एक तरी खड्डा अनुभवावा...।

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
9 Sep 2019 - 5:41 pm

'एक तरी खड्डा अनुभवावा'

वास्तविक हे शीर्षक उगाचच मिरवतंय. ह्याच धर्तीवर १६८ कोटी चकचकीत शीर्षके हात जोडून समोर उभी आहेत. त्या प्रत्येकाने आपला काळजाचा ठाव घ्यावा इतपत तपश्चर्या केलेली आहे. २ अकतुबरला गांधीजींच्या छायाचित्राला मनोमन नमन करत असताना एक प्रश्न पडतो की ते नक्की ' खेड्याकडे चला' असे म्हणाले का ' खड्ड्यांकडे चला' असे म्हणाले. सर्व विश्वात बापूंची वचनं वाचली / अवलंबली जातात, तर आपण कसे मागे असणार? आपल्या सभोवताली अशी एकही भिंत नाही, जिच्यावर बापू नाहीत आणि जिच्या साक्षीने 'प्रामाणिक' व ' सत्य ' व्यवहार होत नाहीत. त्याच ओळीने आपल्या सभोवताली एकही रस्ता नाही ज्यांच्यावर खड्ड्यांची स्वाक्षरी नाही आणि त्यांच्या आसपास ते बुजवण्याची तयारी नाही. आता आधी बुजवायचे का पाडायचे ? हा तर कोंबडी व अंड्यापेक्षाही दर्दनाक सवाल. कदाचित खड्डे पडणार ह्या आत्मविश्वासाने भरायचं कर्तृत्व दाखवायचे किंवा पडले नाहीत तर बुजवायचे काय? या न्यायाने आधी पाडून ठेवायचे. हे कोडे उलगडेल तेव्हा खड्डे रस्तामय होतील आणि अमुक अमुक खड्डा किंवा तमुक तमुक खड्डा अशी रस्त्यांना नावे ( भारतात काय नावांची कमी नाही) देण्यात येतील. पत्ता सांगताना त्या टिम्ब टिम्ब खड्ड्यात गेलात की कोणालाही विचारा, कोणीही सांगेल असा सांगितला जाईल. ' हे विश्वची खड्डेमय' अशी साधकांची उन्मनी अवस्था होईल. त्यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी खड्डेच दिसू लागतील. पुढे जाऊन श्रावणात खड्डयांचे पूजन करून खड्डेषष्ठी साजरी व्हायची बाकी आहे. भाद्रपदांत मानाचे गणपती मनाच्या खड्ड्यांमधून नेण्यात येतील. नवरात्रांत खड्यांमधे गरबा खेळण्यात येईल. खड्डे तेवढे सण...

टंकनसुलभीकरणासाठी पुढील काही काळ
"खड्डे = ख" म्हणू या. त्यांचे कुलदैवत लोणार येथे आहे, असे मानले जाते. तिथे दरवर्षी यात्रा / जत्रा भरत असावी. सर्व भाविक ख तिथे दर्शनासाठी जातात, काहींना तेथे गुरुमंत्र मिळतो आणि मग पुढील 'ताप'श्चर्येसाठी आज्ञा मिळालेल्या रस्त्यावर ध्यान लावून बसतात. तसं पाहिलं (कसंही पहा, काय फरक पडतो?) तर ख स्वयंभूच म्हणायला हवेत. त्यांचा प्रत्यक्ष निर्माता कोणी असू शकत नाही. किंबहुना बॉम्बस्फोट झाल्यावर जशी जबाबदारी घेणं वगैरे असते, तशी ह्यांच्या निर्मितीची घेतल्याची ऐकिवात तरी नाही. तरीही भौतिक जगात (निदान महाराष्ट्रात तरी) ख बदल काही समज आहेत. ' समज 'समजायला कठीण असले तरी सांगायला एकदम सोप्पे असतात.

