शाब्द ज्ञान
(कल्पनारम्य कथा)
- - -
असिद्धवदत्रा! भाति सर्वं शब्देन विना । येथे सर्व काही असिद्ध असल्यासारखे भासतंय हो! शब्दांविना बुद्धी काही समजूच शकत नाही, असे तर नाही ना? नासदासीन्न सदासीत् । "असणे" आणि "नसणे" हेच शब्द नसले तर ज्ञान कुठले? तसे नव्हे. काहीतरी आहे. शब्द नसले तरी संवेदनांमधून काही कळते. नावे नाहीत म्हणजे ज्ञानच नाही, हा भ्रम आहे. "नाव" हे कसले नाव? नाव म्हणजे संकेत-शब्द. "शब्द" हे कसले नाव? शब्दच माहीत नसता, शब्दांतच शब्दांची व्याख्या शक्य नाही. मग व्याख्यांबद्दल कुतूहल तरी शब्दांविना कसे शक्य आहे? कुतूहल म्हणजे ज्ञानासाठी तहान. तहान ही संवेदना आहे. शब्दांशिवायही संवेदना आहेतच.
व्याख्या न करताच ध्वनी केला. "अ" - असा ध्वनी केला. यात संकेत कसला? संकेताविना ते नाव नव्हे. सर्वनाम्नः स्म... सर्व नावांचा संकेत होऊ लागेल की हा एक ध्वनी! याने ज्ञानाची तहान भागणार नाही. एकच नाव असेल, तर "काहीतरी आहे" इतकेच कळते. अप्रकेतं सलिलं सर्वमा इदम् । कुठलीच आकृती स्पष्ट नसलेला जलप्रलयच की हा!
ज्ञानाची तहान म्हणजे कामना. कामस्तदग्रे समवर्तत । कामना ही आधी उद्भवली. हे एक आहे त्याचे अनेक व्हावेत. मग? सर्वस्य द्वे । सर्व काही द्विगुणित केले. किंवा द्विगुणित झाले, म्हणा. कामना दोन करते म्हणा किंवा दोन जाणते म्हणा. "अ अ" । मग? "अ अ अ अ". पुनरावृत्तीमधून काळ मापला जातो. त्याहूनही - पुनरावृत्तीतून काळाचे ज्ञान होते. "आता ऐकल्यासारखाच ध्वनी पूर्वी कधी ऐकला होता" ही स्मृती म्हणजे भूतकाळाचे ज्ञान. "आता ऐकू येते तो ध्वनी थांबेल मग पुन्हा असाच ध्वनी ऐकू येईल" ही अपेक्षा म्हणजे भविष्यकाळाचे ज्ञान.
वृद्धिरा! तदैजते । मग शब्दांच्या वैशिष्ट्याची वाढ फोफावते. वेगवेगळ्या स्वभावधर्माच्या ध्वनी-आकृती उत्पन्न होऊ शकतात. जी "ही", ती "ती" नाही. आणखी कुठली, ती वेगळीच कुठली ध्वनी-आकृती. वेगळ्या ध्वनींचे वेगळे शब्द. वेगळ्या पदार्थासाठी वेगळा ध्वनी, वेगळ्या व्यक्तीसाठी वेगळा ध्वनी जोडला जातो. तिरश्चीनः शब्दरश्मिर्विततः । शब्दाचे किरण आडवे ओढले. त्याच्या प्रकाशात अचानक सर्व काही वेगवेगळे प्रकट झाले. शब्दांचा स्फोट झाला म्हणजे एका-एका वस्तूच्या ज्ञानाचा स्फोट झाला. शब्दांमध्ये अर्थ वाहायची शक्ती आहे. अर्थः पदम् । अर्थवाही शब्द म्हणजे "पद".
पदांनी विश्वातल्या वस्तूंना नावे मिळालीत तरी ज्ञानाची तहान भागली नाही. नावे दिलीत फक्त, तर सर्व काही निर्विकार आहे, असा समज होतो. ते सत्य नाही. काळ बदलतो तसे आहे-नाही ते बदलते, हे स्पष्ट जाणवते. काळ जातो तसा पदार्थांचा संयोग-वियोग जाणवतो, व्यक्तींचे होणे-लय पावणे संवेदनेला जाणवते. शब्दाने काळ कळतो, व्यक्ती कळतात : पण अजून काळाने केलेला व्यक्तिविकार, पदार्थविकार शब्दांत मावत नाही. हा सर्वांचे शाब्द ज्ञान कसे व्हावे?
