मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दही खस्ता कचोरी

सानिकास्वप्निल · · पाककृती
. साहित्य कचोरीचे सारणः १ वाटी पिवळी मुगाची डाळ चांगली धुवून, ४ तास भिजवून, निथळून घेणे दीड टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टीस्पून भरडसर धणेपूड १ टीस्पून बडीशेप पावडर १ टीस्पून जीरेपूड १/२ टीस्पून गरम-मसाला १/२ टीस्पून आमचुर पावडर मीठ चवीनुसार कढीपत्ता बारीक चिरलेली कोथींबीर तेल . पाकृ: डाळ मिक्सरवर भरडसर वाटून घ्यावी. (पाणी अजिबात घालायचे नाही) एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता घालावा. तो तडतडला की त्यात वाटलेली डाळ घालून मंद आचेवर परतावी. झाकून वाफेवर ५-७ मिनिटे शिजु द्यावी. शिजलेली डाळ हळू-हळू कोरडी होऊन मोकळी होऊ लागेल. त्यात लाल तिखट, धणेपूड, जीरेपूड, गरम - मसाला, बडीशेप पावडर, आमचुर पावडर व मीठ घालावे. चांगले एकत्र करून मिश्रण कोरडे होईपर्यंत परतावे . बारीक चिरलेली कोथींबीर घालून एकत्र करावे. तयार सारण एका ताटात काढून ते गार होऊ द्यावे. . साहित्य कचोरीचे आवरणः १ वाटी मैदा २ टेस्पून रवा २ टेस्पून तेल १ टीस्पून ओवा मीठ चवीनुसार बर्फाचे पाणी कणीक भिजवण्यासाठी (रवा आणी गार पाण्यामुळे कचोर्‍या खुसखूशीत होतात) . पाकृ: मैदा, रवा , ओवा, मीठ व तेल एकत्र करावे. बर्फाच्या पाण्याने कणीक भिजवावी. कणीक फार घट्ट किंवा सैल मळू नये, मध्यम सैल भिजवावी. झाकून १५-२० मिनिटे ठेवावी. . पाकृ कचोरी: मैद्याच्या पीठाचे सारखे गोळे करावे. तळहातावर थोडे तेल लावून घेणे. एक गोळा घेऊन चपटा करून त्याची पारी तयार करुन घ्यावी. त्यात चमच्याने सारण भरून, कडा उचलून बंद करून घ्याव्यात. हलकेच तळहाताने चपटे करावे. (मी कचोर्‍या अजिबात लाटत नाही , नाहीतर त्या फुगत नाही तळताना) अश्याच सगळ्या कचोर्‍या तयार कराव्यात. तेल मंद आचेवर तापवायला ठेवावे. एक एक करून कचोर्‍या तेलात सोडाव्यात व मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्याव्या. साधारण ७-८ मिनिटे लागतात. कचोर्‍या खुसखुशीत झाल्या पाहिजेत. . सर्व्हिंगः तयार कचोर्‍या, पुदीन्याची चटणी, चिंच - खजुराची चटणी, मसाला दही ( दह्यात चवीनुसार मीठ, साखर घालून फेटणे. त्यात जीरेपूड व लाल तिखट भुरभुरावे) बारीक चिरलेली कोथींबीर, बारीक शेव . कचोरीला सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावे. त्यावर चमचाने भोक पाडून त्यात पुदीन्याची चटणी, चिंच - खजुराची चटणी, मसाला दही घालावे. वरून बारीक चिरलेली कोथींबीर व शेव भुरभुरावी. . चटपटीत दही खस्ता कचोरी खाण्यासाठी तयार आहे :) . नोटः आवडत असल्यास ह्यात कच्चा कांदा ही घालू शकतो. खस्ता कचोरी नुसत्या चिंचेच्या चटणीसोबत ही सर्व्ह करु शकता.

वाचने 20859 वाचनखूण प्रतिक्रिया 42

मृत्युन्जय 21/06/2012 - 12:05
हे असले फोटो दाखवुन आम्हाला जळवल्याबद्दल देवबाप्पा तुम्हाला नक्कीच शिक्षा करेल

तर्री 21/06/2012 - 12:07
सुंदर छायाचित्रे व पाकृ. "डेरी फारम" छाप दुकानातून मिळणारा ,हा पदार्थ घरी करता येईल असे नव्हते वाटले. आजच पांडेजी कडे जायला हवे.