काहींच्या मते, ख हे माणसाचे भोग पूर्ण करायला आलेले अवतार आहेत. आपल्या पूर्वसुकृतानुसार आपले रहायचे ठिकाण व तिथून नोकरी अथवा इतर व्यावहारिक बाबींकरता जायला लागणाऱ्या ठिकाणांचे रस्ते ख नी भरलेले असणे, हे याचेच द्योतक असावे. यात भर घालणाऱ्या कुकर्मांमुळे लालपरीने (S T) अथवा 'डमडम' असे नाव धारण करणाऱ्या क्रूर वाहनांमधून प्रवास करायला लागणे, अशा प्रकारे भोग भोगूनच संपवावे लागतात. मानेत, कंबरेत पट्टे लावून काही प्रमाणात प्रायश्चित्तही घ्यावी लागतात.
असंही म्हटले जाते की 'गेलास खड्डयात...' असे म्हणून वारंवार लोकांना हीनवण्याने, म्हणणाऱ्याला रोज ख तून जावे लागते. इतरांना पाण्यात बघणारे असतात तसे ख मधे बघणारेही असू शकतात. न्यूटनच्यासुद्धा बालपणी शोध लागलेल्या ' जो बोलतो तोच असतो' या सुप्रसिद्ध नियमाचा आधार इथे लागू पडतो का? हे तपासायला हवं.

सरकार, भ्रष्टाचार, कंत्राटदार या यमकांत जमतील असे अनेक शब्द गोळा करून त्यांच्याच गळ्यात ख यांच्या जन्माची माळ घालायचे भगीरथ प्रयत्नही काही कमी नसतात. थोडक्यात वर उल्लेखिलेल्या निष्पाप मानवांना वेठीस धरण्याचे आणि समाजाला भडकवायची दुष्ट प्रवृत्ती पाहून माझ्या अंत:करणाला सलमानयातना झाल्याशिवाय राहत नाहीत. (सलमान यमाचं पार्ट टाइम काम बघतो, असा समज पसरवू पाहतोय, असं समजू नका.) बिच्चाऱ्या राजकारण्यांनी अनेक वेळा सांगितले आहे , " पाऊस आल्याशिवाय ख पडत नाहीत. पडल्याशिवाय दिसत नाहीत. पाऊस थांबल्याशिवाय भरता येत नाहीत." इतकं समर्पक उत्तर देऊनही आपली प्रजा राग धरून असते. मतदानाआधी पैसे मिळतात तेव्हा कुठे तो राग जाऊ पाहतो ( जास्त राग, जास्त मोठं कुटुंब म्हणजे जास्त पैसे हे सम प्रमाण गणित शिकवण्यासाठी वापरता येतं)पाऊस हाच खरा अपराधी सोडून कोणा मंत्र्यांचे राजीनामे मागणाऱ्या मंद लोकांचा धिक्कार असो. असो...
रस्ते बांधताना गायी, म्हशी, इतर काही पाळीव व वन्य प्राणी बसलेले असतात आणि हाकलूनही न उठल्याने, ती जागा सोडूनच, लोकांच्या हितासाठीच झपाट्याने झटणारे, उर्वरित स्थळावरचं रस्त्याचं बांधकाम करतात. हेही ख चे कारण, असं मानणारा एक गट या भूतलावर आहे असं ऐकलंय. आता सांगा प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध असलेले आपण, त्यांना हाकलावून स्वत:च्या क्षुल्लक स्वार्थासाठी रस्ते तुळतुळीत करायच्या मागे लागायचे? शी..कल्पनाही करवत नाही.

पण मला वैयक्तीक पातळीवर ख यांचा खूप आदर आहे. इतका की आधी मी ख आले की मनोमन पाया पडत गाडीतल्या गाडीत चपलासुद्धा काढायचो. ( आजकाल चपला काढूनच ठेवाव्या लागतात कारण रस्ता नसतोच असतात फक्त..) बघा नं, ख निर्विकार असतात, आकार असतो पण गुणातीत असतात. सत्त्व, रज, तम यांच्याही पलीकडे ते वसलेले असतात. तुम्ही त्यांना शिव्या द्या, त्यांच्यातून जा, त्यांना हुलकावणी देऊन जा, त्यांच्यात बसून ध्यान लावा अथवा उतरून त्यांच्यासह सेल्फी काढा. त्यांना काहीच फरक पडत नाही. कोणतीही गाडी असो, ती यांच्यापुढे नमतेच. ख आज सकाळी लहान असेलही पण तपस्येने व तेजाने तो पसरतोच. संध्याकाळी कामं आटपून परतताना तुम्ही नाही त्याला 101 प्रदक्षिणा घालून, नारळ फोडून लोटांगण घातलंत तर मी माझं नाव ख लावेन.

