Skip to main content

मला आलेले एक सुन्दर इ मेल...

लेखक स्वाती राजेश यांनी शुक्रवार, 21/12/2007 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक मेल आले. ते खूप छान वाटले म्हणून शेअर करत आहे. ते असे.... एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं... असा वाटण्याची जागा मग, मूल झालं की ... मोठं घर झालं की... अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो. मुलांच्या वाढत्या वयात , त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं. आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की... आपल्या दाराशी एक गाडी आली की ... आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की... निवृत्त झालो की ... आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल , असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो. खरं असंय, की आनंदात असण्यासाठी , सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश् चय करायचा हेच बरं नाही का ? जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत राहतं. पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं.... आणि अगदी शेवटी कळतं , की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं . या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं, आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही . आनंद हाच एक महामार्ग आहे. म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा. शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून ... शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी ... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी ... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी ... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी ... आपण थांबून राहिलेले असतो . एकदाचा तो टप्पा पार पडला की , सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण , असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा. आता जरा या पुढे दिलेल्या प्रश् नांची उत्तरं द्या पाहू - १ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू. २ - गेल्या पाच वर्षांत विश् वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत ? ३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील ? ४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का? हं! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण, असं वाटलं नसलं तरी , या प्रश् नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच , नाही का? टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो. पदकं आणि चषक धूळ खात पडतात . जेत्यांचाही लवकरच विसर पडतो. आता या चार प्रश् नांची उत्तरं द्या पाहू - १ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं. २ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील ? ३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत , असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला? ४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं . क्षणभर विचार करा . आयुष्य अगदी छोटं आहे. तुम्ही कोणत्या यादीत असाल? काही अंदाज लागतोय ? मी सांगतो. जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये . पण, हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं, त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे.... आता एक गोष्ट . काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती . पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही . पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं. धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले . सारे मागे फिरले ... सारे जण... "डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, "" आता बरं वाटतंय ?'' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10029
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

अगदी सुंदर स्वाती खरेच अगदी मनाला टच् करणारी ई-मेल आहे ही... नक्कीच आचरणात आणण्याच्या गोष्टी आहेत या. तुम्हाला यासाठी धन्यवाद की माझ्याकडे ही ईमेल इमेज स्वरुपात होती. ती तुम्ही मराठीतून टंकल्याबद्दल धन्यवाद... (सर्वांचे हित इच्छीणारा ...) सागर

धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले . सारे मागे फिरले ... सारे जण... सुरेख! --

खरच अती सुरेख मेल आहे ........... "क्रियेविण वाचाणता व्यर्थ आहे " असे काही तरी सावरकरांचे वचन आहे..... तेव्हा आचरणात आणण्याचा प्रयत्न करा ...........

दोन साधू बसलेले असतात. एक अगदी शांतपणे घडणारे सारे बघत . दुसरा अस्वस्थ असतो, कश्याच्यातरी शोधात असल्यासारखा. पहिला विचारतो, "काय रे, काय झालं?" दुसरा म्हणतो, "काहीच घडत नाहीये. काहीतरी घडायची वाट बघतोय." पहिला हसून म्हणतो, "अरे समोर चालले आहे तेच घडतंय, तेच आयुष्य. अजून वेगळं काही नसतं!" चतुरंग

मला याच ईमेल बरोबर खालील कविता आली होती, कधीतरी असेही जगून बघा.... माणूस म्हणून जगताना हा एक हिशोब करुन तर बघा! 'किती जगलो' याऐवजी 'कसे जगलो', हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा! कधी असेही जगून बघा... कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार करुन तर बघा! तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा! कधी असेही जगून बघा... संकटांमुळे खचुन जाणारे,तर शेकडोंनी मिळतात कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिंमत दाखवून तर बघा! स्वत:पुरता विचार तर नेहमीच करतो आपण कधीतरी बुडत्यासाठी काठीचा आधार होऊन तर बघा! कधी असेही जगून बघा... वर्तमान आणि भविष्याची चिंता तर सदाचीच असते कधीतरी भूतकाळाच्या विश्वात गुंगून तर बघा! काळाची वाळू हातातून निसटली म्हणून काय झाले? आधी अनुभवलेल्या क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा! कधी असेही जगून बघा... प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी? एखाद्यावर जिवापाड,निर्मळ प्रेम करुन तर बघा! कधी असेही जगून बघा...

नविन वर्शासाथि कहितरि विचारदिशा नक्किच मिलेल असे कहि वाचुन आपला योगेश्चन्द्र

In reply to by योगेश्चन्द्र

अवांतर - योगेशराव, आपलं मराठी लेखन खूप लाघवी आणि निष्पाप आहे! असंच राहू द्या! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ठ्यॉ...फुटलो...

