सौदी क्षणचित्रे : ०४ : जगातले सर्वात मोठे मरुवन, अल् अहसा
...पुढच्या भागापासून आपण बृहद् दम्मामच्या बाहेर पडून सौदी अरेबियातील इतर प्रेक्षणीय ठिकाणांना भेट देणार आहोत.
दम्मामच्या आजूबाजूस एखाद्या दिवसाची सफर करण्याजोगी जी ठिकाणे आहेत त्यात जी तीन मुख्य आहेत ती अशी: अल् हफूफ, अल् कतीफ व अल् जुबेल. त्यांची स्थाने खालच्या नकाश्यात दाखवली आहेत...
पूर्व प्रांतातील दम्मामजवळची प्रेक्षणीय स्थळे (मूळ नकाशा जालावरून साभार)
अल् अहसा
पूर्व प्रांताचा मोठा हिस्सा अल् अहसा या विभागाने (गव्हर्नरेट) व्यापला आहे. स्थानिक बोलीभाषेत याच्या नावाचा उच्चार बहुदा "हास्सा" असाच करतात. हास्सा म्हणजे अरबीमध्ये वाहत्या पाण्याचा आवाज. या भागात मुबलक पाणी आहे आणि हे जगातले सर्वात मोठे मरुवन आहे. येथे असलेल्या खजुरांच्या झाडांची संख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे. काही लिखाणांत ती संख्या २० लाख इतकी मोठी असल्याचेही नोंदलेले आहे. पण सौदी अरेबियाचे इतर वाळवंटी प्रदेश पाहता दहा लाख झाडे हीसुद्धा फार आश्चर्यकारक वाटावी इतकी मोठी संख्या आहे. त्याच्या भौगोलिक स्थानामुळे आणि पाण्याच्या मुबलकतेमुळे हास्सा प्राचीन व्यापार आणि दळणवळणाच्या मार्गांवरील एक महत्त्वाचे ठाणे होते. आताही दोन विद्यापीठे, शेतकी संशोधन संस्था आणि उद्योगधंदे यामुळे ते सौदी अरेबियातला एक महत्त्वाचा प्रभाग आहे. अल् हफूफ हे या प्रभागातील मुख्य शहर आहे. अल् अहसा विभागाला जुन्या काळी अल् बहरेन असे म्हणत आणि आधुनिक सौदी अरेबियाच्या पूर्व किनार्याचा भाग आणि अवल बेटे (आधुनिक बहरेन देश) त्यात सामील होते. इ स ८९९ मध्ये अबू ताहीर नावाच्या कॉर्मेशियन सरदाराने हा भाग बगदादच्या अब्बासिद खलिफतीपासून स्वतंत्र केला आणि हफूफ शेजारी आपली राजधानी स्थापली. सत्तर ऐंशी वर्षांच्या स्थैर्यानंतर येथे खूप राजकीय उलथापालथी झाल्या. प्रथम आयुनिद, नंतर उसफुरीद असे करत जाब्रीद घराण्याची सत्ता तेथे स्थिरावली होती. इ स १५२१ मध्ये पोर्तुगीजांनी अवल बेटे (आधुनिक बहरेन) जिंकून घेतली आणि जाब्रीद घराण्याला उतरती कळा आली. त्यातच त्या काळात ऑटोमन साम्राज्य आणि त्याला सहकार्य करणार्या स्थानिक जमातींनी हल्ले करायला सुरुवात केली. अखेर १५५० मध्ये अल् अहसा ऑटोमन साम्राज्याचे मांडलिक संस्थान झाले. साधारण शतकभराच्या स्थैर्यानंतर परत एकदा या विभागाचा ताबा बदलत राहिला. इ स १६७० मध्ये बानू खालिद जमातीच्या सरदारांनी अल् अहसा ऑटोमन साम्राज्यापासून स्वतंत्र केले. १७९५ मध्ये अल् अहसा आणि त्या भागातले अल् कतीफ हे भाग पहिल्या सौदी वहाबी राज्यात सामील केले गेले. १८१८ मध्ये ऑटोमन साम्राज्याने हा भाग परत जिंकून घेतला. पण १८३० मध्ये दुसर्या सौदी राज्याने ते परत आपल्या आधिपत्याखाली आणले. नंतर १८७१ मध्ये हा भाग ऑटोमन साम्राज्याच्या ताब्यात गेला तो १९१३ मध्ये इब्न सौदने आधुनिक सौदी अरेबियाच्या स्थापनेच्या कारवाईत परत जिंकून घेईपर्यंत. या त्रोटक इतिहासावरून या भागाचे किती महत्त्व होते हे ध्यानात येते. त्याचे मुख्य कारण म्हणजे येथील मुबलक पाणी आणि त्यामुळे असलेली शेती व उद्योगधंदे. हा भाग भातशेतीसाठी प्रसिद्ध होता. अल् हफूफ लोकर, रेशीम आणि कापसाच्या व्यापाराचे केंद्रही होते. .अल् हफूफ
हफूफ हे हास्सा प्रभागातील १२ लाख वस्तीचे मुख्य शहर आहे. हे सौदी अरेबियातील एक सांस्कृतिक केंद्र समजले जाते. येथील विद्यापीठात इतर विषयांबरोबर शेती, प्राणीवैद्यकशास्त्र (veterinary medicine) आणि प्राणी संपत्ती (animal resources) व्यवस्थापन शिकवले जाते. याशिवाय येथे स्त्रियांसाठी स्वतंत्र वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि गृहवित्त महाविद्यालये आहेत. या विभागाला पर्यटन आकर्षण बनविण्यासाठी सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाचे प्रयत्न चालू आहेत. दंतकथांतही या शहराला महत्त्वाचे स्थान आहे. लैला-मजनू या प्रेमी युगुलांचे दफन याच जागी झाले असे म्हणतात. तसेच येमेनच्या प्रसिद्ध शिबा राणीनेही या शहराला भेट दिली होती असे म्हणतात. चला तर अश्या या अनेक ऐतिहासिक आणि आधुनिक पैलू असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या मरुवनाच्या सफरीला... दम्मामपासून साधारण १३० किमी दूर असलेल्या या ठिकाणी चारचाकीने (तुमच्या गाडीच्या वेगाप्रमाणे) सव्वा ते दोन तास लागतात. हाफूफ जसे जवळ येऊ लागते तसे रुक्ष वाळवंट संपून डोळ्याला थंडाई देणारी हिरवळ दिसायला सुरुवात होते...