नाही म्हणायला रणगाड्यांसारखी काही वाहने ( suv +4 wheel drive) ख ना तुच्छ समजतात. जेव्हा मारुती 800, अल्टो, ओम्नी वगैरे आणि तत्सम गाड्यांचे मालक गियर बदलू का ब्रेक दाबू का उतरून डोक्यावरून गाडी घेऊन जाऊ का उरलेला प्रवास चालत करू वगैरे प्रश्नांशी सामना करत हँग झालेले असतात तेव्हाच काही अजस्त्र गाड्या आपली गती तिळमात्रही कमी न करता ख ची दखल न घेता , मस्तवालपणे बाजूने निघून जातात, हे बेकायदेशीर आहे. याने समाजातली आर्थिक रुंदावते, दुर्बळ मनांवर आघात होतो. पण मला विश्वास आहे की तो दिवसही दूर नाही, जेव्हा आकाशातील विमानेसुद्धा उडायच्याआधी किंवा उडत असताना आणि जमिनीवर टेकताना ख ना लवून कुर्निसात करतील, तर मग या रानगव्यांसारख्या गाड्यांचे काय घेऊन बसलात?
ख धर्म, जातपात, धर्म यांच्या परे आहेत. सर्वांना लाभ घेऊ देतात. निधर्मी देशात शोभतील असेच त्यांचे आयुष्य. कधी डॉक्टरांना पेशंट पाठव, कधी एखाद्या गर्भवतीला पटकन मोकळी कर, कधी एखाद्याचे कपडे रंगवून दे ( चाक ख मध्ये जाऊन उडालेल्या), कधी कोणाला धडा शिकव, कधी एखाद्या मेकॅनिकला पाटा बदलायचे गिऱ्हाईक मिळवून दे आणि काय काय सांगू? समाजसेवेचे व्रत घेतलेले हे समाजोत्कर्षी महात्मे जागोजागी बघितले की ऊर अभिमानाने भरून येतो. ख यांच्यात भरलेल्या पावसाच्या पाण्यात पक्षी आंघोळ करतात, एकमेकांच्या अंगावर उडवतात, तहानलेले इतर जीव आपली तृष्णा शमवतात तेव्हा तर हे विहंगम दृश्य पाहणाऱ्याचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. त्या ख मधून भरधाव गेलेल्या एखाद्या चाकाने एखाद्याचे कपडे खराब झाल्यास अनाहूतपणे त्यास एखादी नवी अनोखी शिवी सुचते, ती पण नव्या छंदातली. खरोखरच ते वाल्मिकी आणि हे घालशिवी, 'क्रोध वही सोच नई ।' हेच खरे.

