्स असतात त्यात दोन सेटींग असतात. बटन दाबून हेडलाईट्स हाय बीम - लो बीम - अप्पर बीम - लोअर बीम (डिप्पर) अशा प्रकारे ते चमकवता येवू शकतात. रात्रीच्या वेळी असे हेडलाईट शहरात - जेथे रस्त्यावरील (स्ट्रीट) लाईट्स असतात तेथे - वाहन कायम लो बीमवर चालवणे गरजेचे आहे. नव्हे तसा नियमच आहे. आणि असा नियम आहे हेच बहूदा बर्‍याच वाहनचालकांना माहीत नाही. केवळ कार किंवा मोठ्या गाड्याच नव्हे तर लहान अगदी दोन चाकी वाहनांचेही हेड लाईटस आताश: प्रखर असतात. अशा अपर बीममुळे समोरच्या वाहनधारकांचे डोळे दिपतात. जेथे स्ट्रीट लाईट्स नसतात तेथे, ग्रामीण रस्त्यांवर अपर बीमवर वाहन चालवायला हरकत नाही. परंतू तेथेही समोरून वाहन येत असल्याचे दिसल्यास दोनही वाहनांनी डिपर किंवा लो बीमवर वाहन चालवावे. हाच नियम आपले वाहन इतर वाहनापासून साधारण २०० ते ३०० मिटर मागे असते तेव्हापासून आपले वाहन लो बीमवर चालवणे गरजेचे आहे असा समजायला हरकत नाही. असे केल्याने आपल्या वाहनाचे हेडलाईटस पुढच्या वाहनाच्या आतील मागे बघण्याच्या (IRVM) काचेमध्ये चमकत नाही. वाहन कायम लो बीमवरच चालवणे हे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांनी गरजेचे आहे. आणि हा नियम असल्याने तो पाळायलाच हवा. हाय बीम वाहन चालवणे आणि जंगली प्राणी सुरक्षा हा एक नवा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. यात किती तथ्य असावे ते सांखिकीयदृष्ट्या आणि इतर संशोधनाने सिद्ध व्हावे लागेल याची मला कल्पना आहे. तर आजकाल अज्ञात वाहनाच्या धडकेने जंगलातले प्राणी (हरीण, बिबटे किंवा इतर प्राणी) गतप्राण होण्याच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचतो आहे. लक्षात घ्या की या पृथ्वीवर आपला जसा हक्क आहे तसाच प्राणी, वनस्पती यांचाही हक्क आहे. रात्री वाहनचालक आपले वाहन अपर बीमवर चालवत असल्याने या जंगली प्राण्यांचे डोळे दिपतात. ते गोंधळून जातात आणि ते तेथेच उभे राहत असतील किंवा ते बचावासाठी  इतरत्र पळत असतील किंवा वाहनांवर हल्ला करण्याच्या हेतूने ते वाहनाकडे झेपावत असतील. कारण काही का असेना पण मानवाप्रमाणेच या प्राण्यांचे डोळे वाहनांच्या तिव्र प्रकाशाने दिपतात आणि ते वाहनाखाली येवून गतप्राण होतात. पुन्हा सांगतो या मुद्यावर प्राण्यांची मानसीकता, त्यांचे प्रकाशाप्रती होणारे वर्तन या सर्वांगाने संशोधन होणे गरजेचे आहे. वाहनातील हाय बीम - लो बीम हेडलाईट योग्य कसे वापरावे? आपण येथ पर्यंत वाचत आलात तेव्हा आपल्याला हेडलँपमधील हाय बीम आणि लो बीम किती महत्वाचे आहे याचे महत्व पटले असेल. हाय बीम - लो बीम योग्य कसे वापरावे हे खालील प्रकारे समजावून घेता येते. - जेथे स्ट्रीट लाईटस आहेत (शहरात) तेथे