झगमगाटातील अस्वस्थता....
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
एक जोरदार आळस देऊन मी उठलो. भ्रमणध्वनीवर 'ओला' निरोप पावला. Driver Saroj is reaching your address. 'सरोज? ओलाने लेडी ड्रायव्हर पाठवला की काय?' क्षणभर सुखावलेल्या माझ्या मनाला चालकाच्या तपशिलात छायाचित्र दिसले जे बाप्याचे होते. म्हंटले 'असो.' सामानाची बॅग उचलली आणि खाली आलो. चालक वाट पाहात होता. डिकीत (भारतात हाच शब्द प्रचलित आहे) बॅग ठेवली आणि पासपोर्ट, तिकिट थोडेफार भारतिय आणि ओमानचे चलन असलेला महत्वाचा चामड्याचा कसा उर्फ 'पाऊच' घेऊन मी चालकाशेजारी बसलो. परदेश प्रवास, विमान प्रवास तसा आता मला नविन नव्हताच. गेली ३८ - ३९ वर्षे परदेश प्रवास करीत आल्याने माझ्या हालचालीत, नवव्या बाळंतपणाला निघालेल्या एखाद्या ग्रामिण महिले इतकी सहजता होती. गाडीत बसल्याबसल्या भारतातील एकेका मित्रसमूहावर मी निघाल्याचा आणि मस्कतच्या मित्रसमुहांवर मी येत असल्याचा निरोप टाकला. एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्यावर फेसबुक चाळत बसलो. भारतातील मित्रांचे 'आनंदित' हास्यमुद्रांचे शिक्के भ्रमणध्वनीवर येऊ लागले तर मस्कतच्या मित्रांचे 'रडवेले' शिक्के येऊ लागले. रजेचा दिवस असल्याने महामार्गावर विषेश रहदारी नव्हती. वेळेत विमानतळावर पोहोचलो. खाली उतरून मोठी बॅग उतरवली. 'ओला'वाल्याचे हात ओले केले. तो निघाला..निघाला...आणि दिसेनासा झाला. मी वळलो. बॅग उचलली आणि शरीरातून वीज सरसरली. पासपोर्ट, तिकिट असलेला पाऊच कारमध्येच राहीला होता. 'ओला' ड्रायव्हर मुंबईच्या रहदारीत विरघळला होता.
आता एकच मार्ग होता. चालकाला फोन करून बोलवायचे. पण भ्रमणध्वनीतील आलेले निरोप तपासून पाहता ड्रायव्हरचा भ्रमणध्वनी असलेला निरोप कुठे सापडेना. वेगवेगळ्या प्रकारे शोध घेऊन ही क्रमांक मिळेना आणि माझी अस्वस्थता वाढू लागली. ताबडतोब करण्यासारखी गोष्ट म्हणजे पोलीसात तक्रार करणे. पोलीस डेस्क विमानतळाच्या दूसर्या टोकाला होते. आता धावाधाव अटळ होती. वेळ पुढे सरकत होती. पोलीसांना सर्व हकीकत सांगितल्यावर त्यांनी आपापसात जरा विचारविनिमय करून मला 'ओला'च्या डेस्कवर तक्रार करायला सांगितले. 'ओला' डेस्क कुठे आहे हे विचारल्यावर त्यांनी समोरची इमारत दाखविली. 'सहाव्या मजल्यावर कोणालाही विचारा.' हा निरोप घेऊन मी लगबगीने (जमेल तेव्हढ्या) निघालो. सहाव्या मजल्यावर पोहोचलो. 'ओला'चे डेस्कही मिळाले. तिथे ५-६ जणं गर्दी करून उभे होते. डेस्कवर कोण बसलंय दिसत नव्हतं. गर्दीत घुसलो. तिथे एक 'तुला पाहते रे' आकाराची मुलगी बसली होती. तिला माझी समस्या सांगितल्यावर 'तिथे सुपरवाझरला सांगा' अशी सज्जड विनंती तिने मला केली. तिने दाखविलेल्या दिशेने पाहीले तर तिथे जवळ जवळ १५-२० माणसे अस्ताव्यस्त फिरत होती. 'अहो! त्यांच्यात सुपरवायझर कोण' असे विचारता 'तिथे विचारा होss!' अशा वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या. तिथे एकाच्या अंगावरील जा़कीटावर 'OLA' असं लिहीलं होतं. त्याला विचारलं 'तुम्ही सुपरवाझर आहात का?' त्यावर हो, नाही काही न म्हणता म्हणाला 'काय काम आहे?' मी कैफियत मांडली. त्या बरोबर 'त्यांना सांगा असे म्हणून अजून एका तिसर्याकडेच मला पाठवले. हे सर्व इतक्या तपशिलात लिहीण्याचा उद्देश हा की हातातून वाळू सरकावी तशी वेळ झरझर सरकत होती. तो 'ओला'चा चालक किती दूर गेला असेल, त्याला माझा पाऊच मिळाला असेल का? तो प्रामाणिक असेल का? पैसा आणि तिकिटा पेक्षा मला पासपोर्टची धास्ती होती. त्यावर माझे ओमान आणि युएस असे दोन वैध व्हिसा होते. नविन पासपोर्ट, नविन व्हिसा ह्यात बराच काळ गेला असता आणि तेव्हढा वेळ मला भारतात राहावे लागले असते आणि माझ्या व्यवसायाच्या दृष्टीकोनातून ते फार अडचणीचे झाले असते. त्यामुळे त्या भव्य विमानतळावरील झगमगाटात माझी अस्वस्थता वाढत होती.
