जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : ३ : ख्मेर राजधानी "अंगकोर"
==================================================================
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...
==================================================================
...आजचा शेवटचा थांबा बघून झाल्याची मार्गदर्शिकेने घोषणा केली आणि दिवसभराचा शीण उसळून आला. कधी एकदा हॉटेलवर परततो आणि गरम गरम शॉवर घेतो असे झाले.
सहलिचा पुढचा दिवस मोठ्या म्हणजे अगदी फार मोठ्या उत्सुकतेने उजाडला. कारण त्या दिवशी सहललितल्या सर्वोत्तम आकर्षणाकडे जायचे होते. ही सगळी सहल ज्याला मध्यवर्ती ठेऊन आखली होती असे ते ठिकाण होते... ख्मेर साम्राज्याची राजधानी "अंगकोर".
अंगकोरचे अवशेष आताचे कंबूज शहर सिएम रीपच्या जवळ आहेत. अंगकोरच्या जागतीक प्रसिद्धीमुळे सिएम रीप नावारुपाला येऊन एक आघुनिक शहर बनले आहे. तेथे प्रवाश्यांच्या सोईकरता अनेक सुविधा, अनेक प्रकारची तारांकित हॉटेल्स आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
विमानाने आकाशात भरारी घेतली आणि नॉम् पेन् चा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो... आणि थोड्याच वेळात कंबोडियाचा भातशेतीचा भाग दिसू लागला..
......
.....
कंबोडियातील महापूराने केलेली शेतीची अवस्था
सिएम रीप आंतरराष्ट्रिय विमानतळ
अंगकोर वट सभोवती असलेल्या मोटेचे आणि तटबंदीचे प्रथम दर्शन
अंगकोर
अंगकोर हे काही एक मंदिर किंवा प्राचीन अवशेषांचे एक आवार नाही. ही आहे सतत ६०० वर्षे दक्षिणपूर्व आशियावर सत्ता असलेल्या आणि दक्षिणपूर्व आशियामार्गे होणार्या भारत-युरोप-चीन यांच्यातील व्यापारावर नियंत्रण असलेल्या साम्राज्याची राजधानी. अंगकोर हा शब्द संस्कृत शब्द नगर यावरून ख्मेर भाषेत येता येता "नगर --> नोगोर --> नोकोर --> अंगकोर" असा झाला आहे. इ स ८०२ मध्ये कौडिण्य नावाच्या राजपुत्राने दुसरा जयवर्मन या नावाने राज्याभिषेक करवून स्वतःला ख्मेर साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट घोषित केले आणि राजा हा शिवाचा अंश म्हणून त्याला "देवराजा" असे संबोधण्याची प्रथा सुरू केली हे आपण अगोदरच्या भागांत पाहिले आहेच. नवव्या शतकापासून थायलंडच्या (त्याकाळचा सयाम) आयुथ्थाया (आयोध्या) राज्याने पाडाव करेपर्यंत अंगकोर ही ख्मेर साम्राज्याची राजधानी होती. या काळात येथे एक हजारापेक्षा जास्त देवळे बांधली गेली... त्यांची आताची अवस्था "शेती आणि माळरानांवर पसरलेले असंख्य विस्कळीत दगड" ते "आकारमानामुळे, स्थापत्यशैलीमुळे आणि कोरीवकामामुळे जगप्रसिद्ध झालेल्या अंगकोर वट सारखे अजून बर्याच सुस्थितीत असलेले मंदिर" अशी आहे. त्यातली काही देवळे ते पाषाण मूळ स्थानी बसवून पुनर्स्थापित केली गेली आहेत तर अजून बर्याच मंदिरांच्या पुनर्स्थापनेचे काम चालू आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने आधुनिक पद्धतीने उपग्रहचित्रणाव्दारे इ स २००७ मध्ये केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की