वाहन कायम लो बीमवरच चालवावे. यात चारचाकी तर येतातच पण दुचाकी वाहनेही येतात. - ग्रामीण भागात वाहतूक नसेल तेव्हा हाय बीम ठिक आहे. पण तेथेही आजकाल वाहने जास्त धावत असल्याने लो बीमच योग्य आहे. वाहनाचा वेग विनाकारण न वाढवता वाहन चालवायचे असल्यास (डिफेन्सीव ड्रायव्हींग) हेडलँप लो बीमवर योग्य आहे. - काही वाहनात डॅशबोर्डजवळ हेडलाईटचे सेटींग करायचे बटन असते. त्याची पोजीशन कायम शुन्य ठेवावी. ड्रायव्हरच्या उंचीनुसार एखादी पातळी वर किंवा खाली त्या त्या वेळी बदलली तर हरकत नाही. पण खरोखर तशी आवश्यकता नसते. - समोरील वाहन किमान ५०० मिटर दुर असेल तर आपल्या वाहनाचे बीम लो करणे योग्य आहे आणि ते सभ्यपणाचे लक्षण आहे. - आपल्या पुढे एखादे वाहन असल्यास म्हणजेच आपण किमान ३०० मिटर मागे असल्यास आपल्या वाहनाचे दिवे हे लो बीम करणे योग्य आहे आणि ते सभ्यपणाचे लक्षण आहे. - पासींग लाईटचा उपयोगदेखील आपण हाय बीमसाठी तात्पुरता करू शकतात. - पासींग लाईट ओव्हरटेक करतांना योग्य भान ठेवून चमकवावा. दुसर्‍या वाहनाने आधी चमकवला असता आपण त्याला अनुमोदन (अ‍ॅक्नॉलेज) द्यावे आणि पहिल्यांदा त्याने पासींग मागीतले म्हणून आपण त्याला योग्य वाट करून द्यावी - ओव्हरटेक करू नये. हे देखील सभ्यपणाचे लक्षण आहे आणि चांगले वाहन चालवण्याच्या एथिक्समध्ये येते. हॅलोजन लॅम्प आणि पांढरा प्रकाश असणारे दिवे आजकाल वाहनांत हॅलोजन लॅम्प आणि पांढरा प्रकाश असणारे दिवे येतात. काही मॅन्यूफॅक्चररच ते नव्या वाहनात आधीच बसवून वाहन विकतात. ( यात कायद्याचे उल्लंघन होते का हे पाहणे आरटीओचे काम आहे. ते जबाबदारीने वागतात का हा वादाचा मुद्दा आहे.) आपल्या वाहनांत जर असे दिवे आधीच बसवून आलेले असतील तर आपण ते दिवे काढून केवळ इतरांसाठी साधे पिवळे दिवे बसवू एवढे समाजाप्रती संवेदनशील आपण निश्चित नाही. ( हे वाक्य फार दु:खाने लिहावे लागते आहे.) पण आपले वाहन जुने असेल तर आपल्या वाहनात असे हॅलोजन किंवा पांढरा प्रकाश देणारे दिवे शक्यतो बसवू नये. जास्तीचे दिवे, फॉग लँप, मोटरसायकलींच्या हॅन्डलजवळ तिव्र प्रकाशाचे एलईडी लावणे असे प्रकार शक्यतो टाळावेत. (यात जास्त आवाजाचा सायलेंसर, रिवर्स हॉर्न आणि जास्त किंवा निराळा आवाज असलेले हॉर्न बसवणे देखील येते.) अशा प्रकारच्या दिव्यांची खरोखरच आवश्यकता आहे का हा प्रश्न मनाला विचारावा. इतरांनी केले म्हणून मी पण केले पाहीजे हि वृत्ती नसावी. अर्थात वाहन घेणे ही एक लग्झरी समजली जाते. ठिक आहे तसे समजा. वाहनाचा आतील भाग कितीही सजवा पण वाहनाच्या बाह्य भागात काही बदल करणे, इतरांना हानी पोहोचेल असे बदल करणे कायद्याने कितपत योग्य आहे त्याचा विचार करावा. नियम आणि कायदे हे आपल्या