Skip to main content

फुकटात विनासायास वेटलॉस

लेखक शाम भागवत यांनी मंगळवार, 03/07/2018 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय. ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे ....... थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय. कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो! घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार. तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये. तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल. त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली. मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका. सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही. आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा! तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते. त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे. बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती. डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत. पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात. २०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे. खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता. डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा. https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/ डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा. https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4 मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे. एक महत्त्वाची सूचना : ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये. -------------------------------------------------------------- (श्री. शाम भागवत यांचा खालील एक प्रतिसाद लेखात समाविष्ट केला आहे.) एकदाच ऐकून भाषणातले सगळे मुद्दे लक्षात राहणे शक्य नसते. परत दोन तास देणे कंटाळवाणे होऊ शकते किंवा नंतर बघू अस म्हणत लांबणीवर पडते. यासाठी एक लिंक देत आहे. तो VDO आहे. डॉ. दिक्षीतांनीच सारांश रुपात सगळे सांगितले आहे. नुसते ऐकूनही उजळणी करता येऊ शकेल. तसेच डॉक्टरांनी बरेच तक्ते बनवलेले असून त्यातले दोन महत्वाचे दाखवले जातात. त्यांचे screenshot घेऊन ठेवल्यास सर्व संदर्भ अगदी हाताशी राहू शकतील. कोणालाही थोडक्यात सांगायचे असल्यास खूप उपयोगाला येतात. तुम्हाला आलेल्या अडचणीमुळे मला हे सुचले म्हणून तुम्हालाच धन्यवाद व शुभेच्छा. https://youtu.be/99iQOs-u_HU

वाचने 164449
प्रतिक्रिया 313

प्रतिक्रिया

डॉ. जिचकारांचा विडियो बघीतला. सगळच खूप छान समजावून सांगीतले आहे. तुम्ही लींक दिलीत , हा धागा काढला , बरयाच वाचकांना याचा निश्चीतच लाभ होइल. मी तुमची अत्यंत आभारी आहे.

In reply to by सुचिता१

तरीपण माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही डॉ. दिक्षीतांचा व्हीडीओ पण पहा. डॉ. जिचकारांचा विचारांच्या आधारे आणखी प्रयोग करून डॉ. दिक्षीतांनी तो विचार आणखी पुढे नेलाय. जास्त सोपा केलाय. त्या विचारात आणखी खोल जाऊन डॉ. जिचकारांच्या पध्दतीपेक्षा जास्त प्रभावी पध्दत मांडली आहे.

सध्या आमच्या घरातही डॉक्टर दीक्षितांच्या डाएटचे प्रयोग चालू आहेत . मी स्वत: यापूर्वी (७-८ वर्षांपूर्वी) क्लीन डाएट + व्यायाम या मार्गाने १० किलो वजन कमी केले होते .. आता पुन्हा सुरुवात केली आहे. ३१ डिसेंबर पर्यंत ८ किलो वजन कमी करायचे टार्गेट आहे .. बघूया डॉ. दीक्षितांच्या प्रयोगाला यश मिळते कि माझ्या क्लीन डाएट + व्यायाम या मार्गाला

In reply to by अमर विश्वास

डॉ. दीक्षितांच्या प्रयोगाला तसेच तुमच्या क्लीन डाएट + व्यायाम या दोन्ही मार्गांना यश मिळो. फिटनेस महत्वाचा. त्याचबरोबर निवडलेल्या मार्गावर कोण जास्त काळ टिकून राहते आहे ते पण नोंदवा. जी पध्दत सोपी असते ती सहजपणे जास्त काळ टिकण्याची शक्यता असते. त्यादृष्टीनेही काही नवीन माहिती मिळू शकेल. तुमचे अनुभव जरूर मांडत रहा. तसेच तुम्ही राबवत असलेल्या क्लीन डाएट + व्यायाम मार्गाबद्दलपण येथे माहिती दिली तर फार बरे होईल. तेवढीच ज्ञानात भर.

In reply to by शाम भागवत

क्लीन डाएट ... हा शब्द खूप नंतर वाचनात आला ... पूर्वी याचाच स्वरूप जंक फूड नको असं होत ... मी स्वतः खाद्य प्रेमी असल्याने बाहेरचे खाणे भरपूर व्हायचे ... त्यामुळे सध्या खालील गोष्टी पूर्णपणे बंद आहे १. बिस्किटे २. भेळ / मिसळ / वडे ३. पंजाबी डिशेस ४. रोटी ५ हॉटेलचे खाणे ६ सॉफ्ट ड्रिंक्स सध्याचे डाएट साधारणतः असे आहे सकाळी उठल्यावर १ ग्लास दूध (बोर्नव्हिटा सह) १ तास व्यायाम नाश्ता : दूध व सिरल्स + एक फळ (केळे / पेरू / सफरचंद ) किंवा १ अंडे + १ पोळी दुपारी १ वाजता : २/३ पोळ्या + भाजी + कोशिंबीर (घरून डबा नेतो) ५ वाजता : एक अंडे किंवा सुकामेवा + एक फळ रात्री जेवण : भाकरी + भाजी + सलाड आठवड्यातून किमान दोनदा तरी वरण भात तूप पोळीवर तूप आवर्जून घेतो ... लोणी टाळतो . पाणी भरपूर पितो व्यायाम : आठवड्यातील ३ दिवस स्पिननिंग + स्ट्रेचिंग + ऍब्स ३ दिवस : स्ट्रेंथ ट्रेंनिंग सध्या असे शेड्युल आहे. यात सर्वात अवघड जिभेवर ताबा ठेवणे व आग्रहाला बळी न पडणे . एकदा हे जमले कि बाकी काही प्रॉब्लेम नाही महिन्यातून एक पार्टी करण्याची परवानगी (स्वतःच स्वतःला दिलेली)