समर्थः पदविधिः । पदांची जोडणी हे करायला समर्थ आहे. पदांची जोडणी म्हणजे पदांची व्यवस्था. त्यातून पदार्थांचे संबंध कळतात. होणे-लयास जाणे, संयोग-वियोग त्या जोडणीतून सांगता येते. त्या व्यवस्थेतून व्यक्तींचा संबंध, काळाने केलेले पदार्थांतले, व्यक्तींतले विकार सांगता येतात. मग काय?
प्रत्ययः । प्रत्यय येतो. विश्वाचे संवेदनाज्ञान शब्दांच्या पूर्वीचे आहे, हे सांगितलेच आहे. पण ते ज्ञान म्हणजे प्रत्यय नव्हे. ती पश्यंती (बघणारे ज्ञान) होय. पश्यंतीचे ज्ञान प्राकृतिक आहे, स्थितीशील आहे. जमीन पाऊस प्राप्त करते, तशी शब्दाविना पश्यंती संवेदना प्राप्त करते. परश्च? शब्दानंतर? मध्यमा (मनातली भाषा) आणि वैखरी (स्पष्ट-ध्वनिरूप भाषा) तथ्याचे भिन्न-भिन्न वस्तू म्हणून विश्लेषण करतात, आणि वाक्यांनी, काव्याने पुन्हा भिन्न-भिन्न वस्तूंचे एकत्रीकरण करतात. पश्यंतीने बघितलेल्या असिद्ध संवेदनांमधून सिद्ध ज्ञान जन्माला घालतात. स्वौजसम् । आपल्या ओजाला प्रकट करतात. जणू जमिनीत पावसानंतर बीज अंकुरावे.
कोणाकरिता हे? कोणाला सर्व ज्ञान कधीतरी होईल काय? तस्मै हितम् ? त्याच्या हिताकरिता? य एतज्ज्ञानं दधे सो अङ्ग वेद यदि वा न वेद । जो हे ज्ञान धारण करेल त्यालाही हे कळेल का - नव्हे, निश्चितच कळणार नाही.
- - -
ही शाब्दज्ञानाच्या जन्माबद्दल कल्पनारम्य कथा आहे. इतिहास किंवा तर्क नव्हे. विरंगुळा म्हणून काही व्याकरणसूत्रे (मुळातल्यापेक्षा वेगळ्याच अर्थाने) उद्धृत केलेली आहेत. शिवाय नासदीय सूक्तातली काही वाक्ये विखुरलेली आहेत - त्यांचे शब्दार्थ बर्यापैकी ठीकठाक आहेत. उद्धरणांची सूची येणेप्रमाणे -
पाणिनीय सूत्रे - असिद्धवदत्राभात् । पा० ६.४.२२ ॥ सर्वनाम्नः स्मै । पा० ७.१.१४ ॥ सर्वस्य द्वे । पा० ८.१.१ ॥ अ अ । पा० ८.४.६८ ॥ वृद्धिरादैच । पा० १.१.१ ॥ समर्थ: पदविधि: । पा० २.१.१ ॥ प्रत्ययः । पा० ३.१.१ ॥ परश्च । पा० ३.१.२ ॥ स्वौजसम्० । पा० ४.१.२ ॥ तस्मै हितम् । पा० ५.१. ५ ॥
हे सूत्र ऐंद्र व्याकरणातले - अर्थ: पदम् ।
नासदीय सूक्तातील वाक्ये - नासदासीन्न सदासीत् । अप्रकेतं सलिलं सर्वमा इदम् । कामस्तदग्रे समवर्तत । तिरश्चीनो रश्मिर्विततः । दधे । सो अङ्ग वेद यदि वा न वेद ।
(मूळ संस्कृत लेख प्रकाशित झाल्यावर त्याचा दुवा येथे देईन.)
वाचने
5152
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
तथास्तु!
हे राम!
+१
In reply to हे राम! by सहज
काल्पनिक घटनाक्रम
In reply to +१ by नितिन थत्ते
हे लिखाण
परत वन्चन
कथा आवडली.
ज्ञान
वाचले. कळले नाहि
म्हणजे मी
In reply to वाचले. कळले नाहि by ऋषिकेश
+ १
In reply to म्हणजे मी by मस्त कलंदर
अहो,
मला अंधुकसे समजलेले...
In reply to अहो, by रामदास
प्रथमार्धाचा असा अर्थ करता येईल खरा
In reply to अहो, by रामदास
मराठीत अनुवाद
छान लेख!
अरेच्चा!!!
In reply to छान लेख! by चतुरंग
हो साष्टांगच आहे तो!
In reply to अरेच्चा!!! by बिपिन कार्यकर्ते
भाष्य