बालक-पालकः एक चिंतन...
मुलांच्या समस्यांविषयी काही चर्चा सध्या इथे चालू आहेत. त्या अनुषंगाने काही अनुभव, निरीक्षणे मांडण्यासाठी हा लेख लिहावासा वाटला. आम्हाला लग्नानंतर जवळपास बारा वर्षांनी मूल झाले. आमच्या (मी आणि बायको) वयाच्या अनुक्रमे चाळीस आणि छत्तीसाव्या वर्षी आम्ही आई-वडील झालो. बाळ घाई-घाईने सातव्याच महिन्यात या जगात आले; त्यामुळे ते दीड महिने अतिदक्षता विभागात होते. त्याआधी मी बर्याच मुलांचे, त्यांच्या आई-वडीलांचे निरीक्षण केले. मला हे निरीक्षण आवडायचे. अजूनही हे निरीक्षण चालूच असते. खूप गोष्टी खटकायच्या आणि खटकतात पण सांगणार कुणाला आणि कसे?
सामान्यपणे भारतीय आई-वडील आपल्या मुलांची अतिकाळजी करतात असे माझे निरीक्षण आहे. अगदी मोठ्या मुलांचीदेखील प्रमाणाबाहेर काळजी घेतली जाते. मूल किरकोळ पडलं तर आई धावत-पळत जाऊन त्याला उचलून घेते. 'मेरे लाल, मेरे पिले' म्हणत त्याचे मुके घेते. डोळ्यात अश्रूंची फुले उमलतात आणि एकंदरीतच मामला एकदम 'ओक्साबोक्शी' होऊन जातो. बाळ थोडंसच पडलेलं असतं. त्याला कुठेच काही लागलेलं नसतं. घाबरल्यामुळे ते रडायला लागतं आणि साधारण अर्ध्या मिनिटात ते शांत होतं. त्यात इतकं घाबरून जाण्यासारखं काहीच नसतं. माझा मुलगा (आताचे वय एकवीस महिने) असा पडला तर माझ्या लक्षात येतं की पडण्याची तीव्रता किती आहे. ती जर किरकोळ असेल तर मी त्याला त्याचं उठू देतो आणि तो उठतो.
बाळाला बाहेर फिरायला नेलं की आई-वडील त्याला कुठेच हात लावू देत नाहीत. 'फुलासारखं जपणे' आणि 'तळहाताच्या फोडासारखं सांभाळणे' हे अतिशय चुकीचे फंडे आहेत असं माझं मत आहे. मुलाचे हात खराब होतील, कपडे खराब होतील म्हणून मुलांना त्यांचे आई-वडील चालण्याव्यतिरिक्त काहीच करू देत नाहीत. माझा मुलगा रस्त्याने चालता-चालता कडेला फतकल मारून बसतो आणि येथेच्छ माती, दगडं, पाने, फुले, वाळू खेळतो. अगदी बराच वेळ हे सगळं हातात उचलून दुसरीकडे टाकायचा त्याचा उद्योग सुरू असतो. या सगळ्या प्रकारात तो कधी कधी पडतो आणि जमिनीवर चक्क आडवा होतो. मी त्याला गरज असल्याशिवाय उचलत नाही. चिखल असेल तर तो चिखलातदेखील हात घालून खेळतो. त्याला खूप आनंद होतो. त्याचा तो निरागस आनंद बघून मलादेखील आनंद होतो.
