फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ ~ यश आणि उपेक्षा
सन १९४२. दुसरे महायुध्द. बर्मा आघाडी आणि जपानी सैन्याने अचानक मारलेल्या विजयाच्या मुसंडीपुढे दोस्त राष्ट्रांना जबरदस्त हादरा बसला होता. म्यानमारच्या 'सित्तान्ग ब्रिज' भोवताली दोस्तांनी जपान्यांना पुढे येऊ द्यायचे नाही या निर्धाराने मोर्चे बांधणी केली होती आणि त्या दिवशीच्या कंपनीचा मुख्य अधिकारी होता २८ वर्षाचा एक भारतीय तरणाबांड बहाद्दर; ज्याच्या नेतृत्वाखाली तुकडीने जपान्यांना तोडीस तोड जवाब दिला. आपल्या साथिदारांना प्रोत्साहन देत देत स्वतःही शत्रूवर आग ओकत असतानाच तिकडून आलेल्या मशिन गनच्या फैरीनी त्याच्या पोटाचा वेध घेतला व हा उमदा अधिकारी तिथेच कोसळला. पोट फुटले होते, रक्तस्त्राव चालूच होता, पण याचा आपल्या जवानाना प्रोत्साहन देण्याच्या भाषेतील जोष काही कमी होईना. आपला कमांडर मरणोन्मुख अवस्थेत पडला आहे पण त्याही अवस्थेत त्याची जिद्द लखलखीत आहे हे पाहून तुकडीला नवीच संजीवनी मिळाली आणि तिने जपान्यावर अशी काही सरबत्ती केली की शत्रू सैन्य थोड्याच वेळात सित्तान्गपासून दूर गेले. विजय मिळाल्याचे पाहिल्यावर तो बहाद्दर अधिकारी बेशुद्ध झाला. सकाळी ब्रिटिश जनरलनी या तुकडीस्थळी तातडीने भेट दिली, विजयाबद्दल जाहीर सत्कार केला. सैनिकांनी त्यावेळी विजयाचे श्रेय आपल्या कंपनी कमांडरला दिले आणि त्यावेळी जनरलने जवळपास मरणोन्मुख अवस्थेत पडलेल्या त्या अधिकार्याजवळ जाऊन त्याला धीर दिला आणि सांगितले की, "यंग मॅन, तुझा कालचा पराक्रम हा 'मिलिटरी क्रॉस' मिळविण्याचा तोडीचा आहे आणि मी आताच ती सरकारकडे शिफारस करीत आहे...पण एक लक्षात ठेव 'मिलिटरी क्रॉस' मरणोत्तर मिळत नाही. तेव्हा त्या मानासाठी तुला जगलेच पाहिजे." त्याही अवस्थेत तो तरूण अधिकारी उदगारला, 'सैनिकी सेवा माझ्या रक्तातच आहे, आणि यातून वाचलोच तर पुढेही हेच करणार !" ही जिद्दच त्या अधिकार्याला मृत्युच्या मुखातून परत घेऊन आली. स्वतंत्र भारताच्या 'परमवीर चक्र' दर्जाचा ब्रिटीश सैन्यातील 'मिलिटरी क्रॉस' ही अर्थात या विलक्षण प्रतिभावान सैन्याधिकार्याला प्रदान करण्यात आला....आणि इथून सुरू झाली जवळपास ४० वर्षाची अखंड सेवा....फक्त एका दलाची.... एका देशाची....एका शपथेची....दल होते - लष्कर...देश भारत...शपथ ~ गणवेश, ज्या गणवेशाशिवाय देश याला ओळखूच शकत नाही, इतको तो त्याच्या प्रतिमेशी निगडीत आहे : आणि हा तरुण अधिकारी होता ~ सॅम होरमुस्जी फ्रामजि जमशेदजी माणेकशॉ : संपूर्ण भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ, मूर्तिमंत सळसळते चैतन्य...वयाच्या ९४ वर्षीदेखील शेवटचा श्वास घेत असतानासुध्दा आपला चेहरा चकचकीत दाढी केलेला असला पाहिजे अशी सूचना आपल्या नातवाला देऊन ठेवणारा एक जबरदस्त शारीरिक आणि मानसिक ताकतीचा सेनानायक....ज्याला या देशातील [काही राजकारणी सोडले तर] प्रत्येकाकडून भरभरून आदर आणि प्रेम लाभले.
(या फोटीतील गुरखा सैनिक फार लोकप्रिय झाला. बांगला मुक्ती आघाडीवर तैनात असलेल्या एका तुकडीला भेट देण्यास जनरलसाहेब आले होते. हा सैनिक ड्यूटीवर तैनात होता. सहज नाव विचारले असता सैनिकाने उत्तर दिले, "सॅम बहादूर साहेब जी"....जनरल सॅम भलतेच खूष झाले, 'अरे मग मीच इथे खरा तर ड्यूटीवर आहे.." या प्रसंगानंतर जर त्यांच्या निकटच्या मित्रांनी आणि अधिकार्यानी त्यांना 'सॅमबहादूर' हेच संबोधन दिले, ते त्यांना खूप आवडे.)