छिद्रान्वेषी नजरेने या विषयावर नवीन काळात काय जेन्युईन मतप्रवाह आहेत ते अनेक दिवस शोधल्यावर थोडे थोडे अनेकदा खाणे या पद्धतीमध्ये दोन वेळा पूर्ण जेवण घेण्याच्या पद्धतीपेक्षा विशेष फायदा नसावा असं दिसून येतं आहे. उलट दोन वेळा व्यवस्थित (आचरट प्रमाणात नव्हे) खाणं जमल्यास ते जास्त फायदेशीर असल्याचे निष्कर्ष मिळताना दिसतात. म्हणजे हा शास्त्रीय मार्ग आहे आणि फॅड डाएट नव्हे असं नक्की म्हणता येईल. दोनदाच खाण्याच्या अन्य काही उजव्या बाजू परत नोंदवण्याचा प्रयत्न करेन. मुख्य पटणेबल मुद्दा म्हणजे "अनेकदा थोडं थोडं" या प्रकारात प्रत्येक वेळी थोडंसंच जास्त जास्त खाल्लं जातं आणि एकूण दिवसात कॅलरीची बेरीज फारच वाढू शकते. स्वतः कोणतंही सर्टिफिकेट किंवा निवाडा देण्याचा हक्क किंवा ज्ञान नसूनही तूर्तास "वेलकम" मधल्या आरडीएक्सच्या स्टाईलमध्ये म्हणायचं तर "डॉ. दीक्षितजी और ऋजुताजी के बीच डॉक्टरसाब का पलडा अभी बहुत भारी है.." :-)

In reply to by गवि

आपला मुद्दा एकदम मान्य आहे. कारण थोडंसं याची व्याख्या कुठेच नाही. उदा. माझ्याकडे सोनोग्राफी साठी आलेल्या एका स्त्रीला मी विचारले कि आपण संध्याकाळी काय खाल्लं आहे. त्यावर त्या म्हणाल्या काहीच नाही. त्यांचे पित्ताशय आकुंचन पावलेले होते( रिकाम्या पोटी पित्ताशय आकुंचन पावणे हि पित्ताशयात रोग असण्याची लक्षणे आहेत) म्हणून मी परत विचारले, " काहीच नाही? चहा पण नाही?" त्यावर त्या म्हणाल्या चहा घेतला आणि त्याबरोबर दोन बिस्कीटे खाल्ली पण ती "मारी"ची होती. मी विचारले अजून काय खाल्ले तर त्यांचे यजमान त्यांना म्हणाले कि ढोकळ्याचे तीन तुकडे खाल्लेस ना? तात्पर्य -- थोडंसं हे फारच सापेक्ष आहे. त्यामुळे आम्ही काहीच खात नाही पासून आम्ही अगदी थोडंसंच खातो पर्यंत दवे करणाऱ्यांचे वजन कमी होतच नाही. यामुळे डॉ दीक्षितांची दोनच वेळेस जेवण घेण्याची उपचारपद्धती हि यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे असे मला वाटते.

एक ऐकलेला सोपा डाएट पोटाचे चार भाग करा. दोन भाग अन्न खा एक भाग पाण्यासाठी ठेवा व एक भाग वायु साठी ठेवा. संपला डाएट

In reply to by प्रकाश घाटपांडे

घाटपांडे साहेब तिथेच तर गोची आहे. लोक एक भाग वायूचा ठेवतात. मग ढेकर देतात आणि वायू काढून टाकतात. आणि मग तो भाग परत अन्नाने भरतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

एक ऐकलेला सोपा डाएट पोटाचे चार भाग करा. दोन भाग अन्न खा एक भाग पाण्यासाठी ठेवा व एक भाग वायु साठी ठेवा. संपला डाएट मुळात प्रत्येकाने आपल्या पोटाचा/जठराचा volume आकारमान किती आहे ते आधी शोधायला हवे. मग त्याचा पाव भाग किती व त्याप्रमाणे दोन * पाव भाग अन्न volume/ आकारमान निश्चित करता येईल . दुसरे एक म्हणजे यात वजनाचे आणि पदार्थाच्या पोषणमूल्याचे काही स्पष्टीकरण नाही ,

In reply to by ओम शतानन्द

मी वाचलेल्या एका प्लॅन मध्ये वजनकाट्याला फार महत्व दिले होते. म्हणजे तुमच्या स्वतःच्या वजनाला नाही तर तुम्ही जे काही खाता त्याच्या वजनाला. प्रत्येक गोष्ट मोजून मापून आणि काटेकोरपणे वजन करून खायचा सल्ला दिला होता. किचन वेईन्ग स्केल आणावे लागेल म्हणून तो प्लॅन मी रद्द केले होता. काही रेस्तरॉं मध्ये वजनावर अन्न विकतात तेथे मात्र हा डाएट पालन पाळता येईल. :) या बद्दल काही मोजमाप उपलब्ध आहे का? म्हणजे तुमचे वजन इतके किलो असेल तर दररोज तुम्ही इतके ग्रॅम अन्न खाऊ शकता अश्या पद्धतीचे.

In reply to by चामुंडराय

....या बद्दल काही मोजमाप उपलब्ध आहे का? .... वजन वगैरेंच्या भानगडीत न पडता एक सोपा नियम पाळला तर गरजेपेक्षा जास्त खाणे सहज बंद होऊ शकते.... तो नियम म्हणजे काहीही खाताना ते जोवर छान लागत आहे, अजून खावेसे वाटते आहे, तेंव्हाच खाणे बंद करणे. कुणी एका ९४ वर्षे वयाच्या कोणत्यातरी देशाच्या अध्यक्षाने सांगितलेले थोड्याच दिवसांपूर्वी वाचनात आले, तेंव्हापासून हे पाळणे बर्यापैकी जमत आहे, त्यातून जास्त खाणे बंद झाले, आणि खाण्याचा आनंदही प्रकर्षाने जाणवू लागला आहे. अर्थात ‘किती’ याबरोबरच ‘काय’ खावे, हेही फार महत्वाचे आहे. ज्यातून विविध खनिजे, सर्व जीवनसत्वे पुरेशी मिळतील असा आहार घेण्याने भूक कमी लागते आणि आपोआपच कमी (आवश्यक तेवढेच) खाल्ले जाते.