सुपरवाझर अबोल असला तरी समजुतदार होता. माझी समस्या लक्षात घेऊन त्याने त्याच्या आसपास उभ्या असलेल्यां समस्या बाजूला सारुन मला प्राधान्य दिले. माझ्या भ्रमणध्वनीतुनच कुठेतरी एक नंबर फिरवला आणि म्हणाला, 'बोला'. फोनमधल्या माणसाला मी माझी समस्या सांगितली. आता समांतर नविन समस्या अशी होती की जिथून मी बोलत होतो तिथे खुप आवाज, गोंगाट होता आणि पलिकडच्या बाजूला मनस्वी खरखर होती. त्याला काय समजत होते तोच जाणे. तो मला फक्त 'होल्ड ऑन' म्हणाल्याचे मला समजले आणि होल्ड मोड मध्ये गेलो. थोड्या वेळाने (तो ही मला कितीतरी खूप खूप वाटला) तो म्हणाला,'तुमचा पाऊच ड्रायव्हरला मिळाला आहे आणि तो तो घेऊन विमानतळावर येतो आहे. त्याचा नंबर लिहून घ्या. म्हंटलं द्या. त्याने नंबर सांगायला आणि मी लिहून घ्यायला सुरुवात केली. दहापैकी ७ क्रमांक लिहून झाले आणि शेवटचे तिन क्रमांक काही नीट कळले नाहीत. 'हॅलो, अहो नीट ऐकू येत नाहीए. शेवटचे ३ क्रमांक पुन्हा सांगा. हॅलो.....हॅलो....!' पण माझे हॅलो..हॅलो खरखरात विरून गेले आणि फोन बंद झाला. आता झाली का पंचाईत. पुन्हा त्या सुपरवाझरला गाठलं. त्याने न चिडता पुन्हा नंबर जुळवून दिला. पण आता पलीकडचा माणूस बदलला होता. नशिब म्हणजे मघा सारखी खरखर नव्हती. त्याला मी सर्व केस समजाऊन सांगितली. त्याने मला ड्रायव्हरचा नंबर दिला. त्याचे धन्यवाद मानून मी फोन बंद केला आणि ड्रायव्हरला नंबर जुळवला. नशीब तो लगेच फोनवर आला. आमचं बोलणं झालं आणि तो येतो म्हणाला. 'तुम्हाला सोडलं होतं तिथेच थांबा.' झालं. पासपोर्ट मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने डोक्यावरचं बरचसं ओझं उतरलं होतं. पण त्याने सांगितलेली जागा इथून दूर होती. पुन्हा लगबग. २० किलोची बॅग घेऊन धावाधाव. कसाबसा पोहोचलो. ड्रायव्हर वाट पाहात उभा होता. पाऊच मिळला. हुश्श्श्श्श.....! ड्रायव्हरला बक्षिशी देऊन निघालो.
