'उरा'तली सर!

मेघवेडा जे न देखे रवी...
नेमेचि येतो मग पावसाळा. पाऊस आला की मान्सूनइतकाच मुसळधार बरसणार्‍या वर्षाकवितांचा पाऊसातच आपली माझी एक बारकीशी सर. :) परवा मुंबईत मान्सूननं आगमनाची वर्दी दिल्याचं वाचलं. मागोमाग विविध सोशल नेटवर्क्सवर उष्म्यानं जीवाची काहिली झालेल्या तमाम मुंबैकरांनी नि:श्वास टाकल्याचंही वाचलं. मनात पाऊसकवितांची उजळणी सुरू झाली. आणि बोरकरांच्या एका द्विपदीवर मन येऊन अडलं ते तिथंच उरलं. त्यातून निर्माण झालेली ही 'उरातली' सर! (अर्थात, यातल्या बोरकरांच्या ओळी ओळखालच.) :)
पाहुन जळता धरेस ग्रीष्मानलदाहें निष्ठूर दाटुन येई मनी नभाच्या कृष्णमेघकाहूर तहानलेला चातक कोठे आर्त आळवी सूर कैवल्याने वरूणाचे का भरू नये मग ऊर? बरसे रस पिकल्या अम्भोदांतुन टापूर-टुपूर सुगंधमृण्मय अभिनव नाजुक पसरे सर्वदूर दिशादिशांतुन आषाढाच्या श्यामघनांना पूर तृणाप्रमाणे मनेंहि होती चंचल तृष्णमयूर कुडा सुरंगी कवळा मुसळी पुंगळी संकासूर पेव फुलांचे फुलता उमले भूवर सौख्यांकुर! इंद्रधनू-वर दृष्टिस पडता नभोमंडपी दूर हरितवनश्रीलेपित सृष्टी वधू लाजुनी चूर! सोनसळी लेऊन नव्हाळी साळि नर्तनातूर, शेतांमधुनी फुले तृप्तिचा पीत वर्ण भरपूर! भद्र भादवा घेऊन ये सौभाग्याचा सिंदूर निरोप देती वर्षाराणी हासे मधुरमधूर!
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

38 टिप्पण्या 13,010 दृश्ये

Comments

पैसा नवीन

उन्हाळ्याचा ताप असह्य झाल्यावर पहिला पाऊस येतो आणि सगळं वातावरण बदलून जातं, तसं वाटलं तुझी कविता वाचून.

अस्मी नवीन

In reply to by पैसा

आणि सगळं वातावरण बदलून जातं, तसं वाटलं तुझी कविता वाचून.
अगदी.. खूप सुंदर आणि नादमय कविता..तू नेहमी लिहीत राहा. -अस्मिता

नंदन नवीन

बोरकरांच्या ओळी 'मध्यवर्ती' ठेवून केलेली रचना आवडली :). पहिली द्विपदी 'तन्नि:श्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी'ची आठवण करून देणारी. कवितेतले चेतनागुणोक्ती, अनुप्रास अलंकार आणि फुलांची अस्सल नावं हे 'अच्च' बोरकर परंपरेतलं! जियो!!

सागर नवीन

मस्त रे मेव्या... खूप दिवसांनी तुझी एक झकास कविता वाचली... :) इंद्रधनू-वर दृष्टिस पडता नभोमंडपी दूर हरितवनश्रीलेपित सृष्टी वधू लाजुनी चूर! या ओळी तर क्या बात है.... ;)

चतुरंग नवीन

आषाढातल्या पहिल्या पावसाची चातकप्रतीक्षा (दवणीय शब्दाबद्दल माफ करशीलच ;) ) आणि त्यापुढला वरुणराजाचा प्रवास सुरेख चितारला आहेस. (बाकीबाबप्रेमी)रंगा

बहुगुणी नवीन

इंद्रधनू-वर दृष्टिस पडता नभोमंडपी दूर हरितवनश्रीलेपित सृष्टी वधू लाजुनी चूर! ..... सुंदर ओळी! सर्वच रचना picturesque आहे, चित्रगुप्तांनी आणि त्यांच्यासारख्या प्रतिभावंत कलावंतांनी या कवितेला चित्ररुप द्यावं असं सुचवावसं वाटतं! मेघवेड्या: या निमित्ताने 'बोरकरी' पावसावरच्या आणखी एका लेखाची आठवण करून दिलीस...

अमृत नवीन

In reply to by बहुगुणी

कविता आवडली. || चित्रगुप्तांनी आणि त्यांच्यासारख्या प्रतिभावंत कलावंतांनी या कवितेला चित्ररुप द्यावं असं सुचवावसं वाटतं! || - या वाक्याशी सहमत. अमृत

सहज नवीन

कविता आवडली. मेवे ध्वनिमुद्रीत करुन फित चढवा.

पहाटवारा नवीन

कडक ऊन्हात सह्याद्रितल्या कुठल्या तरि गडावर नाहितर डोंगरावर चढत जावे .. ऊन्हे ऊतरायच्या आतच एकदम आभाळ भरून यावे .. अन बरोबरिच्या कुणाच्या तरि "चला पावसाच्या आत खाली ऊतरूया".. असल्या हट्टाला न जुमानता तिथेच कुठेतरि कडे-कपार्‍यांमधे थांबून धूम पावसाचे रूप अन तुषार अंगावर झेलून जेव्हा हळू हळू खाली ऊतरत येताना .. मधेच एखादि छोटिशी वाडि अन पायर्‍या पायर्‍यांची शेती बघत , एकदम तुमची हि कविता समोर दिसावी .. नाहितर ... दे धूम पावसात गाडि हाकत घाटमाथ्यावर येउन थाम्बावे .. पावसाचा जोर जरा कमी झालेला पाहून , गाडि रस्त्याच्या कडेला लावावी .. अन पावसाची थोडिशी रिप रिप अंगावर झेलत एक फेरफटका बाजूच्या माळरानावर मारायला निघावे .. तेव्हा तुमची हि कविता एक्दम भेटावी .. वाह .. मे वे .. मन एकदम फ्रेश करून टाकलेत ..

बिपिन कार्यकर्ते नवीन

हा धागा स्पेशली रेकमेंड झाला म्हणून उघडला ... आणि सार्थक झालं! अप्रतिम आहे रे हे मेव्या! नंदन आणि पहाटवारा यांचे प्रतिसादही आवडले.

स्मिता. नवीन

इकडे उन्हाचा उकाडा असूनही कविता वाचताना आजूबाजूला पाऊस कोसळत असल्याचा भास झाला :)

प्रीत-मोहर नवीन

दा .. प्रच्चंड आवडेश. अरे लिखाणाची फ्रिक्वेंसी वाढवलीस तरी चालेल :) कोटीभास्कर आणि पहाटवारा यांचे प्रतिसादही आवडले आहेत :)

मेघवेडा नवीन

समस्त रसिकजनांचे मनःपूर्वक आभार. नंदन - स्तुतीनं मेंदू ढिला होतो असं अलीकडेच कुठेतरी वाचलं! ;) आणि आपण तर मला तडक बोरकरांच्या परंपरेत नेऊन ठेवलंत. मेंदू निखळला तर जबाबदारी तुमची. ;) बहुगुणी - लिंकबद्दल धन्यवाद. सुरेखच लेख आहे. सहजमामा - वेळ मिळेल तेंव्हा नक्की ध्वनिमुद्रण करीन. पहाटवारा - :) कार्यकर्ते - कोण तो रेकमेंडर? मृत्युंजय - यातली गत तर नाही ना? ;) वाटत नाही म्हणा तसं तुमचं लेखन वगैरे बघून. नाना - आपणच रसग्रहण करावेत अशी नम्र विनंती.

स्वाती दिनेश नवीन

सुंदर कविता! स्वाती

चैतन्य दीक्षित नवीन

अतिशय सहज, वृत्तबद्ध आणि सकस काव्य वाचायला मिळाले. जियो! जियो!

स्पंदना नवीन

"सकस" हा शब्द चैतन्य दिक्षितां कडुन उधार घेउन सुद्धा शब्द अधुरे वाटताहेत. मेवे अगदी "हलवा" कविता. सुरेख, नाजुक शब्द रचना अन चित्रदर्शी काव्य. पुन्हा पुन्हा वाचाव अन उरी साठवाव.