In reply to by चामुंडराय

@ चामुंडराय तुमचे वजन इतके किलो असेल तर दररोज तुम्ही इतके ग्रॅम अन्न खाऊ शकता अश्या पद्धतीचे. अन्नातील वजनापेक्षा कॅलरी हा जास्त महत्त्वाचा भाग ठरतो. तूप घेतले तर १०० ग्राम तुपात ९०० कॅलरी होतात. तेच १०० ग्राम पेरू खाल्ले तर फक्त ६८ कॅलरी होतात. १०० ग्राम काकडी खाल्ली तर १५( पंधरा फक्त) कॅलरी होतात आणि टोमॅटो मध्ये १८ कॅलरी होतात. ६० ग्रॅमच्या समोशात ३१० कॅलरी होतात. १०० ग्राम जिलेबीत ३०० कॅलरी होतात.

In reply to by सुबोध खरे

ओके, आता आलं लक्षात, त्या डाएट प्लॅन मध्ये प्रत्येक खाद्य पदार्थ वजन करा आणि इतक्याच वजनाचा खा का सांगत होते ते. म्हणजे अप्रत्यक्षरीत्या तुमचा कॅलरी इन टेक प्रमाणित करायचा हेतू होता तर ! परंतु हा प्लॅन किती सस्टेनेबल आहे हा प्रश्नच आहे. प्रत्येक वेळी वजन करून कोण खाणार? त्या ऐवजी दोन्ही हातांच्या तळव्याने ओंजळ करा आणि त्यात मावेल तेव्हढेच अन्न खा हा बहुधा सेलेब्रिटी आहार-ताईंचा सल्ला बरा वाटतो आहे.

In reply to by चामुंडराय

दोन्ही हातांच्या तळव्याने ओंजळ करा आणि त्यात मावेल तेव्हढेच अन्न एवढा सोपं नसतं. ओन्जळ भरुन बासुंदी रोज खाऊन पहा वजन कमी होतं कि वाढतं? असं वर्तमानपत्रात दिलेलं "आहाराचं गणित" त्याच वर्तमानपत्रात दिलेल्या राशि भविष्याइतकंच भंपक असतं. आणि हे ते लिहिणार्यांनाही माहित असतं.( आहारही आणि भविष्य हि). आपला कोणताही निर्णय हा नीट अभ्यासानेच आणि तज्ञ माणसाच्या मदतीने घ्यायचा असतो. मग तो आहाराबद्दल असो किंवा आपला घामाचा पैसे गुंतवणुकीबद्दल असो

In reply to by सुबोध खरे

सेलेब्रिटी आहार-ताईं पूर्वी तूप अजिबात खाऊ नका सांगत असत आता भरपूर तूप खा सांगतात. त्यावर किती विश्वास ठेवायचा हा एक प्रश्नच आहे.

In reply to by सुबोध खरे

२००८ कि ९ मध्ये त्येंच पुस्तक आलेलं त्यात तरी तुप नका खाऊ वाचलेलं आठवतं नाही.

In reply to by सुबोध खरे

मला वाटतं सेलेब्रिटी आहार-तैं ना असे म्हणायचे असावे कि तुम्ही तुमचा नेहमीचा चौरस आहार ओंजळीभर घ्या, म्हणजे क्वालिटी नाही तर क्वांटिटी कमी करा. अन्यथा एकच खाद्य पदार्थ ओंजळी भर खाल्ला तर दुष्परिणाम / कुपोषण होईल यात शंका नसावी. "हाफ पोर्शन डबल टाइम" हा आणखी एक त्यांचा प्रसिद्ध मंत्र आहे. बाकी कोणताही निर्णय तज्ञ व्यक्ती कडून सुबोध घेऊन विचारपूर्वक घ्यावा हे तुमचे मत अगदी खरे आहे. :)

In reply to by ओम शतानन्द

@ ओम शतानन्द सामान्य माणसाच्या जठराचा आकार रिकाम्या पोटी साधारण २०० मिली असतो आणि हाच पोट भरून खाल्ल्यावर ८०० मिली ते १ लिटर पर्यंत होऊ शकतो. लठ्ठ माणसांच्या जठराचा आकार १६०० ते २००० मिली होतो. यामुळेच अशा माणसांना भरपूर खाल्ल्याशिवाय पोट भरल्याची संवेदना होत नाही. आपल्या पोटाचा आकार ८०० मिली ते १ लिटर आहे हे गृहीत धरल्यास आपण एका वेळेस जास्तीत जास्त ४०० ते ५०० मिली खाणे आवश्यक आहे. हे म्हणजे जास्तीत जास्त दीड पॅकेट मॅगी इतके होईल ( १०० ग्राम कोरडे मॅगी + १५०-२०० ग्राम/ मिली पाणी). दुर्दैवाने जठराची क्षमता हि मिलिलिटर मध्ये मोजता येते. कॅलरी किंवा ग्राम मध्ये नाही. आपण जर पाव किलो तूप प्यायला तर त्याच्या २२५० कॅलरी होतील जे सामान्य माणसाच्या दिवसभराच्या कॅलरीच्या गरजेपेक्षा जास्त होईल. एवढे करूनही आपले पोट ( सुरुवातीला तरी) रिकामे असल्याचेच आपल्याला भासेल. सुदैवाने आपले शरीर कोणत्याही स्थितीला पटकन जुळवून घेत असल्याने लठ्ठ माणसांनी जर खरीखर्च मिताहार केला तर एक महिन्यात त्यांच्या जठराची क्षमता ३६% पर्यंत कमी होऊ शकते. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/8561056?itool=EntrezSystem2.PEntrez… दुर्दैवाने बहुसंख्य लोक असा मिताहार धरसोड तर्हेने करतात यामुळे लठ्ठ पण सहजासहजी कमी होत नाही.