अंगकोर औद्योगिक क्रांती होण्याअगोदरच्या काळातील सर्वात मोठे शहर होते. सुमारे १,००० चौरस किमीपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेल्या या शहरात पाणी, सांडपाणी, रस्ते, इ सर्व मूलभूत गरजांची उत्तम संरचना (elaborate infrastructure system) होती. (या बाबतीत दोन क्रमांकावरचे शहर माया संस्कृतीतले आताच्या ग्वाटेमाला देशातले "तिकाल" हे आहे. त्याचे क्षेत्रफळ १०० ते १५० चौ किमी होते. आजच्या पुणे शहराचे क्षेत्रफळ ७०० चौ किमी आणि नवी मुंबईचे ३४४ चौ किमी आहे. यावरून अंगकोरच्या भव्यतेची कल्पना यावी.) एवढ्या मोठ्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दर देवळासभोवताच्या खंदकांत, मोठमोठ्या तलावांत आणि काही घरांच्या जवळच्या मध्यम ते लहान आकाराच्या तळ्यांत पाणी साठवून ते सर्व पाण्याचे साठे कालव्यांनी एकमेकाला जोडलेले होते. मेकाँग आणि तोन्ले साप नद्यांतील पाणी खास बांधलेल्या कालव्यांतून त्या साठ्यांत सोडले जात असे. याशिवाय या नद्यांच्या तोडीचीच पावसाचे पाणी अडवून कालव्यांत सोडण्याची तिसरी मानवनिर्मित जलप्रणाली त्याकाळच्या ख्मेर अभियंत्यांनी बांधली होती. अंगकोर शहराच्या चार दिशांना असलेल्या मुख्य चार तलावांपैकी (Baray) सगळ्यात मोठ्या पश्चिमेकडच्या तलावाचा आकार ८ किमी X २ किमी होता. ११ व्या शतकाच्या मध्यात बांधलेला पश्चिम दिशेचा तलाव आजही आस्तित्वात आहे आणि त्यात अजूनही मासेमारीही केली जाते. पूर्ण भरल्यावर या तलावात सद्या ५३० लक्ष घनमीटर पाणी साठते. अंगकोरच्या एकूण लोकवस्तीबद्दल संशोघकात पूर्णपणे एकमत नाही. पण, शहरातील मूलभूत व्यवस्था आणि नैसर्गीक-मानवनिर्मित तळी व कालवे बांधून रचलेल्या शेतीच्या प्रणालींवरून तेथे १०,००,००० (दहा लाख) लोक राहू शकत असावे असा अंदाज आहे ! (२०११ च्या जनगणने प्रमाणे नवी मुंबईची लोकसंख्या साधारण ११ लाख होती.) देवळांच्या भोवतीचे खंदक हे दुग्धसागराचे प्रतिक, मधले विशाल आणि उंच मंदीर म्हणजे देवनिवास मेरू पर्वत आणि त्याच्या टोकावर असलेल्या गर्भागृहात देवराजाचे शिवलिंगाच्या स्वरूपातले आस्तित्व अशी बर्याच देवळांची मांडणी आहे. येथिल अंगकोर वट मंदिर हे जगातील आतापर्यंतचे सर्वकाळचे सर्वात मोठे धार्मिक बांधकाम आहे. दरवर्षी अंगकोरला वीस लाखापेक्षा जास्त प्रवासी भेट देतात आणि त्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. बांधकामाचा वारसा अनेक राजांनाही मिळाला होता. इ स ८८९ मध्ये सत्तेवर आलेला सम्राट यशोवर्मन हा स्वतः नावाजलेला अभियंता होता आणि त्याने यशोधरापुरा नावाची ख्मेर साम्राज्याची जुनी राजधानी वसवली. अंगकोरच्या मध्यभागाच्या २४ किमी X ८ किमी इतक्या क्षेत्रफळात ७२ मोठी मंदिरे आणि इतर प्राचीन महत्वाच्या इमारती आहेत. याखेरीज याच भागात असलेल्या इतर प्राचीन अवशेषांची संख्या अनेक शेकड्यांत जाते. अंगकोरच्या मध्यवर्ती भागाच्या नकाशावर नजर टाकली तर त्याच्या आवाक्याची थोडीबहूत कल्पना येईल...
अंगकोरच्या मध्यवर्ती भागाचा नकाशा (जालावरून साभार)
वाचन
17358
प्रतिक्रिया
0