मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सौदी क्षणचित्रे : ०३ : महाकंपनी सौदी आराम्को आणि मरजान बेट

डॉ सुहास म्हात्रे · · भटकंती
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... =================================================================== ...पुढच्या भागापासून आपण दम्माम शहरातून बाहेर पडून आजूबाजूला हिंडणार आहोत.

महाकंपनी सौदी आराम्को (Saudi Aramco)

सौदी आराम्को या महाकंपनीचे सौदी अरेबियात आणि जगात इतके मोठे महत्त्व आहे की तिची ओळख करून घेतल्याशिवाय त्या देशाची ओळख अपुरी राहील. सौदी आराम्को (Saudi Arabian Oil Company) ही सौदी सरकारच्या आधिपत्याखालील खनिज तेल आणि वायूचे व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. सद्द्या या कंपनीच्या ताब्यात सबळ पुराव्यांच्या आधारे सिद्ध झालेला २६० बिलियन बॅरल्स येवढा तेलसाठा आहे. फिनान्शियल टाईम्सच्या मूल्यमापनाप्रमाणे या कंपनीची किंमत US $ १०,०००,०००,०००,००० (दहा ट्रिलियन) म्हणजेच साधारणपणे भारतीय रुपयांत ६,००,००,००,००,००,००० (साठ लाख कोटी) आहे. अर्थातच तेलाच्या वाढणार्‍या भावाप्रमाणे ती वर अथवा खाली (बहुदा वरच) जाते. नवीन तेलसाठ्यांचा शोध लागल्यास अर्थातच तिची किंमत वर जाते. जगतील दुसर्‍या क्रमांकाची कंपनीची किंमत सौदी आराम्कोच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. जगातले सर्वात मोठे असणार्‍या घवार आणि शायबा या दोन तेलसाठ्यांच्या जवळ असलेल्या दाहरान या शहराला या कंपनीच्या मुख्यालयाच्या जागेचा मान मिळाला आहे. आणि हा मान असा की जवळ जवळ सर्व दाहरान शहर या कंपनीच्या कार्यालयांनी आणि कर्मचार्‍यांच्या वसाहतींनी व्यापून गेले आहे. या कंपनीचा इतिहास आणि त्याचा जगातील अर्थकारणावर आणि राजकारणावर पडलेला प्रभाव मोठा मनोरंजक आणि बोधकारक आहे. त्याची एक धावती उजळणी अशी आहे... पहिल्या महायुद्धात झालेल्या मोठ्या प्रमाणावरच्या खनिज तेलाच्या (आणि त्यामुळे उर्जेच्या) तुटवड्याने युद्धात, उद्योगधंद्यांत आणि एकूणच अर्थकारणात खनिज तेलाचे अनन्यसाधारण महत्त्व जगापुढे आले. इ स १९२० च्या सान रेमो कराराप्रमाणे ब्रिटन आणि फ्रान्सला ऑटोमान साम्राज्यापासून स्वतंत्र झालेल्या (त्या वेळेस माहीत असलेल्या) तेलाने समृद्ध सिरीया व मेसोपोटेमिया (आताच्या इराकचा भाग) या देशांत शासकीय अधिकार (अड्मिनिस्ट्रेटिव्ह राइट्स) मिळाले. अर्थातच तेथे अमेरिकेचा प्रभाव नगण्य झाला. त्यामुळे अमेरिकेचा त्या वेळेचा वाणिज्य मंत्री हर्बर्ट हूवरने परदेशात तेलसंशोधन करून तेथून तेल आयात करण्यासाठी "खुला दरवाजा धोरण (Open Door policy)" जाहीर केले. Standard Oil of California (SoCal) या कंपनीने या धोरणाचा उपयोग करून मध्यपूर्वेत तेल उद्योगधंद्यात शिरकाव करायला सुरुवात केली. SoCal ने १९२९ मध्ये Bahrain Petroleum Co. (BAPCO)च्या रूपाने पहिली उपकंपनी स्थापन केली. या कंपनीला बहारेनमध्ये १९३२ मध्ये तेलाचा शोध लागला. यामुळे मध्यपूर्वेतील तेलसाठ्यांकडे जगाचे लक्ष वेधले जाऊन तेथे तेलसंशोधनाला चालना मिळाली. २९ मे १९३२ रोजी सौदी सरकारने तेलसंशोधनाचे हक्क ब्रिटिश प्रभावाखालील Iraq Petroleum Co. ला डावलून SoCal ला दिले. SoCal ला १९३६ पर्यंत सौदी अरेबियात तेल शोधण्यात यश मिळाले नाही. त्यामुळे तिचे ५०% समभाग Texas Oil Co. (Texaco) विकावे लागले. चार वर्षांच्या असफल प्रयत्नांनंतर दाहरान जवळ सातव्या प्रयत्नात "दम्माम क्रमांक ७" या तेलविहिरिला यश मिळाले. मात्र ही विहीर इतकी लाभदायक ठरली की तिने त्वरित दर दिवशी १,५०० पिंपे