डॉ दीक्षितांचा व्हिडीओ मी परत पाहिला. त्याबद्दल मी वाचले आहे आणि वाचतो आहे. त्यांचा मूळ उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. भारतात लठ्ठपणा मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. शारीरिक श्रमांची गरज कमी झाली आहे आणि त्याबरोबर रुचकर अन्नाची उपलब्धता आणि परवडणारे दर यामुळे अति खाणे यामुळे हि स्थिती येत आहे. डॉ दीक्षितांचा सल्ला बहुसंख्य लोक "करून तर बघू" या उद्देशाने ऐकत आहेत. बहुसंख्य लोकांना त्यातील "फुकटात वेट लॉस" हे जास्त भावणारे वाक्य आहे. कारण बहुसंख्य लोकांनी( त्यांच्या चे पु वर प्रतिसाद देणार्यांनी) अंजली मुखर्जी, VLCC, तळवलकर यांच्याकडे आपले "पूर्वजन्मीचे देणे" दिलेले आहे किंवा मधुमेहाच्या औषधावर त्यांचा खर्च चालू आहे. तेंव्हा स्वस्त ते मस्त आणि फुकट ते पौष्टिक या उक्तीप्रमाणे "करून तर बघू" हा विचार आहे. जर आपण हा सल्ला शिस्तशीर पणे कमीत कमी सहा महिने पाळला तर त्याचे चांगले परिणाम नक्कीच दिसून येतील.(म्हणजे ९० किलोचा माणूस ९-१० किलोने वजन कमी करेल) परंतु आपण हा सल्ला "सोडून दिला" आणि परत भरपूर खायला सुरुवात केली तर एक वर्षाने आपली स्थिती मूळपदावर येईल याबद्दल मला शंका नाही. डॉ. दीक्षित यांचा सल्ला/ उपचारपद्धती हि श्रावणात पोथी वाचली आता वर्षभर पाप करायची मोकळीक मिळाली असे समजणाऱ्या लोकांनी करूच नये कारण त्यांना अपयश येण्याची मला १०० % खात्री आहे. चार महिन्यात १० % वजन कमी होईलच( हि

उपचार पद्धती नसून जीवन पद्धती आहे

हे जे समजून घेतील त्यांना यश येण्याची शक्यता भरपूर आहे. कारण दोन म्हणजे दोनच वेळेस खाणे आवश्यक आहे. आपण आता तिसऱ्यांदा खातो, मग चौथ्यांदा खाल्ले तरी चालेल असे केले तर अपयश हमखास. तात्पर्य -- डॉ दीक्षितांची उपचार पद्धती हि जे लोक जीवन पद्धती बनवतील( आयुष्यभर दोनच वेळेस जेवणे) त्यांना यश नक्की येईल. LOOSING WEIGHT IS SO EASY I HAVE DONE IT SO MANY TIMES.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब तुमचा प्रतिसाद पूर्णपणे पटला .... LOOSING WEIGHT IS SO EASY I HAVE DONE IT SO MANY TIMES. हे माझ्या बाबतीत ही झाले आहे .... काही वेळा फॅड डाएट्स मागे पण लागलो आहे ... पण आता इतक्या वर्षांनी डाएट ही जीवन पद्धती म्हणून स्वीकारली पाहिजे हे पटते डॉक्टर दिक्षतांचे भाषण मी ऐकले आहे तसेच संदर्भात बरेच वाचन व विचार केला आहे ... यानंतरच या पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे . याची कारणे (माझ्यापुरती) १. सकाळी व्यायाम करून आल्यावर मला भूक लागते .... तसेच न्याहरी (ब्रेकफास्ट) केल्याशिवाय बाहेर पडणे मला पटत नाही २. कामाच्या स्वरूपामुळे रात्रीचे जेवण ८.३० च्या आधी घेणे शक्य नाही. म्हणजे सकाळी ८.३० ला न्याहारी केल्यावर १२ तास उपाशी राहावे लागेल ... ते शक्य नाही ३. साधारणतः दर ४-५ तासांच्या अंतराने आपले पोट (जठर ) रिकामे होते व भूक लागते ... ती मारणे मला योग्य वाटत नाही ४. माझा माझ्यावर कंट्रोल आहे .... सकाळी काही खाल्ले नाही .. फक्त थोडा चहा - मारी - ढोकळा ..... असे होत नाही :) या सर्व कारणांमुळे मी वर लिहिल्याप्रमाणे क्लीन डाएट चा मार्ग अवलंबतो आहे ... जाताजाता ... ज्यांना ऍसिडिटी चा त्रास आहे त्यांनी डॉ दीक्षितांचे डाएट फॉलो करण्यापूर्वी नक्की विचार करावा ...

आमच्याइथे सध्या herbalife च्या वजन कमी करण्याच्या प्रोटीन पावडर आणि बाकीचे products जोरात चालू आहेत. निरनिराळे health clubs चालू आहेत. काही लोकांमध्ये फरक पण पडलाय पण त्याच्यात सातत्य ठेवण्यासाठी products विकत घ्यावे लागतात आणि ते महाग आहेत. पण मग ते परवडाव म्हणून त्याचा business करा अस सांगितलं जात. herbalife ची RnD पण खूप चांगली आहे. long टर्म मध्ये या products चा कितपत दुष्परिणाम होईल त्याची काही कल्पना नाही.

In reply to by अमर विश्वास

हि उत्पादने "त्यांनी सांगितल्याप्रमाणे" तुम्ही घेतली तर वजन कमी होते. परंतु हि उत्पादने त्याच्या उत्पादनखर्चाच्या किती तरी पटीने महाग असतात. https://www.amazon.in/Herbalife-Weight-Loss-Package-Pack/dp/B01FLRQZ7I कारण त्यांची उत्पादने हि जेवणा "ऐवजी" घ्यायची असतात आणि तुमच्या वजन उंची प्रमाणे ती "योजलेली" असतात. परंतु हि उत्पादने वर्षभर किंवा त्यानंतरहि घ्यावी लागतात. इतके सातत्य साधारण कोणाही ग्राहकात नसते. आणि आपण हि उत्पादने बंद करून आपल्या मूळ अति आहाराकडे गेलात कि वजन परत "येरे माझ्या मागल्या" प्रमाणे मूळपदावर येते. पण मधल्या काळात वजन थोडे कमी झाल्याने आपले वजन फार वाढले आहे हि जी आंतरिक टोचणी (GUILT) असते ती कमी होते. यातच अशा अनेक उत्पादनांचे/ कार्यक्रमांचे यश सामावलेले आहे. कोणत्याही वजन कमी करण्याच्या उपचाराच्या रथाची दोन चाके असे सर्वात महत्त्वाचे दोन भाग

मिताहार आणि सातत्य.

यातील एक चाक जरी काम करेनासे झाले तरी रथ जागीच उभा राहतो.

