मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनमोहक बाली : ०४ : किंतामणी आणि पुरा तिर्ता एंपुल

डॉ सुहास म्हात्रे · · भटकंती
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)... =================================================================== ...केवळ वेळेचे बंधन पाळायला हवे म्हणून जड पावलांनी गाडीच्या दिशेने निघणे भाग पडले. गाडी रस्त्याला लागली आणि बालीच्या नयनरम्य निसर्गातून आमचा प्रवास सुरू झाला. आजच्या सहलीत अनेक छोटे मोठे रोचक थांबे होते. शिवाय प्रवासातल्या अनेक निनावी जागाही इतक्या सुंदर होत्या की डोळ्यांना आणि कॅमेर्‍याला मेजवानीच होती. इथे कार्तिकचा नेहमीचा अनुभव कामाला आला असणार, कारण आम्ही काही म्हणण्याच्या आधी "पाहिजे तेथे फोटो काढायला खुशाल गाडी थांबवायला सांगा" असे त्यानेच सांगून टाकले !

किंतामणी

अगुंग पर्वताच्या उत्तरपूर्वेला असलेल्या बातूर पर्वतावर बालीतील दुसरा महत्त्वाचा जिवंत ज्वालामुखी आहे. हल्लीच्या काळात म्हणजे १८०४ आणि १९६८ सालीही या ज्वालामुखीतून लाव्हाचा उद्रेक झाला होता. त्याच्या २३ ते २८ हजार वर्षांपूर्वी झालेल्या उद्रेकाने बनलेल्या प्रचंड विवरात १० X १३ किलोमीटर आकाराचे बातूर तळे आणि त्या तळ्याकाठी वसलेली प्राचीन पार्श्वभूमी असलेली अनेक गावे आहेत. हा किंतामणी नावाचा भाग त्याचा "स्फोटक" इतिहास, अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि प्राचीन संस्कृती यामुळे बालीतील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण बनले आहे. येथील पर्वतराजीत अनेक सुंदर पर्वतारोहण (ट्रेक) करण्याचे मार्ग आहेत. त्यातले काही तर अगदी बातूर पर्वतशिखरावरील ज्वालामुखीच्या मुखापर्यंत घेऊन जातात. इ स २०१२ मध्ये UNESCO ने या प्रभागाला Global Geopark Network मध्ये स्थान दिले आहे. अनेक आकर्षणे व अपुरा वेळा यामुळे या भागाचा मध्ये मध्ये फोटोथांबे घेत चारचाकीनेच धावता दौरा केला... या रस्त्यावरून पुढच्या थांब्याकडे जाताना अनेक पारंपरिक बालीनीज घरे दिसत होती...

 .

 .

 बातूर पर्वत आणि बातूर तळे

.

 बातूर पर्वताच्या उतारावर आणि बातूर तळ्याच्या काठी वसलेल्या गावांचे विहंगम दृश्य

.

पुरा तिर्ता एंपुल

तंपाक सिरिंग गावाजवळचे हे मंदिर इ स ९६२ मध्ये वर्मदेव राजघराण्यातील राजा इंद्रजयसिंह याने स्थापन केले एका मोठ्या झर्‍याच्या ठिकाणी बांधले. एका दंतकथेप्रमाणे मयदानव नावाच्या असुराने देवांच्या सेनेवर विषप्रयोग केला आणि इंद्राने त्या सैनिकांना या झर्‍याची निर्मिती करून त्याच्या पवित्र पाण्याने परत जिवंत केले. त्यामुळे लोक या पवित्र तीर्थावर डुबकी घेऊन पुण्य कमावायला आणि रोगमुक्तीसाठी येतात. मंदिराच्या आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शिलालेखांप्रमाणे या जागेचे नाव वेगवेगळ्या काळांत "तिर्ता री ऐर हांपुल", "तिर्ता हांपुल" व "तिर्ता एंपुल" असे बदलत गेले आहे. त्यातल्या पहिल्या नावाचा अर्थ "जमिनीतून बाहेर येणारे पाणी" असा आहे. मंदिराच्या आवारात शिरल्या शिरल्या खुद्द देवांचा राजा इंद्र आपले स्वागत करतो...