ख मधे भर लेल्या पाण्यातून जाणारी आपली गाडी आपल्या काचेवर अचानक धबधबा उमटवते. तो वायपरने पुसून होईपर्यंत समोरून येणाऱ्या एका गाडीला मागे टाकत येणारी दुसरी गाडी आपल्या पुढ्यात असते. तिला वाचवण्याच्या नादात आपण एक दोन धबधबे दुसऱ्या गाड्यांवर टेकवून सटकतो. वीरता वीरता ती हीच नाही का? अन्यथा आजच्या काळांत शौर्याची व्याख्या तरी कशी करायची ?अशीच ना की समोरील ख, त्यातले पाणी, ते पाणी किती, कसे, कुठे व केव्हा उडेल, याचा अंदाज घेत घेत, समोरून येणाऱ्या वाहनांची होणारी दैना ( दंगल मधले 'नैना' गाणं काढून ख शी लढणाऱ्या मुलींवर सिनेमा काढला तर?) पाहून नेमकं आपण काय करायचं हे ठरवून ते तसं करता येत नसेल तर काय करायचं, हे सगळं जमवून गाडीतल्या गाडीत उलटेपालटे होऊनही दारं उघडून रस्त्यावर न पडता पुढे कूच करतो, तोच शूर. असं काय काय करत करत आपण सर्व इच्छित स्थळी पोचतोच, हीच ती नकारात्मकतेची झिलई लाभलेली सकारात्मकता.
ख अमिबासारखे पेशी विभाजन करु शकतात, असा एक नवा कोरा क्रांतिकारक विचार मनात चमकून जातोय. कोणताही अक्ष, केंद्रक असो वा नसो, डी न ए चीही गरज आहे असं नाही. इथून चंद्रावर , मंगळावर त्यांची कामं होतात म्हणे. रस्ता ख ने 'भरलेला' आहे, किती विनोदी वाक्य नाही? ख तसा रिकामा पण काहीतरी भरतोच.
पण ख समोरच असतात लपत नाहीत. तात्पुरते का होईना बुजवता येतात. आपल्या मनातल्या खड्डयाचं काय? दिसत, जाणवत, भरता येत नाहीत. स्वतः ला व इतरांना नेहमीच अडवणारे, दुसऱ्याची गती कमी करायला लावणारे, त्यातूनच तर तयार होतात नवीन ख, त्यांत साचणारे षडविकारांचे पाणी. त्यातूनच जाणाऱ्या विचारांच्या गाड्या, चिखलाने बरबटलेल्या तश्याच फिरत राहतात मनांत खोलवर. तेच ते मन दुरुस्त करून समतोल राखणाऱ्या डांबरीकरणाचे ढोंग आणि तेच ते मतलबी भुसभुशीत निसरड्या संयमाचा चिखल ज्याने ना कधी काम सुरू होत ना कधी संपत. एक कंत्राट संपतं आणि दुसरं सुरू होतं. आपली आपल्यालाच फूस, आणि मनाची नेहमीचीच धुसफूस. हे रस्त्यावरचे खड्डे आपल्या मनाचे आरसे तर नव्हेत? वाटतं कधी चांगले सन्मार्गाचे रस्ते नकोच होते. ज्ञानोबा, शिवबा, तुकोबा... राम मोहन रॉय, र धों कर्वे ...सगळ्यांनीच ख बुजवायचे काम केले होते. सगळ्यांना विरोध व्हावा ? सॉक्रेटिस समजत नाही म्हणून त्याला हेमलॉक पाजणारा समाज खड्डाच नव्हे का? एकंदर काय तर कोकणातून गणपती करून मम्हईला येताना लागणाऱ्या रांगेपेक्षा खूप मोठ्ठी रांग आहे. वासनांच्या खड्डयांचीच हाव हवीशी वाटणारी. स्वतःला हवेत नेऊन खाली आपटवणारे 'अहं' चे खड्डे. येनकेनप्रकारेण 'हटातटाने पटा रंगवुनी ...' मिळणाऱ्या सवंग प्रसिद्धीचे खड्डे कित्ती कित्ती हवेसे असतात, नाही?

कदाचित म्हणूनच धिंड काढताना तोंडाला ( मनाच्या खड्डयांना जमत नाही म्हणून) डांबर फासत असावेत. (परंतु फासणारे लायक असतात का?) खरं का?

- अभिजीत श्रीहरी जोगळेकर

समाजप्रकटनप्रतिक्रियालेखअनुभव

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

12 Sep 2019 - 3:22 pm | जॉनविक्क

काहीही खरडायचे म्हणून खरडता आणि आम्हाला मुग्ध करून जाता :)

मायमराठी's picture

14 Sep 2019 - 11:26 am | मायमराठी

जॉन विकजी,
६०० वाचने झाल्यावर १ प्रतिक्रिया आली. ती पण संदिग्धतेने दाटलेली, लेखन नक्की आवडलंय का खड्डयात :गेलंय , ते कळेना झालंय :)).