पुलवामा हल्ल्यानंतर विमानतळावर सुरक्षाव्यवस्था पराकोटीची होती. प्रवेशद्वारावरचा द्वारपाल प्रत्येक प्रवाशाचा पासपोर्टवरील कधीकाळी काढलेले छायाचित्र प्रवाशाच्या आजच्या चेहर्यामोहर्याशी जुळविण्याचा प्रयत्न करीत होता. तिकिटावरील तपशील, कोणाच्या भ्रमणध्वनीतील बोर्डींग पास वगैरे तपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत होता. रांग वाढत होती आणि सुस्तावल्या अजगराच्या चालीने सरकत होती. मला घाम फुटायला लागला. केव्हा मी आत जाणार आणि कधी विमानापर्यंत पोहोचणार? आधीच बराच वेळ फुकट गेला होता. एक समाधान होतं. विमान चुकलं तरी चालण्यासारखं होतं. एखाद दिवस उशीर झाला असता पण पासपोर्ट मिळाला होता हे महत्वाचे. कसाबसा विमानतळाच्या इमारतीत प्रवेश मिळाला. चेकइन काऊंटरला पुन्हा भरली थोरली रांग. मी तिथल्या एका कर्मचार्याला पकडले आणि 'माझ्या विमानाची वेळ होत आली आहे मला पुढे घ्या' अशी विनंती केली पण 'वेळ झाली की ते बोलवतीलच' असे म्हणून घाईघाईत तो कुठे तरी निघून गेला. बहूतेक त्याची 'वेळ' जवळ आली असावी. मुंगीच्या गतीने सरकत चेकइन काउंटरला पोहोचलो. बॅग स्विकारली गेली. मी माझा पासपोर्ट, पाऊच घट्ट धरून सुरक्षाकक्षाकडे धावलो. तिथेही हीssssss गर्दी. माझी अस्वस्थता कमालीची वाढली होती. इतर प्रवाशांची माफी मागत थेट काऊंटरला गेलो आणि माझ्या फ्लाईटची वेळ झाली आहे सांगत मला आधी तपासा अशी विनंती केली. त्या बाबाने माझं ऐकलं आणि सुरक्षातपासणी उरकली. पुढे गेलो आप्रवास (इमिग्रेशन) काऊंटरला पोहोचलो. आज नशिबच मार खात होतं. सगळीकडे खचाखच गर्दी आणि वेळ तर संपत आली होती. पुन्हा ते विनवाविनवी, मनधरणी. इतर प्रवाशांची आणि अधिकार्यांचीही. पण जमलं. इमिग्रेशन अधिकार्याने पासपोर्ट, बोर्डींगपास तपासला. त्याचा चेहरा चिंताग्रस्त दिसला. एकदा हातावरचे घड्याळ पाहीले. मला तिथेच तिष्ठत ठेवून तो त्याच्या वरीष्ठांना भेटायला गेला. मी अस्वस्थ. नवरीष्ठ, वरीष्ठ जवळच होता. अधिकार्याचे आणि त्याच्या वरीष्ठाचे काहीतरी बोलणे झाले आणि वरीष्ठाने कोणाला तरी फोन लावला. बहुधा विमान कंपनीच्या कर्मचार्याला असावा तिथून हिरवा कंदील मिळताच. तो अधिकारी परतला आणि माझ्या पासपोर्टवर जाण्याचे शिक्कामोर्तब झाले. अजूनही धोका टळला नव्हता. ऐनवेळी विमानाच्या दरवाज्यातूनही परत पाठतात. धावलो. गेट क्रमांक ७७. दरवाज्याला पोहोचलो तर बोर्डींग सुरु झाले होते. नंबर लागला बाबा एकदाचा. फायनल हुश्श्श्श्श करून निघालो. आता काही अडवत नाहीत. विमान भरले असणार आणि मी येताच विमान हलेल असा माझा अंदाज. पण विमानात पोहोचलो तर विमान ९० टक्के रिकामेच होते. जागेवर स्थानापन्न झाल्यानंतरही बराच वेळ प्रवासी येतच होते. विमान भरत होतं. विमानाला अर्धातास उशीर झाला होता.
विमान तळावारील झगमगाटात झालेल्या माझ्या अस्वस्थ जीवाला स्वस्थता लाभली. अर्धातास उशीराने का होईना विमान मला घेऊन एकदाचे हलले.
-समाप्त-
प्रतिक्रिया
मस्त जमलाय
धावतं वर्णन!
थरारक आणि चित्रदर्शी.
बापरे! भलतीच धावाधाव की!
कधी येवून गेलात ते कळालेच
धन्यवाद.
पुण्यात होणार ना कट्टा? तीन
मस्तच
अनुभव गुरु.....
पर्याय...
नवव्या बाळंतपणाला अनपेक्षित
खरं आहे....
रोचक किस्सा
धन्यवाद.
ओघवते लिखाण आवडले. नवव्या
थरारक!!
वेलकम ब्याक
धन्यवाद.
सहजसुंदर लेखन.
नववे बाळंतपण होते म्हणून ठीक
धन्यवाद.
आवडलं
उत्कृष्ट पटकथा
अरे
मस्तं अनुभव वर्णन ! बर्याच
धन्यवाद.
छान!
वाचायला मजा आली
थरारक अनुभव
शेवटी पासपोर्ट
पासपोर्ट व्हिसा आणि तिकीट
नशीब....सुटलात...
आवडलं धावतं वर्णन.
धन्यवाद.
टिक टिक वाजते डोक्यात, धडधड
थरारक वर्णन! पण वाचायला मजा
मस्त वर्णन. वाचताना सुद्धा
अनिता ठाकूर - धन्यवाद.
बापरे.. वेळेवर पासपोर्ट हरवणे
सुंदर!
पेठकर काका इज बॅक..
मस्त......विशेष करून ....
धन्यवाद.
खतरनाक लिहिलंय राव !
चांगलीच धावपळ झाली काकांची,
+१
हे सगळं ईथे लिहीताना
चौथा कोनाडा, उपेक्षित,
मस्तच
धन्यवाद.