मिपा सदस्यांना वाटेल की, आज अचानक माणेकशॉ यांच्यावर हा लेख का? ना त्यांची जयंती, ना पुण्यतिथी, ना एखाद्या विक्रमी विजयाच्या आठवणीचा दिवस ! असे असताही, लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली ती 'पैसा', 'सहज' आणि 'सुधीर काळे' यांच्यामुळे. दोनतीन दिवसापूर्वी श्री.सुधीर काळे यांच्या 'कारगील' धाग्यावर अभ्यासपूर्ण चर्चा चालू असताना एके ठिकाणी भारतीय सेनादलाचे पहिलेवहिले 'फिल्ड मार्शल' चा बॅटन मिळविणारे सॅम माणेकशॉ यांच्यासंदर्भात काही उल्लेख आले व तिथे माझ्या प्रतिक्रियेवर उल्लेख करताना सदस्यांनी (नंतर खरडीतूनही) "या विषयावर स्वतंत्र लेख लिहा" अशी सूचना केली. माझ्या मनीही तीच भावना आली तसेच या निमित्ताने का होईना, भारतभूमीच्या या एका महान सेनानीला, त्यांच्या आठवणी जागृत करून, सलाम करू या.
३ एप्रिल १९१४ ला 'अमृतसर' पंजाब येथे पारसी घराण्यात जन्माला आलेल्या सॅमनी प्राथमिक शिक्षण अमृतसर येथेच पूर्ण केले तर नैनितालच्या शेरवूड कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर १९३२ ला त्याचवेळी डेहराडून येथे ब्रिटीश सरकारने सुरू केलेल्या आय.एम.ए. (इंडियन मिलिटरी अॅकेडेमी) च्या ४० कॅडेटच्या तुकडीत प्रवेश मिळविला. योगायोगाची गोष्ट म्हणजे आज देशातील या नामवंत अकादमीतून पास आऊट झालेल्या १९३४ च्या पहिल्या बॅचमधील माणेकशॉ हे पहिले सेकंड लेफ्टनंट होते. पुढे रॉयल स्कॉउट्स आणि १२ फ्रंटियर फोर्स रायफलचे नेतृत्व केले आणि बर्मा आघाडीवर केलेल्या पराक्रमाने ते त्यावेळच्या आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्थापित झालेल्या भारतीय लष्करातील एक लाडके नावच झाले.
१९४७ च्या स्वातंत्र्याचा जल्लोष चालू असतानाच फाळणीमुळे विदिर्ण झालेली अवस्थादेखील ते पाहत होते आणि त्यातच काश्मिर प्रश्नावरून पाकने केलेली घुसखोरीला त्यानी (आता ते 'कर्नल माणेकशॉ' झाले होते) दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे ते सैन्याच्या गळातील ताईत तर बनले पण आता इथे त्यांना घाणेरड्या राजकारण्यांच्या मत्सराची पहिली झलक पाहायला मिळाली. त्यांच्या आणि तत्सम वा वरिष्ठ सेनाधिकार्यांना भारत-पाक राजनैतिक संबंधावर जणू काही मत व्यक्त करूच द्यायचे नाही, आणि जरी काही मत असलेच तर ते पं.नेहरूंच्यापर्यंत पोहोचणार नाही अशा पटावरील खेळ्या खेळल्या गेल्या (आणि आज त्याचा परिणाम आपण पाहतोच आहोत...असो.). पुढे १९६१ च्या सुमारास त्यावेळचे एक नेहरू सोडले तर सर्वांना नकोसे झालेले संरक्षणमंत्री व्ही.के.कृष्ण मेनन यांच्या तुसड्या स्वभावाशी दिलखुलास आणि कायम हसतखेळत गंमतीशीर शेरेबाजी करण्याच्या (टिपिकल पारशी पर्सन...) सवयीच्या सॅम यांचे सूत जमणे शक्यच नव्हते. (सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक श्री.खुशवंतसिंग यांना कृष्ण मेनन यांच्याबरोबर लंडनमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या खास अशा शैलीत रंगविलेले मेनन वाचनीय आहेत. त्या विषयी पुढे कधी तरी....अर्थात इथल्या सदस्यांनी हवे असेल तर !). त्यामुळे सॅम मिलिटरी व्यूहरचनेत 'साईडलाईन्ड' झाले आणि चीनकडून नेफात झालेल्या अपमानस्पद पराभवानंतर पंडित नेहरूंना आठवण झाली ती या धडाडीच्या सेनानायकाची. त्यांनी प्रथम मेनन यांना राजिनामा देण्यास सांगितले व पुढच्याच क्षणी तातडीने सॅम माणेकशॉ यांना बोलावून घेतले आणि पराभूत अवस्थेत माघार घेण्याच्या मनस्थितीत असलेल्या नेफा कमांडचे नेतृत्व करण्याची जबाददारी त्यांच्याकडे तात्काळ दिली. सॅमनी कोणताही अवधी न दवडता नेफा आघाडीकडे धाव घेतली आणि तिथे त्यांनी पाहिले की आपल्या सैन्याला सर्वप्रथम काय हवे तर 'मनोधैर्य', जे पार खच्ची झाले होते. सॅम यांच्याकडे शस्त्राची ताकद जितकी जबरदस्त होती तितकीच शक्ती होती त्यांच्या जादूमय वाणीत. इथून सुरू झाली माणेकशॉ यांचे दलातील अगदी शेवटच्या सैनिकाला केवळ आपल्या वाणीने जिंकण्याची विलक्षण असे कौशल्य. पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व अधिकार्यांना आणि सैनिकांना उद्देशून भाषण केले (ज्याची प्रत दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात असलेल्या मिलिटरी हेडक्वार्टर्समध्ये तसेच तत्सम अन्य महत्वाच्या - ५६ जीपीओ सारख्या - मिलिटरी डेपो लायब्ररीत जाणीवपूर्वक जपून ठेवण्यात आली आहे...). भाषणात त्यांनी सांगितले की, 'एक लक्षात ठेवा हा जो चिनी सैनिक आहे तो काही १० फूट उंच नाही...आहे तो तुमच्यामाझ्यासारखाच...तो पुढे आला म्हणजे त्याने त्याच्या अधिकार्याने सांगितलेल्या आज्ञेचे पालन केले म्हणून...जे आजपासून तुम्ही कराल." माणेकशॉ यांचे पुढील वाक्य तर कायमचे सैनिकानी आपल्या मनावर कोरून ठेवण्यासारखे आहे...ते म्हणाले, "आजपासून माझ्या लिखित ऑर्डरशिवाय एकही सैनिक युध्दभूमिवरून माघार घेणार नाही हे लक्षात ठेवा....आणि आता हेही लक्षात ठेवा की, अशी कोणतीही लेखी ऑर्डर मी काढणार नाही..." व्वा ! याला म्हणतात सेनाधिकारी ! असा अधिकारी मिळाल्याने भारतीय सैन्याने गमावलेले ते धैर्य परत मिळविले आणि 'भिंतीला पाठ दाखविण, पण शत्रूला दाखविणार नाही...' हे वचन अंमलात आणले, जे पुढील दोन पाक युध्दात प्रकर्षाने जाणविले.
(हाच तो ऐतिहासिक क्षण : ले.जन.जगजितसिंग अरोरा [सॅम यांचा लाडका 'जग्गी'] भारताच्या बाजूने पाक शरणागतीचे दस्ताऐवज घेताना. सही करणारे पाक ले.जनरल 'टायगर' नियाझी.)
.....(पुढे चालू....)
इन्द्रा
In reply to लिहित राहा. फारच छान वाटलं. by अप्पा जोगळेकर
In reply to सुंदर by विनायक प्रभू
In reply to सुंदर लेख इन्द्रा! by पैसा
In reply to इंद्रराज, by श्रावण मोडक
In reply to नेहरू, मेनन.....खुशवंतसिंग, माणेकशॉ by इन्द्र्राज पवार
येथील सदस्यांना राजकारणाची ही कबर खणल्याचे आवडणार असेल तर पुढे हा विषयदेखील घेऊ या; या निमित्ताने.अर्रे,,, हे काय विचारणं झालं? लिहाच.
In reply to लिहाच by श्रावण मोडक
In reply to लिहाच by श्रावण मोडक
In reply to नेहरू, मेनन.....खुशवंतसिंग, माणेकशॉ by इन्द्र्राज पवार
In reply to सुंदर लेखन by अडगळ
In reply to सेनानायक by इन्द्र्राज पवार
In reply to एकदम सहमत! by मुशाफिर
In reply to नशीबवान सैनिक... by इन्द्र्राज पवार
In reply to एकदम सहमत! by मुशाफिर
In reply to बा मुशाफिरा.. मानले! by संजय अभ्यंकर
हाच तो ऐतिहासिक क्षण : ले.जन.जगजितसिंग अरोरा [सॅम यांचा लाडका 'जग्गी'] भारताच्या बाजूने पाक शरणागतीचे दस्ताऐवज घेताना. सही करणारे पाक ले.जनरल 'टायगर' नियाझी.हे असे, खरा इतिहास जागता ठेवणारे फोटो नेहमी पेपर मध्ये आणि टिव्हीवर का दिसत नाहीत... हे खरे इंडियन आयडॉल्स आहेत! इंद्रराज यांचे लेखन वाचत असतो, फार उत्तम लिहिता तुम्ही. पुढील भागाची वाट पाहत आहे.
In reply to आयडॉल्स by इन्द्र्राज पवार
In reply to आयडॉल्स by इन्द्र्राज पवार
In reply to नेहमी प्रमाणेच सुंदर व by परिकथेतील राजकुमार
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to वाचकाची प्रतिक्रिया by इन्द्र्राज पवार
In reply to इन्द्रा, ही माशी ज्यांच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to उपेक्षा by इन्द्र्राज पवार
In reply to उपेक्षा by इन्द्र्राज पवार
In reply to नीट वाचून प्रतिक्रिया देईन ४ ऑक्टोबरला. by सुधीर काळे
In reply to आज या लाडक्या फिल्डमार्शल चा by महासंग्राम
लिहित राहा. फारच छान वाटलं.