गंमत
-----------------------------------------------------------------------------------------
“ साप -साप “,…
विकेटकिपिंग करणारी गोड ,खोडकर पोरगी एकदमच किंचाळली . पण त्याही क्षणाला तिने सफाईदारपणे बॉल धरला होता ,ज्या बॉलने बॅट्समनला चकवलं होतं .
परसामध्ये क्रिकेट खेळणारी सगळीच पोरं दचकली !
“ कुठंय कुठंय ? “ , म्हणत बॅट्समन पुढे गेला . क्रीझ सोडून. त्याबरोबर तिने बॉलने स्टंपस उडवले व ती ओरडली , “ आऊट “ ! सगळीच पोरं ओरडली , “ आऊट “ ! आणि हसायला लागली .
त्या खोडकर पोरीने बॅट्समनला बरोबर टोपी घातली होती . तो तिचा भाऊच होता खरं तर. उन्हात खेळून तो आधीच वैतागला होता . घामेजला होता . त्याला राग आला व त्याचा गोरा रंग लाल झाला . तो ओरडू लागला , “ चीटिंग चीटिंग “ !
पण त्याला आऊट देण्यात आलंच . त्याला बहिणीचा खूप राग आला. पण काय करणार ?... तिचा खोडकरपणा साऱ्यांनाच भारी पडत होता .
परसात खेळ रंगला होता. त्यांचा आरडाओरडा सोडला तर शांतता होती . आजूबाजूच्या वाड्यांमध्येही कसली गजबज नव्हती .
मग ती बॅटिंगला आली . तिने अंगातला निळा टी शर्ट सारखा केला . कपाळावरचे भुरभुरणारे केस उडवले . कट्टयावर ठेवलेली टोपी घातली . बॅट घेतली . जमिनीवर ठोकली .
पहिल्याच बॉलला तिने बॅट घुमवली . नुसतीच . बिच्चारी ! आऊट होता होता वाचली. बॉलिंग तिचा दादा करत होता . त्याचे बॉल खेळणं तिला अवघड होतं .
“ साप- साप ” , बॅटिंग करणारी तीच गोड , गोबऱ्या गालांची , खोडकर पोरगी पुन्हा एकदा किंचाळली . सगळी पोरं पुन्हा एकदा दचकली . पण या वेळी मात्र तिच्याकडे संशयाने पाहू लागली .
“ ए फेकू , सारखी सारखी तीच नाटकं करू नकोस ना ! “ तिचा भाऊ म्हणाला . त्यावर तिने न्हाणीघरातून बाहेर आलेल्या पांढऱ्या पाईपजवळ बोट दाखवलं . तिथे रचलेल्या दगडांजवळ अळू फोफावलेला होता . सांडपाण्यावर हिरवीगार , दाट सावली धरून. पटकन काही शोधायचं म्हणलं तर मोकळं दिसत नव्हतं .
पोरं थोडीशी पुढे होऊन ,काळजीपूर्वक बघू लागली .
“ ए चला रे , ही ना - फुकटच्या फेका टाकते ! “ तिचा भाऊ म्हणाला .
त्यावर ती मोठ्याने दादाला म्हणाली , “ दादा , नाही रे ! ती अळूची पानं चांगलीच सळसळली . मी पहिली ना शेपूट त्याची . चॉकलेटी रंगाची . खरं - शप्पथ ! “
बसल्या जागेवरून मीही पाहू लागलो .
खरं तर कोकणातल्या पोरांना सापाची कसली भीती . पण शहरी पोरं ती ! जाम घाबरली होती .
ती वाडी मामाची होती . ऐसपैस . नारळ सुपारीची . हे इथून तिथून पसरलेली . हिरवीगार ! मध्येच आंब्यांचाही वास येत होता .
ही शहरी पोरं म्हणजे दादाची आतेभावंडं होती . दोन आत्यांची चार पोरं . पुण्याहून आलेली . उन्हाळ्याची सुट्टी घालवायला .
“ अरे , कोब्रा होता ! … पोरगी धसकल्यासारखी म्हणाली .
“ कोब्रा ? कळतंय का तुला काय बोलतेस ते ? शब्द माहिती आहेत म्हणून फेकू नकोस उगा . इथे मुळात साप आहे का नाही याचाच पत्ता नाहीये . ए , चला रे स्टार्ट . “ तिचा भाऊ म्हणाला . त्याला खेळायचं होतं . तिला आऊट करायचं होतं . अन मग तिला चांगल्या वाकुल्या दाखवायच्या होत्या . जशास तसं .
त्यावर दादा म्हणाला, “ कोब्रा ? म्हणजे नाग का ? अरे , असू शकतो . उन्हाळ्यात ते गारव्याला बाहेर पडतात .”
पोरांच्या गलक्याने मागच्या वाडीतून एक गडी पळत आला . काळा , सडसडीत , एखाद्या पोलादी कांबीसारखा ! तो नारळाच्या झाडावरून उतरलेला असावा . कारण त्याच्या हातात धारदार कोयता होता .
गड्याने तो कोयता कंबरेला खोचला . एक काठी उचलली . त्यानं पोरांना धीर आला . त्याने फटाफट काठी आपटली . दगड उचलले . चाहूल घेतली . अळूची पानं हलवली .
पोरंही धिटाईने पुढे झाली . पाहू लागली. शोधू लागली.
पण तिथे काही नव्हतंच …
उन्हाळ्याचे दिवस . दुपारची वेळ . कोरडी हवा . नकोसा वाटणारा उकाडा . जीवाची नुसती घालमेल होत होती . त्यात हि धांदल !
