कागदफूल

इरामयी's picture
इरामयी in जनातलं, मनातलं
28 Apr 2019 - 11:29 am

मम्म्मी, what is bougainvillea?

माझी छोटी मला विचारत होती. मी तिला बोगनवेलीचं चित्र दाखवलं, थोडीशी माहिती वाचून दाखवली आणि मग माझं मलाच कळलं नाही की माझं मन भूतकाळात कधी घरंगळलं ते.

माझ्या लहानपणी आम्ही मुली बोगनवेलीच्या फुलांना कागदी फुलं म्हणत असू. उन्हाळ्याच्या सुट्टया लागण्याच्या जरा आधीपासून आजूबाजूच्या घरांच्या कुंपणांवर एखाद्या सिद्धहस्त कलावंताने चितारल्यागत लगडलेली ती गडद गुलाबी पर्णसादृश फुलं म्हणजे बोगनवेलीची फुलं.

या बिनवासाच्या फुलांची मला आणि माझ्या मैत्रिणींना कसली मोहिनी होती काय जाणे! कुंपणांचे शेंडे गुलाबी व्हायला लागले की आमच्या नजरा अधूनमधून सततच शेजाऱ्यापाजाऱ्यांची कुंपणं चाचपायला सुरुवात करत. कागदी फुलं यायला लागली. आता आठवड्या दोन आठवड्यात बहर येईल. मग खूप खूप मज्जा!

ती फुलं खुडणं म्हणजे एक कौशल्याचं काम. कारण या फांद्या संपूर्णपणे काट्यांनी मढलेल्या. त्यामुळे अगदी अलगदपणे ती पानांसारखी दिसणारी फुलं काढायची आणि हाताला ओरखडे पडू नाही द्यायचे हे काम काही सोपं नसायचं. आणि आम्ही सगळ्या मुली लहानखुऱ्या. फुलं असायची झाडांच्या शेंड्यावर. मग एकीने ओणवं उभं रहायचं आणि दुसरीने तिच्या पाठीवर चढायचं. तिसरी मैत्रीण सोबत असेल तर तिने फ्रॉकची झोळी करून त्यात फुलं गोळा करायची.

आणि या गडबडीत एखादा वात्रट काटा बोटाचं किंवा तळहाताच्या मागच्या भागाचं किंवा थेट गळ्याचं किंवा गालाचं चुंबन घ्यायचाच. किंवा कधी एकही ओरखडा येऊ दिला नाही म्हणून खूष व्हावं तर ओणवं राहिलेली मुलगी अचानक काही कारणास्तव हलायची आणि मग दोघीही फुलांसकट तोंडघशी!

ती कागदफुलं फुलं आंम्ही वहीत दडपून ठेवायचो आणि मग काही दिवसांनी वहीच्या पानांचा वास त्या फुलांना येऊ लागे. निदान मला तरी तो यायचा. कारण मी तो कौतुकाने घरात कोणाला देऊ केला तर माझी हसून बोळवण केली जायची. तुझं आपलं काहीतरीच असतं. तुला कागदी फुलं आवडतात त्यामुळे तुला हे असले कसले कसले वास येतात! आम्हांला कुणाला नाही येत वहीचा वास फुलांना.

कागदी फुलांची अजून एक गंमत सांगते. ही फुलं केसांत अडकवलेली छान दिसायचीच पण ती मोगऱ्याच्या किंवा अश्याच छान वासाच्या जाई किंवा जुईच्या गजऱ्यात मधोमध माळून देवीच्या तसबिरीला वाहिली की सुद्धा खासच शोभून दिसायची.

आता हल्ली धकाधकीच्या शहरी जीवनात बोगनवेलीची फुलं खुडणं कित्येक वर्षांत राहूनच गेलंय. अगदी विसर पडला होता. आज छोटीच्या प्रश्नामुळे त्या लहानपणीच्या नाजूक गुलाबी आठवणी जाग्या झाल्या आणि मी माझ्या मुलांना सांगून लगोलग बाहेर पडले. घराजवळच्या एका चर्चच्या कुंपणावरची मऊसर गुलाबी कागदफुलं मला जोरजोराने हाका मारत होती:

"ए, धांदरट. किती वर्षांपासून तुला हाका मारतोय. म्हटलं ही वेडी मुलगी आम्हांला विसरली की काय...?"

