मनमोहक बाली : ०९ : महानाट्य बाली अगुंग आणि इतर काही थोडेसे... इकडचे-तिकडचे (समाप्त)
...बाली थिएटरमध्ये असलेल्या भव्य मंचावर "बाली अगुंग" नावाचे महानाट्य सादर केले जाते. त्याची माहिती आपण पुढच्या भागात घेऊ...
बाली सफारी पार्कची खरी मजा घ्यायची तर पार्कमधील हॉटेलमध्ये दोनतीन दिवस राहून रात्रीची सफारी आणि बाली थिएटरमधील कार्यक्रमासह सगळी आकर्षणे पाहायला हवीत. पण आमच्या रूपरेखेत ते बसण्यासारखे नव्हते. शिवाय हा पार्क आणि त्यातल्या बाली थिएटरचा तर आमच्या भारतीय सहल कंपनीला पत्ताच नव्हता ! ऐन वेळेला आमच्या प्रवासाच्या रूपरेखेत या गोष्टी सामावून घेण्याच्या आमच्या इच्छेला पुरी करण्याचे श्रेय आमच्या मार्गदर्शकाला, कार्तिकला, जाते.
महानाट्य बाली अगुंग
"बाली अगुंग" या नाट्यामध्ये बालीचा इतिहास व दंतकथा यावर बेतलेल्या नाटकसंहितेचे नृत्य, संगीत, बालीच्या कठपुतळी बाहुल्या, चित्ताकर्षक वेशभूषा आणि जागतिक दर्जाचे नेपथ्य व प्रकाशयोजना वापरून अवर्णनीय सादरीकरण केले जाते.स्वागतकक्ष
१२०० प्रेक्षकांना बसण्याची आरामदायी सोय असलेल्या या रंगमंदिराचा स्वागतकक्ष आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून त्याचा उपयोग छोटेमोठे स्वागतसमारंभ करण्यास तसेच नाटकांच्या अगोदर आणि मध्यांतरात प्रेक्षकांना धक्काबुक्की न करता आरामात पेयपान-अल्पोपाहाराचा आस्वाद घेता येईल इतका मोठा आहे. त्याला लागून असलेली बाग मनोहर आहे असे बालीत सांगणे म्हणजे व्दिरुक्तीच होईल...
......
स्वागतकक्ष : ०१ व ०२ (जालावरून साभार)
......
स्वागतकक्ष : ०३ व ०४ (जालावरून साभार)
स्वागतकक्षातला ड्रॅगन
रंगमंच
येथील रंगमंच ८० मीटर लांब, ४० मीटर रुंद आहे. याच्या उंचीबद्दल खात्रीलायक माहिती मिळाली नाही पण माझ्या अंदाजाप्रमाणे ती १५-२० मीटर किंवा जास्त असावी....
विशाल रंगमंच (जालावरून साभार)
कलाकार
येथे होणार्या बाली अगुंग नावाच्या महानाट्याचा प्रयोगात १५० मानवी कलाकार, बालीच्या पारंपरिक कळसुत्री बाहुल्यांचे कलाकार, हत्ती आणि इतर प्राणी काम करतात.कथा
लोकप्रिय राजा श्री जयपंगुस (११७९-११८१) आणि त्याची कांग चिंग वी ही चिनी वंशाची राणी यांची प्रेमकथा बालीचे महाकाव्य समजले जाते. ही मूळ कथावस्तू बालीच्या निसर्गाच्या, संस्कृतीच्या, सामान्य जनजीवनाच्या आणि नेत्रदीपक राजेशाही झगमगाटाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या कलात्मक रितीने सादर केली जाते. अनेक भव्य, चित्ताकर्षक आणि स्वप्नवत प्रवेशांनी हे नाटक प्रेक्षकांना खिळवून ठेवते आणि अनेकदा आश्चर्याने आ वासायला लावते. बाली प्राचीन काळापासून त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे. तसेच ते जलव्यापाराचे महत्वाचे केंद्रही होते. बालीचा राजा श्री जयपंगुस बालीला भेट देणार्या एका चिनी व्यापार्याच्या कांग चिंग वी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. नाटकातला चिनी जहाजाचा बालीच्या बंदरात प्रवेश आणि राजेशाही लग्नसमारंभ आपल्याला त्या काळाचे खरे दर्शन देऊन जातात. राजा राणीसाठी खास नगरी उभारतो आणि तेथे राजधानी हलवतो. मात्र त्यांच्या सुखी प्रेमकथेला गालबोट लागते. अनेक वर्षे जाऊनही राज्याला वारस मिळत नाही. निराश झालेला राजा मोठ्या जलपर्यटनास बाहेर पडतो. त्याचे जहाज प्रचंड वादळात सापडते आणि तो विचित्र प्राण्यांनी भरलेल्या एका अनोळखी जादुई बेटावर जाऊन पडतो. तेथे