नव्या `इतिहासा'ची `नांदी'?

दिनेश५७ जनातलं, मनातलं
हाराष्ट्रासमोर असंख्य समस्या आ वासून उभ्या असताना त्या मुद्‌द्‌यांवर प्रचाराची राळ उठविण्याऐवजी राज ठाकरे यांना "टार्गेट' करून विधानसभा निवडणुका जिंकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न बूमरॅंगसारखा उलटल्याने "युती'ची वाताहात झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पहिला ठोसा लगावून शिवसेनेला घायाळ करणाऱ्या "मनसे'चा "दुसरा ठोसा' विधानसभेच्या निवडणुकीत बसल्याने शिवसेना-भाजप युती जायबंदी झाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत आणि मुख्यालय असलेल्या दादर माहीम मतदारसंघावर "मनसे'चा झेंडा फडकावून, "विधानसभेवर भगवा' फडकावण्याच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाला मनसेच्या इंजिनाने धडक दिली आहे. राज्याची सत्ता तर दूरच, पण येत्या काही वर्षांत होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेवरचा "भगवा' तरी शाबूत राहणार की नाही याची चिंता करण्याची वेळ निवडणुकीच्या ताज्या निकालांनी "युती'वर आणली आहे. दादर-माहीममधून " सुसाट सुटलेले' मनसेचे इंजिन आता महापालिका मुख्यालयाकडे वळणार आणि युतीच्या या सत्तास्थानास धडक देणार, हे स्वच्छ भविष्य आहे. त्यामुळे "युती'ची फेरबांधणी करावी की तिचे अस्तित्व टिकविण्याची धडपड करावी असा पेच युतीच्या, विशेषतःशिवसेनेच्या नेत्यांसमोर उभा राहणार आहे. राज ठाकरे यांच्याविषयी शिवसेनेतील अनेकांच्या मनात आजही असलेली सहानुभूती आता उफाळून आली, तर सेनेसमोर नव्या समस्या उभ्या राहणार आहेत. त्या समस्या ऊग्र होण्याआधी काळाची पावले ओळखली नाहीत तर शिवसेना हा एक राजकीय इतिहास होईल, आणि बालेकिल्ल्याचे काही ढासळलेले बुरूज भविष्यात महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची साक्ष देत राहतील... मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसमोरील मनसेचे आव्हान उघड झाले होते. राज ठाकरे यांनी इन्कार केला तरी मनसेमुळे सेना-भाजप युतीची मोठी पडझड झाली, हे मतांच्या आकडेवारीवरून सिद्ध झालेले आहे. "मनसे'च्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला नसला, तरी युतीच्या पराभवात त्यांचा हातभार होता, हे मनसे आणि युतीमधील मतविभागणीवरून उघडही झाले आहे. या मतविभागणीमुळेच मुंबईत युतीला विधानसभेतदेखील याच आव्हानास सामोरे जावे लागेल, हे स्पष्ट दिसत होते. तरीही सेनेच्या नेतृत्वाला जनमानसाचा अंदाज आला नाही. "मनसे'ला मत देण्याने कॉंग्रेसचा लाभ होतो, हे मतदारांच्या लक्षात आलेले असल्याने लोकसभेत केलेली चूक मतदार पुन्हा करणार नाहीत, अशा भ्रमातून सेना नेतृत्वाने राज ठाकरे आणि "मनसे'वरील टीकेचा एककलमी कार्यक्रम राबविला तेव्हा भाजप मात्र एकमार्गीपणाने प्रचाराचे गाडे महागाईच्या मुद्‌द्‌यावर आणण्याचा अपयशी प्रयत्न करीत होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची गाडी एका रुळावरून धावलीच नाही, आणि मनसेचे इंजिन शिवसेनेची फरफट करीत आहे, असे एक "करमणूकप्रधान' दृश्‍य प्रचाराच्या काळात जनतेला पाहायला मिळाले. शिवसेनेच्या जन्मापासून अगदी कालपर्यंत मुंबई आणि शिवसेना हे एकमेकांचा आधार असल्याचे चित्र होते. छगन भुजबळ, गणेश नाईक, रमेश प्रभू आदी मोहरे बाहेर गेल्यानंतरदेखील बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा हीच शिवसेनेची शक्ती होती. उद्धव ठाकरे यांच्या हातात सेनेची