मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हसू

आतिवास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
शाळेत पावणे आलते. कशाला कायकी. आमाला कायबाय इचारलं. धडा वाचाया लावला, पाडे इचारले. अंक्या, भान्या, निमी हुशार हायेत बक्कळ. त्यास्नी समदं येतं. माज्या टकु-यात शिरतं, -हात नाय. आमचे अण्णा म्हणत्यात “डोस्क्याला भोक हाये एक”. गवसलं न्हाय ते बेणं – एक चिंधी बांधली की काम जालं! मला विचारलं कायतरी पावण्यानी. भ्याव वाटलं येकदम. कांडल्यावानी झालं छातीत. ठोके नुस्ते. धाडधाड धाडधाड. आवाज खोल हिरीतून आला. पावणे हसले. गुर्जीबी हसले. समदी हसली. म्याबी हसली. पावणे गेले. गुर्जी आले. माजे केस वढत एक ठिउन दिली गालावर. दातच तुटला येक. रडत म्या चिराकले, “काSओ गुर्जी” “बक्षीSस” ते म्हणले. समदी पुन्ना हसली. म्या रडतच व्हती. तरीबी हसली. *शतशब्दकथा

वाचने 14820 वाचनखूण प्रतिक्रिया 38

किसन शिंदे Fri, 04/19/2013 - 11:37
काय की या वेळेला जरा कळाली नाही कथा.
आमचे अण्णा म्हणत्यात “डोस्क्याला भोक हाये एक”. गवसलं न्हाय ते बेणं – एक चिंधी बांधली की काम जालं!
याबद्दल कोणी मला विस्कटून सांगेल काय?

In reply to by किसन शिंदे

अद्द्या Fri, 04/19/2013 - 11:55
अण्णा म्हणतात डोक्याला भोक आहे एक काहीही ऐकलेलं / सांगितलेलं/ समजावलेलं डोक्यात राहत नाही . . त्या भोकातून बाहेर जातं . . (एका वाक्यात . . अक्कल नाही ) आता ते भोक बंद करायला काही तरी प्याच वर्क केलं पैजे ना . मग वरून एक फडकं बांधेन म्हणतीये ती मुलगी . म्हणजे भोक बंद होईल काहीही ऐकलेलं / सांगितलेलं / समजावलेलं त्या भोकातून बाहेर पडणार नाही (एका वाक्यात . काही विसरणार नाही ) हुश्श . . . बहुदा समजेल एवढ्याने . नाही . तर तुम्ही पण एक फडकं बांधून घ्या

In reply to by अभ्या..

अद्द्या Fri, 04/19/2013 - 16:13
हसायला काय झालं रे अभ्या किती मेहनतीनं मी ते समजावून सांगितलं होतं :( :| (जोक/कविता समजावून सांगायला लागणे . . य़ पेक्षा वाईट गोष्ट दुसरी नाही ):P

अग्निकोल्हा Fri, 04/19/2013 - 11:45
समदी पुन्ना हसली. म्या रडतच व्हती. तरीबी हसली.
_/\_ अतिशय संवेदनशिल शेवट. छान माडणी आहे.

In reply to by अद्द्या

आतिवास Sat, 04/20/2013 - 07:43
या कथेची रचना छोट्या वाक्यांत असल्याने 'पाहताना' ती कविता दिसतेय खरी; पण ही कविता नाही. निदान लिहिताना तरी मला 'कविता' अभिप्रेत नव्हती. कदाचित एका विशिष्ट पद्धतीने ती म्हटली/वाचली तर ती कविता वाटण्याची शक्यता आहे हे मात्र खरं :-)

In reply to by आतिवास

अद्द्या Sat, 04/20/2013 - 08:33
अच्छा . . मला हा प्रकार फार माहित नवता . . पण जे काही आहे ते मस्त आहे . आवडलं एवढ खरं युन्द्या अजून :D

तिमा Fri, 04/19/2013 - 12:02
वर्गात स्वतंत्र विभाग असता तर समदी हंसली नसती.

स्मिता. Fri, 04/19/2013 - 17:43
१०० शब्दांत मनाला भिडणारं काही लिहीणं सोपं नाही, लेखिकेत ते कौशल्य आहे. ही कथा वाचून फार वाईट वाटलं. 'छडी लागे छम छम, विद्या येई घम घम' हे लॉजिक माझ्या आकलनापलिकडचं आहे.

मनीषा Sat, 04/20/2013 - 05:26
चूक नक्की काय झाली हे न सांगताच शिक्षा देणे हा अतिशय क्रूरपणा आहे... पण आपल्या समाजात तो सर्वमान्य आहे. शतशब्द कथा हा लेखन प्रकार खूपच प्रभावी आहे. काही हजार शब्दांत अथवा पानात (पुस्तकांच्या) जे कदाचित सांगता येणार नाही, ते अचूक पणे सामोरे येते.

In reply to by सस्नेह

प्यारे१ Sat, 04/20/2013 - 17:09
+१ आठ-दहा दिवसांपूर्वी चप्प तेल लावून घातलेल्या दोन वेण्या नि त्यांना बांधलेल्या लाल रिबीन्स. त्या देखील आता मळलेल्या. सकाळी खोपटात पाणी नसल्यानं आंघोळ न करता तशीच तोंड धुवून. केसात गवताच्या एक दोन बारीक काड्या.गारठ्यामुळं थोडं नाक वाहतंय. सुरसुर करत वर ओढायचा अयशस्वी प्रयत्न. मोठ्या भावाचा मापाला मोठाच होणारा कधीतरी पांढरा असलेला,ज्याचा खिसा अर्धवट फाटलेला, दोन बटनं तुटलेली नि कुठंतरी मधेच फाटलेला शर्ट. अर्धवट खोवलाय डार्क निळ्या (नेव्ही ब्ल्यू) स्कर्टमध्ये... हा तर एक दोन महिने धुतलाच नाहीये. दोन हुकांच्या ह्या स्कर्टला एक बक्कल लाल नि दुसरं पांढर्‍या दोर्‍यात शिवलेलं. पायावर मळ साठलेला. 'शिल्पर' पर्वाच तुटली म्हणून तशीच अनवाणी आलेली. कानाखाली बसल्यानं झिणझिण्या आलेल्या एक हात गालाशी नि दुसरा स्कर्टाच्या टोकाशी चाळा करत, पायाच्या अंगठ्यानं वर्गातली जमीन उकरत, डोळ्यात पाणी आलेलं नि तोंडानं ओशाळवाणं हसणारी यत्ता ४-५ वी तली मुलगी.

In reply to by प्यारे१

आतिवास Sat, 04/20/2013 - 20:43
वर्णन आवडलं - चित्रमय झालं आहे :-)

शिल्पा ब Sun, 04/21/2013 - 00:06
आपल्याकडची शिक्षक जमात पोरांना फक्त शिक्षा करण्याचंच काम करायचं असतं अशा समजुतीत असते. त्यामुळे हे असले लोकं अज्जिब्बात आवडत नैत. भिकारचोटपणा नुसता.

चिगो Tue, 04/23/2013 - 09:13
चटका लावणारी कथा.. जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त लिहीता तुम्ही. चिंधी बांधायची आयड्या आवडली..:-) (डोक्याला भोक असलेला) चिगो