साहित्य
२ कांदे उभे चिरून
१ वाटी सुक्क खोबरं, किसून
२ माध्यम टोमॅटो
१ मूठ कोथिंबिरीच्या काड्या
१५ ते २० लसूण पाकळ्या
1 इंच आलं
२ तमालपत्र
१ दालचिनी
१० ते १२ काळेमिरे
१/२ चमचा तीळ
१/२ चमचा बडीशेप
१ बडी इलायची
२ ते ३ छोटी इलायची
१ चक्रीफुल
२ ते ३ लाल सुक्या मिरच्या
२ ते ३ लवंगा
२ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
२ चमचे कांदा लसूण मसाला
१ चमचा हळद पावडर
तेल आवश्यकतेनुसार
मीठ , चवीनुसार
बाकरवडी माणशी ३ ते ४
कोथिंबीर बारीक चिरून
बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा वरून भुरभुरायला
घरात प्रसिद्ध "अमुक" बंधूंचे (हो, उगाच जाहिरात नको) बाकरवडी चे पाकीट येऊन पडलेले. ह्या बाकरवड्या
थोड्याच दिवसात कडक होतात किंवा सादळतात, मग त्या खाण्याची मज्जा कमी होऊ लागली. म्हंटल करावा हा प्रयोग शेव भाजीच्या धर्तीवर. मी दिलेल्या तर्री ची पाककृती काही लोकांना मिसळीच्या कटाची आठवण नक्कीच करून देईल, मी मिसळीचा कट हा असाच बनवतो.
शेव भाजीचा रस्सा/कट ह्याच्या असंख्य वेगळ्या पद्धती घराघरात आहेत, त्या वापरून शेवेच्या ऐवजी बाकरवड्या घालून बघा.
कृती
एक चमचा तेलावर खोबरं भाजून घ्या. त्याच पॅन मध्ये सगळे खडे मसाले, लाल मिरची मंद आचेवर भाजून घ्या. त्यात आलं, लसूण कोथिंबीर काड्या टाकून 2 मिनिटे परतून घ्या. पॅन मधून काढून गार करायला ठेवा. पॅन मध्ये परत एक चमचा तेल घालून कांदा खमंग भाजून घ्या.
मिक्सर मधून, टोमॅटो, खडा मसाला आणि कांदा बारीक करून घ्या. (मी आधी टोमॅटो प्युरी करून घेतले, मग इतर जिन्नसा बरोबर ते सगळं बारीक वाटून घेतलं). वाटताना पाणी वापरले तरी चालेल.
कढईत अर्धी वाटी तेल घाला. तेल गरम झालं की कढई गॅस वरून खाली घ्या आणि त्यात मिरची पावडर आणि कांदा लसुण मसाला घाला. (ह्याने अर्थातच तर्री ला मस्त रंग येईल, गॅस वरून काढल्यामुळे जळणार नाही) ह्यात आता वाटलेला मसाला घालून परत गॅस वर ठेवा.
हे आता आपल्याला तेल सुटे पर्येंत परतून घायचय. ह्यात आता ८ ते १० वाट्या पाणी घाला (तर्री किती घट्ट किंवा पातळ हवी त्यावर पाण्याचे प्रमाण ठरेल. मी अगदीच पातळ न करता थोडीशी घट्ट ठेवली). उकळी आली की गॅस कमी करून झाकून हि तर्री साधारण 20 ते 30 मिनिटे उकळत ठेवा, वर तेल सुटे पर्येंत. चव बघून, मीठ, चिमूटभर साखर घाला. शेवटी एका लिंबाचा रस घालून , वरून कोथिंबीर पेरा.

वाढताना, तर्रीला मस्त उकळी काढा, एका वाटीत काढून त्यात बाकरवडी कुस्करून, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो भुरभुरून, पाव, काकडी च्या चकत्या आणि लिंबाच्या फोडी बरोबर खायला घ्या!
[मुलं खाणार असल्यामुळे मी हिरवी मिरची नाही वापरली, तसेच लाल मिरचीचे प्रमाण अगदी अल्प ठेवले. मी वापरतो तो कांदा लसुण मसाला बेताचा तिखट असल्यामुळे त्यानुसार वापरलाय.]