तेल देण्यास सुरुवात केली ! अश्या तर्‍हेने अर्थकारणीय राजकारणाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली, जे अजून चालू आहे. ३१ जानेवारी १९४४ ला SoCal चे नाव बदलून Arabian American Oil Co. (Aramco, आराम्को) असे ठेवले गेले. या नवीन कंपनीत SoCal आणि Texaco बरोबर Esso आणि Mobil या दोन कंपन्याच्या पूर्वाश्रमीच्या अवतारांचाही सहभाग होता. इ स १९५० मध्ये राजा अब्दुल अझिझ ने देशातील तेलसाठ्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याची धमकी देऊन आराम्कोच्या ५०% फायद्यावर हक्क मिळवला. या वेळेपर्यंत ही तेलकंपनी इतकी प्रबळ झाली होती की तिने या "फायद्यातल्या घाट्या"ला उपाय म्हणून सौदी सरकारला द्यायचा ५०% फायदा उत्पन्नकरातून वजा करण्याची तरतूद अमेरिकन सरकारकडून मंजूर करवून घेतली ! या प्रकाराला "सोनेरी युक्ती (golden gimmick)" असे नाव पडले आहे ! नंतर हा प्रकार कायदेशीर बनवण्यासाठी कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतील न्यू यॉर्क येथून सौदी अरेबियातील दाहरान येथे हलवले गेले. १९७३ मध्ये झालेल्या योम किप्पूर नावाने ओळखल्या जाण्यार्‍या अरब-इझ्रेली युद्धात अमेरिकेने इझ्रेलला मदत केल्याच्या कारणावरून दबाव आणून सौदी सरकारने आराम्कोचा २५% हिस्सा मिळवला. १९७४ मध्ये सौदी सरकारने त्याचा हिस्सा ६०% पर्यंत वाढवून आणि पुढे १९८० मध्ये १००% केला. त्यानंतर १९८८ मध्ये सौदी सरकारने या कंपनीवर पूर्ण व्यावसायिक ताबा मिळवून तिचे सौदी आराम्को (Saudi Aramco) असे नामकरण केले. पूर्ण सौदी मालकी असली तरी या कंपनीने पूर्वीच्या भागधारक कंपन्यांशी असलेले तेलसंशोधन आणि तेलव्यवस्थापनाचे करार मात्र अबाधित ठेवलेले आहेत. या कंपनीच्या ताब्यात असलेल्या प्रचंड तेलसाठ्यांमुळे आणि विकाऊ तेलाच्या मोठ्या आकारमानामुळे तिचा जागतिक तेलव्यवसाय व तेलाच्या किमतीवर प्रबळ प्रभाव असणे आश्चर्यकारक नाही. आता ही कंपनी देशाच्या सीमा ओलांडून बाहेर पडली आहे. Saudi Aramco Asia Co नावाच्या तिच्या एका उपकंपनीचा इंडोनेशियाच्या Pertamina या राष्ट्रीय तेलकंपनीबरोबर US$ ८ बिलियनचा करार करण्याचा मानस २०१३ मध्ये जाहीर झाला आहे. अश्या या जगातील सर्वात बलाढ्य कंपनीच्या प्रचंड आवारात शिरकाव करायला जवळ जवळ एखाद्या देशात प्रवेश करण्यासारखेच सोपस्कार करावे लागले तर आश्चर्य नाही. कंपनीचे व्यावसायीक निमंत्रण अथवा आतल्या एखाद्या महत्त्वाच्या रहिवाशाचे आमंत्रण असल्याशिवाय तेथे प्रवेश अशक्य आहे. शिवाय मुख्य व्दारावर पूर्ण चौकशी होऊन आणि रहिवाशाबरोबर दूरव्धनीवर संभाषण करून मगच आत प्रवेश मिळतो. आवार इतके मोठे आहे की विभाग, रस्ता आणि घर क्रमांक माहीत असले तरी रस्ता चुकण्याचे प्रमाण कमी नाही ! हे आवार एका प्रकारे "देशामध्ये देश (State within State)" आहे कारण इथे सौदी पोलिसांना मुक्त प्रवेश नाही आणि ही एकच जागा आहे की जिथे स्त्रिया (फक्त आवाराच्या आतच) चारचाकी चालवू शकतात. दाहरानमधे असलेली अजून एक महत्त्वाची संस्था म्हणजे किंग फाहाद पेट्रोलियम आणि खनिजे विद्यापीठ (King Fahd University of Petroleum and Minerals, KFUPM). येथे मॅसेचुसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) च्या सहकार्याने नवअविष्कर्त्यांना आणि नवसंकल्पनाकारांना (inventors and designers) प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी एक खास विभाग (incubator cell) आहे. असो. इतकी माहिती घेतल्यावर आता सौदी आराम्कोच्या आवारातल्या तेल उद्योगावर आधारीत खास प्रदर्शनाची एक प्रकाशचित्रसफर करूया...

