Skip to main content

घडवणूक शब्दांची!

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 07/06/2018 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत भाषेत अन्य भाषांमधून होणारी आवक आपल्याला नवी नाही.महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधे बोलल्या जाणार्‍या भाषांपासून ते फारसी,इंग्लिश,पोर्तुगीज,अरबी अशा बर्‍याच भाषांमधून ही आवक झालेली आहे. काही शब्द तर मूळचे मराठी नाहीत हे सहजपणे लक्षातही येणार नाही इतके ते मराठी भाषेत बेमालूमपणे मिसळले आहेत,स्वीकारले गेले आहेत. ही आवक अजूनही सुरुच आहे. पण ही आवक किती होऊ द्यायची यालाही काही मर्यादा असाव्यात,त्यामागे निश्चित असे धोरण असावे असे वाटू लागले आहे. खालील वाक्ये पहा. "हार्डडिस्क केबलनं लॅपटॉपला अॅटेच केली की विदीन टेन सेकंद लॅपटॉप आपोआप बंदच होतो." "पावसाडा सुरु होऊनही मुंबईच्या रस्त्यांमदले गढ्ढे महापालिकेने न भरल्याने पुन्हा एकदा महापालिकेची पोल खुललेली आहे. - अखिलेश मिश्रा ------- न्यूजसाठी" "पिल्लू तिकडे नको जाऊ.तिकडे अँटस असतील,त्या तुला बाईट करतील." "अगं मी बोलली होती त्याला, मला जाताना पिकअप कर म्हणून!" अशीच मराठी वाटू शकणारी काही वाक्ये तुमच्याही कानावर बर्‍याचदा पडत असतील. या वाक्यांमधे काही मोजके शब्द मराठी आहेत,क्रियापदे मराठी आहेत.पण सोबतच इंग्लिश आणि हिंदी शब्दांचाही नको इतका भरणा आहे. अशा भाषेला आपण मराठी का समजावं? मोजकेच मराठी शब्द आणि क्रियापद मराठी आहे म्हणून? अशी भाषा ही खरंतर इंग्लिश किंवा हिंदीची बोलीभाषा म्हणून जास्त शोभेल असं नाही का वाटत? मराठीच्या अशा धेडगुजरी रुपाबद्दल खंत व्यक्त करुन हळहळण्यापेक्षा आपणच काही केलं तर? प्रयत्न करुन पहायला हरकत काय आहे? याच इच्छेतून सुरु झालेला हा उपक्रम "घडवणूक शब्दांची!" १) परकीय आणि स्वकीय भाषेतून आलेले क्लिष्ट, लांबलचक, उच्चारायला अवघड असे शब्द २) परकीय भाषेतून आलेल्या वैज्ञानिक,तांत्रिक पारिभाषिक संज्ञा ३) समान,नेमका अर्थ दर्शवणारा शब्द आधीपासूनच मराठीत उपलब्ध असूनही तोच अर्थ दर्शवणारा मराठीतर शब्द वरील तीन प्रकारच्या शब्दांसाठी अचूक मराठी शब्द सुचवणे किंवा त्यांचे मराठीकरण करणे आणि हे करताना नवीन निर्माण केला जाणारा शब्द लांबीला कमी, उच्चारायला सोपा, अर्थवाही असेल याचाही विचार करणे म्हणजे "शब्दांची घडवणूक!" आपणही या उपक्रमात सामील होऊ शकता. हे निर्माण झालेले नवीन शब्द मुक्त वापरासाठी सर्वांकरिता उपलब्ध असतील.असे शब्द सुचविणार्‍यांबद्दल कृतज्ञता नक्कीच असेल,श्रेय देण्याजोगे असेल. या उपक्रमात आपण कशाप्रकारे सहभागी होऊ शकता? ‍१) हा धागा बनवलाच आहे.इथेच आपण असे शब्द बनवून प्रकाशित करु शकता.इतरांनी बनवलेल्या शब्दांवर चर्चा,काथ्याकूट करु शकता. २) "घडवणूक शब्दांची!" याच नावाने एक व्हॉटसअॅप समुहसुध्दा बनवला आहे.तिथे बरेचसे सदस्य हे मिपाकरच आहेत.तिथे सामील होऊ शकता.सामील होण्यासाठी आपण आपलं नाव आणि व्हॉटसअॅप नं व्यनिद्वारे मला पाठवू शकता. ३) सर्वात महत्वाचा मुद्दा: - हे शब्द केवळ बनवून उपयोग नाही तर ते सर्वत्र पसरले पाहिजेत,त्यांचा प्रसार झाला पाहिजे,मराठीजनांनी ते बोलण्यातून,लेखनातून वापरले पाहिजेत.हे शब्द रुळणे हे या उपक्रमाचं खरं यश म्हणता येईल. आंतरजाल,संभाषण,लेखन,समाजमाध्यमे अशा मार्गांनी हे शब्द पसरवण्यास,रुळवण्यास मदत करु शकता. दर सोमवारी व्हॉटसअॅप समुहावरील अंतिमत: निश्चित झालेले शब्द इथे दिले जातील,किंवा निश्चित न झाल्यास आलेली समस्या अधिक चर्चेसाठी इथे दिली जाईल. जेणेकरुन अधिक मार्गदर्शन मिळेल. असाही प्रश्न पडू शकतो की याआधी असे शब्दनिर्मितीचे प्रयत्न झालेले आहेत.वि.दा.सावरकरांनी भाषाशुद्धीच्या माध्यमातून हे प्रयत्न पूर्वी केले आहेत.तुम्ही असं वेगळं काय करताय? याचं उत्तर असं की आम्ही संपूर्णतः नवीन असं काहीच करत नाही आहोत.फक्त याआधीच्या प्रयत्नांमधल्या त्रुटी दूर करण्याचा आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आणि नवीन,सोप्या शब्दांचा प्रसार,प्रचार करुन हे शब्द रुळवण्यास यथाशक्ती प्रयत्न करत आहोत. असा प्रयत्न करुन सावरकरांची बरोबरी करण्याचे धाडस करावे हा उद्देश यामागे नसून सावरकर ही यामागची प्रेरणा असून नवशब्दांची गंगा वाहती ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. अशा नवीन शब्दांचा प्रसार,प्रचार करताना ते रुळवताना काही वेळा थट्टा,मस्करीही होईल.ती याआधीच्या प्रयत्नांवेळीही झालेली आहे.सदर आक्षेपक मस्करी करण्याऐवजी सकारात्मकपणे या उपक्रमात सामील झाल्यास अधिक आनंद होईल. सर्व सकारात्मक सुचनांचे,सल्ल्यांचे स्वागतच आहे.

