मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सिंहलव्दीपाची सहल : ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी

डॉ सुहास म्हात्रे · · भटकंती
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...     ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...     ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...     ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...     ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...     ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...     १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...     १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...     १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त) ==================================================================

डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...

================================================================== गाडी परत पाचूच्या महिरपीतून धावू लागली आणि त्या दोनेक तासांच्या प्रवासात मी सरळ मागच्या आसनावर ऐसपैस बसून कधी बाहेरचे निसर्गसौंदर्य पहा तर कधी मस्त डुलकी घे असा कार्यक्रम चालू ठेवला. आज सहलीचा दुसरा दिवस उजाडला. दम्मामपासून निघाल्यानंतर झालेल्या गेल्या दीड-दोन दिवसांच्या धावपळीने इतका थकवा आला होता की, पोलोन्नारुवाच्या डियर पार्क रिसॉर्टवर पोहोचल्यावर शॉवर, जेवण आणि बिछाना या पलीकडे काही सुचले नव्हते. रात्री ओंडका का काय म्हणतात तो असल्याइतकी इतकी गाढ झोप लागली होती. पण सकाळी जाग आली तेव्हा नवीन आकर्षणांच्या ओढीने बहुतेक शीण पळाला होता. आजचा दुसरा दिवसही भरगच्च कार्यक्रमाने भरलेला आहे हे आठवून भराभर सकाळचे कार्यक्रम आटपून खोलीबाहेर पडलो... आणि दिसले की, "अरे आपण जंगलातच झोपलो होतो की! ". अर्थातच, कमरेला लावलेले कॅमेरा नावाची बंदूक उपसून, क्लिक्, क्लिक् असा गोळीबार करत, त्या जंगलातून मोठ्या कष्टाने वाट काढत, भोजनगृहापर्यंत पोहोचणे कसेबसे शक्य झाले !...

 पोलोन्नारुवामधिल डियर पार्क रिसॉर्ट ०१

.

 पोलोन्नारुवामधिल डियर पार्क रिसॉर्ट ०२

.

 पोलोन्नारुवामधिल डियर पार्क रिसॉर्ट ०३

कालच्या थकव्यात आणि संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात या परिसराकडे फारसे लक्ष गेले नव्हते. रिसॉर्ट अगदी जंगलात असल्याचे वाटावे इतक्या घनदाट झाडीत असले तरी खोल्यांतील व्यवस्था आधुनिक होती व मुख्य म्हणजे न्याहारीत विविधता होती... आणि अर्थातच फळांची रेलचेल होती. वेगवेगळ्या पदार्थांनी सजलेले टेबल पाहून पोटाने दिलेल्या जोरदार हाकेला ओ देऊन, न्याहारीवर हल्ला करून तिचा यथेच्छ फन्ना उडवला! सज्जड न्याहरीबरोबर व नेहमीच्या फळांबरोबरच एक दोन अनवट श्रीलंकन फळांचा आस्वाद घेऊन बाहेर पडलो.

*********************************

आजच्या दिवसाचा आराखडा असा होता...

 सिंहलव्दीपाची सहल : दुसरा दिवस - पोलोन्नारुवा --> गल विहारा --> कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान --> पोलोन्नारुवा (वस्ती) (मूळ नकाशा जालावरून साभार)

*********************************

पोलोन्नारुवा (Polonnaruwa)

पोलोन्नारुवा हे प्राचीन श्रीलंकेतील अनुराधपुरानंतरचे सनावळीप्रमाणे आणि आकारमानाप्रमाणेही दुसर्‍या मोठ्या राजधानीचे ठिकाण आहे. हे एक युनेस्कोप्रणित जागतिक वारसा स्थान आहे. महावेली नदीच्या काठावर वसलेले हे नगर अनुराधापुराइतकेच जुने आहे. याच्यापासून जवळच विजिथागामा येथे इ स पूर्व ४०० मध्ये वस्ती असल्याचे पुरातत्त्व संशोधकांचे व लिखित ग्रंथांतले दावे आहेत. सिंहली भाषेत कापसाला पुलुन म्हणतात व मारुवा म्हणजे वस्तुविनिमय (बार्टरींग) यावरून हे शहर कापसाच्या विक्रीचे केंद्र असावे व त्यावरून त्याचे नाव पडले असावे असा एक दावा आहे. चोल राजा पहिला राजराजन याने इ स १०१७ मध्ये अनुराधापुराचा पाडाव करून राजा पाचवा महिंदा याला बंदी करून भारतात आणले व भारतातच महिंदाचा १०२९ मध्ये मृत्यू झाला. या विजयानंतर चोलांनी राजधानीचे ठिकाण अनुराधापुराहून पोलोन्नारुवाला हलवले, नगराचे नाव जयनाथमंगलम् असे बदलले आणि तेथून श्रीलंकेवर ५२ वर्षे राज्य केले. श्रीलंकेतील चोल राजांचा पराभव केल्यावर सिंहला राजा पहिला विजयबाहूनेही या शहराला आपली राजधानी बनवली आणि तेथून श्रीलंकेत सिंहला राजवंशाचा एकछत्री अंमल स्थापन केला. पोलोन्नारुवा कालखंडातले पहिला पराक्रमबाहू व निस्सानकमला हे दोन बलशाली राजे सोडले तर इतर सिंहला राजे कमकुवत निघाले. राजदरबारातील कलहांवर ताबा न ठेवता आल्याने त्यांनी सत्ता हाती ठेवण्यासाठी दक्षिण भारतातील बलवान राजांशी रोटीबेटी संबंध सुरू केले. काही कालाने याचा परिणाम दक्षिण भारतातून श्रीलंकेवर आक्रमणे होण्यात झाला. भारतीय पांडियन राजघराण्यातील 'पराक्रमा पांडियन' नावाच्या राजाने पोलोन्नारुवा राज्यावर हल्ला करून तेथे १२१२ ते १२१५ या काळात राज्य केले. त्यानंतर आर्यचक्रवर्ती राजघराण्यातला राजा कलिंग माघ याने प्रथम जाफना जिंकून तेथे आपल्या राज्याची स्थापना केली. नंतर त्याने पोलोन्नारुवा काबीज केले व तेथे १२३६ मध्ये पाडाव होईपर्यंत राज्य केले. अश्या रितीने विविध संस्कृतींच्या राजवंशांच्या राजधानीचे स्थान असल्यामुळे पोलोन्नोरुवाच्या स्थापत्यावर अनेक भारतीय व सिंहला शैलींची छाप आहे. चोल राज्यांच्या कालात हिंदुधर्माचे प्राबल्य होते. त्या काळी शिवमंदिरांची उभारणी झाली व पायर्‍यांमध्ये वापर केला जाणार्‍या चंद्रशिलेच्या रचनेतून शिवाचे वाहन असलेल्या बैलाचे चिन्ह काढून टाकले गेले. बौद्ध कालात, पहिला विजयबाहू व पहिला पराक्रमबाहू यांच्या कालखंडांत अनेक नवीन विहारांची रचना व जुन्यांची डागडुजी केली गेली. या दोन्ही कालांत लोकमनात दबदबा निर्माण करणारे महाप्रसाद, रुग्णालये, इत्यादीसारखी बांधकामे व अनेक बागबगीचे बनवले गेले. राजकालांशी संबंधीत धर्मस्थानांना व त्या धर्मांशी निगडित शिक्षणसंस्थांना राजाश्रय मिळून त्यांचा विकास झाला. अर्थातच, या नगरीचे स्थापत्यवैभव व आकारमान १४ व्या शतकापर्यंत उत्तरोत्तर वाढत गेले. इतर काही कारणे असली तरी, मुख्यतः दक्षिण भारतातून होणार्‍या सतत आक्रमणांमुळे राजधानीचे ठिकाण पोलोन्नारुवाहून कायमस्वरूपी हलवले गेले. यानंतर हे शहर ओस पडले. सहा शतके दुरवस्थेत गेलेल्या या शहराचे अनेक अवशेष आजही त्या शहराच्या सुवर्णकालाची झलक आपल्याला दाखवतात. चला तर, करूया वैविध्यपूर्ण पोलोन्नारुवा नगरीचा फेरफटका सुरू...

 पोलोन्नारुवाचे विहंगम दर्शन (जालावरून साभार)

.

पराक्रमसमुद्र

राजा पहिला पराक्रमबाहू याचा कालखंड पोलोन्नारुवाचा सुवर्णकाल समजला जातो. या काळात व्यापार व कृषीउद्योगांची भरभराट झाली. हा राजा जलनियोजनाबाबत इतका सजग होता की आकाशातून पडणारा एकही थेंब वाया जाता कामा नये असे त्याचे मत होते. अर्थातच, पोलोन्नारुवामधील जलप्रणाल्या अनुराधापुरापेक्षा अधिक विकसित होत्या आणि त्यापैकी बर्‍याच प्रणाल्या ८-९ शतकांनंतर आजही उन्हाळी भातशेती करण्यासाठी वापरल्या जात आहेत. यातील एक पराक्रमसमुद्र नावाची जलप्रणाली संपूर्ण शहराभोवतीचा खंदक आणि शहराची जीवनवाहिनी असे दुहेरी काम करत असे. ही विशाल जलप्रणाली पाच सरोवरे/धरणे व त्यांना एकमेकांशी जोडणारे रुंद कालवे मिळून बनलेली आहे. ती बर्‍याच ठिकाणी इतकी रुंदी आहे की एका किनार्‍यावर उभे राहिल्यावर पलीकडचा किनारा डोळ्यांना दिसत नाही. तिच्या जलसाठ्यांत अनेक छोटी बेटे सुद्धा आहेत आहेत...