दादा म्हणाला , “ गेला असेल तो आता. चला खेळू या . आवाजामुळे ते जवळ येत नाहीत “ , असं म्हणत त्याने जोरजोरात बॅट आपटली .
त्या गोड मुलीकडॆ तिचा भाऊ मात्र अजूनही संशयानेच पाहत होता . ती खोडकर होती ना . पण तो खोडकरपणा आत्ता मात्र तिच्या चेहऱ्यावरून गायब होता .
तिला वाईट वाटत होतं . तिने सगळ्यात आधी तो नाग पहिला होता . पण ती मुलांना तो दाखवू शकली नव्हती . ते दाखवून भाव खायचा तिचा चान्स गेला होता . त्यात मुलांचा तिच्यावर विश्वास नव्हता …
तिला वाटलं - ‘ कुठे गेला असेल तो ? कुठे दडलाय कोणास ठाऊक ? ‘
कसलीच चाहूल लागेना , तसा गडी पुन्हा कामाला निघून गेला .
तो गेला त्या बाजूला दाट सावली होती . तिथे फुलपाखरांचा एक मोठा थवा बसलेला होता . त्या गड्याच्या चाहुलीने तो उडाला . नारिंगी रंगाचा . पोरगी ते पाहू लागली . एवढी फुलपाखरं एकदम? तीही एकसारखी ? … तिला जाम मजा वाटली . बाकी पोरंही मग ते पाहू लागली .
तसं मुलांचं खेळणं थांबलंच . सगळी मुलं सावलीत बसून गप्पा मारू लागली . कट्ट्यावर बसून . जो न्हाणीघराच्या थोडासाच पलीकडे होता .
‘ गंमत ‘ संपली होती .
तेव्हा मीही निघालो . आता मी त्यांच्या विरुद्ध बाजूला होतो . मी माझा फणा मिटून जाऊन लागलो . रुबाबात ! … उन्हाच्या कवडशांमध्ये माझं सळसळणारं शरीर भारीच चमकत होतं .
-----------------------------------------------------------------------------------------
बिपीन सांगळे
वाचने
9883
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडेश.. मस्तच आहे
आवडेश.. मस्तच आहे
छान
छान
आवडली. शेवटच्या वाक्यात मस्त
आवडली. शेवटच्या वाक्यात मस्त फिरवली आहे कथा.
मस्तच!
शशकसारखाच ट्विस्ट दिलाय भारी!
Sandy
मस्तं कथा ! शेवट खास आवडला.
मस्तं कथा ! शेवट खास आवडला.
कथा आवडली
मस्त !
छान कथा .
छान कथा . हा तर हॅरि पॉटरच्या जगातला साप दिसतो आहे .
आवडली
आवडली
जबरदस्त बिपीन शेठ
जबरदस्त बिपीन शेठ
एकदम झकास
बिपीन सांगळे,
आवडली कथा. आधी वाटलं की स्मृती मानधनावर आहे की काय.
आ.न.,
-गा.पै.
मलाही ! पण शेवटी मस्त ट्विस्ट
In reply to एकदम झकास by गामा पैलवान
मलाही ! पण शेवटी मस्त ट्विस्ट दिला आहे.
मस्स्त
साप म्हटलं की आपले हात पाय रिस्पॉन्स देणं बंद करतात!
हे वाचूनच कसंसं झालं.
आनन्दा,वगिश,योगेशु , संदीप ,
आनन्दा,वगिश,योगेशु , संदीप , डॉ म्हात्रे ,खंडेराव ,स्वलिखित,
आभार
सिरुसेरि
सिरुसेरि
विशेष प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
उपेक्षित धन्यवाद .
उपेक्षित धन्यवाद .
पण हे असं शेठ वगैरे म्हणू नका .
संकोच वाटतो .
आपण मला ओळखता काय ?
गामा ,
गामा ,
आभार
पण हे कळलं नाही -
आधी वाटलं की स्मृती मानधनावर आहे की काय.
हे इथे बघा .....
In reply to गामा , by बिपीन सुरेश सांगळे
बिपीन सुरेश सांगळे,
स्मृती मानधना म्हणजे काय ते इथे सापडेल : https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%…
आ.न.,
-गा.पै.
आवडली. एक द्विशशक मस्त होवू
आवडली. एक द्विशशक मस्त होवू शकेल .
शेवटचा धक्का मस्त आहे.
गामा ,
गामा ,
मला आधी स्मृती आणि मानधन असे काही शब्द वाटले .
नंतर लक्षात आलं ,
कि तुम्ही त्या क्रिकेट खेळाडू बद्दल बोलताय .
आपण लिंक हि दिलीत .
आभार .
पण तिचा संदर्भ आपल्याला का असावा असे वाटले ?
मला जाणून घ्यायला आवडेल -
तशी काही घटना तिच्या आयुष्यात आहे का ?
कारण तुम्ही फक्त तिचेच नाव घेतलेले आहे .
क्रिकेट खेळणाऱ्या मुली
In reply to गामा , by बिपीन सुरेश सांगळे
बिपीन सुरेश सांगळे,
ती पण अशीच भावाबरोबर क्रिकेट खेळायला जायची म्हणून तिची कथा वाटली. मुली सहसा मुलांसोबत क्रिकेट खेळतांना दिसंत नाहीत. निदान आमच्या वेळेस तरी.
आ.न.,
-गा.पै.
प्रमोद देर्देकर धन्यवाद
प्रमोद देर्देकर
धन्यवाद
शेवटचं वाक्य भाव खावून गेलं..
शेवटचं वाक्य भाव खावून गेलं....
सगळ्या वाचकांचे पुन्हा एकदा
सगळ्या वाचकांचे पुन्हा एकदा आभार