✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जल्लोष (निवडणूक निकाल स्पेशल)

आ
आजी यांनी
Mon, 06/03/2024 - 14:00  ·  लेख
लेख
निवडणूक मग ती विधानसभेची असो की लोकसभेची, मी खूप उत्सुक, उत्साही आणि अधीर होते. मतदानाचा दिनांक जाहीर होतो आणि तो माझ्या पक्का लक्षात राहतो. ती तारीख जवळ येत चालली की माझा उतावीळपणा वाढत जातो. "आपली नावं आहेत ना मतदारयादीत? चेक करा. तुम्ही खात्री करून घेतली आहे ना? मतदान केंद्र नेहमीचंच ना? सकाळी लवकर जावून मतदान करुन येऊया हं! उशीर नको. आपला पहिला नंबर हवा. पहिला चहा, ब्रेकफास्ट मतदानानंतर करायचा." .. अशी कटकट मी घरच्यांच्या कानाशी सुरु करते आणि तेही होकार देऊन देऊन बेजार होतात. एकदाचं नवसाचं ते मतदान झालं की मी माझी डाव्या हाताची मतदानाची निशाणी असलेली तर्जनी उत्साहानं ग्रुपवर टाकते. आनंदानं,समाधानानं स्वतःशीच हसते. निवडणुकीच्या निकालाच्या तारखेची तर मी चातकापेक्षा जास्त आतुरतेने वाट पाहत असते. मतदानाच्या सहा,सहा,सात,सात फेऱ्या वाट पाहताना माझ्या ताटकळण्याचा अंत होतो. त्यानंतर एक्झिट पोल. त्यात कोणाला किती सीट मिळणार याचे तर्क वितर्क. शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत निघत नाही अशी अवस्था. मग एकदाची मतदानाच्या निकालाची तारीख उजाडते. त्याच्या आदल्या रात्री मला आनंदानं आणि उत्सुकतेनं झोप लागत नाही. (शाळेत असताना उद्या ट्रीपला जायचं असेल तर आदल्या रात्री आनंदानं झोप लागत नाही ना, तसं.) निवडणूक निकालाच्या तारखेला मी भल्या पहाटे उठते. (झोपतेच कुठं म्हणा.)तर मी भल्या पहाटे,ब्राह्म मुहूर्तावर अभ्यंग स्नान करते. मग धूतवस्त्र परिधान करते. भालप्रदेशावर केशराचा टिळा लावते.. नको नको.. अंगारा लावते, किंवा अष्टगंध म्हणूया. संकटनाशनं स्तोत्र म्हणते. मग माझ्या खोलीत माझ्या आवडत्या कोचावर मांडी घालून बसते,ती दिवसभर. (फक्त बाथरूम आदि कामांसाठी वगळता. बाकी जेवण, चहा पाणी जागेवर.) दिवसभर डोळ्यांची पापणीही न लववता टीव्हीवर निकाल बघते. माझ्या आवडत्या पक्षाचे यशाचे आकडे चढताना दिसले तर माझे हृदय आनंदाने छातीच्या पिंजऱ्याबाहेर येऊ पाहते. मग आमचे म्हणजे आमच्या राजकारणप्रेमी ग्रुपचे,(यात मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आणि घरातले लोक ,असे सगळे आले.) तर आमचे एकमेकांना फोन सुरू होतात. सगळे जण आनंदाने किंचाळत, फोनवर "ओ ला ला" , याsssहू असे चीत्कार करत असतात. मग आम्हांला एक्झिट पोल चे निकाल आठवतात. "अरे/अगं एक्झिट पोल मध्ये एवढा मोठ्ठा आकडा सांगितला नव्हता रे/गं.." असं आम्ही एकमेकांना म्हणतो. मग आमच्यातलाच एक "बुद्धिमान"आम्हांला समजावतो. "हा एक्झिट पोल नसून "एक्झॅक्ट"पोल आहे. हे दिसतंय ते सत्य आहे."दुसरा "बुद्धिमान"म्हणतो", एक्झिट पोलही मॅनेज केलेले असतात. मिडियाही विकला गेलाय." ही विधानं आपण नेहमी ऐकतो. खरे खोटे ब्रह्मराक्षस जाणे. निकाल जाहीर होत असताना आपले लाडके उमेदवार निवडून आलेत ना इकडं माझं काटेकोरपणे लक्ष असतं. ते निवडून आले की आम्ही सगळे आनंदित होतो. आमच्यापैकी कुणीही"पित"नाही. ("ओढतही "नाही) पण सिनियर सिटिझन मित्र मंडळींत उगाचच "आज रात्री शॅंपेन पार्टी करायची" असं आम्ही किंचाळतो. टीव्हीवरही उमेदवारांच्या आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, चाहत्यांचा गुलाल उधळत, नाचत जल्लोष चालू असतो. मला तो जल्लोष ,तो ओसंडून वाहणारा उत्साह बघून आपणही नाचावं असं वाटतं. निवडणुकीला लोकशाहीचा उत्सव म्हणतात ते उगीच नाही. मीही वय विसरून जमेल तितपत नाचते, आनंदानं चित्कारत स्वतःभोवती गिरक्या घेते. घरच्यांना मिठ्या मारते. अर्थात आपल्या मनातला पक्ष निवडून आला तरच. नाहीतर तोंडे उतरलेली आणि एकमेकांचे सांत्वन, सुन्न मौन अवस्था वगैरे. तर सर्व जागांचे निकाल आले आणि माझं आवडतं सरकार बहुमताने आले की मी शेळीचं आय मीन गोमातेचं (A1 किंवा A2 जे असेल ते) पिशवीतून येणारं दूध पिऊन दिवसभराचा धिंगाणा थांबवते, आणि माझा उपास सोडते. (बरीच वर्षे झाली शेळीचे दूध आउटडेटेड झाल्याला.) माझा हा फसफसून येणारा उत्साह बघून माझी शेजारीण म्हणते,"इश्य, इतकं काय त्याच्यात? दुसऱ्या दिवशी पेपरात कळतं की कोण जिंकलं ते! मी माझं कामधाम आटपलं की दुपारी चार वाजता पेपरवर नजर टाकते." मी विचारलं,"मतदान करायला गेला होतात का?" ती म्हणाली, "नाही ग, माझ्या वन्सं आणि त्यांचे मिस्टर त्याच दिवशी आमच्या घरी जेवायला आले. सुट्टी होती ना! मग मतदान राहिलंच." मी तिला मनोमन साष्टांग दंडवत घातला. ही बया भारत पाकिस्तान क्रिकेटची मॅचही लाइव्ह न बघता, दुसऱ्या दिवशी पेपरात कोण जिंकलं बघत असेल. बघूया मग उद्या निकाल! यावर एक "द्या टाळी" तो बनती हैं यार.."
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
7561 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