तो मन:शांतीसाठी तपस्या करू लागतो. जलदेवता दानूच्या आगमनाने त्याची तपश्चर्या भंग होते. देवी दानूच्या प्रेमात पडून राजा तिच्याशी लग्न करतो आणि तेथेच राहू लागतो. त्यांना एक मुलगा होतो. अनेक वर्षे वाट पाहून राणी (कांग चिंग वी) राजाच्या शोधाला बाहेर पडते. तिला राजा आणि दानू त्यांच्या मुलासह सापडतात. राणी रागावून तिच्या सैनिकांना त्यांच्यावर हल्ला करायला सांगते... त्यांत अनेक विचित्र प्राणी आणि नैसर्गिक आपत्ती त्यांचे योगदान मिळून युद्ध अधिकच भिषण होते. राजाच्या पूर्वायुष्याचे सर्व सत्य पुढे आल्याने रागावून आपली दैवी ताकद वापरून देवी दानू राजा आणि राणीचे दगडी पुतळ्यांत रूपांतर करते. मात्र त्यानंतर तिचा राग शांत झाल्यावर बालीच्या लोकांची विनंती मान्य करून ती राजपुत्राला गादीवर बसवून राज्यकारभार सुरू करते. अशी ही काहिशी ऐतिहासिक आणि काहिशी दंतकथा असलेली पण बालीच्या सामाजिक-धार्मिक-सांकृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली कहाणी आहे. राजा-राणीचे आत्मे "बारोंग लादुंग" नावाच्या सिंहासारख्या दिसणार्या पवित्र दैवी प्राण्याच्या रूपात आजही बालीचे रक्षण करत असल्याची बालीच्या लोकांना खात्री आहे. राजा, राणी आणि देवी दानू हे बालीत आजही वरिष्ठ देवतांपैकी मानले जातात. बालीमध्ये दरवर्षी (२१० दिवसातून एकदा) बारोंग लादुंगची मिरवणूक काढली जाते. देवी दानू बातूर सरोवराची जलदेवता आणि सुपीकतेची व धनधान्याची देवता मानली जाते. रंगमंदिरात फोटो काढायला मनाई आहे. परंतू या महानाट्याच्या जालावरून साभार जमा केलेल्यांपैकी काही फोटो येथे दिल्याशिवाय राहवत नाही. त्यांच्यावरून ह्या नाट्याची पूर्ण कल्पना येणार नाही. पण त्याचे शब्दात वर्णन करणे कसे शक्य नाही याची थोडीशी कल्पना जरूर येईल.कलाकारांचे पोशाख
कलाकारांचे पोशाख
......
राजा, त्याच्या उजवीकडे राणी वी आणि डावीकडे देवी दानू.....................राजा आणि राणी
.
जलदेवता दानू
नाटकातील क्षणचित्रे
राजाचा दरबार
चिनी व्यापारी आणि त्याच्या मुलीचे आगमन
राजा त्याच्या प्रेयसीचे स्वागत करताना... दोन खर्या हत्तींच्या सलामीसह
विवाहानंतरचा राजदरबार
समुद्रप्रवासात आलेल्या वादळात विचित्र जलचरांशी सामना करणारा राजा
अनोळखी बेटावरील विचित्र प्राण्यांशी सामना करणारा राजा
देवी दानूचे आगमन : ०१
देवी दानूचे आगमन : ०२
देवी दानू, राजपुत्र, पांढर्या कपड्यातले राजाराणीचे आत्मे आणि जनता... नवीन राज्यकारभाराची सुरुवात... पार्श्वभूमीवर पवित्र बातूर पर्वत
इतर काही थोडेसे... इकडचे तिकडचे
बालीच्या शिल्पकलेचे अजून काही नमुने
......
दोन खास संरक्षक असुर
......
राम .......................................................कुंभकर्ण
बारोंगची मिरवणूक
(जालावरून साभार)
दहनविधी
हा सोहळा अर्थातच सुखकारक नाही आणि त्याकरिता बालीला प्रवासाला कोणीही जात नाही. पण कर्मधर्मसंयोगाने जर कोण्या खास माणसाच्या संदर्भात हा सोहळा बघायला मिळाला तर तो एक जगावेगळा अनुभव नक्कीच असेल...
(जालावरून साभार)
बालीचे समुद्रकिनारे
बाली सुंदर आणि सर्फिंगसाठी जगप्रसिद्ध असलेले समुद्रकिनारे आणि समुद्रकिनार्यावरील रिसॉर्ट यासाठीही प्रसिद्ध आहे. अपुर्या वेळेमुळे माझ्या सहलीच्या प्राधान्यक्रमात ते बरेच खाली असल्यामुळे मी त्यांना काट दिली होती. पण वेळ आणि आवड असल्यास यांचा आनंद जरूर घ्यावा...
......
(चित्रे जालावरून साभार)