२७ डिसेंबरची ती संध्याकाळ आम्हा चौघांच्या आयुष्यातील संस्मरणीय सोनेरी किरणांनी सजली , 'वेलकम टू कन्याकुमारी या अक्षरांची कमान पाहताना गेल्या तेरा दिवसाचा सायकल प्रवास नकळत डोळ्यासमोर ओझरता वाहू लागला गेली दोन आठवडे या ठिकाणाची अनामिक ओढ लागली होती , त्या ओढीनेच पॅडेलवर फिरणारे पाय थकले नव्हते कि चार राज्याच्या प्रवासातून शरिर थकले नव्हते , निसर्गाच्या सानिध्यात आधीच ताजेतवाने झालेले मन आता जल्लोष करण्यासाठी आतूर झाले होते .
ही गोष्ट आहे चार वेड्या भटक्यांची , १५०० किमी सायकल प्रवासाची , जंगलाच्या गंभीरतेची आणि सागराच्या धुंद लाटांची . येस वूई डीड इट ...........
केड्या च्या सुपिक डोक्यात पुणे कन्याकुमारी सायकल राईड करायची असा विचार आला आणि त्याने तो बोलून दाखविला आणि कन्याकुमारीचे वारे डोक्यात घूमू लागले ,गेल्या दोन वर्षात या ना त्या कारणाने डिसेंबर ची कन्याकुमारी सायकल राईड रद्द होत होती , या वर्षी तिला हिरवा कंदील मिळाला ,आता नव्या भिडूंबरोबर का होईना ही सायकल सफर सुरु होणार होती. प्रशांत ,संग्राम ,शैलेश आणि मी चौघांचा संघ मोहीमेसाठी सज्ज झाला. तसे गेल्या वर्षी पुणे कोकण गोवा अशी समुद्राच्या बाजूने अमित ,केदार च्या साथीने केलेल्या सायकल राईड मुळे खूप दिवसांचा सायकल दौरा शक्य आहे एवढा आत्मविश्वास होता शिवाय अधून मधून सायकल सायकल समुहाच्या भिडूबरोबर केलेल्या ५० ते १०० किमीच्या राईडस मुळे तयारीही होत होती . क्न्याकुमारी सफरीची वेळ जवळ आल्यावर मात्र आवश्यक त्या गोष्टी आचरणात आणल्या ज्यात पौष्टीक खाणे,योग्य प्रमाणात पाणी पिणे , छोट्या अंतराच्या का होईना पण नियमित सायकल राईड करणे हे ओघाने आले होते .
दिवस पहिला - पुणे कराड
१५ डिसेंबर ची पहाट ,डोळ्यात पुणे कन्याकुमारी सायकल सफरीचे स्वप्न घेवून झोपेतून जाग आली. सायकल बॅग आणि बाकीची तयारी रात्रीच करुन ठेवली होती त्यामूळे सकाळी फक्त अत्यावश्यक विधी उरकून आणि बायकोने सकाळी उठून बनवलेला नाष्टा हादडून मी सायकलवर बसलो .वडगावच्या पुलाखाली भेटायचे असे ठरले होते, आमच्या सायकल सायकल समुहाच्या इतर सदस्यानाही या सफरीचे भलते कुतूहल होते, मी तिथे पोहचण्याआधी मोदक आणि सागर (समुहाचा एकमेव पहाटेचा रायडर - कारण हा उजेड पडायच्या आत राईड करुन घरी पोहचतो) आम्हाला निरोप देण्यासाठी हजर होते . हळू हळू या गँग मध्ये केदार, अनूप ही मंडळीही सामिल झाली . तेवढ्यात आमचे सायकलवरुन मुख्य रायडर क्र २-आबा उर्फ संग्राम सायकलवरुन आला ज्याच्यामागे त्याची अर्धांगिनी आणि त्याची गोड मुलगीही त्याला निरोप द्यायला वडगाव पूलापर्येंत आल्या होत्या. जरा गप्पा टप्पा आणि चहापानाचा कार्यक्राम चालू झाला . याच दरम्यान आमच्या सायकल समुहाचे प्रेरणास्थान असलेला सिध्दूने ६०० किमीच्या बीआरएम साठी सायकलींग सुरु केले होते. आम्हाला रस्त्यावर पाहून तो ही थांबला थोड्याशा गप्पा टप्पा करत त्याच्याकडचे एक छानसे ब्लिंकर संग्राम ला देवून तो बीआरएम ६०० किमी साठी मार्गस्थ झाला. अजूनही आमचे दोन रायडर पिंपरी चिंचवड वरुन येणार होते , त्यांना वेळ होणार हे अपेक्षित होते पण जास्त वेळ होणार हे अपेक्षित नव्हते . अखेर तेही उगवले रायडर क्र ३ प्रशांत उर्फ सरपंच आणि रायडर क्र ४ शैलेश उर्फ पीटर साधारण ७ च्या दरम्यान पोहचले समुहाचे अजून एक सद्स्य उत्तेकर आणि आबांचे मित्र सचिन, प्रसादसुद्धा निरोप द्यायला पोहचले. आणि थोडावेळ फोटोसेशन करुन आम्ही चौघे सायकलवर स्वार झालो.
कात्रज च्या दिशेने चार सायकल ,त्यावर बसलेले भटके आजच्या प्रवासाचा विचार करत घाट चढू लागले , सकाळच्या उत्साहात घाट सहज पार करत बोगद्यापर्यंत पोहचलो.
तिथेही फोटोसेशन करुन आजचा १६० कीमी चा प्रवास असाच निवांत करु असा बेत करुन पुढे सरकत राहिलो. बोगद्यानंतर पुढे काही अंतर हलकासा उतार असल्याने सायकल चांगल्या वेगाने धावते याचा अनुभव याआधी होता त्यामूळे इकडे सायकल रेमटवत म्हणता म्हणता शिवापूर टोलनाका ही ओलांडला . पुढे खंबाटकीच्या ८-१० किमी आधी राजगड नावाच्या हॉटेलवजा टपरीवर मस्त मिसळ चेपली , चहा मारुन त्याच उत्साहात खंबाटकी पायथा गाठला .
आतापर्यंतच्या राईडमध्ये सर्वात चांगली गोष्ट ही होत होती कि सर्वांचा सायकल चालवण्याचा वेग जवळपास सारख होता त्यामुळे कोणीही नजरेआड जाईपर्यंत पुढे किंवा मागे राहत नव्हते. खंबाटकी घाट तसा कठीण नाही पण जास्त उन्हात आणि जड वाहनांच्या वर्दळीत वेळ खाऊ शकतो म्हणून उन डोक्यावर पडायच्या आत तो पुर्ण करायचा अस ठरवलेले होते त्याप्रमाणे घडलेही. घाटमाथ्याच्या जरासे आधी डाव्या बाजूला दत्तमंदीराशेजारील विहीरीतून मिळालेल्या थंड पाण्यामुळे फारच ताजेतवाने झाल्यासारखे वाटले.
आता आम्ही खरोखर सायकलींगच्या मूड मध्ये पोहचलो होतो, खंबाटकिचा उतारावर पक्ष्याप्रमाणे घिरक्या हाणत सुरुर फाटा गाठला , पुढे हसत खेळत,फोटोग्राफी , नदी आणि डोंगर बघत सधारण २० किमी वर असलेल्या साता-यात पोहचलो. एव्हाना पोटात कावळे ओरडायला चालू होते. चूल आनंद नावाच्या हॉटेलात शिरुन पनीर बटर आणि इतर भाज्यावर यथेच्छ ताव मारला.
उर्जेचा पुरवठा झाल्याने शरिर पुन्हा सायकलींग साठी सज्ज झाले. पुणे बंगलोर हा महामार्ग चांगला रुंद आणि चांगल्या स्थितीत असल्याने सायकलींग सुसह्य होते, दूपारी थोडासा उन्हाचा कोप सोडला तर बाकी सर्व गोष्टी अनुकूल झाल्या होत्या, मसूर टोल नाक्यावर चहा साठी १५ मीनिटे थांबून संधीप्रकाशात आम्ही कराड मध्ये पोहचलो .
पहिल्या दिवस अखेर अपेक्षित १६० किमी चा टप्पा ओलांडल्याचे समधान सर्वांच्या चेह-यावर दिसत होते , हॉटेलसाठी फारशी शोधाशोध न करता जवळच दिसलेल्या हॉटेल पंकज मध्ये शिरलो .
थोडासा आराम आणि आंघोळ आटोपली. रात्री तिथेच पवन केटरिंग वाल्यांची गुजराती व्हेज थाळी दिसली ज्यात गाजर हलवा , खीर असा जीभेचे चोचले पुरविणारा जिन्नस मिळाल्याने मंडळी खूष झाली .
भरपेट भोजनाचा आस्वाद घेत गप्पांची रंगत वाढली. रात्री झोप यायची वाट पहावी लागली नाही , बेडवर आडवे होताच समाधी लागली आणि पहिल्या दिवसाचा प्रवास ओघात पुर्ण झाला.

वाचने
19968
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान वर्णन
वा !
छान लिहिलेय.
वा!
फोटो अपडेट केले
In reply to वा! by कंजूस
सहल आवडू लागली आहे.
सुरवात छान झाली आहे किकू !
जोरदार लिखाण, बहारदार फोटो..
मस्तं सफरवर्णन आणि फोटो !
वा, छान प्रवासवर्णन! आले
आता दिसत आहेत सर्व फोटो.
व्वा!
वाह, बहारदार सायाकल
अरे वा !!!
गावी येउन संपर्क न
वर्णन आवडले पुभाप्र...
In reply to गावी येउन संपर्क न by दुर्गविहारी
सर्वांचे मनापासून आभार
वा! झकास!! ....
शुक्रवारी चार वाजता गुरुजींचा
आता आबा आणि पीटरचे वर्जन पण
In reply to शुक्रवारी चार वाजता गुरुजींचा by प्रशांत
मस्तं जोडवर्णन. मुकुट खास
In reply to शुक्रवारी चार वाजता गुरुजींचा by प्रशांत
भारीच
पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल)
सायकलिंग विषयी अधिक माहिती
In reply to पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) by ओम शतानन्द
भारीच आहे
जय हो !!
सायकल ला बॅग
सॅडल बॅग
In reply to सायकल ला बॅग by झिंगाट
पुढचा भाग कुठे आहे ?