कुणाला तरी बहुमत असावं एवढीच

कंजूस
Mon, 06/03/2024 - 14:13 नवीन
कुणाला तरी बहुमत असावं एवढीच उत्सुकता असते.अपक्ष किंवा छोट्या जिंकलेल्यांची मोठ्यांकडून रस्सीखेच आणि कायम तणाव नको.
  • Log in or register to post comments

पण इतकं सुद्धा बहुमत नको की

अहिरावण
Mon, 06/03/2024 - 14:31 नवीन
पण इतकं सुद्धा बहुमत नको की साथीला आलेल्या अपक्ष आणि छोट्या पक्षांना फाट्यावर मारलं जावं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अगदी माझ्यासारखंच आहे तुमचं

श्वेता व्यास
Mon, 06/03/2024 - 15:10 नवीन
अगदी माझ्यासारखंच आहे तुमचं आजी :D मला वाटलं होतं की राजकारण, राजकारणी, फार कशाला आपल्या मतदारसंघातील उमेदवार या कोणाशीही काहीही संबंध नसताना उगीच लष्कराच्या भाकरी भाजण्याचा उत्साह फक्त मलाच आहे, किंवा तुम्ही हे उपहासाने लिहिलं असेल तर कल्पना नाही :)
  • Log in or register to post comments

छान खुसखुशीत लिहिलंय.

Bhakti
Mon, 06/03/2024 - 15:26 नवीन
छान खुसखुशीत लिहिलंय.
  • Log in or register to post comments

मस्त लिहीले आहे. इश्य. . म्हणणार्‍या

चित्रगुप्त
Mon, 06/03/2024 - 15:56 नवीन
आजीचे लिखाण हे 'साध्याही विषयात आशय मोठा' आपल्या खुसखुशीत शैलीत समर्थपणे मांडण्याचे उत्तम उदाहरण असते. " इश्य " म्हणणार्‍या काही बायका अजून जगात शिल्लक आहेत हे वाचून ड्वाळे पाणावले आणि गतकाळातील 'इश्य' म्हणणार्‍या काही मोहक तरुणी आठवल्या. -- (गेले ते दिवस)
  • Log in or register to post comments

(गेले ते दिवस) >>> अगदी अगदी.

भागो
Mon, 06/03/2024 - 16:45 नवीन
(गेले ते दिवस) >>> अगदी अगदी. "अय्या" पण गेले. अय्या आणि इश्श्य ह्यांची जोडी होती. दिवस एकदा गेले कि परत नाही येत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

छान लेख!

अथांग आकाश
Mon, 06/03/2024 - 16:13 नवीन
"हा एक्झिट पोल नसून "एक्झॅक्ट"पोल आहे. हे दिसतंय ते सत्य आहे."दुसरा "बुद्धिमान"म्हणतो", एक्झिट पोलही मॅनेज केलेले असतात. मिडियाही विकला गेलाय." ही विधानं आपण नेहमी ऐकतो. खरे खोटे ब्रह्मराक्षस जाणे.
एका पाकिस्तानी च्यानलचा अँकर म्हणतोय एन डि ए ३५३ ते ४२९ जागा जिंकेल! तिकडचा मिडिया सुद्धा विकला गेलाय का काय :) खरे खोटे उद्या कळेलच!!
  • Log in or register to post comments

आम्ही कोण?

अनन्त्_यात्री
Mon, 06/03/2024 - 16:29 नवीन
https://www.misalpav.com/node/38918
  • Log in or register to post comments

उत्तम वर्णन. असाच उत्साह

गवि
Tue, 06/04/2024 - 07:28 नवीन
उत्तम वर्णन. असाच उत्साह सर्वत्र दिसतो आहे. आणि हल्ली जास्त वाढला आहे. चला, निवडणूक निकाल बघता बघता चर्चा करायला हाच धागा वापरावा हे बरे. किती वाजता सुरू होणार आहे मोजणी? कधीपर्यंत फायनल कळेल?
  • Log in or register to post comments

NDA आणि India आघाडी यातील गॅप

गवि
Tue, 06/04/2024 - 09:29 नवीन
NDA आणि India आघाडी यातील गॅप कमी कमी होत चालली. जनतेचा काय कौल आहे कळेना. पण हे अतिशय रोचक होत आहे. लोकशाहीची ताकद .. !!!
  • Log in or register to post comments

परत एकदा मोदी सरकार येतंय,

Vichar Manus
Tue, 06/04/2024 - 09:50 नवीन
परत एकदा मोदी सरकार येतंय, 300 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर.
  • Log in or register to post comments

२७५-२२५ असे दिसतेय. ४०० सोडा

गवि
Tue, 06/04/2024 - 10:05 नवीन
२७५-२२५ असे दिसतेय. ४०० सोडा, ३०० पार झाले तरी पुष्कळ. असे तूर्त चित्र. मोदी येतील मोस्टली. पण प्रचंड बहुमत? तूर्त काहीच कळत नाहीये.
  • Log in or register to post comments

#४००ठार...

Bhakti
Tue, 06/04/2024 - 10:56 नवीन
#४००ठार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

४०० पार हे तसंही शक्य नव्हतं

सोत्रि
Tue, 06/04/2024 - 11:03 नवीन
४०० पार हे तसंही शक्य नव्हतं हे मोदीशहांना पण माहिती होतं. निवडणूकीतलं स्लेजिंग होतं ते. पण भाजपाला बहुमत ही मिळणं कठीण दिसतंय सध्याच्या आकड्यांवरून, पण एकंदरीत भाजपा+ (एनडीए) सरकार बनवेल असं दिसतंय. - (स्थिर सरकारची अपेक्षा असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आयोध्या you too..

कर्नलतपस्वी
Tue, 06/04/2024 - 11:35 नवीन
Surprised.
  • Log in or register to post comments

अर्धवट मंदिर

हणमंतअण्णा शंक…
Tue, 06/04/2024 - 11:40 नवीन
१. स्थानिकांच्या जागा गेल्या असणार, किंवा त्यांना अपेक्षित विकास झालेला नसणार २. इतका प्रचंड संयम ठेवून, संघर्ष करून मंदिर झाले पण मोदींना वर्षभर थांबता आले नाही. इतक्या घिसाडघाईत प्राणप्रतिष्ठा करायला नको होती. सगळा राजकीय इवेंट केला मोदींनी. लोकभावना इतकी गृहीत धरू नयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

भारतीयांना हलक्यात घेणे बंद करावे

हणमंतअण्णा शंक…
Tue, 06/04/2024 - 11:36 नवीन
मोदींनी हा धडा जरी घेतला तरी पुरेसे. वाटेल ती नौटंकी खपवून घेणार नाहीत, तुम्हाला विकास करावा म्हणून निवडून दिले होते असा स्पष्ट इशारा लोकांनी भाजपला दिला आहे. महाराष्ट्रात जर भाजप ने राजकारणाचा चिखल केला नसता तर आज चित्र वेगळे असते.
  • Log in or register to post comments

सहमत. मोदीच येतील पुन्हा.

गवि
Tue, 06/04/2024 - 11:41 नवीन
सहमत. मोदीच येतील पुन्हा. पण अधिक जमिनीवर राहून भाजप राज्य करेल हा जनतेला फायदा. जनतेची लोकशाहीची ताकद अशी दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

+1

कर्नलतपस्वी
Tue, 06/04/2024 - 11:52 नवीन
गवई भौं बरोबर सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+1

कर्नलतपस्वी
Tue, 06/04/2024 - 11:55 नवीन
गवी भौं बरोबर सहमत. कदाचित २२६+२०+नितीश+ चंद्रबाबू बद्दल काय मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१

Bhakti
Tue, 06/04/2024 - 11:42 नवीन
महाराष्ट्रात जर भाजप ने राजकारणाचा चिखल केला नसता तर आज चित्र वेगळे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

तेच कारण ठरले असावे. उद्धव

गवि
Tue, 06/04/2024 - 11:52 नवीन
तेच कारण ठरले असावे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे लोकांचे पाठबळ टिकून राहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

#evmने घेतला दहा वर्षांनंतर

Bhakti
Tue, 06/04/2024 - 11:56 नवीन
#evmने घेतला दहा वर्षांनंतर मोकळा श्वास ;)
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 06/04/2024 - 17:25 नवीन
सकाळपासूनच वेफर्स,पॉप्कॉर्न खात टी.व्हि.पाहणे चालु होते. एकंदरित येणारे कल पाहता , मतदार भाजपाला हेच सांगू पाहतात की "अतिरेक करू नका. प्रत्येकवेळी ईतिहास खणून काढुन लोकांना पेटवायची गरज नाही. सारखे हिंदु-मुस्लिम करू नका. उठ्सूठ विरोधी नेत्याना जेल्मध्ये टाकू नका. तुमच्या नेत्यांची ऐषारामी राहणी आम्ही पाहत आहोत. तेव्हा अजून एक चान्स तुम्हाला देत आहोत."
  • Log in or register to post comments

नवनित

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 06/04/2024 - 17:51 नवीन
नवनित राणा हरल्या ते बरे झाले. ह्यांचे आचरट वर्तन डोक्यात जायचे. स्मृती ईराणी हरल्या तेही बरे झाले. संसदभवनात फक्त हातवारे करुन ओरडणे ही ह्यांची खासियत. उज्ज्वल निकम हरले तेही योग्यच झाले. वास्तविक भाजपाकडे चांगल्या नेत्यांची तशी कमी नव्हती. पण उमेद्वार निवडताना फक्त जिंकण्याची शक्यता आणि पैसा.. बाकी काहीच बघायचे नाही. ही अमित शहांची कथित चाणक्य नीती. ज्या राज्यांमध्ये फोडाफोडीचे राजकारण झाले नाही तेथे भाजपाचा बर्यापैकी विजय होताना दिसत आहे.
  • Log in or register to post comments

ध्रूवीकरण अंगाशी आले... आता

अहिरावण
Tue, 06/04/2024 - 19:22 नवीन
ध्रूवीकरण अंगाशी आले... आता बुलदोझर, जेसीबी रस्ते बनवायलाच वापरा.. घरं तोडायला नको.
  • Log in or register to post comments

बुलदोझर, जेसीबी रस्ते

सुक्या
Wed, 06/05/2024 - 10:01 नवीन
बुलदोझर, जेसीबी रस्ते बनवायलाच वापरा.. त्याची पण गरज नाही. धुर्व राठी बोललाच आहे .. काय गरज आहे हायवे ची.. काय गरज आहे विमानतळांची...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

अच्छा ! पण धृवराठीला तर

अहिरावण
Wed, 06/05/2024 - 10:05 नवीन
अच्छा ! पण धृवराठीला तर विमाने लागतात ना? तो काय छपरावरुन उडणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

असल्या डोक्याने चाला.

कर्नलतपस्वी
Wed, 06/05/2024 - 11:58 नवीन
ध्रुव राठी चे काम झाले. आता भेटेल पुढच्या निवडणुकीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

तोवर नवा राठी माठी गाठी साठी

अहिरावण
Wed, 06/05/2024 - 12:42 नवीन
तोवर नवा राठी माठी गाठी साठी नाठी येईल... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

हा हा हा

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 06/05/2024 - 14:29 नवीन
त्या आकाश बॅनर्जीने गेले काही महिने आकाश पाताळ एक करुन भाजपा विरोधात आघाडी उघडली होती. आमचे नव-बुद्धिवादी निखिल वागळे,असिम सरोदे,निरंजन टकले हेही भाजपाविरोधात प्रचार करत होते. खुद्द काँग्रेसवाल्यांचा जेवढा विरोध नव्हता तेवढा ह्या लोकांचा भाजपाला विरोध होता.!ह्यांची अवस्था एका डोळ्यात आनंदाश्रु आणि दुसर्या डोळ्यात दु:खाश्रु अशी झाली आहे. कारण पुढची ५ वर्षे भाजपाच सत्तेवर असणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

त्यांची अवस्था सहनही होत नाही

अहिरावण
Wed, 06/05/2024 - 14:30 नवीन
त्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली असावी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हे म्हणजे अवघड जागी...

कर्नलतपस्वी
Wed, 06/05/2024 - 15:20 नवीन
अवघड जागी दुखणं आणी जावई बापू वैद्य..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

नितीश पंलटू पंतप्रधान होऊ

अहिरावण
Tue, 06/04/2024 - 19:25 नवीन
नितीश पंलटू पंतप्रधान होऊ शकतात.... लोकशाही झिंदाबाद
  • Log in or register to post comments

या लेखाची पुष्कळ वाचने करून

आजी
गुरुवार, 06/13/2024 - 10:41 नवीन
या लेखाची पुष्कळ वाचने करून त्यावर अनेक प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे खूप आभार..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा