Skip to main content

हसू

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 19/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत पावणे आलते. कशाला कायकी. आमाला कायबाय इचारलं. धडा वाचाया लावला, पाडे इचारले. अंक्या, भान्या, निमी हुशार हायेत बक्कळ. त्यास्नी समदं येतं. माज्या टकु-यात शिरतं, -हात नाय. आमचे अण्णा म्हणत्यात “डोस्क्याला भोक हाये एक”. गवसलं न्हाय ते बेणं – एक चिंधी बांधली की काम जालं! मला विचारलं कायतरी पावण्यानी. भ्याव वाटलं येकदम. कांडल्यावानी झालं छातीत. ठोके नुस्ते. धाडधाड धाडधाड. आवाज खोल हिरीतून आला. पावणे हसले. गुर्जीबी हसले. समदी हसली. म्याबी हसली. पावणे गेले. गुर्जी आले. माजे केस वढत एक ठिउन दिली गालावर. दातच तुटला येक. रडत म्या चिराकले, “काSओ गुर्जी” “बक्षीSस” ते म्हणले. समदी पुन्ना हसली. म्या रडतच व्हती. तरीबी हसली. *शतशब्दकथा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14824
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

काय की या वेळेला जरा कळाली नाही कथा.
आमचे अण्णा म्हणत्यात “डोस्क्याला भोक हाये एक”. गवसलं न्हाय ते बेणं – एक चिंधी बांधली की काम जालं!
याबद्दल कोणी मला विस्कटून सांगेल काय?

In reply to by किसन शिंदे

अण्णा म्हणतात डोक्याला भोक आहे एक काहीही ऐकलेलं / सांगितलेलं/ समजावलेलं डोक्यात राहत नाही . . त्या भोकातून बाहेर जातं . . (एका वाक्यात . . अक्कल नाही ) आता ते भोक बंद करायला काही तरी प्याच वर्क केलं पैजे ना . मग वरून एक फडकं बांधेन म्हणतीये ती मुलगी . म्हणजे भोक बंद होईल काहीही ऐकलेलं / सांगितलेलं / समजावलेलं त्या भोकातून बाहेर पडणार नाही (एका वाक्यात . काही विसरणार नाही ) हुश्श . . . बहुदा समजेल एवढ्याने . नाही . तर तुम्ही पण एक फडकं बांधून घ्या

In reply to by अभ्या..

हसायला काय झालं रे अभ्या किती मेहनतीनं मी ते समजावून सांगितलं होतं :( :| (जोक/कविता समजावून सांगायला लागणे . . य़ पेक्षा वाईट गोष्ट दुसरी नाही ):P

समदी पुन्ना हसली. म्या रडतच व्हती. तरीबी हसली.
_/\_ अतिशय संवेदनशिल शेवट. छान माडणी आहे.

In reply to by अद्द्या

या कथेची रचना छोट्या वाक्यांत असल्याने 'पाहताना' ती कविता दिसतेय खरी; पण ही कविता नाही. निदान लिहिताना तरी मला 'कविता' अभिप्रेत नव्हती. कदाचित एका विशिष्ट पद्धतीने ती म्हटली/वाचली तर ती कविता वाटण्याची शक्यता आहे हे मात्र खरं :-)

In reply to by आतिवास

अच्छा . . मला हा प्रकार फार माहित नवता . . पण जे काही आहे ते मस्त आहे . आवडलं एवढ खरं युन्द्या अजून :D

पोराच्या वाट्याला नशीब आणि त्याचं दुर्दैव. छान मांडणी. -दिलीप बिरुटे

वर्गात स्वतंत्र विभाग असता तर समदी हंसली नसती.

१०० शब्दांत मनाला भिडणारं काही लिहीणं सोपं नाही, लेखिकेत ते कौशल्य आहे. ही कथा वाचून फार वाईट वाटलं. 'छडी लागे छम छम, विद्या येई घम घम' हे लॉजिक माझ्या आकलनापलिकडचं आहे.

लघुकथा आवडली. शेवट मात्र चटका लावून गेला.

'तरीबी हसली...' हा शेवट अत्युच्च! भारी लिहिलेय.

चूक नक्की काय झाली हे न सांगताच शिक्षा देणे हा अतिशय क्रूरपणा आहे... पण आपल्या समाजात तो सर्वमान्य आहे. शतशब्द कथा हा लेखन प्रकार खूपच प्रभावी आहे. काही हजार शब्दांत अथवा पानात (पुस्तकांच्या) जे कदाचित सांगता येणार नाही, ते अचूक पणे सामोरे येते.

दोन येण्या घातलेली तोंडात बोट घातलेली शाळकरी पोर डोळ्यासमोर उभी राहिली..!

In reply to by सस्नेह

+१ आठ-दहा दिवसांपूर्वी चप्प तेल लावून घातलेल्या दोन वेण्या नि त्यांना बांधलेल्या लाल रिबीन्स. त्या देखील आता मळलेल्या. सकाळी खोपटात पाणी नसल्यानं आंघोळ न करता तशीच तोंड धुवून. केसात गवताच्या एक दोन बारीक काड्या.गारठ्यामुळं थोडं नाक वाहतंय. सुरसुर करत वर ओढायचा अयशस्वी प्रयत्न. मोठ्या भावाचा मापाला मोठाच होणारा कधीतरी पांढरा असलेला,ज्याचा खिसा अर्धवट फाटलेला, दोन बटनं तुटलेली नि कुठंतरी मधेच फाटलेला शर्ट. अर्धवट खोवलाय डार्क निळ्या (नेव्ही ब्ल्यू) स्कर्टमध्ये... हा तर एक दोन महिने धुतलाच नाहीये. दोन हुकांच्या ह्या स्कर्टला एक बक्कल लाल नि दुसरं पांढर्‍या दोर्‍यात शिवलेलं. पायावर मळ साठलेला. 'शिल्पर' पर्वाच तुटली म्हणून तशीच अनवाणी आलेली. कानाखाली बसल्यानं झिणझिण्या आलेल्या एक हात गालाशी नि दुसरा स्कर्टाच्या टोकाशी चाळा करत, पायाच्या अंगठ्यानं वर्गातली जमीन उकरत, डोळ्यात पाणी आलेलं नि तोंडानं ओशाळवाणं हसणारी यत्ता ४-५ वी तली मुलगी.

In reply to by प्यारे१

वर्णन आवडलं - चित्रमय झालं आहे :-)

आपल्याकडची शिक्षक जमात पोरांना फक्त शिक्षा करण्याचंच काम करायचं असतं अशा समजुतीत असते. त्यामुळे हे असले लोकं अज्जिब्बात आवडत नैत. भिकारचोटपणा नुसता.

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

वाचून कळवळलो हो! असल्या शाळांनी आणि असल्या मास्तरड्यांनी किती मुलांचा स्वाभिमान नष्ट केला असेल देव जाणे.

In reply to by नगरीनिरंजन

खरंच वाईट वाटतं.. पण हे सगळं असं १०० शब्दात बसवणं फारच कठीण आहे. छानच लिहिताय तुम्ही.

चटका लावणारी कथा.. जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त लिहीता तुम्ही. चिंधी बांधायची आयड्या आवडली..:-) (डोक्याला भोक असलेला) चिगो