कॅम्पस प्लेसमेंट
मुद्दामहून कॉलेजच्या बोलीभाषेत लिहले आहे, इंग्रजाळलेल्या. काही जोडाक्षरे गंडताहेत.
--------------------------------------------------------------------------------------------
इंजिनीरींगचे सहावे सेमिस्टर आले ते प्लेसमेंटचे लेबल घेऊन. आतापर्यंत जेवढा घासून कुतून अभ्यास केला तो एन्कॅश करायची संधी. परत रट्टेबाजी चालू झाली. पण या आयटी कंपन्यांसाठी अॅटिटूड आणि अॅप्टिटूड फार महत्वाचा. स्वतःचा उगिच अॅटिटूड न दाखवणे हाच तो अॅटिटूड आणि अॅप्टिटूडसाठी आर.एस. अग्रवालची पारायणं, अशी तयारि चालू होती. पण या कंपन्या, तेथे पाहिजे आयटीचे, सिवील मेकॅनिकलचे ते काम नोहे असे म्हणत नाहित. त्यामुळे आणखीन टेन्शन (त्यावेळी).
पहिला १०-१२ कंपन्या यायच्या होत्या. टिपीओ ऑफिसमधे डे-झिरो पासून शेवटापर्यंत सगळ्यांच्या डेट आणि परसेंटेज क्रायटेरिया लागले. ह्याचा अॅवरेज येवढा त्याचा तेवढा, त्यात आमचे नेत्रदिपक गुण (गोल्डनला दुर्दैवाने सगळे ड गटातले पडलेले प्रश्न सोडवून एम-टू काढलेले लोक आम्ही). जेमतेन दोनच कंपन्या आमच्या लायकीत बसत होत्या (क्रायटेरियाला मराठीत लायकी म्हणतात), काहिही म्हणा पण यातच काय ते जमवायचं होतं. त्यातल्या पहिल्या कंपनीला माझ्या टेक्निकल नॉलेजचं काही पडलं नव्हतं, म्हणजे सगळी मदार त्या अॅटी-अॅप्टिटूडवर होती. तर दुसर्या कंपनीला मी टेक्निकलमधे बापमाणूस असायला पाहिजे होतं ज्यावर माझी सगळी मदार होती. आता सगळ्यांच्या हातात आर.एस. अग्रवाल दिसायला लागले. प्रेमवीर लोक जे फोन कानाला टांगून बाजूच्या जंगलात तासनतास अंतर्धान पावायचे ते चक्क नजरेला पडायला लागले. दिवस रात्र, खाता पिता, हॉस्टेलवर कॉलेजवर, रात्रिच्या गार्डच्या शेकोटीजवळ बसून सगळ्यांचं एकचं अग्रवाल अग्रवाल चालू झालं.
अखेर डे-झिरो उगवला. आमचं काही काम नव्हतं पण कुहूतूल फार होतं म्हणून बघायला पोहोचलो. सकाळी ८-९ वाजता त्यांची टीम आली, इंट्रोडक्शनं झाली आणि त्यांच्या एच.आर.ने कंपनीची टिमकी वाजवायला सुरू केली. क्रायटेरियावाली दोन-तीनशे पोरं-पोरी अगदी कान टवकारून ऐकत होती, लिहून घेत होती, न जाणो यातलाच एखादा प्रश्न इंटरव्हूमधे विचारायचे. मग चालू झाला अॅप्टिटूडचा कार्यक्रम. कार्यक्रमच म्हणायला पहिजे कारण यात बाकांवर सीट नंबर घातलेले नसतात, पेरता येतील तशा सेटिंग पेरल्या होत्या. तरी हा असला पहिलाच अनुशव, त्यामुळे बर्यापैकी सिरीयसली चालू होतं. (पुढ एकदा एका कंपनीने ऑनलाईन अॅप्टि टेस्ट घेतली. तेव्हा हि पेरलेली मंडळी उत्तरे काढून नुसती पुरवत होती. हे तिकडे सर्वरवर बसून मॉनिटर करण्यार्या कंपनीच्या माणसाला लगेच कळाले, तो भडकला आणि बाहेर येऊन, "हमको क्या xxx समझा है क्या zzz" म्हणून गेला आणि खुन्नस खाऊन फार कमी जणांना घेउन गेला.)
तर या अॅप्टिची शॉर्टलिस्ट लागली. या कंपनीने मार्कांच्यामधे लोअर बरोबर उप्पर कटॉफ पण लावला होता. कारण त्यांच्या अॅनॅलिसीस वरून असे लोक एकतर जॉईनच करत नाहित नाहितर कंपनीत जास्त वेळ राहत नाहित असे दिसले होते. जे शॉर्टलिस्ट झाले होते त्यांच्या टाय मिळवण्याच्या खटपटी चालू झाल्या आणि बाकिचे पुढचं कसं असतय बघयाला मिळावं म्हणून मेसकडे पळाले. पहिले २-३ टेक्निकल राउंड होते त्यात लोकांचा घाम निघाला. अगदी चार-आठ पदरानं गाळून घ्यावं तसं एचआर राउंडसाठी वेचून घेतलेली मुलं, पण पुढे मात्र विशेष काट्छाट न करता एचार राउंड झाला. संध्याकाळी टिपिओने निकाल जाहिर केला. कुणी पार्टी करायला गेले, सेलेक्टेड प्रेमवीर परत गायब झाले, उरलेले दुसर्या दिवसाच्या तयारीला लागले.
आणि डे-वन उगवला. आज आणि आजच आपल्याला झळकायचं होतं! लोअर लायकीमुळे मुलं कालच्या पेक्षा एकदम दुप्पट झाली होती. टिमकीवादन झाल्यानंतर अॅप्टीसाठी क्लासरूममधे बसा असं फर्मान मिळताच धावपळ सुरू झाली. काल सिलेक्ट झालेली आज सेटिंग म्हणून आलेले (अगदी सेक्शनवाईज!). आमची काही सेटिंग नसल्याने आम्हाला अगदी आयसोलेटेड कोपरा मिळाला (हरिशचंद्र आडवा आला दुसरं काय). जिथे अग्रवाल ने तारले तिथे इंग्लिश सेक्शनने पार दांड्या उखडून टाकल्या. तरी एकूणच बाकिच्यांचीपण अॅवरेज बुद्धिमत्ता माहित असल्यामुळे आशा तग धरून होती. टिपिओने सांगितले की पेपर बरेच असल्यामुळे जसे तपासले जातिल तसे टप्प्याटप्प्याने लिस्ट जाहिर होईल. अशी १५-२० जणांची एक एक लिस्ट दर अर्ध्या-पाउण तासाने मोठ्याने ओरडून सांगायचे. तेवढ्याश्या छोट्या जागेत एवढे लोक अगदी शांतपणे एक एक नाव लक्ष देउन नावे ऐकायचे. त्यातून आपल्या एखाद्या मित्राचे नाव आले तर तेवढ्यापुरते हुर्रे कि परत शूsssssशूssss. अशातच जेवणाच्या वेळा टळून गेल्या, जेवणाचं पार खोबरं झालेलं. कुत्र्यागतं भुका लागल्यामुळे बेकरीच्या आयटमांवर भागवण्यात आले.
दिवसभर उन्हात उभा राहून, प्रत्येक वेळी त्या लिस्ट्मधे आपले नाव न ऐकून थोडं निराश होउन सगळ्यांचा चेहरा रापल्यागत झालेला. मुलिंसाठी होस्टेलचं टायमिंग शिथील केलेलं. या अवस्थेत इंटरव्हू द्यायची कुणाचीच तयारी नव्हती. शॉर्ट्लिस्टेड लोकांचे इंटर्व्हू चालूच होते. अखेर रात्री १० वाजता टिपिओ दोन कागद नाचवत बाहेर आला! लगेच शे-दोनशे लोकांच कोंडाळं जमलं. तो म्हणाला, "ह्या दोन लिस्ट शेवटच्या लिस्ट आहेत. आता फार वेळ झाल्यामुळं याचे इंटरव्हू उद्या पुढच्या कंपनीच्या आधि सकाळी ६.३० वा. होतील. आता मी नावे वाचून सांगतो". असे म्हणून तो एक एक तो एकूण कितवा शॉर्ट्लिस्टेड कॅन्डिडेट आहे त्या नंबरसकट नाव वाचून दाखवू लागला. सगळी जिवाचा कान करून ऐकू लागली. आता हुर्रे शूsss नव्हतच कारण अनेक कमी मार्कवाल्या मुलांना इथे करो या मरो परिस्थिती होती. सगळे आपलं नाव येतय काय बघत होती. पहिला कागद संपला, दुसरा संपायला आला आणि तो मधेच म्हणाला, "आणि १५२ नंबरावं शेवटचं नाव आहे", एक बर्यापैकी पॉज घेउन, माझं नाव! च्यामारी, जीव भांड्यात कसा पडतो हे चांगलच समजलं मला. त्यादिवशी बर्याच जणांनी बर्याच शिव्या घातल्या असणार. मला माझा आनंद कळायच्या आधिच शे-दिडशे पडलेले चेहरे दिसले होते. उरलेल्या लोकांत अॅप्टीवाले अगदी दिग्गज लोक पण होते. माझा मित्र ज्याच्याकडून आदल्या रात्री बर्याच गोष्टी शिकलो होतो मी तो माझ्या बाजूलाच उभा होता. क्षणात सगळांचा उत्साह मावळला. मला फक्त कॉग्रट्झ म्हणून तो बाहेर पडला. आता उद्याची कसली तयारी करायची, एचार इंटरव्हू तर होता. फार तर शकुंतला देवी वाचलो असतो पण ते पुस्तक माझ्या नेहमीच डोक्याच भुगा करते.
पहाटे ५ वाजता वडिलांनी फोन करून अलार्म केला. माझ्या पलिकडच्या खोलीमधला एक सिवीलचा पण माझ्या बरोबर होता. सकाळी ७ वाजता इंटरव्हू चालू झाले, माझे नाव आले. मी एका आधिच्या झालेलेल्या कडून टाय गाठीसकट घेउन लावला (हा टाय डे-झिरोच्या सकाळपासून फिरत होता). आत गेल्यावर थोडा अंदाज घ्यायचा होता, पण लगेचच एका केबिनमधे पाठवलं. केबिनचं दार महाघट्ट होतं. आयुश्यातला पहिला इंटरव्हू, इंग्लिश्चे वांदे, त्यातून हे दार उघडना, मे आय कम ईन गंडलं. पहिलं इंप्रेशन खराब! एक पन्नाशिच्या बाई होत्या. ग्रीट करून त्यांच्याकडे फाईल सरकवत खूर्चीवर बसलो. त्यांनी इकडचे तिकडचे वैयक्तिक प्रश्न विचारून नेहमी सारखं एक कोडं घातलं. काय तर एका रूळावर मुलं खेळताहेत आणि दोन्ही बाजूंनी रेल्वे येताहेत, तुम्ही एकाचे ड्रायवर आहेत तर काय कराल? *unknw* एकूणच इंप्रेशन फूल डाउन होत चाललं होतं. माझा आवाज मोठा असल्यामुळे त्यांना मला २-३ वेळा "थोड्या हळू आवाजात बोल" असं सांगावं पण लागलं होतं. अगदी शेवटी त्यांनी मला प्रश्न केला, "तुझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय प्रसंग कुठला?". अरेच्या, हा तर प्रश्न मी तयारच केला नव्हता.
मी म्हणालो, "मला क्वचीत एखादा प्रसंग आधि घडून गेला आहे असे वाटते आणि एकदम जग थांबल्या सारखे वाटते".
तिला वाटले असणार कुणाला आणून बसवले आहे. ती म्हणाली, "म्हणजे ते सिरियल्स मधे कुणीतरी मांत्रिक-तांत्रिक बाबा वगैरे दाखवतात तसे काय?"
"नाही नाही. हा जगात सर्वाना माहित असलेला कन्सेप्ट आहे. याला देजा वू म्हणतात. आणि मुळात हा शब्दच फ्रेन्च की जर्मन काहितरी आहे."
आता ती जरा गंभीरपणे बोलू लागली, "अछा? म्हणजे नेमके असे कसे होउ शकते आणि असे का होते."
मी म्हणालो, "अजून यावर काही सर्वमान्य उत्तर सापडले नाही. प्रत्येकाच्या आपापल्या थेरी आहेत."
"अछा. मग तुझी तेरी काय आहे?" ती.
मी नुकतच स्वामी विवेकानंदांच एक योग पुस्तक वाचलं होत. ज्यात त्यांनी एका व्याख्यानात जगाच्या चक्राविषयी सांगितले होते, "यापुर्वीही अगणित वेळा मी इथे उभा राहून तुमच्या समोर हेच व्याख्यान दिले आहे. यापुर्वीही अगणित वेळा तुम्ही इथेच बसून हेच व्याख्यान ऐकले आहे. आणि यापुढेही अगणित वेळा असेच होईल".
मी तो पुर्ण भाग समजाउन देउन म्हणालो, "म्हणजे यापुर्वीही अगणित वेळा मी हा इंटरव्हू दिला आहे; यापुर्वीही अगणित वेळा तुम्ही इथेच बसून हा इंटरव्हू घेतला आहे. आणि यापुढेही अगणित वेळा घ्याल."
त्या बाईंनी स्वतःची प्रायवेट डायरी पिशवी उघडून काढली, मला देजा वू चे स्पेलिंग विचारून लिहून घेतले आणि म्हणाल्या, "धन्यवाद. झाला तुझा इंटरव्हू. जा तू आता. बेस्ट लक!".
वर्गीकरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
अगदी अगदी .. मस्त लेख ..
व्ह्यायचं ते झालं :)
मी घरी कधीतरी दहा-पंधरा
मस्त लेख...
माझा प्रेमविवाह असल्याने
आमचा पण प्रेम विवाहच...
मस्त लेख
कँपस इंटर्व्ह्यू साठी
तुम्हाला कॉलेजात जे शिकवले गेले आहे किंवा
शिक्षणतज्ञच असं म्हणत असतील
आणखीही दुसरी बाजू म्हणून
आमचं पण सेम असच होत.. अगदि
बराय
मस्त लिहिलंय!
मस्तच....
मस्त लेख...माझंपण कॅम्पस
जबरा
लेखन अगदीच आवडलं. मस्त, एकदम
धन्यवादाचा प्रतिसाद :)