वाचने 79845
प्रतिक्रिया 148

प्रतिक्रिया

In reply to by मराठी_माणूस

....इंग्लिश भाषेच उत्पनांच्या दृष्टीने असलेले महत्व हे मराठी भाषा आणि इतर भारतीय भाषा च्या तुलनेत सारखेच आहे..... ते कसं काय?इंग्लिश आंतरराष्ट्रीय भाषा आहे. शिवाय वरील अनुभव माझा नाही.अग्रेषित म्हणजे फॉरवर्ड असं लिहिलंय की!

In reply to by उपयोजक

मला असे म्हणायचे आहे की "इंग्लिश भाषा जेवढा पैसा मिळवून देते तेवढा पैसा मराठी देत नाही हे असेल का?" इथे "मराठी" च्या ऐवजी इतर कोणतीही भारतीय भाषा टाकली तरी चालेल. प्रतिसादाचा काही भाग हा फॉरवर्ड मधल्या अनुभवा संबधी आहे. रोख तुमच्या कडे नाही.

In reply to by उपयोजक

शिवाय वरील अनुभव माझा नाही.अग्रेषित म्हणजे फॉरवर्ड असं लिहिलंय की!
शिंपल मराठीत लिवायच ना "फॉरवर्ड मेसेज" म्हणून आम्ही उगा दोन दीस डोक लावत बसलो "अग्रेषित" वर. आम्हाला वाटल हा कोन नवा प्रेषित आला की काय? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

खी खी खी... https://www.misalpav.com/comment/1000667#comment-1000667 या प्रतिसादातल्या, ठळक केलेल्या मजकूराचे उत्तम उदाहरण, इथे इतक्या लवकर मिळेल असे वाटले नव्हते ! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ओ म्हात्रे सर आमच्या धनुष्यातुन तुम्ही तुमचे बाण मारु नका. एका विषिष्ठ, उदात्त, विशुध्द, प्रामाणिक सोज्वळ आणि निर्मळ मनाने दिलेला तो प्रतिसाद होता. कोणालाही कोणत्याही प्रकारे दुखावण्याचा आमचा हेतु नव्हता. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

दिसले ते सांगितले... फक्त, (काहीसे आश्चर्य वाटून केलेले) स्टेटमेंट ऑफ फॅक्ट आहे हो ते ! :) तुमच्या विषिष्ठ, उदात्त, विशुध्द, प्रामाणिक सोज्वळ आणि निर्मळ मनाबद्दल आमच्या मनात काडीचीही शंका-आशंका नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आमच्या मनात काडीचीही शंका-आशंका नाही
डाऊट नाय म्हणा की राव. की तुमीपण अस्मितावादी हायसा? अस्मिता म्हणजे लै वंगाळ नशा बगा. आरडीएक्स जनू. ९९% तुडवातुडवीचं कारण. बोले तो रूट कॉज.

In reply to by उपयोजक

सरकारी नियमांचे उल्लंघन होत असल्यास व तुम्ही केला आहे तसा प्रयत्न करूनही शाळेचे प्रशासन सुधारत नसेल तर, महाराष्ट्र शासनाच्या योग्य त्या सरकारी खात्यात त्याबद्दल तक्रार करणे योग्य होईल.

In reply to by उपयोजक

वर ते सर्व आणखी तोषाने मला बोलू लागले.
मराठीसाठी त्या इतक्या पोटतिडकीने लिहित आहेत, पण तोष आणि त्वेष यातील फरक त्यांच्या लक्षात आलेला दिसत नाही, मराठी त्यांचीपण तृतीय भाषाच होती का :))

In reply to by उपयोजक

एक एक करून आत्तापर्यंत जवळ जवळ ८ अमराठी भाषिक व्यक्तींनी तो ग्रुप सोडला.
भारीच की ... बाकी वाद-विवाद करण्यापेक्षा बाईंनी कायदेशीर प्रक्रियेलाच हात घालायला हवा असे मला वाटते.

In reply to by उपयोजक

अगदी अगदी एक ठीकाणी ती असे म्हणते "there is उत्सुकता आहे मला" खरेच धन्य आहे.