सूत्रे आल्यानंतर नारायण राणे आणि त्यापाठोपाठ राज ठाकरेंनी सेनेला सोडचिठ्ठी देत सेनेसमोर आव्हाने उभी केली. या काळात सेनेची पडझड सुरू झाल्यानंतर मात्र, मुंबई आणि शिवसेनेचे नाते हा एक "इतिहास' झाला. गेल्या पाच वर्षांत राणे आणि राज यांनी शिवसेनेला असंख्य धक्के दिले. आता विधानसभेच्या निवडणुकीतून शिवसेनेच्या शक्तीचा उतरता आलेख आणखी ठळक झाला आहे. "मनसे'मुळे शिवसेनेला मोठा फटका बसला हेच याही वेळचे वास्तव आहे. मुंबईतील वडाळा, भायखळा, मुंबादेवी, मालाड (प.), वर्सोवा, अंधेरी (प.), चांदिवली, धारावी आणि वांद्रे (प.) या नऊ मतदारसंघांत कॉंग्रेस आघाडीने स्वबळावर वर्चस्व सिद्ध केले आहे. यापैकी धारावी, वांद्रे (प.), वर्सोवा आणि मुंबादेवी या चार मतदारसंघांत "मनसे' नसतानाही युतीला कॉंग्रेस आघाडीकडून पराभव पत्करावा लागला, तर मनसे आणि युती अशा लढतीत शिवडी आणि घाटकोपर (प.) या दोन जागा मनसेने युतीकडून काबीज केल्या. शीव कोळीवाडा, कुलाबा, दिंडोशी, कांदिवली (पूर्व), अंधेरी (पूर्व), विलेपार्ले, वरळी, अणुशक्तीनगर आणि कुर्ला या नऊ मतदारसंघांत मनसे आणि युतीच्या मतविभागणीमुळे कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार विजयी झाले. या सर्व मतदारसंघांत मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती. बोरीवली आणि मुलुंडमध्ये मनसेशी थेट टक्कर देऊन युतीमधील भाजपने या जागा जिंकल्या. विशेष म्हणजे, मनसेमुळे फायदा झालेल्या कॉंग्रेस आघाडीसही माहीम, मागठाणे, विक्रोळी आणि भांडुपमध्ये "मनसे'ची धडक बसलीच आहे. या चार जागा मनसेने कॉंग्रेसशी थेट लढत देऊन जिंकल्या आहेत, तर चेंब ूर आणि कालिना या दोन मतदारसंघांत मनसे आणि कॉंग्रेस अशी लढत होऊनदेखील युतीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे मनसेला फटका बसला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, मनसे रिंगणात असूनदेखील वांद्रे (पूर्व), दहिसर, गोरेगाव, जोगेश्‍वरी (पूर्व), चारकोप, घाटकोपर (पू.), आणि मलबार हिल या सात मतदारसंघांत युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या मतदारसंघांत मनसेचा युतीच्या विजयावर परिणाम झालेला नाही. मुंबईतील निकालावरील "मनसे फॅक्‍टर'चा प्रभाव या निकालातून स्पष्ट दिसतो. शिवसेनेच्या पडझडीतून जन्मलेल्या "मनसे'मुळे सेनेच्या सहानुभूतीदारांना "हवा असलेला पर्याय' मिळाला आणि त्यांची मते मनसेकडे वळली, हाच याचा अर्थ आहे. शिवसेनेची एक भक्कम "मतपेढी' आता फुटली आहे, हे स्पष्ट झाले आहे. मनसेला तरुण मतदारांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचे दिसते. त्याबरोबरच, मुंबईत "मनसे'ला सहा जागांवर मिळालेल्या विजयास शिवसेनेच्या जुन्या मतदारांचाही हातभार आहे, हेही स्पष्ट आहे. वाढती ताकद घेऊन नव्या रिंगणात उतरण्याची तयारी करणाऱ्या "मनसे'मुळे प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेची ताकद क्षीण होत गेल्याचे मनसेच्या स्थापनेनंतरच्या दोनच निवडणुकांत उघड झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या भक्कम निकालांमुळे मनसेचे मनोबल वाढले आहे. आता त्यांच्या तंबूत मुंबई महापालिकेसाठी "तिसऱ्या लढाई'ची तयारी सुरू झाली आहे. "दोन ठोशां'मुळे क्षीण झालेली शिवसेना तिसऱ्या निवडणुकीतील मनसेचे आव्हान कसे पेलणार, यावर "भविष्य' आणि "इतिहास' यांतील संघर्षाचा फैसला अवलंबून राहणार आहे (सकाळ, शनिवार, २४ ऑक्टो. ०९)
वर्गीकरण