की मी नेमकं मराठीतच लिहतो ना आणि नेमकं जे लिले आहे तेच त्यांनी वाचले आहे ना यांवर मलाच शँका येते.

आपण तर साक्षात मायमराठीचे अधिकृत चाकर म्हणविता मग सिद्धहस्त शब्दाबाबत किंतू घेताच कसे बरे ?

मिपा जरा मजेशीर पल्याटफारम आहे प्रतिसाद मिळणे बाबत, जर तुम्ही इतर सदस्यांना अनोनिमस असलात तर. कारण हा इथे लिखाणासोबतच मैत्रीचे गुंफलेले धागेही कामी येत असतात आणि उगा सपक वाटणाऱ्या गोष्टीही प्रतिसादांचा रतीब घेतात. तेंव्हा चिलॅक्स. जर लिखाण कोणाला आवडलेच नसते तर बाजार उठवणारे किमान 10 प्रतिसाद आलेच असते हे नक्की. लिखते रवो.

काहीही खरडायचे म्हणून खरडता

असे म्हटले कारण विषय इतका चावून चोथा झालेला आहे की आता यावर कोणीही काहीही खरडले जमून जाईल. त्यासाठी फार प्रतिभेची गरज नाही.

आणी आम्हाला मुग्ध करून जाता :)

असे म्हटले कारण तुमचा टच जो या लिखाणाला आहे त्याने हा क्लिशे विषय सुद्धा पुन्हा रंजक बनवला.

मायमराठी's picture

14 Sep 2019 - 11:03 pm | मायमराठी

जॉन विकजी,
आपल्या मोकळ्याढाकळ्या प्रतिक्रिया नेहमीच आवडतात. मायमराठीचा ह्या अधिकृत चाकराला आपल्याकडून मिळालेल्या ३ दा 'सिद्धहस्त' मिळालेत. हीच तर ती चाकरी करून मिळालेली संपत्ती.
_/\_

खड्यातील रस्त्यातुन प्रवास करताना, कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर धड नसताना, पाण्याखाली रस्ते आणि रेल्वे गेले असताना... मी बुलेट ट्रेन आणि ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेची चर्चा करतो ! वाहन कायदा मोडण्यार्‍यांसाठी मोठा दंड जाहिर करतात, मात्र वाईट रस्ते बनवणार्‍यांना, काळ्या यादीत गेलेल्या कंत्राटदारांना नव-नविन कंत्राट देउन पुरस्कॄत करतात ! एक १७ हजाराच्या स्मार्ट फोनच्या किंमतीत १ खडा बुजवला जातो अन् सत्ताधीरी टोणगे मी मुंबईत एकही खड्डा पाहिला नाही अशी कोडगी माजुरडी विधान करुन परत मत मागायला आणि उध्याच्या खड्ड्यात तुमच्याच चचण्याची व्यवस्था करुन पुन्हा निवडणुक लढवण्यास सज्ज होतात !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरी मेरी कहानी... :- Happy Hardy And Heer

श्री. नितीन गडकरी नविन मोटार कायद्या बद्धल सातत्याने वक्तव्य करत आहेत, परंतु देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात रस्ते नसुन फक्त खड्डे आहेत यांची माहिती त्यांना नसावी ! त्यांनी सामान्य जनतेसाठी आधी रस्ते उपलब्ध करुन द्यावे आणि मग कायद्याच्या अंमलबजावणी बद्दल १ तास व्याख्यान द्यावे !
संदर्भ :- केंद्रीयमंत्री गडकरी म्हणतात नव्या मोटार वाहन कायद्याला जनतेचा पाठिंबा
लोक जसे कायद्याचे समर्थन करत आहेत तसे खड्डात गेलेल्या महाराष्ट्रा बद्धल आणि भ्रष्ट कंत्राटदारां बद्धल विरोध देखील करत आहेत हे गडकरींना अजुन उमगत नसेल याचे नवलं वाटते !
रस्त्यावरचा दहशतवाद

चंद्राहूनही खडबडीत..!