मराठी बोलताना इंग्रजीच्या कुबड्या घेऊन बोलणे खरेतर लाजिरवाणे वाटले पाहिजे पण तो एक कौतुकाचा, आदराचा विषय बनतो. बोलताना अतिरेकी इंग्रजी शब्दांचा वापर म्हणजे सदर व्यक्ती उच्चभ्रू, उच्चशिक्षित, समाजाच्या अभिजन वर्गातली आहे ह्यावर शिक्कामोर्तब असे अत्यंत विकृत समीकरण बनलेले आहे. खरे तर अशा व्यक्तीचे मराठीही चांगले नाही आणि इंग्रजीही अशी मला तरी शंका येते. आचार्य अत्रे हे अनेक वर्षे शिक्षणाकरता इंग्लंडला होते. ते परत आल्यावर त्यांना मराठीत एक भाषण करायचे होते. त्याची त्यांनी चांगली तयारी होती. पण त्यातील मुख्य भर हा आपल्या बोलण्यात इंग्रजी शब्द असता कामा नये ह्यावर होता. आपण इंग्लंडमधे राहिलो असल्यामुळे ह्या बाबीकडे त्यांचा कटाक्ष होता. (अंगावर इंग्रजी सूटबूट धारण करण्यात त्यांना फार चुकीचे वाटत नव्हते. पण आपल्या मराठी भाषेला अशा प्रकारे सूटबूट चढवणे हे साफ नामंजूर होते.) अर्थात तो जुना काळ होता. आज असे झाले तर उलट प्रकार होईल. जास्तीत जास्त परदेशी इंग्रजी शब्द, इंग्लंड वा अमेरिकी पद्धतीने उच्चारण्याची अहमहिका सुरू होईल ह्यात शंकाच नाही. मला वाटते की भाषेत काय बदल व्हावेत ह्याबद्दल एक निरोगी संघर्ष कायम चालू असला पाहिजे. नव्या शब्दांची आयात वा जुन्या शब्दांचे पुनरुज्जीवन वा मराठीतच नवे शब्द जन्माला घालणे ह्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. समाज काय स्वीकारतो ह्यावर भाषा कशी बदलते ते अवलंबून आहे. ज्यांना मराठीचा अभिमान आहे (गर्व नाही!) त्यांनी आपापल्या परीने नवे चांगले मराठी शब्द नव्या शब्दांच्या आयातीला पर्याय म्हणून सुचवले पाहिजेत. नाहीतर मराठी भाषा नष्ट होईल.

१. गोरीला ग्लास - माकडकाच २. हार्डडिस्क - हार्दीक(थेट अपभ्रंश :)) ३. OTG केबल - अोतार(OT+तार) ४. डेटा केबल - वितार (विदा+तार) ५. सेट टॉप बॉक्स - साधपेटी ६. रिचार्ज - पुभार(पुनर्भार) ७. सिमकार्ड - मामापत्र(मालकाची माहिती भरलेले पत्रक) ८. डेटा केबल = विदावती ९. गोरीला ग्लास = माकडकाच १०. ३.५ mm जॅक = रवटेकू ११. सिम स्लॉट = सरखळी १२. Cathode ray tube = (ऋकिन/रुकिन) ~ ऋण किरण नलिका १३. सोल्डरींग = लयघट्ट

In reply to by उपयोजक

४. डेटा केबल - वितार (विदा+तार) ८. डेटा केबल = विदावती
यामुळेच गडबड होते.. एकाच गोष्टीसाठी तुम्ही दोन शब्द दिले.. झालंच तर तुम्हीच दिलेले शब्द का प्रमाण मानायचे असंही इतर जण म्हणू शकतात. मग इंग्लिशमध्ये जसा Oxford चा शब्दकोश बहुतांशी प्रमाण मानला जातो तसा मराठीचा एक शब्दकोष असायला हवा.

In reply to by मराठी कथालेखक

लक्षात आलं. खरंतर अोतार हा एकच शब्द द्यायचा होता.समुहात चर्चेदरम्यान घेतलेला होता विदावती.त्यामुळे तो ही आला.क्षमस्व!

In reply to by मराठी कथालेखक

आमचेच शब्द प्रमाण मानावेत असा मुळीच आग्रह नाही.इतरांनीही सुचवावेत.त्यावर चर्चा होऊन सर्वांतून एकच शब्द अंतिमत: निश्चित करुन तोच पुढे जायला हरकत नाही. पण याहून महत्त्वाचं म्हणजे एखादा नवीन शब्द तयार होऊन तो सातत्यानं वापरात येणं.मी वर शब्द सुचवताना कोणते निकष असावेत ते सुचवलं आहेच.ते पटण्यास हरकत नसावी. अर्धशिक्षित,अशिक्षित किंवा खेड्यातल्या लोकांना हे शब्द सहज म्हणता यावेत हा उद्देश आहे. कारण शहरी लोकांपेक्षा हेच लोक मराठी भाषा टिकवायला तुलनेने अधिक मदत करतात. त्यांना डावलून हा उपक्रम यशस्वी होऊच शकत नाही.

नवीन शब्द * उच्चारायला सोपा असावा. * जास्तीतजास्त ४ किंवा ५ अक्षरे असावीत. * एकच अखंड शब्द असावा.शब्दांचे दोन गट नकोत. १. पेनड्राईव्ह २. बॅककव्हर ३. स्मार्ट टिव्ही ४. इलेक्ट्रिक स्क्रू ड्रायव्हर ५. Printed circuit board(PCB) ६. Monitor ७. Card reader ८. हेडफोन्स ९. हेल्मेट १०. USB

Otg cable - ओतार तशी Data Cable - डीतार / डातार/दातार/देतार पेनड्राईव्ह - पांडाव /पनडाव/पेंडाव USB - असबी मला कदाचित जमत नसेल परंतु मराठीकरण करताना मराठी उच्चार हा इंग्रजी शब्दाच्या जवळ जाणारा असावा भले त्याला मरीठीत काही अर्थ नसला तरी चालेल असे वाटते. इतर सदस्यांना काय वाटते?