 ... पराक्रमसमुद्राच्या भव्यतेची कल्पना देणारी दोन प्रकाशचित्रे (जालावरून साभार)

.

राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद"

या थक्क करणारे स्थापत्य असलेल्या भव्य सात मजली इमारतीत एक हजार खोल्या होत्या असे म्हणतात. खोल्यांच्या एकूण संख्येबाबत दुमत असले तरी तेथे पराक्रमबाहूच्या नावाला साजेश्या संख्येच्या खोल्या असणार याची खात्री त्याला पाहिल्यावर पटते. उरलेल्या चौथर्‍यावरून व इतर अवशेषांवरून या इमारतीच्या विशालतेची कल्पना येते...

 राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद" ०१ : समोरील बाजूने अवलोकन

.

 राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद" ०२ : मागच्या बाजूने अवलोकन

या इमारतीच्या १ ते ९ मीटर जाडीच्या भिंती जवळून बघितल्यावर खरोखरच छातीवर येतात! भिंतींची इतकी मोठी जाडी बहुतेक इमारतीच्या अनेक मजल्यांचा भार तोलण्यासाठी व महालातल्या जलप्रणालीसाठी असावी. भिंतीतील मोठी छिद्रे बहुदा त्यातून लाकडी तुळया टाकून मजल्यांच्या जमिनी बनविण्यास वापरलेली असावी. ८०० वर्षे उघड्यावर निसर्गाचे आघात सहन करूनही या इमारतीचा गिलावा काही ठिकाणी उरलेला आहे. राजमहालाभोवती राजदरबारातील मंत्री, सैन्याधिकारी व सेवकांच्या घरांचे अवशेष (मुख्यतः घरांचे चौथरे) दिसतात...

 राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद" ०३ : मजल्यांच्या व भिंतींच्या आकारमानाचा अंदाज येण्यासाठी मानवाकृतीबरोबर घेतलेला फोटो

.

 ... राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद" ०४ व ०५ : भिंतींच्यामधून सांडपाणी वाहून जायची व्यवस्था व ते वाहून नेणारा नलिकामार्ग

.

 राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद" ०६ : महालाच्या संरक्षक भिंतीच्या पायाचे अवशेष

.

 ... राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद" ०७ व ०८ : महालाच्या संरक्षक भिंतीच्या पायावरची बाहेरच्या बाजूने दिसणारी नक्षी

.

 राजा पहिला पराक्रमबाहूचा राजवाडा, "विजयंतप्रासाद" ०९ : स्नानकुंड

आपण केवळ अवशेष पाहत असलो तरी, स्थापत्यविषारदांनी या प्रासादाचा आराखडा बनवताना व बांधकाम करताना, तो पूर्ण झाल्यावर त्याचे वर्णन करताना "प्रचंड", "विशाल", "महा-" या विशेषणांची गरज वारंवार पडावी असा उद्द्येश डोळ्यासमोर ठेवलेला होता हे मनावर नक्कीच ठसते. . या परिसरात अजून बरेच लहानमोठ्या प्रासादांचे अवशेष आहेत...

 अजून एका भव्य इमारतीचे (थुपारामा) अवशेष

.

शिवमंदिर

चोल राजांची राजधानी असल्यामुळे व चोलांशी लग्नसंबंध झाल्याने हिंदू असलेल्या राण्यांच्यामुळे पोलोन्नारुवामध्ये अनेक हिंदू मंदिरे होती. ती मुख्यतः शिवमंदिरे होती. मात्र या नगराचा उत्तर काल बौद्ध राजांचा असल्याने त्यातील बहुतेक सर्व नष्ट झाली अथवा केवळ अवशेषरुपात उरलेली आहेत. हे त्यातल्या त्यात बरे असलेले एका हिंदू राणीसाठी बांधलेले शिवमंदिर...

 ... एका राणीचे शिवमंदिर व त्यातील पुजारीण

.

पोलोन्नारुवाचे वटदागे किंवा अवशेषमंदिर (Polonnaruwa Vatadage)

वटदागे म्हणजे (बहुतांश वेळा भगवान बुद्धाचे) अवशेष ठेवलेल्या स्तूपांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्याभोवती बांधलेले मंदिर. यांच्या स्थापत्यावर काहीसा भारतीय स्थापत्यशैलीचा प्रभाव असला तरी वटदागे हे केवळ श्रीलंकेत सापडणारे स्थापत्य आहे. वटदागेमध्ये मध्यभागी बुध्दावशेष ठेवलेला किंवा एखाद्या घटनेमुळे पवित्र समजल्या जाणार्‍या भूमीवर बांधलेला एक छोटा स्तूप असतो. त्याच्याभोवती दगडी खांब व विटांचे बांधकाम असलेली व कोरीवकाम असलेली गोलाकार इमारत असते. या इमारतींचे छप्पर बर्‍याचदा लाकडी असे.