In reply to by सुबोध खरे

हि उत्पादने "त्यांनी सांगितल्याप्रमाणे" तुम्ही घेतली तर वजन कमी होते. परंतु हि उत्पादने त्याच्या उत्पादनखर्चाच्या किती तरी पटीने महाग असतात. https://www.amazon.in/Herbalife-Weight-Loss-Package-Pack/dp/B01FLRQZ7I कारण त्यांची उत्पादने हि जेवणा "ऐवजी" घ्यायची असतात आणि तुमच्या वजन उंची प्रमाणे ती "योजलेली" असतात. परंतु हि उत्पादने वर्षभर किंवा त्यानंतरहि घ्यावी लागतात. इतके सातत्य साधारण कोणाही ग्राहकात नसते. आणि आपण हि उत्पादने बंद करून आपल्या मूळ अति आहाराकडे गेलात कि वजन परत "येरे माझ्या मागल्या" प्रमाणे मूळपदावर येते. ->+१

In reply to by सुबोध खरे

WHEY प्रोटीन बद्दल आपले काय म्हणणे आहे? शरीर सौष्ठव करणारे हे प्रोटीन घेतात. याच्या फायदे किंवा दुष्परीणामांबद्द्ल सांगू शकाल का?

In reply to by खटपट्या

कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन या धाग्यावर मी लिहिलेला प्रतिसाद "जसाच्या तसा" येथे टाकत आहे मी अ‍ॅक्टीव्हली जिम करत होतो तेव्हा व्हे प्रोटीन रेकमेन्ड केले होते जिम ट्रेनर ने व्हे प्रोटीन हे साध्या दुधापेक्षाकिंवा कोणत्याही प्रथिन युक्त अन्न पदार्थापेक्षा जास्त चांगले आहे या विधानाला कोणताही शास्त्रीय पुरावा मला तरी आढळलेला नाही. (आमच्या बायकोला तिच्या जिमच्या इन्स्ट्रक्टर ने ५०० रुपयाला चुना लावला ते पाहून माझे डोके ठणकले होते म्हणून मी बऱयापैकी वाचन केले होते) कारण मुळात कोणतेच प्रथिन हे तसेच्या तसे शरीरात शोषले जात नाही. त्याचे मूळ अमायनो ऍसिड मध्ये पचन होणे आवश्यक आहे. व्हे प्रथिन पचायला हलके आहे असेही नाही. मग सर्वत्र जिम मध्ये व्हे प्रोटीन घ्या हा आग्रह का होतो याचा विचार करा. व्हे प्रोटीन हे चीज तयार करताना बाकी राहिलेल्या टाकाऊ द्रव पदार्थात (WASTE PRODUCT) असलेले प्रथिन आहे. Whey protein is a mixture of globular proteins isolated from whey, the liquid material created as a by-product of cheese production. कचऱ्यातून कला निर्माण करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी शोधून काढलेला हि एक क्लृप्ति आहे. आणि हे असे प्रथिन दोन हजार ते चार हजार रुपये किलोने विकले जाते आणि हे फक्त जिम मध्ये किंवा त्याचे साहित्य विकणाऱ्या दुकानातच मिळते. कोणताही डॉक्टर आपल्याला हे घ्या म्हणून सांगताना आढळत नाही. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिये In 2010 a panel of the European Food Safety Authority examined health claims made for whey protein. For the following claims either no references were provided on the claimed effect, or the provided studies did not test the claims or reported conflicting results: the claims Increase in satiety leading to a reduction in energy intake Contribution to the maintenance or achievement of a normal body weight Growth or maintenance of muscle mass Increase in lean body mass during energy restriction and resistance training Reduction of body fat mass during energy restriction and resistance training Increase in muscle strength Increase in endurance capacity during the subsequent exercise bout after strenuous exercise Skeletal muscle tissue repair Faster recovery from muscle fatigue after exercise. On the basis of the data presented, the 2010 panel concluded that a cause and effect relationship between the consumption of whey protein and these claims had not been established. साधे चणे खाल्ले तरी १०० रुपयात ३८० ग्राम प्रथिने मिळतात(१९ टक्के प्रथिने आणि साधारण ५० रुपये किलो). आणि व्हे प्रोटीन मध्ये तुम्ही १५०० रुपये मोजता ते सुद्धा टाकाऊ पदार्थातून निर्माण केलेले.

In reply to by सुबोध खरे

ओके, सविस्तर माहीतीसाठी धन्यवाद. हा प्रतिसाद जीम इन्सस्ट्रक्टर ला दाखवतो. असंही त्यांचं शिक्षण यथातथाच असतं... पाहुया.

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद डॉ साहेब. :-) मी पण जीमच्या नादात आणि स्नायूंच्या विकासासाठी व्हे प्रोटीन घेतोय, ते पण "इम्पोर्टेड गोल्ड स्टँडर्ड"! पण जेव्हा शेंगदाण्यातून मिळणार्‍या प्रोटीनची माहिती कळाली तेव्हा हा प्रश्न पडलाच की खरच व्हे ची गरज आहे का?

प्रतिसादाला लाईक करण्याची सोय हवी होती. खरे काकांचे किती तरी प्रतिसाद लाईक करावेत असे आहेत. मस्त चर्चा चालू आहे.

भागवत साहेब. तुमचा धागा यशस्वी झाला अाहे. मी दोन वेळा जेवायला सुरुवात करून ३ अाठवडे झालेत. काही त्रास जाणवत नाहीए. बरं वाटतंय. पण रक्ताच्या कोणत्याच चाचण्या केल्या नाहीत. तर यात काही धोका असू शकतो का? डायबेटीस किंवा लठ्ठपणा नसेल, किंवा बाकी अारोग्याचा काही अाढळून अालेला प्रश्न नसेल, तर हा प्लॅन सुरू करण्यापूर्वी रक्ताच्या चाचण्या करणे खरंच गरजेचं अाहे का? आधीच धन्यवाद. जिचकरांचे मूळ भाषण काल ऐकले. त्यात रक्ताच्या चाचण्या केल्याशिवाय हे सुरू करू नये असे सांगितल्याचे अाठवत नाही. उलट त्यांनी नाॅर्मल लोकांसाठी पण हे योग्यच असल्याचे सांगितले अाहे. पण दीक्षित यांच्या व्हिडीअोमध्ये मात्र चाचणीवर बराच भर दिलेला अाहे. म्हणून विचारतोय.

