Skip to main content

बिल्ला

लेखक बबन ताम्बे यांनी गुरुवार, 06/08/2015 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत सायंकाळी पाचचे टोल पडले आणि गण्या, किशा, दिल्या, दस-या, जया ही सगळी चौथीतली पोरे इतरांना ढकलत रस्त्याला लागली. आज गण्या खूप खूष होता. निबंध स्पर्धेत पहीला नंबर आल्यामुळे त्याला पन्नास रुपयांचे बक्षिस मिळाले होते. कधी एकदा आईला सांगतो असे त्याला झाले होते. "ए गण्या, सांग ना, पन्नास रुपयांचे काय करणारे.." - किशा. "लय मजा करणारे "- गण्या , " आपल्या सु-याकडं टॉय टॉय करणारी गाडी हाय ना, तशी आणनार हे. ती गाडी गर्कन वळती आन उल्टी उडी बी मारती. मला लय आवडती ती गाडी पण सु-याचा आजा मला हात लावून देत नाय. सु-याला म्हणतो, ते गरीबाचं पॉर हे, रोज आंघूळ बी करीत नाय, तेला हात लावून दिऊ नको.आता त्याला दाखवतोच " "अजून काय करणारे? " दिल्या. "अजून? पांडबाच्या हाटेलात भरपेट जिल्बी खाणारे.कवा खाल्लीच नाय" - गण्या. "आजून ? " " एक बिल्ला घेणारे खिशावर लावायला. लय भारी वाटतं. लाल निळा गोल बिल्ला आन तेच्याखाली दोन तिरक्या रिबीनी." गण्या. "हॅ ! बिल्ल्यात कशाला पैशे घालवतो? गुर्जी म्हणले की जो चांगलं काम करील, त्याला हेडमास्तरांच्या हातानी सगळ्यांसमोर बिल्ला लावण्यात यील म्हणून. " दस-या. "खरंच? चांगलं काम केल्यावर हेडमास्तर बिल्ला लावतील मला? " गण्या. "खरंच. गोटयानी नाय का परवा एका म्हता-याला यष्टी स्ट्यांडपर्यंत हात धरून नेलं. दिवसभर बिल्ला लावून लय भाव मारत होता." दस-या. "असं करू ना, " जया, " माझ्याकं फळी हे. बारक्या सुतार म्हंटला वीस रुपयात चांगली बॅट बनवून देतो. पण आय नाही म्हणती. बॅट करायची का? दररोज खेळायला व्हईल " "बेष्ट आयडीया. पण मी कॅप्टन बरका !" गण्या. सगळ्या पोरांनी मान डोलावली. घर आलं तसं गण्या "आई ..." हाक मारत सुसाट स्वयपाक घरात घुसला. चूल बंद दिसत होती. आई आणि तायडी चूलीसमोर चिंताग्रस्त चेह-यानी बसली होती. तायडीने गण्याला चापले,"गण्या, रोजच्यासारखं आल्या आल्या भूक लागली म्हणून आईमागं भूनभून करू नको. आज घरात एक दाणा बी शिल्लक नाय आन आईला आज मजुरीबी मिळाली नाय." दुस-या दिवशी गण्या शाळेत बिल्ला लावून फिरत होता.
लेखनविषय:

वाचने 17463
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

In reply to by बबन ताम्बे

शब्दसंख्येला मारा फाट्यावर...त्या शशक स्पर्धेत जास्त कर्ञ करून रडकथा नैतर अर्धवट सोडलेल्या कथाच जास्त आहेत...त्यापेक्षा हि फार म्हणजे फारच उजवी आहे

In reply to by टवाळ कार्टा

तेच म्हणतो. शब्दांपेक्षा कंटेंट महत्वाचा. अगदी छान मांडलंयत. खूप आवडलं वाचताना. ग्रामीण बाज छान जमलाय. आपण पक्के ग्रामीण भागात राहिलेले असणार, त्याशिवाय हे जमणार नाही. लिहित रहा असेच मस्त!

कथा आवडली

सुरेख कथा, ह्रुदयस्पर्शी ! शाळा आणि "नाहीरे" स्तरातील मुलांचे विश्व तंतोतंत उतरलेय ! अश्याच एका घटनेचा साक्षीदार असल्यामुळे कथा मनाला भावली ! लिखते रहो बबनभाई ! [[ अन.... शंभर शब्दांत काय जमली नाही .. यात वाइट काय वाटायचे ?, तुमच्या साठी खास "त्रिशतशब्दकथा" स्पर्धा आयोजित करायला सांगु इथे ]]

आवडली. कथा शंभर शब्दात कोंबायच्या अट्टाहासापेक्षा अशा स्वान्त सुखाय लिहिलेल्या कथा भावतात.

In reply to by माधुरी विनायक

अट्टाहास बरोबर पण प्रत्येक वेळी कोंबणं नसतं. कधीतरी 100 शब्द जास्त सुद्धा होतात. बबनराव लिखाण आवडलंच!

+१

शंभर शब्दी कथेपेक्षा शंभर नंबरी कथा झ्याक असते असा अनुभव हाये!!! गणूचा शेजारी नाखु

गणू इज द बेश्ट !!

मस्त

आवडली! शतशब्दकथा हा एक वेगळाच प्रांत आहे, त्यात थोडक्यात परिणामकारक लिहायचं असतं. ती सुद्धा एक कलाच आहे. तुम्ही जे लिहीलय ते सुद्धा छानच जमलय. व्यक्त होणे जास्त महत्वाचे.. शब्दसंख्या नाही.

मस्त कथा.. जमलीय राव..

अतिवासताईंच्या 'आंजी' सारखं 'गणू' हे पात्र जन्माला घालताहात, अल्पावधित लोकप्रिय होणार! गणूच्या आतापर्यंतच्या गोष्टी आवडल्या, शब्दमर्यादांच्या बंधनात बांधून घेऊ नका, चांगलं लिहिता आहात, तसंच लिहीत रहा. पुढील लेखनास शुभेच्छा!

In reply to by बहुगुणी

गणू वाचकांना आवडतोय हे वाचून खूप आनंद झाला. लवकरच एका नव्या गोष्टीत गणू पुन्हा भेटीस येईल. पुन्हा एकदा आभार. जमल्यास माझे इतर काही पुर्वीचे लेख देखील वाचणे.

मुंशी प्रेमचंद यांची या धाटणीची कथा आहे. ती आठवली.

आवडली.नियमात बसली नाही तर काही बिघडत नाही. कथेसाठी नियम आहेत, नियमांसाठी कथा नाहीत.इ