"यह तीर्थ महातीर्थों का है
मत कहो इसे काला पानी ।
तुम सुनो यहा की धरती के
कण कण से गाथा बलिदानी ॥"
---- गणेश दामोदर सावरकर
मराठी माणसाला अंदमानची ओळख आहे ती सावरकर बंधुंच्या "सजा-ए-कालापानी" मुळे... मीही जेव्हा अंदमानला निघालो, तेव्हा मनात उत्सुकता होती ती "सेल्युलर जेल" ला बघण्याचीच ! एकदा तिथे पोहचल्यावर मात्र सौंदर्य, विविधता आणि इतिहासाची पाखरण असलेल्या ह्या भुमीला पाहुन वाटलं की, ये सफर यादगार रहेगा !!
कोलकात्याहुन उडून पोर्ट ब्लेअरला उतरलो. मनापासुन सांगतो, मी आजपर्यंत पाहीलेल्या सगळ्या भारतीय शहरांमध्ये हे सगळ्यात निटनेटकं शहर आहे ! अक्षरशः सुईपासुन प्रत्येक गोष्ट ज्या ठिकाणी भारताच्या मुख्य भुमीवरुन येते, अश्या ठिकाणी हे लोक इतके आटोपशीर, नीट कसे राहतात ह्याचच मला नवल वाटत होतं.
पोर्ट ब्लेअर वरुन आम्ही जवळच्याच एका किनार्यावर गेलो. जातांना वाटेत जागोजागी त्सुनामी ने केलेल्या हानीचे अवशेष दिसत होते. हा एक नमुना

ह्याचा मुळ्यांचा पसारा फोटोत माववणं म्हणजे एक दिव्यच होतं..
त्या बीचवर पोहोचल्यावर मात्र आम्ही वेडावलो. सर्वदुर निळ्या रंगाच्या छटा दाखवणारा अथांग सागर पहुडला होता. त्यातल्या मी त्या आधी पाहिलेला समुद्र म्हणजे मुंबईचा, मग तुम्ही माझी अवस्था ओळखु शकता. तिथुन आम्ही दुसर्या एका बेटावर निघालो. ह्याचं नाव "कोरल आयलंड"..

इथे जातांना मी पुन्हा एकदा स्वर्गाला खो देऊन परत आलो. झालं असं, की मी बोटच्या समोरच्या टोकावर उभा होतो. माझा विचार होता की किनारा जवळ आल्यावर उडी मारीन. किनारा अद्याप दुरच होता, तेवढ्यात मला पोज मध्ये पाहुन एका मित्राने मस्तीत दिला की मला ढकलून ! आम्ही बुडबुड करत तळाशी... (मला पोहता येत नाही बरोबर). नाकतोंडात खारट पाणी गेल्यावर हात पाय झाडत वर आलो. वर येवून पाहतो, तर बोट सरळ माझ्या उरावरच येत होती. मी आपला "इकडं (उरावर येणारी) बोट नी तिकडं समुद्र" ह्या अवस्थेत. शेवटी पुन्हा एकदा बुडबुडत वर आलो, अंगावर येण्यार्या बोटीलाच रेटा मारुन किनार्याकडं हातपाय मारले नी आमचे चरण जमिनीला टेकले... :-)
इथे स्नॉर्केलिंग करुन, पाण्यात डुबक्या मारुन आम्ही परत पोर्ट ब्लेअरला आलो...
संध्याकाळी "सेल्युलर जेल"ला लाईट अँड साउंड शो बघायला गेलो. अगदी "मस्ट सी" आहे हा शो. जेलच्या वेगवेगळ्या भागांवर प्रकाश पाडून, त्यांना अतिशय योग्य अशा संवादांची आणि संगिताची जोड देत हा शो आपल्या डोळ्यांसमोर "सजा-ए-कालापानी" चा काळाकुट्ट इतिहास उभा करतो..
रात्रीच्या वेळी घेतलेले जेलचे दर्शन...

आणि जेलच्या समोर पार्कमधे असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा पुतळा....

मात्र रात्रीच्या वेळी जेलचे दर्शन घ्यायला परवानगी नसते. म्हणुन मग नंतर यायचे ठरवून परत गेलो..
दुसर्या दिवशी आम्हाला दक्षिण अंदमान मधल्या "बारटांग" नावाच्या द्विपावर जायचे होते. पोर्ट ब्लेअर ते बारटांग ह्या प्रवासात तुम्ही जंगलातुन प्रवास करता, जिथे "जारवा" नावाच्या "प्रिमिटीव्ह" आदिवासी समुहाचे वास्तव्य आहे. जारवा लोक आधुनिकते पासुन अतिशय दूर असुन ते बाहेरच्यांशी संपर्क टाळतात. तरीही प्रवासात आम्हाला काही जारवा दिसले. त्यांना फोटो घेतलेला आवडत नाही म्हणुन मी ते टाळलं. रस्त्यात आम्हाला एक जारवा स्त्री तिच्या चिमुकल्यांसह दिसली. आणि खरंच, शप्पथ सांगतो.. कमरेपासुन वर ती विवस्त्र असुनही मला एकदम स्ट्राइक झाला तो तिचा चेहरा ! अतिशय आखीव आणि तेजस्वी असा तो चेहरा कुठल्याही "फेअर अँड लव्हली" ब्युटी कन्सेप्टच्या कानफडीत मारेल असा होता.. :-०
बारटांग ला पोहचल्यावर आम्ही "मड वल्कॅनो" बघायला गेलो.