In reply to by श्वेता२४

पेनड्राईव्ह - पांडाव /पनडाव/पेंडाव
'पांण्डू हवालदार', पण हरकत नाही :) , (हवालदार मंडळींनी हे फायली सांभाळण्याचे काम ह. घ्यावे)

चांगला प्रयत्न. शक्य सगळं आहे. फार पुर्वी आकाशवाणीवर क्रीकेटचं धावतं समालोचन ऐकायचो. त्यानंतर टीवीवरचे हींदी समालोचनही ऐकले आणि त्यानंतर असं वाटलं की क्रीकेट्चे जास्तीत जास्त शब्द भाषांतरीत झाले असतील तर ते फक्त मराठीतच. रन - धावा, स्टंप - यष्टी,धावचित, यष्टीचीत, गोलंदाज, फलंदाज, अजून बरेच... आजच्या पीढीला जर खेळपट्टी, सीमारेषा असे शब्द ऐकवले तर बघत बसेल. विषेश म्हणजे हे शब्द अगदी चपखल बसले, कोणाला ते कठीण वाटले नाहीत की कोणी आक्षेप घेतला नाही की नाके मुरडली नाहीत. अशा प्रकारचं भाषांतर झालं तर कधीही स्वागतार्हच असेल...

१. इलेक्ट्रिक स्क्रू ड्रायव्हर = विमचा ~ विद्युत मळसूत्र चालक २. हँड स्क्रू ड्रायव्हर = हामचा ~ हाताने वापरायचा मळसूत्र चालक ३. Printed Circuit Board(pcb) = छापटी ~ छापील परिपथ पट्टी ४. Monitor = चित्रक ~ चित्र दाखवणारा ५. USB = जुतार ~ अन्य साधनांची संगणकाशी जुळवणी करायला मदत करणारी तार

हार्दिक , ओतार , विदार वगैरे नवीन शब्द रुढ करणे ही नंतरची पायरी असावी असे मला वाटते. टू स्टार्ट विथ ज्या इंग्लिश शब्दांना मराठीत ऑलरेडी शब्द आहे निदान ते तरी रुटीन कॉनव्हर्सेशनमध्ये रेग्युलरली युज करुयात..व्हाट यू से ? ओह.. माफ करा. असो. असो , मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळालंच असेल तर आता आपण या उपक्रमाला सुरुवात करुयात का ? मिपावरील इतर धाग्यांवरही मूळ लेख , प्रतिसाद यांत विनाकारण आलेल्या इंग्लिश शब्दांना जमेल तशी'भाषादुरुस्ती" सुचवूयात. काय म्हणणे आहे ? इंग्लिश शब्दांप्रमाणेच 'लोक्स' , वीकांत अशा शब्दही टाळता येतील का ? वीकांत ऐवजी साप्ताहिक सूटी/सूट्या हा आधीच प्रचलित असलेला शब्दप्रयोग करता येईल. लोक्सची तर अजिबातच गरज नाही.

एडव्हान्स सूचना आम्ही नूतन शब्द निर्मिती प्रेमी पाठीराखे आणि कट्टर मराठी प्रेमी असलो तरीही ज्या धागा / प्रतिसादम्मध्ये / व्यनि / खरडीतून आम्ही स्वतःहून पृच्छा केलेली नाही तो पर्यंत सूचवण्या देऊ नयेत फाट्यावर मारल्या जातील .

ज्या धागा / प्रतिसादम्मध्ये / व्यनि / खरडीतून आम्ही स्वतःहून पृच्छा केलेली नाही तो पर्यंत सूचवण्या देऊ नयेत फाट्यावर मारल्या जातील
मग मराठी प्रेम आणि मराठीचा आग्रह या (किंवा अशा) एकाच धाग्यापुरता मर्यादित ठेवायचा आहे का ?

In reply to by मराठी कथालेखक

दीर्घ उत्तराचा विषय आहे, ते काळाच्या ओघात वेगळ्या धागा लेखाच्या माध्यमातून मांडेन. तुर्तास थोडक्यात, मी सोशल अ‍ॅडव्होकसीचा पक्षधर नाही सोशल मार्केटींगचा पक्षधर आहे. मलाही नकळत नवे शब्द माझ्या वापरात कुणी आणू शकत असेल तर माझी ना नाही, वस्तुतः त्यालाच नैसर्गीक रुळणे म्हणवले जाऊ शकेल -त्यासाठी डोक्यात न जाणारे मार्केटींग जमावयास हवे. ( या विषयात कृत्रिमतेचे अपयश -विशेषतः कृत्रिम आग्रहाचे अपयश- नवे नाही हे वे.सा.न.ल.)

In reply to by माहितगार

मला वाटतं मिसळपावसारख्या संस्थळावर अशा प्रकारची सूचना (ज्याला तुम्ही कृत्रीम आग्रह म्हणत आहात) केली गेली तर ती अस्थानी वाटू नये. झालंच तर अशा मैत्रीपुर्ण सूचने वा आग्रहाशिवाय चांगले बदल सहसा लवकर घडून येत नाहीत (याउलट वाईट/विचित्र गोष्टी सहसा लवकर ,सहज आणि कोणत्याही जाहिरातबाजीशिवाय पसरतात. उदा: 'लोक्स', 'वीकांत' ) आणि एखाद्या अगंतुक सूचनेला किती गांभीर्याने घ्यायचे (अथवा साफ दुर्लक्ष करायचे) ह्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहेच.