भल्यासाठी असतात. भले आपल्याला आपल्या जीवाची काळजी नसेल पण खाजगी वाहन रस्त्यावर आले तर ते सार्वजनीक होते. तेथे सामाजीक वर्तनच केले पाहीजे. समाजाप्रती आपली जी जाणीव आहे ती प्रगल्भ ठेवली पाहीजे. पोलीस, आरटीओ - सरकारी खात्यांची कर्तव्ये पोलीस, वाहतूक पोलीस शाखा, आरटीओ यांनी वेळोवेळी निरनिराळ्या माध्यमातून या नियमांबद्दल जागरूकता आणणारे कार्यक्रम केले पाहीजे. भारतीय लोकांत - समाजात ब्रेनवॉश केल्याशिवाय एखादी गोष्ट त्यांच्या डोक्यात शिरतच नाही. एखादा नियम, कायदा त्यांच्या डोक्यात भिनवावा लागतो तरच तो अंगवळणी पडतो. आरटीओ, पोलीसांनी झेब्रा क्रॉसींगबाबत बर्‍यापैकी जाणीव केली आहे. त्यामुळे वाहने जरी झेब्रा कॉसींगवर (अजूनही!) थांबत असतील पण कमीतकमी (!) झेब्राक्रॉसींगच्या पुढे तर थांबत नाहीत हा असल्या शिकवणूकीचा (की पोलीसांनी दंड घेतल्याचा) फायदाच समजायचा! (समजले नसेल तर वाक्य पुन्हा वाचा.) असलीच जागरूकता, वारंवार सांगणे, ब्रेन वॉश करणे हे अपर बीम, लोअर बीम ( हाय बीम- लो बीम, अप्पर- डिप्पर), रिव्हर्स हॉर्न, मोठ्या आवाजाचे सायलेंसर, पांढरे, हॅलोजन, तिव्र प्रकाश देणारे हेडलँप, टेल लँपला सजवणे, वाहनात बाह्य बदल करणे या बाबतीत पोलीस, वाहतूक पोलीस शाखा, आरटीओ तत्सम शासकीय खाते आदींनी जनतेत केले पाहीजे. वेळोवेळी जनतेला सजग केले पाहीजे. अपर बीम आणि तत्सम नियम, कायदे वारंवार सांगितले पाहीजे. मला एक आश्चर्य वाटते, आवाज मोठे असणारे सायलेंसर गाडीला लावतात तर मग त्याला सायलेंसर का म्हणतात. विनोद सोडा, पण आपण समाजाप्रती किती सिरीअस आहोत हेच ही बाह्य लक्षणे दाखवतात. असो. या असल्या अपर लोअर, हाय लो बीम वर एक युट्यूबवर बंगलोरच्या आदीत्य कुमार - विषयम मेडीआ याने "EDUCATED SUTIYA... ARE YOU ONE OF THEM?" हे टायटल असणारा विडीओ अपलोड केला आहे. वाहनांविषयी, अपर बीम विषयी असलेल्या भारतीय मानसीकतेला "एज्यूकेटेड सुतीया....त्यातले आपण तर नाही ना?" हे शिर्षक अगदी परफेक्ट फिट होते आहे. या विडीओला फक्त ६०४ व्हूज, ५ लाईक्स, १ डिसलाईक आणि एक कमेंट मिळालेले आहेत. (तो एक डिसलाईक देणारा एज्यूकेटेड सुतीया असावा.) याच्या विरूद्ध "जेसीबीकी खुदाईला" या विडीओला किती लाईक्स आणि किती व्ह्यूज मिळाले असतील याची गणती आपल्यापैकीच बर्‍याच जणांच्या तोंडावर असेल. खरोखर आपण एज्यूकेटेड सुतीया आहोत का याच ज्याने त्याने विचार करायचा आहे. काल रात्री रस्त्याने जातांना माझे आणि माझ्या बरोबर चालणार्‍या पथीकाचे डोळे समोरच्या वाहनाच्या प्रकाशाने दिपले तेव्हा मी असलेच उद्गार काढले होते. माणसे शिकून शिक्षित झालीत पण सुशिक्षीत झाली नाहीत. एका वाहन बनवणार्‍या कंपनीने डिप्पर या नावाने