कोणीतरी बाजूला सरकले असेल......

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
4 May 2019 - 10:39 am

घरातील चार मुले चार दिशांना पांगतात. घरातील कर्ता पुरुष अंथरुणाला खिळतो. मग बागेत नको असणारे तण पुरुषभर उंच वाढू लागते. नको त्या कुठल्या कुठल्या जाडजूड वेली मोठमोठ्या झाडांना विळखा घालू लागतात. बाग गुदमरते. घर आकसू लागते. माईंचे वय झालेले, उमेद संपलेली. पण नवऱ्याची अहोरात्र सेवा, त्यात खंड नाही. अशात लाडली नावाची मांजरी घरात येते, जीव लागतो. ती गर्भार मांजरी एके दिवशी नाहीशी होते. तिला शोधशोधून माई थकतात. त्याच रात्री नवर्याचा जीव जातो. सभोवती कुट्ट काळोख. त्या काळी इतकी संपर्कसाधने नव्हती. जवळ दुसरे माणूस नाही. माई वरच्या मजल्यावर जाऊन किमान गुरखा तरी पाय आपटत येण्याची कान लावून वाट पहात राहतात. जराशाने त्यांना पायाशी उबदार काही लागते. गायब झालेली लाडली आपली चार पिले घेऊन त्यांच्या पायाशी घुटमळत असते. माईना संताप येतो. ‘तुझ्या पिलांना जागा करून द्यायला त्यांना स्वत:ला बाजूला सरकावे लागले!’ पण त्यांच्या विकल कुडीत संताप तोलून धरण्याचीही शक्ती नसते. त्या विचार करू लागतात, ‘आम्ही जन्माला आलो त्या वेळी कोणीतरी बाजूला सरकले असेल. ते कोणीतरी जन्माला येताच आणखी कोणीतरी सरकून जागा करून दिली असेल....’ बराच वेळ जातो. तेवढ्यात समोर एक भली मोठी, याआधी कधीही न पाहिलेली काळीकुट्ट मांजरी त्यांच्या समोर येऊन उभी राहते. माई निरखून पाहतात, तिच्याही पोटाचा आकार भरदार, गोलसर दिसतो. माईंचे मन चरकते. विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या मांजरीच्या हिरवट डोळ्यांकडे पहात राहतात ..... जी ए पुढे तिच्या मनातले लिहित नाहीत. पण माणूस म्हणून आपण तो अंदाज करू शकतो, ‘हिच्या पिलांना जागा करून द्यायला या घरात माझ्या शिवाय कोण राहिलंय? आता इथला प्रवास संपण्याची माझी पाळी.....’

जी एं ची 'पुनरपि' कथा वाचून संपली आणि स्मरणात सुरु झाली. सासर, माहेर, आजोळ, शेजारीपाजारी, ओळखीच्यातले.... असे किती किती तरी बाजूला सरकलेले चेहरे आठवून गेले. सगळेच जायच्या वयाचे नव्हते, सगळेच असाध्य रोगाने आजारी नव्हते, काही हसता खेळता बाजूला झालेले, आपण हाक मारू तर लगेच समोर येऊन ‘कधी आलीस? आता जाऊ नकोस लगेच, रहा,’ असा मायेने आग्रह करतील, इतके जिवंत. जरा आणखी आठवून पाहिले, तर त्या गेलेल्यांनी कुणाकुणाला जागा करून दिली ते ही चेहरे आता डोळ्यांसमोर तरळतात. आलेले नवे चेहरे जुन्याची रिप्लेसमेंट होऊ शकत नाहीतच. आलेले सगळेच ‘कधी आलीस?.......रहा’ च्या आपुलकीचे, हसरे, जिवंत असतीलच असेही नाही. मग घरदार अनोळखी गर्दीसारखे वाटू लागते. आपण आपले मोजके सामान उचलून, उठून चालू लागतो.