किलमाऊस्की 21/06/2012 - 13:45
माझा आवडता पदार्थ. बाकी सगळंच म्हणजे कृती , फोटो नेहमीप्रमाणे झक्कस !!! नो "खस्ता "कचोरी असं नाव हवं होतं ;-)

प्रेरणा पित्रे 21/06/2012 - 13:00
पावसाळी वातावरणात भुकेच्या वेळी हे असले फोटो नका दाखवत जाऊ... :) घरी करेन तेव्हा करेन पण आज मात्र हापिसातुन घरी जातांना कचोरी पार्सल घेऊन जाणार... पहिला फोटो एकदम कडक... :)

श्रीरंग_जोशी 21/06/2012 - 13:10
पाककृती अन छायाचित्रे पण. अवांतर -फार खस्ता खाव्या लागतात का हो ह्या कचोऱ्या बनवताना?

बाळ सप्रे 21/06/2012 - 14:12
वॉव!! फोटो तर एकदम प्रोफेशनल वाटले.. कचोरीत नंतर दही,चटणी,शेव हे सगळं आत भरायचचं असल्याने.. आधीचं मुगाच्या डाळीचं सारण नसलं तरी चालेल अस वाटलं..

परिकथेतील राजकुमार 21/06/2012 - 14:14
सदेह खस्ता झालेलो आहोत. जमल्यास 'चिंच खजुराची चटणी ' पाकृ व्यनी / खरड करावी. इथे अज्जीबात देऊ नये. चार नादान माणसे चार अजून काहीतरी सुधारणा सुचवतात आणि सगळ्याची माती करतात.

चिंतामणी 21/06/2012 - 14:49
जेवण झाल्यावर सुद्धा बादलीभर लाळ गळली. असो. बाकी नेहमीप्रमाणेच. XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

स्मिता. 21/06/2012 - 15:51
.

स्वाती दिनेश 21/06/2012 - 16:21
कचोरी मस्तच ग, पहिला फोटो तर.. अहाहा.. स्वाती

sneharani 21/06/2012 - 17:40
मस्त, पहिलाच फोटो खल्लास ! :)

अमोल केळकर 21/06/2012 - 17:51
खुप मस्त ..... :) अमोल केळकर

मिहिर 21/06/2012 - 17:53
काय मस्त फोटो आहेत! पाणी सुटलं तोंडाला! मस्त!

अत्रुप्त आत्मा 21/06/2012 - 22:34
नेमका आजच संध्याकाळी कर्वे पुतळ्या जवळचा माझा फेवरिट ,याच स्टाइलचा दहि/चटणी/शेव टाकलेला कट पॅटिस खाल्ला. ही कचोरी त्यापेक्षा कातिल लागणार यात शंका नाही. :-)

पैसा 22/06/2012 - 20:13
कचोरी मला आवडत नाही, पण फोटो अप्रतिम देखने आलेत!

श्रीयुत संतोष जोशी 23/06/2012 - 10:39
क्या बात है ..........मस्त !!!!! एकदम मस्त.

प्रभाकर पेठकर 23/06/2012 - 14:57
व्वा..! 'खस्ता' कचोरीसाठी फार काही खस्ता खाव्या लागत नाहीतसे दिसते आहे. लवकरच करून पाहावी (आणि खावी) असा विचार करतो आहे. अभिनंदन.

खादाड 03/07/2012 - 16:19
पहिला आणि शेवटचा फोटो जीवघेणा आहे !! :)

नगरीनिरंजन 04/07/2012 - 15:25
अत्यंत आवडीचा प्रकार आहे हा. त्यात सादरीकरण आणि सजावट पाहून या पाकृवर फिदा झालेलो आहे. वाचनखूण साठवत आहे. -वर्धमानसमोरच्या रगडाकचोरीच्या आठवणीने अंमळ हळवा झालेला

priya_d 17/11/2016 - 06:39
सानिका, वर दिलेल्या प्रमाणात किती कचो-या होतात?