गर्भनिरोधक बाजारात आणले होते. कारण बर्‍याच ट्रक्सवर "Use Dipper at Night" हे स्लोगन लिहीलेले असते. यामुळे वाहनधारकांमध्ये कितपत आणि नक्की कोणत्या "विषयाची" जागरूकता झाली असेल याची आपल्याला कल्पना आली असेलच. हे असले धेडगूजरी आणि आपलाच फायदा होणारे जाहिरातीचे प्रयोग त्या त्या कंपन्यांनी थांबावावेत आणि या बाबतीवर खर्च होणारा पैसा योग्य ठिकाणी सत्कारणी लावावा. रस्ते अपघात खूप होत आहेत. या बाबतीत सरकार आपली जबाबदारी टाळू शकत नाही. सरकारला वाहनधारक, वाहनचालक, वाहन मॅन्यूफॅक्चरर आदींकडून खूप पैसा मिळतो आहे. त्यातील काही भाग हा सोशल अवेअरनेस या कारणाखाली खर्च करून या अशा न पाळल्या जाणार्‍या वाहतूक नियमांबाबत जागरूकता आणली पाहीजे. वाहतूक पोलीस रात्री ड्युटी संपवतात. वाहतूक पोलीस आपले मित्र आहेत. त्यांच्या कामाचे तास खूप आहेत याची मला जाणीव आहे. त्यांच्या संख्येत अधीक वाढ करून त्यातील अधीकचे पोलीस रात्री काही प्रमाणात शहरात नाकेबंदीसाठी नेमून करून असे नियम न पाळणारे वाहनधारक - जे अप्पर लाईट लावून, सायलेंसर बदलून किंवा प्रखर हेड लँप लावून, रिव्हर्स हॉर्न लावून वाहन चालवतात - त्यांना समज दिली पाहीजे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवला पाहीजे. पण यात दंड वसूल करायला अजून एक निमित्त भेटले असे व्हायला नको. राज्यात स्पिडगन असलेल्या नव्या गाड्या पोलीस खात्यात दाखल झाल्या आहेत. त्या देखील असे अपर बीम असलेली वाहने पकडू शकतात. हा लेख शासनापर्यंत हस्ते परहस्ते जावा. शासन जे काही करते आहे त्यात सुयोग्य बदल व्हावा अशी या लेख लिहीण्यामागे प्रेरणा आहे. सोशल मिडीया फार अ‍ॅक्टीव्ह असल्याने मिसळपाव.कॉम सारख्या माध्यमातून तो लोकांपर्यंत जावा अशी इच्छा आहे. या लेखाच्या भरपूर कॉपी होवोत. हा लेख कॉपीराईट वगैरे मुक्त आहे. कुणाचे नाव नाही लिहीले तरी चालेल. छोटी वाक्ये, परिच्छेद कॉपी झालेत तरी हरकत नाही. पण समाजाच्या तळापर्यंत वाहतूकीच्या नियमात असे काही आहे याची जाणीव होणे महत्वाचे आहे. कारण वाहतूकीचा किंवा वाहन चालवण्याचा परवाना कसा मिळतो हे आपण जाणतोच. त्यात वाहतूकीच्या नियमांबाबत शिक्षण किती होते या बाबतीत संशोधन करावे लागेल. लेखात काही तृटी असतील तर त्या जरूर सांगा. आणि हा लेख संपल्यानंतर पहिले दोन परिच्छेद पुन्हा वाचा. ट्रकवर जसे मागे लिहीतात तसे या लेखाच्या शेवटी लिहीतो की: Use Dipper at Night - रात के समय डिप्पर इस्तेमाल किजीए - आणि हो, या वाक्याचा कृपया योग्य तो अर्थ घ्या. हॅपी अ‍ॅन्ड सेफ ड्रायव्हींग!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
12690 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