कोणीतरी जन्माला येताच, कोणीतरी जागा करून देत असेल, हे खरेच खरे का? बाहेर ऊन मी म्हणत असते. सगळीकडे माणसेच माणसे दिसू लागतात. सगळी अनोळखी गर्दी. ही इतकी माणसे जन्माला आली, तेव्हा त्यांना कोणी जागा करून दिली असेल? एकास एक माणूस जाता, तर इथे इतकी गर्दी नक्कीच झाली नसती. मग कोण बाजूला सरकले? सिमेंटच्या मैलोनमैल पसरलेल्या कडकडीत रस्त्याच्या दुतर्फा/एकतर्फा एकही झाड दिसत नाही, आजूबाजूला नजर जाईल तिथपर्यंत एखादेच खुरटे झुडूप दिसते. रसरशीत झाड दिसत नाहीच. इतक्या जन्मलेल्या गर्दीला जागा कुणी करून दिली असेल? पडलेल्या, पाडलेल्या झाडांनी? जंगलांनी? नामशेष झालेल्या कितीतरी प्राणीपक्ष्यांच्या प्रजातींनी?

अशा वेळी जी एं च्या गूढ, भयप्रद कथा जास्त दयाळू वाटू लागतात. एकाच्या बदल्यात एक असे जननमरण असते, तर मी गर्द वनराईतून, आतड्याच्या माणसांतून प्रवास केला असता.

शिवकन्या

मांडणीवावरमुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

शिव कन्या's picture

4 May 2019 - 11:21 pm | शिव कन्या

आनन्दा.... काय लिहिताय?

अन्या बुद्धे's picture

4 May 2019 - 2:20 pm | अन्या बुद्धे

आवडलं.. सरकून जागा देणे..

यशोधरा's picture

4 May 2019 - 3:55 pm | यशोधरा

सुरेख.

तुषार काळभोर's picture

4 May 2019 - 4:42 pm | तुषार काळभोर

मिपावंतर-
बरेच जुने आयडी सरकतात (/सरकवले जातात) आणि नवीन आयडीना जागा मिळते.

मस्त. शेवटचे दोन परिच्छेद तर फारच आवडले.

श्वेता२४'s picture

4 May 2019 - 8:47 pm | श्वेता२४

दर्जेदार लिखाण

जव्हेरगंज's picture

4 May 2019 - 8:56 pm | जव्हेरगंज

क्लास!!!

नावातकायआहे's picture

4 May 2019 - 9:37 pm | नावातकायआहे

मस्त.... आवडलं!

छान लिहिलं आहे ... कोणासाठी तरी कोणाला बाजूला सरावं लागणं ही कल्पना काहीशी भीतीदायक आहे :(

शिव कन्या's picture

4 May 2019 - 11:23 pm | शिव कन्या

सत्य बहुतेकवेळा भितीदायकच असते.

शेखरमोघे's picture

4 May 2019 - 10:57 pm | शेखरमोघे

छान, मोजक्या शब्दात सुन्दर आशय रेखन!

शिव कन्या's picture

4 May 2019 - 11:24 pm | शिव कन्या

लिहियाची उमेद वाढली..धन्यवाद

नाखु's picture

5 May 2019 - 8:17 am | नाखु

चाबूक लेख.
धागा बुकमार्क केला आहे.

आठवणींच्या गाठोड्यातला पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

बिपीन सुरेश सांगळे's picture

5 May 2019 - 2:08 pm | बिपीन सुरेश सांगळे

आपण आता आहोत आतले
कधीतरी होणार बाहेरचे
सासुरवास संपणार हा अन
बोलावणे येणार माहेरचे ...

लई भारी's picture

6 May 2019 - 1:54 pm | लई भारी

पुलेशु!

दुसऱ्यासाठी जागा करून देणे हा विचारच फार छान आहे.

लेखन आवडले.

मित्रहो's picture

8 May 2019 - 7:49 am | मित्रहो

छान आशयसंपन्न लिखाण

जालिम लोशन's picture

8 May 2019 - 3:41 pm | जालिम लोशन

+1

अभ्या..'s picture

8 May 2019 - 3:57 pm | अभ्या..

सुरेख.
नव्याची नवलाई घेऊन भरली जाते रिकामी जागा इतकीच काय ती आनंदाची गोष्ट, अन्यथा नरकच.

ज्योति अळवणी's picture

9 May 2019 - 10:12 pm | ज्योति अळवणी

खूपच छान लिहिलं आहे