आमची धमाल मसुरी - ऋषिकेश सहल!
आमचा दहा जणांचा गृप. त्यापैकी आठ जण (किरण, दीपक, सचिन, धनंजय, आनंद, केदार, संतोष, आणि मी) एकाच अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंते झाले. अस्मादिक त्या आठपैकी एक. राहिलेले दोन जण (गजानन, संजय) नंतर मित्र झाले. अगदी जवळचे! आजदेखील आमचा हा गृप अभेद्य आणि अखंड आहे. काही "सामायिक सद्गुणांच्या आणि आवडींच्या" भक्कम पायावर ही मैत्री गेली २३ वर्षे टिकून आहे. नुसती टिकलेलीच नाही तर बहरलेलीदेखील आहे आणि चविष्ट लोणच्याप्रमाणे मुरलेलीदेखील आहे. इतकी मुरलेली आहे की कुणी नुसतं "कधी?" असं विचारलं की बाकीच्या सगळ्यांना लगेच अचूक संदर्भ लागतो.