बरोबर...

अभिदेश
गुरुवार, 12/12/2019 - 19:18 नवीन
कायम लो बीमवरच गाडी चालवावी. पण आपल्याकडे दुर्दैवाने बर्याच लोकाना गाडी 'योग्य' प्रकारे कशी चालवावी हेच कळ्त नाही , त्यामुळे हे कधी माझ्या जिवन्तपणी घडेल असे वाटत नाही. एकुणच सामाजिक शिस्त कमी होत चालली आहे.
  • Log in or register to post comments

+1

मुक्त विहारि
गुरुवार, 12/12/2019 - 19:48 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश

....

हेमंतकुमार
Fri, 12/13/2019 - 08:34 नवीन
+ १११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

छान!

Nitin Palkar
गुरुवार, 12/12/2019 - 20:07 नवीन
सुंदर लेख! अभिनंदन. माझ्या मनीच्या भावना व्यक्त झाल्यासारखे वाटले. _/\_
  • Log in or register to post comments

चांगला लेख

धर्मराजमुटके
गुरुवार, 12/12/2019 - 20:07 नवीन
चांगला लेख ! वरील सर्व नियम पाळतो मात्र समोरचा विशेषत: फॉर्च्युनर सारख्या एसयुव्ही वाले पाळत नाही तेव्हा खुप राग येतो. पण बहुतेकांना हे माहितच नसते असे वाटते. लोकशिक्षणाच्या / सामाजिक वावरा संबंधी बाबतीत एकंदरीत नैराश्य येईल असेच वातावरण भारतात आहे असे खेदाने म्हणावे लागेल. मोबाईल आल्यापासून तर वाहनचालकांचा / पादचार्‍यांचा बेशिस्तपणा फारच वाढलेला आहे असे जाणवते.
  • Log in or register to post comments

आज काल नव्या दुचाकी वाहनांना

सर टोबी
गुरुवार, 12/12/2019 - 20:20 नवीन
कायमस्वरूपी चालू असणारा दिवा बसविण्याची अट आहे. डोंगराळ प्रदेशात वाहन चालविताना किंवा धुक्यात वाहन चालविताना त्यांचा उपयोग होतो असा दावा केला जातो. परंतु अशा ठिकाणी वाहनचालक स्वतःच्या सोयीसाठी हेडलॅम्प लावतातच. त्यामुळे सरसकट सर्व ठिकाणच्या वाहनांना कायम स्वरूपी चालू असणारे दिवे बसविण्याची सक्ती अनाकलनीय आहे. त्याहून वरताण म्हणजे हे दिवे बऱ्याच वेळेला हॅलोजचे असतात. गडकरी किंवा अशा निर्णयाला जबाबदार असणाऱ्या लोकांनी लोकसंख्या कमी करण्याचा चंग बांधलाय कि काय अशी शंका येते. फॉर्च्युनर चालवणारा एक विशिष्ठ वर्गाबद्दल तर बोलायलाच नको. यांच्या गाड्यांना असणाऱ्या गडद काचांबद्दल पोलिसांना काही आक्षेप नसतो. दादा, नाना अशी नंबर प्लेट असणे, पक्षाचे चिन्ह नंबर प्लेटवर मुद्दाम लावणे, आणि गर्दीच्या रस्त्यावर हाय बिमची उघडझाप करून साईड मागणे, टोल नाक्यावर फुकट जाण्यासाठी दमदाटी करणे असे या वर्गाचे उद्योग असतात.
  • Log in or register to post comments

पुर्ण पोस्टशी सहमत !