मुंबईतील एक खड्डा भरण्यासाठी २,०३,९६६ रूपयांचा खर्च
सहा वर्षांत खड्डे बुजवण्यासाठी ११४ कोटी
एक खड्डा १५ हजारांचा!
१७ हजार ६९३ रुपयांना एक खड्डा
=======================================================================================
कलाकारांचेही ‘खड्डे’बोल
कल्याणमध्ये नाट्यरसिक उत्तम रस्ते मात्र थर्ड क्लास
‘मुंबईतील ट्रॅफिकमध्ये कामाचं नियोजन करावं तरी कसं?, शंकर महादेवन यांचा संतप्त सवाल
रस्त्यांवरील ‘या छुप्या दहशतवाद्यांपासून सावधान’, मराठी कलाकारांचा संताप
========================================================================================

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात अॅम्ब्युलन्सला खड्ड्यांमुळे उशीर, एकाचा मृत्यू
‘मुंबईकरांसाठी एकही दिवस गुड-डे नाही खड्डे’
खड्डे ठरताहेत जीवघेणे
खरंच? मुंबईत केवळ ४१४ खड्डे बुजविण्याचं काम बाकी!

मुंबईत राहण्याची आता भीती वाटते; संतापाचा पूर

===========================================================================================

माज कसा करावा तर असा :-
कोण म्हणते मुंबई तुंबली?; महापौरांचा सवाल
‘मुंबईतील रस्त्यांवर एकही खड्डा नाही’; पालिका स्थायी समितीच्या सभापतींचा दावा

आदित्य ठाकरेंनाच बसला रस्त्यावरील खड्ड्यांचा फटका, म्हणाले… शिवसेनेची सत्ता असणाऱ्या ठाण्यातील खड्यांचे खापर आदित्य ठाकरेंनी मेट्रो प्रशासनावर फोडले आहे.

रस्त्यांवर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही : चंद्रकांत पाटील

जाता जाता :- मलिष्काची आठवण आली !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकिस्तान विरोधात भारताला मिळालं घातक ‘अस्त्र’, ७० किमी अंतरावरुनही F-16 पाडणं शक्य

मायमराठी's picture

17 Sep 2019 - 11:07 pm | मायमराठी

'खड्डे पडल्याशिवाय तोंडं उघडत नाहीत' असंच म्हणावं लागेल. (अर्थात गेंड्याची कातडीही ज्यांना लाजते असली राजकारणी धेंडं ह्यांना भीक घालणार नाहीतच) एरवी राजकारण गेलं खड्डयात असं म्हणणारे स्वतः खड्डयात विहार करू लागल्यावर ( त्यांतून बाहेर येऊन म्हणजे) रस्त्यावर येऊन बाह्या सरसावू लागले आहेत हेच दुःखात सुख असं वगैरे म्हणावं लागतंय. देणारं आहे. हळूहळू सगळेच खड्यांचं व्याकरण शिकू लागलेत. आता हेच बघा ना
"अमुकतमुक रस्त्यावरच्या खड्यांत 'भर' पडली" म्हणजे नक्की खड्डे भरले का वाढले ? मग वाढ व्यासाने का खोलीने का संख्येने? निदान हे कळायला मंत्र्यांना खड्ड्यांची भाषा शिकावीच लागेल.

परवाच मलिष्काची आठवण काढली होती ! ती परत आली आहे नवं गाणं घेउन !

लस्सी स्पेशल :-

खड्ड्यांबाबत चिन्मय मांडलेकर संतप्त; उपस्थित केले ‘अज्ञानी माणसाचे प्रश्न’

आदित्य ठाकरेंच्या आगमनापूर्वी रस्ते सपाट
वा... लोक खड्ड्यात मेले तरी चालेल पण याचा प्रवास मात्र सगळीकडे सुखकर झाला पाहिजे !

तुटलेल्या झाकणावर आदित्य ठाकरेंच्या बॅनरचे कोंदण; कल्याणकरांनी लढवली शक्कल

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गांधीवाद की जंग बहुत हो चुकी - मेजर जनरल जी.डी बख्शी, AVSM VSM