In reply to by मराठी कथालेखक

मत ज्याचे त्याचे, पण व्यक्तीशः न विचारता केलेले आग्रह बहुतांश वेळेस अस्थानी आणि अस्विकार्ह वाटत आले आहेत. नंतरचे गैरसमज नको म्हणूनच मी माझ्यापुरती भुमिका आधीच स्पश्ट ठेवत आलो आहे. पर्यायी मराठी शब्द शोधण्यासाठी माझ्या कडे ऑनलाईन डिक्शनरींची मोठी यादी आहे त्यातील सुयोग्य शब्दकोश मी बर्‍यापैकी सातत्याने वापरत असतो. आणि तरीही नैसर्गिकपणे अध्ये मध्ये येणारे परभाषिय शब्द थांबवत नाही. भाषा ही प्रवाही असते, अमुक एवढ्या वापरानंतर एखादा शब्द मराठी झाला किंवा मराठीत रुळला याचे नेमके गणित भाषाशास्त्री देताना दिसत नाहीत कारण तसे शक्यही नसते. प्रमाण भाषेची व्याख्या संकुचित आणि आदेशात्मक असुन चालत नाही त्याने भाषेचा मृत्यू ओढावण्याचा धोकाच अधिक असतो. मराठी सर्वनाम आणि क्रियापदे वापरते आनि भौगोलीक महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्रात बोलली जाते ती सर्व मराठी अशी माझी मराठीची व्यापक व्याख्या असते. माझ्या मराठीच्या व्याख्येत मराठीच्या सर्व बोली आणि त्यांच्या सरमिसळीचा समावेश असतो. इतर अनेक भाषांशी भाषिक देवाणघेवाण अनेक कारणांनी होते अशा प्रत्येक प्रकारच्या देवाण घेवाणीतून नवी बोली जन्माला येत असते. ती माझ्या भाषेची बोली म्हणून स्विकारणे मला भाग असते. माझ्या प्रदेशाची एकचतुर्थांश मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेतअ, त्यांची म्हणून एक स्वतंत्र बोलीही तयार होणार आहे हे कितीही कटू वाटले तरी सत्य मला स्विकारावे लागते. जेव्हा केव्हा ते बघू इच्छितील तेव्हा त्यांच्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधीक मराठी शब्द उपलब्ध करणे हा एक नव्या काळातला उपाय आहे. हि उपलब्धता ऑनलाईन शब्दकोश आणि ऑनलाईन भाषांतर सुविधाच्या माध्यमातून दिली जाऊ शकते. इतर वेळी जिथे जिथे मराठी शब्द वापरले आहेत त्यांच्या पर्यायी शब्दाम्ची यादी लेखाखाली दुव्यातून उपलब्ध ठेवणे असे उपाय असू शकतील किंवा मनोरंजन आणि रंजक पणे मराठी शब्द रुळवता येतील. किंवा मिपा सॉफटवेअर अपडेटच्या माध्यमातून सॉफ्टवेअर मला पर्यायी शब्द सुचवू शकत असेल तर नको आहे असे नाही. किंवा मिपा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आठवड्यातून दोनचार रॅम्डम सजेशन दिली तरी चालू शकतील. न मागितलेले स्पॅमिंग नकरता हुशारीने सुयोय वेळी सुयोग्य पर्याय उपलब्ध ठेवण्याचे अनेक मार्ग असू शकतात. पण कुणितरी सारखे सारखे टोकणे नकोसे होते हे प्रांजळपणे सांगावेसे वाटते. माझ्या लेखनाच्या अथवा विचार प्रक्रीयेत मला स्पॅम ईमेलसारखे मध्येमध्ये डोकावणारे मी स्वतः न मागितलेले अडथळे नकोसेच असतात. पुढे कधितरी अधिक सविस्तर पणे लिहिन मनमोकळ्या चर्चेसाठी अनेक आभार

In reply to by माहितगार

पण कुणितरी सारखे सारखे टोकणे नकोसे होते हे प्रांजळपणे सांगावेसे वाटते.
मराठी शब्दांचा वापर सुचवणे हे टोकणे वाटत असेल तर काय म्हणणार !!
माझ्या लेखनाच्या अथवा विचार प्रक्रीयेत मला स्पॅम ईमेलसारखे मध्येमध्ये डोकावणारे मी स्वतः न मागितलेले अडथळे नकोसेच असतात.
एकूणातच धाग्यावर येणार्‍या प्रतिसादांवर कुणाचे नियंत्रण नसतेच. पण प्रत्येकाचे स्वातंत्र्य आणि ज्याची त्याची इच्छा. असो. बाकी
१) रॅम्डम सजेशन
साठी धूनमधून सूचना आणि २) डिक्शनरींकरीता शब्दकोष हे शब्द सुचवण्याचे मी माझे स्वातंत्र्य उपभोगतो :) धन्यवाद

उपयोजकांच्या यादी वाचली त्यातील periodic table म्हणजे अनुक्रमणिका हे तर माझ्या वाचण्यात कधीच आलं नाही. content म्हणजे अनुक्रमणिका ना ? periodic table ला बहुदा आवर्त-सारणी म्हणतात. इतके पर्यायी मराठी शब्द शोधणं (इंग्रजी शब्दांना तसे त्या तसे accept करता त्यावर कल्हई करणं, कुछ जमा नाही ) आणि वापरणं काहीसं अतिरेकी वाटत. त्यामुळे भाषेच्या flowमधे (प्रवाही राहणं ) अडथळा येण्याचीही शक्यता आहे. ज्याला हवं त्यांनी करावं पण सर्वांसाठी ते must नसावं

In reply to by उपयोजक

मी खरंच व्यवस्थित पहिले नसावं तोही शब्द मला माझ्या अभ्यासक्रमात गेला नाही. माझं मराठीबद्दलचं अज्ञानच असावं. पण खरे डोळे तर तुमच्या प्रतिसादानेच उघडले हो. लोकांनी भाषेबरोबर किंवा त्याआधी मार्दवपण (politeness) शिकायला हवे हे परत जाणवले. असो.

१) “ संघमित्रा संध्याकाळी रोजच्यापेक्षा उशिरा दमून भागून कार्यालयातून घरी आली. खांद्यावरचे पोते काढून कोनाड्यात ठेवले आणि कर्णपिशाच्च किणकिणले. तातडीने काही अहवाल जलदपत्राद्वारे त्यांना पाठवण्याचा आदेश असलेला साहेबांचा संदेश आला होता. दिवसभर कार्यालयात मान मोडेपर्यंत काम केल्यानंतर खरंतर स्वतः पुरती कॉफी करून घेण्याचे त्राणही तिच्यात उरले नव्हते. पण कामाप्रती असलेल्या तिच्या श्रद्धेमुळे तिने मंडळाने दिलेला मांडीवरचा संगणक तिच्या कार्यालयात नेण्याच्या पोत्यातून बाहेर काढून उघडला आणि कळ दाबून सुरु केला. खिडक्यांच्या कार्यपट्टीवर विद्युतघटाची भार पातळी कमी असल्याचा संदेश पडद्यावर दिसत होता. म्हणून तिने पोत्यातून मांडीवरच्या संगणकाचा भारक काढून त्याच्या एका टोकाची त्रिकांडी भिंतीवरच्या विद्युतपुरवठा करणाऱ्या फलकावरच्या खोबणीला जोडून दुसऱ्या टोकाची कांडी मांडीवरच्या संगणकाच्या खोबणीशी जोडली आणि बिनतारी जोडणीसाठी उपलब्धता दर्शवणाऱ्या यादीतून तिच्या घरच्या मार्गकाचा सेवा संच अभिज्ञापक निवडून आंतरजालाशी संपर्क प्रस्थापित केला. जसा आंतरजालाशी संपर्क प्रस्थापित झाला तशी लगेच रोगजंतू प्रतिरोधक प्रणाली अद्ययावत होण्यास सुरवात झाली........” २) “ रामू सुतार काल-परवा पर्यंत हामचा वापरात होता, पण शहरात शिकत असलेल्या त्याच्या मुलाने उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी परतताना त्याच्यासाठी विमचा आणला होता. विमचाने काम करताना हामचा पेक्षा कमी वेळ आणि कष्ट लागत असल्याने रामू खुश होता.....” अशाप्रकारचा मजकूर असलेला लेख, कथा, कादंबरी लिहिणारा थोडे जास्तीचे कष्ट घेऊन लिहील, पण नवीन वाचक या शब्दांचे अर्थ एकीकडे नवीन शब्दकोश बघून समजून घेत घेत पुढचा मजकूर वाचण्याचे कष्ट घेईल का? एवढा द्रविडी-प्राणायाम करण्यापेक्षा तो अशा लिखाणाकडे मग त्यातला आशय कितीही चांगला असला तरी पाठ फिरवण्याचीच शक्यता अधिक वाटते. त्यामुळे अशा प्रकारचे लिखाण हे मास बेस्ड न राहता क्लास बेस्ड होण्याचीही शक्यता अधिक. जाणकार यावर अधिक प्रकाश टाकतीलच. उपक्रमास शुभेच्छा.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

:)

In reply to by रंगीला रतन

+१००१ सहमत, मला जे माझ्या प्रतिसादातून एक्सप्लेन करणे नीटसे जमले नाही ते आपण चपखलपणे केलेत. अनेक आभार.

In reply to by रंगीला रतन

तुम्ही धाग्यावरचे याआधीचे सर्व प्रतिसाद वाचले नसावेत असं वाटतंय. नवीन शब्द सुचवताना हे खाली दिलेले निकष वापरावेत असं लिहिलंय की हो! १) उच्चारायला सोपा+सुगम असा शब्द बनवता येतो का हे प्रयत्न करुन तर पाहूयात. नाहीच जमलं तर, २) इंग्लिश शब्दाचे मराठीकरण करु. ३) नवीन शब्दात जास्तीतजास्त ४ अक्षरे असावीत. ४) एकच अखंड शब्द असावा.शब्दांचे दोन गट नकोत. मराठी शब्द म्हणजे बोजड,लांबलचक असेच असणार हा पूर्वग्रहच तर बदलायचाय.लांबीला कमी असणारे शब्द बनवण्यासाठी प्रयत्न करायचेत. हे तुम्ही समजूनच घेतलं नाहीत.त्यामुळेच तुम्ही पहिल्या उतार्‍यात वापरलेले खांद्यावरचे पोते , कर्णपिशाच्च किणकिणले , मांडीवरचा संगणक, खिडक्यांच्या कार्यपट्टीवर विद्युतघटाची भार पातळी, रोगजंतू प्रतिरोधक प्रणाली असे लांबूडके शब्द वापरलेत.जे लक्षात ठेवायला अवघड आहेत.हे नवीन शब्द सुचवणारे लोक असेच डोकं भंजाळणारे शब्द बनवणार आहेत या पूर्वग्रहातून हा पहिला उतारा लिहिला असावा की काय असे वाटून जाते. पण दुसरा उतारा पहा(रामूचा) त्यात तुम्ही वर सुचवलेले नवे शब्द वापरलेत.त्यामुळे मजकूराची लांबी कमी झाली हा फायदाच झालाय.वर त्याचे अर्थही दिलेत.नव्या वाचकाला तेवढे अर्थ सांगितले की तो ही प्रश्न निकालात निघेल.त्यावरचा उपाय पुढे देतो आहे. दुसरं असं की इंग्रजीत लिहिलेला मजकूर असलेला लेख, कथा, कादंबरी वाचणारा वाचक त्याला माहीत नसलेले शब्द वाचनात आले तर त्या शब्दांचे अर्थ शब्दकोशात बघून समजून घेत घेत पुढचा मजकूर वाचण्याचे कष्ट घेतो ना? की कशाला एवढा द्रविडी-प्राणायाम असं म्हणून तो अशा लिखाणाकडे मग त्यातला आशय कितीही चांगला असला तरी पाठ फिरवतो? अशा प्रकारचे इंग्रजी भाषेतले लिखाण हे मास बेस्ड न राहता क्लास बेस्ड होते का? की इंग्रजी पैसा ही मिळवून देणारी,जागतिक दर्जाची भाषा,ती जितकी चांगली बोलता येईल तितका पैसा जास्त म्हणून हा शब्दकोशात अर्थ पाहण्याचा त्रास सोसला जातो? आणि मराठी काही इंग्रजी एवढा पैसा मिळवून द्यायला उपयोगाची नाही म्हणून मराठीसाठी एवढी तसदी घेण्याची गरज नाही. असं काही आहे का? तसं असेल तर मराठीबद्दलचा हा नकारात्मक विचार,अौदासीन्य मराठीचं नुकसान करणारंच म्हणावं लागेल. आता तुमच्या या समस्येवरचा उपाय नवे शब्द रुळेपर्यंत या नव्या शब्दाशेजारीच कंसात याअाधी मराठीत वापरात असलेला शब्द लिहायचा; म्हणजे शब्दकोश शोधणे,ते विशिष्ट पान शोधणे यात वेळ जाणार नाही.नंतर जसजसे हे शब्द रुळत जातील तसतसे कंसात आधी वापरात असलेले शब्द लिहिण्याची गरज पडणार नाही. मिपावरचे कृहघ्याहेवेसांनल,हाकानाका,विदा,खखोदेजा,बशिवला टेंपोत,कायप्पा,तू नळी या शब्दांचे अर्थ काही नवीन मिपासदस्यांनाही माहित नसण्याची शक्यता आहे.मग असे मिपाप्रेमी या शब्दांचे अर्थ कळत नाहीत म्हणून मिपाच वाचायचं सोडून देतात का? फक्त इच्छा हवी.मार्ग मिळतोच.अौदासीन्य नको असे वाटते.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

जराशी गम्मत केली हो ! तसं केशविभाजन (हेअर स्प्लिटिंग) करायचं म्हटलं तर "चहा" या शब्दालाही प्रतिशब्द शोधावा लागेल. खूप काळ वापरात असल्याने आपला (आणि 'आपला आपलासा'ही) वाटणारा हा शब्द, मूळच्या चीनी असलेल्या चहाबरोबर त्याच्या "चा (茶, Chá)" या मूळ चिनी नावाबरोबर भारतात आला आहे. :)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

ज्ञानोबाचे पैजार, माझ्या मते कॉफीस कवा हा प्रतिशब्द आहे. हा अरबी पेय कहावा वरून आला असावा. मात्र वापरला जातो कॉफीसाठी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कॉफी मूळची इथिओपिया, सुदान व मादागास्करमधली. वसाहतवादी युरोपियनांनी तिचा इतर ठिकाणी प्रसार केला... सद्या सुमारे ७० देशांत तिचे उत्पादन केले जाते. इथिओपियातिल काफ्फा (Kaffa) विभागावरून तिचे नाव पडले असावे असे म्हणतात. सर्वप्रथम तिचा ऑटोमान (तुर्कस्तान) साम्राज्यात कहवा (قهوة) या नावाने प्रसार झाला. अरबीतले काहवा हे तिचे नाव तेथूनच आले आहे. डच व्यापार्‍यांनी तिला कोफ्फी (koffie) या नावाने उचलले आणि तिचा जगप्रवास सुरू झाला. इंग्रजानी आपल्या भाषेत घेताना तिचे कॉफी (coffee) असे नामकरण केले. मराठीत कॉफीला कवा असे म्हणतात हे माहीत नव्हते. अरबी-फारसीतून मराठीत येताना "काहवा"चा "कवा" असा अपभ्रंश झाला असावा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉक्टर सुहास म्हात्रे, कहवा वरून कवा आला असावा असा माझाही अंदाज आहे. हा शब्द तरखडकरांच्या इंग्रजी शब्दकोशात वाचल्याचं स्मरतं. नक्की कुठला शब्दकोश ते आठवंत नाही. त्यात कॉफीच्या दाण्यांना बुंदकवा असाही प्रतिशब्द दिल्याचंही आठवतं. आ.न., -गा.पै.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अर्रर्रर्र तिच्या...हो कि. उत्तेजक काढा करून प्यायला असं काहीतरी पाहिजे होत :)

प्रत्येक इंग्लिश शब्दाला अगदी एकच मराठी शब्द असायला हवा असे काही नाही. जर एका शब्दातून नेमका अर्थ व्यक्त करणे कठीण असेल तर ओढून ताणून लांबलचक शब्द न देता योग्य असा शब्दसमूह वापरता येईल. एका भाषेत एका शब्दात जे सांगता येते ते दुसर्‍या भाषेत एकाच शब्दात सांगता येईल असे नाही. जसे मराठीतील मामा साठी इंग्लिशमध्ये Maternal uncle असे दोन शब्द लागतात. कैरी या शब्दासाठी तर बहूधा दुसर्‍या कोणत्याच भाषेत 'एक' शब्द नसावा. बाकी स्क्रू साठी मळसूत्र हा शब्द कसा आला ? तो आधीच प्रचलित आहे का ? तसे नसल्यास मला दुसरा शब्द सुचवायला आवडेल.

In reply to by मराठी कथालेखक

मळसूत्र हा आधीच प्रचलित आहे असे दिसते. मग screw driver साठी मळसूत्र चालक ही रचना थोडी लांबलचक वाटते त्या ऐवजी मळसूत्रक कसे वाटेल ?

In reply to by मराठी कथालेखक

विजेवर चालणारा असेल तर विद्युत मळसूत्रचालक आणि हाताने वापरायचा असेल तर हाताचा मळसूत्रचालक होईल ना ते? केवढं लांबलचक.त्यापेक्षा हामचा,विमचा अधिक चांगलं.छोटंसं!

In reply to by उपयोजक

वीजेवर चालणारा विद्युत मळसूत्रक आणि हाताने वापरायचा असेल तर साधा /हाताचा मळसूत्रक असे होवू शकेल. हे मोठे वाटत असले तरी सुटसुटीत दोन शब्द आहेत. शिवाय मळसूत्र या आधीच काहीशा माहित असलेल्या शब्दाचा त्यांत उपयोग असल्याने जास्त योग्य वाटतो. पण मुळात मळसूत्र या शब्दाचा वापर वाढणे गरजेचे आहे , नाही का ?

सर्व प्रतिसाद वाचले. कोणा एका प्रतिसादावरून नव्हे तर एकूण निरीक्षण असं झालं: परभाषेतल्या रूढ शब्दांचा एकवेळ अपभ्रंश करू, मराठीत पाडलेला किंवा असलेला शब्द लांब आणि क्लिष्ट असल्यास त्याचे एकवेळ पूर्ण अर्थहीन भासणारे शॉर्टफॉर्म करू, मूळ परभाषेतल्या शब्दाच्या उच्चाराशी साम्य असलेला पण मराठीत अर्थ नसला तरी चालेल असा शब्द बनवू, हे सर्व पसरवू, रूढ करू.. हे सर्व मूळ मराठीत नसलेलं आलं तरी चालेल. ते उच्चाराबाबतीत मूळ परभाषीय शब्दाशी साम्य असलेलंही चालेल पण किंचित तरी काळी तीट लावून का होईना आम्ही थोडातरी दृश्य बदल करणार. तरच तो मराठी शब्द. तसे शब्द चालतील.. पण तो नतद्रष्ट परभाषेतला मूळ शब्द नको. भले तो तोंडात बसलेला का असेना. तो अन-लर्न करू. यात मला मराठीप्रेमापेक्षा परभाषातिरस्कार किंवा परभाषा अस्पृश्यता जास्त दिसते आहे.

In reply to by प्रचेतस

काय हे.. मी तीन चार जणांना मला समर्थन देण्यासाठी विनंती केली होती. एकाचाच रिप्लाय यावा? कंपूबाजी सक्स. :-)

In reply to by गवि

पण तो नतद्रष्ट परभाषेतला मूळ शब्द नको. भले तो तोंडात बसलेला का असेना. पण मी म्हणतो एवढे भारंभार परके शब्द स्वीकारायचा मक्ता मराठीनं कशाला घ्यावा? अहो नवीन मराठी शब्द ही रुळतील की,तोंडात बसतील की.हाकानाका.

In reply to by उपयोजक

अहो मालक तंत्रज्ञान रोज बदलतंय, कालचं आज कालबाह्य होतंय. त्यासाठी आमच एवढच म्हणणे आहे कि तांत्रिक किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित शब्द यातून वगळा. उपक्रम चांगलं आहे पण तो सुरवातीला static शब्दांसाठीच मर्यादित राहणे चांगले, नाहीतर एवढेवेळा शब्दकोश अद्ययावत करणे जिकीरीचे होऊन जाईल.

In reply to by रंगीला रतन

तंत्रज्ञान बदलू द्या दिवसाला.काही अडचण येणार नाही.फक्त ते मराठीबद्दलचं अौदासीन्य नको.ते नसलं की सगळं जमेल.शिवाय लगेच शब्दकोश बनवायला बसायचं नाहीचयं.शब्द वापरात आणणं महत्वाचं.मग शब्दकोश बनो की न बनो.

In reply to by गवि

आत्ताच सर्व प्रतिसाद वाचले. आपल्या प्रतिसादाशी सहमत आहे. आपली मतं नेहमीच वेगळी, रोचक आणि बुद्धीला चालना देणारी असतात. पण आता पेनड्राइव्हला मराठी शब्द कसा तयार करावा ? काही कल्पना, खेळ करूयात का काही इंग्रजी शब्दांचे ? ''लहानविदासाठवणजोडणीपेटी'' असा शब्द तयार करावा, जेणेकरून त्यात काय अर्थ दडला आहे, त्याचा बोध व्हावा असे वाटते. -दिलीप बिरुटे

सामान्यत: कोणत्याही उत्पादनासोबत येणारी माहिती पुस्तिका (युजर मॅन्युअल) फक्त इंग्लिशमध्ये असते. मला प्रश्न पडतो या कंपन्यांना आपले उप्तादन फक्त इंग्लिश येणार्‍या ग्राहकांनाच विकायचे आहे काय ? की इग्लिश न येणार्‍याबाबत "बघतील ते त्यांचं.." अशी उत्पादकाची बेफिकीर वृत्ती असते ? अगदी स्वस्त अशा मिक्सर पासून टिव्ही, फ्रीज, वॉशिंगमशीन ते कार पर्यंत सगळ्याच उत्पादन व उत्पादकांची हीच कथा (अपवाद वगळून). फार काय अनेकदा एखाद्या पाककृतीत वापरला जाणार्‍या वा पुर्ण पाककृतीच ज्यावर बेतलेली आहे अशा एखाद्या पदार्थाच्या वेष्टनावर पाककृती लिहिलेली असते ती केवळ इंग्लिशमधूनच ..म्हणजे इंग्लिश न येणार्‍यांनी असा पदार्थ घेवू नये !! अगदी अस्सल देशी म्हणवणार्‍या कंपन्याही बहुसंख्येनं हेच करताना दिसतात. ग्राहक संरक्षण कायद्यात सुधारणा करुन इंग्लिशसोबतच स्थानिक भाषेतील पुस्तिका , सुचना देणे बंधनकारक केले पाहिजे.