दुर्गविहारी
Fri, 12/13/2019 - 17:35 नवीन
पुर्ण पोस्टशी सहमत ! आणखी वेगळे काही लिहायची आवश्यकता नाही. एका ज्वलंत विषयावर धागा काढल्याबद्दल पा.भे. साहेबांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

खूप चांगला लेख. लोकांना माहीत

खटपट्या
गुरुवार, 12/12/2019 - 21:11 नवीन
खूप चांगला लेख. लोकांना माहीत नाही याला कारण लेखी परीक्षा न देता परवाने देणे. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की रस्त्याच्या मध्ये जे डिवायडर असतात त्यावर लावलेली झाडे फक्त शोभेसाठी नसतात, तर समोरच्या बाजूने येणारे वाहन आहे त्याच्या हेडलाईट चा झोत आपल्या डोळ्यावर पडू नये हे उद्दिष्ट असते, हायवे वर जिथे झाडे शक्य नाहीत तिथे प्लास्टिक चे किंवा पत्र्याचे बोर्ड डीवायडर वर उभे करतात, ज्यामुळे समोरच्या वाहनांच्या लाईट पासून आपला बचाव होतो, अशा ठिकाणी हाय बीम वर गाडी चालवण्यास हरकत नाही, रस्त्यावरचे दिवे नसतील तर. तसेच मागचे वाहन बघण्यासाठी जो आरसा असतो चालकाच्या समोर, त्यात एक आजकाल असा एक खटका येतो की तो दाबल्यास मागील वाहनांच्या लाईट दिसतात पण त्यांची प्रखरता शून्य होते, याचा रात्री जरूर वापर करावा.
  • Log in or register to post comments

बरोबर आहे. हाय बीमचा खुप त्रास होतो.

नेत्रेश
गुरुवार, 12/12/2019 - 21:51 नवीन
एकदा हाय बीम फक्त ५ मिनीटे लावला होता. समोरुन येणार्‍या पोलीसाने बघीतले आणी २०० डॉलर दंड लावला. अपिल करुन पण काही फायदा झाला नाही. झक मारत पैसे भरले. पण तेव्हापासुन कधीही कयद्याचे उल्ल्ण्घन करुन हाय बीम लावला नाही. कायम चालु रहाणारे दीवे आता जगात सर्वत्र नवीन वहानांसाठी बंधनकारक आहेत. ते प्रखर नसतात. त्यांचा त्रास होत नाही. फक्त दुरुन वहान दीसायला मदत होते.
  • Log in or register to post comments

सहमत

विनोदपुनेकर
Fri, 12/13/2019 - 07:23 नवीन
सदर विषयावर मिपा वर अभ्यासपूर्ण लेख लिहिला त्याबद्दल आपले प्रथम अभिनंदन कारण रोज़ आपण प्रवास करताना हां त्रास रोज़ सहन करावा लागतों खरतर असा क़ाही नियम असवा हेच बहुतेक महोदयाना माहित नसावे शक्यतो समोरुन कोनी अप्पर दिवा लावला असेल तर समोरुन आपण आपला दिवा लोअर केला की त्यानहि तो लोअर करावा ही अपेक्षा अस्ते पन आपण त्या गावचे नाहीं आसे वागुन आमच्या ड़ोल्यात त्यंचा प्रखर दिवा सोडुन रवाना टिप : फ़क्त फ़ोर्टूनर वाले नहीं ट्रक आनी बस पन सहभागी
  • Log in or register to post comments

सहमत

श्रीरंग_जोशी
Fri, 12/13/2019 - 10:19 नवीन
या अभ्यासपूर्ण लेखनासाठी धन्यवाद. वाहन चालवताना स्वतःबरोबर रस्त्यावरच्या इतरांच्या सुरक्षेचा विचार केला पाहिजे. दुर्दैवाने मोठ्या प्रमाणावर असे आचरण कुणीच करत नाही. प्रत्यक्षात अप्पर बीमच्या वापराबाबत नियम असुनही त्या नियमांना फारसे कुणी गांभिर्याने घेत नाही. ९०च्या दशकात काही शहरांत प्रत्येक गाडीच्या दिव्यांच्या काचेचा वरचा २०% भाग काळ्या रंगाने रंगवावा असा काहीसा नियम होता. नागपुरमध्ये फार काटेकोरपणे अंमलबजावणी केली जायची असे आठवते. तो प्रकार कसा व का थांबला याबाबत कल्पना नाही. कदाचित एका मर्यादेपलिकडे उपयुक्त नसावा.
  • Log in or register to post comments