एका एकरभराच्या जागेत,काहीतरी रासायनिक प्रक्रियेनी जमिनीतून सतत चिखल वाहत असतो. हा अनोखा प्रकार पाहुन मजा आली. इथे ह्या वल्कॅनोज चा वैज्ञानिक अभ्यासही सुरु आहे.
बाराटांगच्या दुसर्या भागात चुनखडीच्या गुहा आहेत. भुगोलात शिकलेल्या "स्टॅलेक्टाईट्स, स्टॅलेग्माईट्स" वगैरे इथे बघायला मिळतात. (उजेड बरोबर नसल्याने फोटोज काही चांगले आले नाही मात्र).. इथे जाण्यासाठी "मॅनग्रोव्हस" च्या जंगलातून जावे लागते. पाण्यात मगरी-बिगरी असल्याने प्रवास मस्तपैकी टरकीफाईंग होतो.

इथल्या जंगलात काही दिसलेल्या काही सुंदर छटा...

परत पोर्ट ब्लेअरला आलो. पुढचा टप्पा होता "हॅवलॉक आयलँड".... इथे जाण्यासाठी दोन-अडीच तासांचा समुद्रप्रवास करावा लागतो. समुद्र सूर्याच्या सोबतीने प्रकाशाच्या किमया दाखवत होता..

हॅवलॉकला पोहचलो आणि .... आ हा हा !! सुखावलो. पुन्हा एकदा निळाईची जादू पसरायला लागली. आणि "सी ग्रीन" किंवा "ब्ल्यु ग्रीन" च्या कुठल्याही रंगछटेत न समावणारी ती कलाकारी समोर होती..

त्यातल्या त्यात मला हा किनारा आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे बर्याच दुरपर्यंत हा किनारा उथळ आहे. जवळजवळ अडीच-तिनशे मीटर आतपर्यंत माणसाच्या खांद्याच्या वर पाणी येत नाही. मी नुकताच "स्वर्गसुख" उपभोगता उपभोगता
परत आयटमपणा करण्याच्या मुडमध्ये नव्हतो. ओहोटीत तर किनार्याचा विस्तार स्पष्टपणे समोर येत होता...

इथे खुप भटकलो मी..
वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे शंख-शिंपले गोळा केले. (कुणासाठी ते नाही सांगणार आमि, जा ! ;-))
इथं कुणीतरी लपलेले आहे. शोधा बरं जरा...

इथुन आम्ही राधानगरी बीचला गेलो. आशियातील टॉपच्या १० बीचेस मधे ह्याचा नंबर लागतो. इथला सुर्यास्त प्रसिद्ध आहे. पण आम्हाला मात्र ढगाळ वातावरणामुळे तो बघायला मिळाला नाही. इथे खेकड्यांनी बनवलेली रांगोळी किनाराभर पसरलेली होती..

ह्याला कॅमेर्यात कैद करता करता माझी पार वाट लागली. एका बिळावरुन दुसर्या बिळावर त्यांना टिपायला मी फिरत होतो. शेवटी म्हटलं, एका ठिकाणी कॅमेरा धरुन वाट बघू, तर हे महाशय लपंडाव खेळायच्या मुड मधे. भोकाच्या तोडांशी आल्यावर मी क्लिक करणार एवढ्यात पुन्हा तुरुतुरु आत.. पुन्हा बाहेर आले, मी क्लिकतो म्हटलं का पुन्हा भोकात पसार... अक्षरशः भोकाशी आली होती !

दुसर्या दिवशी परत पोर्ट ब्लेअर ला आलो. आज सेल्युलर जेलला जायचेच, असं ठरवलं होतं.. दुपारी आम्ही त्या स्वातंत्र स्मारकात पोहोचलो.

सुरुवातीला सेल्युलर जेल ७ रांगांचे बनलेले होते. (मॉडेल खाली) मात्र दुसर्या विश्वयुद्धाच्या काळात जर्मन-जपानी सैन्याच्या बॉम्बवर्षावात त्याचे चार भाग नष्ट झाले.

आत कैद्याना देण्यात येणार्या अमानुष वर्तणुकीचे दृष्य दाखवणारे काही मॉडेल्स ठेवलेले होते.

हे बघून झाल्या-झाल्या आम्हाला सगळे बाहेर चलायला सांगू लागले. मी म्हटलं, मला सावरकरांची कोठडी पहायचीय. तिथले अधिकारी म्हणत होते की ती तिसर्या मजल्यावर एकदम टोकाला आहे, वेळ लागेल. मी त्यांना बोललो, "पाच मिनिटं थांबा." आणि सुस्साट पळत सुटलो. स्वातंत्र्यवीरांच्या कोठडीसमोर पोहचलो आणि.... अंगभर रोमांच दाटून आले. पाय पुढे रेटेना. माझा मित्र मागुन आला नी म्हणाला, "अरे, अंदर क्यों नही जाता?" मी म्हटलं, थांब. थोड्या वेळाने आत गेलो. त्यांच्या प्रतिमेला नमस्कार केला.. थोडा वेळ कोठडीत डोळे मिटून उभा राहीलो. कोठडीचे फोटो काढून बाहेर आलो. मात्र त्या कोठडीत उभं राहून फोटो काढून घ्यायची माझी हिंमत झाली नाही. फक्त अंदमानला यायची ऐपत झाली, म्हणून स्वातंत्र्यवीरांच्या जागेवर, क्षणभराचा का होईना, हक्क सांगायची आपली लायकी नाही, हीच एक भावना मनात होती त्याक्षणी...

ह्या काळ्यापाण्याच्या प्रदेशातली हिरवळ आणि निळाई मनात ठेवून, दुसर्या दिवशी चेन्नईला रवाना झालो...
:: सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... ही दिवाळी आपल्या जीवनात सुख-समृद्धीचा प्रकाश आणि स्नेहीजनांच्या सहवासाचे माधुर्य घेवून येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!
जबरदस्त फोटो!!!!!!