'इमॅजिन' (कल्पना कर...)
(जॉन लेनन यांच्या 'इमॅजिन' या गीताचा स्वैर अनुवाद)
सहज कल्पना कर, स्वर्गच नसेल तर..
नरकही नसेल अन् होईल आकाश घर!
(कल्पना कर, जगेल जग आजचा प्रहर)
न देश, न देशभक्ती मारण्या-मरण्यासाठी
न धर्मही जीवनी या भरण्यासाठी जहर
(कल्पना कर, शांतता पसरेल दूरवर)
भासेल एकले स्वप्न, येतील ज्यात सकल...
अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर!
(कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर)
लोभ, मोह ना अपेक्षा, उपेक्षाही ना कुणाची
निनादेल दाही दिशा विश्वबंधुत्वाचा स्वर!
(कल्पना कर, होईल हे विश्व बलसागर)
भासेल स्वप्न हे माझे, येतील ज्यात इतर...
अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर!
(कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर)
- कुमार जावडेकर
सुरेख
वाह! 'इमॅजिन' कानात रुंजी