In reply to by स्वधर्म

साधारणतः निरोगी माणसे स्वतःहून ही आहारशैली स्विकारत नाहीत. कोणालाही जिभेवरचे बंधन नको असते. कोणतातरी त्रास व्हायला लागला की मगच उपायांची शोधाशोध सुरू होते असे माझे मत आहे. डॉ. दिक्षीतांनीही त्यांचे स्वतःचे "वाढते वजन" यावर उपाय म्हणूनच संशोधन सुरू केलेले आहे. त्यावेळी प्रचलीत असलेले वजन कमी करायचे प्रयोग स्वतःवर सुरू केलेले आहेत. ते प्रयोग फसल्यावर आणखी शोधाशोध करताना, त्यातूनच त्याना डॉ. जिचकारांचा ऑडिओ सापडलेला आहे. त्यांनी जे संशोधन केले त्याचे विषय ही स्थूलत्व व मधुमेह हेच आहेत. त्यामुळे त्या संबंधातील लोक या आहारशैलीकडे आकृष्ट होणार असतील तर सावधानता म्हणून ते रक्त तपासणी करायला सांगत असावेत असे माझे मत आहे. एखादा निरोगी माणूस या आहारशैलीचे फायदे लक्षात घेऊन ती अवलंबायला लागेल हे त्यांनी गृहित धरलेले नसावे. मात्र डॉ. जिचकार अतिरिक्त इन्सूलीन सर्व रोगांचे कारण आहे असे मत प्रतिपादन करतात व हे अतिरिक्त इन्सूलीन निर्माण होऊ नये यासाठी सर्वांना काळजी घ्यायला सांगतात. त्यांचा भर आहे निरामय व दिर्घायुष्य यावर. मला वाटते यात आपोआपच निरोगी माणूस येतो. दोन्ही व्हीडिओ मधे हा महत्वाचा फरक आहे अशी माझी समजूत आहे. यासाठीच मी या लेखात जिचकार यांना महत्व दिलेले आहे. "ऐशी अक्षरे" मधे डॉ. जिचकार यांना या लेखात उगीचच घुसडले आहे असाही एक संदेश आला होता. पण तेथील प्रतिसादांचे स्वरूप पहाता मी तिथे जास्त थांबलो नाही. तुम्हाला काहीच होत नसेल आणि या ३ आठवड्यानंतरही काही होत नसेल तर तपासण्याची जरूरी नसावी असे वाटते. तुमचा ३ आठवड्यांच्या अगोदरचा संपूर्ण दिवसातला आहार व आत्ताचा संपूर्ण दिवसाचा आहार हा सारखाच असेल तर तुम्ही काहीच वेगळे करत नाही आहात असेच मला वाटते. मग तपासण्या कशासाठी करायच्या? मी माझे मत मांडले आहे. कृपया तज्ञांनी त्यांचे मत मांडले तर फार बरे होईल.

In reply to by शाम भागवत

लगेच उत्तर दिल्याबद्दल. मी तूर्त तरी ते सुरूच ठेवणार अाहे. नंतर रक्तदान करता अाले (डिसेंबर) अाणि काही त्रास झाला नाही, तर हे मला धार्जिण अाहे असे मानायला हरकत नाही. अाणखी एक उल्लेखनिय गोष्ट म्हणजे तुंम्ही धाग्यावर अगदी व्यवस्थित प्रतिसाद देत अाहात. धागा काढून गायब झाला नाहीत.

In reply to by स्वधर्म

दिवसात दोन वेळा जेवण्यामुळे नुकसान काहीही होणार नाही. जगात कित्येक लोक असे आहेत ज्यांना एकवेळ सुद्धा धड पोट भरेल असे जेवण मिळत नाही. तेंव्हा आपण निर्धास्त असावे. डायबेटीस किंवा लठ्ठपणा नसेल, किंवा बाकी अारोग्याचा काही अाढळून अालेला प्रश्न नसेल, तर हा प्लॅन सुरू करण्यापूर्वी रक्ताच्या चाचण्या करणे अजिबात आवश्यक नाही बाकी --आपले वय चाळीशीच्या पेक्षा जास्त असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त चाचण्या करायच्या असतील तर करा.

In reply to by सुबोध खरे

तीन वेळा खाण्याची अापली परिस्थितीच नसली असती तर? किंवा कधी दिवसातले एखादे जेवण मिळालेच नाही तर टिकाव धरता अाला पाहिजेच, असा विचार केला होता. कधी कधी कडक भूक लागूनही उपाशी राहिलो, तर त्यामुळे मधुमेहाच्या जवळ जाणार नाही ना असे वाटले, म्हणून विचारले. तुंम्ही धीर दिला.

In reply to by स्वधर्म

@ स्वधर्म : दीक्षित डाएट सुरु करून आता तुम्हाला साधारणतः आठ महिने झाले आहेत. रिझल्ट्स काय आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

मला तरी खूप फायदा जाणवला - मी स्वतः एप्रिल २०१८ पासून फॉलो करतोय वजन ४.५ किलो ने कमी झालय ३ महिन्यात ७५ ते ७०.५ आणी ढेरी ३७ ईंच वरुन ३५ ईंच झालीये :-) एच बी ए १ सी ६.९ वरुन ५.७ झालाय सध्या. स्वतः डॉ. दिक्षीतांशी व्हाट्स अ‍ॅप वर चर्चा पण केलीये ऑलरेडी. कृत्रिम साखर एक वर्षा पूर्वीच बंद केलीये.