हाफूफमधल्या मरुवनाचे प्रथम दर्शन
वाळवंटातला पाण्याचा पाट
खजुराच्या झाडांमधिल शेती आणि भाजीपाल्याची लागवड
पाण्याचा पाट, त्याच्या बाजूचे रस्ते व बागा
हफूफमधले फार्महाउस : ०१
हफूफमधले फार्महाउस : ०२
हफूफमधले फार्महाउस : ०३
हफूफमधले फार्महाउस : ०४
हफूफमधले फार्महाउस : ०५
हफूफमधले फार्महाउस : ०६
गारा (कारा) डोंगर
हाफूफच्या जवळ एक गारा / कारा नावाचा वालुकाश्मांचा डोंगर आहे. हजारो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेने त्याची झीज होऊन बाहेर वालुकाश्मांचे उंच खांब आणि डोंगराच्या पोटात मोठमोठ्या गुहा तयार झाल्या आहेत. त्यांच्या उंचीमुळे या गुहांमधली हवा उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम असते. हा निसर्गाचा चमत्कार पाहायला अनेक पर्यटक इथे येत असतात.
गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०१
गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०२
गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०३
गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०४
गारा डोंगरातले वालुकाश्माचे खांब : ०५
गारा डोंगरामधली गुहा : ०१
गारा डोंगरामधली गुहा : ०२
गारा डोंगरामधली गुहा : ०३
गारा डोंगरामधली गुहा : ०४
गारा डोंगरमाथ्यावरून दिसणारा परिसर आणि नजरेपलीकडे पोचणारे मरुवन : ०१
गारा डोंगरमाथ्यावरून दिसणारा परिसर आणि नजरेपलीकडे पोचणारे मरुवन : ०२
गारा डोंगरमाथा आणि नजरेपलीकडे पोचणारे मरुवन : ०३
स्थानिक कला
हाफूफमध्ये मातीच्या वस्तू आणि खजुराच्या पानांपासून वस्तू बनवण्याचा उद्योगधंदा प्राचीन काळापासून चालत आला आहे. मात्र आता जगभरच्या मालाने सौदी बाजारपेठ काबीज केल्यामुळे या कला एक सांस्कृतिक ठेवा आणि पर्यटन आकर्षण म्हणून जतन केल्या जात आहेत. आमचा पुढचा थांबा एका स्थानिक कारागिराच्या कार्यशाळेचा होता...
मातीच्या वस्तू बनवणारा एक स्थानिक कलाकार
मातीच्या वस्तू : ०१
मातीच्या वस्तू : ०२
मातीच्या वस्तू : ०३
खजुराच्या झावळ्यांपासून बनवलेल्या रोजच्या वापरातल्या वस्तू
इब्राहिमाचा राजवाडा
हाफूफमध्ये इब्राहिमाचा राजवाडा नावाची एक गढी आहे. ही गढी ऑटोमनपूर्व काळातली आहे आणि ऑटोमन पर्वात ती या प्रांतामधल्या सैन्यदळाच्या मुख्य छावणीचे ठिकाण होते. जीर्णोद्धार करून तिला आता एक पर्यटक आकर्षणाचे स्वरूप दिले गेले आहे.
इब्राहिमाचा राजवाडा : पूर्वरूप (जालावरून साभार)
इब्राहिमाचा राजवाडा : जिर्णोद्धारानंतरचे बाह्यरूप
इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०१
इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०२
इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०३
इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०४ : सेनापतीचे निवासस्थान
इब्राहिमच्या राजवाड्याचे आतले रूप : ०५