मन धावे....... मन धावे......
पालवी नवी अंगावरती ओलावे...
ओठात नवे जीवनगाणे..
वाटे गावे...
मन धावे...
मोकळ्या दिशा
आकाश कडेवरती,.. वाकुन बोलावे
ओणवे मेघ मल्हार कधी
अमृत घन पान्हावे...
साकेत अंगणी पुष्करिणीसह
दान पसा पावे...
मन धावे...
साधार कल्पना
स्वप्न अकल्पित दावे...
जे काय हवे ते
हृदयी भावे.....
संकेत संगमी,
रंजन संगर भुलवे...
मन धावे...... मन धावे.....
.....................अज्ञात
पाचोळा माझाच पेटला
झळा लागुनी दग्ध विशाखा
अंगावर जळली पाने पण
आत अबाधित बहर अनोखा
ना सूडाचा लेश तसूही
ना रिपुकांचा जंगम विळखा
डाव मांडला ऋतुचक्राचा
ना कोणी मज आपला परका
कुणी न माझा असो तरीही
"मी" माझ्यातिल उत्कट झोका
पवनाचे हुंकार झेलतो
जरी कधी असतो तो धोका
.........................अज्ञात
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.
या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.
(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)
(ज्याच्या कडे बर्यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.
तू असताना चंद्रचांदणे
तू नसताना खिन्न स्फुंदणे
तू असताना श्वास हवेसे
तू नसताना फक्त उसासे
तू असताना मधुर कहाणी
तू नसताना फक्त विराणी
तू असताना मंगल प्रभात
तू नसताना काजळ रात
तू असताना सुरेल सनई
तू नसताना फक्त जांभई
तू असताना जग हे हसते
तू नसताना सगळे फसते !
.
शुष्क दिसे, पोटी पण पाणी,
हृदयी एक कहाणी,
बीजे अगणित दडलेली,..
पाहिली कधी का कोणी ?
श्वासात उसासे जडलेले
आतूर सदा आणीबाणी
छाया मेघांची कुंद जशी
ओठी थिजलेली वाणी ?
सर सर सर शिरवा शिडकावा
काहुरते एक विरह राणी
हुरहुरते सुप्त, डंवरते मन
अंकुरते व्याकुळ धरणी
....................अज्ञात