सौदी आराम्को प्रदर्शन

ज्या एकमेवाव्दितीय कंपनीने सौदी अरेबियाला जागतिक अर्थकारणात आणि राजकारणात मानाचे स्थान मिळवून दिले तिच्या संबंद्धीच्या तिच्या स्वतःच्या कायमस्वरूपी प्रदर्शनाला भेट देण्याबद्दल खूपच उत्सुकता होती. हे प्रदर्शन कंपनीच्या आवारातच असल्याने तेथे मुक्त प्रवेश नाही. ते बघण्याची संधी आमच्या हॉस्पिटलाच्या क्रीडा व मनोरंजन विभागाने (रिक्रिएशन डिपार्टमेंट) एक सहल आयोजित करून दिली. प्रदर्शनाच्या आवारात मुख्य प्रवेशव्दाराच्या समोर असलेला पृथ्वीचा गोल आपले स्वागत करतो. त्याच्या पलीकडे एका उंचवट्यावर खर्‍याखुर्‍या तेलवाहकांच्या व्हाल्वज् चे मानशिल्प आहे...

 प्रवेशव्दारासमोरचे प्रांगण

.

 प्रवेश्व्दार

.

 स्वागतकक्षातून दिसलेली पहिली झलक

. आत गेल्यावर आपल्याला एक मार्गदर्शक पत्रिका मिळते. तिच्यात प्रदर्शनाचा नकाशा आणि सर्व विभागांची तोंडओळख असते. या पत्रिकेमुळे कोणाच्याही मदतीशिवाय हे प्रदर्शन आपल्या मनाप्रमाणे फिरून बघता येते. इथेच आपल्याला आतापर्यंत ऐकलेल्या सौदी आराम्कोच्या व्यवस्थापकीय वेगळेपणाची खात्री पटू लागते. .

 भूस्तरांची मांडणी आणि त्यांत खनिज तेलाच्या खाणाखुणा

.

 तेलाच्या विहिरीची किचकट मांडणी

.

 समुद्रातल्या तेलविहीरीतले तेल तेलवाहू जहाजावर चढवण्यासाठीची यंत्रणा

.

 तेलवाहू जहाजाची रचना

.

 खनिज तेलापासून रॉकेल, पेट्रोल, डिझेल, इ भाग उर्ध्वपतनाने वेगळे करणारे मनोरे

.

 खनिज तेलापासून तयार होणारी अनेक उत्पादने

.

 समुद्रातल्या तेलविहिरीचा खूप काळाच्या वापरानंतर काढून टाकलेला, त्याच्यावर वाढलेल्या पाणजीवांसह, एका भाग

. प्रदर्शनातील बहुतेक सर्व वस्तूंजवळ त्यांची अरबी व इंग्लिशमध्ये माहिती देणारे फलक आणि दृकश्राव्य व्यवस्था आहे. त्यामुळे मनातल्या बहुतेक सर्व शंका मार्गदर्शकाविना दूर होण्यास मदत होते आणि प्रत्येक भाग आपल्या आवडीप्रमाणे वेळ देउन बघता येतो. हे माहितीपूर्ण प्रदर्शन बघायला खूपच मजा येते. मला सर्वच विभाग आवडले पण सर्वात जास्त रोचक वाटलेला होता "खनिज तेल तयार होण्याची दशकरोडो वर्षांची प्रक्रिया, तिला हिमयुगांमुळे समुद्राच्या पाण्याच्या वरखाली होणार्‍या पातळीची मदत आणि आधुनिक तेलसंशोधन प्रणाली" दाखवणारा विभाग.