या विरोपातून आलेल्या मजकूराचा जनक कोण असेल? त्याने जाणीवपुर्वक आपले नाव अज्ञात ठेवले असेल का? जो कुणी अज्ञात असेल त्याला मनापासून धन्यवाद. किशोरी , स्वाती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्द्ला धन्यवाद. सोहम कोहमच्या गोष्टी ले. प्रा. दत्ता दंडगे या प्रायोगिक नाटकाची आठवण झाली. प्रकाश घाटपांडे

...आणि मनात निरनिराळ्या विचारांची गर्दी करणारे तुमचे मूळ टिपण. असे काही वाचले की जाणवते , की अरे, हे काही आपल्याला अज्ञात नव्हते ! पण रोजच्या धबडग्यात हे आपण पार विसरून गेलेले आहोत. माझ्या एका आवडत्या लेखकाने (एका अगदी वेगळ्या संदर्भात ) असे काही म्हण्टले आहे की जे इथे चपखल लागू पडेल. आपल्या जगण्याची तुलना ते एका अतिशय गुंतागुंतीच्या यंत्राशी करतात. एखादे यंत्र मोठ्या प्रयत्नाने कसे चालते, कसे चालवले जाते हे आपण शिकतो आणि काहीतरी विशेष मिळवल्यासारखे ते साजरे करतो. पण हे यंत्र घेऊन कुठे जावे , त्याचा नक्की उपयोग काय हे काही आपल्याला उमगले नाही अद्याप ! असो. "लाइफ इज जस्ट व्हॉट हॅपन्स टू यू व्हाईल यू आर मेकींग अदर प्लॅन्स" असे लेनन नावाचा माणूस म्हणून गेला ते खरे अगदी ! तेव्हा पुढे जात रहाण्याच्या , काहीतरी काबीज करण्याच्या रोजच्या झगड्यात, थोडे थांबा , मिसळपावाचा थोडा आस्वाद घ्या ; इथल्या जित्याजागत्या माणसाना हलो म्हणा (वाटल्यास चार "श्या" द्या !!) आणि पुढे चला ; खरे ना ? :-)

In reply to by मुक्तसुनीत

रोजच्या झगड्यात, थोडे थांबा , मिसळपावाचा थोडा आस्वाद घ्या ; इथल्या जित्याजागत्या माणसाना हलो म्हणा (वाटल्यास चार "श्या" द्या !!) आणि पुढे चला ; खरे ना ? :-) अगदी खरे! :) तात्या.

खूप सुंदर आहे मेल. प्रत्येकाने आवर्जून वचावे असे आहे. स्वाती.. धन्यवाद. - प्राजु.

फारच सुंदर आणि 'विचार' करायला लावणारे विचार आहेत.पण केवळ विचार आणि स्तुती करण्यापेक्षा कृती करण्यावर भर द्यायाला हवा,नाहितरी म्हटलेच आहे की... "क्रियेवीण 'वाचा'ळता व्यर्थ आहे रे | आधि केलेची पाहिजे"- संत तुकारामदास (संदर्भः मिसळबोध)

स्वाती , मि.पा. वर तसा नवीन आहे. जुने लेखन वाचत असताना हे सापडले. ई-मेल खुप खुप आवडला. बर्‍याच जणाना एक नविन द्रुष्टीकोन मिळेल. सिऍटल ऑलिंपीकचा किस्सा एकदम टचिंग ! ई - मेल ईथे दिल्याबद्दल धन्यवाद. केशवराव.

छान आहे इ-मेल. सिऍटल ऑलिंपीकचा किस्सा खरोखरच एकदम टचिंग ! धन्यवाद!! अश्विनि.

चतुरंग, तुमची झेन कथा पण आवडली, पण झेन कथा म्हणजे काय ते सांगाल का? अश्विनि.

खरच खुपच सुंदर आहे हा मेल. सिऍटल ऑलिंपीकचा किस्सा वाचुन.... =D> स्वातीताई,किशोरी हा मेल आणि कविता सगळ्यांपर्यंत पोहचवल्या बद्द्ल धन्यवाद. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

खरंच खूपच भावस्पर्शी मेल आहे.प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.
खरं असंय, की आनंदात असण्यासाठी , सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश् चय करायचा हेच बरं नाही का ?
हे विधान विशेषतः आवडले.पुनश्च अभिनंदन.

ईमेल आहे. हा धागा उडवु नये. भेन्डि(बेन्गळुरु)

स्वाती ताई मेल छान आहे. डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, "" आता बरं वाटतंय ?'' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. मस्त आहे. त्याला म्हणतात माणूसकी. एकमेकाना बरोबर घेऊन आपण आपले लक्ष्य गाठावे.