 संग्रहालयात ठेवलेले वटदागेचे प्रारूप (मॉडेल)

श्रीलंकेत सद्या फक्त दहा एकच वटदागे उरलेली आहेत. तीही बर्‍याचश्या दुरवस्थेत आहेत. पोलोन्नारुवाचे वटदागे या सर्वात उत्तम अवस्थेतले समजले जाते. पहिल्या पराक्रमबाहूच्या कारकीर्दीत पोलोन्नारुवाचे वटदागे भगवान बुद्धाचा दात ठेवण्यासाठी बांधले गेले. त्यानंतर निस्सांका मल्ल या राजाच्या काळात येथे बुद्धाचे भिक्षापात्र ठेवले गेले.

 पोलोन्नारुवाचे वटदागे किंवा अवशेषमंदिर ०१

.

 पोलोन्नारुवाचे वटदागे किंवा अवशेषमंदिर ०२

.

कीर्ती विहार

हा पोलोन्नारुवामधील सर्वात मोठा व २४ मीटर उंच विहार पहिल्या पराक्रमबाहूच्या सुबद्रा (सुभद्रा) नावाच्या राणीने बांधला. याचे मूळ नाव रूपवती स्तूप होते. ९०० वर्षे निसर्गाचे आघात सहन करत हा स्तूप अजूनही मूळ रूपात राहिला आहे. याच्या बाजूला वरिष्ठ धर्मगुरु व राजघराण्यातील लोकांच्या मृत देहांवर उभारलेले अनेक छोटे स्तूप आहेत. त्यात राजा व राणीच्या नावे बांधलेले दोन स्तूप आहेत असे मानले जाते.

 कीर्ती विहार

.

सतमहाल प्रासादा

पहिल्या पराक्रमबाहूच्या कारकीर्दीत बाराव्या शतकात हे मंदिर बांधले गेले. ही विटांचे बांधकाम असलेली, ९ मीटर (३० फूट) उंचीची, पिरॅमिडच्या आकाराची, कंबोडियन व थाई स्तुपशैलींतली, सात मजली इमारत तिच्या अनवट बनावटीमुळे येथील परिसरात उठून दिसते. तिच्या वास्तुविशारदाबद्दल संभ्रम आहे. हे मंदिर राजाच्या पदरी काम करणार्‍या कंबोडियन सैनिकांनी त्यांच्या उपासनेसाठी बांधले असावे असे समजले जाते. त्याला चारी बाजूने प्रवेशद्वारे आहेत व मजले चढण्यासाठी जिने आहेत. मात्र, सुरक्षिततेच्या कारणासाठी इमारतीत प्रवेश निषिद्ध आहे.

 सतमहाल प्रासादा

.

राजांचे पुतळे

अवशेषांमध्ये बाहेर उघड्यावर हा सुंदर कोरीवकाम असलेला एकाकी पुतळा दिसला. तो एका राजाचा आहे या पलीकडे जास्त माहिती मिळू शकली नाही...

 एका राजाचा पुतळा

पहिल्या पराक्रमबाहूचा ३.४ मीटर उंचीचा एकाच शीळेतून कोरलेला पुतळा मुख्य आकर्षणांपासून दूर एकाकी जागेत आहे असे कळले. मात्र म्हणजे तो पराक्रमबाहूचा पुतळा असण्याबाबत मतभेद आहेत. त्यामुळे वेळ वाचविण्यासाठी त्याला भेट दिली नाही. पण, वाचकांच्या सोयीसाठी त्याचे जालावरून घेतलेले चित्र देत आहे...

 पहिल्या पराक्रमबाहूचा पुतळा (जालावरून साभार)

. इथेही अनुराधापुरासारखीच अवस्था झाली. एका आकर्षणापासून दुसर्‍याकडे धावताना अजून जास्त वेळ हवा होता असे सारखे वाटत राहिले. पण पुढचा कार्यक्रमही एका महत्त्वाच्या आकर्षणाला "गल विहारा" ला भेट देण्याचा होता. त्यामुळे नाईलाजाने पोलोन्नारुवाचा निरोप घ्यावा लागला. (क्रमश : ) ================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुद्धमूर्ती...     ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...     ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...     ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...     ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...     ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...     १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...     १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...     १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त) ==================================================================

डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...

==================================================================

वाचन 16134 प्रतिक्रिया 0