मरजान बेट

दम्माम शहराशेजारी अरबी आखातात मरजान नावाचे एक छोटेसे बेट आहे. सौदी आराम्कोने त्याचा विकास करून त्यावर एक मळसूत्राकार अथवा कुंडलाकार मनोरा व बाग बनविली आहे. हे बेट सार्वजनिक वापरास खुले आहे. बेटावर जाण्यासाठी मुख्यभूमीपासून एक अर्धवर्तुळाकार बंधारा बांधून त्याच्यावर चारचाकीने जाण्यासाठी रुंद रस्ता केलेला आहे. आठवड्याच्या सुट्टीत (शुक्रवार-शनिवारी), शाळा-कॉलेजच्या सुट्ट्यांत आणि विशेषतः ईदच्या सुट्ट्यांत हे बेट तेथे फिरायला जाणार्‍या लोकांनी फुलून जाते. चला तर मरजान बेटावर सहलीला... .

 दम्मामचा समुद्रकिनारा आणि मरजान बेट (मूळ नकाशा जालावरून साभार)

.

 मरजान बेटाचे पहिले दर्शन

.

 दुरून दिसणारा मनोरा आणि बागेचा एक भाग

.

 चारचाकीच्या पार्किंगमधून दिसणारा मळसुत्राकार मनोरा

.

 मळसुत्राकार मनोरा, जवळून

.

 मनोर्‍यावरून होणारे बागेचे दर्शन

.

 मनोर्‍यावरून होणारे बागेचे आणि एका पर्यटन बोटीचे दर्शन

. बेटाच्या जवळ एक धक्का आहे तेथून पर्यटन बोटींनी बेट आणि दम्मामच्या समुद्रकिनार्‍याचे समुद्राच्या बाजूने दर्शन घेता येते. दम्मामचा जवळ जवळ १५-२० किमी लांबीचा समुद्रकिनारा हिरवळ, फुलझाडे आणि मुलांच्या खेळाच्या व्यवस्थांनी सजविलेला आहे. असे समुद्रकिनारे कॉर्निश या नावाने ओळखले जातात. समुद्रकिनार्‍यांंवर वसलेल्या अनेक शहरा-गावांना असे कॉर्निश आहेत. तेथे संध्याकाळी, विशेषतः हिवाळ्यात, फिरायला जाण्याची मजा लोक भरभरून घेतात. ईदच्या मोठ्या सुट्ट्यांत तर कॉर्निश लोकांच्या गर्दीने भरलेले असतात. काही लोक संध्याकाळचे जेवण तेथे आणून त्याचा कुटुंबासह हिरवळीवर बसून आस्वाद घेतात तर काही उत्साही मंडळी तेथे चक्क बार-ब-क्यु पार्टी करतात. तर चला बोटीतून मरजान बेटाचा आणि दम्माम कॉर्निशचा नजारा बघायला...

 बोटीतून दिसणारे मरजान बेट : ०१

.

 बोटीतून दिसणारे मरजान बेट : ०२

.

 बोटीतून दिसणारे दम्माम कॉर्निश

. जसजसा सूर्य खाली येऊ लागतो तसतसा हा सर्व परिसर प्रथम धूसर प्रकाशात आणि नंतर दिव्यांच्या झगमगाटात नवनवीन रूप धारण करू लागतो... .

 मरजान बेटावरची संध्याकाळ : ०१

.

 मरजान बेटावरची संध्याकाळ : ०२

.

 मरजान बेटावरची संध्याकाळ : ०३

.

 मरजान बेटावरची संध्याकाळ : ०४

. पुढच्या भागापासून आपण बृह्द् दम्मामच्या बाहेर पडून सौदी अरेबियातील इतर प्रेक्षणीय ठिकाणांना भेट देणार आहोत. क्रमशः =================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... ===================================================================

वाचन 19547 प्रतिक्रिया 0