बालक-पालकः एक चिंतन...

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
3 Jan 2019 - 5:04 pm

मुलांच्या समस्यांविषयी काही चर्चा सध्या इथे चालू आहेत. त्या अनुषंगाने काही अनुभव, निरीक्षणे मांडण्यासाठी हा लेख लिहावासा वाटला. आम्हाला लग्नानंतर जवळपास बारा वर्षांनी मूल झाले. आमच्या (मी आणि बायको) वयाच्या अनुक्रमे चाळीस आणि छत्तीसाव्या वर्षी आम्ही आई-वडील झालो. बाळ घाई-घाईने सातव्याच महिन्यात या जगात आले; त्यामुळे ते दीड महिने अतिदक्षता विभागात होते. त्याआधी मी बर्‍याच मुलांचे, त्यांच्या आई-वडीलांचे निरीक्षण केले. मला हे निरीक्षण आवडायचे. अजूनही हे निरीक्षण चालूच असते. खूप गोष्टी खटकायच्या आणि खटकतात पण सांगणार कुणाला आणि कसे?

सामान्यपणे भारतीय आई-वडील आपल्या मुलांची अतिकाळजी करतात असे माझे निरीक्षण आहे. अगदी मोठ्या मुलांचीदेखील प्रमाणाबाहेर काळजी घेतली जाते. मूल किरकोळ पडलं तर आई धावत-पळत जाऊन त्याला उचलून घेते. 'मेरे लाल, मेरे पिले' म्हणत त्याचे मुके घेते. डोळ्यात अश्रूंची फुले उमलतात आणि एकंदरीतच मामला एकदम 'ओक्साबोक्शी' होऊन जातो. बाळ थोडंसच पडलेलं असतं. त्याला कुठेच काही लागलेलं नसतं. घाबरल्यामुळे ते रडायला लागतं आणि साधारण अर्ध्या मिनिटात ते शांत होतं. त्यात इतकं घाबरून जाण्यासारखं काहीच नसतं. माझा मुलगा (आताचे वय एकवीस महिने) असा पडला तर माझ्या लक्षात येतं की पडण्याची तीव्रता किती आहे. ती जर किरकोळ असेल तर मी त्याला त्याचं उठू देतो आणि तो उठतो.

बाळाला बाहेर फिरायला नेलं की आई-वडील त्याला कुठेच हात लावू देत नाहीत. 'फुलासारखं जपणे' आणि 'तळहाताच्या फोडासारखं सांभाळणे' हे अतिशय चुकीचे फंडे आहेत असं माझं मत आहे. मुलाचे हात खराब होतील, कपडे खराब होतील म्हणून मुलांना त्यांचे आई-वडील चालण्याव्यतिरिक्त काहीच करू देत नाहीत. माझा मुलगा रस्त्याने चालता-चालता कडेला फतकल मारून बसतो आणि येथेच्छ माती, दगडं, पाने, फुले, वाळू खेळतो. अगदी बराच वेळ हे सगळं हातात उचलून दुसरीकडे टाकायचा त्याचा उद्योग सुरू असतो. या सगळ्या प्रकारात तो कधी कधी पडतो आणि जमिनीवर चक्क आडवा होतो. मी त्याला गरज असल्याशिवाय उचलत नाही. चिखल असेल तर तो चिखलातदेखील हात घालून खेळतो. त्याला खूप आनंद होतो. त्याचा तो निरागस आनंद बघून मलादेखील आनंद होतो.

रस्त्यात कुत्री, मांजरं दिसले की आई-वडील आपल्या मुलांना घेऊन पळून जातात. तशी ही थोडी बेभरवशाचीच मंडळी हे अगदीच मान्य पण लहानपणापासून मुलांच्या मनात असंख्य प्रकारच्या भीती घालून ठेवणं मला चुकीचं वाटतं. मला स्वतःला कुत्र्यांची भीती वाटत नाही. मुलाला फिरवत असतांना कुत्री दिसली तर मी त्याला जवळ घेऊन जातो आणि कुत्र्याला हात लावायला उद्युक्त करतो. अर्थात, माझं कुत्र्याकडे बारीक लक्ष असतं. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव थोडेदेखील बदलल्यासारखे वाटले तर मी मुलाला लगेच उचलून घेतो पण असे प्रसंग अजून एक-दोनच आलेत. बहुतेक वेळेला कुत्री लहान मुलांसोबत खुश असतात असा अनुभव आहे. मला कुत्रा हा प्राणी भयंकर आवडतो. कुठल्याही कुत्र्याजवळ जाऊन त्याचे लाड करणे मला आवडते. देवाच्या कृपेने मला अजून कुत्र्यांचा कधी वाईट अनुभव आलेला नाही. एकदा तर चुकून एका झोपलेल्या कुत्र्याच्या पोटावर माझा पाय पडला होता. तो कुत्रा विव्हळत उठला पण त्याने मला इजा केली नाही. ज्या भाजीच्या दुकानाजवळ हा किस्सा घडला त्या दुकानाच्या मालकाला खूप आश्चर्य वाटले होते. तो रस्त्यावरचा बेवारशी कुत्रा होता. आमच्या घराजवळ एक गाय राहते. माझ्या मुलाला मी तिला बिनधास्त हात लावू देतो. मी लहानपणी गायींशी खूप खेळलेलो आहे. गाय आणि कुत्रा हे तसे प्रेमळ प्राणी आहेत. लहानपणी मी रस्त्यावरच्या एका कुत्र्याला माझ्या पांघरुणात झोपायला लावत असे. अर्थात तो कुत्राच असल्याने तो लगेच पांघरुणातून बाहेर निघून जात असे. आजारी, पिसाळलेल्या, जखमी, हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित अशा कुत्र्यांपासून मात्र दूर राहिलेलेच बरे. केवळ भुकेला आहे म्हणून एखादा चांगला कुत्रा कधीही चावत नाही. परवा एक काका त्यांच्या बँक्स नावाच्या कुत्रीला घेऊन चालले होते. मी माझ्या मुलाला तिच्याकडे घेऊन गेलो. पाच मिनिटात तीन-चार मुले आली आणि बँक्ससोबत खेळायला लागली. माझा मुलगादेखील तिच्याशी खेळायला लागला. ती मस्त गुबगुबीत आणि प्रेमळ होती. मुले तिचे वाट्टेल तसे लाड करत होती पण तिच्या चेहर्‍यावर त्रासिक भाव नव्हता. ती मस्त डोळे मिचकावत, दात दाखवत हसत होती.

चपला. सध्या माझ्या मुलाची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे चपला किंवा बूट. कपाट उघडून तो त्यातून चपला, बूट काढतो आणि घरभर फिरतो. सुरुवातीला बायकोने त्याला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण आता मात्र तिने माझ्या सांगण्यावरून त्याला चपला-बुटांशी खेळायला मुभा दिली आहे. काय बिघडतं? चपला, बुटं रस्त्यावरची धूळ बाळगून असतात. असू दे. मुलगा जेव्हा माझे बूट घेऊन पलंगावर ठेवतो तेव्हा त्याला होणारा आनंद इतका भारी असतो की मला त्याला पटकन उचलून त्याच्या पप्या घ्यायचा मोह होतो. हळूहळू ही सवय जाणारच आहे पण सध्या तो एंजॉय करतोय तर काय हरकत आहे? उलट त्याची प्रतिकारशक्ती वाढेल असा माझा अंदाज आहे.

खूप कमी वेळेला आम्ही मुलाला मोबाईल हाताळायला देतो. कधी कधी मात्र तो भयंकर आरडा-ओरडा करतो तेव्हा काही पर्याय नसतो. हे मला न उलगडलेलं कोडं आहे. इतक्या लहान मुलाला मोबाईलचं आकर्षण का असावं? चित्र दिसतात म्हणून? व्हिडीओ दिसतात म्हणून? आम्ही शक्यतो मोबाईल-टीव्ही न लावता त्याला जेवू घालण्याचा नियम घालून घेतलेला आहे. कधी कधी मात्र टीव्हीवर गाणी लावून जेवू घालतो हे मान्य करायला पाहिजे आणि हे असे का आहे हे मला अजून कळत नाही. गाणी बघत जेवत असतांना तो मेथीच्या भाजीचे गोळेदेखील निमूटपणे खातो. पण इतर वेळेसदेखील अजून तरी तो सगळ्या भाज्या (मेथी, चाकवत, तोंडली, दोडकी, लाल-हिरवा माठ, वगैरे आऊट-ऑफ-सिलॅबस भाज्यादेखील) व्यवस्थित खातो. हे अजून किती दिवस चालेल माहिती नाही. बाहेरचं वातावरण बघता हा सदाचार फार काळ टिकेल असं वाटत नाही. त्याला आम्ही अजूनपर्यंत चॉकलेट, आईस्क्रीम खायला दिलेले नाही. अजून हे पदार्थ त्याला माहितच नाहीत. एकदा या पदार्थांची चटक लागली की मग त्याचे निराळे दुष्परिणाम दिसायला लागतात; त्यामुळे जेवढे दिवस शक्य आहे तेवढे दिवस आम्ही हे पदार्थ त्याला देणार नाही आहोत. मला स्वतःला अजून काही काही पदार्थांची चव माहित नाही. कार्यालयात माझे मित्र रेग्युलरली चॉकलेट फज खातात. मी अजून चाखूनही पाहिलेले नाही. एका दृष्टीने ते बरे आहे. सतत मोह होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भारतात मी अजून एकदाही मॅक्डॉनाल्ड्स आणि पिझ्झा हटमध्ये गेलेलो नाही. मुलाला जेवतांना निरनिराळे अभिनव खेळ खेळण्याची हौस आहे. ताटात पाणी सांडणे, भात-खिचडी-पोळी त्या पाण्यात मिक्स करणे, मग हे सगळे मिश्रण जमिनीवर ओतून देणे, नंतर ते उचलून पुन्हा ताटात टाकणे आणि हे सर्व प्रकार सुरू असतांना जेव्हा मनात येईल तेव्हा यातले काही घास तोंडात टाकणे. मी त्याच्याजवळ बसून हे सगळं बघत असतो. त्याची काहीतरी गोड बडबड चालू असते आणि मला मात्र जबरदस्त हसू येत असते. हे सगळं मी त्याला निवांतपणे करू देतो. मुरमुर्‍यांचा चिवडा जमिनीवर सांडल्यानंतर त्यावरून चालत जाणे आणि मग खाली बसून तळपायाला चिकटलेले मुरमुरे खाणे हा सध्या त्याचा अत्यंत आवडता छंद झालेला आहे. मी सहसा त्याच्या या छंदाच्या आड येत नाही. तो ज्या पद्धतीने खाली बसून तळपाय उचलून एक एक मुरमुरा टिपून खातो ते बघणं खूपच आनंददायी असतं.

अजून एक निरीक्षण म्हणजे मुलाला/बाळाला थोडं बरं नसलं म्हणजे लगेच डॉक्टरकडे नेणं, औषधी देणं वगैरे प्रकार आजकाल खूप वाढलेत. एक साधारण ठोकताळा असा असू शकेल की जर मूल अॅक्टीव्ह असेल आणि नेहमीच्या अॅक्टीविटीज सुरळीतपणे करत असेल तर थोडं थांबायला हरकत नाही. किरकोळ ताप वगैरे तसेच बरे होतात.

आजकाल मी बर्‍याच मुलांच्या खाण्याच्या सवयी पाहिल्या आहेत. त्यांना रोज प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं हवं असतं. दुपारच्या जेवणातलं काही रात्रीच्या जेवणात चालत नाही. पालेभाज्या तर अजिबात चालत नाहीत. फळभाज्यांपैकी फक्त बटाटा चालतो. बाकी मग सहसा पाव-भाजी, नूडल्स, पास्ता, पिझ्झा, पराठा, तळलेले पदार्थ, चॉकलेट्स, निरनिराळ्या प्रकारच्या मिठाया वगैरे पदार्थांवरच मुलांचा जास्त भर असतो. माझ्या मते हे थोडसं प्रॉब्लेमॅटिक आहे. पुढे या मुलांना अन्नाच्या बाबतीत तडजोडी जमणारच नाहीत. शिवाय योग्य ते पोषण त्यांना मिळत असेल की नाही हादेखील एक प्रश्न उरतोच. नेहमी जीभेचे चोचले पुरवण्याची सवय लागल्याने आणि आवडीचंच मिळाल्याने जगण्यातल्या कित्येक पैलूंच्या अनुभवास ही मुलं मुकतात असे मला वाटते.

कित्येक घरांमध्ये सुखासीन आयुष्याशी निगडीत बाबी मुलांशी चर्चिल्या जातात. अशा आयुष्यासाठी पूरक गोष्टींचा ऊहापोह त्यांच्यासोबत केला जातो पण जगण्याच्या 'अभावग्रस्त' बाजूची साधी तोंडओळखदेखील त्यांना दिली जात नाही. अडचणींवर मात करून यश मिळवण्याच्या कथा त्यांना ऐकवल्या जात नाहीत. कधी काळी हलाखीत राहणार्‍या पण कष्टाळू अशा आपल्या वर्गमित्रांच्या यशोगाथा आपण वाढत्या वयातील मुलांना सांगतच नाही. काही मुलांसाठी रोजची भाकरी मिळवणंदेखील किती जिकिरीचं काम असतं हे आपण मुलांना कळूच देत नाही. संपन्नतेचा आनंद घेणं चुकीचं नाही पण ही संपन्नता सगळ्यांच्या नशिबी नसते ही जाणीव मुलांमध्ये जागवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. या जाणीवा जागृत झाल्या तरच ते मोठे होऊन सगळ्यांना समजून घेऊ शकतील. सगळ्यांना समजून घेऊन काम करणारी व्यक्ती जास्त समाधानी आणि यशस्वी असण्याची शक्यता असते.

मुले आपल्या आई-वडीलांना नीट ओळखून असतात. अगदी लहानपणापासून त्यांना आपले आई-बाबा कुठल्या प्रकारचे प्राणी आहेत हे कळत असतं. साधारण एक वर्षाच्या बाळाला हा अंदाज आलेला असतो. बाळ त्या अनुषंगाने आपले हट्ट, स्वभाव, मागण्या, नाराजी, आनंद वगैरे अॅडजस्ट करत असते. लहान मुलांना विश्वासात घेऊन समजावून सांगीतलेलं कळतं आणि अशा सहजसुंदर संवादाला ते सकारात्मक प्रतिसाद देत असतात. मी काही मुले पाहिलेली आहेत ज्यांना त्यांच्या आई-बाबांनी समजावून सांगीतल्यावर त्यांनी घराच्या भिंतींवर अजिबात रेघोट्या मारल्या नाहीत.

माझा मुलगा अकारण भित्रा न बनता त्याने थोडं कणखर बनावं म्हणून मी थोडेफार प्रयत्न करत असतो. त्यात मी काहीतरी खूप वेगळं करतोय अशातला भाग नाही किंवा माझा मुलगा किती धीट बनतोय अशी दर्पोक्तीदेखील नाही हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. अजून बरीच वर्षे जायची आहेत. मुलांना कुठे आणि कसे कुठले वळण लागेल हे सांगता येत नाही. या प्रवासात कधी काही चुकले तर शेवटी बालपणीची शिकवण त्यांना योग्य मार्गावर आणण्यास सहाय्यभूत ठरत असावी असा अंदाज आहे म्हणून ही धडपड! आपण जे मुलांसाठी करतो ते सगळं योग्यच असेल असं नाही पण अनुभवांच्या कसोटीवर आपली शिकवण पडताळून पाहिल्यास फायदा होण्याची शक्यता जास्त! मुलांच्या कोवळ्या मनांमधली उत्सुकता आपल्या अतिकाळजीच्या सवयींमुळे खुंटायला नको हे महत्वाचं!

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Jan 2019 - 5:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

माझी धाकटी मुलगी ५ वर्षाची होईपर्यंत घराच्या भिंतींवर चित्र काढायची. जस जशी तिची उंची वाढत गेली तस तशी चित्रे देखील उंच आणि मोठी होत गेली. जेव्हा तिची ही सवय पूर्णपणे बंद झाली तेव्हाच मग आम्ही घराला नवा रंग लावला. त्या आधि त्या सगळ्या भिंतीचित्रांचे फोटो काढून घेतले. (पुराव्याने शाबीत करायला)