रस्त्यात कुत्री, मांजरं दिसले की आई-वडील आपल्या मुलांना घेऊन पळून जातात. तशी ही थोडी बेभरवशाचीच मंडळी हे अगदीच मान्य पण लहानपणापासून मुलांच्या मनात असंख्य प्रकारच्या भीती घालून ठेवणं मला चुकीचं वाटतं. मला स्वतःला कुत्र्यांची भीती वाटत नाही. मुलाला फिरवत असतांना कुत्री दिसली तर मी त्याला जवळ घेऊन जातो आणि कुत्र्याला हात लावायला उद्युक्त करतो. अर्थात, माझं कुत्र्याकडे बारीक लक्ष असतं. त्याच्या चेहर्यावरचे भाव थोडेदेखील बदलल्यासारखे वाटले तर मी मुलाला लगेच उचलून घेतो पण असे प्रसंग अजून एक-दोनच आलेत. बहुतेक वेळेला कुत्री लहान मुलांसोबत खुश असतात असा अनुभव आहे. मला कुत्रा हा प्राणी भयंकर आवडतो. कुठल्याही कुत्र्याजवळ जाऊन त्याचे लाड करणे मला आवडते. देवाच्या कृपेने मला अजून कुत्र्यांचा कधी वाईट अनुभव आलेला नाही. एकदा तर चुकून एका झोपलेल्या कुत्र्याच्या पोटावर माझा पाय पडला होता. तो कुत्रा विव्हळत उठला पण त्याने मला इजा केली नाही. ज्या भाजीच्या दुकानाजवळ हा किस्सा घडला त्या दुकानाच्या मालकाला खूप आश्चर्य वाटले होते. तो रस्त्यावरचा बेवारशी कुत्रा होता. आमच्या घराजवळ एक गाय राहते. माझ्या मुलाला मी तिला बिनधास्त हात लावू देतो. मी लहानपणी गायींशी खूप खेळलेलो आहे. गाय आणि कुत्रा हे तसे प्रेमळ प्राणी आहेत. लहानपणी मी रस्त्यावरच्या एका कुत्र्याला माझ्या पांघरुणात झोपायला लावत असे. अर्थात तो कुत्राच असल्याने तो लगेच पांघरुणातून बाहेर निघून जात असे. आजारी, पिसाळलेल्या, जखमी, हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित अशा कुत्र्यांपासून मात्र दूर राहिलेलेच बरे. केवळ भुकेला आहे म्हणून एखादा चांगला कुत्रा कधीही चावत नाही. परवा एक काका त्यांच्या बँक्स नावाच्या कुत्रीला घेऊन चालले होते. मी माझ्या मुलाला तिच्याकडे घेऊन गेलो. पाच मिनिटात तीन-चार मुले आली आणि बँक्ससोबत खेळायला लागली. माझा मुलगादेखील तिच्याशी खेळायला लागला. ती मस्त गुबगुबीत आणि प्रेमळ होती. मुले तिचे वाट्टेल तसे लाड करत होती पण तिच्या चेहर्यावर त्रासिक भाव नव्हता. ती मस्त डोळे मिचकावत, दात दाखवत हसत होती.
चपला. सध्या माझ्या मुलाची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे चपला किंवा बूट. कपाट उघडून तो त्यातून चपला, बूट काढतो आणि घरभर फिरतो. सुरुवातीला बायकोने त्याला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण आता मात्र तिने माझ्या सांगण्यावरून त्याला चपला-बुटांशी खेळायला मुभा दिली आहे. काय बिघडतं? चपला, बुटं रस्त्यावरची धूळ बाळगून असतात. असू दे. मुलगा जेव्हा माझे बूट घेऊन पलंगावर ठेवतो तेव्हा त्याला होणारा आनंद इतका भारी असतो की मला त्याला पटकन उचलून त्याच्या पप्या घ्यायचा मोह होतो. हळूहळू ही सवय जाणारच आहे पण सध्या तो एंजॉय करतोय तर काय हरकत आहे? उलट त्याची प्रतिकारशक्ती वाढेल असा माझा अंदाज आहे.
