माझी कविता

रदीफ नाही कधी जुळला ...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
13 Oct 2018 - 8:04 pm

रदीफ नाही कधी जुळला
न कधीही काफिया सुचला
गजल जगण्यातला तरिही
कैफ भरपूर अनुभवला

जिव्हारी लागतिल ऐसे
कितीतरी वार परतविले
तरी एल्गार युध्दाचा
जखम ओली असुन केला

सदैवच लागले होते
ध्यान हे ऐहिकापार
इकडच्या ऊनछायेचा
कधी अफसोस ना केला

कवितामुक्तकमाझी कविता

वृद्धाश्रम

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
17 Sep 2018 - 3:35 pm

वृद्धाश्रम

आज एका आजीला
मी वृद्धाश्रमात पाहिलं
तीच्या डोळ्यातील दुःख
मी जवळून अनुभवलं

ती निराश होती
हतबल होती
दाराकडे नजर रोखून
वाट बघत होती

काय चुकलं तिचं की
वृद्धाश्रमात तिला राहावं लागतंय
सार काही मुलाला देऊन
तिला मात्र अस जगावं लागतंय

डोळ्यातले अश्रु ही
तिचे काही वेळाने थांबून गेले
पुण्य केलं की पाप
हे तिला ही कळेनासे झाले

म्हणुनच म्हणते की ……..

नका रे मुलांनो
वागु असे
आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ
ह्या जगात कोणी नसे

कवितासमाजअभय-काव्यकविता माझीभावकवितामाझी कवितावृत्तबद्ध कविता

शुभ्र सारे जीवघेणे

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
14 Sep 2018 - 9:46 pm

एकटा मी चालताना सावली सोडून गेली
तापत्या सार्‍या उन्हांना हसत ओलांडून गेली
वेदनांना लपवणारे मुखवटे माळून गेली
शुभ्र सारे जीवघेणे सोसण्या सांगून गेली

मुक्तकमाझी कविता

तुझे नाव

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
12 Sep 2018 - 11:37 am

इतके अलगद उच्चारावे नाव तुझे ओठाने
एकाच शब्दामध्ये सामावून गावे अवघे गाणे

काना होऊन वीज रहावी खडीच भूमीवरती
मात्र्याने मग नभासमोर खोटेच द्यावे बहाणे

अनुस्वाराचे टपोर मोती अंगठित सजवावे
रेखीव कोरावीत तयास्तव अर्धचंद्र कोंदने

पाय मोडल्या अक्षरांनी मारावी तिरकी गिरकी
ऊकाराने रुणझुणावे पायात बनून पैंजणे

नदी वळवावी कडेकडेने रफार वेलांटीच्या
विसर्ग घेऊन पुरी सजावी उर्वरित व्यंजने

हरेक वळण, गाठ नि कोन मनामध्ये ठसावा
नाव उमटता सुटून जावे जिंदगीचे उखाणे

-- विशाल

कवितागझलgajhalgazalकविता माझीमराठी गझलमाझी कविता

शब्दांच्या घनगर्द सावलीत

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
9 Sep 2018 - 7:55 pm

तार्‍यांनी गजबजल्या रात्री
चांदणवर्खी प्रकाशलाटा
शब्दांच्या घनगर्द सावलीत
धूसरल्या अर्थाच्या वाटा

त्या लाटांवर हरपे जाणीव
त्या वाटांवर अगणित संभव
जाणिवेतुनी ठिबके नेणीव
संभव सरता उरे असंभव

मुक्तकमाझी कविता

पूर

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
7 Sep 2018 - 8:58 am

इथे गूढ अंधार दाटून येता, तिथे तारकांचे दिवे लागले
मिटताच डोळे हे होतील जागे, पुन्हा आठवांचे थवे मागले

जुनी तीच ओढ, जुनी तीच उर्मी, जुनी तीच ती आर्त व्याकुळता
भरुनी अकस्मात अस्मान येते नि जाते कडाडून विदयुल्लता

दिसेना कुणाला तिच्या अंतरीचे, फुत्कारते जीवघेणे प्रकार
"तिळा तिळा" मी किती घोकतो पण उघडीत नाही का हे कवाड

अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल, डोळ्यांमध्ये उतरते रक्त का ?
पितांबरात घुसमटे एक काया, ये कंठात बावनकशी हुंदका

मनाच्या तळाशी उदसताच पाणी, त्या वेदनांचा का पूर होतो ?
चातकाप्रमाणे आतुर कोणी, उध्वस्त तेव्हा गझल पीत जातो

कविताकविता माझीभावकवितामाझी कवितामुक्त कविता

निघताना....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
23 Aug 2018 - 5:02 pm

मी हळूहळू पण निश्चितपणे
पार दिसेनाशी होईन
तेव्हा तू चौकट ओलांड,
आणि निघताना.....

आपल्या हसल्याबोलल्या
आवाजांची फूले घेऊन ये
आपल्यातल्या गहिवरांचे
कढ, न हिंदकळता आण

मी न ओलांडलेली अंतरे
तू सहजच पार करुन ये
माझे न उच्चारलेले नाव
चारचौघांत सरळच घे

सगळे उठून जातील तेव्हा
आपल्यातल्या शब्दांची
आरास मांड
त्यानंतर आपोआप दिवा लागेल
तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल

मांडणीवावरवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजप्रवासकविता माझीप्रेम कविताभावकवितामाझी कवितासांत्वनाहट्टकरुण

अज्ञाताचा गड चढताना

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Aug 2018 - 7:04 pm

अज्ञाताचा गड चढताना अशी पायरी आली
तर्कबुध्दी थकुनिया त्यावरी विश्रांतिस्तव बसली
उठून गड बेलाग लांघण्या कंबर कसुनी उठली
निरीक्षणाची, निष्कर्षाची वाट पकडुनी चढली

जिथे संपली वाट त्या तिथे काहीतरी लखलखले
त्या तेजातच अज्ञाताचे नवेच दर्शन घडले

मुक्तकमाझी कविता

गर्भार सातव्या महिन्याची

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
1 Aug 2018 - 10:28 am

जिच्यासाठी झटून दिनरात
दिली परीक्षा प्रीतीची
आज भेटली ती, होऊन
गर्भार सातव्या महिन्याची!

मावळला ध्यास, गळाली आस
गळ्यापाशी कोंडला श्वास
म्हणतील मामा, तिची लेकुरे
भीती मला त्या नात्याची!

क्षण पदोपदी झुरण्याचे
नकळत मागे फिरण्याचे
आता आठवती ते खर्च
आणि उसनवार मित्रांची!

आता काय, शोधू दुसरी
तीही नसेल तर तिसरी
करणार काय, मुळातच
आहे, बागेत गर्दी फुलांची!

- संदीप चांदणे

कविताप्रेमकाव्यविनोदमौजमजाeggsmiss you!अनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगाणेजिलबीनागपुरी तडकाप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितारतीबाच्या कविताभयानकहास्यकरुणशांतरस

गुरू

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
24 Jul 2018 - 7:56 pm

कठिण,गहन,भेदक प्रश्नांचे
चिंतन ज्यांना मोहविते
त्यांच्या प्रतिभेची प्रत्यंचा
इंद्रधनूसही वाकविते

जटिल समस्या त्यांच्या हाती
पडता सरळ,सुलभ होते
विभिन्न अस्फुट पैलूंमधले
नाते अलगद उलगडते

आदिम अनघड पत्थरातही
सुबक शिल्प त्यांना दिसते
केवळ प्रज्ञा-स्पर्शे त्यांच्या
हीणाचे सोने बनते

कवितामाझी कविता