मी गेल्यवर्षी हीरो प्लेझर

नितिन थत्ते
Fri, 12/13/2019 - 18:25 नवीन
मी गेल्यवर्षी हीरो प्लेझर स्कूटर घेतली. तिला ओरिजिनल जो दिवा आहे त्याचे मुळातले सेटिंग लो बीमवर प्रकाश समोरून येणार्‍या कारवाल्याच्या डोळ्यात जाईल आणि हाय बीम वर प्रकाश समोरून येणार्‍या ट्रकवाल्याच्या डोळ्यात जाईल असे होते. ते चूक आहे आणि मला ते खाली करून दे असं हीरोच्या अधिकृत सर्विस सेंटरमधील अ‍ॅडव्हायझरला पटवायला आणि ते करून घ्यायला मला एक तास लागला त्यातील अर्धा तास पटवायला लागला.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी.

पाषाणभेद
Fri, 12/13/2019 - 21:39 नवीन
अगदी अगदी. माझ्या मोसा बाबतही मी हे सेटींग करवून घेतले होते. भारतातील बरेच दुचाकी मॅन्यू. वाहन डिझाईन करतांना त्याच्या बॉडीबाबत काही आरडी करत असतील असे वाटत नाही. निरनिराळे कार्टूनसारखे वाहन तयार करायला काय मिळते काय माहीत. मी तर अनेक सजेशन्स देवू शकतो अशा वाहनांबाबत. अ‍ॅक्टीव्हा आणि तत्सम स्कुटरेटमधील हेडलँप रचना खराब आहे हे मान्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

धन्यवाद

chittmanthan.OOO
Fri, 12/13/2019 - 18:40 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

लई भारी
Fri, 12/13/2019 - 21:43 नवीन
एका महत्वाच्या विषयाबद्दल अभ्यासपूर्ण धागा काढल्याबद्दल धन्यवाद! सगळ्या मुद्द्यांशी अगदी सहमत. विनाकारण हाय बीम लावून चालवणारे लोक बघून चीड येते. काही लोकांना सिग्नल दिल्यावर ते लो-बीम करतात, पण बहुतांश लोक तेव्हा सुद्धा तसेच चालवतात. आणि भारतात कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाचे दुरुपयोग कसे लवकर दिसतात त्याप्रमाणेच एलइडी लाईटचा एवढा दुरुपयोग कुणी केला नसेल. गावाकडे सर्रास सगळ्या गाडयांना प्रखर दोन बाजूला एलइडी लावलेले असतात.
- आपल्या पुढे एखादे वाहन असल्यास म्हणजेच आपण किमान ३०० मिटर मागे असल्यास आपल्या वाहनाचे दिवे हे लो बीम करणे योग्य आहे आणि ते सभ्यपणाचे लक्षण आहे.
बऱ्याच वेळेला मागोमाग गाड्या असतात आणि तरीसुद्धा मागच्या गाड्या हाय बीम वरच चालवतात. दोन्ही बाजूच्या आरशांमधून त्याचा प्रचंड त्रास होतो डोळ्याला. अजून एक मुद्दा म्हणजे, बऱ्याच वाहनांचे टेल-लाईट्स बंद असतात. आणि त्यांना याची कल्पना पण नसते! असा ट्रक वगैरे असेल आणि रिफ्लेक्टर पण नसतील तर खूप धोकादायक होऊ शकते. ट्रॅक्टर विषयी तर बोलायलाच नको, आणि आता उसाच्या सिझन मध्ये त्यांचा लैच तरास होतो. दुर्दैवाने माझ्या शाळेतले एक शिक्षक अशा एका ट्रॉलीला धडकून अपघातात गेले :-(
  • Log in or register to post comments

छान उपक्रम

भीडस्त
Sat, 12/14/2019 - 14:35 नवीन
मस्त उद्बोधन चालू आहे पाभे
  • Log in or register to post comments

उत्तम लेख.

अभिजीत अवलिया
Sat, 12/14/2019 - 20:21 नवीन
उत्तम लेख.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा