प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ? (Beyond the 'Rainwater Harvesting')

सुनिल प्रसादे's picture
सुनिल प्रसादे in जनातलं, मनातलं
14 Aug 2019 - 12:43 pm

प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ?
(Beyond the 'Rainwater Harvesting')

भाग - एक.
--------------

'रेनवॉटर हार्वेस्टिंग' ही इसवीसनपूर्व बारा हजार वर्षांचा इतिहास असलेली संकल्पना आहे. माणसं तेव्हापासून हे करत आली आहेत. 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'च्या आजपर्यंतच्या व्याख्येमध्ये पावसाचे जमिनीवर पडलेले पाणी गोळा करणे आणि ते साठवणे ह्या दोनच गोष्टींचा समावेश आहे.

आपल्या देशातही आपण 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'ची कामं वेगवेगळ्या पद्धतींनी मागील अनेक वर्षे करत आलो आहोत. परंतु ते करत असताना आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे ह्याचा आपण फार गंभीरपणे विचार केला आहे असं दिसतं नाही. 'रेनवॉटर हार्वेस्टिंग' करताना पावसाचे पाणी जमिनीवर साठवण्याबरोबरच भूगर्भजलसंवर्धन हे आपले मुख्य उद्दिष्ट असायला हवे ह्याकडे आजपर्यंत आपण कधीच लक्ष दिले नाही. आपल्या ह्या तोकड्या विचारसरणीमुळेच आपल्यावर ओला आणि सुका अशा दोन्ही दुष्कळांचा सामना एकाच वेळी करण्याची पाळी वारंवार यायला लागली आहे. 'रेनवॉटर हार्वेस्टिंग' हे प्रभावी असं दुधारी अस्त्र आहे. विचारपूर्वक वापर केला तर ओला आणि सुका अशा दोन्ही दुष्काळांवर मात करण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'साठी म्हणून बांधलेली धरणे सोडता सध्या सार्वजनिक पातळीवर आपण जे काही करत आहोत तो केवळ एक उपचार असून स्वतःला आणि इतरांनाही फसवण्यासारखेच आहे. म्हणूनच त्यासाठी विविध प्रकारची शक्ती (कालशक्ती, धनशक्ती, श्रमशक्ती इ.) प्रचंड प्रमाणात खर्च होऊनही आपल्या पदरात काहीच पडलेलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

सध्या 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'साठी म्हणून ' पाणी अडवणे, पाणी जिरवणे' सारख्या ज्या पध्दती आपण अंगीकारल्या आहेत त्या पद्धती म्हणजे खूपच संथगतीने चालणारी केवळ एक नैसर्गिक क्रिया आहे. थोडा जरी विचार केला तरी त्या क्रियेमध्ये प्रयत्नपूर्वक पाणी जीरवण्यासाठीच्या विचारांचा पूर्णपणे अभाव आहे हे आपल्या लक्षात येतं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूण पावसाच्या प्रमाणाच्या जवळजवळ ऐंशी टक्के पावसाचे पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळाल्यानंतरच आपण त्या पद्धती आमलात आणायला सुरवात करतो. म्हणजेच पावसाच्या उर्वरित खूप कमी पाण्यासाठी आपण खूप मोठा खर्च करून ह्या पद्धती वापरतो. बरं त्या उर्वरित वीस टक्के पाण्याचं तरी शतप्रतिशत नियोजन आपण करू शकतो का ? तर तसेही नाही. त्यातलेही बरेचसे पाणी समुद्रालाच वाहून जाते. एकूणच हे सर्व चित्र पाहता आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल की दरवर्षी आपण चार आण्याच्या कोंबडीसाठी बारा आण्याचा मसाला खर्च करत आहोत.

आपल्या राज्याच्या एक हजार मिलिमीटर ह्या सरासरी पर्जन्यमानाच्या दोन ते तीन टक्के पाण्याचे जरी आपण योग्य नियोजन किंवा हार्वेस्टिंग करू शकलो तरी राज्याचे पाण्याचे सर्व प्रश्न सुटू शकतात. परंतु ज्याअर्थी आजही आपल्यासमोर पाण्याची समस्या आ वासून उभी आहे, त्याअर्थी अद्यापही दरवर्षी आपण तेव्हढ्या पाण्याचेही हार्वेस्टिंग इतक्या वर्षात करू शकलेलो नाही हे स्पष्ट होतं. ह्यावरचा उपाय म्हणजे आपल्याला 'रेनवॉटर हार्वेस्टिंग' ह्या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन 'जलसंवर्धना'ची संकल्पना स्वीकारायला हवी. 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'च्या परंपरागत पध्दतींचं पुनरावलोकन आणि पुनर्मुल्यांकन करून आपल्याला त्यांच्यापेक्षा प्रभावी आणि संपूर्ण पावसाला स्वतःच्या कवेत घेऊ शकणारी नवीन तंत्र शोधायला हवीत आणि ती तंत्र राबवणाऱ्या नवीन पद्धती निर्माण करायला हव्यात, जे आपण आजपर्यंत कधी केलं नाही.

'SAVE WATER' चे नारे देऊन लोकांना पाणी वाचवायला प्रवृत्त केलं तरीही तो पाणी खर्च करण्याचाच मार्ग राहतो, पाणी संपावणारा. आपल्याला अधिक पाणी मिळवण्याचे मार्ग हवे आहेत.

तंत्र म्हणजे सृष्टीचे नियम. ते सृष्टीच्या निर्मितीबरोबरच अस्तित्वात येतात आणि नंतरदेखील कायमचे अस्तित्वात राहतात. शोधले की सापडतात. त्यापैकीच एक तंत्र म्हणजे पाणी आणि जमीन यांचं नातं.

पाणी आणि जमीन ह्या दोघांचं नातं हेच आपल्याला मदत करणारं सर्वात शक्तिमान तंत्र आहे. काय आहे हे तंत्र ? तर,
" जमिनीच्या उदरात सोडलेलं पाणी जमिनीचं उल्लंघन करून पुन्हा बाहेर जमिनीच्या पातळीच्यावर कधीही येत नाही." अगदी साधं सोपं आणि एका वाक्यात मावेल एव्हढंच,आणि कदाचित काहीजणांच्या ओळखीचंदेखील.

आपल्या परसातली विहीर कितीही पाऊस पडला तरी ओसंडून वाहते आहे असं चित्र आपण कधी पाहिलंय? विहिरीमध्ये वरून कितीही पाणी पडलं किंवा आपण सोडलं तरी जमिनीच्या पातळीच्या वर पाणी केव्हाही येत नाही.

'पागोळी वाचवा अभियाना'च्या माध्यमातून हेच तंत्र सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. अभियानांतर्गत तयार केलेलं मॉडेल म्हणजे ते तंत्र राबवण्यासाठी निर्माण केलेली एक पद्धती आहे. हे तंत्र कसं काम करतं हे तुम्हाला आमच्या फेसबुक पेजवरचे व्हिडीओ पाहताना लक्षात आलंच असेल. थोड्या काळामध्ये भरपूर पाऊस पडूनदेखील त्या जलकुंडातील (खड्डा) पाणी बाहेर येत नाही. जेव्हढ्या जास्त प्रमाणात वरून पाणी जलकुंडात पडतं तेव्हढ्याच जास्त प्रमाणात ते जलकुंडाच्या बाहेर न येता खाली जमिनीत जिरत जातं. ह्याला आपण प्रयत्नपूर्वक पाणी जमिनीमध्ये जिरवलं असं म्हणू शकतो. इथे हे मुद्दाम नमूद करत आहोत की व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बांधकामसह चार फूट खोलीच्या जलकुंडाची पावसातली नेहमीची पाण्याची पातळी जलकुंडाच्या तळापासून दीड फूट वर आहे आणि ह्या ठिकाणी मागील चाळीस दिवसात 3200 mm पेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. अतिवृष्टीच्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात जरी पाणी जमिनीच्या वर (बांधकामाच्या नव्हे) पाच सहा इंचानी आलं तरी पावसाचा जोर जरा जरी कमी झाला की ते लगोलग जमिनीच्या पातळीला येतं आणि हळूहळू तिथल्या भूजल पातळीवर येऊन स्थिरावतं. ज्या ठिकाणी भूजल पातळी जलकुंडाच्या एक मीटर खोलीपेक्षा जेव्हढी जास्त असेल तेव्हढी त्या जलकुंडाची पाणी जिरवण्याची क्षमता जास्त आहे असं मानायला हरकत नाही. आकाशातून पडणाऱ्या पावसावर आपला अंकुश असू शकत नाही हे मान्य आहे. परंतु तो जमिनीवर आल्यानंतर मात्र हे तंत्र वापरून इकडे तिकडे वाहणाऱ्या पावसाला आपण आपल्या मर्जीप्रमाणे जमिनीच्या उदरात वळवू शकतो.

हे तंत्र राबवताना उंचीला महत्व आहे. त्यामुळे इमारती, शेड, मांडव इत्यादींच्या छपरावर पडणारे पावसाचे पाणी गोळा करून ते नजीकच्या जलकुंडात सोडणे ह्या पद्धतीने सोपं होतं आणि पावसाचा एकही थेंब फुकट जात नाही. अगदी शत प्रतिशत जलसंवर्धन. परंतु छपरावर पडलेल्या पाण्याप्रमाणे सगळ्याच पावसाच्या पाण्याचं शत प्रतिशत संवर्धन करायचं तर आपल्याला जमिनीवर पडलेलं पाणीदेखील गोळा करावं लागेल. जमिनीवर पडलेल्या पावसाचं पाणी जर आपल्याला जलकुंडात सोडायचं झालं तर आपल्याला वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. ते कसं करायचं हे आपण दुसऱ्या भागात पाहूया.

सुनिल प्रसादे.
दापोली.
दि. 12 ऑगस्ट 2019.
(क्रमशः)

अधिक माहिती- https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448

#RainwaterHarvesting
#PagoliWachawaAbhiyan

समाजप्रकटनविचारलेखमाहिती

प्रतिक्रिया

सुखी's picture

14 Aug 2019 - 6:06 pm | सुखी

कृपया Video YouTube war upload karun link dya.

सुनिल प्रसादे's picture

19 Aug 2019 - 8:42 pm | सुनिल प्रसादे

अधिक माहितीआणि व्हिडिओ साठी लेखाच्या शेवटी दिलेली फेसबुक लिंक पहावी.

अधिक माहिती- https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448

सस्नेह's picture

20 Aug 2019 - 7:43 am | सस्नेह

तुम्ही दिलेल्या लिंकवर व्हिडिओ नाही आणि मी फेसबुक वापरत नाही.
कृपया व्हिडिओ इथेच द्यावा.

हे अगदी बरोबर सांगितलं आहे.