12 टिप्पण्या 2,795 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

अक्षय पुर्णपात्रे नवीन

श्री दिनेश, विश्लेषण आवडले. मूख्य म्हणजे उगीच काहीतरी कथानक गुंफून भरकटवलेले नाही. काही काही पत्रकारांना विश्लेषणात्मक लिहितांना ललितलेखनाचा मोह आवरत नाही. चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद.

चिरोटा नवीन

लेख. मनसेमुळे केवळ सेनाच नाही तर सर्वच राजकिय पक्षांना भविष्यात आपली भूमिका बदलावी लागेल.मनसेचा विजय नवा ईतिहासाची नांदी आहे की नाही हे येणारा काळच सांगेल्.माझ्यामते मनसेने out of the box /क्रांतिकारी विचार मांडलेला नाही.(अर्थात तशी अपेक्षाही नाही).धर्म्/जात/हिंसा/ईतिहास बाजुला ठेवून प्रामाणिकपणे भूमिपुत्रांसाठी लढणारी संघटना ही प्रतिमा मनसेने टिकवून ठेवली आणि तसे प्रयत्न केले तर निश्चितच त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. राजकारणाचा भाग म्हणून ईतर राजकिय पक्ष विशेषकरुन सत्ताधारी मनसेला बदनाम करु पाहतील.केवळ राज्यातच नाही तर राष्ट्रीय स्तरावरही प्रतिमा कशी उंचावेल ह्याचा सेना/मनसे नेत्यांनी विचार केला पाहिजे.राज ठाकरे ह्यांनाही मनसे म्हणजे फक्त राज ठाकरे हे समीकरण बदलावे लागेल. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

प्रदीप नवीन

दिनेश ह्यांनी घेतलेला आढावा आवडला. 'शिवसेना तिसऱ्या निवडणुकीतील मनसेचे आव्हान कसे पेलणार, यावर "भविष्य' आणि "इतिहास' यांतील संघर्षाचा फैसला अवलंबून राहणार आहे' ह्याविषयी मात्र थोडे दुमत आहे. शिवसेनेस आता स्वतःचे सामर्थ्य राहिलेले नाही. तिचे पुढे काय होईल, हे मला वाटते, राज पुढे कितपत खरोखरीच जनताभिमुख कार्य करू शकतील ह्यावर अवलंबून आहे. खरे तर मनसेबद्दल आता जो उत्साह, जो विश्वास मुंबईतील उरल्यासुरल्या मराठी जनतेस निर्माण झालेला आहे, तो वृद्धिंगत करण्याची, कमीतकमी टिकवून धरण्याची, मनसेवर मोठी जबाबदारी आहे. इथून पुढे राज व मनसेची खरी कसोटी आहे. शिवसेना उभी राहिल का, इत्यादि प्रश्न त्यामानाने गौण आहेत. सध्यातरी त्यांचे चित्र पहाता त्यांच्या नेतृत्वात काही मॅच्युरिटी आहे असे दिसत नाही. ह्याचे कारण तळागाळात काम करून आलेले हे नेतृत्व नाही, हे असावे? ह्याउलट लोकसभेच्या निवडणूकांत झालेल्या पराभवावर माकपने संयत आत्मपरिक्षण करून, जबाबदारी स्वीकारून कार्य पुढे सुरू ठेवले आहे. कुण्या एखाद्या व्यक्तिस, व्यक्तिसमूहास नुसता आपला (आपल्या परिने 'जाज्वल्य' वगैरे) इतिहासच दाखवत रहावयाची पाळी येते तेव्हा ती व्यक्ति, तो समूह संपलेला आहे, असे समजावे. राजकिय पक्षांना नुसताच इतिहास असून काय उपयोग? तुम्ही आता काय करता आहात, व ह्यापुढे काय करणार आहात, हे महत्वाचे. राज ह्यांनीही आता फारसे भावनाविवश न होता, आपला पुढील कार्यक्रम आखणे व त्यानुसार स्वतःची व पक्षाची वाटचाल सुरू करणे हे जरूरी आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by प्रदीप

लेख चांगला लिहीला आणि मांडला आहे. प्रदीप यांचा प्रतिसादही आवडला. राज ठाकरे काय करतात यावर मनसेचं भवितव्य अवलंबून आहे हेही मान्य! अदिती

विकास नवीन

In reply to by प्रदीप

चांगला आढावा आहे. प्रदीप यांचे उत्तर पण आवडले. केवळ निवडणूकांमधील एका काळात झालेल्या निकालांवरून नवा इतिहास घडतो आहे की पुढल्या काळासाठी हे इतिहासातील केवळ एक पान ठरत आहे, हे अजून माहीती होण्यास वेळ आहे. कुण्या एखाद्या व्यक्तिस, व्यक्तिसमूहास नुसता आपला (आपल्या परिने 'जाज्वल्य' वगैरे) इतिहासच दाखवत रहावयाची पाळी येते तेव्हा ती व्यक्ति, तो समूह संपलेला आहे, असे समजावे. सहमत. चांगले वाक्य. "सांगे वडीलांची किर्ती..." सारखाच मुद्दा आहे. यावरून सावरकरांचे या अर्थाचे वाक्य आठवले की आम्ही इतिहास नुसता वाचत बसण्याऐवजी घडवत आहोत... राज ह्यांनीही आता फारसे भावनाविवश न होता, आपला पुढील कार्यक्रम आखणे व त्यानुसार स्वतःची व पक्षाची वाटचाल सुरू करणे हे जरूरी आहे. ते काम एका रात्रीत घडणारे नाही. त्याला पेशंन्स लागतो. तसेच खरेच इतिहास घडवायचा असेल तर व्यक्तिगत महत्वाकांक्षेच्या (ती असण्यात काही चूक नाही पण तिच्या) पुढेही जाउन तळमळ आणि सामाजीक/राष्ट्रीय विचार करणारे नेतृत्व आत्ता हवे आहे. राज तसे नेतृत्व देऊ शकणार आहेत का, यावर केवळ त्यांचेच नाही तर त्यांच्याकडे नव्या दमाचे नेतृत्व म्हणून पहाणार्‍या आशावादी आणि निराशावादींचे भवितव्य अवलंबून आहे. ते जर त्यांच्याकडून दिसले नाही तर मग काय परत आहेच, "उडदा माजी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचलिया वृक्षांची फळे, मधुर काय असतील" :-(