खूप कमी वेळेला आम्ही मुलाला मोबाईल हाताळायला देतो. कधी कधी मात्र तो भयंकर आरडा-ओरडा करतो तेव्हा काही पर्याय नसतो. हे मला न उलगडलेलं कोडं आहे. इतक्या लहान मुलाला मोबाईलचं आकर्षण का असावं? चित्र दिसतात म्हणून? व्हिडीओ दिसतात म्हणून? आम्ही शक्यतो मोबाईल-टीव्ही न लावता त्याला जेवू घालण्याचा नियम घालून घेतलेला आहे. कधी कधी मात्र टीव्हीवर गाणी लावून जेवू घालतो हे मान्य करायला पाहिजे आणि हे असे का आहे हे मला अजून कळत नाही. गाणी बघत जेवत असतांना तो मेथीच्या भाजीचे गोळेदेखील निमूटपणे खातो. पण इतर वेळेसदेखील अजून तरी तो सगळ्या भाज्या (मेथी, चाकवत, तोंडली, दोडकी, लाल-हिरवा माठ, वगैरे आऊट-ऑफ-सिलॅबस भाज्यादेखील) व्यवस्थित खातो. हे अजून किती दिवस चालेल माहिती नाही. बाहेरचं वातावरण बघता हा सदाचार फार काळ टिकेल असं वाटत नाही. त्याला आम्ही अजूनपर्यंत चॉकलेट, आईस्क्रीम खायला दिलेले नाही. अजून हे पदार्थ त्याला माहितच नाहीत. एकदा या पदार्थांची चटक लागली की मग त्याचे निराळे दुष्परिणाम दिसायला लागतात; त्यामुळे जेवढे दिवस शक्य आहे तेवढे दिवस आम्ही हे पदार्थ त्याला देणार नाही आहोत. मला स्वतःला अजून काही काही पदार्थांची चव माहित नाही. कार्यालयात माझे मित्र रेग्युलरली चॉकलेट फज खातात. मी अजून चाखूनही पाहिलेले नाही. एका दृष्टीने ते बरे आहे. सतत मोह होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भारतात मी अजून एकदाही मॅक्डॉनाल्ड्स आणि पिझ्झा हटमध्ये गेलेलो नाही. मुलाला जेवतांना निरनिराळे अभिनव खेळ खेळण्याची हौस आहे. ताटात पाणी सांडणे, भात-खिचडी-पोळी त्या पाण्यात मिक्स करणे, मग हे सगळे मिश्रण जमिनीवर ओतून देणे, नंतर ते उचलून पुन्हा ताटात टाकणे आणि हे सर्व प्रकार सुरू असतांना जेव्हा मनात येईल तेव्हा यातले काही घास तोंडात टाकणे. मी त्याच्याजवळ बसून हे सगळं बघत असतो. त्याची काहीतरी गोड बडबड चालू असते आणि मला मात्र जबरदस्त हसू येत असते. हे सगळं मी त्याला निवांतपणे करू देतो. मुरमुर्यांचा चिवडा जमिनीवर सांडल्यानंतर त्यावरून चालत जाणे आणि मग खाली बसून तळपायाला चिकटलेले मुरमुरे खाणे हा सध्या त्याचा अत्यंत आवडता छंद झालेला आहे. मी सहसा त्याच्या या छंदाच्या आड येत नाही. तो ज्या पद्धतीने खाली बसून तळपाय उचलून एक एक मुरमुरा टिपून खातो ते बघणं खूपच आनंददायी असतं.
अजून एक निरीक्षण म्हणजे मुलाला/बाळाला थोडं बरं नसलं म्हणजे लगेच डॉक्टरकडे नेणं, औषधी देणं वगैरे प्रकार आजकाल खूप वाढलेत. एक साधारण ठोकताळा असा असू शकेल की जर मूल अॅक्टीव्ह असेल आणि नेहमीच्या अॅक्टीविटीज सुरळीतपणे करत असेल तर थोडं थांबायला हरकत नाही. किरकोळ ताप वगैरे तसेच बरे होतात.
आजकाल मी बर्याच मुलांच्या खाण्याच्या सवयी पाहिल्या आहेत. त्यांना रोज प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं हवं असतं. दुपारच्या जेवणातलं काही रात्रीच्या जेवणात चालत नाही. पालेभाज्या तर अजिबात चालत नाहीत. फळभाज्यांपैकी फक्त बटाटा चालतो. बाकी मग सहसा पाव-भाजी, नूडल्स, पास्ता, पिझ्झा, पराठा, तळलेले पदार्थ, चॉकलेट्स, निरनिराळ्या प्रकारच्या मिठाया वगैरे पदार्थांवरच मुलांचा जास्त भर असतो. माझ्या मते हे थोडसं प्रॉब्लेमॅटिक आहे. पुढे या मुलांना अन्नाच्या बाबतीत तडजोडी जमणारच नाहीत. शिवाय योग्य ते पोषण त्यांना मिळत असेल की नाही हादेखील एक प्रश्न उरतोच. नेहमी जीभेचे चोचले पुरवण्याची सवय लागल्याने आणि आवडीचंच मिळाल्याने जगण्यातल्या कित्येक पैलूंच्या अनुभवास ही मुलं मुकतात असे मला वाटते.