 ... इथले दुभंगव्दार इंद्राच्या नावाला शोभेल असे भव्य आणि कोरीवकामाने भरलेले आहे. त्याच्या मागे दिसणारा मंदिराचा हिरवागार परिसर मन प्रसन्न करतो...

 आत शिरल्या शिरल्या एका बाजूने बालीनीज ढबीत हिंदी गाणी ऐकू आली. त्या बाजूला पाहिले तर एक बाली महिला गात होती. आश्चर्याने थांबून ऐकू लागलो तर तिने धडाधड आठ-दहा गाण्यांचे मुखडे म्हणून दाखवले. हे सगळे केवळ भारतीय लोक (आम्ही) दिसल्याने गमतीने चालले होते. आमचा फोटो काढा असे म्हणून खरंच फोटो काढताना मात्र बाईसाहेबांनी चेहरा झाकून घेतला...

 हिंदी चित्रपट आणि गाणी बालीत खूप लोकप्रिय आहेत याचे प्रत्यय पुढेही येत राहिले. . देवळाच्या आवारात शिव, विष्णू, ब्रम्हा, बातूर पर्वत आणि इंद्राची देवळे आहेत. भाविकांना आराम करण्यासाठी एक मोठा सुंदर सजावट केलेला मंडप आहे...

 मंडप

.

 पुरा तिर्ता एंपुलचे कोरी अगुंग

.

 ... पुरा तिर्ता एंपुलमधिल अजून दोन कलापूर्ण व्दारे

. इथले सर्वात महत्त्वाचे आकर्षण आहे इथले कोई माश्यांनी भरलेले कुंड आणि त्यात झर्‍याचे पवित्र पाणी सोडणार्‍या (आपल्याकडे गोमुखे असतात तशा) बारा झरण्या. भाविक प्रथम देवळात जाऊन पूजा करतात आणि मग कुंडात उतरून स्नान आणि प्रार्थना करतात. इथले पाणी (गंगाजलासारखे) बाटल्यांत भरून घरी नेण्याचीही प्रथा आहे...

 पवित्र कुंड

देवळाचा संपूर्ण परिसर वृक्षराजीने व वाहत्या पाण्याच्या झर्‍यांनी समृद्ध आणि मन प्रसन्न करणारा आहे...

.

. देवळाचा परिसर अनेक सुंदर दगडी, लाकडी कलाकृतींनी आणि नयनरम्य रंगरंगोटीने भरलेला आहे. त्यातले काही नमुने आपण पाहूया...

 ...

.

.

.

.

.

काय बघू आणि काय नको असे होते. कॅमेर्‍याला ह्या मंदिरात जराशीही फुरसत मिळत नाही. इतक्या सुंदर कलाकृती असलेल्या मंदिरात संरक्षक नाहीत असे कसे होईल ? त्यातले हे दोन नमुने...

 ...

. येथील परिसराला निसर्गाने भरभरून सौंदर्य बहाल केले आहे. त्यामुळे या मंदिरातली मानवी कलाकुसर बघणे हा जितका आनंददायी अनुभव आहे तितकाच आनंद आपली नजर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील निसर्गावर गेल्यावर होतो. या देवळाशेजारी १९५४ मध्ये इंडोनेशियाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षाने (सुकार्नो) आपली सुटी व्यतीत करण्यासाठी एक प्रशस्त बंगला बांधलेला आहे...

बंगल्याचे दोन टेकड्यांवरील दोन भाग जोडण्यासाठी एक खाजगी पूल आहे !...

आजकाल हा बंगला देशाच्या खास पाहुण्यांच्या पर्यटनासाठी वापरला जातो. . हे होते बालीतील अजून एक ठिकाण, जिथून पाय निघणे कठीण होत होते. नाईलाजाने आमचा पुढचा प्रवास सुरू करावा लागला. निसर्गरम्य परिसरातून आमचा रस्ता कधी छोट्या गावातून जात होता...

तर कधी केवळ काही शाकारलेली घरे आणि भाताची खाचरे असलेल्या ग्रामीण भागातून जात होता...

. (क्रमशः ) =================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)... ===================================================================

वाचन 10964 प्रतिक्रिया 0