प्रकाश घाटपांडे नवीन

In reply to by प्रदीप

कुण्या एखाद्या व्यक्तिस, व्यक्तिसमूहास नुसता आपला (आपल्या परिने 'जाज्वल्य' वगैरे) इतिहासच दाखवत रहावयाची पाळी येते तेव्हा ती व्यक्ति, तो समूह संपलेला आहे, असे समजावे. राजकिय पक्षांना नुसताच इतिहास असून काय उपयोग? तुम्ही आता काय करता आहात, व ह्यापुढे काय करणार आहात, हे महत्वाचे.
+१ प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विसोबा खेचर नवीन

दिनेशराव, उत्तम लेखाजोखा घेतला आहे! तूर्तास तरी भाजपा आणि सेना या दोन संघटना प्रभावी नेत्याच्या अभावी मार खात आहेत असे दिसते.. मनसेवरची जबाबदारी वाढली आहे हे निश्चित, आणि मनसे ती कशी आणि कितपत निभावते यावर मनसेची पुढील वाटचाल अवलंबून आहे. राजच्या प्रभावी भाषणांमुळे, मराठीच्या मुद्द्यांमुळे तूर्तास तरी मनसे जबरदस्त फॉर्मात आहे. येती मुंबै महापालिका मनसेच्या ताब्यात जाण्याची बरीचशी शक्यता दिसते.. जय मनसे! तात्या.

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by विसोबा खेचर

तूर्तास तरी भाजपा आणि सेना या दोन संघटना प्रभावी नेत्याच्या अभावी मार खात आहेत असे दिसते.. मनसेवरची जबाबदारी वाढली आहे हे निश्चित, आणि मनसे ती कशी आणि कितपत निभावते यावर मनसेची पुढील वाटचाल अवलंबून आहे. सहमत. राजच्या प्रभावी भाषणांमुळे, मराठीच्या मुद्द्यांमुळे तूर्तास तरी मनसे जबरदस्त फॉर्मात आहे. येती मुंबै महापालिका मनसेच्या ताब्यात जाण्याची बरीचशी शक्यता दिसते.. असहमत. मुंबई महानगरपालिका आघाडीच्याच ताब्यात जाण्याची शक्यता जास्त दिसत आहे. बघू काय होते ते. तशी जर ती गेली आघाडीच्या ताब्यात तर मुंबई महानगरपालिकेचा कारभार हिंदीत सुरु होईल ही शक्यता दुसरी. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

कपिल काळे नवीन

सकाळ मध्ये लिहिणारे दिनेश गुणे तुम्हीच का? कारण हाच लेख दिनेश गुणेंच्या नावाने प्रिंट सकाळमध्ये आला आहे. शनि/ रवि. अंकात नसल्यास हा लेख इथून उडवावा.

दिनेश५७ नवीन

In reply to by कपिल काळे

हा लेख `सकाळ'च्या २४ ऒक्टोबर २००९ च्या अंकात संपादकीय पानावर मुंबई वार्तापत्र या सदरात अगोदर प्रसिद्ध झाला आहे. वृत्तपत्रात वा प्रिंट माध्यमात आधी प्रसिद्ध झालेले लेख `मिपा'च्या वाचकांसाठी देण्यात काही गैर असावे, असे मला वाटत नाही. उलट, त्यामुळे मिपावरही एखाद्या विषयावर व्यापक वैचारिक देवाणघेवाण होऊ शकते. असे लेख `उडवून' ही प्रक्रिया थांबवू नये, असे माझे मत आहे. लेख उडविण्याच्या सूचनेतील `तत्परते'वर काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नसल्यामुळे, `नो कॊमेंट'!

अमोल केळकर नवीन

माझ्या मते ही तर नव्या 'भविष्या 'ची 'नांदी 'आहे ! -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा