बाकरवडी भाजी

केडी पाककृती
Collage साहित्य २ कांदे उभे चिरून १ वाटी सुक्क खोबरं, किसून २ माध्यम टोमॅटो १ मूठ कोथिंबिरीच्या काड्या १५ ते २० लसूण पाकळ्या 1 इंच आलं २ तमालपत्र १ दालचिनी १० ते १२ काळेमिरे १/२ चमचा तीळ १/२ चमचा बडीशेप १ बडी इलायची २ ते ३ छोटी इलायची १ चक्रीफुल २ ते ३ लाल सुक्या मिरच्या २ ते ३ लवंगा २ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर २ चमचे कांदा लसूण मसाला १ चमचा हळद पावडर तेल आवश्यकतेनुसार मीठ , चवीनुसार बाकरवडी माणशी ३ ते ४ कोथिंबीर बारीक चिरून बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा वरून भुरभुरायला घरात प्रसिद्ध "अमुक" बंधूंचे (हो, उगाच जाहिरात नको) बाकरवडी चे पाकीट येऊन पडलेले. ह्या बाकरवड्या थोड्याच दिवसात कडक होतात किंवा सादळतात, मग त्या खाण्याची मज्जा कमी होऊ लागली. म्हंटल करावा हा प्रयोग शेव भाजीच्या धर्तीवर. मी दिलेल्या तर्री ची पाककृती काही लोकांना मिसळीच्या कटाची आठवण नक्कीच करून देईल, मी मिसळीचा कट हा असाच बनवतो. शेव भाजीचा रस्सा/कट ह्याच्या असंख्य वेगळ्या पद्धती घराघरात आहेत, त्या वापरून शेवेच्या ऐवजी बाकरवड्या घालून बघा. कृती एक चमचा तेलावर खोबरं भाजून घ्या. त्याच पॅन मध्ये सगळे खडे मसाले, लाल मिरची मंद आचेवर भाजून घ्या. त्यात आलं, लसूण कोथिंबीर काड्या टाकून 2 मिनिटे परतून घ्या. पॅन मधून काढून गार करायला ठेवा. पॅन मध्ये परत एक चमचा तेल घालून कांदा खमंग भाजून घ्या. मिक्सर मधून, टोमॅटो, खडा मसाला आणि कांदा बारीक करून घ्या. (मी आधी टोमॅटो प्युरी करून घेतले, मग इतर जिन्नसा बरोबर ते सगळं बारीक वाटून घेतलं). वाटताना पाणी वापरले तरी चालेल. कढईत अर्धी वाटी तेल घाला. तेल गरम झालं की कढई गॅस वरून खाली घ्या आणि त्यात मिरची पावडर आणि कांदा लसुण मसाला घाला. (ह्याने अर्थातच तर्री ला मस्त रंग येईल, गॅस वरून काढल्यामुळे जळणार नाही) ह्यात आता वाटलेला मसाला घालून परत गॅस वर ठेवा. हे आता आपल्याला तेल सुटे पर्येंत परतून घायचय. ह्यात आता ८ ते १० वाट्या पाणी घाला (तर्री किती घट्ट किंवा पातळ हवी त्यावर पाण्याचे प्रमाण ठरेल. मी अगदीच पातळ न करता थोडीशी घट्ट ठेवली). उकळी आली की गॅस कमी करून झाकून हि तर्री साधारण 20 ते 30 मिनिटे उकळत ठेवा, वर तेल सुटे पर्येंत. चव बघून, मीठ, चिमूटभर साखर घाला. शेवटी एका लिंबाचा रस घालून , वरून कोथिंबीर पेरा. Ingredients Step1 Step2 Step3 Step4 step5 Step6 Step7 Step9 Step10 Step11 Step12 वाढताना, तर्रीला मस्त उकळी काढा, एका वाटीत काढून त्यात बाकरवडी कुस्करून, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो भुरभुरून, पाव, काकडी च्या चकत्या आणि लिंबाच्या फोडी बरोबर खायला घ्या! [मुलं खाणार असल्यामुळे मी हिरवी मिरची नाही वापरली, तसेच लाल मिरचीचे प्रमाण अगदी अल्प ठेवले. मी वापरतो तो कांदा लसुण मसाला बेताचा तिखट असल्यामुळे त्यानुसार वापरलाय.] Final

73 टिप्पण्या 37,989 दृश्ये

Comments

तुषार काळभोर नवीन

केडी, जीव घेताय तुम्ही नुसत्या फोटोंनीच! (शंका: या कटाची मिसळ करता येईल का?)

केडी नवीन

In reply to by तुषार काळभोर

मी दिलेल्या तर्री ची पाककृती काही लोकांना मिसळीच्या कटाची आठवण नक्कीच करून देईल, मी मिसळीचा कट हा असाच बनवतो.
हे पाकृ मध्ये लिहिलंय.....