पैजारबुवा,

दादा कोंडके's picture

3 Jan 2019 - 8:37 pm | दादा कोंडके

परवा एक कुटुंब घरी आलं होतं. जेवताना त्यांचा पावणेतीन वर्षाचा मुलगा जेवायला बसल्या बरोबर त्याच्या 'ममा'ने पटकन मोबाईल काढून दिला आणि ओशाळून म्हणाली की हा कुठलंतरी ठराविक (नाव विसरलो) कार्टून असल्याशिवाय जेवतच नाही. त्याचं त्यात लक्षं असतं म्हणून मी तेव्हढ्यावेळात त्याला न आवडणार्‍या भाज्यासुद्ध त्याच्या तोंडात कोंबत असते. असले भयंकर लाड बघून आम्हाला आश्चर्य वाटलं. मी माझ्या मुलीला पाच वर्षापर्यंत कोणतीही स्क्रीन असलेली वस्तू बघू दिली नाही. जेवताना तर कटाक्षाने सगळे पदार्थ कसे केले आहेत, त्यांच्या चवी कशा असतात, कोणते पदार्थ कशाबरोबर चांगले लागतात वगैरे समजेल अशा भाषेत सांगायचो आणि सांगतो. या सगळ्याचा उद्देश ती खाण्याचा आनंद घेणं हे आहे. हे सगळं करायला थोडेसे पेशन्स आणि जबाबदारीची जाणीव लागते. अलीकडे बघण्यात येणार्‍या समस्या लहान मुलांच्या नसून पालकांच्या असतात. लहान मुलांसाठी क्वालिटी टाईम द्यावा लागतो. अनेक वाईट सवयी सोडाव्या लागतात चांगल्या सवयी बाणवाव्या लागतात. असं म्हणतात, The most important thing a father can do for his childer is to love their mother (and vice versa). अनेक समस्यांच्या मुळाशी हा इश्यु असतो.

समीरसूर's picture

7 Jan 2019 - 11:57 am | समीरसूर

बरेच पालक डोक्याला ताप नको म्हणून मोबाईल-टीव्ही लावून देतात. अगदी तासंतास! कधी कधी मी देखील किंवा माझी बायकोदेखील मुलाला टीव्हीवर गाणी लावून देतो. कधी कधी पेशन्स संपतो हे तितकेच खरे पण अशी सवय लावून ठेवणं थोडं धोकादायकच! कधी तरी मोबाईल-टीव्ही ठीक आहे पण रोजच दिवसातले पाच-सहा तास मुलं मोबाईल-टीव्हीवर भान हरपून वेळ घालवत असतील तर मग प्रॉब्लेम आहे. या सवयी तोडणं महाकठीण! अहो, मोठ्यांच्या सवयी बदलता बदलत नाहीत; लहानग्यांची काय कथा!

तुषार काळभोर's picture

3 Jan 2019 - 10:04 pm | तुषार काळभोर

मी बऱ्याच गोष्टी माझा चार वर्षांच्या मुलासोबत अशाच करतो.

उदा. आमच्याच घरात जर खाताना फरशीवर काही पडलं तर ते उचलून खाणं. पण बाहेर रस्त्यावर काही पडलं तर ते न खाणं.

सोफ्यावर दिवाणवर, त्यावरून खाली उड्या मारणं, पडणं, सायकल चालवताना धडकण, पडणं, भिंतीवरून उडी मारताना खरचटून घेणं, सगळं करतो. मी अजिबात अडवत नाही. माझे आईवडील आणि बायको अरे लागेल म्हणत बऱ्याच गोष्टी करून देत नाहीत. त्यामुळे मी घरी असल्यावर त्याला खूप आनंद होतो. कारण मी हवं तसं खेळून देतो. त्याच्याबरोबर खेळतो.

आम्ही आवर्जून मॉल मध्ये फिरायला जातो. भरपूर दुकानांत चिक्कार वस्तू बघतो. पण कधीच काही घेत नाही. हे मी आवर्जून करतो, कारण प्रत्येक छान किंवा हवीहवीशी वाटणारी गोष्ट घेतलीच पाहिजे असं नाही, हे बिंबवण्यासाठी.
एखादी गोष्ट त्याला आवडली आणि मागितली तर काही आठवडे किंवा महिने थांबून घेतो. त्याला रिमोटच्या मोठ्या कार आवडतात. मग मी छोट्या कार घेतो. (मला स्वतःला हॉटव्हील्सच्या कार खूप आवडायच्या आणि मी एकएक करत तीस पस्तीस जमवल्या होत्या).

आजारपणाच्या बाबतीत तंतोतंत करतो. सर्दी खोकला ताप- जोपर्यंत तो बिनधास्त खातोय आणि खेळतोय तोपर्यंत दवाखान्यात नेत नाही. सर्दीसाठी नाकाला विक्स लावणं, खोकल्यासाठी मध हळद चाटवण, तापाकडे लक्ष ठेवून जर जास्त वाटला तर डॉक्टरकडे नेणं (तेही बालरोगतज्ज्ञांकडे ना जाता, आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे नेतो).

जेवताना कधी कधी tv असतो कधी नसतो. मोबाईल मात्र आवर्जून नसतो. स.ग.ळ्या. भाज्या आवडीने खातो. मेथी, शेपू, पालक, कोवळ्या हरभऱ्याच्या पाल्याची भाजी, भेंडी, वांगी, बटाटा, कारलं, दोडका, कडधान्ये, अंडी, चिकन, खरवस, दूध, दही, इत्यादी सगळं. शाळेत डब्यात जे असेल ते संपवतो. नाही संपलं, तर घरी आल्यावर संपवतो.

अक्षरशः किंचित म्हणजे किंचित सुद्धा त्रास देत नाही. त्याला (आपण ठरवून दिलेल्या चांगल्या वाईटच्या फ्रेमवर्क मध्ये) हवं तसं वागून देतो, तोपण मग जे सांगेल ते प्रामाणिकपणे ऐकतो.

समीरसूर's picture

7 Jan 2019 - 11:58 am | समीरसूर

हे बेस्ट आहे...अगदी अनुकरण करण्यासारखं!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2019 - 11:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ दादा कोंडके आणि पैलवान :

तुमच्या बहुतेक मुद्द्यांशी सहमत आहे.

१. रोज डोळ्यासमोर असणारे पालक हेच मुलांचे मूलभूत आदर्श असतात. जसे इतर प्राण्याची बालके त्यांच्या आईवडिलांचे निरिक्षण करून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःचे आचार-विचार ठरवत असतात, अगदी तसेच मानवाची मुले करत असतात. पालकांच्या सवयी सुसंगत वाटल्या तर त्यांचे आचरण सुलभपणे केले जाते.

२. पालकांच्या बोलण्यात आणि वागण्यात विसंगती असली तर ती मुलांनाही पटकन समजते. असे झाल्यास मुलांच्या मनातून पालकांबद्दलचा आदर प्रतिक्षिप्तपणे कमी होतो आणि असे ढोंग करणे ठीक आहे असे त्यांचे मत बनले तर मग आश्चर्य वाटून घ्यायला नको.

३. यापुढे जाऊन, चांगल्या आचार विचारांच्या मागची कारणपरंपरा समंजसपणे* समजाऊन देऊन ते आचार-विचार मुलाच्या मनात कायमचे बिंबवणे, हे सुद्धा पालकांचे कर्तव्य आहे. बर्‍याचदा, पालक "मी वयाने मोठा आहे म्हणून आणि मी म्हणतो म्हणून तू ऐकायला पाहिजे" असा आग्रह धरतात. असे केल्यास, "मुले पालकांवर अवलंबून आहेत तोवर त्यांचे ऐकत होती व जरा स्वतंत्र झाल्यावर ऐकणे बंद केले" असे आढळल्यास आश्चर्य वाटू नये.

++++++++++++++++++

* समंजसपणे म्हणजे, "मुलाच्या वयानुसार त्याला समजेल अश्या प्रकारे, पण पूर्णपणे सत्याला धरून सांगणे". असे करताना, 'चुकीचे चलाख तर्क' वापरून ठोकून देणे निग्रहाने टाळावे... कारण, एका ठराविक वयानंतर मुले विचार करू लागली की त्यांना ती चलाखी समजते व तो धक्का त्यांचा पालकांबद्दलचा आदर एका क्षणात संपवू शकतो.

वीणा३'s picture

4 Jan 2019 - 12:43 am | वीणा३

जेवताना टीव्ही :
माझ्या मोठ्या मुलाला टीव्ही दाखवला कि काहीही खायचा. जर टीव्ही नाही दाखवला तर मला तासभर त्याच्या समोर नाचायला लागायचं, आणि एवढं करून वाटीभर खायचा. माझं मूल जेवायला लागेपर्यंत टीव्ही दाखवून जेवण भरवणारे आई वडील मला आळशी वाटायचे, पण नंतर त्याचा प्रॉब्लेम लक्षात यायला लागला.
४ वर्षाचा होईपर्यंत रोज जेवताना टीव्ही होता. आता भरपूर टांगलं मंगळ करत जेवतो पण जवळपास सगळ्या भाज्या खातो. पण ३ महिन्यापूर्वी शाळेत कोणीतरी " eww I Dont like green food " म्हंटल्यापासून मला पण घरी तेच ऐकवणं चालू झालाय.

थोडं काय होतं कि प्रत्येकाची आपल्या मुलाला वाढवायची एक स्वतःची अशी पद्धत असते, त्यात चूक बरोबर असं काही नसतं. काही उदाहरण देते :
१. माझी डॉक्टर, तिची मुलगी लहान असताना तिचं काहीच नीट करायची नाही. ना जेवण वेळेवर ना झोप, सगळाच गोंधळ. इतर घरात मुलांचं किती नीट होत हे बघून तिला वाईट वाटायचं पण तिच्या अंगात टिपिकल आई चे गुण, जे भारतात आदर्श मानले जातात ते नव्हतेच. पण जेव्हा ती मुलगी ८-९ वीत गेली तेव्हा तिचा अभ्यास घेण्याबाबत अतिशय जागरूक होती. तिची मुलगी वर्गात अभ्यास आणि खेळात कायम टॉपर राहिली तिचं पुढचं शिक्षण संपेपर्यंत.

२. माझ्या एका मैत्रिणीला तिच्या मुलांना रोज संध्याकाळी फ्रेश जेवण करून वाढणं अतिशय महत्वाचं वाटत. ती नोकरी करणारी आहे, त्यामुळे ऑफिस मधून मुलांना घेऊन घरी येते, ती स्वयंपाक करते आणि मुलं सगळा वेळ टीव्ही बघतात. तेच दुसरी एक मैत्रीण रोज मुलाला बाहेर घेऊन जातेच जाते, अगदी स्वतः आजारी असली तरी. पण आठवड्याचं जेवण एकदा बनवून ठेवते.

३. एक मैत्रीण मुलांना सतत कसल्या ना कसल्या क्लास ला घालत असते. त्याला बऱ्याच खेळांची माहिती आहे. तर दुसरी ने फक्त फुटबॉल चा क्लास गेली ५ वर्ष लावलाय आणि मुलगा आता जुनियर लीग मध्ये खेळतोय.

४. माझ्या नवऱ्याच्या घरी सगळ एकदम शिस्तीत असतं, अगदी लाईट गेले तर सगळ्या वस्तू सगळ्यांना बरोबर सापडतात. सगळी काम वेळेवर केलेली असतात. आता हि चांगली गोष्ट आहे असं म्हणावं तर या सवयीचा त्याला मॅनेजर झाल्यावर प्रचंड त्रास झाला. कारण हाताखाली काम करणाऱ्या लोकांना या सवाई नव्हत्या. अजूनही आम्ही कधी ट्रिप ला गेलो आणि प्लॅन मध्ये काही गडबड झाली तर त्याला ती हॅन्डल करणं अवघड जातं. त्याची आजी कायम घरी होती आणि रोज घरचं जेवण बनवायची, त्यामुळे नोकरीसाठी बाहेर राहायला लागल्यावर पोटाचे अतिशय हाल झाले. त्याला अतिशय स्वच्छतेची सवय असल्यामुळे (आणि मी हात वर केल्यामुळे ) आम्हाला मुलं झाल्यावर खालचं तोंडात घालतात म्हणून रोज रात्री फरशी, केराची बादली पुसून काढतो. आणि मुलांवर दिवसभर इथे हात धुवा, पाय धुवा म्हणून ओरडत असतो. आणि आता मुलं त्याच्यावरच चाललीयेत, सगळं जागच्या जागी.

त्यामुळे मी आजकाल या मतावर आल्ये कि तुम्ही मुलाला मारझोड करत नसाल आणि तुमच्या परीने जेवढ जमेल ते करत असाल तुम्ही चांगले पालक आहात, मग तुमची मुलं कशी का वागेनात. आता जेवढं जमेल - हे प्रत्येक पालक आणि त्यांची परिस्तिथी यावर अवलंबून असेल. घरात आजी आजोबा असतील , किंवा कामाला बाई असेल, किंवा आई नोकरी करणारी नसेल, किंवा सुपरवूमन असेल, किंवा घरातली सगळीच माणसं व्यवस्थित असतील आणि सगळीच काम करत असतील असे बरेच पॅरामीटर्स आहेत.

आणि एवढं सगळं करून सुद्धा मुलं त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कशी वागतात हे
१. ते मुलं स्वतः , त्याच व्यक्तिमत्व , त्याचे निर्णय
२. त्याचे मित्र मैत्रिणी
३. शिक्षक
४. आजूबाजूची लोक, वातावरण
५. टीव्ही, पुस्तक इ
६. आई वडील
आणि सगळ्यात महत्वाचं -
७. नशीब
या सगळ्या गोष्टीवर अवलंबून राहील. घर आणि घरातलं वातावरण हा त्यांच्या व्यक्तिमत्वातील "फक्त एक" भाग आहे. अतिशय सज्जन आई वडिलांच एक मुलं सज्जन आणि दुसरं वाया गेलेलं हे इतक्या घरांमध्ये बघितलं आहे, कि "नशीब" हा अतिशय महत्वाचा मुद्धा आहे असं वाटायला लागलंय. मला कोणाच्या ४ गोष्टी पटतील किंवा नाही यावरून ते चांगले /वाईट पालक होत नाहीत हे नक्की.

माझं मूल मोठं झाल्यावर पुढच्या अपेक्षा पुर्ण व्हावयत अशी इच्छा आहे.
१. एक चांगला नागरिक
२. आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी
३. आनंदी
४. कोणाला त्रास न देणारा (पण स्वतःला त्रास करून न घेणारा )
५. ड्रुग्स इ घातक व्यसन नसलेला
५. सर्वांशी नीट वागायचा प्रयत्न करणारा माणूस व्हावा अशी इच्छा आहे.

मग तो कायपण शिकू दे, कितीपण पैसे मिळवू दे, कायपण सवयी असू दे,

सस्नेह's picture

4 Jan 2019 - 2:01 pm | सस्नेह

सर्वच मुद्दयांशी सहमत !

समीरसूर's picture

4 Jan 2019 - 3:57 pm | समीरसूर

लहान मुलं टीव्ही/मोबाईल बघत जेवत असतील तर मला तो जरा प्रॉब्लेम वाटतो. अगदी यंत्रवत खातात मुलं. आमच्या घरी पुस्तक वाचत, गाणी म्हणत, गाणी शिकवत मुलाला जेवू घालण्याचा कर्यक्रम असतो. काही वेळेला (मुलगा आजारी असल्यास, घाई असल्यास, पाहुणे असल्यास, किंवा मुलगा अगदी जास्तच चिडचिड करत असल्यास) टीव्ही/मोबाईल लावला जातो हे खरे. संवाद साधत जेवू घालण्याचे निश्चितच काही फायदे असतात असे मला वाटते. बोलणे, संवाद साधणे, नवीन गोष्टी शिकणे (शब्द, गाणी), अन्नाची चव अनुभवणे आणि ओळखणे, बोलण्याला योग्य प्रतिसाद द्यायला शिकणे, विचार करून बोलणे वगैरे फायदे आहेत जे टीव्ही/मोबाईल दाखवून जेवू घालण्यात नसावेत असे मला वाटते. टीव्ही/मोबाईल हे माणसाला 'पॅसिव्ह' बनवणारे माध्यम आहे. या दोन्ही माध्यमांचा अतिवापर कृतिशून्यता वाढवतो असे माझे वैयक्तिक मत आहे. आपले उदरनिर्वाह करण्याचे साधन यावर अवलंबून नसेल तर वाजवी प्रमाणात ही माध्यमे अत्यंत उपयुक्त आहेत हे मान्यच!

बर्‍याच घरांत मुलांना खायला-प्यायला मुबलक असतं, मारझोड नसते नसते तरी मुलं फुलांसारखी टवटवीत दिसत नाहीत. याला कारण बहुतेक सुदृढ संवादाचा अभाव आणि पालकांच्या आयुष्यातील बेशिस्तपणा हे असावं असे वाटतं. ताजं उदाहरण :

https://www.misalpav.com/node/43825

सुरज भोसले - आपल्या लेखाचा संदर्भ येथे देत आहे म्हणून मनापासून क्षमा मागतो. विषय तोच आहे म्हणून देतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jan 2019 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत.

लई भारी's picture

4 Jan 2019 - 9:13 am | लई भारी

सर्वांचे मुद्दे चांगले आहेत आणि वरती जे लिहिलंय ते बहुतांशी पटण्यासारखं आहेच.
मला वाटत आपला गोंधळ अशा ठिकाणी होतो कि आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी मुलांसोबत आपल्याला करायला लागतात(उदा. टीव्ही बघत भरवणे, मोबाईल देणे) किंवा मुले तसे हट्ट करायला लागतात.
पहिला मुद्दा माझ्यामते आपण कधीतरी शॉर्टकट/सोय किंवा अपरिहार्यता म्हणून निवडलेला असतो; आपल्या मनाविरुद्ध, आणि कदाचित अशी समजूत करून कि आता गरजेपुरत करू, नेहमी करणार नाही. पण पुढे मुलांना याची सवय लागते कारण त्यांना पॅटर्न पटकन कळतात.
त्यांचे हट्ट एकतर आपण काहीतरी केलेलं असत त्यामधून किंवा बाह्य जगाशी संबंध यायला लागला की 'तसंच पाहिजे' या भावनेतून येत असावेत.

पण एक निश्चित आहे, एकदा त्यांचा पॅटर्न रुळला कि बदलणं प्रचंड अवघड आहे. त्यामुळे पहिल्यापासून काळजी घेणं उत्तम.
आता मुद्दा उरतो की आपल्याकडे नेहमी सतर्क राहण्या इतपत वेळ, संयम आहे का? कितीही नाकारलं तरी किमान मला ते जमलेलं नाही हे प्रांजळपणे कबूल करतो.
त्यामुळे दुर्दैवाने आमच्याकडे मोबाईल किंवा टीव्ही च वेड सुरु झालंय. जेव्हा आम्हा दोघांना वेळ देता येत नाही तेव्हा द्यावा लागतोय सध्या :(
जुळ्या असल्यामुळे दोघी एका वेळी न भांडता गुंततील असे पर्याय मला खूप कमी सापडलेत. (अजून ३ वर्ष झाली नाहीत).
खूप खेळ वगैरे आहेत(अगदी फॅन्सी नाही; ब्लॉक्स, स्टॅकिंग रिंग, मोठे मणी, मेडिकल सेट, भातुकली, साध्या बाहुल्या इ.) पण सलग गुंतून नाही राहत.

याबाबतीत आपले अनुभव/सल्ला ऐकायला आवडेल.

समीरसूर's picture

7 Jan 2019 - 12:07 pm | समीरसूर

एकदा जडलेली मोबाईल-टीव्हीची सवय तोडणे अतिशय कठीण! किंबहुना कुठलीही सवय तोडणे कठीणच. लहान मुलांकडून खूप समंजसपणाची अपेक्षा ठेवणं त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं असतं. मोठे इतके समंजस नसतात तर त्या लहान जीवांकडून काय अपेक्षा ठेवणार? यावर उपाय म्हणजे त्यांना काही गोष्टींपासून दूर म्हणजे दूरच ठेवणे! आम्ही अजून आमच्या मुलाला चॉकलेट दिलेले नाहीये. मोठा झाल्यावर खाणारच आहे पण कदाचित त्यावेळेस किंचित समज आलेली असेल. अजूनतरी पिझ्झा, बर्गर वगैरे दिलेलं नाहीये. कार्टूनपासून त्याला कटाक्षाने दूर ठेवलेलं आहे. छोटा भीम आणि नोबिताने इतके मोठे प्रॉब्लेम्स करून ठेवेलत ऑलरेडी! असल्या फालतू कार्टून्समधून मुलं ढेकळं काहीही शिकत नाहीत. मेंदू बधिर होतो फक्त! मोबाईलसाठी भयंकर आरडाओरडा करतो पण आम्ही त्याच्या हातात मोबाईल देत नाही म्हणजे नाहीच. अगदी कितीही रडला तरी! एकदा रडण्याचा कर्यक्रम केला की हवं ते मिळतं हा विचार रुजूच द्यायचा नाही लहान मुलांच्या मनात!

यशोधरा's picture

4 Jan 2019 - 10:30 am | यशोधरा

वीणा3 आणि लई भारी ह्यांचे प्रतिसाद आवडले. प्रामाणिक वाटले.
काही बाबा लोक मुलाचं कवतिक करताना सुद्धा स्वतः चच कवतिक जास्ती करून राहिलेत ब्वा!! =))

तुषार काळभोर's picture

4 Jan 2019 - 1:14 pm | तुषार काळभोर

आता दुसरं कुनी तर कौतूक करत नाय. मग सोताचं सोता केलं तर काय हुतंय!
=))
=))

यशोधरा's picture

4 Jan 2019 - 3:15 pm | यशोधरा

करा की वं दादा! म्या न्हाई म्हनीत न्हायी. =))

सस्नेह's picture

4 Jan 2019 - 2:27 pm | सस्नेह

मुलांच्या सवयी संस्कारावर अवलंबून असतात हा घोर गैरसमज आहे. तसं असतं तर सर्व सख्ख्या भावंडांच्या सवयी तंतोतंत सारख्या असत्या. प्रत्यक्षात असं फार कमी वेळा दिसतं. माझ्या मतेमुलाचा आहार, आरोग्य, मानसिकता एवढं आई-वडिलांनी जमेल तितकं सांभाळून बाकी जसं मूल वाढेल तसं वाढू द्यावं. ते आपोआप जितकं शिकेल तितकं चांगलं.
टीव्ही बघत जेवणं वाईट आहे असं का ब्वा ? पूर्वी आया काऊचिऊच्या गोष्टी सांगत पोरांच्या पोटात जेवण भरायच्या ते आता गोष्टी पहात काम होतं. रमतगमत जेवण होते. चार घास जास्त जातात. त्यात वाईट काय ? मीतर अजून एरवी कधी नाही पण जेवताना मात्र टीव्ही बघते ! डोक्यातली कटकटींची जळमटं बाजूला राहतात, निवांत जेवण होतं.
मी पहिल्यापासून व्यवस्थित तर माझा मुलगा गबाळा. लाख प्रयत्न करूनही वस्तू जागच्या जागी ठेवण्याची सवय मी त्याला लावू शकले नाही. गंमत म्हणजे चुकून कधीतरी मी एखादी वस्तू जागा सोडून पलिकडे ठेवली तर हा मला ओरडतो. त्याला बिलकुल सापडत नाही.
पण पावलोपावली एक गोष्ट प्रखरपणे जाणवते ती म्हणजे त्याचं आईवर अतोनात प्रेम आहे. ! दॅट्स ऑल !!

माझ्या मुलाच्या बाबतीत सांगायचं तर मी सुरवातीपासून मुलाला भरवायला घेताना पुस्तक घेऊन बसायचे. त्यातही चित्र दाखव, कधी चित्रावरून गोष्ट तयार करून त्याला समजेल अशी सांग असं करत सुरवात केली. कार्टून पासून सुरवातीला अगदी लांब ठेवलं. आता तो ८ वर्षाचा आहे. वीकएंड ला त्याला कार्टून बघायची मुभा दिलेय. बाकी आठवड्याच्या वेळात त्याला तसा फारसा वेळ मिळत नाही. म्हणजे टीव्ही बघत नाही असे नाही पण माझ्या नवऱ्याला स्वतःला डिस्कवरी, नॅशनल ज्योग्राफी सारखे चॅनेल बघायला आवडतात. त्यामुळे तो मुलासमोर कायम तेच लावतो आणि मुलगा देखील ते प्राणिजगत उत्साहाने बघतो. माझ्या सासर्यांना खेळ बघायला आवडतात त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मग क्रिकेट, प्रो कबड्डी, कुस्ती, टेनिस सगळ्या प्रकारच्या मॅच बघणं चालू असतं. त्यामुळे घरात टीव्ही लागतो पण त्यावर सीरिअल हा विषय त्याच्यासमोर होत नाही. (मुलगा शाळेत गेल्यावर मी नि सासरे दुपारी एखाद दुसरी सीरिअल बघतो अजिबात नाही असे नाही.)
खाण्याच्या सवयीच्या बाबतीत आम्ही दोघेही थोडे कठोर आहोत. पानात एकदा वाढलेलं संपवायचेच असा आग्रह असल्याने तो पानात काहीही टाकत नाही. अर्थात आम्ही देखील हेच करतो. जेवून झाल्यावर पानाभोवती पडलेली शीतकणे त्यालाच उचलायला लावतो. आता सांडण्याचं प्रमाण खूपच कमी झालाय.
माझा मुलगा कसा आदर्श बेटा किंवा आम्ही कसे शिस्तीत वाढवतो हे सांगण्याचा उद्देश नक्कीच नाही. वयाप्रमाणे तोही हट्ट करतो, त्रास देतो, पण इतर मुलांकडे बघता मला ते नक्कीच सुसह्य वाटत.
लहानपणी आम्ही त्याला फळा आणि रंबेरंगी खडू आणून दिले नि काय रंगवायचे ते इथे करायचं सांगितलं. मी देखील त्याच्याबरोबर त्याच्या रंगकामात मदत करायचे. परिणामी भिंती कधी खराब झाल्या नाहीत.

काही दिवसांपूर्वी माझी पुण्याची एक मैत्रीण तिच्या ८ नि २.५ वर्षाच्या मुलांना घेऊन कोकणात आली होती. ती मुलांना घेऊन पहिल्यांदाच घराबाहेर पडली होती. मला ऐकून आधी आश्चर्य वाटलं. आम्ही समुद्र किनारी गेलो होतो. त्या दोन दिवसात तिच्या सासू सासर्यांचा किमान २० -२५ वेळ फोन येऊन गेला. मूल त्रास देत नाहीयेत ना?, त्यांना पाण्यात जाऊ देऊ नको( कारण सर्दी होईल), त्यांना जास्त फिरवू नको (हवा बदलल्याने त्रास होईल), वाळूत जाऊन देऊन नको( एकमेकांवर उडवतील), त्यांना आमची आठवण येत नाही का? त्यांची औषध बरोबर आहेत ना ?तिथे साप विंचू असतात तेव्हा काळोख व्हायच्या आत घरात परत या. एक ना दोन मी ऐकूनच हादरले. असेही पालक असतात. मला खरंच राहवलं नाही. तिला म्हटलं अगं त्यांना सांग आता कितीही गाव असल तरी साधारण इथे डॉक्टर असतात,औषध मिळतात. इथे पण माणसं जगतात रोज मरत नाहीत. माझी ऐकूनसुद्धा चिडचिड झाली. आणि ती मैत्रीण मुलाना नि सासू सासर्यांना कशी सांभाळत असेल असं वाटलं. नातवंड म्हणजे दुधावरची साय असेल तरी इतका अतिरेक नसला पाहिजे असं माझं मत आहे.

अगदी सहमत! शंभरवेळा फोन, प्रत्येक फोन कॉलमध्ये पन्नास वेळा तब्येतीच्या चौकशा, 'काळजी घ्या'चे सल्ले, जे आपल्याला माहित असतं आणि आपण फॉलो करत असतो त्याविषयीचेच उपदेश...इरिटेटिंग प्रकार! जसं काही आपण लहान बाळाला लाटांवर टाकून निवांत बीअर पीत बीचवर पडून रहाणार असतो...

स्मिता श्रीपाद's picture

4 Jan 2019 - 4:15 pm | स्मिता श्रीपाद

“Your children are not your children.
They are the sons and daughters of Life's longing for itself.
They come through you but not from you,
And though they are with you, yet they belong not to you.
You may give them your love but not your thoughts,
For they have their own thoughts.
You may house their bodies but not their souls,
For their souls dwell in the house of tomorrow,
Which you cannot visit, not even in your dreams.”

― Kahlil Gibran

अनिंद्य's picture

5 Jan 2019 - 8:11 pm | अनिंद्य

सत्यवचन !

अनिंद्य's picture

5 Jan 2019 - 8:09 pm | अनिंद्य

लेख आणि चर्चा उदबोधक आहे.
पाल्याला कसे वाढवायचे याबद्दलचे पालकांचे मत मिळतेजुळते असणे महत्वाचे आहे. नाही तर मुले त्याचा फायदा उचलतात किंवा मग गोंधळतात तरी.