कित्येक घरांमध्ये सुखासीन आयुष्याशी निगडीत बाबी मुलांशी चर्चिल्या जातात. अशा आयुष्यासाठी पूरक गोष्टींचा ऊहापोह त्यांच्यासोबत केला जातो पण जगण्याच्या 'अभावग्रस्त' बाजूची साधी तोंडओळखदेखील त्यांना दिली जात नाही. अडचणींवर मात करून यश मिळवण्याच्या कथा त्यांना ऐकवल्या जात नाहीत. कधी काळी हलाखीत राहणार्या पण कष्टाळू अशा आपल्या वर्गमित्रांच्या यशोगाथा आपण वाढत्या वयातील मुलांना सांगतच नाही. काही मुलांसाठी रोजची भाकरी मिळवणंदेखील किती जिकिरीचं काम असतं हे आपण मुलांना कळूच देत नाही. संपन्नतेचा आनंद घेणं चुकीचं नाही पण ही संपन्नता सगळ्यांच्या नशिबी नसते ही जाणीव मुलांमध्ये जागवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. या जाणीवा जागृत झाल्या तरच ते मोठे होऊन सगळ्यांना समजून घेऊ शकतील. सगळ्यांना समजून घेऊन काम करणारी व्यक्ती जास्त समाधानी आणि यशस्वी असण्याची शक्यता असते.
मुले आपल्या आई-वडीलांना नीट ओळखून असतात. अगदी लहानपणापासून त्यांना आपले आई-बाबा कुठल्या प्रकारचे प्राणी आहेत हे कळत असतं. साधारण एक वर्षाच्या बाळाला हा अंदाज आलेला असतो. बाळ त्या अनुषंगाने आपले हट्ट, स्वभाव, मागण्या, नाराजी, आनंद वगैरे अॅडजस्ट करत असते. लहान मुलांना विश्वासात घेऊन समजावून सांगीतलेलं कळतं आणि अशा सहजसुंदर संवादाला ते सकारात्मक प्रतिसाद देत असतात. मी काही मुले पाहिलेली आहेत ज्यांना त्यांच्या आई-बाबांनी समजावून सांगीतल्यावर त्यांनी घराच्या भिंतींवर अजिबात रेघोट्या मारल्या नाहीत.
माझा मुलगा अकारण भित्रा न बनता त्याने थोडं कणखर बनावं म्हणून मी थोडेफार प्रयत्न करत असतो. त्यात मी काहीतरी खूप वेगळं करतोय अशातला भाग नाही किंवा माझा मुलगा किती धीट बनतोय अशी दर्पोक्तीदेखील नाही हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. अजून बरीच वर्षे जायची आहेत. मुलांना कुठे आणि कसे कुठले वळण लागेल हे सांगता येत नाही. या प्रवासात कधी काही चुकले तर शेवटी बालपणीची शिकवण त्यांना योग्य मार्गावर आणण्यास सहाय्यभूत ठरत असावी असा अंदाज आहे म्हणून ही धडपड! आपण जे मुलांसाठी करतो ते सगळं योग्यच असेल असं नाही पण अनुभवांच्या कसोटीवर आपली शिकवण पडताळून पाहिल्यास फायदा होण्याची शक्यता जास्त! मुलांच्या कोवळ्या मनांमधली उत्सुकता आपल्या अतिकाळजीच्या सवयींमुळे खुंटायला नको हे महत्वाचं!
याद्या
7637
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
मस्त...
छान
कंटाळा
In reply to छान by दादा कोंडके
लेख आवडला
बेस्ट आहे...
In reply to लेख आवडला by तुषार काळभोर
@ दादा कोंडके आणि पैलवान :
जेवताना टीव्ही :
+१
In reply to जेवताना टीव्ही : by वीणा३
छान प्रतिसाद
In reply to जेवताना टीव्ही : by वीणा३
सहमत.
In reply to छान प्रतिसाद by समीरसूर
छान लेख आणि चर्चा!
उपाय...
In reply to छान लेख आणि चर्चा! by लई भारी
वीणा3 आणि लई भारी ह्यांचे
=)) =))
In reply to वीणा3 आणि लई भारी ह्यांचे by यशोधरा
करा की वं दादा! म्या न्हाई
In reply to =)) =)) by तुषार काळभोर
छान धागा
धागा वाचतेय . आणि आवडतोय सुद्धा .
हा एक बोअर प्रकार असतो...सहमत
In reply to धागा वाचतेय . आणि आवडतोय सुद्धा . by मालविका
“Your children are not your
सत्यवचन !
In reply to “Your children are not your by स्मिता श्रीपाद
लेख आणि चर्चा उदबोधक आहे.