मी त्यांना म्हटलं, आलेच बघा तुम्हांला घरी घेऊन जायला. पण आज माझ्यासाठी नाही हं, माझ्या छोट्या मुलीसाठी...

मुक्तकरेखाटनप्रकटनलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

28 Apr 2019 - 11:45 am | वामन देशमुख

>> म्हटलं ही वेडी मुलगी आम्हांला विसरली की काय...?

छान लिहिलंय हं!

प्रमोद देर्देकर's picture

28 Apr 2019 - 12:42 pm | प्रमोद देर्देकर

खूप छान लिहलंय. मिपावर स्वागत .
येवू दे अजून.

कंजूस's picture

28 Apr 2019 - 12:49 pm | कंजूस

मस्तच।

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Apr 2019 - 12:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मनोगत !

जालिम लोशन's picture

28 Apr 2019 - 12:59 pm | जालिम लोशन

छान

इरामयी's picture

28 Apr 2019 - 2:36 pm | इरामयी

माझ्या पहिल्यावाहिल्या लिखाणाला असे उत्तेजनात्मक प्रतिसाद मिळतील असं वाटलं नव्हतं.

मनःपूर्वक आभार!

इरामयी's picture

28 Apr 2019 - 2:36 pm | इरामयी

माझ्या पहिल्यावाहिल्या लिखाणाला असे उत्तेजनात्मक प्रतिसाद मिळतील असं वाटलं नव्हतं.

मनःपूर्वक आभार!

अभिनंदन, छान लिहिलंय, स्वागत आहे मिपावर.
असेच उत्साही प्रतिसाद आपण इतर लेखकांच्या लेखावरही द्यावेत ही अपेक्षा. खूप वेगवेगळ्या विषयावरचे लेख, कविता, कथा, चर्चा इथे आहेत.
आपल्या प्रतिसादाने जसा आपल्याला आला तसा हुरूप त्यांनाही मिळो ही सदिच्छा.
धन्यवाद

इरामयी's picture

29 Apr 2019 - 7:29 pm | इरामयी
इरामयी's picture

29 Apr 2019 - 7:29 pm | इरामयी
इरामयी's picture

29 Apr 2019 - 7:30 pm | इरामयी

हो, जरूर प्रतिसाद देईन.

वरचा मजकूर चूकून दोन्दा छापला गेलाय. क्रुपया उडवाल का?

सुचिता१'s picture

28 Apr 2019 - 3:52 pm | सुचिता१

ओघवती शैली आहे तुमची . पु ले शु!!

अन्या बुद्धे's picture

28 Apr 2019 - 6:41 pm | अन्या बुद्धे

छान!

श्वेता२४'s picture

28 Apr 2019 - 9:02 pm | श्वेता२४

आवडले.

सोन्या बागलाणकर's picture

29 Apr 2019 - 9:06 am | सोन्या बागलाणकर

वा वा सुंदर प्रकटन!
अजून येऊ द्या.

महासंग्राम's picture

29 Apr 2019 - 9:54 am | महासंग्राम

अभिनंदन, छान लिहिलंय,

चौथा कोनाडा's picture

29 Jun 2019 - 11:14 pm | चौथा कोनाडा

वाह, सुंदर सुरेख !
माझ्याही बालपणीच्या कागदीफुलांच्या आठवणी जाग्या झाल्या !
किती निरागस असते ते वय ! किती जीव जडतो अश्या छोट्या छोट्या गोष्टीवर !

शेवटचा परिच्छेद आणि संवादात्मक शेवट तास मस्तच !

लिहीत रहा, आनंद वाटत रहा !

पुलेशु ।।

टर्मीनेटर's picture

29 Jun 2019 - 11:43 pm | टर्मीनेटर

छान लिहिलंय.
पुढील लेखनास शुभेच्छा!

मदनबाण's picture

30 Jun 2019 - 10:53 am | मदनबाण

छान लिहलंय, लिखाण करत रहा...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant

जालिम लोशन's picture

6 Jul 2019 - 11:59 pm | जालिम लोशन

छान