In reply to by संदिप एस

व्वा!! व्वा!! व्वा!! आता अनुभवाचे बोल ऐकायला मिळायला लागल्यावर तर या धाग्याची दिवाळीच सुरू होणार आहे. येणारे अनुभव शेअर करत रहा. _/\_

माझे वडील फक्त सकाळी १० आणि संध्याकाळी ५ वाजता जेवत असत. (जेवणात भाकरी/पोळी, भात, भाजी, वरण, कोशिंबीर, चटणी, ताक आणि सणावारी गोड असायचे — विशेष म्हणजे आई अगदी ताजा स्वयंपाक १० आणि ५ वाजता करून गरमागरम वाढायची ). याशिवाय ते कधीही काहीही खात नसत. ८०+ वयातही त्यांची प्रकृती उत्तम होती. लठ्ठपणा अजिबात नव्हता, चष्मा लागला नव्हता (वाचन भरपूर करत तरिही) कोणतीही व्याधी नव्हती. कुठेही जायचे ते पायी किंवा सायकलीने. आमचे औषधाचे दुकान असूनही स्वतः कधीच औषध घ्यायचे नाहीत. मृत्युसमयी एक मिनीटही अंथरुणावर नव्हते. फिरायला म्हणून बाहेर निघताना जरा थकल्यासारखे वाटले म्हणून खुर्चीवर बसले आणि तिथेच प्राण गेला. मला पुष्कळ वर्षांपासून त्यांच्यासारखी आहाराची सवय लावून घेण्याची इच्छा आहे. दिक्षितांचे विडियॉ मी पूर्वीच बघितलेले आहेत. हा लेख आणि प्रतिसाद वाचून वाटू लागले आहे की ती वेळ आता आलेली आहे. मला दिवसभर काही ना का काही खात रहाण्याची सवय लागलेली आहे. (अनेक वर्षांपासून दिवसभर घरी असण्याचा परिणाम, त्यातून ऋजुताबाईंची पुस्तके वाचलेली) मी हा प्रकार सुरू केल्यावर त्याबद्दल लिहीनच.

In reply to by चित्रगुप्त

दिवसातून दोनदाच खाण्याची जिवनशैली डॉ. दिक्षीत २०१२ पासून पाळत आहेत. म्हणजे त्याला अंदाजे ५-६ वर्षे झाली असतील . पण तुमचे वडील ती जिवनशैली त्यांच्यापेक्षाही जास्त काळ अंगीकारत होते हे लक्षात येतय. तसेच या जिवनशैलीमुळे त्यांना झालेले फायदेपण तुम्ही लिहिलेले असल्याने, या धाग्याचा वाचकवर्ग आता आणखी विश्वासाने ही जिवनपध्दती स्विकारण्याचा विचार करायला लागेल. धन्यवाद. _/\_

In reply to by शाम भागवत

माझ्या वडिलांचा जन्म १८९६ चा आणि मृत्यु १९७८ चा. मला जरा कळू लागल्यापासून म्हणजे साधारणतः १९५७ पासून मी त्यांना दोनदाच जेवताना बघितलेले आहे, कदाचित त्यापूर्वी अनेक वर्षे त्यांना ही सवय असावी. त्यांचे बालपण फारच विपरित परिस्थितीत गेलेले होते, त्यातून ही सवय लागली किंवा कसे हे ठाऊक नाही.

In reply to by चित्रगुप्त

तुमच्या वडिलांच्या स्मृतीला _/\_ परिस्थिती का जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय हे सांगणे खरोखरच अवघड आहे. शिवाजी महाराज दिवसातून (दुपारी) एकदाच जेवत असत, अस काहीस बाबासाहेब पुरंदरे म्हणाल्याचे अंधूकस आठवतय. असो.

फक्त दहा आणि पाच वाजता जेवण्याची सवय लावून घेऊन ती उर्वरित आयुष्यात कायम ठेवणे माझ्यासाठी इतके सोपे नाही, कारण मुळात अनेकदा खाण्याची सवय तर लागलेली आहेच, आणि वडिलांना जसे आई नियमाने गरम ताजे अन्न करून वाढायची, तशी शक्यता जवळजवळ नाहीच. फारतर त्या त्या वेळी घरात जे उपलब्ध असेल ते खाणे, हेच होऊ शकते. पहिली पायरी म्हणून मी आजपासून दिवसभरात काय काय, किती खाल्ले, याची लेखी नोंद करणे सुरू करत आहे. पाच - सहा दिवसांच्या नोंदी बघून मग काय करायला हवे आणि काय करता येईल, हे स्पष्ट होईलसे वाटते.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त साहेब तुम्ही तुमच्या वडिलांचे आशिर्वाद घेऊन या धाग्यावर आलेला पाहून फार छान वाटले. २-३ वर्षापूर्वी तुमच्या धाग्याची "शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले?" वाचनखूण साठवली होती. त्याची आठवण आली. तुम्हाला तुमचे वडीलच स्फूर्ती देणार असल्याने तुम्हाला यश मिळणारच याची मला खात्री आहे. _/\_