अभ्या.. नवीन

ही ग्रेव्ही स्पेशल भाजीय. बाकरवडीएवजी काहीही घातले तरी खपून जाईल इतकी टेस्टी ग्रेव्ही बनलीय. . बादवे अशी रेडी २ मिनिट ग्रेव्हीसाठी काही आहे का उपाय?

केडी नवीन

मी दिलेल्या तर्री ची पाककृती काही लोकांना मिसळीच्या कटाची आठवण नक्कीच करून देईल, मी मिसळीचा कट हा असाच बनवतो.
हे पाकृ मध्ये लिहिलंय.....

नेत्रेश नवीन

मस्त, पण असे काही करण्यचे टॅलेंट नाही आपल्या कडे :)

स्वाती दिनेश नवीन

दिसते आहे मस्त पण एक प्रॅक्टिकल शंका आहे, बाकरवड्या मऊ पडेपर्यंत शिल्लकच राहत नाहीत आमच्याकडे. :) स्वाती

पिशी अबोली नवीन

In reply to by स्वाती दिनेश

हेच्च हेच्च.. त्यामुळे मलापण नुसती लाळ गाळण्याशिवाय पर्याय नाही.

बाबा योगिराज नवीन

आत्ता कळलं कि प्रशांतराव बाकरवडी कुठे विसरले ते. उगीच अमुक बंधू, उगीच (झैरात नको) बदनाम झाले. नवं कट्टेकरी बाबा योगीराज

सस्नेह नवीन

एकदम डिटेल.. ! फोटो भारी.

नाखु नवीन

पण पावाबरोबर खायचे पातक सोडून बिन्धास भाकरीबरोबर खाल्ल्या जाईल याची नोंद घेणे आणि सोबत पातीचा कांदा+काकडी. स्वगतःरवीवारी करावा काय बेत?

पैसा नवीन

अगागा! लैच्च चित्ताकर्षक प्रकार आहे!

भाते नवीन

सचित्र आणि सविस्तर नविन पाकृ आवडली. करून बघायला नक्की आवडेल.

सूड नवीन

बाकरवड्या मऊ होईस्तवर शिल्लक राहात नाहीत, त्यामुळे पास. ग्रेव्ही चटकदार दिसतेय, त्यामुळे दुसर्‍या कशात तरी चालवून घेणेत येईल.

प्रभाकर पेठकर नवीन

पहिला आणि शेवटचे छायाचित्र खतरनाक आहे. पाककृतीच्या दृष्टीकोनातून आणि छायाचित्रणाच्या कलेच्या दृष्टीकोनातूनही. पाककृती झणझणीत आणि सणसणीत दिसते आहेच. आता बाकरवड्या मुद्दाम उरवून प्रयोग करावा लागणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

फोटो लय जीवघेणे आले आहेत. -दिलीप बिरुटे

मोदक नवीन

आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार भाग्यश्री बांदिवार नामक काकू केडी सरांच्या पाककृती केडीचा आणि मिपाचा टॅग काढून त्यांच्या ग्रूपावर चिकटवत आहेत. या चोरीला काय करावे..? भाग्यश्री मॅडमचे प्रोफाईल - https://www.facebook.com/bhagyashri.bandiwar?fref=ts आम्ही सारे खवय्ये - https://www.facebook.com/groups/1735753063324406/

पैसा नवीन

In reply to by तुषार काळभोर

त्या प्रोफेशनल चोर आहेत. नियमित मिपावरच्या पाककृती चोरत असतात. आम्ही लोकानी विरोध केला तर त्या पोस्ट्स उडवणे, मेसेजेसना ऊर्मट उत्तरे देऊन जाब विचारणार्‍याला ब्लॉक करणे असले उद्योग करतात. ज्या मुलीनी मेसेजेस टाकले होते त्याना मिपाकर ग्रुपवर आणि इथे स्क्रीनशॉट्स टाकायला सांगते.

पूर्वाविवेक नवीन

In reply to by मोदक

माझ्या ब्लॉगवरच्या अनेक रेसिपी तिथे मला सापडल्या. म्हणून मी त्या बाईंना मेसेज पाठवला व कायदेशीर कारवाईबद्दल बोलले तर तिने मला अतिशय उद्धट उत्तरे देऊन ब्लॉक केलं. मी तिच्या ग्रुपवर आता माझ्या बहिणीच्या ac वरून नजर ठेवून आहे. त्यानंतर तिने माझ्या रेसिपी वापरल्या नाहीत व वरवरच्या माझ्या काही रेसिपी उडवल्या पण माझ्या जुन्या रेसिपी फोटोंसह अजूनही तिथेच आहेत. इथे मिपावरील अनेक रेसिपी आहेत विशेषतः सानिकाच्या तसेच मायबोली व चकली ब्लॉगच्या अनेक रेसिपी आहेत. मी ते स्क्रीन शॉट मिपाच्या फेसबुक पेजवर टाकत आहे.

मोदक नवीन

In reply to by पूर्वाविवेक

तुम्ही प्लीज एक काम कराल का? मिपावर याचा एक धागा काढा. त्याची लिंक आम्ही तेथे चिकटवतो. आम्हाला ब्लॉक केले तर आपण त्यांचे प्रोफाईल रिपोर्ट करून त्याला टाळे लावू शकतो.

केडी नवीन

In reply to by पूर्वाविवेक

धन्यवाद पूर्वाविवेक नजरेस आणून दिल्याबद्दल, आणि मोदक भाऊ त्यांची रितसर कानउघाडणी केल्या बद्दल. ह्या पुढे आशा आहे की त्या असं काही करणार नाहीत. पाककृती बद्दल नेहेमीच कॉपीराईट नसू शकतो, पण कष्टाने काढलेल्या फोटोंवर मात्र मूळ लेखकाचा हक्क असतो, तेवढं त्यांना लक्षात आलं तर बरं पडेल. निदान मूळ स्रोत (source) तरी त्यांनी द्यावा. सकाळीच त्यांनी अनन्या ह्यांची पातोळे पाककृती तिथे टेपवली आहे, सगळ्या छायाचित्रां सकट! तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनापासून आभार!

सूड नवीन

In reply to by मोदक

ज्यांच्या ज्यांच्या म्हणून रेसिपीज चोरल्यात त्यांनी रिपोर्ट ग्रुप ऑप्शन सेलेक्ट करा. मिपावरच्या चोरल्या असतील तर मिपाकर ग्रुपच्या अ‍ॅडमिन्सना पण हे करता येत असेल तर बघा. बाई अगदी बेरकी दिसत्ये.

सूड नवीन

In reply to by सूड

आणि मिपावरच्या रेसिपीज उचलतात म्हणजे या प्रतिसादांवरही बाई लक्ष ठेवून असणार, त्यामुळे घाई करा.

रुपी नवीन

In reply to by सूड

प्रमोद तांबे मिपावरच्या पाकृ उचलून तिकडे टाकतात. पटाईत यांच्या एका पाकृबद्दल हे घडलेले आहे. इथे पहा. माझी पाकृ नसल्यामुळे मला रिपोर्ट करण्याचा योग्य पर्याय निवडता आला नाही. कृपया ज्यांच्या चोरल्या आहेत त्यांनी रिपोर्ट करत रहा म्हणजे अश्या कृत्यांना आळा बसेल.

मराठमोळा नवीन

केडी साहेब.. तुमच्या कलेला आणि कल्पकतेला सलाम. कोणत्याही गोष्टीची आवड आणि पॅशन यात जो फरक असतो. तुमच्याकडे ते पॅशन आहे असे म्हणायला हरकत नाही. तुम्हाला मास्टर शेफ मधे पहायला नक्की आवडेल. शुभेच्छा!!

नरेश माने नवीन

एकदम कातिल फोटो आलेत. तरीचा रंग आणि पाककृती लय भारी.

मदनबाण नवीन

In reply to by रुपी

तर्री भारीच आहे. हेच म्हणतो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT

सुखीमाणूस नवीन

सान्डगे पण या ग्रेव्ही मधे छान लागतील असे वाटतेय. Receipe भारी आहे

दक्षिणा नवीन

झन्नाट पाककृती तोंडाला जाम पाणी सुटलं

अनिंद्य नवीन

@ केडी, रेसीपी झकास आहे आणि ग्रेव्ही तर प्रेग्नेंट विथ पोटेन्शियल आहे - अनेक पाककृती / प्रयोगांना जन्म देऊ शकेल :-)

चौकस२१२ नवीन

कांदा लसूण मसाला हा झणझणीत पणा साठी आणि काश्मिरी लाल मिरची पावडर रंगासाठी ...अशी रचना आहे का केडी? तोंडाला पाणी सुटले आणि हळहळ पण वाटली हळहळ अशासाठी कि अहो ती "निनावी" बाकरवडी धूमकेतू सारखी मिळते आणि ती सुद्धा समुद्रमार्गे आलेली म्हणजे १ महिने प्रवासात (साधी खाताना पंण ओव्हन मध्ये भाजून घेतली तर जरा खुसखुशीत होते ) आणि भारतीय दुकानात पंजाबी आणि गुजराथी राज्य असल्यामुळे असली कांदा लसूण मसाला जवळ जवळ नाहीच ... असो करा लेको मज्जा