मी कायप्पा वर काही दिवसांपूर्वी डॉक्टर दिक्षितांचा उपाय असलेली पोस्ट वाचली होती , ति खरच आहे का ते पडताळण्यासाठी यु टूब वर त्यांचा संपूर्ण व्हीडीओ पहिला. मला पटलं आणि शुक्रवारी २० सप्टेंबर१८ च्या दिवशी घरी पोचल्यावर , बायकोला अगोदरच सांगितले मला चहा नकोय ....तिने पुन्हा विचारले ....मी पुन्हा सांगितलं ,आणि माझा प्रयोग सुरु झाला शनिवारी,+ रविवार सुटी असल्याने आपण स्वतःला कंट्रोल करू शकतो का हे तपासायच होत. ते दोन दिवस मला घरच्यांच्या टोचण्या ....बडबड ....वेड लागलय तुम्हाला वगैरे सहन करत काढावे लागले पण मी माझ्या प्रयोगावर ठाम होतो . डॉक्टर जिचकर आणि दीक्षितांच मत मला तंतोतंत खर करायचं होत हे मी मनात पक्क ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी घरातून निघताना पत्नी ने नाश्ता समोर आणला ...तिला म्हटल ...सकाळी सकाळी वाद नको मला माझ्या वाटचा नाश्ता एका डब्यात दे मी जेवणाच्या वेळेस खाईन. पण तिची बडबड चालूच होती ...मी स्वतःच तो एका डब्यात घेतला आणि घराबाहेर पडलो ..... सोमवार चा दिवस माझ्या खूप लक्षात राहील ....आपण रोज काय काय खात होतो या वेळेत त्याची खरी यादी त्या दिवशी मिळाली शुक्रवारी ऑफिस मधून निघताना वजन केलं होतं ते होत ७६ किलो दीक्षित सरांच्या म्हणण्या नुसार उंची - १०० = अपेक्षित वजन ( उंची १६५ सेमी म्हणजे १६५ - १०० = ६५ ) म्हणजे माझ वजन ६५ किलो असायला हवं पण ते ७६ म्हणजे तब्बल ११ किलो नि जास्त आहे .......... मला माझ टार्गेट सापडलं होत ११ किलो कमी करायचं आहे आणि मी खूप सिरिअस होऊन हा प्रयोग ३ महिने तरी करायचा हा उद्देश ठेवून सुरु केला .... सोमवारी नाश्ता न केल्याने जरा कासावीस झालो होतो घशाला कोरड पडत होती ....पाणी पीत होतो ...... मधेच मनात यायचं कि चल जे डब्यात आहे ते संपवून आजच जेवण झालं अस घोषित करूया .....पण मग निट विचार केल्यावर कळल कि आपल्याला आज आता भूक लागली आणि वेळ आहे म्हणून जेवू शकतोय ... रोज असं शक्य नाही मग दुसरा नियम आठवला ......भुकेची वेळ शोधा .... आणि त्या वेळेस पोटभर जेवा ......मी ति ऑफिस च्या वेळेस जुळवायचा प्रयत्न करत होतो .....पहिल्या दिवशी मी न राहून ११.४५ ला जेवलो ...नंतर च्या दिवशी १० मिनिटे थांबून १२ च्या दरम्यान जेवलो आणि ४ दिवसात १ वाजेपर्यंत पोचलो गुरुवार पर्यंत दुपारची वेळ पक्की झाली ...आता घरी पोचल्यावर बायको मुद्दामून काही खायला करू का .... बिस्कीट तरी घ्या ....नको इतकि आगत्य करीत होती मुलं मुद्दामून माझ्यासमोर काहीतरी खात येत होती पण त्या सगळ्यावर कटाक्षाने दुर्लक्ष करत होतो.. तिसरा नियम आठवला - चहा - चहा पिवू शकता पण विना दुध आणि विना साखर पहिल्या दिवशी घरी वेगळा करायला सांगितला तर कडाडून विरोधाला सामना करावा लागला ... म्हटल अस कसं चालेल चहा तर हवाय ...विनंती करून साखर घालायच्या अगोदर कपभर बाजूला काढण्यात आला ...... तो अतिशय कडू लागला .... दोन घोट पिऊन ओतून दिला .......मग ग्रीन टी बग्स आणल्या आणि सकाळचा प्रश्न निकालात निघाला. १० दिवसानंतर माझा मी चहा करून प्यायला लागलो .....आज २० दिवस झाले आहेत माझ वजन - कधी एकदा काट्यावर उभा राहतोय असं झालं होत ......वजन केलं आणि मला आश्चर्य चकित व्हायला झालं माझ वजन २० दिवसात २ किलो कमी झालं आहे . पावसामुळे सकाळी चालायला जमत नाहीये पण मी खूप प्रेरित झालोय आणि मला याच वेगानी जर वजन कमी झालं तर याच वर्षी माझ टार्गेट पूर्ण करता येईल याची खात्री वाटली . मित्रानो एक आठवडा खूप त्रास झाला मी माझ्या बागेत एक प्लास्टिक ची पिशवी आणि एक रिकामा डबा ठेवतो .... कुणी काही खायला दिल तर मी ते डब्यात न लाजता ठेऊ लागलोय ....जेवताना ते अगोदर खातो आणि मग पुढच जेवण मला पटलय आणि मी तुम्हाला हि हा प्रयोग करायचा आग्रह करेन

In reply to by II श्रीमंत पेशवे II

विना दूध असे दीक्षितांनी सांगितलेले नाहीये. एका कपाला पाव कप दूध असे प्रमान चलेल त्यांच्या मते. मी तरी तसा चहा दिवसातून ३ वेळा पितो, आणि दोन्ही वेळच्या जेवणानंतर मस्तपैकी साखर घालून कॉफी. तसेही जेवण २०-२५ मिनिटात संपते, त्यामुळे छानपैकी बायकोबरोबर गप्पा मारत १५ मिनिटे कॉफीपानाचा कार्यक्रम होतो.

In reply to by II श्रीमंत पेशवे II

मी माझ्या बागेत एक प्लास्टिक ची पिशवी आणि एक रिकामा डबा ठेवतो
पाच हजार रु दंड :)

In reply to by II श्रीमंत पेशवे II

नाही सांगत हो कुणी त्या पथकाला तुमचे नांव. उगी कशाला घाबरताय? ;) आणि भेटलेच तर सांगा बिनधास्त बायोडिग्रेडेबल प्लास्टिकची पिशवी आहे म्हणून. त्यांना तरी कुठे फरक कळतोय अजुन साध्या आणि बायोडिग्रेडेबल प्लास्टिकमधला. ;) नसल्यास ५१ मायक्रॉनची आहे म्हनून सांगा. ते मोजायचे टूल नसते त्यांच्याकडे. जरी कमी भरले तरी वापरुन झिजली म्हणायची. ;)

In reply to by II श्रीमंत पेशवे II

मला २० जुलै असे लिहायचे होते चूकीन शुक्रवारी २० सप्टेंबर१८ असे लिहले गेले
आम्ही सगळ्यांनी ते समजून घेतले होते. :)

काल आणि परवा मी केलेल्या नोंदीवरून एक गोष्ट लक्षात येते आहे की आपण आवश्यकतेपेक्षा जास्त खात आहोत. आधी त्यावर लगाम घातला पाहिजे. सध्यातरी एकदम एका झटक्यात दोनदाच जेवणाची सवय लावणे मला जमेलसे वाटत नाहिये.

In reply to by चित्रगुप्त

काका सहज जमेल.. फक्त ८ दिवस८गरज पडेल तेव्हा झोपायची तयारी ठेवा. (तुम्हाला डायबेटिस नाहीये हे गृहीत धर्तोय) मला ४ तास काही खल्ले नाही की गरगरायला लागायचं. ४-५ दिवस त्रास झाला. पण हे गरगरल्याशिवाय चरबी वितळायचा मॅकेनिझम सुरु होत नाही.. वर्षानुवर्षे शरीराला चरबी वितळवायची सवयच नसते. ती लागताना थोडासा त्रास होणारच.